: कैलास कोद्रे, तुकाराम गुजर यांना पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशनचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान ; पुणे नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि. (महाराष्ट्र) च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : महाराष्ट्राच्या सहकाराचा गौरव देशात केला जातो. सहकार हा महाराष्ट्राचा प्राण आहे. राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही सहकाराशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे सहकार वाढून तो समृद्धीकडे जायला हवा. यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया, देशाचा सहकार आणि राज्य यांच्यातील समन्वय साधण्याचे काम सरकारच्या माध्यमातून यापुढील काळात केले जाईल, अशी ग्वाही सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
सहकार व बँकिंग क्षेत्रात बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. (महाराष्ट्र) तर्फे सन २०२२-२३ वर्षासाठी पुणे कँन्टोमेंट बँकेचे अध्यक्ष कैलास कोद्रे आणि सन २०२३-२४ वर्षासाठी प्रेरणा सहकारी बँक थेरगावचे संस्थापक संचालक तुकाराम उर्फ भाऊसाहेब गुजर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्र सरकारमध्ये सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचाही यावेळी विशेष सन्मान झाला. शिवदर्शन येथील राजीव गांधी अॅकॅडमी आॅफ ई-लर्निंग स्कूल साहित्य सम्राट तेंडुलकर सभागृह येथे हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे, तर रिझर्व बँक ऑफ इंडियाचे संचालक सतिश मराठे, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सह. प्रबंधन संस्थानच्या निदेशक डॉ.हेमा यादव आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबईचे प्रशासक विद्याधर अनास्कर,असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.सुभाष मोहिते, उपाध्यक्ष अॅड.साहेबराव टकले, सुनिल रुकारी, निलेश ढमढेरे, डॉ. प्रिया महिंद्रे, बाळकृष्ण उंद्रे, मंगला भोजने मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेळके उपस्थित होते.
ज्या बँकांनी शून्य टक्के एन.पी.ए. राखला, त्या बँकांचा गौरव कार्यक्रमात करण्यात आला. असोसिएशनने आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये ज्या बँकांनी जास्तीत जास्त सहभाग घेतला, त्या बँकांना देखील यावेळी सन्मानित करण्यात आले. सी.ए. मिलिंद काळे यांची नॅफकॅबचे उपाध्यक्ष पदी , डॉ अनिल कारंजकर यांची पुणे विद्यापीठाच्या विखे पाटील अध्यासनाचे प्रमुख म्हणून नेमणूक झाल्याबद्दल तर प्रसाद पाटील केंद्रीय सहकार निबंधक कार्यालयात सल्लागार म्हणून नियुक्ती झाल्यानबद्दल विशेष सन्मान यावेळी झाला.
प्रवीण दरेकर म्हणाले, महाराष्ट्राला सहकाराचा मोठा वारसा आहे. परंतु सहकारी बँकेच्या अनेक गोष्टी रिझर्व बँक ऑफ इंडियापाशी येऊन थांबतात. रिझर्व बँक ऑफ इंडिया समजून घेत नाही तोपर्यंत अडचणी सुटणार नाहीत. महाराष्ट्रात सहकाराचे जाळे आहे. छोट्या बँकांची गरज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात आहे. त्यामुळे या बँकांना अडचणीत असतानाच मदत करा. सहकारी बँकांना ताकद देण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अनिल कवडे म्हणाले, देशातील नागरी सहकारी बँकेच्या एक तृतीयांश बँका या महाराष्ट्रात आहेत. सहकारी तत्त्वांवर बँक उभ्या करताना ज्ञान मिळवून त्या ज्ञानाचा योग्य वापर केला पाहिजे. सहकारी बँकांमध्ये काम करताना आपण सर्वज्ञ नाहीत बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. केवळ प्रशिक्षण देऊन उपयोग नाही तर ग्रहण करण्याची इच्छाशक्ती देखील पाहिजे.
अॅड. सुभाष मोहिते म्हणाले, नागरी सहकारी बँकांच्या अडचणी मांडणे आणि त्या कमी करण्याचे प्रयत्न पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने सातत्याने केले जाते. सहकारी बँकांसाठी सरकार सकारात्मक असते परंतु आरबीआयचे धोरण बघता ते नकारात्मक आहेत का असे वाटते. सहकारी बॅंकाना समजून घेण्याची आणि त्यांना सहकार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.