Home Blog Page 34

सावरकरांचा उदोउदो करणाऱ्यांनी तरी त्यांना वाचलंय का?:सावरकरांची प्रतिमा वापरुन तेढ पसरवण्याचा प्रयत्न, राज ठाकरेंनी टोचले कान

मुंबई–स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट शेअर करत राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर बोचरी टीका केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सावरकरांच्या विचारांचा केवळ राजकीय वापर करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. सावरकरांचे हिंदुत्त्व, त्यांची विज्ञाननिष्ठा आणि तर्कशुद्ध विचारांचा दाखला देत, “आज जे सावरकरांचा उदोउदो करत आहेत, त्यांनी सावरकर तरी वाचले असतील का?” असा खोचक सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. सावरकरांना व्यक्तीपूजेपेक्षा तर्क आणि विज्ञानाच्या कसोटीवर सत्य शोधणे अधिक मान्य होते, असे सांगत राज ठाकरेंनी सध्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीकास्त्र सोडले.

राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी वाचा …

राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. सावरकर हे हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्वज्ञ होते, क्रियाशील धर्मसुधारक, समाजसुधारक होते, आणि तितकेच विज्ञाननिष्ठ पण होते. सावरकर हे माझ्या मते देशातील एक असे महापुरुष आहेत, की त्यांच्या टीकाकारांना पूर्ण सावरकर कधी कळले नाहीत किंवा झेपले नाहीत. आणि सध्या सावरकरांचा उदोउदो करून त्यातून मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी तरी सावरकर वाचले असतील का? त्यांना समजले असतील का याची शंकाच आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीला पटते का हे पाहणारे सावरकर खरंच यांना झेपत असतील का?”

“सावरकरांना कधीच एका व्यक्तीचा उदोउदो करणं मान्य नव्हतं. कुठलीही गोष्ट तर्क आणि विज्ञानाच्या कसोट्यांवर थोडक्यात सत्य असत्य स्वतः तपासून बघितलं पाहिजे असं त्यांचं ठाम मत होतं.”
“हे सगळं सांगण्याचं कारण इतकंच ज्या भूमीत सावरकर जन्माला आले त्या महाराष्ट्रात व्हाट्सअप विद्यापीठात काय आलंय ते चूक बरोबर काही न तपासता किंवा साधा विचार पण न करता खरं मानण्याची चढाओढ लागली आहे. याच महाराष्ट्रात राजकारणी भोंदू बाबांच्या भजनी लागल्याचं दिसत आहे. आणि आपण कोण होतो, आपली महाराष्ट्राची परंपरा किती उज्वल होती हे न बघता उत्सव, डीजे याच्यात आपल्याला गुंतवून ठेवलं जात आहे. सावरकर हे प्रखर हिंदू धर्मभिमानी होते पण म्हणून धर्मातील त्रुटींवर टीका करताना त्यांनी कधी मागेपुढे पाहिलं नाही. पण आज सावरकरांच्या महाराष्ट्रात त्यांच्या प्रतिमा वापरून फक्त धर्मात तेढ पसरवणं सुरु आहे. जिथे त्यांनी जाती अंताचा लढा दिला त्या महाराष्ट्रात जातींवरून डोकी फोडणं सुरु आहे. आणि याला खतपाणी सत्ताधारी घालत आहेत.”

“उठता बसता सावकरकरांचा तिरस्कार करणाऱ्यांना सोडून द्या. पण जे त्यांचा वापर स्वतःच्या राजकारणासाठी करत आहेत त्यांना नक्की कुठले सावरकर कळलेत आणि त्यांचे कुठले विचार राजकीय आचरणात आणण्याची तयारी आहे? मी गेल्या २ महिन्यांत दोन वेळेस भाषणांमधून महाराष्ट्र विचारांनी आणि कल्पनांनी किती संपन्न आणि पुढारलेला होता हे सादरीकरण करून सांगतोय. याचं कारण आपण कोण होतो हेच आपण विसरलो तर पुढे कुठे जायचं याचा मार्ग आखणार तरी कसे आहोत? आणि यासाठी जर आपण सत्तेला आसुलेले राजकारणी आणि व्हाट्सअप विद्यापीठातील खोटी नरेटिव्ह यावर अवलंबून राहणार असू तर महाराष्ट्राचं कठीण आहे.”

“आपण कोण होतो आणि आपल्या परंपरेतलं जे उत्तम आहे ते घेणं, प्रत्येक गोष्टीला तर्कावर तपासून बघणं हे करणं म्हणजेच सावरकरांना खरी श्रद्धांजली. अन्यथा तो उपचार ठरेल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन”

नेहरूंचा जगात नैतिक दबदबा-ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर

पुणे : ‘शीतयुद्धाच्या काळात जग अमेरिका आणि सेवियत युनियन या दोन देशात विभागलेले असताना स्वतंत्र परराष्ट्र धोरण आखून पं. जवाहरलाल नेहरूंनी तिसरी शक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नेहरूंचा जगात नैतिक दबदबा होता,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी बुधवारी केले. ‘आजचा भारत हतबल झाला आहे. सध्याचे परराष्ट्र धोरण फसले असून मालदीवसारखा छोटा देशही आपले ऐकत नाही,’ अशी टीका त्यांनी केली.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या वतीने देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘नेहरू प्रणित भारताच्या विकासाचे प्रतिमान आणि त्याची प्रसंगिकता’ या विषयावर डॉ. मुणगेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ॲड. शंकर निकम लिखित ‘भारताचा कोहिनूर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेचे महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त सचिव अन्वर राजन, विश्वस्त डॉ. शिवाजीराव कदम, लक्ष्मीकांत देशमुख, एम.एस. जाधव, रमेश आढाव उपस्थित होते. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत अध्यक्षस्थानी होते.

