पुणे: देशभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उभारण्यात आलेल्या तंबाखू सेसेशन सेंटर (टीसीसी) अर्थात तंबाखू व्यसनमुक्ती केंद्रांचे उद्घाटन करून आज राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत तंबाखूमुक्त युवा अभियानातील दुसरा महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या या उपक्रमाअंतर्गत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज थेट प्रक्षेपणाद्वारे या केंद्रांचे उद्घाटन केले पिंपरी येथील डॉ.डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातही हे केंद्र उभारण्यात आले आहे. तंबाखूचे व्यसन सोडू इच्छिणाऱ्या लोकांना यातून बाहेर काढण्यासाठी मानसिक, वैद्यकीय व आवश्यक ते सर्व साह्य प्रदान करणे हा या केंद्रांचा उद्देश आहे.
राष्ट्रव्यापी उद्घाटनाच्या अनुषंगाने मंगळवारी (ता.२४) डॉ.डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील केंद्राचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. संस्थेतील सामुदायिक औषध विभाग आणि मानसोपचार विभागाच्या समन्वयाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या उदात्त उपक्रमाचा भाग असल्याचा संस्थेला अभिमान वाटतो.
डॉ डी वाय पाटील दंतचिकित्सा महाविद्यालयांमध्ये २०१८ मध्ये तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र सुरू करून या उपक्रमाची पायाभरणी करण्यात आली होती. आता वैद्यकीय संस्थांचा समावेश करून सार्वजनिक आरोग्य आणि तंबाखू नियंत्रणासाठी सरकारच्या वचनबद्धतेला बळकटी देण्यात येत आहे. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ही केंद्रे तंबाखू चे व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आवश्यक गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा प्रदान करण्याबरोबर डॉक्टरांचे मार्गदर्शन, समुपदेशन या सेवा दिल्या जात आहे.
डॉ.डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्राने नेहमीच निरोगी आरोग्याबरोबर सामाजिक जबाबदारीचे भान बाळगत, समाजाचे ऋण फेडण्यास प्राधान्य दिले आहे, अशी भावना डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठाचे विश्वस्त डॉ. यशराज पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले, “आमच्या संस्थेत आम्ही नेहमीच सामाजिक जबाबदारीवर विश्वास ठेवला आहे. नॅशनल टोबॅको सेसेशन सेंटर उपक्रमात आम्ही सक्रिय सहभाग घेऊन तंबाखूमुक्तीबरोबर समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी आम्ही सुलभ आरोग्य सेवा देत जनसामान्यात जागरुकता कार्यक्रम राबविण्यासाठी वचनबद्ध आहोत. हा उपक्रम तंबाखूमुक्त भविष्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे आणि त्याचा एक भाग असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.”
डॉ डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे.एस. भवाळकर म्हणाले, “आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा हा उपक्रम समाजसेवा आणि सार्वजनिक आरोग्याला चालना देण्याच्या आमच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तंबाखूमुक्ती केंद्रे स्थापन केल्याने या व्यसनाच्या आहारी गेलेल्या व अनावधानाने व्यसनाच्या विळख्यात सापडलेल्या रुग्णांना याचा फायदा होईल. तंबाखूच्या व्यसनावर मात करण्यासाठी आवश्यक त्यासर्व सेवा देण्याची आम्ही कटिबद्ध आहोत.
सामुदायिक औषध विभागाच्या प्रमुख डॉ. हेतल राठोड म्हणाल्या, “तंबाखू सेसेशन सेंटर केवळ व्यावसायिक सहाय्यच प्रदान करणार नाही, तर लोकांना योग्य मार्गदर्शन करून तंबाखू सोडण्यासाठी सक्षम करेल. या परिवर्तनीय उपक्रमाचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे.”
सामुदायिक औषध विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. कविता विश्वकर्मा म्हणाल्या, “डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील या केंद्राच्या माध्यमातून तंबाखूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी लोकांना मदत करण्यात सक्रिय भूमिका बजावण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. येथे येणाऱ्या व्यक्तींना-मग ते रुग्ण असोत की त्यांना भेटायला येणारे नातेवाईक, मित्र कोणीही असो, त्यांना मार्गदर्शन करणे, प्रत्येक पायरीवर योग्य माहिती देणे हे आमचे ध्येय आहे. आमचा हा उपक्रम तंबाखूमुळे होणाऱ्या गंभीर आजारांना आळा घालण्याच्या राष्ट्रीय अभियानाशी सुसंगत आहे. आम्हाला विश्वास आहे की योग्य सुविधा, समुपदेशन सेवा आणि उपचारपश्चात्त देखभाल प्रदान करून, आम्ही तंबाखूच्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो. आमचे ध्येय केवळ रूग्णांवर उपचार करणे नाही तर त्यांना निरोगी जीवनशैली निवडण्यासाठी शिक्षित आणि सक्षम करणे हे आहे.”
तंबाखूच्या व्यसनावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तंबाखू निरसन केंद्रांची स्थापना हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरतो आहे, असे डॉ. सुप्रकाश चौधरी, प्राध्यापक आणि विभागप्रमुख, मानसोपचार विभाग, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, पिंपरी यांनी स्पष्ट केले. तंबाखूचे व्यसन शारीरिक आणि मानसिक आव्हान असल्याचे सांगून डॉ. चौधरी यांनी या केंद्रांमध्ये पुराव्यावर आधारित उपचार आणि वैयक्तिक सल्लामसलत दिली जाणार असल्याचे सांगितले, ज्यात तंबाखू सोडण्याच्या मानसिक व भावनिक पैलूंवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. “आम्ही तंबाखूपासून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या लोकांना सातत्यपूर्ण आधार प्रदान करून त्यांचे आरोग्य आणि कल्याण पुन्हा मिळवून देण्यास कटिबद्ध आहोत,” असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमाचा उद्देश समाज जागृती मोहिमा आणि शैक्षणिक उपक्रमांद्वारे तरुणांमध्ये तंबाखूच्या व्यसनाबद्दल जनजागृती करणे आहे.
या उपक्रमाचे उद्दिष्ट जागृती मोहिमेद्वारे आणि शैक्षणिक उपक्रमांद्वारे समुदायांपर्यंत पोहोचणे हे आहे. विशेषत: तरुणांना पहिल्यापासूनच तंबाखूपासून दूर राहण्यासाठी जागरुक करणे हे ध्येय आहे. सरकारने सोशल मीडिया एन्फ्ल्यूएन्सरनादेखील या अभियानाचा भाग होणे अनिवार्य केले असून, युवकांमध्ये जागरूकता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.