Home Blog Page 579

संत नामदेव महाराज सायकल वारीचे पुण्यात उत्स्फूर्त स्वागत

संत नामदेव महाराज यांच्या  ७५४ व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान सायकल वारीचे आयोजन

पुणे :  संत नामदेव महाराज यांच्या  ७५४ व्या जयंतीनिमित्त पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यात आल्यावर या सायकल वारीचे  श्री नामदेव शिंपी समाज पुणे लष्कर, नामदेव समाजोन्नती परिषद व पुणेकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी लक्ष्मी रोड मार्गे बुधवार पेठ येथील संत नामदेव मंदिरापर्यंत नामदेव महाराजाच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली होती.
भागवत धर्म प्रसारक मंडळ, नामदेव समाजोन्नती परिषद, महाराष्ट्र राज्य, पालखी सोहळा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, श्री नामदेव दरबार कमिटी श्री क्षेत्र घुमान (पंजाब) यांच्या संयुक्त विद्यमाने या वारीचे आयोजन करण्यात आले. पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर, सरचिटणीस डॉ. अजय फुटाणे यांनी सोहळ्याचे संयोजन केले आहे. पालखीचे स्वागत पुणे विभागीय उपाध्यक्ष रणजित माळवदे, जिल्हाध्यक्ष विजय कालेकर, ना स.प. पुणे शहर शाखेचे अध्यक्ष संदीप लचके, सचिव सुभाष मुळे, प्रशांत सातपुते, सुभाष पांढरकामे, सोमनाथ मेटे, कुंदन गोरटे, अक्षय मांढरे यांनी केले.

श्री क्षेत्र पंढरपूरहून या सोहळ्यास प्रारंभ झाला. सोलापूर, सातारा, पुणे जिल्ह्यात निरा, जेजुरी, सासवड, हडपसर मार्गे वारी पुणे शहरात दाखल झाली. पालखी सोहळा व सायकल वारीची मिरवणूक बुधवार पेठ येथील नामदेव मंदिर येथे आल्यानंतर महिलांनी ओवाळून व पुष्पवृष्टी करीत स्वागत केले. यावेळी सायकल स्वारांचा सत्कार देखील करण्यात आला.

यावेळी वारीतील सहभागी सायकल स्वारांना मेडिकल किट देण्यात आले. सायकल स्वारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी नृत्य व सायकल वारीवर हिंदी गीताचे सादरीकरण करण्यात आले. या गीताची रचना करणारे सुधाकर मेहेर व संगीतकार हरीश धोंगडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पादुकांची पूजा करून महाआरती करण्यात आली. यावेळी बुधवार पेठ शिंपी समाज व संस्थेचे अध्यक्ष कैलास देवळे, चिटणीस डॉ. लक्ष्मण कालेकर यांच्यावतीने उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. 

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव व तुळशी विवाह संपन्न

पंच पक्वांन्नाच्या नैवेद्याचे सामाजिक संस्थांना दान

पुणे :
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव, तुळशी विवाह आणि ५६ भोग चा नैवेद्य करण्यात आला. यावेळी विविध पंच पक्वान आणि फळाची आरास बाप्पा समोर साकारण्यात आली होती.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टने नेहमी प्रमाणे सामाजिक भान राखून बाप्पाला दाखविण्यात येणाऱ्या नैवद्यातील सर्व मिठाई, फराळ आणि फळे सामाजिक संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दत्तवाडी येथील देवतारू आश्रम आणि मुळशी खोऱ्यातील कातकर वस्ती वरील ३०० विद्यार्थ्याना शिक्षण देणाऱ्या आणि दररोज ९० मुलांना जेवण पुरविणाऱ्या पौड येथील ‘डोनेट ऐड’ संस्था आणि भाजे येथील बालग्राम केंद्र यासर्वांना हे सर्व नैवेद्यचे पदार्थ देण्यात येणार आहे.

दिव्यांच्या सजावटीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाचे मंदिर उजळले
त्रिपुरारी पौर्णिमेंनिमित्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात दिवे लावून फुलांनी सुंदर सजावट करण्यात आली होती. काचेच्या ग्लासमधील दिव्यांनी संपूर्ण मंदीर उजळून निघाले होते. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ट्रस्टचे सर्व पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १ हजाराहून अधिक गुन्हे दाखल- राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपूत

पुणे: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने १ ऑक्टोबर २०२४ पासून १ हजार २६७ गुन्हे नोंदविण्यात आले असून १ हजार १७९ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ९८२ वाहनासह ५ कोटी ५५ लाख ६२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली आहे.

जिल्ह्यात सराईत गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ अन्वये ५९ प्रस्ताव संबंधित दंडाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले आहेत. सदर इसमांकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात येत असून आतापर्यंत १२ प्रकरणात रक्कम ११ कोटी ८० हजार रुपये इतक्या रक्कमेचे बंधपत्रे घेण्यात आलेली आहेत. या काळात गोवा राज्य निर्मित मद्याचे तीन गुन्हे उघडकीस आले असून या गुन्ह्यांमध्ये ४१ लाख ७७ हजार ३०५ रुपये किंमतीचा मुद्देमाल २ वाहनांसह जप्त करण्यात आलेला आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे, राज्य उत्पादन शुल्कचे अंमलबजावणी व दक्षता सह आयुक्त प्रसाद सुर्वे व श्री सागर धोमकर विभागीय उपायुक्त , राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार १ ऑक्टोबर २०२४ पासून विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून जिल्ह्यातील सर्व हातभट्टी निर्मिती, वाहतूक, विक्री, तसेच धाबे, अवैध ताडी धंदे यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

जिल्हयात कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या अनुज्ञप्तीचे वारंवार सखोल तपासणी करुन अनुज्ञप्तीच्या ठिकाणी नियमबाह्य बाबी आढळल्यास संबंधिताविरुद्ध नियमातील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यासाठी विशेष निरीक्षण मोहिम राबविण्यात येत आहे. अनुज्ञप्तीद्वारे शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याकरिता २४ बाय ७ गस्ती घालण्यात येत आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या एकुण १०९ अनुज्ञप्ती विरुध्द विभागीय विसंगती नोंदविण्यात आले असुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात अवैध मद्य वाहतुकीस आळा घालण्याच्या दृष्टीने एकूण १८ तात्पुरते चेकनाके उभारुन संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी अवैध मद्याची वाहतूक होणार नाही, मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या विहित वेळेत चालू व बंद होतील तसेच अल्पवयीन ग्राहकांना मद्यविक्री होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. तसेच मद्य विक्रीच्या अनुज्ञप्तीचे नियमित निरीक्षण करण्यात येत आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी अवैध मद्याची वाहतुक केली जाणार तसेच कुठल्याही अनुज्ञप्तीमधून विहीत वेळेच्या अगोदर व नंतर मद्य विक्री होणार नाही व वाईन शॉप व देशी दारुच्या दुकानांमधून घाऊक विक्री होणार नाही याकरिता डॉ. सुहास दिवसे, मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांनी त्यांसबंधित कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्ह्यात १८ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापसून ते २० नोव्हेंबर २०२४ मतदानप्रक्रिया पार पडेपर्यंत आणि २३ नोव्हेंबर २०२४ मतमोजणीच्या दिवशी सर्व विधानसभा मतदार संघाचे अधिकृत निकाल घोषित होईपर्यंत कोरडा दिवस (ड्रायडे) घोषित करण्यात आलेला आहे. या काळात जिल्ह्यातील मद्य विक्रीच्या अनुज्ञप्ती बंद राहतील. अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक किंवा मद्य वाटप आदी संबंधी माहिती, तक्रार द्यावयाची असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ व राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग अधीक्षक कार्यालयाच्या ०२०-२६१२७३२१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी केले आहे.

खेळाची मैदाने, तालमींचे पुनर्जीवन करण्यावर भर देणार-गणेश भोकरे –

; कसब्यात ‘मनसे’च्या इमानदार कार्यकर्त्याला निवडून देण्याचे आवाहन
पुणे: पेठांमध्ये मुलांना खेळाची मैदाने नाहीत. त्यांना बाहेर जावे लागते. या परिसराची आणखी एक ओळख आहे, ती इथल्या जुन्या तालमींची. याच तालमींमधून अनेक पैलवानांनी राष्ट्रीय स्तरावर आपले कर्तृत्व गाजवले. आज मात्र या तालमी मोडकळीस आलेल्या आहेत. येत्या काळात मतदारसंघात खेळाची मैदाने उपलब्ध करून देण्यासह जुन्या तालमीचे पुनर्जीवन करून तेथे पैलवान घडवण्यासाठी चांगले प्रशिक्षक देण्यावर माझा भर राहणार आहे, असा शब्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कसबा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार गणेश भोकरे यांनी दिला. 
टेंडर, कमिशन, कॉन्ट्रॅक्ट यातच अडकलेल्या या दोन्ही उमेदवारांना बाजूला ठेवून एका इमानदार कार्यकर्त्याला तुम्हाला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या, अशी साद भोकरे यांनी मतदारांना घातली आहे. स्वच्छ प्रतिमेचा तरुण, तडफदार आणि तडकीफड लोकांच्या समस्या सोडवणाऱ्या गणेश भोकरे यांना कसब्यामध्ये लोकांचा, माताभगिनींचा पाठिंबा मिळत आहे.
गणेश भोकरे म्हणाले, “गेल्या ३० वर्षांत भाजप, तर गेल्या दोन वर्षांत काँग्रेसचा आमदार येथे आहे. मात्र, कसब्यातील पायाभूत समस्याही सुटलेल्या नाहीत. वाढलेली महागाई, वाहतूककोंडी, गुन्हेगारी, कोयता गँगची दहशत, महिलांवरील अत्याचार यामुळे मतदारसंघातील लोकांमध्ये संताप आहे. दोन्ही उमेदवारांविषयी मतदारांमध्ये आणि पक्षांतर्गत प्रचंड नाराजी आहे. कसबावासीयांच्या समस्या जाणून घेत असून, त्यानुसार माझ्या विकास आराखड्याची निर्मिती केली आहे. या भागातच राहिलेलो असल्याने अनेक प्रश्नांची मला जाणीव आहे.”
शहरातील अनेक मोठ्या शाळांची मैदाने सुटीच्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांना वापरता यावेत, यासाठी नियोजन करणार आहे. तसेच तालमींच्या गरजा लक्षात घेऊन तिथे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. येत्या काळात या तालमींमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीगीर तयार करण्याचे ध्येय आहे. जुन्या वाड्यांचा नियोजनबद्ध पुनर्विकास आराखडा करून तेथेही नागरिकांसाठी विविध स्वरूपाच्या अमेनिटी स्पेस (सोयी-सुविधा) उपलब्ध करण्यासाठी मला काम करायचे आहे, असे भोकरे यांनी नमूद केले.

पर्वती:वयाच्या १०४ व्या वर्षी गृहमतदान करून ‘त्यांनी’ लोकशाहीच्या उत्सवात नोंदवला सहभाग

पुणे, दि. १६ : पर्वती मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक आणि उद्योगपती चंद्रभान पुनमचंद भन्साळी यांनी वयाच्या १०४ व्या वर्षी गृहमतदानाद्वारे हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवला. श्री. भन्साळी यांच्यामध्ये असलेला उत्साह आणि लोकशाहीबद्दलची दृढ निष्ठा यावेळी पहावयास मिळाली. प्रत्येकाने मतदान करून आपली लोकशाही बळकट करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

निवडणूक निर्णय अधिकारी श्री मनोजकुमार खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पर्वती मतदारसंघात गृह मतदान प्रक्रिया सूरू करण्यात आली आहे. फॉर्म १२ डी भरून गृह मतदानासाठी नोंदणी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. भन्साळी यांचे गृह मतदान करून घेण्यासाठी हे पथक त्यांच्या घरी पोहोचले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व्यंकटेश दुर्वास, नायब तहसीलदार सरिता पाटील पथकासोबत भन्साळी यांच्या उपस्थितीत गृहमतदानाची प्रक्रिया पार पडली.

‘सत्तेत १० वर्ष तुम्हीच, तरीही हिंदू खतरेमें ?’ सचिन सावंत यांचा सवाल

पुणे : केंद्रांमध्ये व नंतर राज्यातही भारतीय जनता पक्षाचीच सलग १० वर्षे सत्ता आहे, तरीही हिंदू खतरेंमे कसे काय? असा प्रश्न करत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित केला आहे.\पराभवाच्या भीतीने भारतीय जनता पक्ष आता हिंदु-मुस्लिम करत मतांचे धुव्रीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सचिन सावंत यांची काँग्रेसभवनमध्येआज पत्रकार परिषद झाली. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यावेळी उपस्थित होते.

यावेळी सावंत म्हणाले, ‘लोकसभेचे संविधान बदलाचे वातवरण बदलले आहे असे भाजप स्वत:च सांगत आहे. मात्र इतक्या दिवसांच्या प्रचारात तसे काहीही झालेले नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच आता मतांचे धर्मयुद्ध सारख्या गोष्टी देवेंद्र फडणवीस करत आहे. बटेंगे ते कटेंगे असे पंतप्रधान म्हणत आहे. भाजपच्या सर्वांनीच त्यांच्या पक्षाची घटना वाचून पहावी. त्यात स्पष्टपणे धर्मनिरपेक्ष विचारसरणीवर विश्वास व महात्मा गांधी यांना आदर्श मानून असे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस घटनात्मक पदावर आहेत. ते पद स्विकारताना त्यांनी घटनेची शपथ घेतली. त्याला विसंगत असे ते वागत आहेत.’

मतांचे धर्मयुद्ध यातील धर्मयुद्ध या शब्दाला आक्षेप घेत सावंत पुढे म्हणाले, ‘कौरव पांडव यांच्यात झाले ते धर्मयुद्ध होते. त्यात दोन्ही पक्ष सनातनी हिंदुच होते. याचा अर्थ धर्मयुद्ध हा शब्द नितीअनिती या अर्थाने वापरण्यात आला. फडणवीस मात्र तो हिंदुमुस्लिम या अर्थाने वापरत आहेत. ते घटनेच्या विरोधी आहे. आम्ही याविरोधात निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. त्याशिवाय आता दुरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये मधूनच एखादा रस्ता दाखवत त्यावर लाडकी बहिण योजनेचा फलक दाखवतात. तीच मालिका ओटीटी वर दाखवताना त्यात मात्र फलक नसतो. आचारसंहितेपासून पळवाट काढण्यासाठी भाजप हे करत असल्याचा आरोप सावंत यांनी केला.’

कॅन्टोन्मेंट मतदार संघातील शाळा, महाविद्यालयांमध्ये साडेसात हजार संकल्प पत्रांचे वाटप

पुणे, दि. १५: बालदिनाचे औचीत्य साधुन पुणे कॅन्टोन्मेंट (अ.जा.) विधानसभा मतदार संघात स्वीप व्यवस्थापन कक्षामार्फत विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये ७ हजार ६०० संकल्प पत्रांचे वाटप करुन विद्यार्थ्यांमार्फत “लोकशाहीच्या उत्सवात आई-बाबा तुम्ही सहभाग घ्या” अशी साद घालण्यात आली.

मतदान जनजागृती अंतर्गत कॅन्टोन्मेंट मतदार संघातील सरदार दस्तुर कॉमर्स ॲन्ड सायन्स कॉलेज, सरदार दस्तुर हायस्कुल व इतर संलग्न शाळा, कस्तुरबा गांधी मनपा शाळा, वाडीया ज्युनीअर कॉलेज आर्टस् सायन्स, वाडीया ज्युनीअर कॉलेज कॉमर्स, वाडीया ज्युनीअर इंजिनीअरींग कॉलेज, संत गाडगे महाराज शाळा, कॅम्प एज्युकेशन डॉ.सायरा पुनावाला स्कूल, रवींद्रनाथ टागोर स्कूल, पुना इस्लामीया उर्दु स्कुल तसेच संत गाडगे महाराज या शाळा, महाविद्यालयांमध्ये संकल्प पत्राचे वाटप करण्यात आले

शाळेत पालक सभेला उपस्थित पालकांना मतदानाची शपथ घेण्यात आली तसेच मतदानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघात आत्तापर्यंत जवळपास ४० शाळा,महाविद्यालये, २०० गृहनिर्माण सोसायट्या व ३० शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये जाऊन २८ हजार संकल्प पत्रांचे स्वीप कक्षामार्फत वाटप करण्यात आले आहे.

मारहाण करून अपहरण:भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह 11 जणांवर गुन्हा

पुणे-
प्लॉटिंगबाबत राष्ट्रीय हरित प्राधिकरणाकडे दिलेली तक्रार मागे घ्या, असे म्हणत माहिती अधिकार कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. तसेच, अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती आणि भाजपच्या माजी प्रभाग स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिखलीतील जाधववाडी येथे घडली.

अमित रमेश मोहिते, (वय – ३०, रा. गणेशसिद्धी सोसायटी, नेवाळे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून भाजपचे माजी प्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश लालचंद यादव, भाजपच्या माजी नगरसेविका अश्विनी जाधव यांचा पती संतोष तात्या जाधव यांच्यासह निलेश लालचंद यादव, गणेश किसन यादव, दिपक घन, गणेश नंदू मोरे, सोमनाथ यादव, स्वराज पिंजण, प्रकाश चौधरी, मनोज मोरे, कुंदन गुप्ता (सर्व रा. चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ” मोहिते हे माहिती अधिकार कार्यकर्ता आहेत. ते कामानिमित्त चिखली येथे थांबले असताना आरोपी त्याठिकाणी आले. चिखली येथील प्लॉटिंगबाबत एनजीटीकडे दिलेली तक्रार मागे घ्या. तेथे राहणारे लोक माझ्याकडे आले होते. हे लोक माझे आहेत, असे सांगितले.

फिर्यादी व त्यांचे मित्र गोपाळ यांनी त्यांना आमचा व तुमचा काही संबध नाही. आम्ही न्यायालयात त्याबाबत उत्तर देवू, असे सांगितले. त्यामुळे आरोपींनी आपापसात संगनमत करून काठी व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये मोहिते जखमी झाले असून त्यांचा दात तुटला. त्यानंतर आरोपींनी मोहिते यांचे मोटारीत बसवून अपहरण केले. पुन्हा मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन जाधववाडी येथे सोडून दिले. याबाबत सहायक निरीक्षक राम गोमारे तपास करीत आहेत.

‘रेवडी संस्कृती’मुळे अर्थव्यवस्थेच्या शिस्तीला सुरुंग!!

लोकसभेच्या किंवा विविध राज्यांच्या निवडणुका होतात त्यावेळी राजकीय पक्ष त्यांच्या जाहीरनाम्यातून सवलतींची, घोषणांची खैरात करतात. अन्नधान्य, वीज मोफत वाटतात. पैशाची खिरापत देतात. या आर्थिक सवलतींचा भार कोणावर पडतो, कोणाला सोसावा लागतो याबाबत कोणीही बोलत नाही, चर्चा करत नाही. पर्यायाने राज्यांची, केंद्र सरकारची कर्जे वाढत जातात व त्याचा भुर्दंड करदात्यांना भोगावा लागतो. सवलतींची सर्रास खैरात करत रहाणे म्हणजे “रेवडी संस्कृतीला ” प्राधान्य देणे होय. कोणत्याही अर्थव्यवस्थेत अशा प्रकारची पैशांची खैरात करणे निश्चितच कायमची उपाययोजना नाही. त्यावर पूर्णपणे बंदी घालणे हेही तितकेच अव्यवहार्य. मात्र आर्थिक शिस्त, बंधनांच्या चौकटीत त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. त्यासाठी राजकीय शहाणपणाची गरज आहे. त्याचा घेतलेला वेध.

केंद्र सरकार किंवा कोणतेही राज्य सरकार हे त्यांचा कारभार चालवताना लोककल्याणकारी राज्य संकल्पनेतून त्यांचा गाडा हाकत असते. तळागाळातील किंवा सर्वसामान्य लोकांना आर्थिक सवलती किंवा योजनांचा लाभ दिला जातो. समाजातील ” नाही रे ” वर्गातील घटकांना आर्थिक मदतीचा हातभार लावणे हे सरकारचे कर्तव्य आहे. कल्याणकारी राज्यामध्ये अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा समाजाच्या तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचवणे हे सरकारचे उत्तरदायित्व आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षाच्या काळात सर्व राजकीय पक्षांनी या राजकीय खैरातीचा ज्याला “रेवडी संस्कृती” म्हणतात त्याचा मनमुराद आनंद घेतलेला आहे. याला कम्युनिस्ट पक्षासह कोणताही डावा किंवा उजवा राजकीय पक्ष अपवाद नाही. अशा प्रकारच्या विविध आर्थिक सवलती सरकारने दिल्यामुळे अल्पकाळासाठी किंवा थोड्या काळासाठी जनतेला त्याचे फायदे मिळतात. परंतु दीर्घकालीन उपाय योजनांचा विचार करता मोफत योजनांची खिरापत वाटणे हे कुबेरालाही शक्य होणार नाही. मात्र आजच्या घडीला तरी भारतातील सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते हे कुबेराचे बाप बनलेले असून जनतेकडून कराच्या रूपाने वसूल केलेल्या रकमेचा राजकीय लाभ उठवत असतात ही वस्तुस्थिती आहे. खऱ्या अर्थाने देशाच्या अर्थव्यवस्थेचा गांभीर्याने विचार केला असता अशा प्रकारची वारे माप उधळपट्टी करणे हे कोणत्याही आर्थिक व्यवस्थेच्या शिस्तीत बसत नाही. राष्ट्रीय व प्रादेशिक पातळीवरील अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता, रचना, वर्तन आणि वाजवी तसेच तत्त्वाधारित निर्णय यांना पूर्ण छेद देणाऱ्या योजना म्हणजे या आर्थिक सवलती मानल्या जातात. प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये त्या देशातील महागाई, किंमत पातळी, आर्थिक विकासाचा दर, राष्ट्रीय उत्पन्न किंवा सकल देशांतर्गत उत्पादन (ज्याला जीडीपी म्हणतात), बेरोजगारीतील बदल या सर्वांचा प्रामुख्याने विचार केला जातो. त्यामध्ये राजकीय कारणांनी प्रेरित होऊन “रॉबिन हूड”च्या थाटात आर्थिक सवलतींची खैरात करणे हे कोणत्याही अर्थशास्त्रामध्ये बसणारे नाही. कोणत्याही राज्याने किंवा देशाने लोककल्याणकारी योजना आखू नयेत किंवा त्यांची अंमलबजावणी करू नयेत असे अजिबात नाही. समाजातील ” आहे रे” घटकांकडून कर रूपाने महसूल गोळा केला जातो व समाजातील विकास योजना तळागाळातील आर्थिक दुर्बलांना हातभार देणे यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. परंतु याला काही मर्यादा निश्चित आहेत. त्याबाबत देशामध्ये सर्व राजकीय पक्ष,समाजशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ यांच्यात व्यापक चर्चा होण्याची तातडीने गरज आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच रेवडी संस्कृतीवर भाष्य करताना अशा प्रकारच्या आर्थिक सवलतीची खैरात म्हणजे त्या राज्याची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू असल्याचे मत व्यक्त केले आहे. आपल्या शेजारी श्रीलंकेमध्ये अशा प्रकारच्या आर्थिक सवलतींची खैरात केल्यामुळे संपूर्ण देश आर्थिक संकटात सापडून त्यांना दिवाळखोरीला सामोरे जावे लागले.

आज भारताचा विचार करायचा झाला तर झारखंड, केरळ, ओडिशा, तेलंगणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक व मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक सवलतींची खैरात केल्यामुळे ही सर्व राज्ये कर्जबाजारी झाली असून त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आज खऱ्या अर्थाने विचार केला पाहिजे ते अशा प्रकारच्या योजना जाहीर करून सर्वसामान्य आजार महिलांना पुरुषांना रोख रक्कम खिरापती सारखी वाटल्याने आपण त्यांच्यावर काही प्रतिकूल सामाजिक परिणाम घडवतो किंवा कसे याचा कोणीही विचार करत नाही. अशा प्रकारचे फुकटचे पैसे लोकांच्या हातात मिळाल्यामुळे त्यांच्यात काम करण्याची प्रवृत्ती निर्माण होणार नाही, ऐतखाऊपणा वाढीला लागेल आणि त्याचा मोठा फटका रोजगार निर्मितीवर होण्याची भीती आहे. एवढेच नाही तर त्याचा परिणाम कर्ज संस्कृती,खाजगी गुंतवणुकीला उत्तेजन न मिळणे व काम करण्यासाठी प्रवृत्त न होण्याकडे कल वाढण्याची दाट शक्यता आहे. त्याचा प्रारंभ राज्यातल्या ग्रामीण, निम शहरी भागात झाला असून अनेक ठिकाणी शेतीसाठी कामगार मिळत नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही कंपन्या, संस्था, व्यापार वर्ग यांच्याकडे रोजंदारीवर कर्मचारी मिळणे अवघड काम होत आहे. अलीकडच्या काळात स्वयंरोजगाराच्या निर्मितीवरही त्याचा विपरीत परिणाम झाल्याची आकडेवारी आहे.

कोणत्याही सरकारने लोककल्याणकारी दृष्टिकोन स्वीकारणे हे चुकीचे नाही. मात्र त्याला राजकीय घुमारे फुटल्याने राज्याच्या आर्थिक आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे. या योजनांद्वारे राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा मूळ उद्देश चांगला होता. एखाद्या तात्पुरत्या काळासाठी राज्य शासनाने किंवा केंद्राने केलेल्या योजना या निश्चित चांगल्या असल्या तरी दीर्घकालीन आर्थिक शिस्तीसाठी अशा योजना चालवणे अयोग्य असून ते आर्थिक नीतिमत्तेला धरून नाही.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी त्यांचे जाहीरनामे प्रसिद्ध केले. दोन्ही बाजूंनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि सत्ता काबीज करण्याच्या उद्देशाने अनेक घोषणांचा पाऊस पाडलेला आहे. सर्वांचेच जाहीरनामे हे ‘ रेवडी संस्कृती’चे समर्थन करणारे आहेत.सर्व पक्षांनी कष्टकरी, शेतकरी, महिला वर्ग, युवक या सर्वांना भुरळ पाडतील अशा आर्थिक सहाय्याच्या योजना जाहीर केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करून त्याची अंमलबजावणी ही सुरू केली. या योजनेवर विरोधी पक्षांनी नेहमीप्रमाणे कडक टीका करून या योजनेसाठी लागणारा पैसा कोठून आणणार, त्यामुळे राज्य भिकेला लागलेले आहे अशा प्रकारची टीका केली.मात्र त्याचवेळी या योजनेची रक्कम विरोधक सत्तेवर आले तर वाढवली जाईल अशा प्रकारच्या सवंग लोकप्रियतेच्या घोषणा त्यांनी केल्या. त्यावेळी त्यांच्या हे लक्षात आले नाही की आपण सत्ताधाऱ्यांवर पैशाची उधळपट्टी करत असल्याची टीका करत आहोत मात्र तीच योजना त्यांच्या काळात लोककल्याण करणारी कशी ठरेल याबद्दल काहीही स्पष्टीकरण त्यांना देता आलेले नाही. मध्यप्रदेश सारख्या अन्य राज्यातही योजना चालू आहे.महाराष्ट्रात आज तब्बल एक कोटी बारा लाख महिलांनी यासाठी अर्ज केला आहे व त्यातील काही लाख महिलांना याचा आर्थिक लाभ सुरू झालेला आहे. ज्या खरोखर गरीब महिला आहेत त्यांना याचा निश्चित आधार झाला आहे मात्र या संकल्पनेचाच फेरविचार गांभीर्याने फेरविचार करण्याची गरज आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाचे 45 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.ही योजना पुढे चालू राहिली तर त्याचा मोठा आर्थिक भार राज्याच्या अंदाजपत्रकाला सहन करावा लागेल. आज राज्यात शेतकऱ्यांसाठी व रोजंदारीवर काम करणाऱ्यांसाठी आर्थिक सवलतीच्या योजना असून त्यात लाडकी बहीण योजनेची भर पडली आहे. केंद्र सरकारच्या योजनामुळे आज लाखो घरांमध्ये अन्नधान्य मोफत मिळत आहे त्याच्या जोडीला अनेक योजनांचा आर्थिक लाभ हजारो कुटुंबे घेत आहेत त्यामुळे लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर खर्च करण्याची काही आवश्यकता लागत नाही. लोक कृषी क्षेत्रावर अवलंबून नाहीत उत्पादन किंवा सेवा क्षेत्रात काम करण्याची त्यांची तयारी नाही अशा एका विचित्र अवस्थेमध्ये सध्याची तरुणाई गुंतून पडलेली आहे. राज्याची औद्योगिक,सेवा व कृषी क्षेत्राची कामगिरी अधिक चांगली किंवा सक्षम कशी होईल रोजंदारी कशी वाढेल यावर सर्व पक्षांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हे सर्वांचे उद्दिष्ट हवे. आज राज्यातील मुंबई, ठाणे व पुणे हे अतिश्रीमंत आहेत तर नंदुरबार, वाशिम, गडचिरोली यवतमाळ, हिंगोली व बुलढाणा हे अतिगरीब जिल्हे आहेत. नागपूर, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व सांगली हे श्रीमंत जिल्हे आहेत.अकोला, धुळे,धाराशिव, लातूर, भंडारा, जालना, जळगाव, परभणी, गोंदिया, बीड, नांदेड, अमरावती व यवतमाळ हे गरीब जिल्हे आहेत. गेल्या काही वर्षात विविध जिल्ह्यांमधील असमानता वाढत आहे. एका बाजूला राज्याचा आर्थिक विकास दर अन्य राज्यांच्या तुलनेत समाधानकारक आहे. मात्र उत्पादन तसेच वित्त सेवा क्षेत्रात आपली प्रगती तुलनात्मक दृष्ट्या नकारात्मक आहे. रसायन व वाहन उत्पादन क्षेत्रात आपली कामगिरी निराशा जनक आहे. महाराष्ट्रातील प्रमुख आर्थिक केंद्रांची प्रगती हा चिंतेचा विषय आहे. कृषि क्षेत्र, जमीन सुधारणा, पायाभूत सुविधांची वेगाने निर्मिती हा राज्यापुढील यशाचा मंत्र आहे. विविध सवलतींचा संयुक्त परिणाम म्हणून महाराष्ट्र सकल राज्य उत्पन्नाच्या क्रमवारी 19 राज्यात 16 वा आहे. राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज दिल्यामुळे त्याचे सुमारे पंधरा हजार कोटींचा बोजा अंदाजपत्रकावर आहे. राज्यातील विविध आर्थिक योजना लक्षात घेता 96 हजार कोटींपेक्षा जास्त निधी या योजनांवर वाटला जात आहे. कोणत्याही दृष्टिकोनातून या रेवडी वाटपाचे समर्थन करणे आज तरी शक्य नाही. कर दात्यांकडून मिळालेला पैसा हा सर्वांगीण विकास व लोक कल्याणासाठी वापरला गेला पाहिजे याचे भान सर्वांनीच ठेवण्याची गरज आहे.