मुणगेकर म्हणाले, ‘भारताला कोणत्या दिशेने पुढे न्यायचे, हे समजलेला एकमेव नेता नेहरू होते. राम मनोहर लोहियांमुळे काँग्रेस व नेहरूविरोधी दृष्टी तयार झाली होती. मात्र, संसदीय लोकशाही, आर्थिक नियोजन, धर्मनिरपेक्षता आणि परराष्ट्र धोरण ही नेहरूंची वैशिष्ट्ये आहेत. नेहरूंना लोकशाही समाजवाद आणायचा होता, अनेक अर्थतज्ज्ञांना वाटते. मात्र, त्यांना कल्याणकारी राज्य आणायचे होते. देशातील लोकांना एकत्र ठेवण्याची ताकद राज्य घटनेत आहे. पं. नेहरू, सरदार पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राज्य घटनेसाठी मोठे योगदान आहे. नेहरूंवर रशियन राज्यक्रांतीचा प्रभाव होता. भांडवलशाही अर्थव्यवस्था शोषण करणारी व्यवस्था आहे, असे त्यांचे मत होते. नेहरू राजकारणी झाले नसते तर ते तत्त्ववेत्ते किंवा इतिहासकार झाले असते. नेहरू आणि आइन्स्टाइन यांच्यात चर्चा होत असे. त्यावरून त्यांचा व्यासंग लक्षात येतो. नेहरूंचा प्रत्येक धर्मातील धर्मांधतेला विरोध होता. नेहरू सर्व मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहायचे. विचारांची आदानप्रदान होत होती. नेहरूंनी देशात ११७ संस्था उभ्या केल्या. देशाची बांधणी या संस्थांवर झाली आहे.’

‘नेहरूमुक्त भारत करण्यासाठी मोदी सरकारने नियोजन आयोग बरखास्त केला आहे. इराण आणि इस्रायल युद्धात पाकिस्तान मध्यस्थी करतो आणि आपण अगतिकपणे पाहत बसतो, हे भूषणावह नाही,’ अशी टीका मुणगेकर यांनी केली.

सावंत म्हणाले, ‘मागच्या पिढीने लोहियावादी होऊन चूक केली तशी आजची पिढी सोशल मीडियातून नेहरूंबद्दल तीच चूक करीत आहे. नेहरूंनी दहा वर्षे तुरुंगात काढली. नेहरूंनी संसदेची प्रतिष्ठा जपली. सध्याच्या पिढीला नेहरू समजून सांगितले पाहिजे. भारत कसा असावा, याचे उदाहरण नेहरू आहेत. जगात आपली ओळख कट्टर हिंदू होणे परवडणारे नाही. जगातील आपली ओळख बदलत असून भारतीयांकडे संशयाने बघितले जात आहे.’ अन्वर राजन यांनी प्रास्ताविक केले. सूरज कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. तेजस भालेराव यांनी आभार मानले.

लग्नाचे आमिष दाखवून दोन महिलांनी व्यावसायिकाला तब्बल 55 लाखांचा घातला गंडा

कल्याण- कल्याणमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे चक्क दोन महिलांनी संगनमत करून एका नामांकित व्यावसायिकाला लग्नाच्या जाळ्यात ओढले आणि त्याची तब्बल 55 लाख रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक केली. या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत महात्मा फुले चौक पोलिसांनी धडक कारवाई करत या दोन्ही आरोपी महिलांना बेड्या ठोकल्या आहेत.

कल्याण पश्चिमेतील एका नामांकित व्यावसायिकाची जयश्री पाटील या महिलेने मुंबईत राहणाऱ्या रोमा परदेशी हिच्याशी ओळख करून दिली होती. रोमा एका मोठ्या इन्शुरन्स कंपनीत कामाला असल्याचे भासवून तिने सुरुवातीला या व्यावसायिकासोबत जवळीक वाढवली. त्यानंतर इन्शुरन्स पॉलिसीच्या बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन करून तिने त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही इन्शुरन्स पॉलिसी काढण्यात आलीच नाही.या आर्थिक फसवणुकीनंतर काही दिवसांनी, रोमा हिने जयश्री पाटीलच्या माध्यमातून या व्यावसायिकासोबत लग्न करण्याची तयारी दर्शवली. लग्नाला होकार मिळाल्याचा फायदा घेत, या दोन्ही महिलांनी संगनमत करून वेळोवेळी विविध खोटी कारणे सांगत व्यावसायिकाकडून आणखी पैसे उकळण्यास सुरुवात केली. तक्रारदार व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार, इन्शुरन्स आणि लग्नाचे आमिष दाखवून या दोन्ही महिलांनी आतापर्यंत त्यांची तब्बल 55 लाख रुपयांची मोठी फसवणूक केली आहे.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या व्यावसायिकाने तत्काळ महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला मुख्य आरोपी रोमा परदेशी हिला अटक केली होती, मात्र तिची नंतर जामिनावर सुटका झाली. या गुन्ह्याचा सखोल तपास करत असतानाच पोलिसांनी नुकतीच तिची साथीदार जयश्री पाटील हिलाही कोल्हापूरमधून बेड्या ठोकल्या आहेत. लग्नाचे आमिष दाखवून माझी मोठी फसवणूक करण्यात आली असून, आरोपींकडून माझे सर्व पैसे वसूल करून मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आता या तक्रारदार व्यावसायिकाने पोलिसांकडे केली असून महात्मा फुले पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

इराणनंतर ओमानलाही ट्रम्प यांची धमकी:म्हटले- होर्मुझवर कुणाचा कंट्रोल सहन करणार नाही, उडवून देऊ, मला निवडणुकांची काळजी नाही

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराणला वाटले होते की ते चर्चेतून माघार घेतील, परंतु आता तेहरानकडे करार करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही.

