Home Blog Page 3208

सारसबागेसमोरील दादावाडी मंदिरात पालिताना मधील शत्रूंजय गिरीराज तिर्थाच्या मंदिराची प्रतिकृती

0

पुणे-  श्री जैन श्वेतांबर दादावाडी टेम्पल ट्रस्टतर्फे सारसबागेसमोरील दादावाडी मंदिरात उभारण्यात आलेल्या श्री शत्रूंजय गिरीराज तिर्थाच्या मंदिराच्या प्रतिकृतीचे उदघाटन येत्या शुक्रवार दिनांक १९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता विजय रामचंद्रसुरीश्वरजी म . सा . यांचे शिष्य परमपूज्य मुनिश्री वैराग्यरति विजयजी गनिवर्य यांच्या हस्ते होणार आहे . हि माहिती मंदिराचे प्रसिद्धी प्रमुख श्री संपत जैन यांनी आज मंगळवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
या सोहळ्यास शोभायात्रेने प्रारंभ दि १९ जानेवारी रोजी सकाळी सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरापासून होणार आहे. शोभायात्रेची सांगता दादावाडी मंदिराजवळ होणार आहे. या शोभायात्रेत मंदिराचे ट्रस्टी , पदाधिकारी , जैन समाजातील हजारो भाविक नागरिक सहभागी होणार आहे.
गुजरातमधील पालिताना येथील श्री शत्रूंजय गिरीराज तिर्थ मंदिर हे भाविंकांचे श्रद्धास्थान आहे . या तिर्थस्थानास लाखो भाविक भेट घेऊन दर्शन घेतात . श्रद्धा आणि कलेच्या दृष्टीने हे तिर्थ मंदिर जैन समाजाचे सर्वोच्च स्थान आहे . जैन धर्माचे प्रथम तिर्थंकर भगवान आदिनाथ यांनी ९९ वेळा या तीर्थ मंदिरास भेट दिली होती . त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे मंदिर आहे . चैत्र आणि कार्तिकी पौर्णिमेस हजारो जैन साधू , साध्वी यांचे महानिर्वाण या पवित्र स्थानी झाले आहे . अनेक भाविकांनी आपल्या मनाचा क्रोध , द्वेष , मोह , माया लाभ यावर मात केली . त्यामुळे या तीर्थक्षेत्राचे नाव शत्रूंजय पडले आहे . हे तीर्थ मंदिर जमिनीपासून २ हजार फूट उंचीवर आहे . याठिकाणी ७०० मंदिरे व हजारो प्रतिमा आहेत .या तीर्थ मंदिराकडे वाट चालून वर जावे लागते . या रस्त्यावर सुमारे ३,७५० पायऱ्या आहेत . खूप उंचीवर असल्याने ठिकठिकाणी विश्रामगृहे व स्थानके बांधण्यात आली आहेत . गरम व गार पाण्याची सोय व ज्यांना पायी जाणे अशक्य आहे त्यांच्या साठी डोलीची सोया करण्यात आली आहे.
या शत्रूंजय गिरीराज तीर्थ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती दादावाडी मंदिरात साकारण्यात आली आहे . या मंदिराच्या कलाकृतीची प्रतिकृती तयार करण्यासाठी कलकत्ता येथील ३० ते ३५ कलाकार गेली १ ते दिड वर्षे झटत होते.
या मंदिरात तलाट्टी , नौतूण्क, दादाचा दरबार , कुंड , विश्रामस्थळ , पादुका (पगलियाजी ) ,दर्शनीय स्थळांची प्रतिकृती उभारण्यात आली आहे .

महाआरोग्य शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नियोजनबध्द कामे करावीत -जिल्हाधिकारी सौरभ राव

0

पुणे – महाआरोग्य शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी नियोजनबध्द कामे करुन दिलेल्या जबाबदाऱ्या  चोख पार पाडाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिल्या.

तालुका मावळ येथे दि. 21 जानेवारी 2018 रोजी होणाऱ्या महाआरोग्य शिबिराची नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे श्री. राव यांच्या अध्यक्षतेखाली  घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार संजय भेगडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर.के. शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने उपस्थित होते.

श्री. राव म्हणाले, महाआरोग्य शिबिराच्या ठिकाणी व्यासपीठ, मैदानाची व्यवस्था करावी. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच दक्षता व आपत्ती व्यवस्थापनासाठी पोलीस, महसूल व प्रादेशिक परिवहन विभागाने समन्वयाने काम करावे. रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाने औषधांचा साठा पुरेसा ठेवावा व  रुग्णांची वेळेत  तपासणी करुन औषाधोपचार करावेत. नागरिकांना योग्य ते मागदर्शन करण्यासाठी स्वयंसेवक नेमावेत. तसेच गर्दी होवू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात यावी

श्री. भेगडे म्हणाले, महाआरोग्य शिबीराच्या ठिकाणी वाहतूकीची कोंडी होवू नये, यासाठी पार्कींगची व्यवस्था करावी. नागरिकांच्या सुरक्षेसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करावा. शिबीर पार पाडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्यांमधील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी  सोपविलेल्या जबाबदाऱ्या चोख पार पाडाव्यात.

यावेळी श्री. मांढरे, श्री. मुठे, डॉ. शेळके यांनीही उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी विविध विभागांचे अधिकारी  उपस्थित होते.

गॅम्बियाचे राजदूत जैनब जगने आणि कॉन्सुल जनरल एली बाह यांची आझम कॅम्पसला भेट

0
गॅम्बियाच्या शिक्षण व्यवस्थेत योगदान देण्याचे आवाहन 
पुणे :गॅम्बिया च्या भारतातातील राजदूत जैनब जगने आणि कॉन्सुल जनरल एली बाह यांनी मंगळवारी  सकाळी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी(आझम कॅम्पस) ला भेट देऊन विविध महाविद्यालयांच्या शैक्षणिक प्रगतीची पाहणी केली . संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार ,उपाध्यक्ष आबेदा इनामदार ,अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस चे संचालक आर . गणेसन यांनी स्वागत केले . आझम कॅम्पस च्या असेम्ब्ली हॉल मध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला .
‘महाराष्ट कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक प्रगतीने आम्ही प्रभावित झालो आहोत . गँबिया च्या शैक्षणिक व्यवस्थेत आणखी गुणवत्ता आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून संस्थेने गॅम्बिया च्या शिक्षण व्यवस्थेत योगदान द्यावे ‘असे आवाहन गॅम्बियाच्या भारतातील राजदूत जैनब जगने यांनी केले .
‘आझम कॅम्पस मधील शैक्षणिक वातावरण प्रभावित करणारे आहे .येथील विध्यार्थी ,प्राध्यापक ,संस्थेचे नेतृत्व यांचा चांगला अनुभव आम्हाला आला .  गॅम्बिया तील आणि भारतातील सामाजिक वातावरण सारखे असल्याने येथील शैक्षणिक प्रगतीचे मॉडेल गँबियात देखील उभे राहावे आणि त्यासाठी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीची मदत व्हावी अशी आमची इच्छा आहे. गॅम्बिया तील कृषी आणि शिक्षण क्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी भारतीयांसाठी उपलब्ध असून व्हिसा प्रणाली देखील सुलभ आहे  ‘असे उद्गार कॉन्सुल जनरल एली बाह यांनी काढले .
डॉ पी ए इनामदार म्हणाले,’गँबियाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये योगदान देण्याच्या विनंतीला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊ . तेथील प्राध्यापक ,शिक्षकांना प्रशिक्षण ,तंत्रज्ञानाची मदत आणि विद्यार्थी-प्राद्यापक आदान -प्रदान उपक्रम आखता येण्यासारखे आहेत . त्यासाठी लवकरच एकत्रित चर्चा केली जाईल ‘
यावेळी तन्वीर इनामदार ,एस ए इनामदार ,गँबियाचे प्रोटोकॉल ऑफिसर रहमान ,श्री .पंजाबी इत्यादी उपस्थित होते

पु.ना. गाडगीळ आणि सन्स यांच्या सहकार्याने “सकाळ मिस महाराष्ट्र २०१८” स्पर्धेची घोषणा

0

मुंबई -महाराष्ट्रातील तरुणींच्या गुणवत्तेला संधी देण्यासाठी, त्यांच्यातून दर्जेदार अभिनेत्री घडवण्यासाठी “सकाळ माध्यम समूहा’तर्फे सोमवारी (ता.१५) मुंबईत पु.ना. गाडगीळ आणि सन्स पुरस्कृत “मिस महाराष्ट्र २०१८’ स्पर्धेची घोषणा करण्यात आली. मुंबई-पुण्यातील तरुणींना चित्रपटात काम करण्याची संधी मिळते; मात्र ग्रामीण महाराष्ट्रात किंबहुना आदिवासी भागातील तरुणींमध्ये गुणवत्ता असूनही त्यांना संधी मिळत नाही. सर्वांनाच मुंबई पुण्यात राहणे शक्य होत नसल्याने संधीला मुकावे लागते. आदिवासी भागातील तरुणींना अनेकदा भाषेची समस्या जाणवते; मात्र “सकाळ’च्या मिस महाराष्ट्र स्पर्धेत चित्रपट क्षेत्रातील मान्यवर तरुणींना प्रशिक्षण देऊन त्यांच्या कलागुणांना आणि त्यांच्या भविष्यालाही आकार देतील .”मिस महाराष्ट्र’ स्पर्धेच्या जिल्हा स्तरावर ऑडिशन्स होणार असल्याने तालुक्यातील तरुणींनाही स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल.त्यातूनच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील दर्जेदार अभिनयाची गुणवत्ता समोर येईल.

या स्पर्धांची नोंदणी १६ जानेवारी ते २६ जानेवारी या काळात केली जाइल. महाराट्रात 8 विविध केंद्रावर या स्पर्धेच्या ऑडिशन्स घेतल्या जातील. अंतिम ३२ तरुणींची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येइल. या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या चित्रपटात काम करण्याची संधीमिळणार आहे. अन्य स्पर्धांप्रमाणे केवळ सौंदर्याला नव्हे; तर तरुणींमधल्या कलागुणांना प्रकाशकोंदण मिळणार असून त्यांच्या सर्वांगीण विकासाचा हेतूही या स्पर्धेतून साध्य होईल  मिस महाराष्ट्रच्या ऑडिश्न्स विविध ८ केंद्रांवर घेण्यात येतील. त्यातून अंतिम स्पर्धेसाठी ३२ स्पर्धकांची निवड केली जाइल. अंतिंम स्पर्धकांचे ट्रेनिंग आणि ग्रुमिंग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने होइल.

