Home Blog Page 584

MIM चे इम्तियाज जलील ‘मातोश्री’वर:उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

मुंबई-एमआयएमचे नेते तथा छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज अचानक मातोश्रीवर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेचा तपशील समजला नाही. पण यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जलील आपल्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी ठाकरेंकडे गेले असतील, असा अंदाज वर्तवला आहे.

अंबादास दानवे यांनी काही दिवसांपूर्वी ईदच्या निमित्ताने इम्तियाज जलाली यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी ईदच्या शुभेच्छा देण्याशिवाय या भेटीत काहीही नवीन नसल्याचा दावा केला होता. जलील यांनी यावेळी आपली बाजू स्पष्ट केली होती. मी दरवर्षी अंबादास दानवे यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी जातो. ते ही ईदच्या निमित्ताने माझ्या घरी येतात. आमच्यात राजकीय मतभेद आहेत म्हणून आम्ही एकमेकांचे शत्रू आहोत असे नाही. त्यामुळे या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका, असे ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

इम्तियाज जलील आज दुपारी मातोश्री या ठाकरे कुटुंबाच्या निवासस्थानी पोहोचले. तिथे त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांत बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेचा तपशील बाहेर आला नाही. त्यामुळे या भेटीचे कारण काय? उभय नेत्यांत काही राजकीय चर्चा झाली का? इम्तियात जलील ठाकरे गटाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत का? अशा वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

दुसरीकडे, अंबादास दानवे यांनी इम्तियाज जलील यांच्या मातोश्री भेटीमागे कोणतेही राजकारण नसल्याचा दावा केला आहे. इम्तियाज जलील यांच्या मुलाचे लग्न आहे. या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ते मातोश्रीवर गेले असण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे व इम्तियाज जलील यांच्या मुलाचीही थोडीफार ओळख आहे. त्यामुळे जलील लग्नपत्रिका देण्यासाठी मातोश्रीवर गेले असतील, असे दानवे म्हणाले.

उल्लेखनीय बाब म्हणजे इम्तियाज जलील यांनी नुकतीच खुलताबादचे नामांतर रत्नपूर असे करण्याच्या मुद्यावरून शिंदे गटाचे नेते तथा कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्यावर टीका केली होती. तुम्ही शहरांची, इमारतींची व रस्त्यांची नावे बदलत आहात. आता नावे बदलण्याची मालिका सुरूच झाली असेल, तर तुम्ही तुमच्या बापाचेही नाव बदलून घ्या. आता अजून राहिले तरी काय? सांगून टाका की, आम्हाला हे नाव आवडले नव्हते, त्यामुळे आम्ही ते बदलले, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेचा संजय शिरसाट यांनी खरपूस समाचार घेतला होता.

फुले दांपत्यांनीच महिलांसाठीची देशातील पहिली शाळा सुरु केली- अजितदादा म्हणाले…

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन!

पुणे- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज येथील फुले वाड्यात येऊन महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुलेंना आदरांजली वाहत कृतज्ञापूर्वक अभिवादन केले , यावेळी ते म्हणाले,क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या साथीनं त्यांनी महिलांसाठीची देशातील पहिली शाळा सुरु केली. त्यातून महिलांना शिक्षणाची दारं खुली झाली. आज समाजाच्या सर्व क्षेत्रात महिला आत्मविश्वासानं वावरत आहेत. महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. महिला त्यांच्या हक्कांबद्दल जागरुक झाल्या आहेत, याचं सर्व श्रेय महात्मा फुले-सावित्रीबाईंनी त्याकाळात दाखवलेली दूरदृष्टी आणि हालअपेष्टांना आहे, याचा विसर पडता कामा नये. महात्मा जोतिबा फुले यांनी समाजातील अज्ञान, अंश्रश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेद, लिंगभेदाविरोधात दिलेला लढा आणि सत्यशोधक विचारांची चळवळ पुढे घेऊन जाणं, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

महात्मा फुले यांनी भारतीय समाजव्यवस्थेतून अज्ञान, अन्याय, अनीती, अंधश्रद्धा, अत्याचार, अस्पृश्यता, विषमतेसारख्या कुप्रथा नष्ट करण्यासाठी यशस्वी लढा दिला. शिक्षणाची गंगा बहुजनांच्या दारात नेऊन विकासाची संधी उपलब्ध करुन दिली. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. अनिष्ट रुढी-परंपरांविरोधात सत्यशोधक चळवळ उभारली.

सामाजिक न्यायावर आधारित प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी, विज्ञाननिष्ठ भारताचा पाया भक्कम करण्याचं फार मोठं काम फुलेंनी केलं. बहुजन समाजाला शिक्षणाचं महत्वं पटवून देण्यासाठी त्यांनी दिलेल्या “विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले” या संदेशानं देशात क्रांती घडवली.

जिल्ह्यात राबविण्यात येणारा ‘सेवादूत’ स्तुत्य उपक्रम-माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार

पुणे: जिल्ह्यात राबविण्यात येणारा ‘सेवादूत’ उपक्रम स्तुत्य असून जिल्ह्यात या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, याकरीता राज्य शासनाच्यावतीने आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल असे माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे सेवादूत संकल्पना राबविण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी आदी उपस्थित होते.

श्री. डुडी यांनी सेवादूत उपक्रमाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यामध्ये
माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नागरिकांशी थेट संपर्क साधून जलद व सुलभ रीतीने महसूल विभागाच्या सेवा घरपोच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सद्यस्थितीत महसूल विभागाच्या सेवा मिळण्यासाठी नागरिकांना आपले सरकार सेवा केंद्र किंवा तालुकास्तरावरील सेतू केंद्रामध्ये जावे लागते. वयोवृद्ध नागरिक, गर्भवती माता, दिव्यांग व नोकरदार वर्ग यांना आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन महसूल विभागाच्या सेवा प्राप्त करून घेणे आदी त्यांच्या शारीरिक स्थितीमुळे किंवा कामकाजाच्या वेळांमुळे जिकीरीचे व अडचणीचे ठरते. अशा वर्गाला महसूल विभागाच्या सेवा मिळण्यासाठीची अर्ज प्रक्रिया घरून करता आली किंवा त्यांच्या सोयीच्या वेळी करता आली तर त्यांचे दैनंदिन जीवन सुकर होऊ शकते. या कारणास्तव “सेवादूत” ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

सेवादूत कार्यप्रणाली
नागरिकांनी sevadoot.pune.gov.in या संकेतस्थळाचा वापर करून महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ आपले सरकार सेवा केंद्र चालकाच्या माध्यमातून नागरिकांच्या घरूनच घेता येणार आहे. आपले सरकार सेवा केंद्राचे चालक संगणकीय प्रणालीच्याद्वारे महसुली सेवेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे नागरिकांच्या घरीच स्कॅन करून घेणार आहे. नागरिकांच्या समक्ष अर्ज संबंधित प्रणालीमध्ये दाखल करण्यात येणार आहे.

