Home Blog Page 580

नवीन आणि विद्यमान ग्राहकांसाठी बँक ऑफ इंडियाने गृहकर्जाचे दर 25 बेसिस पॉइंट्सने कमी केले

मुंबई, 14 एप्रिल 2025: भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक, बँक ऑफ इंडियाने त्यांच्या
गृहकर्ज व्याजदरात 25 बेसिस पॉइंटची कपात करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे नवीन तसेच विद्यमान
ग्राहकांना फायदा होईल. या सुधारणेसह, CIBIL स्कोअरवर आधारित गृहकर्जाचा दर 7.90% पर्यंत कमी झाला
आहे. ग्राहकांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करण्यासाठी तसेच घराची मालकी अधिक सुलभ आणि
परवडणारी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. सुधारित दर 15 एप्रिल 2025 पासून लागू होतील.

गृहकर्जांव्यतिरिक्त, बँक ऑफ इंडियाने वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, मालमत्तेवरील कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि स्टार
रिव्हर्स मॉर्गेज कर्ज यासारख्या विद्यमान निवडक किरकोळ कर्ज उत्पादनांवरील व्याजदरात 25 बेसिस पॉइंटची
कपात केली आहे. हे समायोजन बँकेच्या अनुकूल बाजार परिस्थितीचे फायदे ग्राहकांना देण्यासाठी आणि स्पर्धात्मक
आणि ग्राहक-अनुकूल कर्ज उपाय देण्याच्या सक्रिय दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे.

वैद्यकीय आणि अभियांत्रिकीप्रमाणे कायद्याच्या शिक्षणाकडे पाहिले जाते-मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संदीप मारणे 

श्री शिवाजी मराठा सोसायटी लॉ कॉलेजच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज ६ वी राज्यस्तरीय अभिरूप न्यायालय स्पर्धा २०२५

पनवेलचे भागुबाई चंगू ठाकूर महाविद्यालय विजेते तर पुण्याच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय ठरले उपविजेते

पुणे : वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण हे २५ ते ३० वर्षांपूर्वी जास्त प्रमाणात घेतले जात होते. मात्र, आता कायद्याच्या शिक्षणाकडे देखील वैद्यकीय आणि अभियांत्रिकीप्रमाणे पाहिले जात आहे. दररोज नवीन गोष्टी या क्षेत्रात शिकायला मिळत असून आपापल्या तालुक्यात व गावी जाऊन काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संदीप मारणे यांनी व्यक्त केले.

श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या विधी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित छत्रपती श्री शिवाजी महाराज सहावी राज्यस्तरीय अभिरूप न्यायालय स्पर्धा शुक्रवार पेठेतील संस्थेच्या सभागृहात पार पडली. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन, सुमंतराव कोल्हे, बार कौन्सिलचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अहमदखान पठाण आणि सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. हर्षद निंबाळकर, अ‍ॅड. राजेंद्र उमाप, जिल्हा न्यायाधीश बी.पी. क्षीरसागर, श्री शिवाजी मराठा सोसायटीचे मानद सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळ अध्यक्ष अ‍ॅड. सत्येंद्र कांचन, कारभारी मंडळ अध्यक्ष सुरेशराव देसाई, अ‍ॅड. एन.डी. पाटील, प्रा. जयप्रकाश जगताप, बी.एम. गायकवाड, रघुनंदन जाधव, महादेव पवार, रविंद्र जेधे, ज्येष्ठ माजी विद्यार्थिनी आशालता देशमुख, आणि नवनियुक्त न्यायाधीश स्नेहा थोरात उपस्थित होते.

या स्पर्धेत पनवेल येथील भागुबाई चंगू ठाकूर विधी महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले, तर पुण्याच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाने उपविजेतेपद मिळवले. युगा कुमारी (श्री शिवाजी मराठा विधी महाविद्यालय) हिला सर्वोत्कृष्ट प्रतिवादी वकील तर श्रुती चौबे (भागुबाई चंगू ठाकूर महाविद्यालय) हिला सर्वोत्कृष्ट वादी वकील म्हणून गौरवण्यात आले.

संदीप मारणे म्हणाले, न्यायाधीशांसमोर खटला सादर करण्याची संधी अभिरूप न्यायालयाच्या माध्यमातून मिळत असते. विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकास होण्यास यामुळे मदत होत आहे. कायद्याच्या क्षेत्रात काम करताना चिकाटी असणे गरजेचे आहे. यामध्ये काम करण्यास खूप वाव असून अभ्यास आणि व्यवहारिक ज्ञान मिळविण्यास सराव आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

शर्मिला देशमुख म्हणाल्या, कायद्याच्या क्षेत्रात कला आणि ज्ञान हे एकत्रित असणे गरजेचे आहे. न्यायाधीशांप्रमाणे त्या खुर्चीचा मान राखणे देखील कायद्याच्या क्षेत्रात आवश्यक आहे. या क्षेत्रात आपल्या वरिष्ठांकडून देखील विद्यार्थ्यानी शिकायला हवे. वकिली हा बिझनेस  नसून एक प्रोफेशन आहे.