 

नोंदणी : १६ जानेवारी ते २६ जानेवारी २०१८

ऑडिशन्स तारिख व ठिकाण  

फेब्रुवारी २०१८मुंब-ठाणे

फेब्रुवारी २०१८ सोलापूर

फेब्रुवारी २०१८औरंगाबाद

फेब्रुवारी २०१८नाशिक

फेब्रुवारी २०१८नागपू

फेब्रुवारी २०१८कोल्हापूर

फेब्रुवारी २०१८जळगाव

फेब्रुवारी २०१८पुणे

ग्रुमिंग सेशन्स- १२ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०१८पुणे

अंतिम फेरी- १७ फेब्रुवारी- ऍमनोरा टाउन सेंटर, मगरपट्टा सिटी, पुणे

सावधान ,पोलीस नसू देत ..आम्ही आहोत ..नो एन्ट्रीत प्रवेशाला कार्यकर्त्यांचा प्रतिबंध

0
पुणे-वाहतुकीचे नियम तोडू नका, पोलीस नसले तरी आम्ही येथे आहोत असे सांगत  नवजीवन समाज सेवा मंडळा ने नवीन वर्षाची सुरुवात वाहतूक विषयक कार्यातून सुरू केलीआहे.
जुना पुणे-मुंबई रोड वरती सुरू असलेले स्मार्ट सिटी रोड चे काम चालू असल्याने विश्रांतवाडी वरून येणारा रोड कामानिमित्त बंद केला आहे व पर्यायी मार्ग उपलब्ध केला आहे तरी ही लोक आपल्या व पुढील व्यक्तीच्या जीवाची पर्वा न करता आपले वाहन नो एन्ट्री  मध्ये  घालत आहे. यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी या मंडळाचे कार्यकर्ते आता स्वतः वेळोवेळी रस्त्यावर  येत आहेत .
 येथे होणाऱ्या नियमबाह्य वाहतुकी संदर्भात मंडळाचे सभासद राहुल मोरे  यांनी वेळोवेळी वाहतूक विभागाकडे तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष करतआल्याने मंडळाने स्वतः या कामी पुढाकार घेतला आहे.
या उपक्रमामध्ये मंडळाचे सभासद व कार्यकर्ते रवींद्र नितनावरे संजू जोशी मनोहर कामठे राजू जोशी प्रशांत ओसवाल बाळू भोसले विजय हुलगुंडे आदित्य कांडेकर विजय कराळे सहभागी झाले आहेत .

टी- 10 क्रिकेट टूर्नामेंट – 2018 ला प्रारंभ

0
पुणे: महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ च्या एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड रिसर्चच्या वतीने आयोजित टी -10 क्रिकेट टूर्नामेंट-2018ला प्रारंभ झाला. या स्पर्धेचे यंदाचे 10 वे वर्ष आहे. ही स्पर्धा दिनांक 18 जानेवारी पर्यंत आझम कॅम्पस क्रिकेट मैदानावर होणार असल्याची माहिती स्पर्धेचे संयोजक विसेंट केदारी यांनी दिली. 
 
एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड रिसर्चच्या प्राचार्य अनिता फ्रांत्झ यांनी सर्व संघाचे स्वागत केले. 
चार दिवसीय या क्रिकेट स्पर्धेमध्ये 14 संघ सहभागी झाले आहेत. यात 9 हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालये आणि 5 हॉटेल उद्योग संस्था आहेत. संघ कर्णधार यांच्या उपस्थितीत स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले.
 
एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड रिसर्च, डॉ. डि.वाय.पाटील (बीएचएमसीटी), डॉ. डि.वाय.पाटील (बीएससीएचएस), अजिंक्य डि.वाय.पाटील, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, अम्ब्रोसिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मॅरिओट सुईटस, ह्यात पुणे, फोर पॉईंट बाय शेराटॉन, अ‍ॅम्ब्रोसिया रिसॉर्ट, कोर्टयार्ड बाय मेरिओट हिंजवडी, डॉ. ए.बी.तेलंग इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, तसावा टूर्स अ‍ॅण्ड ट्रव्हल्स् या संघांचा समावेश आहे. 
——————————————————————-

मासिक पाळीत महिलांना स्वयंपाकघर आणि देवांपासून दूर ठेवण्याची पध्दत चुकीची – अक्षय कुमार

0

पुणे-‘‘पूर्वी मासिक पाळी दरम्यान महिलांना स्वयंपाक घरात प्रवेश दिला जात नव्हता. त्याकाळात महिलांना आराम मिळवा हा त्या मागील उद्देश होता. मात्र, कालांतराने मासिक पाळीला निषिद्ध मानून महिलांना स्वयंपाकघर आणि देवदेवतांपासून दूर ठेवण्याची पद्धत प्रचलित झाली. मासिक पाळी ही निषिद्ध गोष्ट नाही. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ते स्वीकारण्याची  वेळ आता आली आहे. असे मत अभिनेता अक्षय कुमार याने व्यक्त केले.

सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अॅण्ड कम्युनिकेशन (एसआयएमसी) यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सिनेमा : समाज व सांस्कृतिक प्रबोधनचे एक माध्यम’ या विषयावरील चर्चासत्रात तो बोलत होता. यावेळी झाम्बियाच्या राजदूत जैनबा जॅग्ने, डॉ. विद्या येरवडेकर, डॉ. रुचा जग्गी आदी उपस्थित होते.

अक्षय कुमार याने यावेळी त्याच्या आगामी ‘पॅडमन’ या चित्रपटाविषयी माहिती दिली. हा चित्रपट अरुणाचल मुरगणांथम यांच्या जीवनावर आधारित आहे. अरुणाचल हे देशाचे ‘मासिक पाळी मॅन’ म्हणून ओळखले जातात. या चित्रपटाद्वारे त्यांचा जीवन प्रवास उलगडण्यात आला आहे.

अक्षय पुढे म्हणाला की, सद्यपरिस्थितीत देशातील 82 टक्के महिला मासिक पाळीत सॅनिटरी पॅड्स वापरत नाहीत. पाळीदरम्यान त्या राख किंवा मातीचा वापर करतात. देशातील सद्य परिस्थिती पाहता महिलांना सॅनिटरी पॅड्स मोफत उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे तो म्हणाला.

झाम्बियाच्या राजदूत जैनबा जॅग्ने म्हणाले, ” चित्रपटाचा विषयामुळे प्रभावीत झाले आहे. मासिक पाळी हा विषय केवळ भारतामध्ये गंभीर नाही, तर जगभरात त्याचे विदारक चित्र पाहायला मिळते. या विषयावर जगभरातच लोकशिक्षणाची गरज आहे. मासिक पाळी निषिद्ध नाही. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. महिलांना मासिक पाळी आली नसती, तर कोणाचाही जन्म झाला नसता. हा चित्रपट झाम्बियामध्ये प्रदर्शित व्हावा, य़ासाठी प्रयत्न करेन’’

माधुरीने दिले खास तिळगूळ

0

आपल्या दिलखुलास हास्याने कित्येक कळ्या खुलवणारी माधुरी आता
मराठी सिनेसृष्टीत झळकणार ही बातमी पसरली आणि या चित्रपटाच्या
नावाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. चाहत्यांची ही उत्सुकता जास्त
ताणून न धरता अखेर मकरसंक्रांतीचं औचित्य साधत, महाराष्ट्राच्या लाडक्या
धकधक गर्लने आपल्या पहिल्या – वहिल्या मराठी चित्रपटाचं नाव ट्विटरवर
घोषित केलं आहे. ‘बकेट लिस्ट’ असं या चित्रपटाचं नाव असून यानिमित्ताने लाँच
करण्यात आलेल्या टाटयल टीझर पोस्टरवरील माधुरीतला मराठमोळेपणा
तिच्या चाहत्यांच्या ह्रदयाचा ठोका चुकवण्यात यशस्वी होतो आहे.
गृहिणी, आई, मैत्रीण, बहिण, मुलगी अशा कैक भूमिका एकाचवेळी पार
पाडत असलेल्या स्त्रियांचं प्रतिनिधीत्त्व करणारं हे व्यक्तिमत्त्व माधुरीच्या रूपात
बकेट लिस्टच्यानिमित्ताने प्रेक्षकांसमोर येणार असल्याचं नुकत्याच प्रदर्शित
झालेल्या टायटल टीझर पोस्टरमधून दिसत आहे. या सगळ्याच भूमिकांमध्ये
अग्रेसर असणारी ही गृहिणी आपल्या वेगळेपणातून प्रेक्षकांची करमणुक करणार
असल्याचा विश्वास दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊसकर यांनी केला आहे.
डार्क हॉर्स सिनेमा, दार मोशन पिक्चर्स तसेच ब्लु मस्टँग क्रिएशन्स यांनी या
चित्रपटाची निर्मिती करून ही मराठमोळी माधुरी प्रेक्षकांसमोर आणली आहे.
तर दिग्दर्शनाबरोबरच चित्रपटाची कथा, तेजय प्रभा विजय देऊसकर यांची
आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मुंबईत सुरूवात झाली आहे.
गेली तीन दशकं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी माधुरी आपल्या
मातृभाषेत कधी सिनेमा करणार असा प्रश्न कित्येक चाहत्यांच्या मनात होता,
अखेर या प्रश्नाचं उत्तर घेऊन माधुरी बकेट लिस्टच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या
भेटीला येणार आहे.
या चित्रपटाच्या कथेविषयी बोलताना, “हा चित्रपट मराठी असला तरी
चित्रपटाची कथा युनिव्हर्सल असल्याचं, चित्रपटाचे निर्माते म्हणाले. तर हिंदी

सिनेसृष्टीत काम करायला सुरूवात केल्यापासून चांगल्या मराठी संहितेच्या
शोधात असणारी माधुरी कथा ऐकताक्षणी या चित्रपटाच्या कथेच्या प्रेमात
पडली आणि क्षणार्धात चित्रपटाला होकार कळवल्याचं म्हणाली.”
माधुरीचा हा मराठमोळा अवतार येत्या उन्हाळ्यात प्रेक्षकांना गारवा देऊन
जाणारा ठरणार आहे. सुट्टीच्या दिवसांत प्रदर्शित होणारा ‘बकेट लिस्ट’ हा
सिनेमा प्रेक्षकांना हसता हसता प्रेरणा देऊन जाईल, अशी आशा माधुरीने व्यक्त
केली आहे.

