पुणे-NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात CBI ने बुधवारी आणखी 2 आरोपींना अटक केली. पहिल्या आरोपीचे नाव डॉ. मनोज शिरुरे असे आहे. ते लातूरचे रहिवासी आहेत. डॉ. मनोज यांनी एका कोचिंग सेंटरच्या मालकाच्या (जो स्वतःही आरोपी आहे) मुलासह 3 विद्यार्थ्यांना आरोपी पी.व्ही. कुलकर्णीकडून केमिस्ट्रीच्या प्रश्नपत्रिका मिळवून दिल्या होत्या.तर, दुसऱ्या आरोपीचे नाव तेजस हर्षदकुमार शाह असे आहे. तो पुणे येथील डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकादमी (APMA) या कोचिंग सेंटरमध्ये फिजिक्सचा प्राध्यापक आहे. त्याला NEET UG 2026 परीक्षेतील फिजिक्सचे लीक झालेले प्रश्न अटकेत असलेल्या आरोपी मनीषा हवालदारकडून मिळाले होते.
सीबीआय प्रस्तुत प्रकरणात संपूर्ण साखळी आणि कटाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. CBI ने आतापर्यंत यासंबंधी वेगवेगळ्या 49 ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे. त्यात अनेक महत्त्वाचे दस्तऐवज, लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 13 लोकांना अटक करण्यात आली आहे.सीबीआय चौकशीत उघड झाले आहे की, नीटचा पेपर 5 राज्यांमध्ये विकला गेला होता. सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात झाली आणि दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान आहे.सीबीआयचे म्हणणे आहे की, पेपरफुटीचे प्रकरण आणखी व्यापक होऊ शकते. एजन्सीला अजून हे ठरवता येत नाहीये की किती विद्यार्थ्यांनी पेपर विकत घेतला होता.सीबीआयला महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये पेपरचे प्रिंट काढून विकल्याचे पुरावे मिळाले आहेत. पेपरफुटीचे सर्वात मोठे केंद्र महाराष्ट्र होते. येथूनच राजस्थान आणि इतर राज्यांमधील विद्यार्थ्यांपर्यंत ‘प्रश्न बँक’ पोहोचली.
तपास यंत्रणा आता त्या सर्व पालकांची यादी तयार करत आहे, ज्यांच्या बँक खात्यातून शिवराज मोटेगावकर, पी.व्ही. कुलकर्णी किंवा त्यांची सहकारी मनीषा वाघमारे (पुणे) यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित झाले होते. यासंबंधी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) व्यतिरिक्त बाहेरील काही व्यक्ती अजूनही संशयाच्या घेऱ्यात आहेत. सीबीआय लवकरच इतर राज्यांमध्ये छापे टाकेल.
NTA ने शुक्रवारी NEET-UG 2026 उमेदवारांसाठी एक विशेष पोर्टल उघडले आहे. या पोर्टलवर विद्यार्थ्यांना रद्द झालेल्या परीक्षेचे परीक्षा शुल्क परताव्यासाठी आपल्या बँक खात्याचा तपशील नमूद करता येईल. बँक खात्याचा तपशील जमा करण्याची सुविधा 22 ते 27 मे (रात्री 11:50 वाजेपर्यंत) पर्यंत उपलब्ध असेल.