नागरिकांच्या घरीच अर्ज mahaonline प्रणालीमध्ये दाखल झाल्यानंतर बँक एण्ड घटक म्हणजेच शासकीय यंत्रणेमार्फत सक्षम अधिकारी प्राप्त झालेला अर्ज व इतर कागदपत्रांची संपूर्ण छाननी करून वैधता,अर्हता पडताळून नियमानुसार सेवा किंवा दाखला निर्गमित करेल.

निर्गमित्त झालेला दाखला नागरिकाला घरपोच हवा असेल किंवा नोंदणीकृत टपालाने हवा असल्यास टपालाचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. नागरिकांनी दिलेल्या पसंतीनुसार सदरचा दाखला नागरिकाला टपालाद्वारे वितरित करण्यात येणार आहे. या निर्गमित झालेल्या दाखल्याची लिंक देखील नागरिकाला लघु संदेश सेवा, ई-मेल, व्हाट्सअपद्वारे उपलब्ध करून देण्याची सुविधा सेवादूत प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठीच्या प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.

समता भूमी विस्तारीकरण आणि राष्ट्रीय स्मारकाचे काम जलदगतीने व्हावे – शहराध्यक्ष दीपक मानकर

पुणे-क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुणे शहरातील महात्मा फुले पेठ येथे असलेल्या निवासस्थान समता भूमी विस्तारीकरण आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारकाचे काम जलदगतीने व्हावी यासाठी बैठकीचे आयोजन करणे, तसेच पुणे शहरातील सर्व नाल्यांची मान्सूनपूर्व सफाई करणे आणि आपत्कालीन व्यवस्था सज्जतेबाबत, सध्यस्थितीत सुरु असलेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करणे, प्रभागातील मुलभूत सुविधा जसे पाणी पुरवठा, सार्वजनिक शौचालय,ड्रेनेज, पावसाळी लाईन दुरुस्ती करणे, नागरिकांच्या विविध प्रश्न या संदर्भात महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांची भेट घेत विस्तृत चर्चा करत निवेदन दिले.
यावेळी दीपक मानकर यांनी सांगितले, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी महात्मा फुले पेठ येथील समता भूमीला भेट देत अभिवादन केले. यावेळी समता भूमी विस्तारीकरण व राष्ट्रीय स्मारकाच्या कामाला फारसी गती मिळालेली नाही हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निदर्शनास आणून दिले आणि त्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तिथे उपस्थित असलेले महापालिका आयुक्त राजेन्द्र भोसले यांना सूचना केल्या. पुढे बोलताना ते म्हणाले, आपल्या देशाची अस्मिता असलेले क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातील मुलींच्या पहिल्या शाळेची स्थापना केली. पुण्यातील बुधवार पेठेतील तात्याराव भिडे वाड्यामध्ये ही शाळा सुरू झाली. पुणे शहरातील गंज पेठ येथे असलेल्या क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या निवासस्थान फुले वाडा हा परिसर समता भूमी म्हणून ओळखला जातो. फुले दाम्पत्याच्या जयंती आणि स्मृतीदिनी राज्य आणि देशातून माळी समाजासह विविध जाती धर्माचे लोक त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी समता भूमीत मोठ्या संख्येने येत असतात. क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रेरणादायी असून येणाऱ्या नव्या पिढी समोर त्या कार्याची माहिती दिली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘समता भूमी’चे विस्तारीकरण करण्याची आणि फुले वाडा-सावित्रीबाई फुले स्मारक जोडण्याची वारंवार मागणी केली गेल्याने समता भूमीच्या विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या कामाला चालना देण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे स्मारकाच्या व दोन्ही वास्तू जोडण्याच्या कामास गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक याच्यामध्ये अंदाजे शंभर मीटरचे अंतर आहे. या विस्तारीकरणामध्ये करावे लागणारे भूसंपादन व इतर अत्यावश्यक गोष्टींची पूर्तता होण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन, जागामालक, स्थानिक नागरिक यांची एकत्रित बैठकीचे आयोजन करण्यात यावे आणि या वास्तूचे जतन व्हावे आणि त्याची डागडुजी करून ऐतिहासिक वारसा जपला जावा, यासाठी आपले प्रशासन निश्चितपणे या वारशाकडे भावनिक दृष्टिकोनातून पाहील याची खात्री आहे. क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाईंची शिकवण तळागाळापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. तसेच जुन महिन्याच्या अखेरीस पुण्यामध्ये मान्सून दाखल होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात पुणे शहरातील अनेक भागामध्ये पाणी साचणे, रस्त्यांवर खड्डे पडणे यासारख्या समस्या निर्माण होतात. पावसाळा सुरु होण्यापूर्वी पुणे शहरातील सर्व नाले, पावसाळी गटारांची सफाई, गाळ काढणे ही कामे होणे अत्यावश्यक आहे. तसेच रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यामुळे छोटे मोठे अपघात होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी खड्ड्याची पाहणी करून या खड्ड्याची तातडीने डागडुजी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून टास्क फ़ोर्स तयार करून पुणे शहरातील सर्व नाल्यांची मान्सूनपूर्व सफाई आणि आपत्कालीन व्यवस्था सज्जतेबाबत उचित कार्यवाही व्हावी. मा.आयुक्त श्री. राजेंद्र भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबधित विभाग प्रमुखांना पुढील कार्यवाही करणेबाबत सूचना केल्या.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांचा छत्रपतींच्या वंशजांना सवाल ..कोण होतास तू ..काय झालास तू …

महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या फुले वाड्यात जाऊन मुलीची पहिली शाळा प्रतापसिंह राजे यांनी सुरु केल्याचे वादग्रस्त वक्तव्य केलेल्या उदयनराजे भोसले यांचा समाचार कॉंग्रेस पक्षाने घेतला आहे. कॉंग्रेस चे प्रदेश अध्यक्ष मधुकर सकपाळ यांनी म्हटले कि, खुद्द छत्रपतींची समाधी ज्यांनी लपवून ठेवली त्यांची पाठराखण आणि ज्या फुलेंनी छत्रपतींची समाधी शोधून काढली त्यांच्या क्रांतिकारक कामाबाबत असे वक्तव्य .. यामुळे छत्रपतींच्या या वंशजांना .. कोण होतास तू … काय झालास तू … असे विचारावे लागेल.

