Home Blog Page 33

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

अहिल्यानगर-माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते विजय चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन, माध्यम विभाग प्रमुख गोविंद येतयेकर आदी उपस्थित होते. श्री. तनपुरे हे 2019 मध्ये राहुरी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये श्री. तनपुरे राज्यमंत्री होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले, राहुरी मतदारसंघातील नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी मी माझ्या सहकाऱ्यांसोबत प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत चर्चा केली तेव्हा त्या विधानसभा मतदार संघातील तिन्ही तालूक्यातील अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. त्यांना जनतेच्या प्रश्नांची उत्तम जाण आहे. वर्षानुवर्षे समाजातील अनेक घटकांसोबत त्यांनी काम केले आहे. ज्या विश्वासाने श्री. तनपुरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. भाजपा संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील, अशी ग्वाहीही श्री. चव्हाण यांनी दिली .
यावेळी प्राजक्त तनपुरे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून या मतदारसंघातील वीज, शेती आणि पाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक होईल. पक्ष भविष्यात जी काही जबाबदारी सोपवेल ती उत्तमप्रकारे पार पाडेन.
यावेळी राहुरी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, अहिल्यानगर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, राहुरी उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, युवक तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर वाचकर, राहुरी तालुका युवक शहर अध्यक्ष संतोष आघाव, पाथर्डी उपाध्यक्ष जालिंदर वामन, अंबादास डमाळे, राहुरी पंचायत समिती माजी उपसभापती बाळासाहेब लटके, राहुरी पंचायत समिती माजी उपसभापती रवींद्र आढाव, किसनराव जवरे, प्रभाकर गाडे, नंदराज पाटील, अजय जाधव, गोरखनाथ पवार, महेश पानसरे, महेश उदावंत, ओंकार कासार, चंद्रकांत पानसंबळ, सोहम प्राजक्त तनपुरे, अनेक नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

रात्री दहा नंतर पब,बार देखील बंद ठेवा: आम आदमी पार्टी

पुणे:
जवळपास ऐंशी लाख लोकसंख्येच्या पुणे शहर व परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे.गुनहेगारी रोखण्यासाठी रात्री दहा नंतर पब,बार, रेस्टॉरंट हाँटेल बंद ठेवण्याचा निर्णय पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी घेतला आहे. या निर्णयास पुणे शहर आम आदमी पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे.

आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांच्या नेतृत्वाखाली महासचिव सुभाष करांडे, महासचिव सुनील सवदी, सागर झा, मिलिंद सरोदे, अविनाश भाकरे, उमेश दीक्षित, अनिकेत शिंदे, महिला आघाडीच्या ज्योती जोगदंड आणि मनोज ओझा यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची पोलीस मुख्यालयात भेट घेऊन त्यांना हा निर्णय कायमस्वरूपी लागु करण्यात यावा असे साकडे घातले..
आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले,
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी शहरात दोन आठवडे जमावबंदी जारी केली आहे.
याच बरोबर रात्री दहा नंतर सर्व पब, बार, रिसॉर्ट आदी बंद ठेवण्याची अमंलबजावणी सुरू केली. सिंहगड रोड,वारजे माळवाडी धायरी नऱ्हे, कात्रज आंबेगाव धनकवडी बिबवेवाडी हडपसर आदी ठिकाणी संघटित गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय आहेत. राजकीय वरदहस्तामुळे मध्यरात्री पासुन पहाटे पर्यंत गुन्हेगारी टोळ्या मद्यपान पार्टी करुन मुख्य रस्ते सोसायट्या लोकवस्त्यांत अशा सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालुन दहशत निर्माण करत आहेत. टोळी युध्दात अनेक गुन्हेगार ठार झाले आहेत त्यामुळे नागरिकांत प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे रात्री घरी परत जाणे तसेच घराबाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे रात्री दहा नंतर सर्व पब हाँटेल ,बार बंद ठेवण्याचा निर्णय समाजाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा आहे.
यावेळी मिरवणुकांमुळे निर्माण होणारे ट्राफिक जॅम, रुग्णवाहिकांना होणारा अडथळा, ध्वनीप्रदूषण तसेच महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास याबाबत पोलीस आयुक्तांना आम आदमी पक्षाच्या सविस्तर निवेदन देण्यात आले. नागरिकांच्या शांतता, सुरक्षितता आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

जनगणना कर्मचाऱ्यावर झालेली मारहाण म्हणजे शासन व्यवस्थेवर हल्ला – आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करा : आम आदमी पार्टी

पुणे : जनगणना कर्मचाऱ्यावर झालेली मारहाण म्हणजे शासन व्यवस्थेवर हल्ला असून आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई कराअशी मागणी आम आदमी पार्टीचे पुणे शहर महासचिव – सुभाष कारंडे तसेच निरंजन मधुकर अडागळे यांनी केली आहे.

