Home Blog Page 583

युवा कलाकारांच्या मुकुल कला महोत्सवाला चांगला प्रतिसाद!

कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट कडून यशस्वी आयोजन

पुणे :कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अरुंधती पटवर्धन यांच्या वतीने युवा कलाकारांसाठी आयोजित ‘मुकुल कला महोत्सवाला आज चांगला प्रतिसाद मिळाला.

हा कला महोत्सव 14 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता बाल शिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी (कोथरूड) येथे उत्साहात पार पडला.

कला महोत्सवाच्या प्रसंगी ज्येष्ठ नृत्य गुरू डॉ. सुचेता भिडे- चापेकर व ज्येष्ठ हार्मोनियम वादक, भारती विद्यापीठ स्कुल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स चे प्रमुख शारंगधर साठे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .

कृष्णा साळुंके यांच्या शिष्यांचे पखवाज वादन, सुप्रसिद्ध तबला वादक अजिंक्य जोशी आणि गायिका गायत्री जोशी यांची कन्या आणि शिष्या आरुषी जोशी चे गायन, कथक नृत्यांगना पायल गोखले यांची कन्या आणि शिष्या रिया गोखले चे कथक नृत्य,
डॉ. देविका बोरठाकूर यांच्या शिष्यांचे सत्रीय नृत्य आणि
श्रीमती अनुजा बाठे यांच्या शिष्यांचे भरतनाट्यम् नृत्य सादर झाले. पारंपारिक रचनाच्या या जोशपूर्ण सादरीकरणाला उपस्थितानी भरभरून दाद दिली.सत्रिय ही आसाम मधील बहारदार नृत्यशैली देखील रसिकांची दाद मिळवून गेली.

हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य होता. गौरी स्वकुळ यांनी सूत्रसंचालन केले.

उद्घाटन कार्यक्रमात बोलताना शारंगधर साठे म्हणाले,’ युवा कलाकारांना, युवा मनांना व्यासपीठ देण्याचा हा सातत्यपूर्ण उपक्रम महत्वपूर्ण आहे.लहान वयापासून हे सर्व सहभागी युवा कलाकार भारतीय शास्त्रीय नृत्य कला शिकत आहेत,भारतीय कलांसाठी हे आश्वासक चित्र आहे.अशा व्यासपीठांना भारती विद्यापीठ बळ देण्याचे काम करेल ‘.

आम्ही शिवाजी महाराजांच्या बाजूने लढणाऱ्या मुस्लीम सैनिकांचे वंशज आहोत, औरंगजेबची औलाद नाही,हे लक्षात ठेवा

पुणे:’मराठी मुस्लीम सेवा संघाने महाविकास आघाडीला दिलेल्या पाठिंब्यावरून भाजपाचे किरीट सोमय्या, रवीशंकर प्रसाद जो व्होट जिहादचा प्रचार करीत आहेत,तो दुष्प्रप्रचार आहे,असा आरोप करीत ज्यांचे विचार पटतील,त्या पक्षाला-उमेदवाराला मतदान करण्याचा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे’, असे सडेतोड उत्तर मराठी मुस्लीम सेवा संघातर्फे पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आले.

मराठी मुस्लीम सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इब्राहिम खान, राज्य सहसचिव अब्दुल जब्बार शेख,पुणे शहराध्यक्ष जावेद शेख,सिकंदर मुलाणी, अस्लम बागवान आदी उपस्थित होते.१५ नोव्हेंबर रोजी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे ही पत्रकार परिषद झाली.

इब्राहिम खान म्हणाले,’मागील निवडणुकीत ‘सब का साथ, सबका विकास’ ऐकून भाजपाला पाठिंबा दिला तेव्हा तो व्होट जिहाद नव्हता का ? या विषयावर जाहीर चर्चा करण्याची आमची तयारी आहे.मुस्लीमांच्या आत्मसन्मानाशी खेळण्याचे काम भाजपने केले.

सोमय्या यांनी मुख्तार अब्बास नक्वी,माधव भांडारी, डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांच्याकडून २०१४ च्या निवडणुकीत आम्ही दिलेल्या पाठिंब्याबाबत माहिती घ्यावी. भाजपाने बटेंगे, कटेंगे सारख्या घोषणा देऊन ध्रुवीकरणाचे प्रयत्न करू नये.

मराठी मुस्लीम सेवा संघ आत्मसन्मान, संविधान अधिकार, रोजगार, प्रादेशिक अस्मिता या मुद्यावर काम करते. आमच्या प्रगतीसाठी महाविकास आघाडीला मतदान करणार आहे. भाजपाला हरविण्यास जे सक्षम आहेत, त्यांना मतदान करणार आहे.

सिकंदर मुलाणी म्हणाले,’मुस्लीम हे राक्षस, देशद्रोही असल्याचे चित्र रंगविण्याचे प्रयत्न होत आहेत. आम्ही शिवाजी महाराजांच्या बाजूने लढणाऱ्या मुस्लीम सैनिकांचे वंशज आहोत, औरंगजेबची औलाद नाही,हे लक्षात ठेवावे’.

खडकवासालामध्ये 68 मतदारांनी केले गृहमतदान

पुणे: खडकवासाला विधानसभा मतदारसंघांतर्गत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार अशा एकूण ७० मतदारांनी फॉर्म क्रमांक १२ डी भरून गृहमतदानासाठी नोंदणी केली होती. त्यांपैकी ६८ मतदारांनी गृह मतदान केले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ यशवंत माने यांनी दिली. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी गृह मतदानाची सुविधा भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.त्याअनुषंगाने ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे डॉ. माने यांनी सांगितले.
विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मतदानाची प्रक्रिया करण्यात आली. टपाली मतदान कक्षाचे समन्वय अधिकारी दिपगौरी जोशी आणि किशोरी शिंदे यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या विशेष पथकाद्वारे ही प्रक्रिया पार पडली. या पथकामध्ये मतदान अधिकारी १, मतदान अधिकारी २, सूक्ष्म निरीक्षक, पोलीस कर्मचारी व व्हिडीओग्राफर यांचा समावेश होता. टपाली मतदान कक्षाचे प्रशासन कर्मचारी लौकिक दाभाडे यांनी या पथकासोबत समन्वय ठेवून गृह मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.या प्रक्रियेसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री.किरण सुरवसे तसेच सचिन आखाडे, अंकुश गुरव आणि साहीर सय्यद यांचे सहकार्य मिळाले

राहुल गांधींच्या उद्या चिमूर व धामणगाव रेल्वे येथे सभा तर प्रियंका गांधींच्या शिर्डी व कोल्हापुरात सभा, १७ तारखेला प्रियंका गांधी गडचिरोली व नागपूरात.

मुंबई, दि. १५ नोव्हेंबर २०२४
काँग्रेस अनुसूचित जाती व अनुसुचित जमातींचे आरक्षण संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत खोटा व जनतेची दिशाभूल करणारा आहे. काँग्रेस पक्षानेच देशाला संविधान व आरक्षण देऊन मागास जातींना हक्क व अधिकार दिले व वर्षानुवर्षे मनुवाद्यांनी केलेल्या अत्याचारातून त्यांची सुटका केली. आरक्षण व संविधान संपवण्याचे प्रयत्न तर नरेंद्र मोदींचा भारतीय जनता पक्षच करत आहे, असे सडेतोड उत्तर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिले आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी दलित, आदिवासी, ओबीसी समाजाला सामाजिक न्याय मिळावा यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटरची पदयात्रा काढली व जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. जातनिहाय जनगणनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे हे त्यांनी स्पष्ट करावे. जातनिहाय जनगणनेला भाजपाचा विरोध आहे, त्यामुळेच पंतप्रधान मोदी आरक्षण संपवण्याचा खोटा आरोप काँग्रेस पक्षावर करत आहेत. काँग्रेस पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खोट्या आरोपाचा तीव्र निषेधही करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांना महाराष्ट्रातील जनतेचा प्रतिसाद मिळत नाही. मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या सभेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. जनता मोदींच्या खोट्या बोलण्यास कंटाळली आहे. नरेंद्र मोदी रिकाम्या खुर्च्यांना संबोधित करत होते. याउलट लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रचार सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उद्या दिनांक १६ नोव्हेंबर रोजी चिमूर व धामणगाव रेल्वे येथे जाहीर प्रचार सभा होत आहेत तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या उद्या शिर्डी व कोल्हापुरात जाहीर सभा तसेच १७ तारखेला गडचिरोली व नागपूरमध्ये प्रचारसभा होतील, असे रमेश चेन्नीथला यांनी सांगितले आहे.

भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा व कापसाला योग्य भाव देण्याचे आश्वासन पाळले नाही. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर सोयाबीनला ७००० रुपये प्रति क्विंटल भाव देऊ असेही रमेश चेन्नीथला यांनी जाहिर केले.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत डाव्या विचार सरणीचे लोक होते या देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, भारत जोडो यात्रा हे एक मोठे जनआंदोलन होते. यात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते. या यात्रेतून राहुल गांधी यांनी देशातील गरीब, आदिवासी, दलित, वंचित, शेतकरी, महिला, तरुण वर्गांच्या समस्या व वेदना जाणून घेतल्या. भारत जोडो यात्रेला जनतेचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला त्यामुळे भाजपा धास्ती बसली आहे त्यातून असे खोटे आरोप केले आहेत असेही रमेश चेन्नीथला म्हणाले.

या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, सरचिटणीस ब्रीज दत्त, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचे मीडिया प्रभारी सुरेंद्र राजपूत आदी उपस्थित होते.

पुणे कॅन्टोंमेंटमध्ये टपाली मतदानाला सुरुवात

पुणे, दि. १५: मतदान कर्तव्यावरील तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात टपाली मतदानाला सुरुवात झाली असून टपाली मतदानाची प्रक्रिया १९ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी कळविली आहे.

येत्या बुधवारी २० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. यासाठी अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांना मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्तव्यावर हजर असल्यामुळे मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागू नये यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कॅन्टोंमेंट विधानसभा (अ.जा.) मतदारसंघाचे निवडणूक कार्यालय भारतरत्न सर विश्वेश्वरय्या हॉल, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र ५, ३ रा मजला, अर्सेनल प्लॉट, हॉटेल सागर प्लाझा समोर, कॅम्प, पुणे या ठिकाणी स्वतंत्र टपाली मतदान कक्षाची स्थापना करण्यात आली असून निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी १९ नोव्हेंबर पर्यंत आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सिध्दार्थ भंडारे यांनी केले आहे.