फुले दाम्पत्य ज्या प्रवृत्तींच्या विरोधात लढले त्या प्रवृत्तीने पुन्हा डोके वर काढले

समता, बंधुता व सामाजिक न्यायाला बाजूला सारण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न.

तनिषा भिसेंच्या मृत्यूनंतर तात्काळ गुन्हे दाखल करायला हवे होते पण सरकारकडून वेळकाढूपणा, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी फुले वाड्याला भेट देऊन महात्मा फुले यांना अभिवादन केले तसेच भिसे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली.

पुणे दि. ११ एप्रिल २०२५
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशासाठी तनिषा भिसे या भगिनीला उपचार नाकारल्याने तिचा मृत्यू झाला. हा रुग्णालयाने घेतलेला बळी आहे. या धर्मादाय रुग्णालयाने अटी व शर्थींचा भंग केलेला आहे पण कारवाई करताना सरकार वेळकाढूपणा करत आहे. मंगेशकर रुग्णालयातील दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या रुग्णालयाचे संचालक मंडळ बरखास्त करून सरकारने दवाखाना ताब्यात घ्यावा. डॉ. केळकर व रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधिशांमार्फत एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पुण्यात महात्मा ज्योतीबा फुले जयंतीनिमित्त फुलेवाड्यात जाऊन अभिवादन केले व त्यानंतर भिसे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली,यावेळी प्रदेशाध्यक्षांसोबत पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार दिप्ती चौधरी,प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी,प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय ठाकरे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले की, लता मंगेशकर यांच्या जादुई आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले पण आता, कोण होतास तू काय झालस तू, अशी अवस्था झाली आहे. जी घटना झाली ती अत्यंत वाईट आहे. एका गर्भवती महिलेला पैशासाठी साडेपाच तास ताटकळत ठेवून उपचार नाकारले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मंगेशकर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावे. मयत भिसे यांच्या पतीचा व डॉ. केळकर यांचा सीडीआर ताब्यात घ्यावा. या घटनेनंतर तात्काळ गुन्हे दाखल करायला हवे होते पण सरकार वेळकाढूपणा करत आहे, असे सपकाळ म्हणाले.

दीनानाथ मंगशेकर रुग्णालयात जो प्रकार झाला तो अमानुष असून माणुसकीला काळीमा फासणारा आहे. एवढी मोठी घटना होऊन रुग्णालय प्रशासन व डॉक्टरांना जराही शरम वाटत नाही. प्रशासन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे का असा संशय येत आहे. सर्व घटनाक्रम विषण्ण करणारा आहे. स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना जर असा प्रकार घडत असेल तर अत्यंत दुखःद आहे. या प्रकरणात डॉ. केळकर असल्याचे दिसते, प्रशासनाने त्यांना बडतर्फ करावे त्यांच्यावर कटात सहभागी असल्याचा गुन्हा दाखल करावा, डॉ. केळकर यांनी पहिला फोन उचलला पण नंतर एकही फोन उचलला नाही. जबाबदार माणूस असे कसे वागू शकतो. डॉ. केळकर यांचा सीडीआर तपासला पाहिजे. सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे असे वाटते. झालेली घटना दुर्दैवी आहे, आज भिसे परिवाराला आधार देण्यासाठी त्यांची सांत्वनपर भेट घेतली असे सपकाळ म्हणाले.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वसा व वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. परंतु फुले दाम्पत्य ज्या प्रवृत्तींच्या विरोधात लढले त्या प्रवृत्तींनी आज पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्था पुन्हा लागू करण्याचा डाव आहे. संविधानातील समता, बंधुता व सामाजिक न्याय या मुल्ल्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. फुले दाम्पत्याने मुलींची पहिला शाळा काढली त्यावेळी सावित्रीबाई फुलेंवर दगड फेकणारे, शेण फेकणारे विदेशातून आले नव्हते, महिला शिकली तर धर्म बुडेल या विचाराच्या लोकांनीच त्यांना छळले. आता फुले चित्रपटातून तो भाग वगळावा असे सेन्सॉर बोर्ड सांगत आहे, ही लपवाछपवी कशासाठी? मंत्री चंद्रकांत पाटील आज फुले वाड्यावर बोलताना म्हणाले की पूर्वी तसे होत होते पण आता होत नाही. संविधानामुळे ते होत नाही. पण चंद्रकांत पाटील यांच्या पक्षाला हे मान्य आहे का? भाजपासाठी गोळवलकरांचे ‘बंच ऑफ थॉट’ हे बायबल आहे, त्यात महिला शिक्षणाला थारा नाही. चातुर्वर्ण्याबरोबर पाचवा वर्ण महिला सांगितलेला असून महिलांना अति शुद्र म्हटले आहे ते चंद्रकांत पाटील यांना मान्य आहे का? असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला.

