पुणे, : पर्वती मतदारसंघामध्ये 344 मतदान केंद्रे असून 3 लाख 60 हजार 974 इतकी मतदार संख्या आहे. आज अखेर 1 लाख 44 हजार 389 मतदारांना मतदान चिठ्ठीचे वाटप करण्यात आले असून वितरण प्रक्रिया 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी दिली आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक प्रशासनाच्यावतीने स्वीप कार्यक्रम राबवला जात आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापित करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले असून त्याप्रमाणे कार्यवाही केली जात आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी वाढावी यादृष्टिने प्रयत्न करण्यात येत असल्याचे श्री. खैरनार यांनी सांगितले. मतदारांना आपल्या केंद्राचे नाव आणि स्थळ यांची माहिती होवून मतदान प्रक्रियेस मदत होण्याच्या दृष्टिने मतदारांना मतदान चिठ्ठीचे वाटप 21 क्षेत्रिय अधिकारी आणि 344 मतदान केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वितरण करण्यात येत आहे.