पुणे : ‘शीतयुद्धाच्या काळात जग अमेरिका आणि सेवियत युनियन या दोन देशात विभागलेले असताना स्वतंत्र परराष्ट्र धोरण आखून पं. जवाहरलाल नेहरूंनी तिसरी शक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नेहरूंचा जगात नैतिक दबदबा होता,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी बुधवारी केले. ‘आजचा भारत हतबल झाला आहे. सध्याचे परराष्ट्र धोरण फसले असून मालदीवसारखा छोटा देशही आपले ऐकत नाही,’ अशी टीका त्यांनी केली.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या वतीने देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘नेहरू प्रणित भारताच्या विकासाचे प्रतिमान आणि त्याची प्रसंगिकता’ या विषयावर डॉ. मुणगेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ॲड. शंकर निकम लिखित ‘भारताचा कोहिनूर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेचे महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त सचिव अन्वर राजन, विश्वस्त डॉ. शिवाजीराव कदम, लक्ष्मीकांत देशमुख, एम.एस. जाधव, रमेश आढाव उपस्थित होते. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत अध्यक्षस्थानी होते.
मुणगेकर म्हणाले, ‘भारताला कोणत्या दिशेने पुढे न्यायचे, हे समजलेला एकमेव नेता नेहरू होते. राम मनोहर लोहियांमुळे काँग्रेस व नेहरूविरोधी दृष्टी तयार झाली होती. मात्र, संसदीय लोकशाही, आर्थिक नियोजन, धर्मनिरपेक्षता आणि परराष्ट्र धोरण ही नेहरूंची वैशिष्ट्ये आहेत. नेहरूंना लोकशाही समाजवाद आणायचा होता, अनेक अर्थतज्ज्ञांना वाटते. मात्र, त्यांना कल्याणकारी राज्य आणायचे होते. देशातील लोकांना एकत्र ठेवण्याची ताकद राज्य घटनेत आहे. पं. नेहरू, सरदार पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राज्य घटनेसाठी मोठे योगदान आहे. नेहरूंवर रशियन राज्यक्रांतीचा प्रभाव होता. भांडवलशाही अर्थव्यवस्था शोषण करणारी व्यवस्था आहे, असे त्यांचे मत होते. नेहरू राजकारणी झाले नसते तर ते तत्त्ववेत्ते किंवा इतिहासकार झाले असते. नेहरू आणि आइन्स्टाइन यांच्यात चर्चा होत असे. त्यावरून त्यांचा व्यासंग लक्षात येतो. नेहरूंचा प्रत्येक धर्मातील धर्मांधतेला विरोध होता. नेहरू सर्व मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहायचे. विचारांची आदानप्रदान होत होती. नेहरूंनी देशात ११७ संस्था उभ्या केल्या. देशाची बांधणी या संस्थांवर झाली आहे.’
‘नेहरूमुक्त भारत करण्यासाठी मोदी सरकारने नियोजन आयोग बरखास्त केला आहे. इराण आणि इस्रायल युद्धात पाकिस्तान मध्यस्थी करतो आणि आपण अगतिकपणे पाहत बसतो, हे भूषणावह नाही,’ अशी टीका मुणगेकर यांनी केली.
सावंत म्हणाले, ‘मागच्या पिढीने लोहियावादी होऊन चूक केली तशी आजची पिढी सोशल मीडियातून नेहरूंबद्दल तीच चूक करीत आहे. नेहरूंनी दहा वर्षे तुरुंगात काढली. नेहरूंनी संसदेची प्रतिष्ठा जपली. सध्याच्या पिढीला नेहरू समजून सांगितले पाहिजे. भारत कसा असावा, याचे उदाहरण नेहरू आहेत. जगात आपली ओळख कट्टर हिंदू होणे परवडणारे नाही. जगातील आपली ओळख बदलत असून भारतीयांकडे संशयाने बघितले जात आहे.’ अन्वर राजन यांनी प्रास्ताविक केले. सूरज कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. तेजस भालेराव यांनी आभार मानले.

