Home Blog Page 35

नाल्याच्या प्रवाहातील अडथळे त्वरित काढा – सौ. मंजुश्री खर्डेकर.

नाल्यातून मलवाहिनी टाकण्याचे काम त्वरित पूर्ण करावे – पुनीत जोशी, सुनील पांडे, यांची आग्रही मागणी.

दीनानाथ च्या कल्वर्ट बाबत “प्रायमूव्ह” कडून पारदर्शक सर्वे करून अहवाल खुला करणार – संदीप खर्डेकर.

पुणे -नाल्याच्या प्रवाहातील अडथळे त्वरित काढा आणि नालेसफाई चे काम वेगाने पूर्ण करा अश्या सूचना वारजे कर्वेनगर प्रभाग समितीच्या अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.या वर्षी जर नाल्याचे पाणी कोणत्याही सोसायटी मध्ये शिरले तर मी स्वतः जनआंदोलन उभारेन व कामचुकार पणा करणाऱ्यांवर कारवाई साठी आग्रही राहीन असेही त्या म्हणाल्या.
म्हात्रे पुल ते राजाराम पुल ह्या डी पी रस्त्यावरून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे जाण्यासाठी रस्त्याचे व तेथील नाल्यावर कल्वर्ट ( छोटा पुल ) बांधण्याचे काम सुरू आहे.परिसरातील नागरिकांच्या तक्रारीवरून आज ह्या कामाची पाहणी करण्यात आली त्यावेळी दीनानाथ रुग्णालय व मनपा प्रशासनाला योग्य सूचना देण्यात आल्या.
यावेळी नगरसेवक पुनीत जोशी, नगरसेवक सुनील पांडे, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, दीनानाथ रुग्णालयाचे डॉ. योगेश भोपे, अभियंता अमोल साने, वारजे कर्वेनगर च्या सहाय्य्क आयुक्त अस्मिता तांबे,उपअभियंता विनायक शिंदे,कनिष्ठ अभियंता नीलाक्षी तडसे, नालेसफाई चे शुभम असवले, कनिष्ठ अभियंता रोहन दिवटे,भाजपा च्या प्रभाग अध्यक्ष ऍड. प्राची बगाटे, सरचिटणीस बाळासाहेब धनवे, सुयश गोडबोले, वैभव जमदाडे,मंडल उपाध्यक्ष अनघा जगताप, निलेश घोडके,दिनेश जगताप,शेखर वीर,रुपालीताई मगर यांच्यासह वकीलनगर, सुशीलानगरी,हिमाली, संकुल, संजीवनी व इतर सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरसेवक पुनीत जोशी व नगरसेवक सुनील पांडे यांनी नालेसफाई सह नाल्यातून सुरू असलेल्या मलवाहिनीच्या कामाची झाडाझडती घेतली व सर्व प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पुढील आठवड्यात मलवाहिनी टाकण्याच्या कामाची विस्तृत माहिती सादर करण्याबाबत व प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्याबाबत सूचना केल्या.
दीनानाथ रुग्णालयातर्फे बांधण्यात येत असलेल्या कल्वर्ट मुळे नाल्याच्या प्रवाहाला अडथळा येऊन त्याचा फुगवटा होऊन अरुंद नाल्यातील पाणी पावसाळ्यात नाल्यालगतच्या सोसायटीत शिरेल काय याबाबत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी प्रायमूव्ह चे अजित ओक यांना संपर्क केला व त्यांनी याबाबत त्वरित पाहणी करून वास्तुनिष्ठ अहवाल देण्याचे मान्य केले. याच ठिकाणी नाल्यातील सिमेंट ब्लॉक व अन्य डबर त्वरित काढावे अशी सूचना संदीप खर्डेकर यांनी रुग्णालय प्रशासनाला केली व ते आम्ही तातडीने करून घेऊ असे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.
वकीलनगर मधील ड्रेनेज लाईन मुख्य मलवाहिनीला न जोडल्याने तुंबणाऱ्या मलाबाबत नगरसेवक मंजुश्री खर्डेकर, सुनील पांडे व पुनीत जोशी यांनी प्रशासनास धारेवर धरले व पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण करावीत अशी तंबी दिली.
प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून सूचना दिल्याबद्दल नागरिकांनी लोकप्रतिनिधीचे आभार मानतानाच ठरल्याप्रमाणे कामं व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.

राज्यात लाळखुरकत लसीकरण मोहिम-९ ची जय्यत तयारी; १.१९ कोटी लस मात्रा उपलब्ध होणार

पुणे, दि. 27 : राज्यात लाळखुरकत रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लसीकरण फेरी-९ साठी पशुसंवर्धन विभागाने पूर्वतयारीला वेग दिला आहे. मे अखेरपर्यंत राज्याला १ कोटी १९ लाख लस मात्रा उपलब्ध होणार असून, लसींच्या सुरक्षित साठवणुकीसाठी आणि वितरणासाठी नियोजन सुरू करण्यात आले आहे अशी माहिती आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली.

लसींचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी नव्याने २० ‘वॉक-इन कोल्ड-रूम’ उभारण्यात आल्या असून, प्रत्येक शीतगृहात सुमारे ३ लाख लस मात्रा साठवण्याची क्षमता आहे. याशिवाय विद्यमान शीतगृहांचाही पूर्ण क्षमतेने वापर करण्यात येणार आहे.

आतापर्यंत लाळखुरकत लसीकरणाच्या ८ फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या असून, प्रभावी लसीकरणामुळे राज्यात अलीकडील काळात रोगाचा उद्रेक आढळलेला नाही. सलग दोन वर्षे रोगप्रादुर्भाव न झाल्यास महाराष्ट्राला ‘लाळखुरकत रोगमुक्त’ दर्जा मिळण्याची शक्यता असून, त्यामुळे दुग्ध, मांस आणि अंडी यांसारख्या पशुजन्य उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळू शकते.

जिल्हानिहाय लस साठवण क्षमता तपासून माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत. तसेच ऑगस्ट २०२६ पासून प्रत्यक्ष लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी विभागाने तया

सामाजिक न्याय विभागाच्या विविध शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. २७ : सामाजिक न्याय विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (नविन), गुणवडी ता. बारामती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह सासवड ता. पुरंदर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतीगृह तळेगाव दाभाडे येथे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ७ वी नंतर शालेय शिक्षण, कनिष्ठ महाविद्यालय, बिगर व्यावसायिक तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय अनुसूचित जातीमधील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शासकीय वसतिगृह प्रवेश देण्यात येणारआहे.