फुले दांपत्यांनी सुरु केलेली क्रांती बाबत .. अजूनही काही वर्गात जळजळतंय

‘फुले’ चित्रपटातील दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप:प्रकाश आंबेडकरांचा इशारा; चित्रपट जसाच्या तसा प्रदर्शित करण्याची मागणी

पुणे-महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व कार्यावर आधारित ‘फुले’या सिनेमातील काही दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्याने या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, या चित्रपटात ज्याप्रकारे खरा इतिहास मांडला गेला आहे तो जसाच्या तसा प्रदर्शित केला जावा. सेन्सार बोर्डाकडून समाजावर परिणाम कोणत्या गोष्टीने होईल याची तपासणी केली जाते, पण संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. या चित्रपटातून कुठे तेढ निर्माण होणार नाही हे पाहणे महत्वाचे आहे. सेन्सॉर बोर्डाला विरोध करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार असून जर सेन्सार बोर्ड आपला विरोध कायम ठेवणार असेल तर, सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांचे घरासमोर आम्ही आंदोलन केल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त फुले वाडयात फुले दाम्पत्याच्या पुतळयास अभिवादन केल्यानंतर बाेलताना ते म्हणाले, सरकारने महात्मा फुले यांचे वाडमय प्रसिध्द करणे गरजेचे आहे. चित्रपटातील दृश्य ही समग्र वाडमयावर आधारित असून जर सेन्सॉर बोर्डाने लावलेली कात्री काढली नाही तर आम्ही त्यांच्या कार्यालयावर आंदोलन करु. चित्रपटातील दृश्य काढायला सांगणे म्हणजे विचारस्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे. सरकार एका बाजूला फुले यांना अभिवादन करते परंतु दुसऱ्या बाजूला त्यांच्या कार्यावर आधारित चित्रपटाला विरोध करते हा विरोधाभास थांबवला पाहिजे. त्यामुळे सदर चित्रपट आहे तशा तथ्यासह प्रदर्शित होणे महत्वाचे आहे.

मुलींची पहिली शाळा प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली:महात्मा फुलेंनी अनुकरण केलं- उदयनराजेंचे वादग्रस्त वक्तव्य

पुणे- स्त्री शिक्षणाची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली. महात्मा जोतिबा फुले यांनी एका दृष्टिकोनातून थोरले प्रतापसिंह महाराज यांचे अनुकरण केले. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत सर्वप्रथम काेणी पाऊल उचलले असेल, तर ते थाेरले प्रतापसिंह महाराज हाेते, असा दावा शुक्रवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. महात्मा फुले वाड्यामध्ये जाऊन उदयन राजे यांनी हे वक्तव्य केले .

खासदार उदयनराजे भोसले महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात फुलेवाडा येथे जात अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी साधलेल्या संवादामध्ये ते म्हणाले की, स्त्री शिक्षणाची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली. महात्मा जोतिबा फुले यांनी एका दृष्टीकोनातून थोरले प्रतापसिंह महाराज यांचे अनुकरण केले. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत सर्वप्रथम काेणी पाऊल उचलले असेल, तर ते थाेरले प्रतापसिंह महाराज हाेते​​​​​​. त्यांनी स्वत:च्या सातारा येथील राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरू केली हाेती. विशेष म्हणजे याच राजवाड्यात देशाचे संविधान निर्माण करणारे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील प्राथमिक शिक्षण झाले, असे दावाही त्यांनी केला.

उदयनराजे पुढे म्हणाले की, महात्मा फुले हे दूरदर्शी नेतृत्व हाेते. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून सर्व समाज सुधारण्याचे कामाकरिता आयुष्य खर्ची केले. जे युगपुरुष हाेऊन गेले त्यांचे स्मारक जतन करणे आपले र्कतव्य आहे. त्यातून भावी पिढीला प्रेरणा मिळून सदर विचारांचे त्यांनी पालन करून ते आचरणात आणावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:चे आयुष्यभर लाेकांकरिता व राज्यकारभारात लाेकांचा सक्रिय सहभाग असावा यादृष्टीने काम केले.

महापुरुष यांच्याबाबत सातत्याने अनुदगार काढले जातात हे दुर्देव आहे. महापुरुषांचा अपमान होऊ नये. याबाबत कठाेर कारवाई कायद्याने झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर दर्जेदार शासनमान्य ग्रंथ अद्याप प्रकाशित झालेला नाही. अनेकजण कल्पनेतून कादंबरी लिहितात. त्यावर एखादा चित्रपट निघताे आणि वाद निर्माण हाेतात. ऐतिहासिक गाेष्टी संर्दभ तपासणीसाठी एक तज्ञांचे सेन्साॅर बाेर्ड असावे, अशी मागणीही त्यांनी केली.

उदयनराजे म्हणाले की, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकाचा विषय कदाचित तांत्रिक किंवा पर्यावरण विषयक अडचणीमुळे रखडले असावे, पण जर त्याठिकाणी समुद्रात स्मारक करण्यासाठी अडचण येत असेल तर अरबी समुद्रालगत 48 एकर जागा उपलब्ध असून त्याठिकाणी महाराजांचे भव्य स्मारक करण्यात यावे. याबाबत मी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी व इतरांशी देखील चर्चा केली आहे. त्यांनी यासंर्दभात स्पष्ट घाेषणा करावा अशी माझी अपेक्षा आहे.

वारजे माळवाडीतील गॅससिलिंडर स्फोटात बाप-लेकाचा मृत्यू, व्हेंटीलेशन नसल्याने घरमालकावर गुन्हा दाखल

संबधित खोलीला व्हेंटीलेशन नसल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. तसेच एकच दरवाजा असल्यामुळे शॉर्टसर्किट संपुर्ण पत्र्याच्या खोलीला झाले. पत्र्यालाच करंट असल्याुमळे मुडावत बाप-लेकाला दरवाजा उघडता आला नाही. त्यानंतर घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होउन दोघांचा मृत्यू झाला. बाप-लेकाच्या मृत्यूला खोली मालक जबाबदार असल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.

पुणे–पत्र्याच्या खोलीला शॉर्टसर्किट झाल्यानंतर गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची घटना ९ एप्रिलला रात्री साडेबाराच्या सुमारास वारजे भागातील गोकुळनगर परिसरात घडली होती. याप्रकरणी कोणत्याही प्रकारणाची सुरक्षितता खोली मालकाने घेतली नाही. संपुर्ण पत्र्याच्या खोलीत करंट उतरल्यामुळे बाप-लेकाला घराबाहेर येता आले नाही. त्यानंतर गॅसचा स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित खोली मालकाविरूद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नितीन नारायण बराटे वय ४२, रा. हर्षवर्धन इमारत, वारजे गावठाण असे गुन्हा दाखल झालेल्या खोली मालकाचे नाव आहे. मोहन माणिक मुडावत (वय ४३), पप्पु मोहन मुडावत (वय २३ दोघे सध्या रा. गोकुळनगर, वारजे माळवाडी) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडीतील गोकुळनगर भागात पत्र्याच्या खोलीत मोहन आणि पप्पू राहायला होते. ९ एप्रिलला मध्यरात्री सिलिंडरमधून गॅस गळती होऊन स्फोट झाला. स्फोटात गंभीररित्या जखमी झाल्यामुळे मुडावत बाप-लेकाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, शॉर्टसर्किट झाल्यानंतर घरात आग लागली. त्यावेळी मोहन आणि पप्पू गाढ झोपेत होते. आग लागल्यानंतर दोघेही झोपेतून जागे झाले. त्यानंतर ते घरातील मोरीत लपले होते. मात्र, त्याचवेळी खोलीतील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरला आग लागून स्फोट झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

