संत नामदेव महाराज यांच्या ७५४ व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान सायकल वारीचे आयोजन
पुणे : संत नामदेव महाराज यांच्या ७५४ व्या जयंतीनिमित्त पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यात आल्यावर या सायकल वारीचे श्री नामदेव शिंपी समाज पुणे लष्कर, नामदेव समाजोन्नती परिषद व पुणेकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी लक्ष्मी रोड मार्गे बुधवार पेठ येथील संत नामदेव मंदिरापर्यंत नामदेव महाराजाच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली होती.
भागवत धर्म प्रसारक मंडळ, नामदेव समाजोन्नती परिषद, महाराष्ट्र राज्य, पालखी सोहळा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, श्री नामदेव दरबार कमिटी श्री क्षेत्र घुमान (पंजाब) यांच्या संयुक्त विद्यमाने या वारीचे आयोजन करण्यात आले. पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर, सरचिटणीस डॉ. अजय फुटाणे यांनी सोहळ्याचे संयोजन केले आहे. पालखीचे स्वागत पुणे विभागीय उपाध्यक्ष रणजित माळवदे, जिल्हाध्यक्ष विजय कालेकर, ना स.प. पुणे शहर शाखेचे अध्यक्ष संदीप लचके, सचिव सुभाष मुळे, प्रशांत सातपुते, सुभाष पांढरकामे, सोमनाथ मेटे, कुंदन गोरटे, अक्षय मांढरे यांनी केले.
श्री क्षेत्र पंढरपूरहून या सोहळ्यास प्रारंभ झाला. सोलापूर, सातारा, पुणे जिल्ह्यात निरा, जेजुरी, सासवड, हडपसर मार्गे वारी पुणे शहरात दाखल झाली. पालखी सोहळा व सायकल वारीची मिरवणूक बुधवार पेठ येथील नामदेव मंदिर येथे आल्यानंतर महिलांनी ओवाळून व पुष्पवृष्टी करीत स्वागत केले. यावेळी सायकल स्वारांचा सत्कार देखील करण्यात आला.
यावेळी वारीतील सहभागी सायकल स्वारांना मेडिकल किट देण्यात आले. सायकल स्वारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी नृत्य व सायकल वारीवर हिंदी गीताचे सादरीकरण करण्यात आले. या गीताची रचना करणारे सुधाकर मेहेर व संगीतकार हरीश धोंगडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पादुकांची पूजा करून महाआरती करण्यात आली. यावेळी बुधवार पेठ शिंपी समाज व संस्थेचे अध्यक्ष कैलास देवळे, चिटणीस डॉ. लक्ष्मण कालेकर यांच्यावतीने उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.