(प्रा. नंदकुमार काकिर्डे)

(लेखक पुणेस्थित अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार व बँक संचालक आहेत)

पर्वती विधानसभा मतदारसंघात मतदान चिठ्ठ्यांचे वाटप सूरू

पुणे, : पर्वती मतदारसंघामध्ये 344 मतदान केंद्रे असून 3 लाख 60 हजार 974 इतकी मतदार संख्या आहे. आज अखेर 1 लाख 44 हजार 389 मतदारांना मतदान चिठ्ठीचे वाटप करण्यात आले असून वितरण प्रक्रिया 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी दिली आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक प्रशासनाच्यावतीने स्वीप कार्यक्रम राबवला जात आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापित करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले असून त्याप्रमाणे कार्यवाही केली जात आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी वाढावी यादृष्टिने प्रयत्न करण्यात येत असल्याचे श्री. खैरनार यांनी सांगितले. मतदारांना आपल्या केंद्राचे नाव आणि स्थळ यांची माहिती होवून मतदान प्रक्रियेस मदत होण्याच्या दृष्टिने मतदारांना मतदान चिठ्ठीचे वाटप 21 क्षेत्रिय अधिकारी आणि 344 मतदान केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वितरण करण्यात येत आहे.

​रंगली ​कविता -गीत -गझलांची मनस्वी मैफल !

​पुणे :

ज्येष्ठ गझलकार, कवी राजेंद्र शहा यांच्या ‘एकांत​​स्वर​’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन दि.१६ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर,विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ. राजा दीक्षित यांच्याहस्ते करण्यात आले. संवेदना प्रकाशनने हा संग्रह प्रकाशित केला आहे.याच कार्यक्रमात राजेंद्र शहा यांच्या गीत,गझलांचा राहुल घोरपडे यांनी संगीतबद्ध केलेला अल्बम सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

प्रकाशित अल्बममधील गीत -गझला या ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, रविंद्र साठे , पं. रघुनंदन पणशीकर , हृषिकेश रानडे आदि गायकांनी गायलेली आहेत.

राहुल घोरपडे, रवींद्र साठे यांनी निवडक रचना व्यासपीठावरून सादर केल्या.त्यानंतर ‘एकांत स्वर’ ही कविता -गीत -गझलांची मनस्वी मैफल प्रसिद्ध गझलकार रमण रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली रंगली .या मैफलीत प्रदीप निफाडकर,म.भा.चव्हाण,ज्योत्स्ना चांदगुडे,डॉ.संदीप अवचट आणि राजेंद्र शहा सहभागी झाले. प्रकाशन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले,तर मैफिलीचे सूत्रसंचालन धनंजय तडवळकर यांनी केले.

साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते .शनिवार​, १६ नोव्हेंबर २०२४​ रोजी सायंकाळी ५.३०​ वाजता गणेश हॉल​( न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड​) येथे हा कार्यक्रम पार पडला.धनंजय तडवळकर​(कार्याध्यक्ष, साहित्यदीप प्रतिष्ठान)​,नितीन हिरवे (प्रकाशक, संवेदना प्रकाशन)​,ज्योत्स्ना चांदगुडे (अध्यक्ष, साहित्यदीप प्रतिष्ठान)​ यांनी स्वागत केले. प्रकाश भोंडे,डॉ.सौ.माधवी वैद्य,सौ. सुनंदा शहा,संजय खरोटे, अजिंक्य शहा, डॉ. सोनल शहा,प्रकाश बोंगाळे, सुभाषचंद्र जाधव,मीरा शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

राजेंद्र शहा यांच्या यु ट्यूब चॅनेलवर ‘ एकांतस्वर ‘ मधील ही संगीतबद्ध गीते, गझला उपलब्ध करून देणार असल्याची माहिती देण्यात आली.

डॉ.राजा दीक्षित म्हणाले,’ १९६०,७० या दशकांतील काळ हा मंतरलेला काळ होता. दिग्गज कवींचा होता. त्याची आठवण करून देणारे राजेंद्र शहा हे एकांतात रमलेले, कवितेत बुडलेले आहेत. केशवसूत ते सुरेश भट असा तरल कवितेचा प्रवास आहे. सुरेश भटांनी गझल युग आणले. अनील कांबळे यांची आठवण अशा प्रसंगी येते.मराठीतील तरल, हळूवार कवितेची परंपरा शहा यांनी पुढे सुरु ठेवली आहे. ते या गझल युगाचे पाईक आहेत.निसर्गप्रेमी मानवतावादाची वाट राजेंद्र शहा यांच्या कवितेने पकडली आहे.हा एकांतस्वर एकांगी, एकट्याचा नसून सर्वांपर्यंत पोहोचणारा आहे ‘.

रवींद्र साठे म्हणाले,’राजेंद्र शहा यांच्या शब्दात सहजता आहे. क्लिष्टता नाही. शहा नावाची गुजराती व्यक्ती असे उत्तम मराठी शब्द लिहिते,ही मोठी गोष्ट आहे.राहुल घोरपडे संगीत देताना श्रीनिवास खळे यांचा वारसा चालवताना अनुभवास येते’.

राहुल घोरपडे म्हणाले,’ सूर, तालांबरोबबर गीतांमधील भावनांना न्याय देणे,महत्वाचे असते.हा अल्बममधील वैविध्य हे शब्दातील भावनांमुळे आलेले आहे.’

