पुणे:’मराठी मुस्लीम सेवा संघाने महाविकास आघाडीला दिलेल्या पाठिंब्यावरून भाजपाचे किरीट सोमय्या, रवीशंकर प्रसाद जो व्होट जिहादचा प्रचार करीत आहेत,तो दुष्प्रप्रचार आहे,असा आरोप करीत ज्यांचे विचार पटतील,त्या पक्षाला-उमेदवाराला मतदान करण्याचा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे’, असे सडेतोड उत्तर मराठी मुस्लीम सेवा संघातर्फे पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आले.
मराठी मुस्लीम सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इब्राहिम खान, राज्य सहसचिव अब्दुल जब्बार शेख,पुणे शहराध्यक्ष जावेद शेख,सिकंदर मुलाणी, अस्लम बागवान आदी उपस्थित होते.१५ नोव्हेंबर रोजी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे ही पत्रकार परिषद झाली.
इब्राहिम खान म्हणाले,’मागील निवडणुकीत ‘सब का साथ, सबका विकास’ ऐकून भाजपाला पाठिंबा दिला तेव्हा तो व्होट जिहाद नव्हता का ? या विषयावर जाहीर चर्चा करण्याची आमची तयारी आहे.मुस्लीमांच्या आत्मसन्मानाशी खेळण्याचे काम भाजपने केले.
सोमय्या यांनी मुख्तार अब्बास नक्वी,माधव भांडारी, डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांच्याकडून २०१४ च्या निवडणुकीत आम्ही दिलेल्या पाठिंब्याबाबत माहिती घ्यावी. भाजपाने बटेंगे, कटेंगे सारख्या घोषणा देऊन ध्रुवीकरणाचे प्रयत्न करू नये.
मराठी मुस्लीम सेवा संघ आत्मसन्मान, संविधान अधिकार, रोजगार, प्रादेशिक अस्मिता या मुद्यावर काम करते. आमच्या प्रगतीसाठी महाविकास आघाडीला मतदान करणार आहे. भाजपाला हरविण्यास जे सक्षम आहेत, त्यांना मतदान करणार आहे.
सिकंदर मुलाणी म्हणाले,’मुस्लीम हे राक्षस, देशद्रोही असल्याचे चित्र रंगविण्याचे प्रयत्न होत आहेत. आम्ही शिवाजी महाराजांच्या बाजूने लढणाऱ्या मुस्लीम सैनिकांचे वंशज आहोत, औरंगजेबची औलाद नाही,हे लक्षात ठेवावे’.