व्हाइट हाऊसमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान ट्रम्प म्हणाले, इराणला वाटले होते की ते मला वाट पाहायला लावून थकवून टाकतील. त्यांना वाटले की माझ्यासमोर मध्यावधी निवडणुका आहेत, पण मला त्याची पर्वा नाही.

त्यांनी दावा केला की, इराणला आता फक्त करार करायचा आहे. मला वाटत नाही की त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय आहे.

ट्रम्प म्हणाले की, अमेरिका सध्या संभाव्य करारावर समाधानी नाही, परंतु त्याच्या अटी मान्य केल्याशिवाय करार होणार नाही. त्यांनी इशारा दिला की, जर करार झाला नाही, तर आम्हाला काम पूर्ण करावे लागेल.पीबीएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी हे देखील स्पष्ट केले की, जर इराणने आपले उच्च-समृद्ध युरेनियम सोपवले तरीही, त्याला अमेरिकेच्या निर्बंधातून सूट मिळणार नाही.
१. इराण-अमेरिका कराराचा दावा- इराणने दावा केला की, अमेरिकेसोबत युद्ध संपवण्यासाठी प्रारंभिक करार मसुदा तयार झाला आहे, ज्यात होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये (स्ट्रेट) शिपिंग पूर्ववत करणे आणि अमेरिकेची लष्करी उपस्थिती कमी करण्याचा प्रस्ताव समाविष्ट आहे.

२. अमेरिकेने अहवालाला खोटे ठरवले- व्हाईट हाऊसने इराणी माध्यमांच्या शांतता कराराच्या अहवालाला पूर्णपणे बनावट आणि मनगढंत (खोटा) असल्याचे सांगितले. अमेरिकेने म्हटले की, दोन्ही देशांमध्ये कोणत्याही प्रकारचा अधिकृत मसुदा तयार झालेला नाही.

  1. लेबनानमध्ये इस्रायली हल्ले तीव्र- दक्षिण लेबनानमध्ये इस्रायलच्या ताज्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 31 लोकांचा मृत्यू झाला आणि 40 जण जखमी झाले. सततच्या हल्ल्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू आहे.
  2. इराणने भारतीय खलाशांना सोडले- इराणने दीर्घकालीन राजनैतिक प्रयत्नांनंतर, जुलै 2025 पासून ताब्यात घेतलेल्या 10 भारतीय खलाशांना सोडले. सर्व खलाशी लवकरच भारतात परततील आणि सध्या ते सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.
  3. हमास कमांडरला मारल्याचा दावा- इस्रायलने गाझामधील हवाई हल्ल्यात हमासच्या लष्करी शाखेचा नवा कमांडर मोहम्मद ओदेह याला मारल्याचा दावा केला. गाझा शहरातील एका निवासी इमारतीवर अनेक महिन्यांच्या पाळत ठेवल्यानंतर हा हल्ला करण्यात आला.

क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या अखिल काटकरचा सत्कार – संदीप खर्डेकर.

पुणे-गिर्यारोहण हा साहसी क्रीडा प्रकार आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढीस लागला आहे.यातून एक साहसी पिढीची जडणघडण होत आहे.या खेळाला आर्थिक पाठबळ आवश्यक आहे तसेच या खेळासाठी स्वतंत्र विमा कवच असणे गरजेचे आहे असे मत ऑलम्पिक असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.याबाबत गिरीप्रेमीचे उमेश झिरपे माझ्याकडे पाठपुरावा करत आहेत, मी या साठी शासन कडे  नक्की पाठपुरावा करेन आणि या खेळा ला अधिक चालना मिळेल असा प्रयत्न नक्की करेन असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले.

क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे एव्हरेस्ट शिखर सर करून परतलेल्या अखिल काटकर चा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, अखिल च्या आई स्मिता काटकर, मामी लेखिका निलिमा बोरवणकर, मामा अजय बोरवणकर, विजय बोरवणकर इ मान्यवर उपस्थित होते.

आपल्याकडे क्रिकेट ला प्रचंड वलय आहे मात्र ( Glamour ) अन्य क्रीडाप्रकारांना हवी तेवढी लोकमान्यता आणि राजमान्यता मिळत नाही अशी खंत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष आणि रोलबॉल असोसिएशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केली. यात बदल होण्यासाठी ना. मुरलीधर मोहोळ नक्कीच प्रयत्न करतील असा विश्वास ही खर्डेकर यांनी व्यक्त केला. ह्या साहसी क्रीडा प्रकारासाठी अखिल च्या कुटुंबियांनी त्याला प्रोत्साहन दिले यामुळे खरंतर त्यांचेही कौतुक करायला हवे असे मत मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केले.

एव्हरेस्ट वीर अखिल स्मिता रवींद्र काटकर (वय ३६) हे पुण्यातील एक गिर्यारोहक, प्रशिक्षक आणि गिरिप्रेमी संस्थेचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. २१ मार्च १९९० रोजी जन्मलेल्या अखिल यांनी डिप्लोमा इन इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असून काही वर्षे स्वतःचा कॅफे व्यवसायही यशस्वीपणे चालवला. मात्र पर्वत, साहस आणि समाजाभिमुख कार्याची ओढ त्यांना पुन्हा गिर्यारोहण क्षेत्रात घेऊन आली.

सध्या ते पूर्णवेळ गिरिप्रेमी संस्थेशी जोडलेले असून लहान मुलांसाठी प्रशिक्षण उपक्रमांमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गिर्यारोहणासोबतच मॅरेथॉन, ट्रायथेलॉन आणि विविध साहसी क्रीडा प्रकारांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

२१ मे २०२६ रोजी अखिल काटकर यांनी गिरिप्रेमीच्या इतर दोन सहकाऱ्यांसमवेत जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट वर यशस्वीरित्या चढाई केली  आणि भारतीय तिरंगा अभिमानाने फडकावला.