विविध समाजांच्या संघटनांचा सिद्धार्थ शिरोळे यांनी पूर्ण पाठींबा

पुणे, दि. १५ नोव्हेंबर, २०२४ : छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातील विविध समाज संघटना यांची या विधानसभा निवडणुकीत सिद्धार्थ शिरोळे यांना खंबीर साथ मिळत आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्र जोशी समाज संघटना, भारतीय अल्पसंख्यांक संघटना, अखिल भारतीय मराठा महासंघ, हातगाडीवाले, फेरीवाले, पथारीवाले, सायकल, स्टॉलधारक यांची जाणीव संघटना प्रणीत, डेक्कन परिसर नागरी व्यापारी संघटना, महाराष्ट्र आदिवासी जनआंदोलन, महाराष्ट्र भटक्या व विमुक्त जाती संघ, स्वराज्य सेना, अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ या संघटनांच्या प्रतिनिधींनी शिरोळे यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे.

यावेळी शिरोळे यांनी सर्वांसाठी मागील पाच वर्षांत केलेल्या कामांचे कौतुक संघटनांच्या प्रतिनिधींनी केले. जोशी समाज हा भटका विमुक्त समजामध्ये मोडला जातो. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र अधिवेशनामध्ये महाराष्ट्र जोशी समाज संघटनेच्या वतीने समाज बांधवांचे ५० हजार मोफत जातीचे दाखले करून देण्याचा मानस करण्यात आला होता. पण अनेक तांत्रिक अडचणींमुळे ते काम पूर्ण होत नव्हते. यावेळेस शिरोळे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांकडे केलेल्या पाठपुराव्याने बैठक पार पडली यावेळी सदर प्रश्न मार्गी लावण्यात आला असल्याचे जोशी समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष निलेश प्रकाशशेठ निकम यांनी सांगितले.

भारतीय अल्पसंख्यांक संघटनेच्या वतीने महायुती प्रणीत उमेदवारांना पाठींबा देत असून त्यांच्या विजयासाठी आम्हीही प्रयत्न करू असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ताहेर आसी म्हणाले. महायुतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी निवड झालेले मात्र आरक्षण रद्द झाल्याने नियुक्तीपासून वंचित राहिलेल्या मराठा विद्यार्थ्यांची सरकारच्या विविध खात्यात भरती करून घेण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. यासोबतच महायुतीने आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, सारथी संस्था यांद्वारे समाजाच्या सक्षमीकरणाचे काम केले आहे. सरकारने कुणबी नोंदी शोधून त्यांना प्रमाणपत्र वितरीत केले आहे याबरोबरच मुलींसाठी मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले आहे यामुळे आमच्या समाजाच्या वतीने शिवाजीनगर मतदार संघात आम्ही शिरोळे यांना पाठींबा देत आहोत असे पुणे शहर अध्यक्ष मयूर गुजर यांनी सांगितले.

हातगाडीवाले, फेरीवाले, पथारीवाले, सायकल, स्टॉलधारक यांची समस्या सोडविण्यासाठी व सरकार दरबारी मागण्या मान्य करण्यासाठी जाणीव संघटनेच्या वतीने शिरोळे यांना पाठींबा देत असल्याचे अध्यक्ष श्वेता ओतारी यांनी जाहीर केले. पुन्हा आमदारपदी निवडून येत शिरोळे यांनी राज्याच्या मंत्रीपदी विराजमान व्हावे अशा शुभेच्छा डेक्कन परिसर नागरी व्यापार संघटनेचे अध्यक्ष शाम मारणे यांनी दिल्या. याशिवाय महाराष्ट्र आदिवासी जनआंदोलन संघटनेच्या वतीने पारधी समाजाचे बांधव, भगिनी व कार्यकर्ते यांनी शिरोळे यांना एकमुखाने पाठींबा जाहीर केला आहे. शिरोळे हे कायमच भटक्या विमुक्त जाती जमातीच्या उन्नतीसाठी कार्यरत असतील या अपेक्षेने महाराष्ट्र भटक्या व विमुक्त जाती संघाने देखील आपला पाठींबा जाहीर केला आहे.

राज्यात विविध पातळ्यांवर अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या महायुतीला आमचा पाठींबा असून महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेल्या शिरोळे यांना स्वराज्य सेनेने पाठींबा जाहीर केला आहे. मतदार संघातील ओबीसी समाज शिरोळे यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभा असल्याचे अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या प्रदेश अध्यक्षा रेखा रेखा आखाडे यांनी सांगितले.

शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्याचे नगरसेवक-पोलीस तपासात माहिती उघड, नेमके कोणाच्या जीवाला धोका?