स्पर्धेतील पारितोषिक वितरण जिल्हा न्यायाधीश डब्ल्यू.के. कनबरकर आणि के.बी. कटके यांच्या हस्ते करण्यात आले. न्यायाधीश म्हणून दीपक डोंगरे, शरद मडके, अ‍ॅड. नीलिमा वर्तक आणि प्रा. एस.एम. तांबोळी यांनी कामकाज पाहिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत अ‍ॅड. एन.डी. पाटील यांनी केले. प्रा. सिद्धकला भावसार यांनी स्पर्धेचे प्रास्ताविक केले आणि डॉ. अंजली गवळी यांनी आभार मानले. प्रा. मीनाक्षी जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

ब्राह्मो आणि प्रार्थना समाजाने समाज सुधारणेचा व्यापक विचार मांडला-प्रा. डॉ. सदानंद मोरे 

पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने चैत्रोत्सवाचे आयोजन

पुणे :  ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाज, तसेच सत्यशोधक समाज या सर्व चळवळी एकेश्वरवादी होत्या. त्यांनी केवळ धार्मिक विचार न मांडता समाजसुधारणेचा व्यापक विचार मांडला. प्रार्थना समाजाने भागवत धर्मातील तत्त्वांचा स्वीकार करून ‘नव-भागवत’ तत्त्वज्ञान विकसित केले. प्रार्थना समाज केवळ प्रार्थना करणारा समाज नव्हता, तर त्यांचा समाजसुधारणेचा आवाका फार मोठा होता, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

बुधवार पेठेतील पुणे प्रार्थना समाजाच्या हरिमंदिर प्रवेशाला ११६ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त चैत्रोत्सव साजरा करण्यात आला. या चैत्रोत्सवात सदानंद मोरे यांचे ‘ रानडे -भांडारकर’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी पुणे प्रार्थना समाजाच्या अध्यक्ष डॉ. सुषमा जोग, सचिव डॉ. दिलीप  जोग, खजिनदार  प्रशांत पाडवे, ज्येष्ठ सदस्य उषाताई शर्मा, श्री. भास्कर मुजुमदार, डॉ. शिल्पा मुजुमदार, श्री. धनराज निंबाळकर, डेक्कन कॉलेजचे डॉ. पड्डैय्या, डॉ . सचिन नाईक, डॉ. माधवी कोल्हटकर, मुंबईचे श्री. रेगे तसेच अनेक विद्यार्थी  उपस्थित होते.

प्रा. डॉ. सदानंद मोरे म्हणाले, संतपरंपरेत जसे ज्ञानोबा – तुकाराम  हे जोडनाव घेतले जाते तसेच सामाजिक व धार्मिक सुधारणांच्या क्षेत्रात रानडे – भांडारकर हे जोडनाव आहे. दोघांनी प्रार्थना समाजाच्या उभारणीत महत्त्वाचा वाटा उचलला. न्या. महादेव गोविंद रानडे यांच्याकडे त्या काळात संत म्हणून पाहिले जायचे, एवढी त्यांची ख्याती होती. तर डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांची ख्याती जगभर संस्कृत पंडित व प्राच्यविद्या संशोधक म्हणून होती. रानडे हे उत्तम निरुपणकार तर भांडारकर हे उत्तम कीर्तन करत असत, व त्यासाठी त्यांनी पदे रचली व रागदारी संगीत शिकण्यासाठी उस्ताद अब्दुल करीम खाँ यांची शिकवणी लावली, तसेच ते दररोज कुटुंबियांसमवेत एकतारीवर भजने म्हणत असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रार्थना समाज व सत्यशोधक समाज यांचे सदस्य एकमेकांच्या कार्यात सहभागी होत असत असेही त्यांनी सांगितले.

डॉ. दिलीप जोग यांनी प्रास्ताविक केले व डॉ. सुषमा जोग यांनी आभार मानले.

महार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्ट कार्ड पाठविण्याच्या अभियानाची सुरुवात

पुणे : महार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात यावा या प्रमुख मागणी साठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांचे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चा व महार रेजिमेंटच्या निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या यशसिद्धी वेल्फेअर असोसिएशन च्या संयुक्त विद्यमाने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरामध्ये प्रधानमंत्री कार्यालयाला पोस्ट कार्ड पाठवण्याच्या अभियाना ची सुरुवात करण्यात आली. 

सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या अभियानात दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे पंधरा हजार नागरिकांनी सहभाग दर्शवला. अंदाजे एक लाख पोस्टकार्ड पुणे शहरातून पाठवण्याचा मनोदय यावेळी आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे व महार रेजिमेंटचे निवृत्त सैनिक कॅप्टन भगवान इंगोले, नायक सुरेश वानखडे, नायक धनराज गडबडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

पोस्ट कार्ड पाठवण्याच्या मोहिमेमध्ये आंबेडकरी चळवतील ज्येष्ठ नेते वसंत साळवे,  आरपीआय आठवले गटाचे प्रादेश संघटक परशुराम वाडेकर,  अॅड.   मोहन वाडेकर, भारत मुक्ती मोर्चाचे सचिन बनसोडे,  रिपब्लिकन जनशक्तीचे शैलेंद्र मोरे, दलित पॅंथर ऑफ इंडियाचे बापूसाहेब भोसले,  रिपब्लिकन सेनेचे युवराज बनसोडे,  रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सुवर्णा डंबाळे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे विवेक बनसोडे, भिम सेवा प्रतिष्ठानचे राम डंबाळे, सिद्धांत सुर्वे, निखिल बहुले इत्यादी सहभागी झाले होते. 

सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रतीक डंबाळे, राहुल नागटिळक यांनी केले यावेळी महार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा बसवण्यासाठी राज्यभरातून किमान दहा लाख पोस्ट कार्ड पाठवण्याचा मानस असल्याचे राहुल डंबाळे यांनी सांगितले.

आंबेडकरांनी संविधानाद्वारे दिलेल्या विचारामुळे देशात लोकशाहीचे अस्तित्व टिकून आहे – शहराध्यक्ष दीपक मानकर

पुणे-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष श्री.दीपक मानकर यांनी ससून हॉस्पिटलजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.चेतन तुपे उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेबांच्या समता आणि बंधुत्वाच्या मार्गाने प्रेरित होऊन त्यांच्या विचारांना मानवंदना देऊन डॉ.बाबासाहेबांनी भारतीय संविधानाद्वारे जो विचार मांडला त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या देशात लोकशाहीचे अस्तित्व टिकून आहे. या खास प्रसंगी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मोफत पाणी वाटप, स्वच्छता मोहीम सारखे अनोखे उपक्रम राबवले त्याबद्दल प्रदीप पवार, राहुल तांबे यांच्यासह पुणे कॅन्टोन्मेंट मधील पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. तसेच ‘एकता मिसळ’तर्फे उपस्थितांना मिसळ वाटण्याचा स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे पार पडला. त्याबद्दल प्रशासन आणि सर्व आयोजकांचे आभार मानले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष प्रदीप पवार यांनी केलेल्या सामाजिक उल्लेखनीय कार्याबद्दल शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


सदरप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हडपसरचे आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष दीपक मानकर, प्रदेश प्रवक्ते महेश शिंदे, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, मा.विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, मा.नगरसेवक शांतीलाल मिसाळ, आर पी आय प्रदेश सदस्य ॲड.मंदार जोशी,विधानसभा अध्यक्ष पुणे कॅन्टोन्मेंट नरेश जाधव, पर्वती  संतोष नांगरे, हडपसर शंतनू जगदाळे, पुणे कॅन्टोन्मेंट महिला अध्यक्ष नीता गायकवाड, ओ.बी.सी. सेल अध्यक्ष हरीश लडकत, व्यापारी सेल अध्यक्ष वीरेंद्र किराड, सामाजिक न्याय सेल अध्यक्ष जयदेव इसवे, तृतीयपंथी सेल अध्यक्ष निर्जला गायकवाड, सोशल मिडिया अध्यक्ष शितल मेदने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उपाध्यक्ष प्रदीप पवार, डिंपल इंगळे, दिलीप जांभूळकर, हनीफ शेख, संघटक सचिव नईम शेख, भारत पंजाबी, रविंद्र कवडे, चिटणीस चेतन मोरे, शाम शेळके, पंडित जगताप, दिनेश परदेशी, दिनेश अर्दाळकर,महेंद्र लालबिगे, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा कार्याध्यक्ष राहुल तांबे, गोरखनाथ भिकुले, हडपसर विधानसभा कार्याध्यक्ष अमर तुपे, संदिपनाना बधे, योगेश वराडे, ॲड.अर्चिता मंदार जोशी,महिला उपाध्यक्ष सुनिता चव्हाण, संघटक सचिव प्रीती डोंगरे, चिटणीस सुनिता बडेकर,युवक उपाध्यक्ष गिरीश मानकर, युवती कार्याध्यक्ष लावण्या शिंदे, उपाध्यक्ष स्नेहल कांबळे,शिवाजीनगर विद्यार्थी अध्यक्ष कार्तिक थोटे, पुणे कॅन्टोन्मेंट सामाजिक न्याय अध्यक्ष अतुल जाधव, पुणे कॅन्टोन्मेंट युवती अध्यक्ष अर्चना वाघमारे, हडपसर विधानसभा उपाध्यक्ष प्रविण पवार, प्रज्ञा वाघमारे,वर्षा गावडे, संतोष हत्ते यांच्यासह मोठ्या संख्येने भीमसैनिक,अनुयायी उपस्थित होते.

