Home Blog Page 573

राज्यात सत्ताधारी भाजपाकडून खुलेआम पैसे वाटप होत असताना निवडणूक आयोग काय झोपला आहे का?: सचिन सावंत.

निवडणुकीत भाजपा युतीकडून साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर, प्रचार संपल्यानंतरही भाजपा नेते विरारमध्ये काय करत होते.

मुंबई, दि. १९ नोव्हेंबर २०२४
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील घटनांनी पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. लोकशाही व संविधानाचा गळा घोटून सत्ताधारी पक्ष साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर खुलेआमपणे करत आहेत. सर्वात आश्चर्याची व गंभीर बाब म्हणजे हे सर्व घडत असताना पोलीस दल व निवडणूक आयोग काय झोपा काढत आहे का? असा सवाल करून भाजपा नेते विनोद तावडेंवर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई करावी अन्यथा निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर धरणे धरू, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी दिला आहे.

विरार प्रकरणी टिळक भवनमध्ये बोलताना सचिन सावंत म्हणाले की, भारतीय जनता पक्ष व युतीने विधानसभा निवडणुकीत लाजलज्जा सर्वकाही सोडली असून खुलेआमपणे पैशांचे वाटप केले जात आहे. शिंदेसेनेच्या एका आमदाराशी संबधित वाहनात मोठी रक्कम वाहनात सापडली पण त्याचे पुढे काय झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मतदारसंघातही सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराकडून पैसे वाटत केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता विरारमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय नेत्याचे पैसे वाटण्याचे प्रकरण उघड झाले आहे. सत्तातुराणां न भय न लज्जा! अशी भारतीय जनता पक्षाची वर्तणूक आहे. पराभवाची चाहूल लागल्याने भाजपा व सत्ताधारी पक्ष पैशाचा वापर करून लोकशाहीचे धिंडवडे काढत आहेत.

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार प्रचार संपल्यानंतर मतदार संघाबाहेरील कोणताही नेता दुसऱ्या मतदारसंघात राहू शकत नाही असे असताना विनोद तावडे काल संध्याकाळ पासून विरारमध्ये काय करत होते, हा प्रश्न आहे. तावडेंवर लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२६ नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे, या कायद्यानुसार दोषीला २ वर्षांची शिक्षा होऊ शकते. राज्यात निवडणुका जाहीर झाल्यापासून निवडणूक अधिकारी स्वतंत्र व निष्पक्षपाती भूमिका घेत नाहीत हा आमचा आक्षेप आहे. लोकशाहीचा हा उत्सव पारदर्शक, निर्भय व निष्पक्षपातीपणे पार पडावा यासाठी निवडणूक आयोगाची भूमिका महत्वाची असून तसे त्यांनी कृतीतून दाखवावे, असेही सचिन सावंत म्हणाले.

फडणवीस यांची ही “लाडका विनोद” योजना आहे का? – कॅांग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ यांचा उपरोधक सवाल ?

पुणे-ना मै खाउंगा ना किसीको खाने दूंगा अशी घोषणा करणाऱ्या पंतप्रधान मोदीजींच्या भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना विरार येथे पैसे वाटताना पकडण्याची बातमी ऐकताच फडणवीस यांनी “ लाडका विनोद “ अशी काही योजना सुरू केली आहे का अशी खोचक प्रतिक्रिया गाडगीळ यांनी दिली आहे. १९८७ साली स्व. बाळासाहेब ठाकरे व रमेश प्रभू यांना धर्माचा प्रचारात वापर केल्याबद्दल निवडणूक आयोगाने त्यांचा मतदानाचा अधिकार ६ वर्षाकरीता काढून घेतला होता. तसा तावडे यांचा अधिकार काढून घेत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवून देणार की हे प्रकरणही वॅाशींग मशीनमधे घालून क्लिन चिट देणार? असा प्रश्न गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे. स्व. अ. बि. बाजपेयी, शा. प्र. मूखर्जी , दि.द. उपाध्याय यांची परंपरा असलेल्या भाजप ला सध्याच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी “चिक्की पासून नाचक्की “ ची सुरवात करत कुठे नेवून ठेवला आहे हा भाजप असे आता त्यांचेच कार्यकर्ते बोलू लागले आहेत.

विनोद तावडेंना तात्काळ अटक कराः रमेश चेन्नीथला

पराभवाच्या भितीने भाजपाकडून राज्यभरात पैसे वाटून मते विकत घेण्याचा प्रयत्न

निवडणूक आयोगाने तावडेंसह भाजपावरही कारवाई करावी

मुंबई, दि. १९ नोव्हेंबर २०२४
भारतीय जनता पक्ष आणि महायुती पराभवाच्या भितीने मोठ्‌या प्रमाणात पैसा आणि सत्तेचा गैरवापर करत असून भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना वसई विरार मध्ये मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडले आहे. विनोद तावडे यांनी पाच कोटी रुपये वाटल्याचे आरोप केले जात आहेत त्यामुळे तावडे यांना तात्काळ अटक केली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून मोठ्या प्रमाणात सत्ता आणि पैशाचा प्रचंड गैरवापर सुरु आहे. आज वसई विरार येथे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना मतदारांना पैसे वाटताना नागरिकांनी रंगेहाथ पकडले. घटनास्थळी पोलीस व निवडणूक आयोगाचे अधिकारी उपस्थित होते. घटनास्थळावरून १० लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. पण अद्याप तावडे यांना अटक केली नाही. प्रचार संपल्यानंतर नियमानुसार मतदारसंघाच्या बाहेरची व्यक्ती थांबू शकत नाही पण तावडे यांनी वसई विरारला जाऊन कार्यकर्त्यांची बैठक घेतली असे सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःच आचारसंहिता भंग केल्याचे मान्य केले आहे. प्रसारमाध्यमातून मिळणारी माहिती व प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार तावडे यांनी पाच कोटी रुपये वाटले आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे. फक्त वसई विरारच नाही तर राज्यभरात भाजपा आणि महायुतीकडून पैसे वाटून जनमत विकत घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यभरात सुरु असलेल्या पैसे वाटपावर कारवाई करून पैसे वाटणा-यांना अटक करावी तरच निष्पक्ष निवडणुका पार पडतील असे चेन्नीथला म्हणाले.

भाजप आणि विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावीः बाळासाहेब थोरात

प्रचार संपल्यावर आचारसंहिता आणि नियम मोडून वसई विरार मध्ये पैसे वाटप सुरु असताना आयोगाचे अधिकारी आणि पोलीस काय करत होते?

मुंबई, १९ नोव्हेंबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्यापासून सत्ताधारी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर सत्ता आणि पैशाचा गैरवापर सुरु आहे. आदर्श आचारसंहिता आणि नियम डावलून मतदारांना पैशांचे वाटप सुरु आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. आज भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे यांना मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ लोकांनी पकडले आहे. भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशांचा वापर करून भाजपा आणि सत्ताधारी मते विकत घेऊन लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम करत आहेत. निवडणूक आयोगाने भाजप आणि विनोद तावडेंवर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने निवडणुका झाल्या पाहिजेत त्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. पण राज्यात सत्ताधारी पक्षांकडून दररोज आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या घटना घडत आहे. आज वसई विरार परिसरातील विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी मंत्री विनोद तावडे हे मतदारांना पैसे वाटत असताना नागरिकांनी त्यांना रंगेहाथ पकडले. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ वृत्तवाहिन्यांवरून संपूर्ण देशाने पाहिले आहेत. घटनास्थळी पोलीस आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी उपस्थित होते. जवळपास १० लाख रुपयांची रोकड जप्तही केली आहे पण कुणालाही अटक केली नाही. निवडणूक प्रचार संपल्यानंतर मतदारसंघाबाहेरील नेत्यांनी व स्टारप्रचारकांनी मतदारसंघात थांबण्यास कायद्याने मनाई असतानाही तावडे वसई विरार मध्ये काय करत होते? निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी व पोलिसांनी त्यांना का रोखले नाही? पैसे वाटताना रंगेहाथ पकडूनही त्यांना अटक का केली नाही? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कालच नाशिक शहरात एका हॉटेलमध्ये मोठी रक्कम सापडली होती. त्यापूर्वीही पुणे परिसरात सत्ताधारी पक्षाशी संबंधित एका गाडीतून पाच कोटी रुपयांची रक्कम सापडली होती. राज्याच्या विविध भागात दररोज मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपये मिळत आहेत पण दुर्देवाने काहीच कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी भाजप आणि विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी अशी मागणी थोरात यांनी केली आहे.

विनोद तावडे प्रकरण हे भाजप, महायुतीमधील गँगवॉर:उद्धव ठाकरे यांचा घणाघात

मुंबई- उद्धव ठाकरे यांनी विनोद तावडे प्रकरण हे प्रकरण भाजप किंवा महायुतीमध्ये सुरू असणाऱ्या गँगवॉरचे उदाहरण असल्याचा दावा करत भाजपचा नोट जिहाद असल्याची टीका केली आहे. महायुतीचे लोक राज्यात अत्यंत निर्घृणपणे राजकारण करत आहेत. ते जिंकण्यासाठी वाट्टेल त्या थराला जात आहेत. या प्रकरणी सर्व पुरावे असतानाही कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रच उद्या काय ती कारवाई करेल, असे ते म्हणालेत.

उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, विनोद तावडे यांनी पैसे वाटतानाचा व्हिडिओ निवडणूक आयोगाने पाहिला पाहिजे. काल अनिल देशमुख यांचे डोके आपोआप फुटले. आज पैसे वाटतानाचा व्हिडिओ असेल तर हे जादुचे पैसे कुठून आले? ते कुणाच्या खिशात जात होते? मी तुळजाभवानीच्या दर्शनाला जाताना माझी बॅग तपासली. मग यांच्या बॅगेतील पैसे कोण तपासणार? निवडणूक आयोगाने यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा आयोगावर कारवाई करण्यासाठी आम्हाला काहीतरी वेगळा मार्ग पत्करावा लागेल.

निवडणूक आयोगाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पण गुन्हा दाखल व आरोपी फरार होता असे होता कामा नये. कदाचित हे यांच्यातील गँगवॉर असेल. याविषयी मला काही ठिकाणाहून माहिती मिळाली आहे. काल नाशिकमध्ये त्यांच्यापैकी एका पक्षाने पैसे वाटल्याची माहिती आहे. त्यामुळे कायदा सर्वांना समान असेल तर निवडणूक आयोगाने या प्रकरणी निष्पक्ष चौकशी व कठोर कारवाई केली पाहिजे.

ठाकरे म्हणाले, विनोद तावडे हे तावडीत सापडले असतील तर त्यांनी आतापर्यंतची सरकारे कशी पाडली? व कशी स्थापन केली? याचा सुद्धा हा पुरावा आहे. ज्या जागृतपणे ज्यांनी कुणी हे कट कारस्थान उजेडात आणले, त्यांचे या प्रकरणी कौतुक झाले पाहिजे. विनोद तावडे प्रकरण हे भाजप किंवा महायुतीमधील अंतर्गत गँगवॉर असू शकेल. हितेंद्र ठाकूर यांनी तसे संकेत दिलेत. महायुतीच्या योजना कशा फसव्या आहेत हे आता संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले पाहिजे. एका बाजूला बहिणीला 1500 आणि यांना मात्र थप्यांच्या थप्या जात आहेत हे अवघा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी हे प्रकरण महायुतीचा नोट जिहाद असल्याचीही टीका केली. हा भाजप, मिंधे व अजित पवारांचा हा नोट जिहाद आहे का? विनोद तावडे यांना पीएचडी मिळाली पाहिजे. त्यांनी काही राज्यांत सरकार पाडले व स्थापन केले. त्याचे गुपित काय आहे ते आज उघड झाले. भाजपचा हा नोट जिहाद आहे. त्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे.

भाजपने निवडणुकीत ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा दिला. पण आता हे पाहून ‘पैसा बाटेंगे और जितेंगे’ असे त्यांचे काही सुरू असल्याचा संशय येतो. या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे. महाराष्ट्र या प्रकरणाचा काय तो निर्णय घेईल. महायुतीचे लोक अत्यंत निर्घृणपणे राजकारण करत आहेत. जिंकण्यासाठी वाट्टेल त्या पातळीवर ते जात आहेत. ज्या पद्धतीने अनिल देशमुखांवर हल्ला झाला, तो कुणी केला याचे उत्तर मिळतच नाही. सर्व पुरावे असतानाही या प्रकरणी कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र उद्या काय तो कारवाई करेल, असेही उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

विनोद तावडे यांनी सर्व आरोप फेटाळले,पैशांसंदर्भात FIRची नोंद नाही, भाजप नेत्याने टीप दिल्याचा दावा खोटा

मुंबई-माझी प्रतिमा मलिन व्हायचे कारण नाही, कारण पैशाचा विषय माझा नाही. पैशांसंदर्भातल्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. भाजपच्या लोकांनी टीप दिली, हे हितेंद्र ठाकुर धादांत खोटे सांगत आहेत. टीप दिल्याचा दावा हा खोटा आहे, असे स्पष्टीकरण भाजप नेते विनोद तावडे यांनी दिले. ते आज सायंकाळी माध्यमांशी बोलत होते. कुणाला शंका असल्यास तुम्ही चौकशी करावी, सीसीटीव्ही तपासावे, असेही विनोद तावडे म्हणाले.

विनोद तावडे म्हणाले, वसई येथील घटनेसंदर्भात तीन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. मी आणि हितेंद्र ठाकुर दोघांनी मिळून पत्रकार परिषद घेतल्यामुळे एक, माझा मतदारसंघ नसताना मी तिथे गेलो हा दुसरा आणि हितेंद्र ठाकुरही त्यांचा मतदारसंघ नसताना तिथे आले, याबाबत तिसरा एफआयआर नोंद झाला आहे. मात्र, पैशाचा एकही एफआयआर नोंदवण्यात आला नाही. पैशांसंदर्भातल्या सर्व बातम्या खोट्या आहेत.

पुढे बोलताना विनोद तावडे यांनी हिंतेंद्र ठाकुर यांच्या टीपच्या विधानावरही भाष्य केले. भाजपच्या नेत्याने टीप दिल्याचे हिंतेंद्र ठाकुर यांनी म्हटले होते, मात्र हे धादांत खोटे आहे. त्यात काही तथ्य नाही, असे तावडे यांनी सांगितले. तुम्हाला शंका आली असेल, तर तुम्ही पैसे तपासा, हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासा. जे मिळेल ते करा, माझे काही म्हणणे नाही, असे तावडे म्हणाले.

दरम्यान, विनोद तावडे यांचे वसई येथील घटनेबाबत निवेदन जाहीर केले आहे. त्या ते म्हणाले की, वाडा येथून आज मी मुंबईला परतत असताना वसई परिसरात आल्यावर स्थानिक भाजप उमेदवार राजन नाईक यांना चौकशीसाठी फोन केला. आम्ही सर्व कार्यकर्ते वसई येथे एका हॉटेलमध्ये आहोत, आपण चहाला या, असे त्यांनी सांगितले. मी तेथे पोहोचल्यावर स्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली. मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया व आपण घ्यायची काळजी याविषयी मी बोलत होतो. त्यावेळी अचानक काही कार्यकर्ते आले व त्यांनी माझ्याभोवती कोंडाळे करून आरडाओरडा सुरू केला. हे कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे असल्याचे समजल्यानंतर मी त्या पक्षाचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांना फोन केला व आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवरावे, अशी विनंती केली.

हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितीज ठाकूर तेथे आले. त्या दोघांशी बोलणे झाल्यावर त्यांच्यासोबत मी एकाच गाडीतून बाहेर पडलो. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला आहे. मी केवळ भाजपा कार्यकर्त्यांसोबत चहापानासाठी गेलो होतो व चर्चा करत होतो. त्यावेळी माझ्याकडून पैसे वाटप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या संदर्भातील सीसीटीव्ही चित्रण तपासावे म्हणजे दूध का दूध, पानी का पानी, स्पष्ट होईल. राहुल गांधी व सुप्रिया सुळे अशा यासंदर्भात टीका करणाऱ्या नेत्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. तसेच याबाबतीत मा. निवडणूक आयोगाकडून निःपक्ष चौकशी व्हावी, असे विनोद तावडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

पैसे वाटप आणि हल्ले: निवडणुकीतील गुन्हेगारीला तातडीने पायबंद घाला- अंकुश काकडे

पुणे-निवडणुकीतील गुन्हेगारीला तातडीने पायबंद घाला अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

या संदर्भात काकडे म्हणाले,’ आज पुणे शहरात वडगाव शेरी मतदार संघातील माजी नगरसेविका सुरेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्या गाडीवर धानोरी येथे ४ अज्ञात इसमाने हल्ला केला त्यात श्री चंद्रकांत टिंगरे अतिशय गंभीर जखमी झाले असून त्यांना जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पोलीस त्या ठिकाणी तक्रार घेण्यामध्ये चाल ढकलपणा करीत आहेत. तसेच पर्वती मतदारसंघांमध्ये बिबेवेवाडी परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उघड उघड पैशाचे वाटप करीत आहेत. तेथील उमेदवार अश्विनी कदम यांनी संबंधितांविरोधात बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली पण त्यावर ही कारवाई केली जात नाही. अशाच प्रकारच्या घटना इतर मतदारसंघांमध्ये पोलीस खात्याकडून नोटीसा दिल्यात कार्यकर्त्यांना नोटीस दिले जात आहेत. या संदर्भात महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ सौ वंदना चव्हाण,श्री अरविंद शिंदे, श्री अंकुश काकडे श्री संजय मोरे, श्री बापूसाहेब पठारे, सौ अश्विनी कदम,सौ रेखा टिंगरे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याबाबत त्वरित कडक कारवाई करावी,अशी मागणी केली. उद्या मतदान संपेपर्यंत सर्व मतदारसंघांमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी मागणी केली.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला

पुणे-वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा देणारे नेते चंद्रकांत टिंगरे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्रकांत टिंगरे हे माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती आहेत.

सहा दिवसांपूर्वी वडगावशेरी भागातील अजित पवार गटाचे नेते चंद्रकांत टिंगरे आणि माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा देऊन यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. यामुळे एकूणच महायुतीला धक्का मानला जात आहे. या सर्व घडामोडी दरम्यान चंद्रकांत टिंगरे यांच्यावर आज दुपारी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.चंद्रकांत टिंगरे यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती बापूसाहेब पठारे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना मिळताच चंद्रकांत टिंगरे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात केली. या हल्लेखोरांचा पोलीस तपास करीत आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर बापूसाहेब पठारे म्हणाले की, निवडणूक मतदानाला काही तास उरले आहे. वडगावशेरी भागातील महत्वाच्या नेत्यावर, कार्यकर्त्यांवर हल्ला होणे ही अतिशय निषेधार्ह बाब आहे. विचारांची लढाई विचाराने लढली पाहिजे. हिंसेचा आधार घेऊन कोणी धमकावत असेल तर त्यांचे मनोदय यशस्वी होणार नाहीत. ही संतांची आणि वारकऱ्यांची भूमी आहे. निर्भय बनून हिंसेचा प्रतिकार केला जाईल आणि लोकशाहीच्या मार्गाने हल्लेखोरांना धडा शिकवला जाईल, अशा शब्दात या घटनेचा त्यांनी निषेध नोंदविला.

भाजपच्या बड्या नेत्यानेच बहुजन चेहरा संपवण्यासाठी विनोद तावडेंचा गेम केला -संजय राऊत

0

पोलिस बंदोबस्तात महायुतीचे पैशांचे वाटपविनोद तावडे स्वतः पैसे वाटतात हे आश्चर्य

मुंबई -विनोद तावडे नालासोपारा विरारमध्ये पैसे वाटप करताना सापडल्यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. आता या निवडणुकीतील भाजपचा खेळ खल्लास झाला आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केला. भाजपतील बहुजन नेतृत्व संपवण्यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनी तावडेंना अशा प्रकारे पकडून देण्याचे कारस्थान रचले, असेही ते यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अंगुलीनिर्देश करताना म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, तरी नालासोपारा विरारमध्ये जे घडले, ते कॅमेऱ्यापुढे आहे. या प्रकरणी खुलासे कशाचे होत आहेत? भाजपचा खरा चेहरा उघड झाला. त्यांचा या निवडणुकीतील खेळ संपला. विनोद तावडे हे भाजपचे सरचिटणीस आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस यांच्याकडे तब्बल 5 कोटी रुपये सापडलेत. बहजुन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हे पैसे जप्त केलेत. पैसे तोंडावर फेकले तोंडावर व गोंधळ घालून विनोद तावडे यांना तिथे कोंडून ठेवले. यावर कोणता खुलासा करणार हे भाजपने सांगावे.

महाराष्ट्राच्या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात आचारसंहिता लागण्यापूर्वी किमान 15 ते 20 कोटी रुपये पोहोचले. आता आज नाशिकमध्ये भाजप व शिंदे गटाचे पैसे पकडले. मुंबईत पैसे वाटण्यासाठी ठाण्यातून खास माणसे नियुक्त करण्यात आली आहेत. ठाण्याच्या बाजूला ईशान्य मुंबई आहे. तिथे शिंदे यांचे राम रेपाळे यांचा माणूस आहे. हा माणूस रात्रीच्या अंधारात पैसे घेऊन येतो व मतदारांना पैसे वाटतो. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात ठाण्याला परत जातो. या प्रकरणी राम रेपाळे हे नाव सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. 23 तारखेनंतर या व्यक्तीचे काय करायचे हे स्वतः मी पाहणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.

माझ्याकडे पैसे वाटणाऱ्या महायुतीच्या 18 लोकांची नावे आहेत. पण विनोद तावडे स्वतः पैसे वाटत आहेत हे आश्चर्य आहे. हे लोक आमच्या बॅगा तपासतात, आमचे खिसे तपासतात. विनोद तावडे यांच्याकडे 15 कोटींहून अधिकची रक्कम होती. त्यातील 5 कोटी रुपये जप्त झालेत, असेही ते यावेळी म्हणाले.

विनोद तावडे यासंबंधीची माहिती भाजपच्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनी बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना दिली. विनोद तावडे भविष्यात आपल्याला जड होतील. ते बहुजन समाजाचा चेहरा आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. त्यांच्या हातात या राज्याची काही सूत्रे आहेत. ते मोदी व शहांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने पकडून देण्याचे कारस्थान भाजपमध्ये रचले गेले. ज्यांच्याकडे गृह खाते आहे त्यांच्याकडे यासंबंधीची जास्त माहिती असते, असेही संजय राऊत यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला.

संजय राऊत यांनी यावेळी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला. निवडणूक आयोग निष्पक्षपाती असता तर ही कारवाई बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांऐवजी आयोगाने केली असती, असे ते म्हणाले.विनोद तावडे विवांता हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते पोलिस हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना दोन डायऱ्या सापडल्या. विनोद तावडे यांनी तिथे आपली बैठक सुरू होती असा दावा केला आहे. पण मतदानापूर्वी 489 तास अगोदर बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे असतात, हे भाजपच्या राष्ट्रीय नेत्याला माहिती नाही का? एवढी अक्कल तावडे यांना नाही का? आता पोलिस या प्रकरणात कोणती कारवाई करतात हे पहावे लागेल. कारण, सरकार त्यांचेच आहे, असेही हितेंद्र ठाकूर यावेळी बोलताना म्हणाले.

विवांता हॉटेलमध्ये 5 कोटी:पैसे वाटप प्रकरणी भाजप नेते विनोद तावडेंवर आरोप

0

विनोद तावडेंसह भाजप उमेदवारावर गुन्हा

मुंबई-बहुजन विकास आघाडीने (बविआ) भाजपचे बडे नेते विनोद तावडे यांच्यावर मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी तावडे यांना रंगेहाथ पकडल्याचा दावा केला आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. नालासोपारा मतदारसंघात ही घटना घडली आहे.निवडणूक आयोगाने या प्रकरणी विनोद तावडे यांच्यासह भाजपचे स्थानिक उमेदवार राजन नाईक यांच्यावर लोकप्रतिनिधित्व कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे.बहुजन विकास आघाडीच्या आरोपानुसार, भाजप सरचिटणीस विनोद तावडे मंगळवारी विरार पूर्वच्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यासोबत भाजप उमेदवार राजन नाईक व भाजपचे काही पदाधिकारी होते. तिथे त्यांची बैठक सुरू होती. त्यावेळी बविआचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले. त्यांनी त्यांच्यावर पैसेवाटप सुरु असल्याचा आरोप केला. त्यानंतर तिथे प्रचंड राडा झाला. हा प्रकार समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी बविआचे उमेदवार क्षितीज ठाकूरही आपल्या कार्यकर्त्यांसोबत उपस्थित होते. यावेळी दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी झाली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी उद्या बुधवारी एका टप्प्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर उपरोक्त घटना घडली आहे. नालासोपारा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या राजन नाईक यांचा काँग्रेसच्या संदीप पांडे यांच्याशी सामना होणार आहे. या ठिकाणी बहुजन विकास आघाडीनेही क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. विनोद तावडे मंगळवारी दुपारी येथे राजन नाईक यांच्या प्रचारासाठी आले होते. ते येथील विवांता हॉटेलमध्ये थांबले होते. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मते, विनोद तावडे यांनी स्वतः त्या ठिकाणी मतदारांना पैसे दिले.

तावडेंनी केली माफ करण्याची विनंती – हितेंद्र ठाकूर

दुसरीकडे, बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडे यांनी आपली माफी मागितल्या आरोप केला आहे. माझे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी बोलणे झाले आहे. विनोद तावडे यांनी मला फोन करून जाऊ द्या, माफ करा अशा प्रकारची विनंती करत आहेत. त्यांचे माझ्या फोनवर एक-दोन नव्हे तर 25 कॉल्स आलेत, असे ते म्हणालेत.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणी भाजप विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी जी, हे 5 कोटी कोणत्या SAFE मधून निघालेत? जनतेचा पैसा लुटून तुम्हाला कुणी Tempo मधून पाठवला? असे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत.
निवडणूक आयोगाने या प्रकरणी विनोद तावडे यांच्यासह भाजपचे स्थानिक उमेदवार राजन नाईक यांच्यावर लोकप्रतिनिधित्व कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. त्यानंतर तावडे यांनी निवडणूक आयोगाकडे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, हे माझ्याविरोधातील कारस्थान आहे. मी तिथे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मी काहीही चुकीचे केले नाही. हे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे षडयंत्र आहे. पोलिस व निवडणूक आयोगाने त्याची चौकशी करावी.

ठाकूर म्हणाले- हॉटेलचे सीसीटीव्ही बंद होते, आम्ही चालू केले:हितेंद्र ठाकूर म्हणाले – विनोद तावडे मतदारांना पैसे वाटण्यासाठी येत असल्याची माहिती मला मिळाली होती. त्यांच्यासारखा राष्ट्रीय नेता एवढे छोटे काम करणार नाही असे मला वाटत होते. हॉटेलमध्ये जाऊन त्यांना पाहिले असता तेथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. आमच्या विनंतीनंतर ते सुरू करण्यात आले. तावडे मतदारांना पैसे वाटप करत होते. ते हॉटेलमध्ये 3 तासांपेक्षा जास्त काळ थांबले होते.

विनोद तावडे म्हणाले की, “विरारच्या राड्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले आहेत. आपण पत्रकार परिषद घेतली त्याचा एक गुन्हा दाखल आहे. माझा मतदारसंघ नसताना मी तिथे गेलो यावर दुसरा गुन्हा दाखल झाला. तर हितेंद्र ठाकूर त्या ठिकाणी आले त्यावर तिसरा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी पैसे वाटप झाल्याचा कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. शंका आली तर तुम्ही सीसीटीव्ही तपासा.”

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला,संपूर्ण घटनाक्रम

0

नागपूर-राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी रात्री हल्ला झाला. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली. या घटनेवरून राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात असताना नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी हा संपूर्ण घटनाक्रम कसा घडला? हे समजावून सांगितले आहे.

हर्ष पोद्दार म्हणाले, अनिल देशमुख सोमवारी रात्री 8 च्या सुमारास आपल्या मतदारसंघातील प्रचार संपवून घरी परतत होते. नरखेडहून परत येत असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. त्यात देशमुख यांच्या डोक्याला मार लागला. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली असून, आमचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर खबरदारी म्हणून संवेदनशील भागांतील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

विशेषतः या घटनेचा सर्वच अंगानी सखोल तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कामाला लावण्यात आले आहे. मी स्वतः घटनास्थळाचा दौरा केला आहे. सध्या तपास सुरू असल्यामुळे त्यावर आताच एखादा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. पोलिस या घटनेतील तथ्य तपासून लवकरच वस्तुस्थिती उजेडात आणतील. सध्या अनिल देशमुख यांच्यावर नागपूरच्या अलेक्सिस (मॅक्स) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, नागपूरचे पोलिस उपायुक्त राहुल मदाने यांनी पोलिसांनी रुग्णालय परिसरातील बंदोबस्तात वाढ केल्याचे सांगितले आहे. अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानंतरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेनागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर यांनीही देशमुख यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. नरखेड येथून परत येताना बेला फाटा येथे आल्यावर अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक प्रकार घडला. त्यांना तात्काळ आरएच काटोल येथे तात्काळ प्राथमिक उपचार करून दर्शनी केअर सेंटर येथे उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलीस तपास करीत आहेत, असे ते म्हणाले.

अनिल देशमुख यांचे सुपुत्र तथा काटोल विधानसभेचे उमेदवार सलील देशमुख यांनी या घटनेसाठी भाजपला जबाबदार धरले आहे. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, अनिल देशमुख यांच्यावर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मी काटोलमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. भाजप राज्यात प्रत्येक ठिकाणी वाईट पद्धतीने पराभूत होत आहे. त्यामुळेच अशा पद्धतीचे हल्ले करून ते त्यांच्याविरोधात आवाज उंचावणाऱ्याचे डोके फोडण्याचा संदेश देत आहेत. त्यांचा काटोल व नरखेडमध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.

दुसरीकडे, भाजपने अनिल देशमुखांवरील हल्ला हा राजकीय स्टंटबाजी असल्याचा आरोप केला आहे. देशमुख स्वतःच आपल्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करून घेतली, असे भाजपचे काटोल मतदारसंघाचे प्रभारी अविनाश ठाकरे यांनी म्हटले आहे. काटोलमध्ये अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील यांचा सामना भाजपच्या चरणसिंह ठाकूर यांच्याशी आहे. दरम्यान, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही घटना घडल्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे.

दौंड राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १० लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त तर २ लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल उद्धवस्त

पुणे, दि. १८: राज्य उत्पादन शुल्क दौंड विभागाच्या धडक कारवाईत एकूण १० लाख ६९ हजार ४१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त तसेच २ लाख ९६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल उद्धवस्त करण्यात आला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विजय रोकडे यांनी दिली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या आदर्श आचारसंहिता कालावधीत पथकाच्यावतीने यवत पोलीस स्टेशनाच्या हद्दीतील मौजे हिंगणीगाडा, येथे अवैधरीत्या गावठी दारूचा साठा असल्याबाबत माहिती मिळताच छापा टाकून धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये गावठी हातभट्टी दारूचे ३५ लिटर क्षमतेचे एकूण ८० कॅन नष्ट करण्यात आले असून. एकूण २ लाख ९६ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल उद्ध्वस्त केला आहे. दुसऱ्या कारवाईत अवैधरित्या देशी विदेशी मद्याची वाहतूक व विक्री करताना एका चारचाकी वाहनासह एकूण १० लाख ६९ हजार ४१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईत निरीक्षक विजय रोकडे यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक, मयूर गाडे, दिनेश ठाकूर, जवान नि. वाहन चालक केशव वामने, जवान अशोक पाटील, जवान संकेत वाजे, जवान सौरभ देवकर, जवान सागर दुबळे, जवान प्रवीण सूर्यवंशी सहभागी होते.

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत ४१ लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त

पुणे, दि. १८: महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या आदर्श आचारसंहिता कालावधीत पुणे विभागाच्या भरारी पथकाने जिल्ह्यातील कारवाईत अवैध हातभट्टी दारू, देशी, विदेशी दारूची वाहतूक, विक्री व इतर साहित्य असे एकूण ४१ लाख ४२ हजार ३९५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांनी दिली आहे.

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत १५ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान अवैद्य दारू निर्मिती वाहतूक व विक्रीवर आळा घालण्याच्या दृष्टिने मोहिम आखून पुणे जिल्ह्यातील अवैद्य गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या, बनावट विदेशी मद्य निर्मितीच्या तसेच अवैद्य दारू विक्रीच्या ठिकाणावर सातत्याने छापे मारून एकूण ५६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्यामध्ये ३५ वारस व २१ बेवारस गुन्ह्यांचा समावेश आहे.

या कारवाईमध्ये आतापर्यंत २७ आरोपी विरूद्ध गुन्हे नोंदविण्यात आले असून ६० हजार ८०० लिटर गावठी हातभट्टी दारू निर्मितीचे रसायन, ६ हजार ८६९ लिटर अवैद्य गावठी हातभट्टी दारू, गावठी हातभट्टी दारू निर्मितीचे साहित्य, १४४ ब.लि. विदेशी मद्य व बनावट मद्य निर्मिती साहित्य, ८३ ब.लि. देशी मद्य, ७ ब.लि. विदेशी मद्य, ७ ब.लि. बिअर व ८६३ लिटर ताडी असा एकूण ४१ लाख ४२ हजार ३९५ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

निरीक्षक नरेंद्र थोरात दुय्यम निरीक्षक विराज माने, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलिम शेख, जवान प्रताप कदम, सतीश पोंधे, अनिल थोरात, रंजीत चव्हाण, शशीकांत भाट, अमोल दळवी, राहूल तारळकर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

यापुढे देखील विधानसभा निवडणूकीच्या आदर्श आचार संहितेच्या पार्श्वभूमीवर अवैद्य दारू व्यवसाय करणाऱ्यावर अशाच प्रकारची कारवाई सूरू राहणार असून कोठेही अवैद्य दारू व्यवसाय सूरू असल्यास राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक ०२०-२९९११९८६ वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.

मतदान प्रकिया निर्भय, भयमुक्त, निःपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि. १८: मतदान प्रक्रिया सुलभ होवून मतदारांना मतदानाचा सुखद अनुभव यावा, मतदानाच्या टक्केवारीता वाढ व्हावी याकरीता निवडणुका निर्भय, भयमुक्त, निःपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे; याकरिता विविध राजकीय पक्षांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मीनल कळसकर, तहसीलदार शीतल मुळे, राहूल सारंग यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार असून याकरीता जिल्हाप्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून पुढील ४८ तास उमेदवारांना जाहीर प्रचारावर बंदी करण्यात आली आहे, यामध्ये मुद्रित, इलेक्ट्रानिक, समाजमाध्यमे, व्हॉट्सॲप, रेडिओ, फलके, राजकीय सभा आदी कोणत्याही माध्यमाद्वारे प्रचार करता येणार नाही.

मतदान केंद्राच्या 200 मीटर बाहेर प्रशासनाच्यावतीने निश्चित केलेल्या जागेवर 10 बाय 10 आकाराचे उमेदवारांचे तंबू लावावेत. त्याठिकाणी निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करणारे कोणत्याही प्रकारचे पक्षाचे झेंडे, फलक, चिन्हे, चिठ्ठी आदी प्रचार साहित्य ठेवू नयेत.

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी (२० नोव्हेंबर) तात्पुरत्या स्वरूपात वाहनतळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध करण्यात आले आहे, मतदारांनी या वाहनतळाचा वापर करावा.

भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे मतदानाची गोपनीयता राखण्याकरीता २० नोव्हेंबर रोजी मतदान केंद्र तसेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी केंद्राच्या १०० मीटरच्या आवारात कोणताही मोबाईल, स्मार्टवॉच, पेन कॅमेरा आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, शस्त्र घेऊन येण्यास पूर्णत: बंदी आहे. त्यामुळे मोबाईल आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणे मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या अंतराच्या बाहेरच ठेवावीत.

मतदानाच्या अनुषंगाने दिशाभूल करणारे संदेश पाठविल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. निवडणूक कामकाजाची छायाचित्रे काढणे किंवा चित्रीकरण करणे, त्यांचे तसेच निवडणूकविषयक अफवा पसरविणारे संदेशाचे व्हॉटस्अॅप ग्रुप, समाजमाध्यमांवर प्रसारण करणे हा गंभीर गुन्हा आहे, असे करणाऱ्यावर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

येत्या २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी लोकशाही अधिक बळकटीकरण्याकरीता पुढे येऊन मतदान करावे, आपल्या परिसरातील पात्र मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे दिले.
0000

राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या झाल्या 64 सभा

मुंबई, 18 नोव्हेंबर
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात विधानसभा निवडणुकीदरम्यान, प्रचाराचा झंझावात केला आणि एकूण 64 ठिकाणी त्यांच्या रॅली, रोडशो आणि सभा झाल्या. यातील दिवाळीनंतर झालेल्या 50 वर सभा त्यांनी अवघ्या 13 दिवसांत केल्या, म्हणजे सरासरी 4 सभा त्यांनी दररोज घेतल्या. आज वर्धा जिल्ह्यात आर्वीत शेवटची सभा घेतली आणि प्रचाराची सांगता केली.

हा प्रवास त्यांनी 25 पेक्षा अधिक जिल्ह्यात केला असून, उर्वरित जिल्ह्यांत व्हीडिओ संदेशाच्या माध्यमातून त्यांनी प्रतिनिधीत्त्व केले. या सभांमध्ये प्रामुख्याने शेतकर्‍यांसाठीच्या योजनांवर त्यांनी भर दिला. शेतकर्‍यांना मोफत वीज, दिवसा वीज, सौरकृषीपंप, एक रुपयांत पीकविमा, यासह सरकार येताच शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्यात येईल, किसान सन्मान निधी 12 हजाराचा 15 हजार करणार, एमएसपीवर भावांतर योजना लागू करुन सोयाबीनला 6000 भाव देणार, खतांवरील राज्य जीएसटीचा परतावा असे अनेक मुद्दे मांडले.

लाडकी बहिण, लेक लाडकी, अर्ध्या तिकिटात एसटी प्रवास, 3 मोफत सिलेंडर, मुलींना मोफत उच्च शिक्षण, लखपती दिदी या महिलांसाठीच्या योजना त्यांनी भाषणातून मांडल्या. लाडक्या बहिणींना आता 1500 वरुन 2100 रुपये देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासोबतच स्थानिक सिंचनाचे प्रकल्प, उद्योग, रोजगार इत्यादींबाबत त्या त्या मतदारसंघात सरकारने काय काम केले, अशा बहुतेक स्थानिक मुद्यांवर त्यांनी भर दिला.