मनोगत व्यक्त करताना राजेंद्र शहा म्हणाले,’ आयुष्यात आता कोणालाही उसंत नसल्याने गझलांचे आदान प्रदान होत नाही.सुरेश नाडकर्णी यांच्यामुळे उर्दू गझलांची ओळख झाली आणि अनुभवविश्व विस्तारले.ते कवितेत उमटले आहे’.

अध्यक्षस्थानावरुन बोलताना विजय कुवळेकर म्हणाले,’ कवी प्रसिध्दीच्या झगमगाटात असतात, पण काही कवींच्या सोबत कविताच नसते.खरा कवी कधी संपत नाही. कविता कधी प्रकट होते, कधी अंतर्मनात रुजून राहते. दुसऱ्या काव्यसंग्रहासाठी २० वर्ष थांबणारे राजेंद्र शहा यांच्यासारखे कवी दुर्मीळ आहेत. दुःख, वेदना,शल्य याचे पडसाद ‘ एकांतस्वर ‘ मधील कवितेत असूनही प्रकाशाच्या कवडशांचा शोध आहे. त्यात सकारात्मक ऊर्जा, मानवी मूल्ये आहेत. कवी काळाच्या पुढे पाहत राहतो, आशावादी राहतो. हे सर्व शहांच्या कवितेत दिसून येते.’

खडकवासला मतदारसंघात निवडणूक कर्मचाऱ्यांना कॉंटिंगचे प्रभावी प्रशिक्षण

पुणे: येथील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कार्यालयात निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत मतमोजणी प्रक्रियेसाठी कर्मचारी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणास निवडणूक अधिकारी डॉ. यशवंत माने आणि सहा निवडणूक अधिकारी किरण सुरवसे, सचिन आखाडे , अंकुश गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. माधुरी माने आणि प्रा. तुषार राणे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेतील तांत्रिक आणि व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या बाबी समजावून सांगितल्या.
प्रशिक्षणादरम्यान, मतमोजणीसंबंधीच्या नियम, पद्धती, आणि प्रक्रियेवर विशेष भर देण्यात आला. ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल) प्रणालींचा वापर कसा करायचा, याची सविस्तर माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली. मतमोजणीदरम्यान उद्भवणाऱ्या संभाव्य समस्या आणि त्यांचे निराकरण यावरही प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
निवडणूक अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी मतमोजणी ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि अचूक असणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. “मतमोजणीसाठी योग्य प्रशिक्षण घेतल्यास निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ होतो,” असे ते म्हणाले. सहा निवडणूक अधिकारी किरण सुरवसे यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांच्या शंका दूर केल्या.
प्रा. माधुरी माने यांनी मतमोजणीसाठी आवश्यक असलेल्या नियोजनावर भर दिला, तर प्रा. तुषार राणे यांनी वेळेचे व्यवस्थापन आणि टीमवर्कच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राजक्ता वनारसे आणि सुवर्णा गुजर यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले.या प्रशिक्षणामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेत अधिक आत्मविश्वास आणि कौशल्य मिळाले आहे. उपस्थित कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि मतमोजणी प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले.

अॅक्शनपॅक्ड “राजवीर” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

सुहास खामकरची प्रमुख भूमिका

साकार राऊत दिग्दर्शित “राजवीर”

पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो.
अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट ‘राजवीर’ या चित्रपटातून उलगडणार आहे. अॅक्शनपॅक्ड या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.

अर्थ स्टुडिओ यांनी सारा मोशन पिक्चर्स आणि रुचिका तोलानी प्रॉडक्शन्स, समृद्धी मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने राजवीर चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. साकार प्रकाश राऊत, ध्वनि साकार राऊत, गौरव परदासनी, सूर्यकांत बाजी चित्रपटाचे निर्माते, तर रुचिका तोलानी सूचक सहनिर्मात्या आहेत. साकार राऊत, स्वप्नील देशमुख यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन साकार राऊत, जेकॉब आणि पॉल कुरियन, माज खान यांनी केलं आहे. भूषण वेदपाठक यांनी छायांकन, अभिनंदन गायकवाड, होपून सैकिया यांनी संगीत दिग्दर्शन, साकार राऊत, कश्यप कुलकर्णी यांनी संकलन केलं आहे. चित्रपटात सुहास खामकरसह झाकीर हुसैन, गौरव परदासनी, प्राशी अवस्थी, धीरज सानप यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

ड्र्ग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला असल्यानं राजवीर हा आयपीएस अधिकारी ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त करण्याचा निश्चय करतो. त्याच्या या ध्येयामध्ये अनेक अडथळे, आव्हाने, संकटे येतात. या संकटांना तोंड देत तो त्याचं ध्येय साध्य करतो का, या आशयसूत्रावर राजवीर हा चित्रपट बेतला आहे. अत्यंत तडफदार व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरनं राजवीर ही आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. बॉडीबिल्डर असलेला सुहास खामकर या चित्रपटात धडाकेबाज अॅक्शन सिक्वेन्स करताना ट्रेलरमध्ये दिसून येतो. म्हणूनच राजवीर मोठ्या पडद्यावर चित्रपटगृहात जाऊन पाहायला हवा.

अभिनेत्री प्रिया बापट यांच्या हस्ते पुण्यात लाईमलाईट डायमंड्सच्या पहिल्या स्टोअरचे उद्घाटन

भारतामध्ये लंबग्रोन डायमंड ज्वेलरीची वाढती मागणी लक्षात घेऊन या वेगाने वाढणाऱ्या ब्रँडने डिसेंबरपर्यंत १३ नवीन स्टोअर्स उघडण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

पुणे – भारतातील सर्वांत मोठ्या लॅबग्रोन डायमंड अॅड, लाईमलाईट डायमंड्सने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत पुण्यात आपले पहिले स्टोअर सुरू केले आहे. या नव्या स्टोअरचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट यांच्या हस्ते झाले. को-फाऊंडर श्री. निरव भट्ट आणि रिजनल पार्टनर श्री. अतुल बोरा यांच्यासोबत प्रिया बापट यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला चारचाँद लागले,

५०० चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रात पसरलेले हे स्टोअर लाईमलाईट डायमंड्ससाठी आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, कारण त्यांनी १५ स्टोअर्सचा टप्पा ओलांडून भारतभर आपला ठसा पसरवला आहे. मागील दोन वर्षांत ब्रेडची झपाट्याने वाढ झाली असून, मुंबई, कोलकाता, दिल्ली, जयपूर, वाराणसी, हैदराबाद, राजकोट, बंगळुरू, चेन्नई यांसारख्या ३५ पेक्षा अधिक शहरांमध्ये यांची उपस्थिती आहे. लाईमलाईट डायमंड्सने स्वतःला सोलिटेअर ज्वेलरीसाठी एक अंतिम गंतव्य म्हणून स्थापित केले आहे, ज्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक सौंदर्य यांचा उत्कृष्ट मिलाप आहे.