भारतीय संविधान हे प्रत्येकाचे भारतीय ओळखपत्र-डॉ .​ श्रीरंजन आवटे

पुणे, दि. १४ एप्रिल २०२५ :जातीधर्मपंथाचा कोणताही भेदभाव न ठेवता, नागरिकाला दर्जा, हक्क व समान समानता प्रत्येक संविधानात आपले भारतीय ओळखपत्र आहे. पहाटेचा खरा आत्मा आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेबांनी संविधानाच्या बहुसांस्कृतिक आणि बहुसांस्कृतिक भारतीय एकात्मता आणखी घट्ट केली आहे. डॉ. विचार विचार अंमलात आणण्यासाठी प्रत्येक वेळेला स्पष्टपणे विषयमतेला नकार आणि समतेला होकार दिला पाहिजे असे प्रतिपादन साहित्य प्रा. डॉ. श्रीरंजन आवटे यांनी दिले (दि. १४)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयती महावितरणमध्ये उत्सव आयोजित कार्यक्रमासाठी आयोजित कार्यक्रमात डॉ. आवटे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार होते. तर प्रमुख पाहुणे महापारेषणाचे अधीक्षक अभियंता श्री. संदीप हाके नियंत्रण होती.

डॉ. श्रीरंजन आवटे म्हणाले की, भारताला काँग्रेस मार्गाने स्थापनेसाठी खऱ्या अर्थाने दिशादर्शक आहे. प्रत्येकाला धार्मिक आहे. मात्र, कोणत्याही धर्माला पर्याय आहे, हे डॉ. लेखकाने स्पष्ट केले आहे. त्या धर्माने कधीच महत्त्वाची भारताची नागरिकांची ओळख पटवली नाही, तर या देशाने ही ओळखलीच आहे, आजवर पक्षपाती आहे.

राज्य मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध अभ्यासक म्हणून देश उभारणीत ऐतिहासिक क्षेत्राची माहिती दिली. प्रशासक अभियंते सर्वश्री युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड, रवींद्र बुंदेले, संजीव नेहेते, सहायक महाव्यवस्थापक माधुरी राऊत (वित्त) व शीतल निकम (मानव संसाधन), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भुपेंद्र वाघमारे आदिंसह कार्यक्रमाला महावितरण व महापारेषणाचे अभिता, अधिकारी कर्मचारी मोठ्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सतीश केदार यांनी तर श्री. बाबासाहेबांनी सूत्रसंचलन केले. श्री. प्रशांत माळवदे यांनी आभार मानले. लोकसभा निवडणुकीसाठी सर्व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त उत्सवाने घोषीत केले.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनासाठी उसळला जनसागर

बौद्ध भन्तेंकडून बुद्ध वंदना आणि धम्मदेसना

पुणे : महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या कोथरुड मधील निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच, जमलेल्या सर्वांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शहरातील अनेक मान्यवर आणि आंबेडकर प्रेमी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देताना ना. पाटील म्हणाले की, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजापूर्ते मर्यादित नसून, ते सर्वांचेच आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांतून सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन करुन; आपल्या सर्वांमध्ये स्वराज्य, स्वभाषा आणि स्वधर्माबाबतचे स्फुल्लिंग चेतवले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच समाजातील प्रत्येक घटकाला समानतेचा अधिकार मिळाला. त्यामुळे अशा महापुरुषाची जयंती प्रत्येकाच्या घरी झालीच पाहिजे, अशी भावना यावेळी ना. पाटील यांनी व्यक्त केली.

दरम्यान, या जयंती कार्यक्रमात बौद्ध भन्ते धम्मदर्शना, भन्ते हर्षवर्धन, भन्ते संघानंद, भन्ते बुद्धभूषण, भन्ते आर्याजी यांनी विशेष उपस्थिती लावली. या भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमांचे पूजन करून बुद्ध वंदना सादर केली. तसेच सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देऊन; धम्मदेसना दिली‌. या कार्यक्रमास शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यामध्ये माजी आयपीएस अशोक धिवरे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, रिपाइंचे नेते परशुराम वाडेकर, ॲड. मंदार जोशी, पल्लवी जावळे, अतुल साळवे, नगरसेवक अविनाश साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, दादांच्या या अभिनव पुढाकाराचे आंबेडकर प्रेमींकडून कौतुक करण्यात आले.

कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची तुरुंगात आत्महत्या:शाैचालयात टाॅवेलने घेतला गळफास

ठाणे -ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणातील आरोपीने नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात आत्महत्या केली. आरोपी विशाल गवळीचा (३५) मृतदेह रविवारी सकाळी तुरुंगाच्या शौचालयात लटकलेल्या अवस्थेत सापडला, असे पोलिसांनी सांगितले. आम्हाला देवानेच न्याय दिला,अशी प्रतिक्रिया गवळीच्या अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीच्या पित्याने व्यक्त केली. यापूर्वी बदलापूर येथे चिमुकल्या मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काउंटर झाले होते. त्यात पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

गवळीवर डिसेंबर २०२४ मध्ये कल्याण येथे १२ वर्षीय मुलीच्या बलात्कार आणि हत्येचा आरोप होता. मुलगी कोळसेवाडी परिसरातून गायब झाली होती आणि तिचा मृतदेह बापगाव येथे सापडला होता. पोलिसांनी गवळी आणि त्याची पत्नी साक्षीला अटक केली होती. त्यांच्यावर खंडणीसाठी अपहरण, बलात्कार, हत्या, पुरावे नष्ट करणे आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. फेब्रुवारीत पोलिसांनी ९४८ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार गवळीने मुलीचा बलात्कार करून हत्या केली, तर साक्षीने मृतदेह लपवण्यात मदत केली होती.

5 वर्षाच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न नंतर खून:कर्नाटक पोलिसांनी आरोपीला एन्काउंटरमध्ये केले ठार

0

हुबळी -कर्नाटकात, ५ वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न आणि नंतर तिची हत्या करणाऱ्या आरोपीला रविवारी रात्री पोलिसांनी चकमकीत ठार मारले. या चकमकीत एका उपनिरीक्षकासह तीन पोलिस जखमी झाले.

ही घटना हुबळी येथे घडली. आरोपीने मुलीचे तिच्या घराजवळून दिवसा अपहरण केले होते. तो तिला एका निर्जन ठिकाणी असलेल्या शेडमध्ये घेऊन गेला. येथे बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून लोक जमा झाले. घाबरून आरोपीने मुलीचा गळा दाबून खून केला आणि पळून गेला.

काही तासांतच पोलिसांनी आरोपीला अटक केली. हुबळी पोलिस आयुक्त शशी कुमार म्हणाले – काही कागदपत्रे आणि ओळख पडताळणीसाठी पोलिसांनी आरोपीला त्याच्या घरी नेले होते. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पोलिस पथकावर दगडाने हल्ला केला.

पोलिसांनी हवेत गोळीबार केला तरीही तो पळून जाण्याचा प्रयत्न करत राहिला. पोलिसांनी त्याच्यावर आणखी दोन गोळीबार केले, ज्यामध्ये तो जखमी झाला. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरोपीची ओळख पटली रितेश (३५) जो बिहारचा रहिवासी होता.

फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसीच्या अटकेची बातमी:बेल्जियम पोलिसांनी तुरुंगात पाठवले; 13,850 कोटी रुपयांच्या PNB घोटाळ्यातील आरोपी

पंजाब नॅशनल बँकेच्या कर्ज घोटाळ्यातील आरोपी फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसीला बेल्जियममध्ये पोलिसांनी अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) च्या अपीलवरून शनिवारी चोकसीला अटक करण्यात आली. सध्या तो तुरुंगात आहे.या वृत्तानुसार, भारताने बेल्जियममधून चोकसीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केली आहे. चोकसीवर १३,८५० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. गेल्या महिन्यात मेहुल चोकसी बेल्जियममध्ये लपल्याचे उघड झाले. तेथील परराष्ट्र मंत्रालयाने एका अधिकृत निवेदनात चोकसीच्या देशात उपस्थितीची माहिती दिली होती.

चोकसीला अटक करताना पोलिसांनी दोन ओपन-एंडेड अटक वॉरंटचा उल्लेख केला. हे मुंबई न्यायालयाने जारी केले होते. या २३ मे २०१८ आणि १५ जून २०२१ च्या तारखेच्या होत्या, असे अहवालात म्हटले आहे. असे मानले जाते की चोकसी त्याच्या खराब प्रकृती आणि इतर कारणांमुळे जामीन आणि तात्काळ सुटकेची मागणी करू शकतो.

त्याने १५ नोव्हेंबर २०२३ रोजी त्याच्या बेल्जियन नागरिक पत्नीच्या मदतीने बेल्जियन ‘एफ रेसिडेन्सी कार्ड’ मिळवले. चोकसीने बेल्जियमच्या अधिकाऱ्यांना बनावट कागदपत्रे सादर केली होती आणि त्याच्या नागरिकत्वाबाबतची तथ्ये लपवली होती, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. त्यांनी त्यांच्या भारतीय नागरिकत्वाची माहितीही उघड केली नाही.

चोकसीने २०१८ मध्ये भारत सोडण्यापूर्वी २०१७ मध्येच अँटिग्वा-बार्बुडाचे नागरिकत्व घेतले होते. मेहुल चोकसीने प्रकृती बिघडल्याचे कारण देत भारतात येण्यास वारंवार नकार दिला. कधीकधी तो फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे समोर येतो. भारतातील त्याच्या अनेक मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत.