त्यांनी म्हटले आहे कि ,’जनगणना करण्यासाठी अधिकृत शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यावर झालेली मारहाण ही केवळ एका व्यक्तीवरील हिंसा नसून संपूर्ण शासन व्यवस्थेवर केलेला भ्याड हल्ला आहे. कायद्याचा धाक संपला आहे का? असा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारत आहेत.
देशाच्या महत्त्वाच्या प्रशासकीय प्रक्रियेसाठी घराघरात जाऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, धमकावणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करणे हा गंभीर आणि अक्षम्य गुन्हा आहे. अशा प्रवृत्तींना राजकीय किंवा स्थानिक दबावाखाली संरक्षण मिळत असेल तर ते आणखी धोकादायक आहे.
आम आदमी पार्टीच्या वतीने संबंधित आरोपींवर कठोर कलमान्वये तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणातील पोलिस व प्रशासनाच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे.
जर शासकीय कर्मचारीच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची हमी कोण देणार? प्रशासनाने या घटनेकडे हलक्यात पाहू नये. दोषींना त्वरित अटक झाली पाहिजे

१३ जण सस्पेंड ,६४५ लिटर मिथेनॉल मिश्रीत गावठी दारु जप्त-राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

पुणे-दापोडी व हडपसर येथे घडलेल्या घटनेची वस्तुस्थिती व त्याअनुषंगाने केलेली उपाययोजना याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने मैती प्रसारी केली असून यात म्हटले आहे की,’
दि. २६/०५/२०२६ ते २८/०५/२०२६ दरम्यान संजयनगर, फुगेवाडी, दापोडी येथील काही व्यक्तींना विषबाधेसदृश लक्षणांमुळे विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी ०५ व्यक्तींचा मृत्यू झाला. माहिती प्राप्त होताच राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ अधिकाऱ्यांची पथके रुग्णालये व घटनास्थळी पाठवून माहिती संकलन व तपासाची कार्यवाही सुरू केली.
दापोडी पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. ११४/२०२६ दाखल करण्यात आला असून तपासादरम्यान कर्नल सिंग बिरका व गुरुमंगतसिंग बिरका यांना अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात मिथेनॉल मिश्रित गावठी दारू सेवनामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
हडपसर येथील पांढरेमळा परिसरातही अशाच प्रकारच्या घटनेत ०४ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली असून दोन्ही घटना परस्पर संबंधित असल्याचे तपासात दिसून आले.
तपासादरम्यान योगेश व्हानकडे उर्फ सिकंदर राठोड याने संबंधित आरोपींना प्रथमदर्शनी मिथेनॉल मिश्रीत विषारी गावठी दारूचा पुरवठा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पोलीस विभागाच्या स्वाधीन केले. तसेच चौकशीत राधेश्याम उर्फ राजू प्रजापती याच्याकडून गावठी दारूचा पुरवठा होत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यालाही पोलीस विभागाच्या ताब्यात देण्यात आले.
मुख्य सुत्रधार योगेश व्हानकडे याच्या चौकशीतून प्रथमदर्शनी मिथेनॉल मिश्रीत गावठी दारु वितरीत झालेल्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाद्वारे दि.२९/०५/२०२६ रोजी मध्यरात्री तात्काळ कारवाई करुन आकाश जाधव, पांढरेमळा, हडपसर याचेकडून ७० लि, इरफान कुरेशी, पवार वस्ती, दापोडी याचेकडून १५५ लि व आर्यन धोत्रे, वडारवाडी, गोखलेनगर याचेकडून ४२० लि. असा एकूण ६४५ लिटर प्रथमदर्शनी मिथेनॉल मिश्रीत गावठी दारु जप्त करण्यात आली असून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपो योगेश व्हानकडे विरुद्ध ०३, आकाश जाधव विरुद्ध ०४, कर्नेल सिंग विरका विरुद्ध ०१ व राधेश्याम प्रजापती विरुद्ध ०४ असे गुन्हे नोंद आहेत तसेच त्यांच्या विरुध्द प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव सक्षम प्राधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे.
संबंधित घटनेच्या पार्श्वभूमीवर कार्यक्षेत्रीय एकुण ९ अधिकारी व ४ कर्मचाऱ्यांना मा. आयुक्त यांच्या आदेशानुसार तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाद्वारे नियमितपणे विशेष मोहिमा राबवून सन २०२५-२०२६ या वर्षामध्ये एकुण ६४६२ इतके गुन्हे नोंद केले असून त्यामध्ये एकुण रु. २९.७४ कोटी इतका मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच एकुण ५ हातभट्टी व्यवसाय करणाऱ्या आरोपींविरुध्द एम.पी.डी.ए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे. घटनेच्या गांभीर्यता लक्षात घेता अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी व्यापक तपास व प्रतिबंधात्मक कारवाई सुरू असुन कार्यक्षेत्रामधील सर्व अधिकारी यांना सतर्क राहुन हातभट्टी निर्मिती, वाहतुक व बिक्री विरुध्द विशेष मोहिम राबवून संबंधितांबर कठोर कारवाई करण्यात येत आहे.

