पुणे — दलित पँथर चळवळीने फार मोठा इतिहास निर्माण केला आहे .अमेरिकेत जशी ब्लॅक पँथर होती तशी भारतात दलित पँथर होती या चळवळीने दलित समाजावरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडली .त्याच चळवळीचा इतिहास आजच्या युवकांना व समाजाला समजण्यासाठी पँथर चळवळीचा इतिहास समाजासमोर येणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले .कवी, चित्रकार, शिल्पकार, लेखक, दलित पँथर चळवळीचे नेते, माजी गृहनिर्माण मंत्री दयानंद मस्के यांचा नागरी सत्कार व ग्रंथ प्रकाशन समारंभ प्रसंगी ते बोलत होते .
पुढे ते म्हणाले की ,माझ्या सामाजिक ,राजकीय प्रवासात पुण्यातील पँथर चळवळीतील कार्यकर्त्यांचे योगदान मोलाचे आहे. तसेच लेखक व पँथर नेते दयानंद मस्के यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
शाहीर संभाजी भगत यांनी सिद्धार्थ वसतिगृहातील आठवणी सांगितल्या तसेच आज चळवळीचा विचार संपवण्याचे षडयंत्र चालू आहे ते थांबविणे गरजेचे आहे
राजकिय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येत आंबेडकरी विचार टिकवला पाहिजे असे आवाहन यावेळी शाहिर संभाजी भगत यांनी केले .
दलित पँथरचे संस्थापक ज.वि.पवार आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की ,आज आंबेडकरी चळवळीची परिस्थिती भयानक आहे या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत .आज आपण वर्षांतून दोनच दिवस आंबेडकरवादी असतो ,ते म्हणजे १४ एप्रिल आंबेकर जयंती व ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन होय.आज आंबेडकरी विचार पुढे घेऊन जाण्यासाठी कायम त्या विचारावर काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले .यावेळी त्यांनी लेखक दयानंद मस्के यांचे पँथर चळवळीतील योगदान व त्याकाळातील आठवणींना उजाळा दिला .
यावेळी दयानंद मस्के लिखित आत्मचरित्र माझा बाप जगन्नाथ या ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
या समारंभास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ,आंबेडकरी लोकशाहीर संभाजी भगत ,कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक ,विचारवंत व दलित पँथर चे संस्थापक ज. वि. पवार,रिपब्लिकन पक्षाचे नेते असित गांगुर्डे,शैलेंद्र चव्हाण तसेच या समारंभाचे आयोजक प्रेरणानंदताई गायकवाड ,आर्ष प्रकाशन चे प्रकाशक दिलीप चव्हाण ,साहित्यिक सुरेंद्र जोंधळे ,प्रा.डॉ.राजाभाऊ भैलुमे,कॉम्रेड सुबोध मोरे,गंगाधर आंबेडकर,दलित पँथर चे नेते दिलीप जगताप ,जेष्ठ पत्रकार महावीर जोंधळे यासह पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील अनेक प्रमुख नेते ,साहित्यिक ,विचारवंत व युवक कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .

