पुणे – भारत हे अखंड राष्ट्र कधीच नव्हते. इथे 700 राज्ये होती. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा महात्मा गांधीजींनी भारत हे अखंड राष्ट्र निर्माणाची प्रक्रिया सुरू केली. हे सर्व समावेशक राष्ट्र असावे ही त्यांची पक्की धारणा होती. इथे सर्वांनी रहावे, तुमच्या जाती धर्मानुसार जे करायचे ते उंबरठ्याच्या आत, बाहेर सर्वजण एकच आहेत, हा त्यांचा राष्ट्रवादाचा सिध्दांत होता. पण त्याची उजळणी आजच्या मतांच्या राजकारणात काँग्रेसने केली तरच सत्तेत येईल, असे परखड मत महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष ज्येष्ठ गांधीवादी डाॅ. कुमार सप्तर्षी यांनी आज म. गांधी विचार धारा प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमाटीच्यावतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित केलेल्य “म. मांधीच्या जीवनावर आधारित विचार धारा” या छायाचित्र प्रदर्शनाच्या उदघाटन डाॅ सप्तर्षी यांच्या हस्ते सारसबागे जवळच्या बाळासाहेब ठाकरे कलादालनात झाले. माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे,माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर,आमदार रवींद्र धंगेकर,शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, संजय बालगुडे, महिला काॅग्रेसच्या अध्यक्षा पूजा आनंद, प्रदर्शनाचे मुख्य आयोजक अभय छाजेड व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाला कमल व्यवहारे, अविनाश बागवे, अजित दरेकर, मुख्तार शेख आदी काँग्रेसचे आजीमाजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
डाॅ. सप्तर्षी म्हणाले, गांधीच्या भोवती अनेक राज्यातील विविध विचारांचे, जातींचे नेते असायचे. ते मतभिन्नता असेल तर गांधीजींशी भांडायचे. हे भांडण कुठपर्यंत तर, गांधीजी निर्णय घेत नाहीत तोपर्यंत. त्यांनी एकदा का निर्णय घेतला की सर्वजण तो मान्य करायचे. त्यानंतर सगळेच त्या निर्णयानुसार कृती करायचे. आज त्या उलट चाललं आहे. जाती धर्माच्या नावाने वेगवेगळी डिपार्टमेन्ट केली आहेत. आपल्याला गांधीचा राष्ट्रवाद रूजवावा लागेल. तेव्हाच मतांच्या राजकारणात काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल.अरविंद शिंदे म्हणाले, गांधीजींनी प्रत्येक संदेश आपल्या कृतीतून दिला आहे हेच सध्या आपण लक्षात घेऊन त्यावर चिंतन करणे आवश्यक आहे. आपणच काँग्रेसजनांनी गांधीजींचे विचार समाजासमोर पुन्हा मांडले पाहिजेत.अभय छाजेड म्हणाले, जगात आज अनेक युद्ध सुरू आहेत. त्यात भरच पडत असताना गांधीजींचा अहिंसेचा संदेश जगासाठी महत्वाचा ठरतो. त्यामुळेच गांधीजींचे विचार नव्या पिढीसमोर मांडण्याचा, त्यांना गांधी समजावून सांगण्याचा प्रयत्न म्हणजे हे प्रदर्शन आहे.
संजय बालगुडे यांनीही मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन पूजा आनंद यांनी केले.
या प्रदर्शनात महात्मा गांधीजींच्या जीवनातील विविध प्रसंगांची सुमारे 100 पेक्षा जास्त छायाचित्रे मांडण्यात आली आहेत. सारसबागे जवळच्या बाळासाहेब ठाकरे कलादालनात हे प्रदर्शन 2 ऑक्टोबर पर्यंत दिवसभर विनामूल्य सर्वांसाठी खुले रहाणार आहे.