हे दुर्घटनेचे बळी नाहीत ओ ..हे तर सरकार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेले सामूहिक खून

पुणे-हे दुर्घटनेचे बळी नाहीत ओ ..हे तर सरकार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेले सामूहिक खून आहेत असा आरोप महापालिकेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते ॲड रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी केला आहे.

ते म्हणाले,’फुगेवाडीमध्ये घडलेली विषारी दारूची घटना ही केवळ दुर्घटना नाही, तर सरकार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेला सामूहिक खून आहे. पुण्यासारख्या शहरात महसूल विभाग, पोलीस यंत्रणा आणि उत्पादन शुल्क विभाग यांच्या नाकावर टिच्चून विषारी दारूची विक्री सुरू असते, लोक खुलेआम मृत्यूच्या दारात ढकलले जातात, आणि तरीही प्रशासनाला त्याचा मागमूस लागत नाही, ही बाब अत्यंत संतापजनक आहे. फुगेवाडीतील अनेक कुटुंबांनी आपल्या घरातील कमावते सदस्य गमावले, अनेक मुलांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले, अनेक संसार एका रात्रीत उद्ध्वस्त झाले. तरीही प्रत्येक वेळी चौकशी, कारवाई आणि निलंबनाचीच भाषा केली जाते; पण अशा अवैध धंद्यांना संरक्षण कोण देतं, हा खरा प्रश्न आहे.

आज महाराष्ट्रात विषारी दारू, ड्रग्ज, बेटिंग आणि गुन्हेगारी यांचे जाळे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सामान्य नागरिक वारंवार आवाज उठवत आहेत, पण राज्यकर्त्यांना त्याची गंभीरता जाणवत नाही. कारण सत्ताधारी पक्षाला जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा जाती-धर्माचे राजकारण करण्यात अधिक रस आहे. बेरोजगारी, व्यसनाधीनता, गुन्हेगारी आणि तरुणांचे उद्ध्वस्त होत चाललेले भविष्य यावर बोलण्याऐवजी समाजाला वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरुणांना नशेच्या आहारी जाऊ द्या, जनता प्रश्न विचारणार नाही, सरकारला जाब विचारणार नाही, अशीच व्यवस्था निर्माण केली जात आहे का, असा प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.

फुगेवाडीतील मृत्यूंना फक्त विषारी दारू विकणारे गुन्हेगार जबाबदार नाहीत, तर त्यांना मोकळे रान देणारी संपूर्ण व्यवस्था जबाबदार आहे. जर प्रशासन वेळेवर जागे झाले असते, अवैध दारू अड्ड्यांवर कठोर कारवाई झाली असती, संबंधित अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले असते, तर आज अनेक निष्पाप लोक जिवंत असते. त्यामुळे या प्रकरणात केवळ खालच्या स्तरावरील आरोपींना अटक करून चालणार नाही, तर या संपूर्ण रॅकेटला संरक्षण देणारे आणि दुर्लक्ष करणारे अधिकारी व जबाबदार लोकप्रतिनिधी यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे. फुगेवाडीतील प्रत्येक मृत्यू हा प्रशासनाच्या अपयशाचा पुरावा आहे आणि या निष्पाप जीवांच्या मृत्यूचा हिशोब सरकारला द्यावाच लागेल.

मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन

मुंबई

येत्या ७ जून २०२६ रोजी गझल मंथन साहित्य संस्थेद्वारा आयोजित ‘पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन’ संपन्न होणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध युवा गझलकार गोपाल मापारी यांची तर स्वागताध्यक्ष म्हणून युवा गझलकार चेतन पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. युवा गझलकार विशाल मोहिते यांना संस्थेचा ‘युवा गझलकार – २०२६’ हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
या संमेलनाचे उद्घाटक म्हणून युवा गझलकार स्वप्नील शेवडे उपस्थित राहणार असून गझलनवाज भीमराव पांचाळे यांना ‘गझल मंथन जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीपाद जोशी तर प्रमुख उपस्थिती म्हणून सुधीर महाजन, रवींद्र यशवंतराव (देशमुख) , डॉ. गिरीश इंगळे, प्रा. हेमंत सुधाकर सामंत उपस्थित राहणार आहेत.