अखिल काटकर यांची एव्हरेस्ट शिखर चढाई ही केवळ वैयक्तिक यशाची गोष्ट नसून नव्या पिढीला आरोग्य, साहस, शिस्त आणि ध्येयपूर्तीकडे प्रेरित करणारी उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे.

अखिल चे अभिनंदन आणि सत्कार करतानाच अधिकाधिक तरुण तरुणींना विद्यार्थी दशेपासूनच ह्या खेळा प्रती आकृष्ट करण्यासाठी शिक्षण द्यावे अशी अपेक्षा संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केली.

विकसित भारतासाठी कर्मयोगाचा सिद्धांत समजणे आवश्यक : अविनाश धर्माधिकारी

‘विकसित भारत’ संकल्पनेवर पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा ४९वा स्थापना दिन साजरा

पुणे : शाश्वत विकास ही भारतीय विकासाची मूलभूत रचना आहे. निसर्गाकडून जितके घ्याल तितकेच त्याला परत करा ही भारतीय तत्त्वज्ञानातील शिकवण जगासाठी मार्गदर्शक ठरणार आहेत. कर्मयोगाचा सिद्धांत समजून त्यानुसार व्यवस्थापन केल्यास, मानव जातीसह निसर्गातील प्रत्येक घटकाला एक कुटुंब मानल्यास निश्चितच विकसित भारताचे स्वप्न साकारले जाईल, असा विश्वास निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केला.

पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा (पीएमए) ४९वा स्थापना दिन ‘विकसित भारत’ या प्रेरणादायी संकल्पनेवर बुधवारी सीपीआर ऑडिटोरियम, पाषाण रोड गणेशखिंड येथे साजरा करण्यात आला. त्या वेळी अविनाश धर्माधिकारी बोलत होते.  समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पित्ती, पूना ॲब्रेसिव्हजचे संस्थापक व अध्यक्ष वीरेंद्र सूद, बँक ऑफ महाराष्ट्रचे संचालक प्रसेनजीत फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. पीएमएचे अध्यक्ष बाळ पाटील, उपाध्यक्ष प्रदिप तुपे, राहुल जोशी मंचावर होते. उत्कृष्ट कार्याबद्दल उत्कृष्ट शैक्षणिक संस्था – आयएमडीआर, उद्योजकांना सहाय्य करणारी उत्कृष्ट संस्था – टाय (द इंडस आंत्रप्रेन्युअर्स), वर्षातील उत्कृष्ट निर्यातदार प्रशांत बोरा, सामाजिक प्रभाव निर्माण करणारी संस्था – स्वरूपवर्धिनी, नेतृत्व क्षेत्रातील उल्लेखनीय महिला – श्वेता शालिनी, प्रथम पिढीतील यशस्वी उद्योजक – गौरव त्रिपाठी, वर्षातील उत्कृष्टता केंद्र – महाट्रेनर्स यांचा गौरव करण्यात आला.

सुरुवातीस पीएमएचे अध्यक्ष बाळ पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला आणि सुवर्णमहोत्सवी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी माहिती दिली.

मानवाचा विकास साधताना भौतिक आणि आर्थिक कल्याणाव्यतिरिक्त मानसिक, मनोवैज्ञानिक आणि आध्यात्मिक कल्याणाला महत्त्व दिल्यास विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात कोणताच अडथळा येणार नाही, असे सांगून अविनाश धर्माधिकारी म्हणाले, विकास साधताना पाश्चत्यांच्या अंधानुकरणामुळे मानव जात विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. निसर्गाच्या अनिर्बंध लुटीमुळे संपूर्ण जग आज पर्यावरणाच्या ऱ्हासाशी झगडत आहे. परंतु विकासाचा भारतीय दृष्टीकोन असा नाही. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने योगदान देणे आवश्यक आहे.

प्रसेनजीत फडणवीस म्हणाले, विकसित भारत २०४७चे ध्येय गाठण्यासाठी शिक्षण आणि बँकिंग क्षेत्राची मदत होणार आहे. कारण बॅकिंग हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे तर शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या युवा पिढीकडून २०४७च्या विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी मदत होणार आहे.

विकसित भारताचे स्वप्न साकारताना सरकारचे विविध उपक्रम, त्याविषयी सखोल विश्लेषण, धोरणात्मक आराखडा याविषयी आदित्य पित्ती यांनी माहिती दिली. विकसित भारताचे स्वप्न साकर करण्यात विकसित पुण्याचा मोलाचा वाटा असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वीरेंद्र सूद म्हणाले, देशाला जर विकसित व्हायचे असेल तर आज पर्यायी ऊर्जांवर काम करायला सुरुवात करावी लागेल. सौर, पवन आणि जलऊर्जा याविषयी तांत्रिकदृष्ट्या अधिक विकास साधणे गरजेचे आहे. जो पर्यंत भारताची बँकिंग प्रणाली जागतिक प्रणालीशी समन्वय साधत नाही, तसेच संशोधन आणि विकास क्षेत्रात भरीव कार्य घडत नाही तोपर्यंत पुरेसा विकास साधला जाणार नाही.

मान्यवरांचे स्वागत बाळ पाटील, प्रदीप तुपे, राहुल जोशी यांनी तर परिचय प्रसाद मिरासदार, भाग्येश अभ्यंकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन पायल गिल यांनी केले.

फर्ग्युसनच्या वसतिगृहातील सावरकरांच्या स्मृतींना अभिवादन

जयंतीनिमित्त ऐतिहासिक खोली दर्शनासाठी खुली-दिवसभर सावरकरप्रेमींची गर्दी

पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. २८ मे) डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयातील मुलांच्या वसतिगृहातील खोली क्रमांक १७ येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे या खोलीमध्ये वास्तव्य होते.

