पुणे, दि. १५: बालदिनाचे औचीत्य साधुन पुणे कॅन्टोन्मेंट (अ.जा.) विधानसभा मतदार संघात स्वीप व्यवस्थापन कक्षामार्फत विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये ७ हजार ६०० संकल्प पत्रांचे वाटप करुन विद्यार्थ्यांमार्फत “लोकशाहीच्या उत्सवात आई-बाबा तुम्ही सहभाग घ्या” अशी साद घालण्यात आली.
मतदान जनजागृती अंतर्गत कॅन्टोन्मेंट मतदार संघातील सरदार दस्तुर कॉमर्स ॲन्ड सायन्स कॉलेज, सरदार दस्तुर हायस्कुल व इतर संलग्न शाळा, कस्तुरबा गांधी मनपा शाळा, वाडीया ज्युनीअर कॉलेज आर्टस् सायन्स, वाडीया ज्युनीअर कॉलेज कॉमर्स, वाडीया ज्युनीअर इंजिनीअरींग कॉलेज, संत गाडगे महाराज शाळा, कॅम्प एज्युकेशन डॉ.सायरा पुनावाला स्कूल, रवींद्रनाथ टागोर स्कूल, पुना इस्लामीया उर्दु स्कुल तसेच संत गाडगे महाराज या शाळा, महाविद्यालयांमध्ये संकल्प पत्राचे वाटप करण्यात आले
शाळेत पालक सभेला उपस्थित पालकांना मतदानाची शपथ घेण्यात आली तसेच मतदानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघात आत्तापर्यंत जवळपास ४० शाळा,महाविद्यालये, २०० गृहनिर्माण सोसायट्या व ३० शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये जाऊन २८ हजार संकल्प पत्रांचे स्वीप कक्षामार्फत वाटप करण्यात आले आहे.