गझल मंथन साहित्य संस्थेने खास युवा गझलकारांसाठी युवा स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील सहभागींच्या गझलयात्री संग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार असून या स्पर्धेतील विजेत्यांना संमेलनात सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, गझलयात्री संग्रह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.
संमेलनात ज्येष्ठ गझलकारांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच चर्चासत्र आणि पाच दर्जेदार मुशायरे संपन्न होणार असून संमेलनाचे आयोजन संस्थेच्या मुंबई कार्यकारिणी आणि परिवर्तन फाऊंडेशन, मुंबईद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे मार्गदर्शक डॉ. शिवाजी काळे, डॉ. स्नेहल कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, महाराष्ट्र समन्वयक प्रणाली म्हात्रे आणि मुंबई कार्यकारिणी अध्यक्षा योगिता तकतराव यांनी दिली आहे.

राम गणेश गडकरी आणि दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्यांची पुनर्स्थापना करा- खर्डेकर

पुणे- श्रेष्ठ नाटककार राम गणेश गडकरी व गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्यांची पुनर्स्थापना करावी अशी जोरदार मागणी आता होऊ लागली आहे .संदीप खर्डेकर,भालचंद्र कुलकर्णी,ॲड. सौ. ईशानी जोशी,विश्वजीत देशपांडे यांनी त्यासाठी महापौर मंजुश्री नागपुरे यांना साकडे घातले आहे.
खर्डेकर म्हणाले कि,’ महापालिकेच्या छत्रपती संभाजी उद्यानात (जंगली महाराज रोडवरील) नुकतेच छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे राज्याचे मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, याबद्दल सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने आपले मनापासून अभिनंदन करीत आहोत. शंभूराजांचा तेजस्वी पुतळा तितक्याच सुशोभनीय पध्दतीने बसवण्यात आला आहे, याचा आम्हा सर्वांना अत्यंत आनंद आहे.
काही समाजकंटकांच्या चिथावणीखोर वक्त्यव्यांमुळे तसेच सामाजिक सौहार्दता टिकवण्यासाठी काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजी उद्यानातील श्रेष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा काढून टाकण्यात आला आहे. श्रेष्ठ लेखक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आचार्य प्र. के. अत्रे यांनी हा पुतळा संभाजी उद्यानात बसवला होता. त्यामुळे सदरच्या राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची सुयोग्य ठिकाणी सन्मानाने पुनर्स्थापना करावी अशी आमची मागणी आहे.


त्याचबरोबर काही वर्षांपूर्वी लाल महालात असलेल्या गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांचा पुतळा देखील सामाजिक असंतोषामुळे काढून टाकला होता व सद्यस्थितीत हा पुतळा सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात वाईट अवस्थेत पडून आहे. सदरचा पुतळा देखील पुणे शहरात सुयोग्य ठिकाणी पुन्हा सन्मानाने बसवण्यात यावा अशी आमची सर्वांची एकमुखी मागणी आहे.
आम्ही खालील सह्या करणारे सकल ब्राह्मण समाज (पुणे शहर) पदाधिकारी म्हणून प्रातिनिधीक सह्या करीत आहोत. पुणे शहरातील सुमारे ३५ ब्राह्मण संस्था / संघटना या सकल ब्राह्मण समाज संघटनेच्या सदस्य आहेत. पुणे शहरातील सर्वच समाजातील महापुरुषांच्या जयंती / पुण्यातिथीनिमित्ताने संबंधित पुतळ्यांबाबत पुणे महापालिका सन्मानाने यथोचित कार्यक्रम करीत असते, अशा वेळी वरील नमूद दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांचा सन्मान राखून त्यांची सुयोग्य ठिकाणी पुनर्स्थापना करावी व सन्मान राखला जावा, अशी आमची आग्रहाची मागणी व विनंती आहे.

महाराष्ट्राचा गृहविभाग ‘पांडू हवालदार’ चालवतो म्हणूनच राज्यात अवैध धंदे, ड्रग्ज, विषारी दारुचे थैमान: हर्षवर्धन सपकाळ

0

राज्यातील कायदा सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती पाहता देवेंद्र फडणविसांनी प्रायश्चित घ्यावे; पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा.

मुंबई, दि. ३० मे २०२६..

महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली असून खालच्या स्तरापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत हप्ते पोहचवले जात आहेत. हप्ता वसुलीमुळे पोलीस प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही म्हणूनच राज्यात ड्रग्जचा खुलेआम काळाधंदा सुरु आहे, गांजा विकला जातो, हातभट्ट्या व विषारी दारुने थैमान घातले आहे. या अवैध धंद्यातूनच पुण्यात विषारी दारुने २२ निष्पाप लोकांचे बळी घेतले आहेत. राज्याचा गृहविभाग ‘पांडू हवालदार’ चालवत असल्यामुळेच सगळीकडे बेबंदशाही माजली आहे, असा घणाघाती आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी याचे प्रायश्चित घेऊन राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, पुण्यात विषारी दारुने २२ जणांचा बळी घेतल्यानंतर सरकारला जाग आली असून हातभट्या तोडण्याची कारवाई केली जात आहे. या हातभट्ट्या काही रात्रीतून उभ्या राहिलेल्या नाहीत. राज्यात ५०० शहरे व ४३ हजार गावखेडी आहेत, या ठिकाणी अवैध धंदे व हातभट्या राजरोस सुरु आहेत. गुजरातचे महाराष्ट्रात येणारे ड्रग्ज, जामतारा सारखे प्रकरण व अवैध धंद्याचे रॅकेट राजरोस सुरु असून त्याला गृहविभागाचा आशिर्वाद आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रिद वाक्यच बदलले आहे. पुण्यातील प्रकरणाने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात असल्याने स्वतःची अब्रु वाचवण्यासाठी आता कारवाईचे नाटक केले जात आहे.