ब्रेडच्या संग्रहाचे कौतुक करताना प्रिया बापट म्हणाल्या, “लंबग्रोन डायमंडची संकल्पना आणि स्टोअर पाहून मी खूप प्रभावित झाले आहे, हे भारतात बनवलेले डायमंड आहेत आणि मला वाटते की प्रत्येक भारतीय महिलेला हे डायमंड घालण्यात अभिमान वाटेल, त्यांचे सोलिटेअर संग्रह अत्यंत दर्जेदार असून आधुनिक डिझाईनसह तयार केले आहे. हे खरोखरच एक मोठे आणि अधिक आकर्षक अपग्रेड आहे. पुण्यात हे अनोखे डायमंड्स आणल्याबद्दल मी लाईमलाईट टीमचे अभिनंदन करते.”

स्टोअरचे रिटेल डिझाईन ब्रेडच्या मोहक, आधुनिकता, टिकाऊपणा आणि आलिशानपणाच्या संकल्पनेचे उत्तम प्रतीक आहे. या स्टोअरमध्ये ग्राहकांना अत्याधुनिक आणि किफायतशीर डिझाईन कस्टमायझेशन, लाइफटाईम बायबैंक, १००% एक्सचेंज गॅरंटी अशा सेवांचा लाभ घेता येईल,

लाईमलाईट डायमंड्सच्या फाउंडर व मॅनेजिंग डायरेक्टर पूजा शेठ माधवन म्हणाल्या, “आमच्या ब्रेडला मिळालेल्या उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल पुण्यात नवीन स्टोअर सुरू करण्याचा मला अभिमान आहे. पुण्याला चमक आवडते, परंतु येथे आमच्या दागिन्यांच्या उच्च गुणवत्तेबद्दलही खूप कौतुक होत आहे. शिवाय, किफायतशीर किंमतींमुळे ग्राहकांना आमचे उत्पादन अधिक आवडते.”

लंवग्रोन डायमंड्स उद्योगाविषयी बोलताना त्यांनी पुढे म्हटले, “भारतामध्ये लॅबग्रोन डायमंड्स उद्योगाला दरवर्षी १५-२०% बाद मिळत आहे. ग्राहकांमध्ये लंबग्रोन डायमंड्सबद्दल जागरूकता खूप वाढली आहे आणि बऱ्याच ग्राहकांना लंबडायमंड हे खरे असल्याचे समजले आहे.”

लाईमलाईटचे प्रादेशिक भागीदार श्री, अतुल बोरा यांनी सांगितले, “लाईमलाईट डायमंड्ससोबतच्या विन्तारित भागीदारीबद्दल आम्ही खूप आनंदित आहोत. आम्ही पुण्यातील ग्राहकांसाठी सर्वोत्तम लॅबग्रोन डायमंड्सची डिझाईन सादर करण्यास उत्सुक आहोत.”

नवीन लाईमलाईट डायमंड्स स्टोअरला भेट द्या आणि हित्यांच्या जगातील जादूचा अनुभव घ्या. अधिक माहितीसाठी www.limelightdiamonds.com वर भेट द्या.

निवडणूक कामकाजाचे चित्रीकरण करुन प्रसारित केल्यास कठोर कारवाई- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

निवडणूक कामकाजाचे चित्रीकरण करुन सोशल मीडियावर प्रसारित केल्याबद्दल भोरमध्ये गुन्हा दाखल- निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांची माहिती

पुणे, दि. 16: भोर विधानसभा मतदार संघातील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट कमिशनींगच्या कामकाजाचे मोबाईलवरुन बेकायदेशीरपणे व्हिडीओ चित्रीकरण करुन समाज माध्यमांवर (सोशल मीडिया) प्रसारित केल्याबद्दल दोन उमेदवारांच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल करुन पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली आहे.

सरदार कान्होजी जेधे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोर येथे बुधवारी (दि. 13 नोव्हेंबर) ईव्हीएम व व्हीव्हीपॅट कमीशनींगचे कामकाज सुरु होते. यावेळी मोबाईल आदी उपकरणांना बंदी असताना उमेदवार शंकर हिरामण मांडेकर यांचे प्रतिनिधी विजय हनुमंत राऊत, रा. लवळे (ता. मुळशी) आणि कुलदिप सुदाम कोंडे यांचे प्रतिनिधी नारायण आनंदराव कोंडे रा. केळवडे (ता. भोर) यांनी बेकायदेशीरपणे मोबाईल घेऊन येऊन मॉकपोलचे चित्रीकरण करुन ते सोशल मीडियावर प्रसारित करुन गोपनियतेचा भंग केला. त्यामुळे विजय हनुमंत राऊत आणि नारायण आनंदराव कोंडे यांच्यावर 14 नोव्हेंबर रोजी भोर पोलीस ठाणे येथे गु.र.नं.222/2024, बी.एन.एस.171(1), 223, आय.टी. अॅक्ट 72 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. या आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.

या घटनेचे गांर्भीय लक्षात घेता घेता जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर येथे भेट देवून घटनेची माहिती घेतली, असेही डॉ. खरात यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी: ईव्हीएम कमिशनींग, मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र आदी ठिकाणी निवडणूक प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यादरम्यान निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, मतदान प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी, मतदार, वार्ताहर आदी कोणाही व्यक्तीला कोणताही मोबाईल, स्मार्टवॉच, इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन येण्यास पूर्णत: बंदी आहे. तसेच निवडणूक कामकाजाचे व्हिडीओ तसेच छायाचित्रे काढून विविध व्हॉटस्अॅप ग्रुप, सोशल मीडियावर प्रसारित करणे हा गंभीर गुन्हा आहे. असे करणाऱ्यावर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्यात येईल.