वसतिगृह प्रवेश हा प्रवर्गनिहाय आरक्षण व गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे. शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास, आंथरूण-पांघरूण, भोजन सुविधा, पुस्तके, स्टेशनरी, विविध शैक्षणिक बाबींसाठी आर्थिक सहाय्य तसेच दरमहा निर्वाह भत्ता यासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी https://hmas.mahait.org/⁠ या संकेतस्थळावर जाऊन प्रवेशासंबंधित सूचना वाचून ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहन वस्तीगृहाच्या गृहपालाकडून करण्यात आले आहे.

.. साहेब तपास लावा .. गुलाबो गॅंग धडकली पोलीस आयुक्तांकडे

पुणे- पुण्यात गेल्या २२ दिवसांमध्ये १२३ महिला व अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचे वृत्त समजताच .. साहेब तपास लावा ..म्हणत गुलाबो गॅंग पोलीस आयुक्तांकडे धडकली आहे.

या संदर्भात संगीता तिवारी यांनी सांगितले कि,’आज सकाळी 11.30 वाजता आम्ही बिटिया फाउंडेशन गुलाबो गॅंग च्या वतीने पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पुण्यात गेल्या २२ दिवसांमध्ये १२३ महिला व अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या गंभीर विषयावर निवेदन दिले आहे
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन कठोर पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. “महिला आणि मुली सुरक्षित नसतील तर समाज सुरक्षित राहू शकत नाही,”अशी भावना सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी आयुक्तांशी बरी चर्चा झाली आणि वेगवेगळ्या विषयावर आयुक्तांनी आम्हाला सर्व माहिती दिली आणि महिला सुरक्षेबाबत अजून काय कठोर भूमिका घेता येईल त्याची आम्ही मीटिंग लावत आहोत आणि त्याप्रमाणे कारवाई होईल असे आश्वासनही दिले.
यावेळी निवेदन देताना संगीता तिवारी, दत्ता बहिरट, योगेश पवार, शोभा पणीकर, सोनिया ओव्हाळ, भारती लोंढे आणि निलेश पवार उपस्थित होते.

सार्वजनिक ठिकाणी पशुबळी कार्यक्रमांवर कारवाई करा:राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे पोलिसांना आदेश

पुणे : शहरातील सार्वजनिक ठिकाणी आणि निवासी सोसायट्यांमध्ये अनधिकृतरित्या पशुबळी व कत्तलीचे प्रकार आयोजित केले जात असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलिस प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिलेआहे.

यासंदर्भात त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवले आहे. पत्रात म्हटले आहे की, मीराभाईंदर परिसरासह पुण्यातील काही भागांमध्ये सार्वजनिक स्वरूपात पशुबळी आणि कत्तलीचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण होत असून सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची प्रशासकीय परवानगी, आरोग्य विभागाचा परवाना किंवा कायदेशीर प्रक्रिया न पाळता अशा कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याची बाब पुढे आली आहे.

मिसाळ म्हणाल्या, “पुणे हे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक सलोखा जपणारे शहर आहे. अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.”

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या महत्वाचे निर्देश

  • सार्वजनिक ठिकाणी किंवा निवासी सोसायट्यांमध्ये परवानगीविना पशुकत्तल करू नये
  • अशा प्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी
  • पुणे पोलिस, महापालिका आरोग्य विभाग, संबंधित समाजघटक आणि स्थानिक प्रतिनिधी यांची तातडीची समन्वय बैठक बोलवावी

मराठमोळ्या नऊवारीने जागतिक मंचावर वेधले लक्ष; ठाण्यातील निरुपा तायडे यांच्या ब्रँडची जोरदार चर्चा

कान्सच्या रेड कार्पेटवरील अभिनेत्री प्राजक्ताच्या सौंदर्याला ‘निरुपा सारीज’चा साज

ठाणे : यंदाच्या प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवामध्ये मराठी कलाकारांनी खास मराठमोळा ठसा उमटवला. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने कान्सच्या रेड कार्पेटवर पारंपरिक नऊवारी साडीत केलेल्या आकर्षक एन्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे, तिच्या या चर्चित लूकला ठाण्यातील निरुपाज येवला पैठणी अँड सिल्क सारीजच्या खास साडीचा साज लाभला होता.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि मनोरंजनविश्वात प्राजक्ताच्या या लूकची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. मोरपिशी छटेतील नऊवारी, त्यावर भरजरी शेला, पारंपरिक नथ, ठुशी, कमरपट्टा आणि मराठमोळा दागिन्यांचा साज अशा संपूर्ण लूकमधून तिने महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जागतिक मंचावर अभिमानाने सादर केली.

कान्सच्या रेड कार्पेटवर सहसा वेस्टर्न गाऊन्स आणि ग्लॅमरस फॅशन पाहायला मिळते. मात्र, प्राजक्ताने भारतीय परंपरा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला प्राधान्य देत नऊवारीची निवड केल्याने तिचा लूक सर्वांपेक्षा वेगळा आणि उठून दिसणारा ठरला. फॅशनप्रेमींसह मराठी प्रेक्षकांनीही तिच्या या निर्णयाचे भरभरून कौतुक केले आहे.

‘निरुपा सारीज’ने तयार केलेल्या या साडीमध्ये पारंपरिक विणकाम, आकर्षक रंगसंगती आणि आधुनिक एलिगन्स यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. मराठमोळ्या साड्यांची समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे काम या निमित्ताने झाले असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

प्राजक्ताने स्वतः सोशल मीडियावर कान्समधील अनुभव शेअर करत ‘मराठी ठसका’ जागतिक रेड कार्पेटवर घेऊन जाण्याचा आनंद व्यक्त केला होता. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. निरुपाज सारीज हा खात्रीशीर येवला पैठणी आणि सिल्क साड्या देणारा ब्रँड आहे. प्राजक्तासह चित्रपट सृष्टीतील सुबोध भावे, अभिजित खांडकेकर, अपूर्वा नेमळेकर, पूजा सावंत’ सिद्धार्थ चांदेकर, केतकी माटेगावकर, हेमल इंगळे, पल्लवी पाटील आदी कलाकारांनी निरुपाज भेट देत येथील साड्यांचे कौतुक केले आहे.