चोर सोडून संन्याशाला फाशी…
गृहविभागाची चिरफाड करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्यात एक मुलगी बेपत्ता झाली, त्यानंतर पोलिसांना एक मृतदेह सापडला हा मृतदेह त्याच मुलीचा आहे हे समजून बेपत्ता मुलीच्या वडील व भावाला पोलिसांनी अटक करून बेदम मारहाण केली, त्यांच्याकडून कबुलीजबाब घेतला व आपण ४८ तासात प्रकरणाचा छ़डा लावला याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतली पण त्यानंतर ती बेपत्ती मुलगी समोर आली. पोलिसांनी कशाचीही शहानिशा न करता हे प्रकरण हाताळले, हा सर्व प्रकार चोर सोडून सन्याशाला फाशी असा आहे. महाराष्ट्रात पोलीस विभागाचे काम असेच चालत आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण..
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मराठा आंदोलनावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील वाशी येथे मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांना आरक्षण दिल्याचे जाहीर केले व गुलाल उधळला होता, त्यानंतर आझाद मैदानातील आंदोलनावेळीही गुलाल उधळला, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या दोन्ही आंदोलनावेळी मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिले होते ते जाहीर करावे. आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर जातनिहाय जनगणना करावी त्यातून मराठा समाजासह सर्वच समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, असेही सपकाळ म्हणाले..

पुणे-पिंपरी दारूकांडाचे धक्कादायक सत्य समोर:एकूण मृतांची संख्या 22 वर पोहोचली; ऑनलाईन मागवलेल्या मिथेनॉलने कुटुंबे उद्ध्वस्त

0

पुणे-पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या विषारी दारू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.विषारी दारूकांडात मृतांचा आकडा आणखी वाढला असून आता एकूण मृतांची संख्या 22 वर पोहोचली आहे. उरळी कांचन येथील 32 वर्षीय रिक्षाचालक उमेश अवचर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी त्याने दारू सेवन केल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूपूर्वी उमेश अवचर याला दृष्टी कमी होणे, मळमळ, उच्च रक्तदाबाचा त्रास आणि तोंडातून फेस येणे अशी लक्षणे दिसून आली होती. विशेष म्हणजे आरोपी राधेश्याम प्रजापती ज्या परिसरात अवैध दारू तयार करत होता, त्याच भागातील दारूच्या अड्ड्यावरून उमेशने दारू घेतल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे विषारी दारूचे संकट आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडनंतर उरळी कांचनपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणातील तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. अधिक नफा मिळवण्यासाठी आरोपी योगेश वानखेडे याने दारूमध्ये मिथेनॉल हे घातक रसायन मिसळल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. उरळी कांचन परिसरातील राधेश्याम प्रजापती याच्याकडून योगेश वानखेडे 35 लिटरचा एक कॅन सुमारे 1900 रुपयांना खरेदी करत होता. त्यानंतर ही दारू पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध अवैध अड्ड्यांवर सुमारे 2700 रुपये प्रति कॅन दराने विकली जात होती. मात्र अधिक नफा कमावण्यासाठी त्याने ऑनलाईन मागवलेले मिथेनॉल दारूमध्ये मिसळून त्याचे प्रमाण वाढवले. याच घातक मिश्रणामुळे अनेक नागरिकांचा जीव गेल्याचे समोर आले आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) वर्ग केला आहे. पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करत अवैध दारूच्या नेटवर्कचा शोध सुरू केला आहे. पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड या भागांमध्ये पसरलेल्या संपूर्ण साखळीचा तपास सुरू असून दारू तयार करणारे, पुरवठा करणारे आणि विक्री करणारे सर्व संबंधित आरोपी तपासाच्या रडारवर आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी 4 आरोपींना 8 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या दुर्घटनेनंतर पोलिस प्रशासनानेही कठोर भूमिका घेतली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दापोडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय वाघमारे यांना निलंबित केले आहे. तपास पथकाच्या प्रमुखांसह आणखी 4 अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. दुसरीकडे पुणे शहरात हडपसर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले, सहाय्यक पोलिस निरीक्षक सिकलगर आणि पोलिस उपनिरीक्षक मुलानी यांनाही निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तांशी चर्चा करून संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे आदेश दिले आहेत. विषारी दारू कुठे तयार झाली, त्यामागे कोणते लोक आहेत आणि संपूर्ण साखळी कशी कार्यरत होती याचा शोध घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. आतापर्यंत अनेक आरोपींना अटक झाली असली तरी आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता तपासली जात आहे. गंभीर रुग्णांना वाचवण्यासाठी वैद्यकीय प्रयत्न सुरू असून या मृत्यूकांडातील प्रत्येक दोषीवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेला एक प्रकारची हत्या, असल्याचे म्हटले आहे.

