इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
पुणे, दि. २७ : सामाजिक न्याय विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (नविन), गुणवडी ता. बारामती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह सासवड ता. पुरंदर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतीगृह तळेगाव दाभाडे येथे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ७ वी नंतर शालेय शिक्षण, कनिष्ठ महाविद्यालय, बिगर व्यावसायिक तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय अनुसूचित जातीमधील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शासकीय वसतिगृह प्रवेश देण्यात येणारआहे.
वसतिगृह प्रवेश हा प्रवर्गनिहाय आरक्षण व गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे. शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास, आंथरूण-पांघरूण, भोजन सुविधा, पुस्तके, स्टेशनरी, विविध शैक्षणिक बाबींसाठी आर्थिक सहाय्य तसेच दरमहा निर्वाह भत्ता यासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर जाऊन प्रवेशासंबंधित सूचना वाचून ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहन वस्तीगृहाच्या गृहपालाकडून करण्यात आले आहे.