0

लॉरेन्स टोळी 18 राज्यांमध्ये शूटर्स तयार करताय-लॉरेन्स गँग नवीन मुलांना तयार करते, ज्यांचा पूर्वीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. लॉरेन्सने राजस्थान, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, बंगाल आणि उत्तर प्रदेश अशा एकूण 18 राज्यांतून टोळ्यांचे आयोजन केले होते.यामध्ये हाशिम बाबा, कला जाठेदी, टिल्लू ताजपुरिया आणि क्रांती गँगचा समावेश आहे. प्रत्येकाची क्षेत्रे विभागली आहेत. त्याचे नेटवर्क कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इटली, फिलीपिन्स, यूएई, यूएस, पोर्तुगाल आणि अझरबैजानमध्ये आहे. लॉरेन्सने आपले लोक इथे स्थायिक केले आहेत. हे लोक तिथून टोळ्या चालवत आहेत.लॉरेन्स गँग मुंबईच्या दिशेने जात असल्याबद्दल बातम्या आहेत सध्या दिल्ली अंडरवर्ल्डचा राजा लॉरेन्स बिश्नोई आहे. आता त्याला आपली दहशत वाढवायची आहे आणि मुंबईतही काम करायचे आहे.असेही वृत्त आहे ‘लॉरेन्स हा लोकांना संघटित करण्यात तज्ञ आहे आणि ही त्याची शक्ती आहे. विद्यार्थी राजकारणात झालेल्या मारामारीत त्याला अटक होऊन तो तुरुंगात गेला. त्याने राजस्थानचा रोहित गोदारा (जो सध्या अमेरिकेत आहे), धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई (अमेरिकेत) आणि मित्र गोल्डी ब्रार (कॅनडामध्ये) यांना तयार केले. आता हेच लोक त्यांच्या शूटर्सच्या माध्यमातून मोठे गुन्हे करत आहेत.

मुंबई-शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्याचे नगरसेवक असल्याचा दावा बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपीने केला आहे. यामुळे आता नेमके हे नगरसेवक कोण?, शुभम लोणकर यांच्या निशाण्यावर तो का आला असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणारा शूटर त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री होईपर्यंत रुग्णालयाजवळच थांबला होता, अशी माहिती कालच पोलिस तपासात समोर आली होती. यानंतर आता पुण्यातील नगरसेवक टार्गेटवर असल्याची माहिती समोर आली आहे.

बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडणारा 20 वर्षीय शूटर मुख्य आरोपी शिवकुमार गौतम याने पोलिस तपासात दिलेल्या माहितीनुसार गोळीबारानंतर त्याने ताबडतोब शर्ट बदलला आणि सुमारे अर्धा तास रुग्णालयाबाहेर गर्दीत उभा राहिल्याचे गोळीबार करणाऱ्याने पोलिसांना सांगितले. या हल्ल्यात सिद्दिकी मरण पावला की बचावला हे जाणून घेण्यासाठी तो उभा होता. सिद्दिकी यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजताच ते तेथून निघून गेले.शिवकुमारच्या म्हणण्यानुसार, बाबा सिद्दिकींची हत्या केल्यानंतर त्याची पहिली योजना उज्जैन रेल्वे स्थानकावर त्याच्या साथीदारांना – धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंग यांना भेटण्याची होती. जिथे बिश्नोई टोळीतील एक सदस्य त्याला वैष्णोदेवी येथे घेऊन जाणार होता. मात्र, कश्यप आणि सिंग यांना पोलिसांनी पकडल्यामुळे ही योजना फसली.

शिवकुमार उर्फ ​​शिव याला 11 नोव्हेंबर रोजी बहराइचमधील नानपारा येथून अटक करण्यात आली होती. त्याच्या उर्वरित 4 साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. शिवकुमारची चौकशी करणाऱ्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर हा संपूर्ण प्रकार सांगितला.अधिकारी सांगतात, ‘शिवचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड सापडला नाही. म्हणजे याआधी तो गुन्हेगारी जगताशी जोडला गेला नव्हता, पण सोशल मीडियावर लॉरेन्स गँगबद्दल पाहिल्यानंतर त्याला गुन्हेगारीच्या जगात येण्याची इच्छा झाली. त्याचे वडील गवंडी म्हणून रोजंदारीवर काम करतात.शिव पुण्यात एका रद्दीच्या दुकानात काम करायचा. शुभम लोणकर हाही जवळच दुकान चालवत असे. त्यामुळेच दोघांची ओळख झाली. शुभमने सांगितले की तो लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित आहे. शुभम अनमोल बिश्नोईशी स्नॅपचॅटवर बोलत असे. शिवने कधीही अनमोलशी थेट संभाषण किंवा गप्पा मारल्या नाहीत.

‘सुमारे महिनाभरापूर्वी बाबा सिद्दिकी किंवा त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचला जात होता. शिवाने पोलिसांना सांगितले की, शुभमच त्याला लोकेशन आणि तपशील देत असे. त्याला सांगण्यात आले की जो कोणी बाबा किंवा झीशानच्या निशाण्यावर सापडेल, त्याला ठार मारावे लागेल. त्यासाठी 10 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. ‘हत्येपूर्वी आणि नंतरचे दोन वेगवेगळे फोन आणि सिमकार्ड सापडले आहेत. 12 ऑक्टोबर रोजी शिवानेच विदेशी ग्लॉक पिस्तुलातून 6 राउंड फायर केले होते. त्याने प्रथमच गोळी झाडली. 3 गोळ्या सुटल्या होत्या. त्यात 3 गोळ्या लागल्या होत्या. बाबा सिद्दिकी यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही त्यांना तीन गोळ्या लागल्याचे समोर आले आहे.

