पुणे: येथील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कार्यालयात निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत मतमोजणी प्रक्रियेसाठी कर्मचारी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणास निवडणूक अधिकारी डॉ. यशवंत माने आणि सहा निवडणूक अधिकारी किरण सुरवसे, सचिन आखाडे , अंकुश गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. माधुरी माने आणि प्रा. तुषार राणे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेतील तांत्रिक आणि व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या बाबी समजावून सांगितल्या.
प्रशिक्षणादरम्यान, मतमोजणीसंबंधीच्या नियम, पद्धती, आणि प्रक्रियेवर विशेष भर देण्यात आला. ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल) प्रणालींचा वापर कसा करायचा, याची सविस्तर माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली. मतमोजणीदरम्यान उद्भवणाऱ्या संभाव्य समस्या आणि त्यांचे निराकरण यावरही प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
निवडणूक अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी मतमोजणी ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि अचूक असणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. “मतमोजणीसाठी योग्य प्रशिक्षण घेतल्यास निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ होतो,” असे ते म्हणाले. सहा निवडणूक अधिकारी किरण सुरवसे यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांच्या शंका दूर केल्या.
प्रा. माधुरी माने यांनी मतमोजणीसाठी आवश्यक असलेल्या नियोजनावर भर दिला, तर प्रा. तुषार राणे यांनी वेळेचे व्यवस्थापन आणि टीमवर्कच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राजक्ता वनारसे आणि सुवर्णा गुजर यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले.या प्रशिक्षणामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेत अधिक आत्मविश्वास आणि कौशल्य मिळाले आहे. उपस्थित कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि मतमोजणी प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले.