पुणे, दि. १८: मतदान प्रक्रिया सुलभ होवून मतदारांना मतदानाचा सुखद अनुभव यावा, मतदानाच्या टक्केवारीता वाढ व्हावी याकरीता निवडणुका निर्भय, भयमुक्त, निःपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे; याकरिता विविध राजकीय पक्षांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मीनल कळसकर, तहसीलदार शीतल मुळे, राहूल सारंग यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. दिवसे म्हणाले, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार असून याकरीता जिल्हाप्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून पुढील ४८ तास उमेदवारांना जाहीर प्रचारावर बंदी करण्यात आली आहे, यामध्ये मुद्रित, इलेक्ट्रानिक, समाजमाध्यमे, व्हॉट्सॲप, रेडिओ, फलके, राजकीय सभा आदी कोणत्याही माध्यमाद्वारे प्रचार करता येणार नाही.
मतदान केंद्राच्या 200 मीटर बाहेर प्रशासनाच्यावतीने निश्चित केलेल्या जागेवर 10 बाय 10 आकाराचे उमेदवारांचे तंबू लावावेत. त्याठिकाणी निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करणारे कोणत्याही प्रकारचे पक्षाचे झेंडे, फलक, चिन्हे, चिठ्ठी आदी प्रचार साहित्य ठेवू नयेत.
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी (२० नोव्हेंबर) तात्पुरत्या स्वरूपात वाहनतळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध करण्यात आले आहे, मतदारांनी या वाहनतळाचा वापर करावा.
भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे मतदानाची गोपनीयता राखण्याकरीता २० नोव्हेंबर रोजी मतदान केंद्र तसेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी केंद्राच्या १०० मीटरच्या आवारात कोणताही मोबाईल, स्मार्टवॉच, पेन कॅमेरा आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, शस्त्र घेऊन येण्यास पूर्णत: बंदी आहे. त्यामुळे मोबाईल आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणे मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या अंतराच्या बाहेरच ठेवावीत.
मतदानाच्या अनुषंगाने दिशाभूल करणारे संदेश पाठविल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. निवडणूक कामकाजाची छायाचित्रे काढणे किंवा चित्रीकरण करणे, त्यांचे तसेच निवडणूकविषयक अफवा पसरविणारे संदेशाचे व्हॉटस्अॅप ग्रुप, समाजमाध्यमांवर प्रसारण करणे हा गंभीर गुन्हा आहे, असे करणाऱ्यावर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
येत्या २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी लोकशाही अधिक बळकटीकरण्याकरीता पुढे येऊन मतदान करावे, आपल्या परिसरातील पात्र मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे दिले.
0000