‘निरुपा सारीज’च्या संस्थापिका निरुपा तायडे म्हणाल्या, “भारतीय साडी ही केवळ फॅशन नसून संस्कृती आणि परंपरेची ओळख आहे. प्राजक्ता माळीसारख्या लोकप्रिय अभिनेत्रीने जागतिक मंचावर आमच्या साडीची निवड करणे हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. कान्ससारख्या प्रतिष्ठित मंचावर ठाण्यातील ब्रँडची झळाळी पाहायला मिळाल्याने स्थानिक फॅशन उद्योगातही उत्साहाचे वातावरण असून, भारतीय पारंपरिक साड्यांची जागतिक लोकप्रियता पुन्हा अधोरेखित झाली आहे.”

सोशल मीडियावरही ‘निरुपाज सारीज’ला मोठा प्रतिसाद मिळत असून, ब्रँडच्या पारंपरिक आणि आकर्षक कलेक्शनची झलक nirupas.sarees_official/ वर पाहायला मिळते.

शशांक शेंडे साकारणार रहस्यमय मांत्रिकाची भूमिका

आपली प्रत्येक भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारत रुपेरी पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेता शशांक शेंडे लवकरच प्रेक्षकांसमोर नव्या आणि गूढ भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्या दमदार अभिनयामुळे प्रत्येक भूमिकेला वेगळं वजन मिळतं, आणि त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक  भूमिकेबद्दल रसिकांमध्ये कायमच उत्सुकता पाहायला मिळते.

‘घबाडकुंड’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये शशांक शेंडे तंत्र-मंत्रात पारंगत असलेल्या सिद्धयोगी मांत्रिकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांची व्यक्तिरेखा एका मांत्रिकाची असून, मंत्र आणि तांत्रिक विद्येचा गूढ अभ्यास केलेला ‘बाबा’ अशी त्यांची ओळख आहे. चित्रपटातील त्यांच्या लूकचीही सध्या चर्चा रंगली आहे. संपूर्ण टक्कल,  कपाळावर काळा टिळा, गळ्यात माळा आणि डोळ्यातील गूढ भाव या व्यक्तिरेखेला अधिकच  भयावह बनवतात.

या भूमिकेबद्दल बोलताना शशांक शेंडे म्हणतात, ‘ही भूमिका खूप वेगळी आणि आव्हानात्मक आहे. एका मांत्रिकाच्या मनोविश्वात शिरून त्याची शक्ती, त्यामागचं तत्त्वज्ञान आणि त्याचा उद्देश प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच खिळवून ठेवेल.’

हा रहस्यमय मांत्रिक नेमका कोण आहे? त्याच्या शक्तींचं गूढ काय आहे? आणि त्याचा खरा हेतू काय आहे? हे  पहाणं  नक्कीच औत्सुक्याचं आहे. ‘घबाडकुंड’ हा चित्रपट या सर्व प्रश्नांची उत्तरं देत प्रेक्षकांना थरारक आणि गूढ प्रवासावर घेऊन जाणार असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

एक भव्य आणि रहस्यमय ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर साकारण्याचा धाडसी प्रयत्न दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी केला आहे. या अभिनव संकल्पनेला ‘आयकॉन दी स्टाईल’ संस्थेचे निर्माते डॉ. रसिक कदम यांची भक्कम साथ लाभली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत नवा ट्रेंड निर्माण करण्याच्या तयारीत असलेला ‘घबाडकुंड’ येत्या १९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भोंदू अशोक खरातच्या’लीला’ पडद्यावर आणणार पण निर्मात्याचे नाव गुलदस्त्यात …


पुणे-भोंदू अशोक खरात व त्याच्या कारनाम्यांवर आता चित्रपट येणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटात सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकारी दीपाली सय्यद प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत. त्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा या प्रकरणातील एक कथित प्रमुख संशयित असणाऱ्या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणार काय? अशी चर्चा सिनेरसिकांत रंगली आहे.मात्र या चित्रपटाचा निर्माता कोण आहे याबाबत अजून तरी गुलदस्त्यात आहे . या चित्रपटाने बरीच राजकीय खळबळ माजण्याची शक्यता नाकारता येणार नाही. चित्रपटात अशोक खरातच्या ढोंगीपणासह या प्रकरणाशी संबंधित महाराष्ट्राच्या राजकारणातील काही प्रभावशाली व्यक्तींचे वास्तवही उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असा दावा केला जातोय . त्यामुळे हा चित्रपट केवळ एका व्यक्तीच्या कथित कृष्णकृत्यापुरता मर्यादित न राहता सामाजिक व राजकीय पैलूंवर प्रकाश टाकणारा असल्याचीही चर्चा आहे.

अशोक खरातच्या कारनाम्यांवर एक मराठी चर्चा येणार आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी तथा अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे.दीपाली सय्यद याविषयी बोलताना म्हणाल्या, बिग बॉस स्पर्धेतून बाहेर आल्यानंतर मला भोंदू अशोक खरात प्रकरणाची माहिती मिळाली. एक असा बाबा समोर आला ज्याने सर्वत्र खळबळ माजवली. या प्रकरणी लवकरच एक चित्रपट येणार आहे. हा चित्रपट मी काढत नाही. त्याचे निर्माते वेगळे आहेत. पण त्यात एक कलाकार म्हणून मी तुम्हाला दिसेल. चित्रपटाची माहिती लवकरच सर्वांपुढे येईल. पण सर्वांनी अशा भोंदूंपासून सावध राहिले पाहिजे. हा एकटाच खरात नाही. असे अनेक खरात कुठे ना कुठे लपलेले असतील. त्यामुळे आपण कोणत्याही गोष्टीवर जागरूक राहिले पाहिजे. लवकरच तुम्ही मला भोंदू खरातच्या चित्रपटात पाहाल.दीपाली सय्यद प्रस्तुत चित्रपटात कोणाच्या भूमिकेत दिसणार याविषयी दीपालीला छेडले असता ती म्हणाली, मी या चित्रपटात भूमिका करणार आहे, पण ती कोणती? हे आत्ताच सांगितले तर काय मज्जा राहणार? तुम्ही चित्रपट पाहा. माझ्याकडे स्क्रिप्ट आली आहे. ती मला वाचू द्या. स्क्रिप्ट वाचल्यानंतर ती भूमिका मला आवडली पाहिजे. त्यानंतर पुढील महिन्यापासून या चित्रपटाचे प्रत्यक्ष शुटिंग सुरू होईल. त्यावेळी मी शुटिंगच्या ठिकाणीच पत्रकारांना मुलाखतीसाठी बोलावेन. ती म्हणाली, राजकारणात सक्रिय असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सतत आरोप – प्रत्यारोपाच्या फैरींना सामोरे जावेच लागते. त्यात काहीच नवे नाही. पण या संपूर्ण खरात प्रकरणात कोणाकोणाचा खरोखरच काही सहभाग होता का? की प्रत्यक्षात वस्तुस्थिती काही वेगळीच आहे, हे तुम्हाला केवळ चित्रपट पाहिल्यानंतरच स्पष्ट होईल.

CID ही कुचकामी यंत्रणा, बिनकामाचे ओझे:रोहित पवार यांचा आरोप

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सीआयडी सारखी यंत्रणा कुचकामी व बिनकामाचे ओझे असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. अजितदादांच्या अपघात प्रकरणात सीआयडी करत असलेला तपास बघता, ही तपास यंत्रणा काय करते नेमके हेच कळत नाही. CID सारख्या कुचकामी यंत्रणा म्हणजे बिनकामाचे ओझेच म्हणावे लागेल, असे ते म्हणालेत.

अजित पवारांचा गत जानेवारी महिन्यात बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून रोहित पवार या प्रकरणाचा पारदर्शक तपास करण्याची मागणी करत आहेत. या प्रकरणी महाराष्ट्रात गुन्हा दाखल करण्यास अपयश आल्यानंतर त्यांनी थेट कर्नाटकात जाऊन झिरो एफआयआर दाखल केला. त्यानंतर तो महाराष्ट्रात वर्ग करण्यात आला. पण त्यावर अद्याप तरी कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडी चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

नेमके काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार म्हणाले, आदरणीय मुख्यमंत्री साहेब, अजितदादांच्या अपघाताला उद्या 4 महिने होतील. अधिवेशनात बोलताना तुम्ही गुन्हेगारांना पाताळातून शोधून काढण्याचा, CBI चौकशीबाबत अमित शहा साहेबांकडे पाठपुरावा करण्याचा तसंच कर्नाटकात नोंद झालेली झिरो FIR महाराष्ट्रात वर्ग करून घेण्याचा शब्द दिला होता. आपण शब्द देऊन अडीच महिने होत आले, या अडीच महिन्यात काय कार्यवाही झाली हे आपणच सांगावे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांसोबत गेल्या अडीच महिन्यात आपल्या असंख्य बैठका झाल्या असतील त्यामध्ये सीबीआय चौकशीचा मुद्दा आपण घेतला नसेल तर आज होणाऱ्या बैठकीत तरी हा मुद्दा आग्रहाने घ्यायला हवा. राष्ट्रवादीचे मंत्री उपस्थित असतील तर त्यांनी देखील पाठपुरावा करायला हवा. मित्र हयात असला किंवा नसला तरी मित्रासाठी मैत्री नेहमीच जिवंत असते, ही सर्वसामान्य जनतेची भावना असते, राजकीय लोकांसाठी ही भावना वेगळी आहे का ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

राहिला प्रश्न CID चौकशीचा तर CID काय करते नेमकं हेच कळत नाही. गेल्या 28 तारखेला CID कार्यालयात गेलो असता तपास अधिकारीच उपस्थित नव्हते, त्यांना mail करून अनेक नवे पुरावे दिले, पत्र स्वतः जाऊन दिले तरी त्यांचा काहीही प्रतिसाद नाही. अजितदादांच्या अपघात प्रकरणात सीआयडी करत असलेला तपास बघता, CID सारख्या कुचकामी यंत्रणा म्हणजे बिनकामाचे ओझेच म्हणावे लागेल. असो, उद्या सीआयडी ऑफिसची वेळ मागितली असून उद्या सकाळी 10.30 वाजता भेट देणार आहे. CID ऑफिसला कदाचित सनदशीर मार्गाची भाषा समजत नसेल तर वेगळ्या भाषेत सांगावे लागेल, असे रोहित पवार म्हणाले.

विधान परिषदेच्या 17 पैकी 14 ठिकाणी भाजपकडे स्पष्ट बहुमत:तरी शिवसेना-राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग

मुंबई-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या आकडेवारीत भाजपचा मोठा दबदबा दिसून येत आहे. राज्यातील 17 पैकी 14 मतदारसंघांमध्ये भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याचे चित्र आहे. शिवसेनेकडे फक्त एका मतदारसंघात, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 2 मतदारसंघात मजबूत आकडेवारी असल्यामुळे महायुतीत जागावाटपावरून मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात शिवसेनेकडे बहुमताचा आकडा आहे. या ठिकाणी शिवसेनेकडे 275 मते असून भाजपकडे 241 आणि राष्ट्रवादीकडे 149 मते आहेत. मात्र, हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे यांच्यासाठी मागितला जात असल्याने तणाव निर्माण झाला आहे. दुसरीकडे पुणे आणि परभणी-हिंगोली या दोन मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीकडे मजबूत स्थिती आहे. पुण्यात राष्ट्रवादीकडे 375 मते आहेत, तर भाजपकडे 335 आणि शिवसेनेकडे 82 मते आहेत. परभणी-हिंगोलीत राष्ट्रवादीकडे 123, भाजपकडे 111 आणि शिवसेनेकडे 74 मते आहेत.

पुणे मतदारसंघामुळे महायुतीतील वाद आणखी तीव्र झाला आहे. राष्ट्रवादी स्वतंत्रपणे मजबूत दिसत असली, तरी भाजप आणि शिवसेनेची एकत्रित मतसंख्या राष्ट्रवादीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे भाजपने पुणे जागेवर दावा ठोकला आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या बदल्यात शिवसेनेकडून राष्ट्रवादीला परभणी-हिंगोली जागा देण्याची चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या सगळ्या घडामोडींमुळे महायुतीतील जागावाटपाचा पेच अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे.

सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपच्या वाट्याला 15 जागा, शिवसेनेला 1 आणि राष्ट्रवादीला 1 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, महायुतीतील समतोल राखण्यासाठी भाजपकडून शिवसेनेला अधिक जागा देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेने 7 जागांची मागणी केली होती. त्यानंतर भाजपकडून 5 जागांची ऑफर देण्यात आली आणि पुढे हा आकडा 6 पर्यंत नेण्याबाबत चर्चा झाली. जळगाव, नाशिक आणि रायगड या जागांवरून सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे.

राज्यातील प्रमुख मतदारसंघातील आकडेवारी पाहिली तर ठाण्यात भाजपकडे 431, शिवसेनेकडे 309 आणि राष्ट्रवादीकडे 18 मते आहेत. नागपुरात भाजपची सर्वाधिक ताकद दिसून येत असून पक्षाकडे 501 मते आहेत. सोलापुरात भाजपकडे 304, सांगली-सातारात 371, धाराशिव-लातूर-बीडमध्ये 379, तर छत्रपती संभाजीनगर-जालन्यात 254 मते आहेत. नाशिकमध्ये भाजपकडे 186, शिवसेनेकडे 161 आणि राष्ट्रवादीकडे 107 मते आहेत. याशिवाय भंडारा-गोंदिया, वर्धा-चंद्रपूर-गोंदिया, अमरावती, यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्येही भाजपची मजबूत स्थिती दिसून येत आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील तीनही पक्षांमध्ये अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत. जागावाटप अंतिम करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू असून अनेक इच्छुक उमेदवारांकडून लॉबिंगही सुरू आहे. भाजपचा स्पष्ट वरचष्मा असला, तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष आपल्या वाट्याच्या जागा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत महायुतीतील जागावाटपावर अंतिम निर्णय काय होतो आणि कोणत्या पक्षाच्या पदरात किती जागा पडतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

कर्नाटकातील शहाजीराजे यांच्या समाधीला संरक्षण कवच; समाधीवर ४५० किलोची भव्य मेघडंबरी

-पुण्यातील मल्हार भक्त डॉ. गौरव घोडे यांचे ऐतिहासिक कार्य

पुणे : कर्नाटकातील दावणगेरे जिल्यात होदिगेरे येथे असलेल्या श्रीमंत छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळावर अखेर भव्य मेघडंबरी उभारण्यात आली असून, शिवभक्तांसाठी हा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण मानला जात आहे. विशेष म्हणजे, हे महत्त्वपूर्ण कार्य पुण्यातील मल्हार भक्त आणि इतिहासप्रेमी डॉ. गौरव भाऊ घोडे यांच्या पुढाकारातून पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे पुणेकरांसाठीही ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

श्रीमंत छत्रपती शहाजीराजे भोसले हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील असून स्वराज्याच्या पायाभरणीत त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. मात्र त्यांच्या समाधीस्थळाची अवस्था अनेक वर्षे अत्यंत दयनीय होती. समाधीवर कोणतेही संरक्षणात्मक छत नसल्याने ऊन, वारा आणि पावसाचा थेट मारा सहन करावा लागत होता. शिवभक्तांकडून अनेकदा संवर्धनाची मागणी करण्यात आली होती. कर्नाटक सरकारकडून आश्वासने मिळूनही प्रत्यक्षात ठोस कार्यवाही होत नसल्याची खंत शिवप्रेमींमध्ये होती.

ही बाब लक्षात घेऊन श्री स्वामी ॐ मल्हारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना ऐतिहासिक वारसा व मंदिर संवर्धन महाराष्ट्र राज्य प्रमुख डॉ. गौरव भाऊ घोडे यांनी पुढाकार घेत समाधीवर स्वखर्चाने भव्य मेघडंबरी उभारण्याचा संकल्प केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामसाहेब रेपाळे यांच्या सहकार्याने हे काम पूर्णत्वास आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

रविवार, २४ मे २०२६ रोजी सुमारे साडेचार लाख रुपये स्वखर्च करून तब्बल ४५० किलो वजनाची मजबूत आणि आकर्षक मेघडंबरी समाधीवर बसविण्यात आली. हे संपूर्ण काम “वेडात मराठे वीर दौडले ७” या मावळ्यांच्या सहकार्याने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले. प्रसाद चव्हाण, आकाश चव्हाण, काशिनाथ ओझरकर, महावीर पाटोळे, सुनील ढवळे आणि अविनाश कदम यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

विशेष म्हणजे, हे काम अवघ्या एका रात्रीत गनिमी काव्याच्या पद्धतीने पूर्ण करण्यात आले. कामादरम्यान अनेक तांत्रिक अडचणी, वाहतुकीची समस्या आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. मात्र छत्रपतींच्या प्रेरणेने आणि शिवभक्तांच्या जिद्दीमुळे हे ऐतिहासिक कार्य यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची भावना सहभागी मावळ्यांनी व्यक्त केली.

“छत्रपतींच्या इतिहासाचे आणि वारशाचे जतन करणे ही प्रत्येक शिवभक्ताची जबाबदारी आहे. आम्हाला ही सेवा करण्याची संधी मिळाली, हे आमचे भाग्य आहे,” श्री स्वामी ॐ मल्हारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून १८ वर्षापासून अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा संवर्धनाची कामे करण्यात आली आहेत असे डॉ. गौरव भाऊ घोडे यांनी सांगितले.

