पुणे: खडकवासाला विधानसभा मतदारसंघांतर्गत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार अशा एकूण ७० मतदारांनी फॉर्म क्रमांक १२ डी भरून गृहमतदानासाठी नोंदणी केली होती. त्यांपैकी ६८ मतदारांनी गृह मतदान केले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ यशवंत माने यांनी दिली. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी गृह मतदानाची सुविधा भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.त्याअनुषंगाने ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे डॉ. माने यांनी सांगितले.
विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मतदानाची प्रक्रिया करण्यात आली. टपाली मतदान कक्षाचे समन्वय अधिकारी दिपगौरी जोशी आणि किशोरी शिंदे यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या विशेष पथकाद्वारे ही प्रक्रिया पार पडली. या पथकामध्ये मतदान अधिकारी १, मतदान अधिकारी २, सूक्ष्म निरीक्षक, पोलीस कर्मचारी व व्हिडीओग्राफर यांचा समावेश होता. टपाली मतदान कक्षाचे प्रशासन कर्मचारी लौकिक दाभाडे यांनी या पथकासोबत समन्वय ठेवून गृह मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.या प्रक्रियेसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री.किरण सुरवसे तसेच सचिन आखाडे, अंकुश गुरव आणि साहीर सय्यद यांचे सहकार्य मिळाले