वास्तू ज्योतिष संमेलनाचे उद्घाटन,दोन दिवस कृष्णमूर्ती पद्धत,वास्तूशास्त्र विषयक मंथन  

गौरीकैलास ज्योतिष संस्थेकडून आयोजन 

पुणे :कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धत,वास्तूशास्त्र विषयक विचारमंथन करण्यासाठी गौरीकैलास ज्योतिष संस्थेच्या वतीने आयोजित   वास्तू ज्योतिष संमेलनाचे उद्घाटन  वास्तू तज्ज्ञ डॉ.आनंद भारद्वाज(दिल्ली) यांच्या हस्ते  आज, दि.१५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता झाले.डॉ. त्रिशला शेठ अध्यक्षस्थानी होत्या.

दि.१५,१६ नोव्हेंबर २०२४ रोजी  पुण्यात हे वास्तू ज्योतिष संमेलन आयोजित करण्यात आले आहे.हॉटेल प्रेसिडेंट (प्रभात रस्ता) येथे हे संमेलन होत असून भालचंद्र ज्योतिर्विद्यालय,स्मार्ट ऍस्ट्रॉलॉजर्स,ज्योतिष प्रबोधिनी,वास्तू ज्योतिष मित्र,आयादी ज्योतिष आणि वास्तू संस्था,मराठी ज्योतिषी मंडळ या संस्था सहभागी  आहेत. गौरीकैलास ज्योतिष संस्थेचे संस्थापक कैलास केंजळे,सौ.गौरी केंजळे यांनी स्वागत केले.वास्तू ज्योतिष संमेलन आयोजनाचे हे तिसरे वर्ष आहे.

चंद्रकांत शेवाळे  हे पहिल्या दिवशीचे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित होते.गुरुश्री प्रिया मालवणकर,ॲड.सुनीता पागे,नरेन उमरीकर,डॉ.चंद्रकला जोशी,मोहन पूर्णपात्रे,रमेश पलंगे,डॉ.सीमा देशमुख,श्री नाटेकर ,गणेशशास्त्री शुक्ल  हे मान्यवर उपस्थित होते.दिवसभर ज्योतिषविषयक सत्रे झाली,त्यात डॉ.आनंद भारद्वाज,डॉ.त्रिशला शेठ,डॉ.कीर्ती शाह,श्री नाटेकर,राहुल सरोदे,प्रदीप पंडित सहभागी झाले.

उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ.आनंद भारद्वाज म्हणाले,’भारतीय ज्ञानसंस्कृती अद्भुत असून हा ठेवा जगभर पोहोचविला पाहिजे.सर्व ज्योतिष मार्गदर्शकांनी त्यासाठी सदैव कार्यरत राहिले पाहिजे’.

डॉ. त्रिशला शेठ म्हणाल्या,’अशा ज्योतिष अधिवेशनात चिकित्सक अभ्यासक एकत्र येतात.ज्ञानाची देवाण घेवाण होते,हे महत्वाचे आहे’.गणेशशास्त्री शुक्ल,अपर्णा पैठणकर यांनी सूत्रसंचालन केले.
ज्योतिषविषयक सत्रे

शनिवार,दि.१६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता ज्योतिष तज्ज्ञ श्री.सिल गुरु यांच्या हस्ते दुसऱ्या दिवशींच्या कार्यक्रमाचे उदघाटन होणार असून दत्त्तप्रसाद चव्हाण हे अध्यक्ष स्थानी असणार आहेत.ख्यातनाम ज्योतिषी आदिनाथ साळवी यांची प्रमुख उपस्थिती  असेल.कांतीलाल मुनोत हे स्वागताध्यक्ष आहेत.सौ.अंजली पोतदार,सौ.पुष्पलता शेवाळे,श्रीराज पाताडे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दिवसभर ज्योतिषविषयक सत्रे होणार असून त्यात  श्री.सिल गुरु,विनायक आगटे,विकास वैद्य,दत्तप्रसाद चव्हाण,विजयानंद पाटील,सौ.अनुराधा कोगेकर,सौ.गौरी केंजळे, प्रदीप पंडित,नंदकिशोर जकातदार,ॲड.मालती शर्मा सहभागी होणार आहेत.  कै.मनोहर केंजळे स्मृती पुरस्कार डॉ.सौ.जयश्री बेलसरे यांना देण्यात येणार आहे.प्रश्नोत्तराचे सत्र तसेच स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे. 

आबा बागुलांच्यासाठी कलाकारांची मांदियाळी

पुणे- पर्वती मतदार संघातील उमेदवार आबा बागुल हिरा चिन्ह घेऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत .वाळवेकर लौंस येथे त्यांच्या कार्यालयात आज अनेक कलाकारांनी वैयक्तीक रित्या प्र्ताय्क्ष भेट घेऊन आबा बागुल यांना आपण मनापसून त्यांच्या पाठीशी असल्याचा निर्वाळा दिला आहे .गेली ४० वर्षे कलाकारांची कदर करणारा एक सामान्य कार्यकर्ता, रसिक आणि प्रेक्षकांशी नाळ जुळलेला एक आमचा स्नेही म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे यावेळी कलाकारांनी नमूद केले .अभिनेता, अभिनेत्री, गायक, कोरिओग्राफर, सहकलाकार, चित्रपट महामंडळाचे काही संचालक, आजीव सभासद, सांस्कृतिक क्षेत्रातील संघटनांचे प्रतिनिधी अशा अनेकांनी यावेळी आमची हि भेट खाजगी आणि मैत्रीपूर्ण असल्याचे माध्यमांना सांगितले.