चोकसी मे २०२१ मध्ये अँटिग्वामधून गायब झाला आणि शेजारच्या डोमिनिकामध्ये पोहोचला. येथे त्याला अटक करण्यात आली. त्याचे प्रत्यार्पण करण्यासाठी सीबीआयचे एक पथक डोमिनिका येथे पोहोचले, परंतु त्यापूर्वीच त्याला ब्रिटिश राणीच्या प्रिव्ही कौन्सिलकडून दिलासा मिळाला. नंतर त्याला पुन्हा अँटिग्वाला सोपवण्यात आले.

तथापि, मेहुल चोकसीला डोमिनिका तुरुंगात ५१ दिवस काढावे लागले. येथे त्याने असा युक्तिवाद केला होता की त्याला अँटिग्वाला जाऊन तेथील न्यूरोलॉजिस्टकडून उपचार घ्यायचे आहेत. अँटिग्वाला पोहोचल्यानंतर काही दिवसांनी, डोमिनिका न्यायालयाने चोक्सीविरुद्ध दाखल केलेले खटलेही रद्द केले.

.

0

.

0

उदयनराजे.. समोर येऊन इतिहास समजावून सांगा किंवा माफी मागा: गुणरत्न सदावर्ते

मुंबई-महात्मा फुले जयंतीदिनी स्त्री शिक्षणाचा इतिहास सांगताना उदयनराजे भोसले यांनी थोरले प्रतापसिंह महाराज यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, असा दावा केला होता. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी थोरले प्रतापसिंह महाराजांचे अनुकरण केले होते, असेही ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. ओबीसी नेत्यांनी उदयनराजेंच्या विधानावर टीका केली. आता अॅड. गुणरत्न सदातर्वे यांनीही उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. समोर येऊन इतिहास समजावून सांगावा किंवा माफी मागावी, असे सदावर्ते यांनी उदयनराजे भोसले यांना म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी उदयनराजे भोसले यांनी पुण्यातील फुले वाड्याला भेट दिली होती. यावेळी महात्मा फुलेंच्या कार्याबाबत बोलताना त्यांनी फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी थोरले प्रतापसिंह महाराजांचे अनुकरण केले होते, असे वक्तव्य केले. यावरून आता गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली.

इतिहासाचा दाखला देताना अभ्यास करावा लागतो, संदर्भ ग्रंथ वाचावे लागतात, साहित्याचे वाचन करावे लागते. इतिहास माहिती असावा लागतो, असेच सहज बोलून चालत नाही, असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी उदयनराजे भोसले यांनी महात्मा फुलेंबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन पलटवार केला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचा अभ्यास आज जगभरातील अनेक देशांतील विद्यापीठांमध्ये शिकवला जातो. आपण कोणताही संदर्भ न देता थेट अनुकरण म्हणता. ‘अनुकरण’ या शब्दाचा संदर्भ त्यांना माहित आहे का? असा बोचरा सवाल सदावर्ते यांनी उदयनराजेंना केला.

एकतर तुम्ही उदार अंतःकरणाने समोर येऊन या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे. कोण कुणाच्या घरात जन्माला आले हे महत्त्वाचे नसते. किती चिंतन झाले, किती अभ्यास झाला याच्यावर भाष्यकार होत असतात. अन्यथा खुलासा करणार नसाल तर ती तुमची एक चूक होती हे मान्य केले पाहिजे आणि त्यासाठी माफी मागितली पाहिजे, असेही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.

मनसेच्या भूमिकेवर बोलताना पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते यांनी संविधानाची भाषा ही हिंदी असल्याचे म्हटले. तसेच, मनसेकडून महाराष्ट्रातील 48 खासदारांचा धिक्कार करणे म्हणजे वैचारिक विकार असणे आहे. जे 48 खासदार मनसेसाठी उभे राहिले नाहीत, त्यांनी संविधानाचा विचार केला असावा. ज्यांनी संविधानाची बाजू घेतली नाही, त्यांना लाथाडले गेले. किती पदाधिकारी आणि नेत्यांची मुले इंग्रजी शाळांमध्ये शिकतात? असा सवालही सदावर्ते यांनी केला. हिंदी भाषेत जे बोलतात, ते संविधानाचीच भाषा बोलत आहेत. त्यामुळे, त्यांना कोणी थांबवू शकत नाही, असेही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते उदयनराजे भोसले?

महात्मा फुले चांगले उद्योजक, अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून जी संपत्ती गोळा केली, ती सर्व समाज सुधारण्याच्या कामाकरिता खर्च केली. महात्मा फुले यांनी एकप्रकारे थोरले प्रतापसिंह महाराजांचे अनुकरण केले होते. सर्वात आधी स्त्री शिक्षणासाठी शाळा कुणी सुरू केली असेल तर ती थोरल्या प्रतापसिंहांनी सातारच्या राजवाड्यात केली होती. ज्या राजवाड्यात शाळा सुरू करण्यात आली होती. त्याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले होते. समाजासाठी झटलेल्या महापुरुषांच्या स्मारकाचे जतन करणे आपल्या सर्वांचे काम आहे, असे उदयनराजे भोसले म्हणाले होते.

