पुणे :
ज्येष्ठ गझलकार, कवी राजेंद्र शहा यांच्या ‘एकांतस्वर’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन दि.१६ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर,विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ. राजा दीक्षित यांच्याहस्ते करण्यात आले. संवेदना प्रकाशनने हा संग्रह प्रकाशित केला आहे.याच कार्यक्रमात राजेंद्र शहा यांच्या गीत,गझलांचा राहुल घोरपडे यांनी संगीतबद्ध केलेला अल्बम सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.
प्रकाशित अल्बममधील गीत -गझला या ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, रविंद्र साठे , पं. रघुनंदन पणशीकर , हृषिकेश रानडे आदि गायकांनी गायलेली आहेत.
राहुल घोरपडे, रवींद्र साठे यांनी निवडक रचना व्यासपीठावरून सादर केल्या.त्यानंतर ‘एकांत स्वर’ ही कविता -गीत -गझलांची मनस्वी मैफल प्रसिद्ध गझलकार रमण रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली रंगली .या मैफलीत प्रदीप निफाडकर,म.भा.चव्हाण,ज्योत्स्ना चांदगुडे,डॉ.संदीप अवचट आणि राजेंद्र शहा सहभागी झाले. प्रकाशन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले,तर मैफिलीचे सूत्रसंचालन धनंजय तडवळकर यांनी केले.
साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते .शनिवार, १६ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता गणेश हॉल( न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड) येथे हा कार्यक्रम पार पडला.धनंजय तडवळकर(कार्याध्यक्ष, साहित्यदीप प्रतिष्ठान),नितीन हिरवे (प्रकाशक, संवेदना प्रकाशन),ज्योत्स्ना चांदगुडे (अध्यक्ष, साहित्यदीप प्रतिष्ठान) यांनी स्वागत केले. प्रकाश भोंडे,डॉ.सौ.माधवी वैद्य,सौ. सुनंदा शहा,संजय खरोटे, अजिंक्य शहा, डॉ. सोनल शहा,प्रकाश बोंगाळे, सुभाषचंद्र जाधव,मीरा शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राजेंद्र शहा यांच्या यु ट्यूब चॅनेलवर ‘ एकांतस्वर ‘ मधील ही संगीतबद्ध गीते, गझला उपलब्ध करून देणार असल्याची माहिती देण्यात आली.
डॉ.राजा दीक्षित म्हणाले,’ १९६०,७० या दशकांतील काळ हा मंतरलेला काळ होता. दिग्गज कवींचा होता. त्याची आठवण करून देणारे राजेंद्र शहा हे एकांतात रमलेले, कवितेत बुडलेले आहेत. केशवसूत ते सुरेश भट असा तरल कवितेचा प्रवास आहे. सुरेश भटांनी गझल युग आणले. अनील कांबळे यांची आठवण अशा प्रसंगी येते.मराठीतील तरल, हळूवार कवितेची परंपरा शहा यांनी पुढे सुरु ठेवली आहे. ते या गझल युगाचे पाईक आहेत.निसर्गप्रेमी मानवतावादाची वाट राजेंद्र शहा यांच्या कवितेने पकडली आहे.हा एकांतस्वर एकांगी, एकट्याचा नसून सर्वांपर्यंत पोहोचणारा आहे ‘.
रवींद्र साठे म्हणाले,’राजेंद्र शहा यांच्या शब्दात सहजता आहे. क्लिष्टता नाही. शहा नावाची गुजराती व्यक्ती असे उत्तम मराठी शब्द लिहिते,ही मोठी गोष्ट आहे.राहुल घोरपडे संगीत देताना श्रीनिवास खळे यांचा वारसा चालवताना अनुभवास येते’.
राहुल घोरपडे म्हणाले,’ सूर, तालांबरोबबर गीतांमधील भावनांना न्याय देणे,महत्वाचे असते.हा अल्बममधील वैविध्य हे शब्दातील भावनांमुळे आलेले आहे.’
मनोगत व्यक्त करताना राजेंद्र शहा म्हणाले,’ आयुष्यात आता कोणालाही उसंत नसल्याने गझलांचे आदान प्रदान होत नाही.सुरेश नाडकर्णी यांच्यामुळे उर्दू गझलांची ओळख झाली आणि अनुभवविश्व विस्तारले.ते कवितेत उमटले आहे’.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना विजय कुवळेकर म्हणाले,’ कवी प्रसिध्दीच्या झगमगाटात असतात, पण काही कवींच्या सोबत कविताच नसते.खरा कवी कधी संपत नाही. कविता कधी प्रकट होते, कधी अंतर्मनात रुजून राहते. दुसऱ्या काव्यसंग्रहासाठी २० वर्ष थांबणारे राजेंद्र शहा यांच्यासारखे कवी दुर्मीळ आहेत. दुःख, वेदना,शल्य याचे पडसाद ‘ एकांतस्वर ‘ मधील कवितेत असूनही प्रकाशाच्या कवडशांचा शोध आहे. त्यात सकारात्मक ऊर्जा, मानवी मूल्ये आहेत. कवी काळाच्या पुढे पाहत राहतो, आशावादी राहतो. हे सर्व शहांच्या कवितेत दिसून येते.’