NEET पेपरफुटी – CBI कडून :एक डॉक्टर लातूरचा,अन एक प्राध्यापक पुण्याचा; अशा दोघांना अटक

0

पुणे-NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात CBI ने बुधवारी आणखी 2 आरोपींना अटक केली. पहिल्या आरोपीचे नाव डॉ. मनोज शिरुरे असे आहे. ते लातूरचे रहिवासी आहेत. डॉ. मनोज यांनी एका कोचिंग सेंटरच्या मालकाच्या (जो स्वतःही आरोपी आहे) मुलासह 3 विद्यार्थ्यांना आरोपी पी.व्ही. कुलकर्णीकडून केमिस्ट्रीच्या प्रश्नपत्रिका मिळवून दिल्या होत्या.तर, दुसऱ्या आरोपीचे नाव तेजस हर्षदकुमार शाह असे आहे. तो पुणे येथील डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकादमी (APMA) या कोचिंग सेंटरमध्ये फिजिक्सचा प्राध्यापक आहे. त्याला NEET UG 2026 परीक्षेतील फिजिक्सचे लीक झालेले प्रश्न अटकेत असलेल्या आरोपी मनीषा हवालदारकडून मिळाले होते.

सीबीआय प्रस्तुत प्रकरणात संपूर्ण साखळी आणि कटाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. CBI ने आतापर्यंत यासंबंधी वेगवेगळ्या 49 ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे. त्यात अनेक महत्त्वाचे दस्तऐवज, लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 13 लोकांना अटक करण्यात आली आहे.सीबीआय चौकशीत उघड झाले आहे की, नीटचा पेपर 5 राज्यांमध्ये विकला गेला होता. सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात झाली आणि दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान आहे.सीबीआयचे म्हणणे आहे की, पेपरफुटीचे प्रकरण आणखी व्यापक होऊ शकते. एजन्सीला अजून हे ठरवता येत नाहीये की किती विद्यार्थ्यांनी पेपर विकत घेतला होता.सीबीआयला महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये पेपरचे प्रिंट काढून विकल्याचे पुरावे मिळाले आहेत. पेपरफुटीचे सर्वात मोठे केंद्र महाराष्ट्र होते. येथूनच राजस्थान आणि इतर राज्यांमधील विद्यार्थ्यांपर्यंत ‘प्रश्न बँक’ पोहोचली.

तपास यंत्रणा आता त्या सर्व पालकांची यादी तयार करत आहे, ज्यांच्या बँक खात्यातून शिवराज मोटेगावकर, पी.व्ही. कुलकर्णी किंवा त्यांची सहकारी मनीषा वाघमारे (पुणे) यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित झाले होते. यासंबंधी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) व्यतिरिक्त बाहेरील काही व्यक्ती अजूनही संशयाच्या घेऱ्यात आहेत. सीबीआय लवकरच इतर राज्यांमध्ये छापे टाकेल.

NTA ने शुक्रवारी NEET-UG 2026 उमेदवारांसाठी एक विशेष पोर्टल उघडले आहे. या पोर्टलवर विद्यार्थ्यांना रद्द झालेल्या परीक्षेचे परीक्षा शुल्क परताव्यासाठी आपल्या बँक खात्याचा तपशील नमूद करता येईल. बँक खात्याचा तपशील जमा करण्याची सुविधा 22 ते 27 मे (रात्री 11:50 वाजेपर्यंत) पर्यंत उपलब्ध असेल.

राज्यात आजपासून 3 दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी

दोन दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; हवामानशास्त्र विभागाचा ‘यलो अलर्ट’

पूर्वमोसमी पाऊस प्रामुख्याने सायंकाळीच पडण्यामागील शास्त्रीय कारणे खालीलप्रमाणे आहेत…
आज, उद्या पाऊस

मुंबई -मराठवाड्यासह राज्यभरात बुधवार, 27 ते 29 मेपर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यात 2, मध्य महाराष्ट्रात 3 तर विदर्भात 4 दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.

दरम्यान, सोमवारी झालेल्या पावसानंतर छत्रपती संभाजीनगरात मंगळवारी तापमान 1.4 अंश सेल्सियसने घसरले. सोमवारी तापमान 41.2 होते ते मंगळवारी 39.8 अंश सेल्सियसवर आले. विदर्भ मात्र उन्हाच्या तडाख्यात होरपळत असून मंगळवारी राज्यातील सर्वाधिक ब्रह्मपुरी येथे 46.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. जळगाव, अहिल्यानगरात पारा 40 अंशाच्या वरच होता तर नाशिक, सो लापूरचा पारा 40 अंशाखाली होता.

छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरात सोमवारी (25 मे) पूर्वमोसमी सरींनी हजेरी लावल्यानंतर बुधवार व गुरुवारीही सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. पावसासंदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून येणाऱ्या 2 दिवसांत ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, मंगळवारी (26 मे) शहरातील कमाल तापमान 39.8 अंश सेल्सियसपर्यंत कमी झाले. या महिन्यात 9 मेनंतर प्रथमच तापमान 40 अंशांपेक्षा कमी झाले आहे.
पूर्वमोसमी पाऊस प्रामुख्याने सायंकाळीच

तीव्र तापमान : उन्हाळ्यात सकाळी 11 ते दुपारी 3 यादरम्यान जमीन प्रचंड तापल्याने स्थानिक पातळीवर तापमान खूप वाढते.
अभिसरण प्रक्रिया : तापलेली हवा हलकी होऊन वेगाने वातावरणात वरच्या दिशेने प्रवास करू लागते.
आर्द्रतेचा पुरवठा : वरच्या दिशेला जाणाऱ्या या उष्ण हवेत समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात बाष्प मिसळते.
वादळी ढगांची निर्मिती : दुपारपर्यंत बाष्पाचे सांद्रीभवन होऊन आकाशात उंच आणि उभ्या आकाराचे वादळी (क्युमुलोनिम्बस) ढग तयार होतात.
सायंकाळी पर्जन्यवृष्टी : ही प्रक्रिया पूर्ण होण्यास दुपार उलटते. सायंकाळी तापमान थोडे कमी होताच मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो.

शहर आणि परिसरात बुधवारी आणि गुरुवारी मेघगर्जना, विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शहरात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बुधवारी कमाल तापमान 41 आणि गुरुवारी 39 अंशांपर्यंत राहील. त्यानंतर शुक्रवारी व शनिवारी आकाश निरभ्र राहील. रविवारी व सोमवारी दुपारनंतर अंशत: ढगाळ वातावरण राहील.