आता चीनने अमेरिकेवर 125% टॅरिफ लादला:जिनपिंग म्हणाले- आम्ही दबावापुढे झुकत नाही

कच्च्या तेलाचा दर आता प्रति बॅरल $६३ च्या खाली आला

वॉशिंग्टन-अमेरिका आणि चीनमधील टेरिफ वॉर वाढत आहे. अमेरिकेने १४५% कर लादल्यानंतर, चीनने आता १२५% कर लादला आहे. उद्यापासून याची अंमलबजावणी होईल. अमेरिकेने लादलेल्या कोणत्याही अतिरिक्त शुल्काला आता ते प्रतिसाद देणार नाही, असे चीनने म्हटले आहे.

अमेरिकेने लादलेले असामान्य शुल्क आंतरराष्ट्रीय आणि आर्थिक व्यापार नियमांचे गंभीर उल्लंघन करते, असे चीनने म्हटले आहे. हे दबाव आणि धमकीचे पूर्णपणे एकतर्फी धोरण आहे.

शी जिनपिंग म्हणाले- चीन कोणालाही घाबरत नाही

अमेरिकेसोबतच्या वाढत्या टेरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पहिल्यांदाच विधान केले आहे. ते म्हणाले की, चीन कोणालाही घाबरत नाही. गेल्या ७० वर्षात चीनचा विकास हा कठोर परिश्रम आणि स्वावलंबनाचा परिणाम आहे.

जिनपिंग म्हणाले-चीन कधीही इतरांच्या दानधर्मावर अवलंबून राहिलेले नाही. किंवा मी कधीही कोणाच्या बळाला घाबरलो नाही. जग कितीही बदलले तरी चीनला काळजी नाही.जिनपिंग म्हणाले की, व्यापार युद्धात कोणीही विजेता नसतो. जगाविरुद्ध जाणे म्हणजे स्वतःविरुद्ध जाणे. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान जिनपिंग यांनी हे सांगितले. सांचेझ शुक्रवारी चीनच्या दौऱ्यावर आले.

ट्रम्प यांनी कर जाहीर केल्यानंतर चीनला भेट देणारे सांचेझ हे पहिले युरोपीय नेते आहेत. सांचेझ यांनीही ट्रम्प यांच्यावर शुल्कांवर टीका केली. त्यांनी ८ एप्रिल रोजी सांगितले की ट्रम्प यांचे टेरिफ युरोपला नवीन बाजारपेठ शोधण्यास भाग पाडतील. याशिवाय, युरोपीय देश आणि चीन दोन्ही त्यांचे संबंध सुधारण्याचा विचार करतील.

अमेरिकेने चीनवर १२५% नाही तर १४५% कर लादला आहे. व्हाईट हाऊसने हे स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांनी बुधवारी चीनवर १२५% कर लादण्याची घोषणा केली. त्यानंतर गुरुवारी, व्हाईट हाऊसने सांगितले की ते फेंटानिलवर २०% कर जोडत आहे, जो मार्च २०२५ मध्ये लागू होईल.

फेंटानिल ड्रग तस्करीमध्ये चीनच्या कथित भूमिकेबद्दल ट्रम्प यांने ४ मार्च रोजी चीनवर २०% कर लादला. आतापर्यंत ते वेगळे मोजले जात होते. व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार, चीनवर १२५% कर, फेंटानिलवर २०% कर. यामध्ये १% विविध समायोजन देखील समाविष्ट आहे. विविध समायोजन लादण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

चीनवर १४५% कर लादण्याचा अर्थ असा आहे की चीनमध्ये बनवलेले १०० डॉलर्सचे उत्पादन आता अमेरिकेत पोहोचल्यावर २४५ डॉलर्सचे होईल. अमेरिकेत चिनी वस्तू महाग झाल्यामुळे त्यांची विक्री कमी होईल. चीननेही अमेरिकेवर ८४% प्रत्युत्तरात्मक शुल्क लादले आहे.

फेंटानिल हे ड्रग हेरॉइनपेक्षा ५० पट जास्त आणि मॉर्फिनपेक्षा १०० पट जास्त शक्तिशाली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणतात की हे ड्रग चीनमध्ये तयार केले जाते आणि तेथून ते मेक्सिको आणि कॅनडामार्गे अमेरिकेत पाठवले जाते. हे थांबवण्यात चीन सरकारला अपयश आले आहे.

सीडीसीच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये, फेंटानिलच्या अतिसेवनामुळे ७०,००० हून अधिक अमेरिकन लोकांचा मृत्यू . ट्रम्प यांचा असा दावा आहे की हे ड्रग अमेरिकेला आतून ‘पोकळ’ करत आहे. त्यांनी याला चीनचे षड्यंत्रही म्हटले आहे.

अहवालांनुसार, चीन पूर्वी फेंटानिलचा सर्वात मोठा स्रोत होता. पण २०१९ मध्ये चीन सरकारने त्यावर बंदी घातली. तेव्हापासून, ड्रग्ज तस्कर फेंटानिलऐवजी चीनमधून रसायने पाठवतात. यानंतर, मेक्सिकन ड्रग कार्टेल ते प्रयोगशाळेत तयार करतात. डीईएच्या अहवालानुसार ९७% फेंटॅनिल मेक्सिकन सीमेवरून अमेरिकेत प्रवेश करते.

अमेरिकन शेअर बाजार कोसळलाअमेरिकन सरकारी बाँड बाजारात पुन्हा विक्री सुरू झाली. त्याच वेळी, शेअर बाजाराचा नॅस्डॅक कंपोझिट निर्देशांक सुमारे ७% ने घसरला. यासोबतच अॅपल, एनव्हीडिया आणि इतर कंपन्यांचे शेअर्सही घसरले. तेलाच्या किमती जवळपास ४% घसरल्या, कच्च्या तेलाचा दर आता प्रति बॅरल $६३ च्या खाली आला आहे.

ट्रम्प यांनी ९ एप्रिल रोजी सांगितले होते की ७५ हून अधिक देशांनी अमेरिकेच्या प्रतिनिधींना बोलावले आहे आणि माझ्या सूचनेनुसार या देशांनी अमेरिकेविरुद्ध कोणत्याही प्रकारे प्रत्युत्तर दिलेले नाही. म्हणून मी ९० दिवसांचा विराम स्वीकारला आहे. या टेरिफवरील विरामामुळे नवीन व्यापार करारांवर वाटाघाटी करण्यासाठी वेळ मिळेल.

यापूर्वी २ एप्रिल रोजी त्यांनी वेगवेगळ्या देशांसाठी परस्पर शुल्क जाहीर केले होते. याअंतर्गत भारतावर २६% दरही लादण्यात आला. पण आता चीन वगळता सर्व देशांवर ९० दिवसांसाठी १०% बेसलाइन टेरिफ लादण्यात आला आहे.
इतर देशांवरील शुल्क काढून टाकण्याची कारणे… मंदी, महागाईचा धोका होता, जवळचे देशही शुल्काविरुद्ध होते

१. ट्रम्प टेरिफमुळे अमेरिकेसह जागतिक बाजारपेठेत १० ट्रिलियन डॉलर्सची घसरण झाली. तथापि, टॅरिफ थांबवण्याच्या निर्णयाच्या काही तासांतच, अमेरिकन शेअर बाजाराचे मूल्य $3.1 ट्रिलियनने वाढले.

२. ट्रम्प यांच्या अनेक जवळच्या सल्लागारांनी आणि स्वतः एलन मस्क यांनी टेरिफ वॉर थांबवण्याचा सल्ला दिला होता. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे अनेक नेतेही या शुल्काच्या विरोधात होते. मिच मॅककोनेल, रँड पॉल, सुसान कॉलिन्स आणि लिसा मुर्कोव्स्की यांनी या शुल्कांना “असंवैधानिक, अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवणारे आणि राजनैतिकदृष्ट्या धोकादायक” म्हटले.

३. या टेरिफमुळे अमेरिकन बाँड्सची अनपेक्षित विक्री झाली. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली होती, परिस्थिती कोरोना काळातील परिस्थितीसारखी होत चालली होती.

४. वॉल स्ट्रीट बँकांनी इशारा दिला होता की टॅरिफमुळे अमेरिकेत महागाई, वाढती बेरोजगारी आणि मंदी येईल.

५. अमेरिका चीनकडून ४४० अब्ज डॉलर्सची आयात करते. यावर १४५% कर लादला आहे. चीनमधून उत्पादने आयात करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांसाठी पर्याय शोधणे आता एक मोठे आव्हान बनत चालले होते. अशा परिस्थितीत, या कंपन्यांच्या पुरवठा साखळीसाठी इतर देशांवरील शुल्क थांबवणे आवश्यक होते.

चीनकडे सुमारे ६०० अब्ज पौंड (सुमारे $७६० अब्ज) अमेरिकन सरकारी रोखे आहेत. याचा अर्थ असा की चीनकडे अमेरिकन अर्थव्यवस्थेवर प्रभाव पाडण्याची मोठी शक्ती आहे. त्याच वेळी, चीननेही तयारी सुरू केली आहे.

चीनने औद्योगिक क्षेत्राला १.९ ट्रिलियन डॉलर्सचे अतिरिक्त कर्ज दिले आहे. यामुळे येथील कारखान्यांचे बांधकाम आणि अपग्रेडेशन वेगाने झाले. हुआवेईने शांघायमध्ये ३५,००० अभियंत्यांसाठी एक संशोधन केंद्र उघडले आहे, जे गुगलच्या कॅलिफोर्नियातील मुख्यालयापेक्षा १० पट मोठे आहे. यामुळे तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षमता वाढेल.

मंगेशकर रुग्णालयाची सेवाभावीवृत्ती,भुजबळांचा फुले स्मारकाच्या कामासाठी उपोषणाचा इशारा , पेट्रोल डीझेलची दरवाढ,फुलेंच्या जीवनावरील चित्रपट,सुप्रिया सुळे यांचे उपोषण.. विविध प्रश्नांना अजित पवारांची उत्तरे

पुणे – महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार प्रसार माध्यमांशी बोलत होते.यावेळी त्यांनी मंगेशकर हॉस्पिटल , रुग्णालयांची सेवाभावी वृत्ती ,मंगेशकर कुटुंबाचे योगदान ,भुजबळांचा फुले स्मारकाच्या कामासाठी उपोषणाचा इशारा , फुलेंच्या जीवनावरील चित्रपट , सुप्रिया सुळे यांचे उपोषण,पेट्रोल डीझेलची दरवाढ अशा पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर उत्तरे दिली.

माझ्या बहिणीला पुन्हा उपोषण करण्याची वेळ येऊ नये, अशी सक्त ताकीद आपण जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकार्‍यांना दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. भोर तालुक्यातील या रस्त्या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. श्रीक्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याची दूरावस्था झाली असून रस्ता करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती. यावर आता अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाबाबत देखील अजित पवार यांनी भाष्य केले. हा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र हा तीढा नक्की सुटेल, जरा धीर धरा, अशा शब्दात अजित पवार यांनी या संदर्भात संयमाचा सल्ला दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. श्रीक्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याची दुर्दशा झाली आहे, तो लवकरात लवकर करावा ह्या मागणीसह सरकारी अनास्थेचा निषेध करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंकडून धरणे आंदोलन करण्यात आले होते. या संदर्भात सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, बनेश्वर देवस्थानांकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अजून झालेले नाही हे खूप दुर्दैवी आहे. ज्या शहरामध्ये करोडो रुपयांची मेट्रो होऊ शकते, करोडो रुपयांचे रस्ते नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात देशभरात होत आहे. नितीन गडकरी यांच्याकडे कधीही कामासंदर्भात गेलो तर ते नाही म्हणत नाही. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व टीमच्या पाठपुराव्यांमुळे सर्वच रस्ते झाले आहेत. तसेच हा रस्ता लवकर करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिक आणि रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तीढा सुटलेला नसला तरी त्यावर काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून तिथले जिल्हा नियोजनाचे बजेट दिलेले आहे. निधी दिलेला आहे. या दोन्ही ठिकाणी निधी वाढवण्यात देखील आला आहे. 22 हजार कोटी रुपयांची सगळीकडे तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाचा देखील तीढा सुटेल थोडा धीर धरा, धीरे… धीरे, अशा शब्दात अजित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