अवैध दारूवर कारवाईसोबत व्यसनमुक्तीबाबत जनजागृती होणे आवश्यक – शिवसेना नेत्या, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे

0

पुणे.दि.३०: हडपसरमधील पांढरे मळा परिसरात घडलेल्या विषारी दारू प्रकरणातील मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत मिळावी, तसेच अशा घटना रोखण्यासाठी केवळ दारूबंदी नव्हे तर व्यसनमुक्तीच्या दिशेने ठोस पावले उचलणे अधिक गरजेचे असल्याचे मत शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

डॉ. गोऱ्हे यांनी आज घटनाग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार राहुल क्षीरसागर, अरुण डाडर, अशोक चव्हाण आणि विजय शर्मा यांच्या कुटुंबीयांना शिवसेना पक्ष व डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावतीने रोख व धनादेश स्वरूपात आर्थिक मदतही देण्यात आली. याप्रसंगी, नाना भानगिरे, मारुती आबा तुपे, दत्ता खवले, संदीप शिंदे, मोहित काकडे, मयुरी बामणे, निशा थोरात यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, मृत व्यक्तींचे कुटुंबीय बहुतांश असंघटित क्षेत्रातील असल्याने प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी, तसेच ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या योजनांचा तातडीने लाभ मिळावा, कुटुंबातील इतर सदस्यांना स्वावलंबी करण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच रुग्णालयाकडून झालेल्या कथित दिरंगाईची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई व्हावी, असेही त्यांनी म्हटले. “रुग्णाला तातडीने उपचार मिळण्याऐवजी आर्थिक बाबींना प्राधान्य दिले गेले. त्यामुळे काही रुग्णांना वेळेत मदत मिळू शकली नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पुणे महापालिकेनेही मृतांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान द्यावे, अशी सूचना आपण महापौर मंजुषा नागपुरे यांना दूरध्वनीवरून केली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारही या प्रकरणात संवेदनशील असून योग्य ती मदत केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, भरवस्तीत अवैध दारू सहज उपलब्ध असणे ही गंभीर बाब असल्याचे नमूद करत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “केवळ पोलिसांचे निलंबन करून प्रश्न सुटणार नाही. या प्रकरणात सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. स्वस्त दारूच्या मोहापोटी नागरिक अशा हातभट्ट्यांकडे वळतात. त्यामध्ये घातक रसायने मिसळली जात असल्याने जीवितहानी होते. त्यामुळे अवैध दारूविक्री रोखण्याबरोबरच व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.”

“जे लोक अशा हातभट्ट्यांवर जातात त्यांनीही आपल्या कुटुंबाचा विचार करणे गरजेचे आहे. दारूबंदीपेक्षा व्यसनमुक्तीचा मार्ग समाजासाठी अधिक परिणामकारक ठरू शकतो,” असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

चंद्रकांतदादांनी कोथरुडमध्ये भरवली बालकलाकारांची ‘शाळा’

0

चंद्रकांतदादांनी कोथरुडमध्ये भरवली बालकलाकारांची ‘शाळा’

चिमुकलीच्या अभिनयाला दिली मनमुराद दाद!

पुणे: नेहमी राजकीय घडामोडी आणि शासकीय बैठकांमध्ये व्यस्त असणारे नेते जेव्हा अचानक लहान मुलांच्या विश्वात रमून जातात, तेव्हा अवतीभवतीचा माहोल आनंदाने प्रफुल्लित होतो. असाच एक सुंदर आणि भावनिक क्षण आज कोथरुडमधील महेश विद्यालयात पाहायला मिळाला. निमित्त होते, ‘नाट्यतीर्थ फाऊंडेशन’ संस्थेच्या समर कॅम्पला राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेल्या सदिच्छा भेटीचे.

या कॅम्पमध्ये प्रवेश करताच चंद्रकांतदादांनी मंत्रिपदाचा प्रोटोकॉल बाजूला ठेवला आणि थेट मुलांमध्ये जाऊन बसले. क्षणार्धात ते एका शिक्षकाच्या भूमिकेत शिरले आणि त्यांनी बालकलाकारांची एक छानशी ‘शाळा’च भरवली. “तुला काय व्हायचंय?”, “तुझा आवडता छंद कोणता?” असे आपुलकीचे प्रश्न विचारत दादांनी प्रत्येक मुलाची आवड-निवड जाणून घेतली. मोठ्या नेत्याला इतक्या जवळून आणि हसून बोलताना पाहून सुरुवातीला बुजलेली मुलेही काही वेळातच दादांशी अगदी मित्रासारखी गप्पा मारू लागली.

