12 हजार कोटींच्या ऑर्डर बुकसह बाजारात उतरणार; ऊर्जा, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील मजबूत उपस्थिती
मुंबई | प्रतिनिधी
तंत्रज्ञानाधारित उत्पादन (Manufacturing) प्लॅटफॉर्म म्हणून वेगाने नावारूपाला आलेल्या झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस लिमिटेडला प्रस्तावित प्राथमिक समभाग विक्री (IPO) साठी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) कडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे कंपनी लवकरच भांडवली बाजारात प्रवेश करणार आहे.
कंपनीच्या आयपीओमध्ये नवीन समभागांचा (Fresh Issue) तसेच विद्यमान गुंतवणूकदारांकडून ऑफर फॉर सेल (OFS) चा समावेश असण्याची शक्यता आहे. झेटवर्कमध्ये Khosla Ventures, Baillie Gifford, राकेश गंगवाल, Accel, Peak XV, GreenOak आणि Lightspeed यांसारख्या नामांकित गुंतवणूकदारांचा सहभाग आहे.
२०१८ मध्ये अमृत आचार्य आणि श्रीनाथ रामकृष्णन यांनी स्थापन केलेली झेटवर्क ही कंपनी तंत्रज्ञानाच्या मदतीने औद्योगिक ग्राहक आणि उत्पादन करणाऱ्या पुरवठादारांना एकाच प्लॅटफॉर्मवर जोडते. कंपनीचे कार्यक्षेत्र ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण, एरोस्पेस आणि कॅपिटल गुड्स या क्षेत्रांमध्ये विस्तारलेले आहे.
झेटवर्कची ‘Zetwerk OS’ ही स्वतःची सॉफ्टवेअर प्रणाली सोर्सिंग, उत्पादन नियोजन, पुरवठादार समन्वय आणि प्रकल्प अंमलबजावणीचे व्यवस्थापन करते. कंपनीकडे स्वतःच्या उत्पादन सुविधा असून, जागतिक स्तरावरील विस्तृत थर्ड-पार्टी पुरवठादारांचे नेटवर्कही उपलब्ध आहे.
जागतिक पुरवठा साखळीतील बदल, ‘चायना प्लस वन’ धोरण, डेटा सेंटर आणि पायाभूत सुविधांमधील वाढती गुंतवणूक तसेच संरक्षण आणि देशांतर्गत उत्पादनाला मिळणारे प्रोत्साहन यामुळे झेटवर्कच्या व्यवसायाला मोठी चालना मिळत आहे.
क्रिसिलच्या अहवालानुसार, कंपनीकडे 1,000 हून अधिक ग्राहक असून त्यामध्ये NTPC Renewable Energy, Samsung India Electronics, NALCO, ArcelorMittal Nippon Steel India यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. भारतासह अमेरिका, आग्नेय आशिया आणि मध्यपूर्व-आफ्रिका या बाजारपेठांमध्येही कंपनी कार्यरत आहे.
देशभरातील 5,000 हून अधिक सक्रिय पुरवठादारांशी कंपनीची भागीदारी असून, मार्च 2026 अखेर कंपनीकडे 12,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याचे ऑर्डर बुक आहे. या ऑर्डर्सची पूर्तता पुढील 12 ते 18 महिन्यांत करण्यात येणार आहे.