गेल्या वर्षी शहर आणि परिसरात मे महिन्यात 8 ते 9 दिवस पाऊस पडल्याची नोंद आहे. यंदा मात्र मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आतापर्यंत 1 दिवस पाऊस पडला आहे. मे महिन्यात शहर व परिसरात 12.2 मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. यंदा आतापर्यंत 4.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात शहरातील छत्रपती संभाजीनगर महसूल मंडळात 98.5, उस्मानपुरा 175.9, भावसिंगपुरा,160.9, कांचनवाडी 126.2 आणि चिकलठाणा महसूल मंडळात 131.8 मिलिमीटर पाऊस पडल्याची राज्य सरकारकडे नोंद आहे. त्या तुलनेत यंदा मे महिन्यात पूर्वमोसमी पाऊस कमी पडला आहे.

मसापच्या १२१व्या वर्धापन दिनानिमित्त जीवनगौरव, कार्यकर्ता पुरस्कारासह वार्षिक पारितोषिकांचे वितरण

चौकटीतल्या जीवनापलिकडचे कठोर वास्तव लेखनातून पहायला शिकले : प्रतिभा रानडे

पुणे : जीवनाच्या वाटचालीत मी वेगवेगळ्या विचारधारांच्या संपर्कात आले, पण कुठल्या एका विचारधारेशी बांधून घेतले नाही. आजवरच्या लेखनाने खूप आनंद दिला. चित्रविचित्र घटनांचे साक्षीदार होता आले. हे भाग्य की दुर्भाग्य माहित नाही. लेखनाच्या निमित्ताने आपल्या चौकटीतल्या जीवनापलिकडचे कठोर वास्तव पहायला शिकले. मध्यवर्गीय कवचाबाहेर पडण्याची सतत धडपड केल्याने त्यातूनच मला जगण्याचे भान आले; माणसाच्या जगण्याकडे बघता आले, अशा भावना प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांनी व्यक्त केल्या.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा १२१वा वर्धापन दिन समारंभ व पुरस्कार प्रदान सोहळा मंगळवारी (दि. २६) बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी मसाप जीवनगौरव पुरस्काराने प्रतिभा रानडे यांचा तर डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने डॉ. श्रीकृष्ण काकडे यांचा गौरव करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना प्रतिभा रानडे बोलत होत्या. ज्येष्ठ संगीतकार, गायक पंडित सत्यशील देशपांडे, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते हृषिकेश जोशी, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण होते. प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, कार्यवाह सुनील महाजन, सुनेत्रा मंकणी, माधव राजगुरू, प्रसाद मिरासदार, डॉ. नितीन संगमनेरकर मंचावर होते. कार्यवाह अंजली कुलकर्णी, डॉ. आशुतोष जावडेकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. या वेळी शाखा व कार्यकर्ता पुरस्कार, मसाप स्नेहबंध पुरस्कार यासह विशेष ग्रंथकार पुरस्कार आणि वार्षिक ग्रंथ पारितोषिकांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

प्रतिभा रानडे पुढे म्हणाल्या, निसर्ग, माणसाचे जगणे याविषयी मला नेहमीच कुतुलह वाटत आले आहे. मी जिथे जिथे गेले तिथला इतिहास, संस्कृती, सामाजिक, राजकीय स्थिती, धर्मसंस्कृतीचा आणि राजकारणाचा सामन्य माणसावर झालेला परिणाम अभ्यासत गेले. त्यातून धर्मसत्ता, अर्थसत्ता आणि राजसत्ता हातात हात घालून चालत असतात; परंतु सामान्य माणूस मात्र संस्कृतीशी जोडला जातो याचे आकलन झाले. दिपाली दातार यांनी प्रतिभा रानडे यांचे मनोगत वाचून दाखविले.

संगीताची संवेदना असल्यास लेखन लयदार : पंडित सत्यशील देशपांडे….

पंडित सत्यशील देशपांडे म्हणाले, लेखकांना संगीताची संवेदना आकलन झाल्यास गद्य वाक्ये देखील लयदार होतात. बंदिशीतल्या शब्दांमधून संवेदना तीव्र, तीक्ष्ण झाल्यास बंदिशीचे सादरीकरण प्रभावी ठरते. गाणाऱ्यांनी देखील भवतालच्या वाङ्‌मयाचा अभ्यास करावा. छंदोबद्ध मुक्तछंदालाही लय असते; परंतु आज मुक्तछंद लिहिणाऱ्या कवींचा छंदाचा अभ्यास नाही हे देखील जाणवते. साहित्यकृतीतून साकारलेल्या शब्दांना वैयक्तिक आणि सामाजिक संदर्भ देखील असतात आणि त्या संदर्भातून अर्थाच्या छटा बदलत राहतात. मनाला झालेल्या जाणीवांमधून उत्कृष्ट साहित्यकृतींची निर्मिती घडत असते. भावनेला शब्द करणे हे साहित्यिकाचे वैशिष्ट्य आहे.

पुरस्कारातून लेखनाची उर्मी मिळते : हृषिकेश जोशी….

हृषिकेश जोशी म्हणाले, चित्रकार, शिल्पकार आणि ग्रंथकार समकालीन माणसांचे आयुष्य साठवतात. लेखक आपल्या साहित्यकृतीतून वाचकाला संपूर्ण जग फिरवून आणू शकतात. पुरस्काराच्या माध्यमातून साहित्यिकांना प्रेरणा लाभते आणि अधिक उत्तम साहित्य निर्माण होऊ शकते. लिहिण्याची उर्मी असल्यास जे वाटते, भावते ते शब्दातून मांडले जाते.

मराठी भाषा देशाचा आधार बनावी : अविनाश धर्माधिकारी….

अविनाश धर्माधिकारी म्हणाले, महाराष्ट्राची भूमी ही संतांचा आणि हिंदवी स्वराज्याचा वारसा सांगणारी आहे. समाजाची चेतना आणि आत्मविश्वास जागृत ठेवण्याचे कार्य संतांनी केले आहे आणि हा वारसा मराठी भाषेच्या संस्कृतीत जाणवतो. मराठी भाषा ज्ञानोबा-तुकोबाची असल्यामुळे काळाच्या ओघातील विज्ञान, प्रगती भाषा रुपातून व्यक्त होण्याची ताकदही तिच्यात आहे. जागतिक भाषा जरूर आत्मसात करावी; परंतु मायबोली मराठी कच्ची राहता कामा नये. शैक्षणिक तत्त्वानुसार दोन भाषांवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. काळाचे आव्हान स्वीकारत आजची मराठी भाषा महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा आधार बनावी.