या गप्पांच्या फडात शिवन्या बुचके ह्या बालकलाकाराने ‘आई’वर आपली एक नाट्यकृती सादर केली. त्याचा तो निरागस अभिनय, चेहऱ्यावरील हावभाव आणि संवादफेक इतकी अप्रतिम होती की, तिथे उपस्थित असलेले सर्वजण मंत्रमुग्ध झाले. स्वतः चंद्रकांतदादाही त्या चिमुकलीचा अभिनय पाहून भारावून गेले. त्यांनी केवळ टाळ्याच वाजवल्या नाहीत, तर त्या चिमुरडीला कॅडबरी आणि पाठीवर कौतुकाची थाप देऊन मनमुराद दाद दिली. एका मोठ्या नेत्याकडून मिळालेली ही दाद त्या चिमुकला बालकलाकाराचा आत्मविश्वास वाढवणारी ठरेल, यात शंका नाही.

उन्हाळ्याच्या सुट्टीत मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहून अभिनयाचे धडे गिरवणाऱ्या या मुलांचे आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना व्यासपीठ देणाऱ्या ‘नाट्यतीर्थ फाऊंडेशन’ संस्थेचे चंद्रकांतदादांनी मनापासून कौतुक केले. राजकारणाच्या धावपळीतून वेळ काढत दादांनी मुलांसोबत अनुभवलेले हे निखळ आणि आनंदाचे क्षण पाहणाऱ्यांच्या मनाला नक्कीच स्पर्श करून गेले.

जनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे-जिल्हाधिकारी

पुणे, दि.२९: ‘जनगणना २०२७’ अंतर्गत स्व-गणना पूर्ण केलेल्या नागरिकांनी त्यांना प्राप्त झालेला स्व-गणना ओळखक्रमांक (एसई आयडी) प्रगणकांस देण्यात यावा तसेच ‘घरसुचीकरण व घरांची गणना’ प्रक्रिया विहीत वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकांद्वारे विचारण्यात येणारी माहिती वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यात प्रगणकाद्वारे १६ मे पासून ‘घरसुचीकरण व घरांची गणना’ करण्यात येत आहे, यामध्ये नागरिकांनी १ ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेत भरलेली माहितीची पडताळणी करुन अंतिम मान्यता देण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. नागरिकांनी एसईआयडी उपलब्ध करून दिल्यानंतरच ‘घरयादी आणि गृहगणना’ प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ज्यांनी स्व-गणना केलेली नाही, अशाची देखील गणना करुन ते अंतीम करण्याचे काम काम १४ जून २०२६ पर्यंत सुरु राहणार आहे.

जनगणना कायदा १९४८ च्या तरतुदींनुसार राबवला जाणारा अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम आहे. प्रभावी धोरण निर्मितीला पूरक ठरणारा आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात योगदान देणारा विश्वसनीय माहितीचा संग्रह (डेटा) निर्माण करण्यासाठी सक्रिय लोकसहभाग आवश्यक आहे, असेही श्री. पाटील यांनी केले आहे.

बारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिक

0

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे केले अभिनंदन

पुणे, दि. २९: “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात बारामती बसस्थानकाने “अ” वर्गामध्ये ९७ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावून १ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. याबद्दल राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आगारातील चालक, वाहक, यांत्रिक, प्रशासकीय व पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.

राज्य परिवहन महामंडळात प्रवाशांना स्वच्छ, सुंदर बसस्थानके उपलब्ध व्हावीत व प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्याच्या हेतूने या अभियानाची २३ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत महामंडळातील सर्व बसस्थानकावर अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान स्पर्धात्मक असून उत्कृष्ट बसस्थनाकांना रोख रक्क्म देवून गौरविण्यात येते. बसस्थानकाच्या कामगिरीवर आधारित सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये बारामती बसस्थानकाला प्रथक क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ” स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत प्रत्येक स्तरावरील तपासणी समित्यांनी त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील बसस्थानकाची तपासणी कधी व किती कालावधीत केली याची नोंद बसस्थानकाच्या स्वच्छता अभियान नोंदवहीत करण्यात येते. तपासणी समितीच्या प्रत्येक सदस्याने काटेकोर तपासणी करुन मूल्यांकन निःपक्षपातीपणे करण्याच्या सूचना दिल्या जातात. प्रत्येक स्तरावरील समितीने दिलेला निर्णय हा अंतिम असतो.
प्रत्येक स्तरावरील तपासणी समितीने त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रामध्ये तपासणीअंती गुणपत्रिका तयार करुन त्यावर सदस्यांची स्वाक्षरी केली जाते. जर दोन किंवा त्यापेक्षा जास्त बसस्थानकांना समसमान गुण प्राप्त झाले तर अशा वेळी ज्या बसस्थानकावरील बस फेऱ्यांची संख्या जास्त असेल त्या बसस्थानकाला वरचा क्रमांक देण्यात येतो. नव्या स्वच्छता अभियानामध्ये मागील स्वच्छता अभियानामध्ये केलेल्या कामगिरीची योग्य दखल घेतली घेण्यात येते. परंतु, नव्या संकल्पना किंवा इतर नावीन्यपूर्ण योजना (ज्या पुर्वी वापरलेल्या नाहीत) या अभियानामध्ये अपेक्षित असल्यामुळे त्या संकल्पना व नावीन्यपूर्ण योजनांचा गुण क्रमांक देण्यासाठी विचार करण्यात येतो.

