पुणे, दि. १५: मतदान कर्तव्यावरील तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात टपाली मतदानाला सुरुवात झाली असून टपाली मतदानाची प्रक्रिया १९ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी कळविली आहे.
येत्या बुधवारी २० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. यासाठी अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांना मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्तव्यावर हजर असल्यामुळे मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागू नये यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कॅन्टोंमेंट विधानसभा (अ.जा.) मतदारसंघाचे निवडणूक कार्यालय भारतरत्न सर विश्वेश्वरय्या हॉल, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र ५, ३ रा मजला, अर्सेनल प्लॉट, हॉटेल सागर प्लाझा समोर, कॅम्प, पुणे या ठिकाणी स्वतंत्र टपाली मतदान कक्षाची स्थापना करण्यात आली असून निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी १९ नोव्हेंबर पर्यंत आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सिध्दार्थ भंडारे यांनी केले आहे.