ज्योतिषशास्त्र हा दैवाचा नकाशा : डॉ. सदानंद मोरे यांचे उद्गार

0

ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी श्रीराम सबनीस यांचा अमृत महोत्सव सत्कार

पुणे : आपल्या परंपरेत प्रयत्नवादाप्रमाणेच दैव या घटकालाही महत्त्वाचे स्थान दिलेले आढळते. अशा दैवाचा ज्योतिषशास्त्र हा नकाशा आहे. ज्योतिष हे एक प्रारूप (मॉडेल) आहे. लोकव्यवहारांचा अभ्यासक, संशोधक या भूमिकेतून ज्योतिषशास्त्राकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक आहे, असे उद्गार संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी काढले.

ज्योतिष परिषद आयोजित विशेष कार्यक्रमात डॉ. मोरे अध्यक्ष पदावरून बोलत होते. परिषदेचे संस्थापक सदस्य, ख्यातनाम शास्त्रज्ञ श्रीराम सबनीस यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचा सत्कार मानपत्र प्रदान करून डॉ. मोरे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी ज्योतिष परिषद संस्थेचे अध्यक्ष ख्यातनाम ज्योतिषी व. दा. भट, ज्योतिषी चंद्रकांत शेवाळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह ॲड. प्रमोद आडकर, निमंत्रक उमेश चाचर तसेच शुभदा सबनीस व्यासपीठावर उपस्थित होत्या.

डॉ. मोरे म्हणाले, “ज्योतिषशास्त्राविषयी मला कुतूहल आहे. मला विद्यापीठ अनुदान आयोगाची फेलोशिप मिळाली होती. तेव्हा अभ्यास संशोधनाच्या निमित्ताने श्रीकृष्णाची कुंडली, या विषयावर माहिती मिळाली. मला असलेल्या कुतूहलापोटी मी अभ्यास करत गेलो. त्यानंतर लोकमान्य टिळकांसह अनेक समाजधुरिणांच्या कुंडली अभ्यासल्या. महाराष्ट्रातील लोकव्यवहारांचा अभ्यास करताना, लोकमानसाचे दैनंदिन जीवन सुकर करण्यात साह्यभूत ठरत असलेल्या ज्योतिषाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोनही बदलत गेला” , असे ते म्हणाले.

ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, भट सरांचे मार्गदर्शन मिळाल्याने मी ज्योतिषशास्त्राकडे सजगतेने पाहू लागलो. सबनीस सरांच्या व्यक्तिमत्वात शास्त्रज्ञ, ज्योतिष अभ्यासक आणि भक्त, यांचा संगम झाला आहे. ते व्रतस्थ अभ्यासक आहेत. ज्योतिषी म्हणून ते मानवसेवा करत आहेत. शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी देशसेवा केली आहे आणि संतसाहित्याच्या अभ्यासातून ते ईश्वरसेवा करत आहेत. त्यांच्या सन्मानाच्या कार्यक्रमात सहभागी होणे आनंददायक आहे.

सत्काराला उत्तर देताना सबनीस म्हणाले, “माझ्या पत्रिकेत गुरूयोग उत्तम आहे, याची प्रचिती मी घेतली आहे. ज्योतिषशास्त्रामुळे मला लोकसंग्रहाची संधी मिळाली. भट सरांच्या पुस्तकांचे स्थान शिक्षणातील बाराखडी व अंकलिपीप्रमाणे मूलभूत स्वरुपाचे आहे. त्यामुळेच गेली 60 वर्षे हे पुस्तक लोकप्रिय ठरले आहे. उद्याविषयीचे कुतूहल हे मानवप्राण्याचे वेगळेपण आहे आणि ते जोवर आहे, तोवर ज्योतिष टिकून राहील“.

सबनीस यांचे स्नेही जयंत पेशवे, वरद खांबेटे, श्रीराम भट यांनी मनोगत व्यक्त केले.
सप्तमस्थान पुस्तकाच्या प्रकाशक सुमेधा तुपे म्हणाल्या, नव्या पिढीशी नाळ जोडण्यासाठी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद आवश्यक वाटला. मूळ पुस्तक मराठी भाषेत आहे, पण त्यातील ज्ञान सीमित राहू नये, या उद्देशाने इंग्रजी अनुवाद प्रकाशित केला.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात व. दा. भट लिखित कुंडली तंत्र आणि मंत्र (भाग 1 व 2) या पुस्तकाच्या प्रकाशनाला 60 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कौतुक समारंभाचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच व. दा. भट लिखित सप्तमस्थान या पुस्तकाच्या सेव्हन्थ हाऊस या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशनही कऱण्यात आले. ज्योतिष परिषदेतर्फे काही विद्यार्थ्यांना पदवीप्रदानही करण्यात आले. मंदार बापट यांनी सूत्रसंचालन केले.

