पुणे, दि. १५ नोव्हेंबर, २०२४ : छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातील विविध समाज संघटना यांची या विधानसभा निवडणुकीत सिद्धार्थ शिरोळे यांना खंबीर साथ मिळत आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्र जोशी समाज संघटना, भारतीय अल्पसंख्यांक संघटना, अखिल भारतीय मराठा महासंघ, हातगाडीवाले, फेरीवाले, पथारीवाले, सायकल, स्टॉलधारक यांची जाणीव संघटना प्रणीत, डेक्कन परिसर नागरी व्यापारी संघटना, महाराष्ट्र आदिवासी जनआंदोलन, महाराष्ट्र भटक्या व विमुक्त जाती संघ, स्वराज्य सेना, अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ या संघटनांच्या प्रतिनिधींनी शिरोळे यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे.
यावेळी शिरोळे यांनी सर्वांसाठी मागील पाच वर्षांत केलेल्या कामांचे कौतुक संघटनांच्या प्रतिनिधींनी केले. जोशी समाज हा भटका विमुक्त समजामध्ये मोडला जातो. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र अधिवेशनामध्ये महाराष्ट्र जोशी समाज संघटनेच्या वतीने समाज बांधवांचे ५० हजार मोफत जातीचे दाखले करून देण्याचा मानस करण्यात आला होता. पण अनेक तांत्रिक अडचणींमुळे ते काम पूर्ण होत नव्हते. यावेळेस शिरोळे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांकडे केलेल्या पाठपुराव्याने बैठक पार पडली यावेळी सदर प्रश्न मार्गी लावण्यात आला असल्याचे जोशी समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष निलेश प्रकाशशेठ निकम यांनी सांगितले.
भारतीय अल्पसंख्यांक संघटनेच्या वतीने महायुती प्रणीत उमेदवारांना पाठींबा देत असून त्यांच्या विजयासाठी आम्हीही प्रयत्न करू असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ताहेर आसी म्हणाले. महायुतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी निवड झालेले मात्र आरक्षण रद्द झाल्याने नियुक्तीपासून वंचित राहिलेल्या मराठा विद्यार्थ्यांची सरकारच्या विविध खात्यात भरती करून घेण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. यासोबतच महायुतीने आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, सारथी संस्था यांद्वारे समाजाच्या सक्षमीकरणाचे काम केले आहे. सरकारने कुणबी नोंदी शोधून त्यांना प्रमाणपत्र वितरीत केले आहे याबरोबरच मुलींसाठी मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले आहे यामुळे आमच्या समाजाच्या वतीने शिवाजीनगर मतदार संघात आम्ही शिरोळे यांना पाठींबा देत आहोत असे पुणे शहर अध्यक्ष मयूर गुजर यांनी सांगितले.
हातगाडीवाले, फेरीवाले, पथारीवाले, सायकल, स्टॉलधारक यांची समस्या सोडविण्यासाठी व सरकार दरबारी मागण्या मान्य करण्यासाठी जाणीव संघटनेच्या वतीने शिरोळे यांना पाठींबा देत असल्याचे अध्यक्ष श्वेता ओतारी यांनी जाहीर केले. पुन्हा आमदारपदी निवडून येत शिरोळे यांनी राज्याच्या मंत्रीपदी विराजमान व्हावे अशा शुभेच्छा डेक्कन परिसर नागरी व्यापार संघटनेचे अध्यक्ष शाम मारणे यांनी दिल्या. याशिवाय महाराष्ट्र आदिवासी जनआंदोलन संघटनेच्या वतीने पारधी समाजाचे बांधव, भगिनी व कार्यकर्ते यांनी शिरोळे यांना एकमुखाने पाठींबा जाहीर केला आहे. शिरोळे हे कायमच भटक्या विमुक्त जाती जमातीच्या उन्नतीसाठी कार्यरत असतील या अपेक्षेने महाराष्ट्र भटक्या व विमुक्त जाती संघाने देखील आपला पाठींबा जाहीर केला आहे.
राज्यात विविध पातळ्यांवर अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या महायुतीला आमचा पाठींबा असून महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेल्या शिरोळे यांना स्वराज्य सेनेने पाठींबा जाहीर केला आहे. मतदार संघातील ओबीसी समाज शिरोळे यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभा असल्याचे अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या प्रदेश अध्यक्षा रेखा रेखा आखाडे यांनी सांगितले.