मसापच्या १२१व्या वर्धापन दिनानिमित्त जीवनगौरव, कार्यकर्ता पुरस्कारासह वार्षिक पारितोषिकांचे वितरण

Date:

चौकटीतल्या जीवनापलिकडचे कठोर वास्तव लेखनातून पहायला शिकले : प्रतिभा रानडे

पुणे : जीवनाच्या वाटचालीत मी वेगवेगळ्या विचारधारांच्या संपर्कात आले, पण कुठल्या एका विचारधारेशी बांधून घेतले नाही. आजवरच्या लेखनाने खूप आनंद दिला. चित्रविचित्र घटनांचे साक्षीदार होता आले. हे भाग्य की दुर्भाग्य माहित नाही. लेखनाच्या निमित्ताने आपल्या चौकटीतल्या जीवनापलिकडचे कठोर वास्तव पहायला शिकले. मध्यवर्गीय कवचाबाहेर पडण्याची सतत धडपड केल्याने त्यातूनच मला जगण्याचे भान आले; माणसाच्या जगण्याकडे बघता आले, अशा भावना प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांनी व्यक्त केल्या.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा १२१वा वर्धापन दिन समारंभ व पुरस्कार प्रदान सोहळा मंगळवारी (दि. २६) बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी मसाप जीवनगौरव पुरस्काराने प्रतिभा रानडे यांचा तर डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने डॉ. श्रीकृष्ण काकडे यांचा गौरव करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना प्रतिभा रानडे बोलत होत्या. ज्येष्ठ संगीतकार, गायक पंडित सत्यशील देशपांडे, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते हृषिकेश जोशी, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण होते. प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, कार्यवाह सुनील महाजन, सुनेत्रा मंकणी, माधव राजगुरू, प्रसाद मिरासदार, डॉ. नितीन संगमनेरकर मंचावर होते. कार्यवाह अंजली कुलकर्णी, डॉ. आशुतोष जावडेकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. या वेळी शाखा व कार्यकर्ता पुरस्कार, मसाप स्नेहबंध पुरस्कार यासह विशेष ग्रंथकार पुरस्कार आणि वार्षिक ग्रंथ पारितोषिकांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

प्रतिभा रानडे पुढे म्हणाल्या, निसर्ग, माणसाचे जगणे याविषयी मला नेहमीच कुतुलह वाटत आले आहे. मी जिथे जिथे गेले तिथला इतिहास, संस्कृती, सामाजिक, राजकीय स्थिती, धर्मसंस्कृतीचा आणि राजकारणाचा सामन्य माणसावर झालेला परिणाम अभ्यासत गेले. त्यातून धर्मसत्ता, अर्थसत्ता आणि राजसत्ता हातात हात घालून चालत असतात; परंतु सामान्य माणूस मात्र संस्कृतीशी जोडला जातो याचे आकलन झाले. दिपाली दातार यांनी प्रतिभा रानडे यांचे मनोगत वाचून दाखविले.

संगीताची संवेदना असल्यास लेखन लयदार : पंडित सत्यशील देशपांडे….

पंडित सत्यशील देशपांडे म्हणाले, लेखकांना संगीताची संवेदना आकलन झाल्यास गद्य वाक्ये देखील लयदार होतात. बंदिशीतल्या शब्दांमधून संवेदना तीव्र, तीक्ष्ण झाल्यास बंदिशीचे सादरीकरण प्रभावी ठरते. गाणाऱ्यांनी देखील भवतालच्या वाङ्‌मयाचा अभ्यास करावा. छंदोबद्ध मुक्तछंदालाही लय असते; परंतु आज मुक्तछंद लिहिणाऱ्या कवींचा छंदाचा अभ्यास नाही हे देखील जाणवते. साहित्यकृतीतून साकारलेल्या शब्दांना वैयक्तिक आणि सामाजिक संदर्भ देखील असतात आणि त्या संदर्भातून अर्थाच्या छटा बदलत राहतात. मनाला झालेल्या जाणीवांमधून उत्कृष्ट साहित्यकृतींची निर्मिती घडत असते. भावनेला शब्द करणे हे साहित्यिकाचे वैशिष्ट्य आहे.