गुरू रोहिणी भाटे यांच्या नृत्यरचनांचे सादरीकरण

0
उद्गारच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजन
पुणे : उद्गार संस्थेच्या दशकपूर्तीनिमित्त ‘अनुकृती’ या कथक मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी (दि.२०) बालशिक्षण मंदिर, मयूर कॉलनी, कोथरूड येथे सायंकाळी ५.३० वाजता ही मैफल होणार आहे.कथक कलेला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या गुरू रोहिणी भाटे यांच्या अजरामर नृत्यरचनांचे सादरीकरण या मैफलीत होईल. गुरू रोहिणी भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या निलिमा अध्ये, मनीषा अभय, आभा वांबूरकर यांच्यासह उद्गार संस्थेच्या शिष्या या सुंदर रचनांचे सादरीकरण करतील. तसेच उद्गारच्या दशकपूर्तीचे औचित्य साधून २ फेब्रुवारीला ‘मंथन’ या अनोख्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्रिविधा, चैतन्य, राधा, सा-रंगी आणि कर्म या संकल्पनेवर आधारित विविध नृत्य रचनांची अनुभूती मंथन मैफलीतून रसिक प्रेक्षकांना घेता येणार आहे. आसावरी पाटणकर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून हा कार्यक्रम होत असून अनुकृती आणि मंथन या दोन्ही कार्यक्रमाचा आस्वाद पुणेकरांनी घ्यावा, असे आवाहन उद्गारतर्फे करण्यात येत आहे.

क्रेडाई महाराष्ट्र कडून शिखर परिषदेचे आयोजन

0

२०० हून अधिक सदस्यांचा सहभाग 

पुणे  :- क्रेडाई महाराष्ट्र कडून येत्या १९ आणि २० जानेवारीला हॉटेल हयात रिजन्सी येथे या राष्ट्रीय शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी क्रेडाई महाराष्ट्राच्या ५० शहरांतील २०० हून अधिक सभासद यात सहभागी होणार आहेत. शिवाय क्रेडाई नैशनलचे चेअरमन गीतांबर आनंद, क्रेडाई – नॅशनलचे अध्यक्ष जक्षय शहा, क्रेडाई – नॅशनलचे प्रेसिडेंट इलेक्ट सतीश मगर,क्रेडाई-महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया,क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, क्रेडाई नैशनलचे सचिव रोहित राज मोदी, क्रेडाई नैशनलचे उपाध्यक्ष बोमन इराणी याप्रसंगी उपस्थित असणार आहेत.

 

पहिल्या दिवशी ‘महारेरा’ अध्यक्ष गौतम चटर्जी तसेच नगर विकास विभागाचे संचालक एन. आर. शेंडे विकसकांना मार्गदर्शन करणार आहेत. समारोपाच्या दिवशी क्रेडाईचे प्रमुख सदस्य क्रेडाईच्या शहर संघटनांनी ५० शहरात पदार्पणनिमित्त एकत्र येणार आहेत.

शहर संघटनांना स्वयंपूर्ण होण्यासाठी आणि तेथील सदस्यांमध्ये नेतृत्वगुण निर्माण करून त्यांना प्रभारी बनविण्याच्या उद्देशाने त्यांच्याशी संवाद साधणे हा यामागचा प्रमुख हेतू आहे.अशी माहिती शांतीलाल कटारिया यांनी दिली.

सुमेधने पटकावली तीन नामांकन

0
    डान्स इंडिया डान्स, डान्स महाराष्ट्र डान्स मधून लोकांपर्यंत पोचलेला सुमेध मुदगलकर नृत्य सोबत एकटिंग मधून देखील लोकांना आवडत आहे. ह्याचं उत्तम उदाहरण द्याचं म्हणजे रेडिओ सिटी सिने अवॉर्ड मराठी ह्या कार्यक्रमात सुमेधला तीन नामांकन मिळाली आहे. मांजा चित्रपटातून सुमेधने मराठीसृष्टीत पदार्पण केले त्यानंतर तो व्हेंटिलेटर चित्रपटात त्याने काम केले. प्रथम पदार्पण (मांजा), बेस्ट ऍक्टर (मांजा) इतकाच न्हवे तर बेस्ट व्हिलन (मांजा) म्हणून देखील त्याला नामांकन मिळाली आहेत. तीन नामांकने मिळल्याबद्दल सुमेधला विशेष आनंद आहे. ह्याबाबत तो म्हणतो “आपलं कोणी कौतुक केल्यावर खूप छान वाटते त्यात नामांकन मिळाल्यावर जणू कामाची पोचपावती मिळाली असे वाटते. आतापर्यंतचा माझा प्रवास खुप चांगला आहे. आणि सध्या काहीतरी नवीन आणि वेगळ्या प्रकारे काम करतोय आणि प्रेक्षकांना हे आवडेल अशी आशा आहे”.
        ह्यासोबत अशोका सम्राट, दिल दोस्ती डान्स ह्या हिंदी मालिकेतून देखील सुमेध लोकांच्या लक्षात राहिला आहे.

नामदेव ढसाळ यांच्या स्मृतीदिनानिमित्त दलित पँथरच्यावतीने अभिवादन सभा

0

पुणे-दलित पँथरचे संस्थापक पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या  स्मृतीदिनानिमित्त दलित पँथरच्यावतीने अभिवादन सभा संपन्न झाली .यावेळी पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या प्रतिमेस आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते अशोक कांबळे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . कोरेगाव पार्कमधील मौलाना अबुल कलाम आझाद स्मारकमध्ये झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे , अशोक कांबळे , प्रकाश साळवे ,नगरसेवक प्रदीप गायकवाड , राहुल तायडे ,बंडू गायकवाड , विठ्ठल केदारी ,   विजय बहुले , रमेश जगताप , प्रविण रणदिवे ,  शुभम सोनवणे , विक्रम चव्हाण , राहुल सोनवणे , पद्मावती शिंदे , आरती बाराथे , सूरज तुपे , गौतम शिंदे , गणेश खडसन , रविंद्र कांबळे , बाळासाहेब कांबळे , रुबिना शेख , मुनिरा थानावाला , सुषमा मंडलिक आदी मान्यवर उपस्थित होते .

या सभेच्या अध्यक्षस्थानी दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी सांगितले कि , पदमश्री नामदेव ढसाळ यांनी दलित पँथरच्या माध्यमातून दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले . पँथरच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते उभे केले .दलित पँथरचे प्रत्येक आंदोलन त्यांच्या माध्यमातून यशस्वी केले . त्यांच्या जाण्याने दलित चळवळीमध्ये त्यांची उणीव प्रकर्षाने भासत आहे . त्यांचे कार्य दलित पँथरच्या माध्यमातून पुन्हा उभे करण्यासाठी आज आम्ही सारे प्रयत्न करीत आहे . त्यांच्या नावाचे भव्य स्मारक पुण्यात उभारणीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत . तशी मागणी आम्ही पुणे महापालिकेकडे करणार आहोत . तसेच पदमश्री नामदेव ढसाळ साहित्यरत्न पुरस्कार दरवर्षी साहित्यिकास  देणार आहोत .

यावेली अशोक कांबळे यांनी दलित पँथरच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच नगरसेवक प्रदीप गायकवाड , राहुल तायडे , विजय बहुले , रमेश जगताप ,पद्मावती शिंदे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश साळवे यांनी केले तर आभार विठ्ठल केदारी यांनी मानले . या कार्यक्रमाचे आयोजनासाठी शुभम सोनवणे , राहुल भोसले , विनायक केसरे , बलराम सिंग , विशाल दनाने , नितीन पवार , शशी निकाळजे , किशोर चव्हाण , मुकेश रणदिवे , मछिंद्र पाटोळे , दीपक गोपाळे आदींनी विशेष परिश्रम घेतले .

वडगाव -धायरी प्रभाग (३३) अंतर्गत “माझा प्रभाग – माझी जबाबदारी” नागरिकांची पर्यावरण समिती स्थापन