आम्हाला अशा बाबतीत प्रसिद्धी नको आहे पण दक्षिण पुण्यात स्वारगेट पासून कात्रज पर्यंत कॉंग्रेस जिवंत ठेवणारा आणि नवनवे आधुनिक प्रकल्प आपल्या भागाला देणारा , कला क्षेत्राची काळजी घेणारा नेता म्हणून आबा बागुलांच्या कडे आम्ही पाहतो . न्याय का अधिकार हे राहुल गांधींचे ब्रीद आहे , ४० वर्षे कॉंग्रेस पक्षात राहून जनतेचे हित साधू पाहणारा , जनतेचे जीवनमान उंचावू पाहणाऱ्या ४० वर्षे नगरसेवक पदावरच राहणाऱ्या आबा बागुलांना न्यायाचा अधिकार आहे कि नाही आणि नेत्यांनी तो डावलला तर जनतेकडे जाण्यात गैर काय ?अशा शब्दात मराठी आणि हिंदी कला क्षेत्रातील मान्यवर कलाकारांनी आबा बागुल यांच्याबाबत सहवेदना व्यक्त केल्या आहेत.लवकरच आम्ही व्यासपीठावर देखील येऊ, नवरात्र उत्सव आणि काशी यात्रा मोठ्या प्रमाणात ज्यांनी सुरु केली, त्यांचा आदर्श घेऊन त्याचा कित्ता राज्यभरातून असंख्य लोकांनी गिरविला त्या आबा बागुलांच्या हक्कासाठी जनतेला आता साद घालण्याची गरज आहे . तळजाई चे सदू शिंदे मैदान असू द्यात , भीमसेन कलादालन असू द्यात , इ लर्निंग स्कूल सारखी अत्याधुनिक शाळा असू द्यात त्यांनी उभारलेल्या प्रकल्पांची त्यांनी केलेल्या कामाची सर्वत्र प्रशंसा झाली आहे. ज्या नेत्यांनी त्यांना डावलले त्यांनी त्यांची प्रशंसा केली आहे . जे विरोधात त्यांच्या लढत आहेत ते देखील त्यांची प्रशंसा करतात मग त्यांना न्याय देण्याचे काम आता जनतेचे आहे हे आम्ही सांगू इच्छितो असे हि त्यांनी म्हटले आहे.दरम्यान दर्जेदार शिक्षणासाठी राजीव गांधी ई लर्निंग स्कूलच्या धर्तीवर पाच शाळा उभारणार.,तीन मल्टी स्पेशालिटी सार्वजनीक रुग्णालयांची उभारणी करणार आहेत ज्याची सूत्रे जनतेच्या हाती असतील , रुग्णांच्या हकांची जिथे जपणूक होईल कुणा नगरसेवकाचे वर्चस्व निर्माण करणारे हॉस्पिटल नसेल . तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे युथ सेंटरच्या माध्यमातून युवकांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार. स्थापत्य,यांत्रिकी,इलेक्ट्रॉनिक्स,इलेक्ट्रिकल या सह सुसज्ज महाविद्यालयाची उभारणी करणार.बेरोजगारी कमी करण्यासाठी अल्प शिक्षीत व उच्च शिक्षीत यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर देणार.अशा स्वरुपाची कामे आपण विधानसभेत गेल्यावर करणार आहोत .असे आबा बागुल यांनी जाहीर केले आहे.

‘बटेंगे तो कटेंगे’ला सर्वांचाच विरोध; पंकजा मुंडेंनीही याला विरोध केला:प्रत्येकाची विचारधारा वेगळी

मुंबई-‘बटेंगे तो कटेंगे’ला सर्वांचाच विरोध आहे हे आम्हाला मान्य नाही. पंकजा मुंडेंनीही याला विरोध केला असे मी ऐकले. प्रत्येकाची विचारधारा वेगळी असते, पण हा महाराष्ट्र आहे इथे असे चालणार नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी घोषनेला विरोध केला आहे.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत संविधान बदलण्यासाठी 400 पारचा पारा दिला गेला. विरोधकांनी फेक नरेटिव्ह बनवला, असे अजितदादांनी म्हटले आहे. राज्यात 2 कोटी 30 लाख महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाला आहे, असेही त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

अजित पवार म्हणाले की, बारामती विधानसभा मतदारसंघात आमच्या पक्षाने पहिले मला उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर युगेंद्र पवार यांना त्यांच्या पक्षाने उमेदवारी जाहीर केली. मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची तो निर्णय पक्षाचा असतो. त्यावर मी काही जास्त बोलणार नाही. कोणीही निवडणूक लढवू शकते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी उमेदवार देऊन चुकी केली हे मी मान्य करतो. पण आता कोणी काय केले ह्यात मी पडणार नाही. त्यावर लोकं निर्णय घेतील.अजित पवार म्हणाले की, शरद पवार यांच्याशी गेली अनेक महिने चर्चा झाली नाही. ते त्यांच्या कामात व्यग्र असतात मी माझ्या कामात व्यग्र असतो. मी शरद पवार यांच्यासोबत जाईल अशा अनेक अफवा पसरवल्या जातात. त्यांच्या मागे नेमके कोण आहे, हे पाहणं महत्त्वाचे आहे.

