; कसब्यात ‘मनसे’च्या इमानदार कार्यकर्त्याला निवडून देण्याचे आवाहन
पुणे: पेठांमध्ये मुलांना खेळाची मैदाने नाहीत. त्यांना बाहेर जावे लागते. या परिसराची आणखी एक ओळख आहे, ती इथल्या जुन्या तालमींची. याच तालमींमधून अनेक पैलवानांनी राष्ट्रीय स्तरावर आपले कर्तृत्व गाजवले. आज मात्र या तालमी मोडकळीस आलेल्या आहेत. येत्या काळात मतदारसंघात खेळाची मैदाने उपलब्ध करून देण्यासह जुन्या तालमीचे पुनर्जीवन करून तेथे पैलवान घडवण्यासाठी चांगले प्रशिक्षक देण्यावर माझा भर राहणार आहे, असा शब्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कसबा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार गणेश भोकरे यांनी दिला.
टेंडर, कमिशन, कॉन्ट्रॅक्ट यातच अडकलेल्या या दोन्ही उमेदवारांना बाजूला ठेवून एका इमानदार कार्यकर्त्याला तुम्हाला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या, अशी साद भोकरे यांनी मतदारांना घातली आहे. स्वच्छ प्रतिमेचा तरुण, तडफदार आणि तडकीफड लोकांच्या समस्या सोडवणाऱ्या गणेश भोकरे यांना कसब्यामध्ये लोकांचा, माताभगिनींचा पाठिंबा मिळत आहे.
गणेश भोकरे म्हणाले, “गेल्या ३० वर्षांत भाजप, तर गेल्या दोन वर्षांत काँग्रेसचा आमदार येथे आहे. मात्र, कसब्यातील पायाभूत समस्याही सुटलेल्या नाहीत. वाढलेली महागाई, वाहतूककोंडी, गुन्हेगारी, कोयता गँगची दहशत, महिलांवरील अत्याचार यामुळे मतदारसंघातील लोकांमध्ये संताप आहे. दोन्ही उमेदवारांविषयी मतदारांमध्ये आणि पक्षांतर्गत प्रचंड नाराजी आहे. कसबावासीयांच्या समस्या जाणून घेत असून, त्यानुसार माझ्या विकास आराखड्याची निर्मिती केली आहे. या भागातच राहिलेलो असल्याने अनेक प्रश्नांची मला जाणीव आहे.”
शहरातील अनेक मोठ्या शाळांची मैदाने सुटीच्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांना वापरता यावेत, यासाठी नियोजन करणार आहे. तसेच तालमींच्या गरजा लक्षात घेऊन तिथे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. येत्या काळात या तालमींमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीगीर तयार करण्याचे ध्येय आहे. जुन्या वाड्यांचा नियोजनबद्ध पुनर्विकास आराखडा करून तेथेही नागरिकांसाठी विविध स्वरूपाच्या अमेनिटी स्पेस (सोयी-सुविधा) उपलब्ध करण्यासाठी मला काम करायचे आहे, असे भोकरे यांनी नमूद केले.