कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट कडून यशस्वी आयोजन
पुणे :कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अरुंधती पटवर्धन यांच्या वतीने युवा कलाकारांसाठी आयोजित ‘मुकुल कला महोत्सवाला आज चांगला प्रतिसाद मिळाला.
हा कला महोत्सव 14 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता बाल शिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी (कोथरूड) येथे उत्साहात पार पडला.
कला महोत्सवाच्या प्रसंगी ज्येष्ठ नृत्य गुरू डॉ. सुचेता भिडे- चापेकर व ज्येष्ठ हार्मोनियम वादक, भारती विद्यापीठ स्कुल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स चे प्रमुख शारंगधर साठे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
कृष्णा साळुंके यांच्या शिष्यांचे पखवाज वादन, सुप्रसिद्ध तबला वादक अजिंक्य जोशी आणि गायिका गायत्री जोशी यांची कन्या आणि शिष्या आरुषी जोशी चे गायन, कथक नृत्यांगना पायल गोखले यांची कन्या आणि शिष्या रिया गोखले चे कथक नृत्य,
डॉ. देविका बोरठाकूर यांच्या शिष्यांचे सत्रीय नृत्य आणि
श्रीमती अनुजा बाठे यांच्या शिष्यांचे भरतनाट्यम् नृत्य सादर झाले. पारंपारिक रचनाच्या या जोशपूर्ण सादरीकरणाला उपस्थितानी भरभरून दाद दिली.सत्रिय ही आसाम मधील बहारदार नृत्यशैली देखील रसिकांची दाद मिळवून गेली.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य होता. गौरी स्वकुळ यांनी सूत्रसंचालन केले.
उद्घाटन कार्यक्रमात बोलताना शारंगधर साठे म्हणाले,’ युवा कलाकारांना, युवा मनांना व्यासपीठ देण्याचा हा सातत्यपूर्ण उपक्रम महत्वपूर्ण आहे.लहान वयापासून हे सर्व सहभागी युवा कलाकार भारतीय शास्त्रीय नृत्य कला शिकत आहेत,भारतीय कलांसाठी हे आश्वासक चित्र आहे.अशा व्यासपीठांना भारती विद्यापीठ बळ देण्याचे काम करेल ‘.