सकाळी ९ वाजता डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ऍड. अशोक पलांडे यांच्या हस्ते स्वा. सावरकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

 ही खोली इतिहासप्रेमी आणि सावरकर अनुयायांसाठी प्रेरणास्थान मानली जाते. जयंतीनिमित्त ही खोली सर्वांसाठी दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली होती. दिवसभर सावरकरप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी येथे भेट देत इतिहासाच्या साक्षीदार ठरलेल्या वस्तूंचे दर्शन घेतले.

या खोलीमध्ये स्वा. सावरकर यांनी वापरलेल्या काळातील अभ्यासाचे टेबल, लाकडी खुर्ची, पारंपरिक पलंग, पुस्तके ठेवण्याची कपाटे, जुन्या शैलीतील लेखन साहित्य, छायाचित्रे आणि त्यांच्या जीवनकार्याची माहिती देणारे दस्तऐवज जतन करून ठेवण्यात आले आहेत. सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेली आरती ही भिंतीवर रेखाटण्यात आली आहे.

विद्यार्थीदशेत सावरकरांनी येथेच राष्ट्रभक्तीचे विचार मांडले, कविता आणि लेखन केले तसेच सहकाऱ्यांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा जागवली, अशी ऐतिहासिक नोंद आहे.

कार्यक्रमाला डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह डॉ. आनंद काटिकर, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शाम मुडे , उपप्राचार्य प्रा. स्वाती जोगळेकर, डॉ. शरद कुंटे, मिलिंद कांबळे, डॉ. ज्ञानेश्वर कुंभार, अंकित रावळ, श्रद्धा काने टकर, गायत्री दीडमिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट तर्फे वृद्धांना मदतीचा हात

उद्योजक प्रकाशशेठ रसिकशेठ धारीवाल यांच्या विशेष सहकार्याने उपक्रम
पुणे : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने वयोवृद्धांसाठी कार्यरत असणाऱ्या ‘वृद्ध मित्र’ संस्थेतील ज्येष्ठ नागरिकांना कंबरेचा बेल्ट, गरम पाण्याची बॅग, निकॅप, थ्री लेग वॉकिंग स्टिक आदी आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. शनिपार चौकाजवळील स्व. रसिकशेठ माणिकचंद धारिवाल या ट्रस्टच्या नियोजित भवनात हा कार्यक्रम संपन्न झाला.

ट्रस्टचे सहायक तथा माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाशशेठ रसिकशेठ धारीवाल यांच्या विशेष सहकार्याने ही मदत देण्यात आली. यावेळी प्रकाशशेठ रसिकशेठ धारीवाल, दिना धारीवाल आणि आदित्य धारीवाल यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी आणि विश्वस्त उपाध्यक्ष निवृती जाधव यावेळी उपस्थित होते.

निवृती जाधव म्हणाले, समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देत वृद्धांचे रोजचे जगणे सोपे करण्यासाठी आमच्याकडून ही मदत करण्यात आली. धार्मिक कार्यासोबत सामाजिक उत्तरदायित्व जपत ट्रस्ट सातत्याने विधायक उपक्रम राबवत आहे. यासाठी माणिकचंद उद्योग समूहाने कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून सातत्याने मदत केली आहे.

डिएपी खतास पर्यायी खते वापरण्याचे आवाहन

पुणे, दि. 27: शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामामध्ये केवळ डिएपी खतावरच अवलंबून न राहता बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत येत आहे.

राज्यामध्ये मागील 3 वर्षात खरीप हंगामात 44 लाख मे.टन रासायनिक खतांचा वापर झाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने युरिया, डीएपी, एमओपी (म्युरेट ऑफ पोटॅश) संयुक्त खते व एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) या खतांचा वापर केला जातो. महाराष्ट्र राज्य हे मृद परिक्षण व जमिन आरोग्य पत्रिकांचेआधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरीताअग्रेसर आहे. राज्यामध्ये लवकरच पेरणीला सुरुवात होणार असून डिएपी खताची शेतक-यांकडून जास्त मागणी होणार आहे. डिएपी खता मध्ये 18 टक्के नत्र तर 46 टक्के स्फुरद ही अन्नद्रव्य आहेत.

स्फुरद युक्त खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी या खताची सर्वाधिक मागणी आहे. एसएसपी खत हे देशातंर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरद-16 टक्के सह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामूळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे . डिएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डिएपीस चांगला पर्याय आहे.

एसएसपी बरोबरच एनपीके-10:26:26, एनपीके-20:20:0:13, एनपीके-12:32:16, युरिया एसएसपी कॉम्पलेक्स व एनपीके-15:15:15 या संयुक्त खतांच्या वापरामुळे नत्र व स्फुरद बरोबरच पालाश हे अन्नद्रव्य सुध्दा पिकांना उपलब्ध होते. त्यामुळे या संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांसाठी पोषक ठरतो. त्याचबरोबर टिएसपी या खतामध्ये 46 टक्के स्फुरद अन्नद्रव्याची मात्रा असुन डिएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व टिएसपी एक गोणी खतांचा वापर केल्यास तो देखिल डिएपी खतास उत्तम पर्याय आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचाळे यांनी दिली आहे

अबब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ४० उमेदवार झाले अपात्र: येताच शीतल तेलींचा जोरदार तडाखा

0

पुणे, दि. २७: पुणे विभागातील महानगरपालिका,नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकांमधील पुणे महानगरपालिकेच्या २२, पंढरपूर नगरपरिषदेच्या १५ व अक्कलकोट नगरपरिषदेच्या ३ अशा एकूण ४० उमेदवारांवर २६ मे २०२६ पासून पुढील ३ वर्षासाठी अपात्र केल्याचे आदेश विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले यांनी जारी केले आहेत. अपात्र घोषित करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे विभागातील एकूण ६० नगरपरिषदा, नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबर २०२५ व ६ महानगरपालिकांची सार्वत्रिक निवडणूक १४ जानेवारी २०२६ रोजी पार पडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडणूक लढविलेल्या पुणे महानगरपालिकेच्या २२, पंढरपूर नगरपरिषदेच्या १५ व अक्कलकोट नगरपरिषदेच्या ३ उमेदवारांनी अनुक्रमे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १० (१ई) तसेच महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ कलम १६ (१ड) मधील तरतुदीनुसार विहित मुदतीत (३० दिवस) निवडणूक खर्चाचा हिशोब सादर केला नाही.

पुणे महानगरपालिका आयुक्त तसेच सोलापूर जिल्हाधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे ५ व २५ मे २०२६ रोजी याबाबत संबंधिताना आपले म्हणणे दाखल करण्याबद्दल सुनावणी आयोजित करण्यात आली. सदर सुनावणीदरम्यान संबंधित उमेदवारांकडून समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार संबंधित उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्यात कसूर केल्याबद्दल आदेशाच्या दिनांकापासून ३ वर्षाच्या कालावधीसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र घोषित करण्यात आले असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाच्या उप आयुक्त प्रतिभा पाटील यांनी कळविली आहे.
0000

मोदी आल्यापासून देशात गरीबी, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार,गुन्हेगारी, शेतकरी आणि जनतेच्या समस्या वाढल्या

0

मी कोणताही चुकीचा शब्द वापरला नाही:हर्षवर्धन सपकाळांचे स्पष्टीकरण
मुंबई-सध्या जी देशात आणि राज्यात परिस्थिती पाहायला मिळत आहे, यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महाविकास आघाडीने काल कांदाच्या प्रश्नी तीन तास रस्ता जाम केला होता. तसेच महागाईवरून देखील विरोधकांनी हल्लाबोल सुरू केला आहे. कालच्या आंदोलनावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान तसेच मुख्यमंत्र्यांविषयी अपशब्दांचा वापर केला होता. यावर आज पत्रकार परिषदे स्पष्टीकरण देत पुन्हा जोरदार टीका केली आहे.हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले, मोदी आल्यापासून देशात गरीबी वाढलेली आहे, शेतकऱ्यांचे भाव पडलेले आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे, महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, भ्रष्टाचार बोकाळला आहे आणि अशा परिस्थितीच्या संदर्भात काल मी त्यांचा तो उल्लेख केला. पण हा शब्द त्यांना खटकला असेल तर नरेंद्र मोदी हे ‘पनवती’ आहेत, हा समजेल असा शब्दप्रयोग मी पुन्हा एकदा करतो.

पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, काल कांदा प्रश्नी तीन तास रस्ता जाम केला आम्ही. त्यात रोहित दादा होते, शशिकांत शिंदे होते, अंबादास दानवे होते तसेच इतर मित्र पक्ष होते. रस्ता जाम केला, लोक रस्त्यावर उतरले होते. याचा परिणाम म्हणजे आज सरकारच्या अर्थमंत्रिमंडळाला दिल्लीला जावे लागले आहे. हे अर्थ मंत्रिमंडळ दिल्लीला गेले असले तरी हात हलवत परत येऊ नका हा आमचा त्यांना सज्जड दम आहे.

मी कोणताही चुकीचा शब्द वापरलेला नाही

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर टीका करताना म्हटले की, हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे. त्यांच्यामध्ये टोळी युद्ध सुरू झाले आहे. सत्तापिपासू लोक आहेत, त्यांचा हा फक्त सत्ता मिळवण्यासाठी खेळ सुरू आहे. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांनी काल भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना अपशब्दांचा वापर केला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, मी कोणताही चुकीचा शब्द वापरलेला नाही. ‘दलिंदर’ हा जो शब्द आहे हा कॅरक्टर दाखवणारा, लक्षण दाखवणारा शब्द आहे. दरिद्री या संस्कृत शब्दातून तो शब्द आलेला आहे.
मोदी आल्यापासून देशात गरीबी वाढली

पंतप्रधान मोदी पनौती तर मुख्यमंत्री फडणवीस खोटारडे, पेट्रोल डिझेल आहे तर पेट्रोल पंपावर रांगा कशासाठी आहेत? हर्षवर्धन सपकाळ.

मुंबई, दि. २७ मे २०२६..

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पेट्रोल, डिझेल, LPG व सीएनजी मध्ये भरमसाठ दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. महागाईने पिचलेल्या जनतेला इंधन दरवाढ करून मोदी सरकारने महागाईच्या खाईत लोटले आहे. भाजपा सरकारने केलेल्या या महागाई विरोधात प्रदेश काँग्रेसचे अध्य हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली दादर येथील इंडिया बुल्स समोर आंदोलन केले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी रास्ता रोको करून लोकांना मेलोडी चॅाकलेट वाटप केले तसेच नरेंद्र मोदी सरकार व फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पेट्रोल नाही, डिझेल नाही, सिलेंडर गायब आहे, इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, शेतमालाला भाव नाही, जनता हवालदिल आहे पण भाजपा सरकार मात्र मस्तीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी पनौती आहेत, ते सत्तेत आल्यापासून देशातील जनतेवर वरंवडा फिरवत आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धादांत खोटे बोलत आहेत. पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा आहे असे जर त्यांना वाटत असेल तर जनता भर दुपारी कडक उन्हात पेट्रोल पंपावर काय ऊन खायला रांगा लावत आहेत का, कोणी साठेबाजी केली असे त्यांना वाटत असेल तर कारवाई केली पाहिजे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

बूथ स्तरावरील संघटन बळकट करण्यासाठी शिवसेना नेत्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न