पुरस्कारातून लेखनाची उर्मी मिळते : हृषिकेश जोशी….

हृषिकेश जोशी म्हणाले, चित्रकार, शिल्पकार आणि ग्रंथकार समकालीन माणसांचे आयुष्य साठवतात. लेखक आपल्या साहित्यकृतीतून वाचकाला संपूर्ण जग फिरवून आणू शकतात. पुरस्काराच्या माध्यमातून साहित्यिकांना प्रेरणा लाभते आणि अधिक उत्तम साहित्य निर्माण होऊ शकते. लिहिण्याची उर्मी असल्यास जे वाटते, भावते ते शब्दातून मांडले जाते.

मराठी भाषा देशाचा आधार बनावी : अविनाश धर्माधिकारी….

अविनाश धर्माधिकारी म्हणाले, महाराष्ट्राची भूमी ही संतांचा आणि हिंदवी स्वराज्याचा वारसा सांगणारी आहे. समाजाची चेतना आणि आत्मविश्वास जागृत ठेवण्याचे कार्य संतांनी केले आहे आणि हा वारसा मराठी भाषेच्या संस्कृतीत जाणवतो. मराठी भाषा ज्ञानोबा-तुकोबाची असल्यामुळे काळाच्या ओघातील विज्ञान, प्रगती भाषा रुपातून व्यक्त होण्याची ताकदही तिच्यात आहे. जागतिक भाषा जरूर आत्मसात करावी; परंतु मायबोली मराठी कच्ची राहता कामा नये. शैक्षणिक तत्त्वानुसार दोन भाषांवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. काळाचे आव्हान स्वीकारत आजची मराठी भाषा महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा आधार बनावी.

कामाची दखल घेतल्याने समाधानी….

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. श्रीकृष्ण काकडे म्हणाले, लोकसंस्कृती, लोककला आणि लोकपरंपरांचा अभ्यास कोणत्याही पुरस्कारासाठी करत नव्हतो; परंतु माझ्या कामाची दखल घेतली गेली याविषयी समाधानी आहे. राजेंद्र खेर, डॉ. कल्याणी हर्डिकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

योगेश सोमण म्हणाले, साहित्यविषयक पुरस्कार देऊन विविध क्षेत्रात लेखन करणाऱ्या साहित्यिकांचा गौरव करता आला याविषयी महाराष्ट्र साहित्य परिषद कृतज्ञ आहे. पुण्यात होणारे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिमाखदारपणे करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. डॉ. स्वाती महाळंक यांनी प्रास्ताविकात परिषदेच्या कार्याविषयी माहिती देत आगामी कामांविषयी आढावा घेतला. आभार प्रसाद मिरासदार यांनी मानले. गौरी ताम्हणकर यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

उत्तरार्धात प्रसिद्‌ध कवी, गीतकार वैभव जोशी यांनी ‘द मनमौजी’ हा कविता व गीतांचा कार्यक्रम सादर केला. निनाद सोलापूरकर (की-बोर्ड), आमोद कुलकर्णी (तबला) यांनी साथसंगत केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विधान परिषदेच्या 17 पैकी 14 ठिकाणी भाजपकडे स्पष्ट बहुमत:तरी शिवसेना-राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग

मुंबई-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांची घोषणा होताच...

कर्नाटकातील शहाजीराजे यांच्या समाधीला संरक्षण कवच; समाधीवर ४५० किलोची भव्य मेघडंबरी

-पुण्यातील मल्हार भक्त डॉ. गौरव घोडे यांचे ऐतिहासिक कार्य पुणे...

राज्यात आजपासून 3 दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी

दोन दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; हवामानशास्त्र विभागाचा ‘यलो अलर्ट’ पूर्वमोसमी...