बाणेरमध्ये पदवीधर तरुणाकडून साडेतीन लाखांचा हायड्रोफोनिक गांजा जप्त

पुणे-पुणे शहरातील बाणेर परिसरात ओझोकुशची (हायड्रोफोनीक गांजा) तस्करी करणाऱ्याला अंमली पदार्थ विरोधी दोनने अटक केली आहे.अर्जुन लिंगराज टोटिगर ( वय २६ वर्षे, रा. सुखवानी पॅनरोमा, सुसगांव, बाणेर) असे अटक केलेल्या तस्कराचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून ३ लाख ५ हजारांचा ३० ग्रॅम ५४० मिली ग्रॅम ओझोकुश गांजा (हायड्रोफोनीक गांजा) इतर ऐवज जप्त केला. त्याच्याविरुध्द बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपी हा मार्केटींग आणि सेल्सचा पदवीधर असून सध्या तो खाजगी कंपनीमध्ये काम करीत आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक दोन हे १० एप्रिलला बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना शिवशक्ती चौक बाणेरमध्ये एकजण गांजा तस्करी करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, एपीआय नितीनकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीला ताब्यात घेतले.त्याच्याकडून ३ लाख ५ हजारांचा गांजा जप्त केला.ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, आझाद पाटील, प्रशांत बोमादंड्डी, साहिल शेख, रविंद्र रोकडे, संदिप जाधव, मयुर सुर्यवंशी, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.

महार रेजिमेंट मुख्यालय बाबासाहेबांचा पुतळा उभारणार : रामदास आठवले

पुणे : भारतीय सैन्य दलाच्या महार रेजिमेंटच्या मध्य प्रदेश येथील मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

भारतीय सैन्य दलातील महार रेजिमेंट मध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व सैनिकांकडून गेल्या 40 वर्षांपासून रेजिमेंटच्या मुख्यालयात बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करावा अशी मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भामध्ये पुणे येथे झालेल्या बैठकीत रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावर याबाबत आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

आज पाषाण येथील यशदा येथे नीती आयोगाच्या कार्यक्रमासाठी रामदास आठवले आले होते, यावेळी महार रेजिमेंट व रिपब्लिकन युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने आठवले यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले होते.

यावेळी बोलताना आठवले यांनी ” आपण बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी उभारावा यासाठी आग्रही आहोत , यासंदर्भात राजनाथ सिंग यांची भेट घेऊन त्यांचेही मत सकारात्मक तयार करणार आहे. दरम्यान या प्रश्नावर गरज पडल्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही सुद्धा भेट घेऊ असे स्पष्ट आश्वासन आठवले यांनी दिले.

रामदास आठवले यांना भेटलेल्या शिष्टमंडळात राहुल डंबाळे यांच्या समवेत संतोष वानखेडे , बुद्धा चव्हाण , राहुल ससाने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सिंचन घोटाळ्याची चौकशी कधीच करायची नव्हती:फक्त धमकी देऊन महाराष्ट्रात सत्ता आणायची होती, शहांच्या दौऱ्यावरून दमानियांचा घणाघात

मुंबई- केंद्रीय गृहमंत्री उद्यापासून दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. 12 एप्रिल रोजी ते रायगडावर भेट देतील. या दौऱ्यात ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी जाणार आहेत. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी 72 हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख करत जोरदार टीका केली. या घोटाळ्याची चौकशी करायची नव्हती, फक्त धमकावून सत्ता आणायची होती, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

2004 ते 2008 या काळात महाराष्ट्रात 72 हजार कोटींचा कथित सिंचन घोटाळा झाला होता. मात्र 2012 मध्ये तो उघडकीस आला. या घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे डिसेंबर 2014 मध्ये अजित पवार, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्याविरोधात चौकशी सुरु करण्यात आली होती. 20 डिसेंबर 2019 रोजी अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली होती. सिंचन घोटाळ्याचे आरोप झालेले सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी गृहमंत्री अमित शहा जाणार असल्यामुळे अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे.

अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत 72 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला आहे. कितीही मोठा घोटाळा करा, काही प्रॉब्लेम नाही, असे दमानिया म्हणाल्या. 72 हजार कोटीचा सिंचन घोटाळा आठवतो का? त्याचे पुढे काय झाले? काहीच नाही ना? कारण आपले थर्ड क्लास राजकारण. घोटाळ्याची चौकशी कधीच करायची नव्हती. फक्त धमकी देऊन, महाराष्ट्रात सत्ता आणायची होती, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला. आता त्याच तटकरेंच्या घरी गृहमंत्री जेवायला जाणार? अतिउत्तम! ED आणि ACB आता गुंडाळून टाका, अशी टीका अंजली दमानिया यांनी केली.अमित शहा 12 एप्रिल रोजी रायगड दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 12 एप्रिल रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. रायगड किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहतील. यानंतर ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे यांच्या घरी भोजनासाठी जाणार असल्याची माहिती आहे. रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर अमित शाह हे सुनील तटकरे यांच्याकडे सुतारवाडीला रवाना होणार आहेत.

