पुणे – महाआरोग्य शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी नियोजनबध्द कामे करुन दिलेल्या जबाबदाऱ्या चोख पार पाडाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिल्या.
तालुका मावळ येथे दि. 21 जानेवारी 2018 रोजी होणाऱ्या महाआरोग्य शिबिराची नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे श्री. राव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार संजय भेगडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर.के. शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने उपस्थित होते.
श्री. राव म्हणाले, महाआरोग्य शिबिराच्या ठिकाणी व्यासपीठ, मैदानाची व्यवस्था करावी. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच दक्षता व आपत्ती व्यवस्थापनासाठी पोलीस, महसूल व प्रादेशिक परिवहन विभागाने समन्वयाने काम करावे. रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाने औषधांचा साठा पुरेसा ठेवावा व रुग्णांची वेळेत तपासणी करुन औषाधोपचार करावेत. नागरिकांना योग्य ते मागदर्शन करण्यासाठी स्वयंसेवक नेमावेत. तसेच गर्दी होवू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात यावी
श्री. भेगडे म्हणाले, महाआरोग्य शिबीराच्या ठिकाणी वाहतूकीची कोंडी होवू नये, यासाठी पार्कींगची व्यवस्था करावी. नागरिकांच्या सुरक्षेसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करावा. शिबीर पार पाडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्यांमधील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी सोपविलेल्या जबाबदाऱ्या चोख पार पाडाव्यात.
यावेळी श्री. मांढरे, श्री. मुठे, डॉ. शेळके यांनीही उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.