अजित पवार म्हणाले की, एक है तो सेफ है म्हणजे राज्यातील सर्वच लोकं असा मी त्यांचा अर्थ घेतला आहे. नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो नाही, प्रत्येकच ठिकाणी जाणं होतेच असे नाही. पुण्यात जी सभा झाले त्यावेळी 6 उमेदवार नव्हते, मग सना, आणि सिद्दीकी त्यांच्यासभेत गेले नाही तर त्यात एवढे काय? प्रत्येकांचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला त्या त्या भागातील आमचे नेते उपस्थित राहतात.

रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अरविंद कोल्हटकरांचे चंद्रकांतदादांना आशीर्वाद

भाजपा-महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांचा घरोघरी संपर्क

पुणे-दादा तू कोथरूड मधून दणक्यात निवडून येणार, असे आशीर्वाद रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तथा माजी प्रचारक अरविंद कोल्हटकर यांनी दिले. भाजपा महायुतीच्या प्रचारासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी घरोघरी संपर्कावर भर दिला आहे. या अभियानाअंतर्गत कोथरुड विधानसभा मतदारसंघातील विविध सोसायटीतील प्रथितयश नागरिकांच्या भेटी घेऊन पाच वर्षांचा कार्य अहवाल देऊन मतदारांचे आशीर्वाद घेत आहेत.

कोथरूड मधील रोहन प्रार्थना सोसायटीतील भेटीदरम्यान संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तथा माजी प्रचारक अरविंद कोल्हटकर यांची चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी दादा तू दणक्यात निवडून येणार! असे आशीर्वाद कोल्हटकर यांनी पाटील यांना दिले.

यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, भाजपा युवा मोर्चा पुणे शहर सरचिटणीस दुष्यंत मोहोळ, प्रभाग १२ चे अध्यक्ष अंबादास अष्टेकर, कोथरुडचे निवडणूक सहप्रमुख नवनाथ जाधव, कोथरुड मंडल सरचिटणीस दिनेश माथवड, युवा मोर्चाचे अमित तोरडमल उपस्थित होते.

खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मतदारांना ऑनलाइन मतदारयादी उपलब्ध – डॉ. यशवंत माने


पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मतदारांना ऑनलाइन मतदारयादी उपलब्ध करण्यात आलेली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिली. मतदारांना ऑनलाइन माध्यमातून आपली माहिती तपासता येईल. यासाठी खालील लिंक उपलब्ध करण्यात आलेली आहे
ceo.maharashtra.gov.in
महसूल सहाय्यक वैभव मोटे यावेळी उपस्थित होते. डॉ. माने यांनी सांगितले की, मतदार यादीतील माहिती ऑनलाइन तपासून, मतदार कोणत्याही अडचणीविना मतदान करू शकतील. मतदारांनी त्यांच्या तपशीलांची योग्य पडताळणी करून मतदानाच्या दिवशी समस्या टाळावी, असे आवाहन त्यांनी केले.

कर्वेनगरमध्ये घुमला महायुतीच्या एकीचा नारा!

भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादांना कर्वेनगर मधून ही चांगला प्रतिसाद

पुणे: कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज कर्वेनगर मधून काढण्यात आलेल्या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी महिलांकडून औक्षण करण्यात आले. अनेक कार्यकर्ते हातात ‘सर्व पुण्यात महायुतीच जिंकणार, कोथरुड मध्ये मताधिक्याचा रेकॉर्ड करणार!’ अशा आशयाचे फ्लेक्स घेऊन चंद्रकांतदादांचे स्वागत करण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता एक आठवड्याचा कालावधी बाकी आहे. सर्वच मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी पहिल्या दिवसापासून प्रचारात आघाडी कायम राखली आहे. आज कोथरुड मधील कर्वेनगर मधून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टीने चंद्रकांतदादा पाटील यांचे स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण करुन पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कर्वेनगर मधील नटराज सोसायटी येथील विठ्ठल मंदिर येथून रॅलीला सुरुवात झाली. विशेष म्हणजे, भागातील कार्यकर्ते ‘चंद्रकांतदादा पाटील यांच्या स्वागतार्थ सर्व पुण्यात महायुतीच जिंकणार, कोथरुड मध्ये मताधिक्याचा रेकॉर्ड करणार!’ ‘माणसातील देव माणूस’ ‘मुलींना दिली शिष्यवृत्ती दादा म्हणजे कामाला गती’ अशा आशयाचे फ्लेक्स धरुन उभे धरुन उभे होते. तसेच ‘एक है तो सेफ है, भारतमाता की जय!’च्या घोषणांनी प्रत्येक चौक दणाणून गेला होता.

यावेळी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे समन्वयक सुशील मेंगडे, नगरसेवक राजाभाऊ बराटे, नगरसेविका वृषाली चौधरी, गिरीश खत्री, विशाल रामदासी, महेश पवळे, ज्येष्ठ कार्यकर्ते शिवरामपंत मेंगडे, अश्विनी ढमाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या संगीता बराटे, रेश्मा बराटे, तेजल दुधाने, संतोष बराटे यांच्या महायुतीचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.

महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध? शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा, दूध, कापसाच्या भावावर बोला: मल्लिकार्जून खर्गे

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ सभा.