0
कचरा व्यवस्थापन कार्यशाळेला चांगला प्रतिसाद
पुणे :
पुणे शहरात वडगाव -धायरी प्रभाग क्र. (३३) अंतर्गत ‘माझा प्रभाग-माझी जबाबदारी’ नागरिकांची पर्यावरण समिती स्थापन करण्यात आली. या समिती अंतर्गत ‘कचरा व्यवस्थापन कार्यशाळा’ संपन्न झाली. सदर कार्यक्रम शनिवारी ‘मुक्ताई गार्डन’, धायरी येथे पार पडण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून घन कचरा व्यवस्थापन सह-आयुक्त सुरेश जगताप आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ चे कायदेशीर सल्लागार दत्तात्रय देवाळे उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, हरीदास चरवड, राजश्री नवले, नीता दांगट, टिळक रोड क्षेत्रीय कार्यालय चे उपायुक्त उमेश माळी, ‘वनराई’ चे रविंद्र धारिया, मुकुंद शिंदे, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ चे शेखर मुंदडा, ‘क्लीन गार्बेज मॅनेजमेंट’चेविलास पोकळे, ललित राठी, माजी नगरसेवक बाळासाहेब नवले, ‘व्यापारी असोसिएशन’चे सचिन निवंगुणे, ‘सागर मित्र’ चे विनोद बोधनकर, ‘सोशल रिस्पोन्सिबिलिटी’ चे विजय वरुडकर उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या माध्यमातून सामाजिक संस्था, कार्यकर्ते, प्रशासकीय कर्मचारी व सामाजिक क्षेत्रातील विविध विषयातील तज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन विषयी जनजागृती अभियान व प्रत्यक्ष कृती- उपाययोजना राबवण्यात आली. या उपक्रमात प्राथमिक प्रशिक्षण, घन कचरा व्यवस्थापन प्रदर्शन व चर्चा हेतू, प्रभागातील नागरिक, सोसायटी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी कचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून धायरी-वडगाव प्रभाग क्र. 33 परिसरातील सर्व प्रकारच्या कचर्‍याचे व्यवस्थापन व्हावे व पर्यावरण संतुलन कार्यासाठी प्रशासन यंत्रणेबरोबर नागरिकांचा सहभाग वाढवा हा हेतू ठेऊन ‘सोशल रिस्पोन्सिबिलिटी’ तर्फे या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय वरुडकर यांनी केले. आभारप्रदर्शन ललित राठी यांनी केले. आशीष पोलकडे यांनी ओला कचर्‍याबद्दल व सुका कचर्‍याबद्दल ‘एन्व्हार्यमेंटल क्लब ऑफ इंडिया’चे नीलेश इनामदार यांनी मार्गदर्शन लाभले.
प्रदर्शनामध्ये घन कचर्‍यात काम करणार्‍या संस्था आणि इतर सामाजिक संस्था चे योगदान होते. यामध्ये ‘जनवाणी’, ‘स्वरूप इंडस्ट्रीज’, ‘ऑपेल प्रो’, ‘प्याटपर्ट’, ‘ग्रीन इफेक्ट’, ‘क्लीन गार्बेज मॅनेजमेंट’ या संस्थांचा समावेश होता.
‘जनवाणी’तर्फे ओला आणि सुक्या कचर्‍याच्या वर्गीकरणाबद्दल माहिती देण्यात आली. तसेच ‘स्वरूप इंडस्ट्रीज’ तर्फे उद्योजक बर्वे आणि घळसाई यांनी घरगुती कंपोस्ट चे मॉडेल, ‘ऑपेल प्रो’ तर्फे होम कंपोस्ट, ‘प्याटपर्ट’ तर्फे टाकाऊ प्लॅस्टिक कचर्‍यापासून निर्माण होणारे ऑइल, ‘ग्रीन इफेक्ट’ तर्फे घरातल्या सुक्या कचर्‍यापासून पुनर्वापर करण्यात आलेल्या वस्तू, ‘क्लीन गार्बेज मॅनेजमेंट’तर्फे संकलन केलेल्या कचर्‍याचे रिसायकलिंग याबद्दल माहिती सादर करण्यात आले होते.
‘माझा प्रभाग-माझी जबाबदारी’ नागरिकांची पर्यावरण संयोजक समितीमध्ये ‘एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया’, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’, ‘सोशल रिस्पोन्सिबिलिटी’, ‘केदारनाथ सामाजिक संस्था’, ‘विशाल सिंहगड विद्या व क्रीडा प्रतिष्ठान’, ‘कै. चंद्रकांत दांगट पाटील ट्रस्ट’ व ‘मुक्ताई प्रतिष्ठान’ यांचा समावेश होता.

मराठी भाषेचा विकास आणि वाढ होणे आवश्यक: डॉ सदानंद मोरे

0
पुणे :  ‘भाषा भाषांमध्ये फरक करू नये. मराठी भाषा सर्वांना समान वागवणारी भाषा आहे. मराठी भाषेचा विकास केला पाहिजे, वाढ केली पाहिजे. एम सी ई सोसायटीच्या स्पोकन इंग्लिश अकॅदमी च्या या कार्यक्रमाने मराठी भाषेला चांगला प्रतिसाद दिला आहे’, असे प्रतिपादन इतिहास संशोधक डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
निमित्त होते ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘स्पोकन इंग्लिश अ‍ॅकॅडमी’तर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या चा समारोप कार्यक्रमाचे. आझम कॅम्पस मधील डॉ ए आर शेख असेम्बली हॉल मध्ये आयोजित या कार्यक्रमाला इतिहास संशोधक डॉ .सदानंद मोरे होते.
यावेळी ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’ चे संचालक प्रा. डॉ आर गणेसन, मराठी अकादमीच्या संचालक नूरजहाँ शेख उपस्थित होते.
डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते मराठी भाषा पंधरवडा तील आयोजित विविध स्पर्धामधील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले .
समारोपप्रसंगी बोलताना डॉ. मोरे म्हणाले, ‘मराठी भाषेच्या अभिवृद्धीमध्ये मुस्लिम बांधवानी फार मोठे योगदान दिले आहे. सर्व भाषांना समानतेची वागणूक दिली पाहिजे. ‘
आझम कॅम्पस आणि शहरभर हे कार्यक्रम झाले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातील उपक्रमांमध्ये ‘काव्य वाचन स्पर्धा’, ‘वक्तृत्व स्पर्धा’, ‘नाटक स्पर्धा’, ‘मराठी चित्रपट’शो, ‘महाराष्ट्रीयन खाद्य मेळावा, ‘मराठी लेखक आणि कवी भित्तीपत्रक स्पर्धा’, ‘प्रश्नमंजुषा स्पर्धा’, ‘महाराष्ट्रीयन वेशभूषा स्पर्धा’, कथाकथन, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बोगस कर्मचाऱ्यांची फॅक्टरी- पुणे महापालिका (मायमराठी विशेष-व्हिडीओ रिपोर्ट )