संत परंपरेचा खजिना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात कीर्तनकारांचे महान योगदान-स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज

0


डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्काराने हभप जयवंत महाराज बोधले, डॉ. प्रकाश खांडगे यांचा गौरव

पुणे : महाराष्ट्राला जी थोर संत परंपरा लाभली आहे तशी देशातील कुठल्याही भागाला लाभलेली नाही. अमृताहुनी फिके वाटावे असे संतसाहित्य लाभणे हे महाराष्ट्राचे प्रगल्भ, समृद्ध संचित आहे. मराठी भाषा लिहिता-वाचता येणारी प्रत्येक व्यक्ती धन्य आहे. संत परंपरेचा खजिना लोकांपर्यंत पोहोचविण्यात कीर्तनकारांचे महान योगदान आहे. कीर्तनकारांनी हे ज्ञान सुशिक्षित तसेच अशिक्षित लोकांपर्यंतही पोहाचविले आणि संस्कृतीचे जतन केले, असे प्रतिपादन श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे (अयोध्या) कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले. जेथे समाजमानसाची मशागत होते, भक्तीची शिकवण दिली जाते, ज्यातून कृतज्ञता येते तो माणूस माणूस म्हणून ओळखावा तसे नसल्यास त्यातील माणुसपणे संपले आहे हे जाणावे. आज कीर्तनकारांच्या नावाखाली तमासगीर, विनोदाचार्य निर्माण होत आहेत, ही खेदाची बाब आहे. रुक्ष शिक्षण रावणनिर्मिती करीत आहेत; परंतु शिक्षणाबरोबर भक्तीचा संस्कार दिला गेल्यास त्याच्यात राम निर्माण होतील, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

संत विचार प्रबोधिनी, पुणे आयोजित वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा आज (दि. 13) टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती कीर्तन सेवा पुरस्कार ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. ॲड. डॉ. जयवंत महाराज बोधले यांना तर वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती लोककला सेवा पुरस्कार लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांना स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील, वासकर महाराज फडाचे प्रमुख ह. भ. प. राणा महाराज वासकर, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, बीव्हिजीचे हणमंतराव गायकवाड, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, देहू संस्थानचे ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज मोरे, ह. भ. प. माणिक महाराज मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 21 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. अंजली देखणे, डॉ. रामचंद्र देखणे साहित्य-कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे, डॉ. पूजा देखणे, डॉ. पद्मश्री जोशी मंचावर होते.

स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज डॉ. रामचंद्र देखणे यांच्या विषयी बोलताना म्हणाले, कीर्तनकार, प्रवचनकार प्रबोधनाचे कार्य करीत असतात. त्या परंपरेतील प्राचीन आणि अर्वाचिन यांचा सांधा साधत पुढील पिढीपर्यंत संत विचार पोहोचविण्याचे कार्य देखणे महाराज यांनी केले आहे. आपला धर्म, वारकरी संप्रदाय निर्दोष आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मातृभाषेत शिक्षण, व्यवसायाभिमुख शिक्षण तसेच संस्कार आणि परंपरा देणारे शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कीर्तनात समाजप्रबोधनाची ताकद असल्यामुळे याचाही शिक्षणपद्धतीत समावेश करण्यात आला आहे. वारकरी परंपरा, कीर्तन परंपरा कधीही खंडित होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सत्काराला उत्तर देताना ह.भ.प. जयवंत महाराज बोधले म्हणाले, डॉ. रामचंद्र देखणे यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार मला कार्य प्रेरणा देणारा ठरणार आहे. संत एकनाथ महाराज यांची सर्वसमावेशक भूमिका देखणे सरांनी अंगिकारली होती.

डॉ. प्रकाश खांडगे म्हणाले, लोक कलेच्या अभ्यासातून कीर्तन, वारकरी परंपरेतील मान्यवरांचा सहवास मला लाभला हे मी माझे भाग्य सजमतो. देखणे सरांच्या नावे मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी प्रसादासमान आहे.

प्रास्ताविकात डॉ. भावार्थ देखणे म्हणाले, डॉ. रामचंद्र देखणे हे हाडाचे वारकरी, कीर्तनकार तसेच लोकसाहित्यिकही होते. यामुळेच कीर्तन आणि लोकसाहित्याच्या प्रांतात पुरस्काराचे वितरण केले जात आहे. कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्माचे सांस्कृतिकीकरण केले जाते.

गौरवपत्राचे वाचन डॉ. पूजा देखणे यांनी केले. सूत्रसंचालन नरहरी महाराज चौधरी यांनी केले तर आभार डॉ. पद्मश्री जोशी यांनी मानले.