पंडित नेहरु ते मनमोहनसिंह सरकारने देशात विकास कामांची मालिका उभी केली, नरेंद्र मोदींनी ११ वर्षात काय केले?

हिंमत होती म्हणूनच काँग्रेसने पाकिस्तानचे 2 तुकडे केले .. आहे तुमच्यात हिंमत..

पुणे, दि. १४ नोव्हेंबर २०२४
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रचार सभांमधून महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नावर काहीच बोलत नाहीत. इंदिरा गांधींनी पुनर्जन्म घेतला तरी जम्मू काश्मीरमधील ३७० कलम पुन्हा लागू करु शकत नाहीत अशी दर्पोक्ती करत आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीत ३७० कलमाचा काय संबंध? महागाई, बेरोजागारी प्रचंड वाढली आहे, महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, त्याच्या सोयाबीन, कांदा, दूध, कापसाच्या भावावर मोदी शाह का बोलत नाहीत? असा रोखठोक सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केला आहे.

काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश बागवे , रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी मल्लिकार्जून खर्गे यांच्या पुण्यात जाहीर सभा झाल्या. या सभेत खर्गेंनी भाजपा व मोदी सरकारवर तुफान हल्लाबोल केला. ते पुढे म्हणाले की, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉ. मनमोहनसिंह यांच्या सरकारने देशात विकासाची गंगा आणली. आयआयएम, आयआयटी, मोठे कारखाने, धरणे, वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये, रुग्णालये, विविध संस्था उभा केल्या. हे विकासाचे काम काही मागील ११ वर्षात झालेले नाही. पंडित नेहरु व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसह सर्वांना मतदानाचा अधिकार दिला. राजीव गांधी यांनी मतदानाचे वय २१ वरुन १८ वर्षे केले. डॉ. मनमोहनसिंह यांच्या सरकारने गरिबांसाठी मनरेगा, अन्नसुरक्षा कायदा आणला. संविधानाने दिलेला अधिकार कायम ठेवायचे असतील तर लोकशाही व संविधानचे रक्षण करा, असे आवाहन खर्गे यांनी केले

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सोयाबीनला बोनससह ७ हजार रुपयांचा भाव देऊ, कांदा, कापसाला योग्य भाव देऊ, शेतकऱ्यांना ३ लाखांची कर्जमाफी देणार, शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवणार, महिलांना ३ हजार रुपये व मोफत बस प्रवास, २५ लाखांचा आरोग्य विमा व सरकारी नोकर भरती करु, असे आश्वासन मल्लिकार्जून खर्गे यांनी दिले.

क्रीडा धोरणाची करणार प्रभावी अंमलबजावणी:हेमंत रासने

पुणे:शहरातील सर्वच खेळाडूंना विशेषतः विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याची माहिती कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांनी दिली.
रासने यांच्या प्रचारार्थ संत कबीर चौक, नेहरु रस्ता, निवडुंग विठोबा, डुल्या मारुती, दगडी मारुती, सोन्या मारुती चौक, मोती चौक, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजश्री सूर्या यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचारफेरीचा प्रारंभ झाला.
राजेंद्र काकडे, शिवम आंदेकर, जयश्री आंदेकर, दत्ता सागरे, राजू परदेशी, उमेश चव्हाण, अरविंद कोठारी, तेजेंद्र कोंढरे, निर्मल हरिहर, करण देसाई, संकेत थोपटे, पुष्कर तुळजापूरकर, पाठक, कौशिक कोठारी, निलेश खडके, तुषार रायकर, समर्थ भोसले, कुणाल गरुड, सनी पवार, गौरी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
रासने म्हणाले, महापालिका हद्दीतील क्रीडांगणासाठी आरक्षित जागांवर अत्याधुनिक क्रीडा संकुल-क्रीडांगणे विकसित करणे, क्रीडा स्पर्धा भरविणे, क्रीडा नर्सरी तयार करणे, स्वतंत्र क्रीडा माहितीविषयक कक्ष, उदयोन्मुख खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देणे आदी योजनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
रासने पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना चालना देण्यासाठी विविध योजना आखणार आहे. केंद्र सरकारच्या खेलो इंडिया या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात क्रीडा क्षेत्रासाठीच्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात विकसित करण्यावर भर देणार आहे. पुणे महापालिकेच्या क्रीडा प्रबोधिनींची संख्या वाढविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. खेळाडूंना अत्याधुनिक सोयी-सुविधा निर्माण करून देणार आहे. त्यांची कसून तयारी करून घेऊन त्यांना स्पर्धेमध्ये उतरविले जाणार आहे.
पुण्याच्या मध्यवर्ती भागातील जवाहरलाल नेहरु स्टेडियची आंतरराष्ट्रीय नियमानुसार विकसित करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव भारतीय खेळ प्राधिकरणाला पाठवणार आहोत. बाबूराव सणस मैदान येथे स्वतंत्र क्रीडा माहिती कक्ष उभारणार असून, नागरिकांना क्रीडाविषयक माहिती सहज उपलब्ध होऊ शकेल. कसबा विधानसभा मतदारसंघातील सर्व भागांमध्ये मोकळ्या मैदानांचा खेळांसाठी अधिकाधिक कसा उपयोग करता येईल यासाठी धोरण निश्चित करणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचा पाठपुरावा करणार आहे.