0

पुणे-वेगवेगळी पारितोषिके घेवून स्वतःला नामांकित महापालिका म्हणवून घेणाऱ्या पुणे महापालिकेचा एक वेगळा चेहरा समोर येत आहे … ज्यामुळे गरजू तरुणांना ‘बोगस कर्मचारी ‘बनविणारी महापालिका अशी प्रतिमा या महापालिकेची बनणार आहे .
गेल्या वर्षी माय मराठी ने मिळकत कर विभागात पकडलेल्या तोतया कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर ..बोगस कर्मचाऱ्यांच्या पुढील शोध मोहिमेत आणखी धक्कादायी माहिती पुढे येत आहे . या प्रकरणी अपराधी कोण ? असा प्रश्न उपस्थित होईल तेव्हा प्रशासनातील बड्या बड्या अधिकाऱ्यांकडे बोटे दाखविली जाणार आहेत . काल ‘मायमराठी’ ने अशा महापालिकेतील ७८ ‘तथाकथित बोगस’ कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध केल्यानंतरही आज १५ जाने.२०१८ रोजी बिनदिक्कतपणे महापालिका प्रशासन याच बोगस कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेताना दिसून आले. हे स्पष्ट व्हावे म्हणून सत्ताधारी भाजपचे नगरसेवक महेश वाबळे यांनी आज भूमी जिंदगी खात्यात काम करणाऱ्या एका बोगस कर्मचाऱ्याचा पर्दाफाश माय मराठी च्या कॅमेऱ्यापुढे केला .
गेल्या वर्षी कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि अविनाश बागवे यांनी आणि माय मराठी ने केलेल्या धडक कारवाईत एक बोगस कर्मचारी पकडला गेला .ज्याच्यावर महापालिकेकडून गुन्हा दाखल करण्यात आला. आणि त्यानंतर महापालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून ज्या व्यक्ती अधिकृतपणे महापालिकेच्या सेवेत नाहीत अशा व्यक्तींना महापालिकेच्या फाईल्स,संगणक आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या खुर्च्या वापरू देवू नयेत ,असे आदेश सर्व खातेप्रमुखांना दिले होते .या शिवाय सुरक्षा विभागाने महापालिकेची सर्व दरवाजे  बंद करून केवळ एकगेट प्रवेशासाठी आणि एक गेट  बाहेर पडण्यासाठी निश्चित करून तातडीने अंमलबजावणी केली . नगरसेवक ,पालिकेचे सेवक,अधिकारी यांच्या व्यतरिक्त जे कोणी पालिकेत येतील अशा सर्व नागरिकांची प्रवेशद्वारावर नोंद ठेवून पालिकेत प्रवेश दिला जावू लागला .
पण सध्या तरी हा सर्व देखावाच असल्याचे निष्पन्न झाले आहे .मिळकत कर विभागात गेल्या वर्षी एक ‘बोगस ‘कर्मचारी पकडूनही अन्य ‘बोगस’ कर्मचाऱ्यांचा कारभार व्यवस्थित सुरूच राहिला हे विशेष . अशा बोगस कर्मचाऱ्यांची संख्या ७८ असल्याचे निष्पन्न झाले . नियुक्ती पत्र नाही , ओळखपत्र नाही ,अधिकृत पगार नाही अशा अवस्थेत हि तरुणाई महापालिकेत काम करत राहिली .
याबाबत अधिक माहिती घेतल्यानंतर असे निष्पन्न झाले कि हि तरुणाई पूर्वी स्मार्ट नावाच्या संस्थेमार्फत महापालिकेत विशिष्ट काळापुरती कामावर ठेवण्यात आली होती . हि कालमर्यादा संपल्यानंतर त्यांना कामावरून कागदोपत्री काढून टाकण्यात आले . पण प्रत्यक्षात हि तरुणाई आहे तशीच काम करत राहिली ,ज्यांना पगार महापालिका नव्हे तर अधिकारी ,आणि ठेकेदार यांच्यामार्फत दिला जातो .
बोगस कर्मचारी म्हणून ज्यांच्यावर शिक्का बसतो आहे अशा ७८ तरुणांची महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गेली वर्षभरापासून ‘स्मार्ट’ फसवणूक होत असल्याचे आणि सर्व कामगार कायदे धाब्यावर बसवून महापालिका प्रशासनानेच हे ७८ कर्मचारी बेकायदेशीर रित्या महापालिकेत कामावर ठेवले असून त्यांचा वापर करून घेत असल्याचे दिसते आहे .विशेष म्हणजे ज्यांनी कामगार कायदे पाळायचे आणि उल्लंघन होणार नाही याकडे लक्ष ठेवायचे अशा सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे सर्रास डोळेझाक चालविली हि आणखी मोठी धक्कादायी बाब आहे .