बूथ पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र, अॅप प्रशिक्षण देणार

पुणे.दि.२७: शिवसेना पक्षाच्या बूथ स्तरावरील नेमलेल्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात पार पडली. बैठकीत शहराच्या विविध भागांतील शिवसैनिकांनी संघटनात्मक काम करताना येणाऱ्या अडचणी आणि स्थानिक पातळीवरील प्रश्न डॉ. गोऱ्हे यांच्यासमोर मांडले.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, “निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार यद्यांची पडताळणी मोहीम राबविली जात आहे. आपल्या भागातील मतदार यादी अचूक असल्याची खात्री करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) संदर्भात केलेल्या आवाहनानुसार आजची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेचबूथ स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी अधिक सक्षमपणे आणि समन्वयाने काम करण्याच्या दृष्टीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा या विषयासंदर्भात महाराष्ट्र दौरा सुरू आहे. संपर्क प्रमुख व ऊद्योगमंत्री ना. ऊदय सामंत, खा. श्रीरंग बारणे, शिरूर संपर्क प्रमुख विकास रेपाळे , आ.विजय शिवतारे, आ. शरद सोनावणे, हे सातत्याने पुणें जिल्ह्याच्या विविध विभागात लक्ष घालत आह्त.
पुणें शहरात
पक्षाने नियुक्त केलेल्या बूथ पदाधिकाऱ्यांना अधिकृत ओळखपत्र देण्याबाबत नीलमताई गोर्हे महत्त्वपूर्ण सूचना केली. तसेच बूथ स्तरावरील कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी पक्षाने तयार केलेल्या मोबाईल अॅप्लिकेशनचे प्रशिक्षण पदाधिकाऱ्यांना देण्यात यावे. स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढावा आणि स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर त्वरित चर्चा व्हावी, यासाठी लवकरात लवकर बैठका आयोजित करण्यात यावी. यांसह बूथ स्तरावरील संघटन अधिक सक्षम करण्यासाठी विविध सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केल्या.

शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी सांगितले की, “बूथ स्तरावर मजबूत संघटन उभारल्याशिवाय पक्ष अधिक प्रभावी होणार नाही. प्रत्येक पदाधिकाऱ्याने जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोहोचवावे.”

रवींद्र धंगेकर यांनी सांगितले की, “शिवसेनेचे बूथ नेटवर्क अधिक सक्षम करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून संघटनात्मक काम गतिमान करावे. पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडाव्यात.

याखेरीज, सुधीर कुरुमकर, मिलिंद अहिरे, प्रकाश ढमढेरे यांनी देखील सूचना मांडल्या.

या बैठकीस शहरप्रमुख नाना भानगिरे, महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर, जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे, युवासेना प्रदेश सचिव किरण साळी, आनंद गोयल, प्रकाश ढमढेरे, राजाभाऊ भिलारे, संदीप शिंदे, सुधीर कुरुमकर, निलेश गिरमे,मिलिंद आहिरे, स्वराज बाबर, प्रणव धंगेकर, सुनील जाधव, पंकज कोद्रे, दत्ता खवले, हेमंत बत्ते, धनंजय जाधव, अक्षदा धुमाळ, आश्विनी मल्हारे, जयवंती फाटे, अनिल दामजी, राजेश मराठे, अनिल गडकरी, निलेश जगताप, नितीन लगस, उद्धव कांबळे, परीक्षित जमदाडे, ओंकार आढाव, गणेश नलावडे, श्री कामठे, अनिल मेमाणे, विशाल पवार, विशाल सरोदे यांसह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर जोशी यांनी केले.

हर्षवर्धन सपकाळ यांना राज्यात फिरू देणार नाही:चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

नागपूर-
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अत्यंत अश्लाघ्य शब्दांत टीका केली आहे. त्यातून त्यांची नीच प्रवृत्ती दिसून येते. त्यांनी आपली भाषा सुधारली नाही, तर भाजप कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाहीत, असा इशारा भाजप नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी महायुतीच्या विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपाची घोषणा उद्या किंवा परवा होईल असेही सांगितले.

विरोधी पक्षांनी मंगळवारी चांदवड येथे शेतकऱ्यांचा मोर्चा आयोजित केला होता. यावेळी भाषण करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत आगपाखड केली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बोलताना त्यांच्या या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले, ते म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केलेली टिप्पणी अत्यंत अश्लिल आहे. त्यातून हर्षवर्धन सपकाळ यांची नीच प्रवृत्ती दिसून येते. त्यांची बुद्धी बुद्धीहिन झाली आहे.

विरोधी बाकावर असल्यामुळे सपकाळांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे अशी विधाने करून ते गावागावात व समाजात तेढ निर्माण करणे, वाद निर्माण करणे व समाजातील चांगले वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी असे विधान करून खूप मोठी चूक केली आहे. भाजपचा कार्यकर्ता हर्षवर्धन सपकाळ यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. ते सुधारले नाही तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणे सोडले पाहिजे. त्यांनी चांगल्या भाषेत बोलले पाहिजे. त्यांची नीच व नालायक टीकेला आम्ही सोडणार नाही.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादग्रस्त घटनाक्रमावरही भाष्य केले. ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनील तटकरे व छगन भुजबळ यांच्यात वाद झाला असेल असे मला वाटत नाही. छगन भुजबळ काल रात्री उशिरापर्यंत माझ्यासोबत होते. त्यामुळे वाद झाल्याची बातमी तुमच्याकडे कुठून आली हे मला माहिती नाही, असे ते म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळेंनी यावेळी विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छाही व्यक्त केली. ते म्हणाले, विधान परिषदेच्या विविध मतदारसंघांत भाजप व मित्रपक्षांचे 70 टक्क्यांपर्यंत मतदार आहेत. त्यामुळे काँग्रेसने उन्हाळ्याच्या काळात अनावश्यक खर्च न करता निवडणूक बिनविरोध करावी अशी माझी त्यांना विनंती आहे. गरज भासल्यास मी या प्रकरणी काँग्रेस नेत्यांशीही चर्चा करेन. दुष्काळी परिस्थितीत निवडणूक लढवण्यापेक्षा ती बिनविरोध झालेली बरी. महायुतीच्या जागावाटपाची बैठक दिल्लीत घेण्याची गरज नाही. आमचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री व दोन्ही मित्रपक्षांचे नेते आपसात बसून निर्णय करतील.उद्यापर्यंत महायुतीचे जागावाटप होईल. महायुतीची जागावाटपाची चर्चा 99 टक्के पूर्ण झाली आहे. फक्त तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी बसून निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब करायचा आहे, असे ते म्हणाले.