राज्य रिंग टेनिस संघटनेच्या अध्यक्षपदी मोहन जोशी: महासचिवपदी अनिल वर्षे यांची फेरनिवड

0

पुणे : टेनीकॉईट (रिंग टेनिस) असोसिएशन, महाराष्ट्र या संघटनेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी माजी आमदार मोहन जोशी आणि महासचिवपदी अनिल वरपे यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली.

संघटनेची सर्वसाधारण सभा नुकतीच पुण्यात झाली. या सभेत अध्यक्ष, महासचिव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकारीणी निवडण्यात आली.

त्यात कार्याध्यक्ष – सौ.राजश्री हेमंत पाटील (नांदेड), वरीष्ठ उपाध्यक्ष प्रा.डॉ.अभिजीत वर्णिले (कोल्हापूर), खजिनदार – ॲड.बांडेबुचे (भंडारा), उपाध्यक्ष – संजय शिंदे (वाशिम), बिभीषण पाटील (धाराशिव), सहसचिव – शरद वाबळे (मुंबई उपनगर), प्रा.डॉ. मयुर ठाकरे (नंदुरबार), डॉ.संदीप जगताप (छत्रपती संभाजीनगर), सहखजिनदार – चंद्रकांत पिंपळे (पुणे), कार्यकारीणी सदस्य: अशोक ठोकळ (अकोला), पी.जे.चांद (जालना), स्नेहा खोंड (नागपूर), प्रा.बाबासाहेब गायकवाड (अहिल्या नगर) यांचा समावेश आहे.

टेनीकॉईट फेडरेशन ऑफ इंडिया चे जनरल सेक्रेटरी एम.आर.दिनेश कुमार (पॉंडेचेरी) सभेत निरीक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांनी नूतन पदाधिकारी आणि कार्यकारीणीला शुभेच्छा दिल्या. या सभेत टेनीकॉईट (रिंग टेनिस) खेळाचा वार्षिक कार्यक्रम ठरविण्यात आला.

रिंग टेनिस हा खेळ गावपातळीपर्यंत पोहोचविण्याचा आणि या खेळातील खेळाडुंच्या भवितव्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा मनोदय माजी आमदार मोहन जोशी यांनी व्यक्त केला.

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लवकरच सहाय्यता कक्ष : डॉ. नीलम गोऱ्हे

0

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने डॉ गोऱ्हे यांची घेतली भेट

पुणे.दि.२८: स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत आज महेश बडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची सिल्व्हर रॉक्स निवासस्थानी भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.

शिष्टमंडळाने स्पर्धा परीक्षा वेळेत घेण्यात याव्यात, आयोग आणि विद्यार्थ्यांमध्ये नियमित संवाद व्हावा, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तात्काळ निर्णय घेऊन न्याय मिळावा, अशी मागणी केली. तसेच सारथी, बार्टी यांसारख्या शासनाच्या अखत्यारीतील संस्थांना मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर व्हावा आणि स्पर्धा परीक्षांसाठी नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधण्यासाठी आठवड्यातून एकदा स्वतंत्र कार्यालयात भेटीचे आयोजन करण्यात यावे, अशी विनंतीही शिष्टमंडळाने डॉ. गोऱ्हे यांच्याकडे केली.

यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आयोगाने वेळोवेळी काढलेल्या शासन निर्णयांमध्ये कोणते बदल आवश्यक आहेत, याबाबत अभ्यास करून त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. तसेच स्पर्धा परीक्षा संदर्भातील न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची यादी तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेतर्फे पुण्यात सहाय्यता कक्ष सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, या कक्षामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या माजी विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येईल. हा कक्ष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी स्वमदत गटाच्या स्वरूपात कार्य करेल. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

तसेच, आयोगाचा कारभार ठरलेल्या वेळेनुसार पार पडावा, विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक निर्णय व्हावेत यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

ज्या प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, त्या विषयांवर शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.