कामाची दखल घेतल्याने समाधानी….

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. श्रीकृष्ण काकडे म्हणाले, लोकसंस्कृती, लोककला आणि लोकपरंपरांचा अभ्यास कोणत्याही पुरस्कारासाठी करत नव्हतो; परंतु माझ्या कामाची दखल घेतली गेली याविषयी समाधानी आहे. राजेंद्र खेर, डॉ. कल्याणी हर्डिकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

योगेश सोमण म्हणाले, साहित्यविषयक पुरस्कार देऊन विविध क्षेत्रात लेखन करणाऱ्या साहित्यिकांचा गौरव करता आला याविषयी महाराष्ट्र साहित्य परिषद कृतज्ञ आहे. पुण्यात होणारे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिमाखदारपणे करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. डॉ. स्वाती महाळंक यांनी प्रास्ताविकात परिषदेच्या कार्याविषयी माहिती देत आगामी कामांविषयी आढावा घेतला. आभार प्रसाद मिरासदार यांनी मानले. गौरी ताम्हणकर यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

उत्तरार्धात प्रसिद्‌ध कवी, गीतकार वैभव जोशी यांनी ‘द मनमौजी’ हा कविता व गीतांचा कार्यक्रम सादर केला. निनाद सोलापूरकर (की-बोर्ड), आमोद कुलकर्णी (तबला) यांनी साथसंगत केली.

वन्य प्राण्यांच्या हालचालीच्या माहितीसाठीएक हजार गावांमध्ये एआयआधारित अर्लट यंत्रणा

  • वनमंत्री गणेश नाईक
    मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी २६० कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी
    अत्याधुनिक नियंत्रण कक्ष, रेस्क्यू सेंटर, उपचार केंद्रे उभारणार
    रॅपिड रेस्क्यू टीम, दहा ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरही उभारणार
    ग्रामस्थांचा समावेश असलेली दोन हजार प्रतिसाद दले स्थापणार

मुंबई, दि. २६ : मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्यात पहिल्या टप्प्यात दहा ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणे, राज्यातील एक हजार गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अर्लट यंत्रणा उभारणे तसेच दोन रेस्क्यू सेंटर व दहा उपचार केंद्रे उभारण्यास राज्य वन्य जीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्ष तथा वन मंत्री गणेश नाईक यांनी मंजुरी दिली. हा प्रकल्प सुमारे २६० कोटी रुपयांचा असून मानवांवरील वन्यजीवांचे हल्ले रोखण्यासाठी तातडीने या उपाययोजना राबविण्याचे निर्देश मंत्री नाईक यांनी यावेळी दिले.

राज्य वन्य जीव मंडळाच्या स्थायी समितीची बैठक मंत्रालयात वन मंत्री श्री. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आमदार समीर मेघे, प्रधान मुख्य वन संरक्षक (वनबल प्रमुख) श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास रेड्डी, उपसचिव निकिता पांडे, विशेष कार्य अधिकारी उदय ढगे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.राज्यातील मानव वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी व मानवी जीविताची हानी होऊ नये यासाठी वन विभागाच्या वतीने कृतीआराखडा तयार केला आहे. या आराखड्याअंतर्गत पोलीस नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर राज्यात विविध भागात दहा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. हे नियंत्रण कक्ष अत्याधुनिक डिजिटल यंत्रणानी सुसज्ज असतील. या नियंत्रण कक्षाद्वारे वन विभागाची संसाधने, वाहने, गस्ती पथक यांचे ट्रॅकिंग करण्यात येईल. मानव वन्यजीव संघर्षाची परिस्थिती उद्भवल्यास नियंत्रण कक्षाद्वारे संबंधितांना तत्काळ कळविण्यात येऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री नाईक यांनी दिली.

तसेच वन क्षेत्राबाहेर वन्य प्राण्याचे अस्तित्व आढळल्यास ग्रामस्थांना कळावे, यासाठी वन क्षेत्रालगतच्या गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अर्लट यंत्रणा प्रायोगिक तत्वावर उभारण्यात आल्या आहेत. या यंत्रणेची उपयुक्तता लक्षात आल्यामुळे आता ही यंत्रणा राज्यातील सुमारे एक हजार गावांमध्येही उभारण्यात येणार आहे. यामुळे वन्य प्राण्यांच्या हालचालीची माहिती तातडीने ग्रामस्थाना मिळून ते दक्ष राहतील. याशिवाय पकडलेल्या वन्य प्राण्यांसाठी रेस्क्यू सेंटर उभारण्यात येणार आहेत. तसेच वन्य प्राण्यांवरील उपचारासाठी दहा ठिकाणी ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरही उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

वन्य प्राण्यांच्या सुटकेसाठी २० ठिकाणी रॅपिड रेस्क्यू टीमची निर्मिती करण्यात येणार आहे. वन क्षेत्राच्या गावांमध्ये वन्य प्राण्यांपासून रक्षणासाठी वन विभागाच्या मदतीसाठी दोन हजार प्राथमिक प्रतिसाद दल (प्रायमरी रिस्पॉन्स टीम) तयार करण्यात येणार आहेत.

शेतपिकांचे नुकसान करणाऱ्या हरण, माकडे, रान डुक्कर आदी प्राण्यांना पकडण्यासाठी दोन फिरती पथके स्थापन करण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी या प्राण्यांचा उपद्रव होत आहे, त्याठिकाणी जाऊन या प्राण्यांना पकडून ती पुन्हा वनक्षेत्रात सोडण्याचे काम ही पथके करणार आहेत. ही पथके अत्याधुनिक साधनांनी युक्त असतील. तसेच माकडे व रानडुकरांची संख्या नियंत्रणासाठी राज्यात दोन ठिकाणी नसबंदी केंद्रे उभारण्याचे प्रास्तावित आहे.

या उपाययोजनांमुळे मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांच्या पिकाचेही नुकसान टळणार आहे. त्यामुळे या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देशही यावेळी मंत्री नाईक यांनी दिले.