काय म्हणाले होते हर्षवर्धन सपकाळ?

हर्षवर्धन सपकाळ काल म्हणाले होते, सरकार तुपाशी शेतकरी उपाशी अशी अवस्था आहे. मी तुमचा कांदा खाल्ला आहे, मी बेइमानी करणार नाही. नालायक म्हणायचे ह***र म्हणायचे, कांदाखोर म्हणायचे, असे हे नालायक सरकार आहे. फडणवीस तर गद्दार माणूस आहे. 24 रुपयांनी कांदा खरेदीचे आश्वासन दिलेले होते. फडणवीस म्हणाले होते वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही आणि लग्न केले. त्यामुळे ते महाराष्ट्राचे खोटारडे मुख्यमंत्री आहेत.

पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, मोदी यांनी आजू-बाजूच्या देशांसोबत भांडण घेतले आहे. जो पर्यंत **** खुर्चीवर आहे तो पर्यंत कांदा आयात होणार नाही. बांगलादेश श्रीलंका आपला कांदा घेणार नाही. नरेंद्र हा **** आहे. एपस्टीन फाईलमध्ये मोदींनी काय – काय केले, ज्यामुळे ते ट्रम्प यांचे ऐकत आहेत? मोदींमुळे आपले चांगले होऊ शकत नाही. कांदा खरेदी आता एपीएमसी मधेच झाली पाहिजे. झोपेच सोंग करणारे खोट सरकार आहे. मोदींना बैलगाडीत बसून त्यांची हिमालयात विल्हेवाट लावा, असे ते म्हणाले होते.

केरळमध्ये छापा टाकायला गेलेल्या ED अधिकाऱ्यांना चोपले, दगडफेक करत गाडीची तोडफोड

विजयन समर्थकांचा ED पथकावर हल्ला- केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीवर मनी लाँड्रिंगचा आरोप
केरळचे माजी मुख्यमंत्री पिनारई विजयन यांच्या घरी छापा टाकण्यासाठी गेलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) पथकावर सीपीआय समर्थकांनी हल्ला केला. ईडीचे 12 सदस्यीय पथक तिरुवनंतपुरममधील बेकरी जंक्शन येथील विजयन यांच्या घरासह 10 ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात छापा टाकण्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी विजयन आणि त्यांचे कुटुंब घरात उपस्थित होते.छाप्याची बातमी पसरताच मोठ्या संख्येने सीपीआय समर्थक घराबाहेर जमा झाले. ईडीचे पथक बाहेर पडत असताना जमावाने त्यांच्या गाड्यांवर दगड आणि काचेच्या बाटल्या फेकल्या. गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आणि लाठीनेही हल्ला करण्यात आला.

हे प्रकरण विजयन यांची मुलगी टी वीना यांच्या ‘एक्सालॉजिक सोल्युशन्स’ कंपनीशी संबंधित आहे. आरोप आहे की, कोचीन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड (CMRL) ने 2018-19 मध्ये वीना यांच्या कंपनीला मासिक पेमेंट म्हणून ₹1.72 कोटी दिले, परंतु त्या बदल्यात एक्सालॉजिक सोल्युशन्सने कोणतीही सेवा दिली नाही.

या संशयास्पद व्यवहाराच्या आधारावर ईडी मनी लाँड्रिंगची चौकशी करत आहे. CMRL आणि एक्सालॉजिक यांच्यातील या देयकाबाबत यापूर्वी आयकर विभागानेही प्रश्न उपस्थित केले होते. नंतर याच आधारावर ईडीने मनी लाँड्रिंगची चौकशी सुरू केली आहे.
यापूर्वी मंगळवारी केरळ उच्च न्यायालयाने CMRL ची याचिका फेटाळली होती. त्यानंतर एक दिवसाने ही कारवाई झाली आहे. कंपनीने ईडीची चौकशी रद्द करण्याची मागणी केली होती. ईडीने या प्रकरणात 2024 मध्ये गुन्हा दाखल केला होता.

CMRL नावाच्या कंपनीने 2018-19 दरम्यान विजयन यांची मुलगी टी. वीणा यांच्या एक्सालॉजिक सोल्युशन्स या आयटी कंपनीला 1.72 कोटी रुपये दिले. हा आरोप आहे की हे पैसे कोणतीही सॉफ्टवेअर किंवा आयटी सेवा न देता बनावट खर्च म्हणून दिले गेले. या खुलास्यानंतर ईडीने PMLA अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

ईडीने 2024 मध्ये आरोपांची चौकशी करण्यासाठी PMLA प्रकरण दाखल केले होते. हा मुद्दा विजयन सरकारच्या समोर राजकीयदृष्ट्या सर्वात संवेदनशील विवादांपैकी एक राहिला आहे. ईडीच्या तपासाव्यतिरिक्त, या प्रकरणाची चौकशी सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस (SFIO) देखील करत आहे.