असा असेल अमित शहांचा महाराष्ट्र दौरा

दिनांक 11 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता पुणे विमानतळावर आगमन.
12 एप्रिल रोजी सकाळी 10.45 वाजता पाचाडमध्ये लँडींग
सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत रायगड किल्ल्यावरील मुख्य कार्यक्रमाला उपस्थिती
दुपारी 1.30 वाजता पाचाडवरुन टेक ऑफ
दुपारी 2 वाजता सुतारवाडी (सुनिल तटकरे निवासस्थान) येथे भोजनासाठी थांबणार असल्याची माहिती
दुपारी 3 वाजता मुंबईकडे रवाना
दुपारी 4 ते 6 विलेपार्ले कार्यक्रम (चित्रलेखा साप्ताहिकाचा कार्यक्रम – मुकेश पटेल सभागृह)
रात्री सह्याद्री अतिथीगृहावर मुक्काम
दुसऱ्या दिवशी 13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता दिल्लीकडे रवाना

मंगेशकर कुटुंब म्हणजे लुटारूंची टोळी:माणुसकीला लागलेला कलंक; तनिषा भिसे प्रकरणात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची तिखट टीका (व्हिडीओ)

मुंबई-तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबीयांवर कडाडून हल्ला चढवला आहे. मंगेशकर कुटुंब माणुसकीला लागलेला कलंक आहे. त्यांनी कधी कुणाला काही दान केले आहे का? खिलारे पाटलांनी त्यांना रुग्णालयासाठी जमीन दान दिली, पण त्यांनी त्यांनाही सोडले नाही, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानाचे तीव्र राजकीय पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

तनिषा भिसे नामक गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चांगलेच वादात सापडले आहे. या रुग्णालयावर गंभीर स्थिती रुग्णालयात आलेल्या तनिषा यांच्या कुटुंबीयांकडे प्रसूतीसाठी तब्बल 10 लाख रुपयांची अनामत रक्कम मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनावर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबीयांवर टीकेची झोड उठवली आहे.

विजय वडेट्टीवार बुधवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, तनिषा भिसे मृत्यू प्रकरण मी रोज वाचतो आहे. मंगेशकर कुटुंब म्हणजे लुटारुंची टोळी आहे. त्यांच्यापैकी कुणी कधी काही दान केले आहे का? चांगले गाणे म्हटले म्हणून सगळ्यांनी मिरवले… लतादीदी, आशादीदी, हे दीदी, ते दीदी… यांनी लोकांसाठी आणि देशासाठी काय केले? खिलारे पाटलांनी यांना जमीन दान केली, पण मंगेशकरांनी त्यांनाही सोडले नाही. त्यामुळे हे माणुसकीला कलंक आहेत असे मी म्हणतो. अशा पद्धतीने रुग्णालय चालवत असतील, तर मंगेशकर कुटुंब कलंक आहेत. विजय वडेट्टीवार यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

रावेतकरांचा वचक होता तो आताच्या आरोग्यप्रमुखांच्या नशिबी कुठला ? त्यांच्या निर्णयाला IMA ने केला कडाडून विरोध,म्हणाले,’तुमची सक्ती गैरलागू…

पुणे- महापालिकेच्या आरोग्य प्रमुख पदी डॉ. अनिल रावेतकर,जी बी परदेशी ,रुपचंद परदेशी ,डॉ. धायगुडे अशा महापालिका अधिकाऱ्यांनी काम केले आहे. शहराच्या आरोग्याची जबाबदारी आपली मानून काम करणाऱ्या या अधिकाऱ्यांचा खाजगी , शासकीय अशा सर्वच रुग्णालयांवर जो वचक होता तोच वचक आता या पदावर सरकारी अधिकारी येऊ लागल्याने आणि प्रचंड भ्रष्ट कारभार वाढल्याने हरवून गेलाय . त्यांचे तोंडी आदेश सूचना यांना जो सन्मान होता तो आता लेखी पत्रांनाही उरला नसल्याचे स्पष्ट झालेय .
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर पुणे महानगरपालिकेने शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांना नोटीस बजावली. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर प्रथम उपचार करा, त्यानंतर त्यांच्याकडे पैसे मागा, असे नोटीसीत नमूद केले. तसेच या नियमाची अंमलबजावणी करण्याची सक्ती महापालिकेने केली आहे. मात्र, आता इंडियन मेडिकल असोसिएशन आणि हॉस्पिटल बोर्ड ॲाफ इंडियाकडून पुणे महापालिकेच्या या निर्णयाला विरोध दर्शवण्यात आला आहे. प्रशासनाची सक्ती गैरलागू असल्याचे आयएमएने म्हटले आहे. रुग्णाची इमर्जन्सी नेमकी कशी ठरवायची? असा अर्थहीन सवाल मेडिकल असोसिएशनने महापालिकेला केला आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी गर्भवती महिलेच्या उपचारासाठी नकार दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. तातडीने उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे यांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर पुणे महापालिका प्रशासनाने खडबडून जागे होत शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांना नोटीस बजावून उपचारापूर्वी डिपॉझिट घेण्यास मनाई केली आहे. याबाबत रुग्णालयांना नोटसी बजावण्यात आली. मात्र, आता या निर्णयाला आयएमएने विरोध दर्शवला आहे.

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या कायद्याप्रमाणे इस्टिमेट देणे आणि ॲडव्हान्स घेणे हे कायदेशीरमेडिकल असोसिएशन

रुग्णालये ही प्रथम सेवा आहे धंदा नंतर … असे मानणाऱ्या ना आता धक्क्यावर धक्के बसणार आहेत .कारण डिपॉझिट घेणे हे कायदेशीर असल्याचा दावा मेडिकल असोसिएशन ने केला आहे. तातडीच्या रुग्णांकडून पैसे घेऊ नयेत, ही महापालिकेची सक्ती गैरलागू असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे. अनेक जण याचा गैरफायदा घेतील, असा दावाही असोसिएशनच्या वतीने करण्यात आला. महापालिकेने यावर विचार करावा, अशी विनंती इंडियन मेडिकल असोसिएशन आणि हॉस्पिटल बोर्ड ॲाफ इंडियाने केली आहे.रुग्णाची इमर्जन्सी नेमकी कशी ठरवायची? असा सवाल करीत इमर्जन्सीमध्ये कुठलाही डॉक्टर आधी पैसे मागत नाही. आधी पेशंटची ट्रीटमेंट करतो, असा हास्यास्पद दावा मेडिकल असोसिएशनने केला आहे . महापालिकेच्या या निर्णयाचा अनेक जण गैरफायदा घेत आहेत. या नोटीसीचा देखील विपर्यास केला जात असल्याचे आयएमएने म्हटले. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या कायद्याप्रमाणे इस्टिमेट देणे आणि ॲडव्हान्स घेणे हे कायदेशीर आहे. खाजगी आणि धर्मादाय रुग्णालयाचे नियम हे वेगळे असतात. महापालिकेला देखील याबाबत आम्ही उत्तर देऊ, असे इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे.