Home Blog Page 3165

एफसी पुणे सिटी संघाचा दिल्ली डायनॅमोस एफसी संघावर विजय

0
पुणे- विभागातील प्राथमिक फेरीच्या पाचव्या ग्रुपमध्ये एफसी पुणे सिटी  (रेझर्व)  संघाने पुणे येथे पिरंगुट फुटबॉल मैदानावर दिल्ली डायनॅमोस एफसी संघाचा 1-0 असा पराभव केला.
 
एफसी पुणे सिटी (रेझर्व) संघाचा मिडफिल्डर राहुल यादवने 58 व्या मिनिटाला स्पर्धेतील आपला दुसरा गोल नोंदविला.एफसी पुणे सिटी पाच गेमनंतर अपराजित राहिली आणि गोलरक्षक अनुज कुमारने चारही सामन्यांमध्ये एकही गोल होऊ दिला नाही.
 

एफसी पुणे सिटी संघचा सामना 23 एप्रिल 2018 रोजी दिल्ली डायनॅमोस एफसी संघाबरोबर  आंबेडकर स्टेडियमवर, नवी दिल्ली येथे होणार आहे. 

शहर सुधारणा च्या अध्यक्षपदी मेंगडे तर महिला बालकल्याण च्या अध्यक्षपदी नवले (व्हिडीओ)

0

पुणे- महापालिकेत एक हाथी सत्ता असल्याने आज झालेल्या विषय समित्यांच्या निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले .आज दुपारी स्थायी समितीच्या सभागृहात या निवडणुका झाल्या . शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी सुशील मेंगडे यांची तर महिला बालकल्याण समितीच्या  अध्यक्षपदी राजश्री नवले यांची आणि विधी समितीच्या अध्यक्षपदी माधुरी सहस्त्रबुद्धे ,क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी राहुल भंडारे यांची निवड झाली .तर उपाध्यक्षपदी शहर सुधारणा – अजय खेडेकर , उपाध्यक्ष विधी समिती -विजय शेवाळे , उपाध्यक्ष क्रीडा समिती -जयंत भावे यांची निवड झाली .कृषी प्रकल्प अधिकारी सुशील खोद्वेकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले . महापौर मुक्ता टिळक , सभागृहनेते श्रीनाथ भिमाले,स्थायी समिती अध्यक्ष -योगेश मुळीक , विरोधी पक्ष नेते चेतन तुपे पाटील, नगरसचिव सुनील पारखी आदींनी यावेळी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले .

शिवसेनेने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला . तर कॉंग्रेस राष्ट्रवादीने पराभव माहिती असूनही निवडणूक लढविली .

विरोधीपक्षांच्या वर्तणुकीच्या निषेधासाठी पुण्यात खा. शिरोळेंच्या नेतृत्वाखाली भाजपचे १२ एप्रिलला लाक्षणिक उपोषण …

पुणे-विरोधीपक्षांच्या वर्तणुकीच्या निषेधासाठी भाजपच्या वतीने १२ एप्रिलला लाक्षणिक उपोषणकरण्यात येणार असून
पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर चौकात खासदार अनिल शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली गुरवार दि. १२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्या पासून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापौर मुक्ता टिळक, सर्व लोकप्रतिनिधी, पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपोषणात सहभागी होणार आहेत. कॉंग्रेसच्या लोकशाही विरोधी भूमिकेला विरोध करण्यासाठी या उपोषणाला पुणेकरांनी मोठ्या संख्येने पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात खासदार अनिल शिरोळे यांनी सांगितले कि ,संसदेचे कामकाज चालविणे ही आम्ही देशवासियांच्या प्रतीची बांधिलकी मानतो. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेचे कामकाज फक्त ४३ तास तर राज्यसभेचे कामकाज ४५ तास चालू शकले. दोन्ही सभागृहाचे कामकाजाचे तब्बल २४८ तास वाया गेले.
विरोधी पक्षांच्या आडमुठ्या धोरणांमुळे संसदेचे कामकाज होऊ शकले नाही. त्याच्या निषेधार्थ भाजपच्या खासदारांनी संसदेच्या प्रांगणातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर धरणे धरले. विरोधी पक्षांच्या वर्तणुकीचा सनदशीर मार्गाने निषेध करण्यासाठी भाजपचे सर्व खासदार गुरवार दि. १२ एप्रिल रोजी आपआपल्या मतदारसंघात उपोषण करणार आहेत.
संसदीय कामकाजात अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्वपूर्ण असते. ते अधिवेशन चालू न देण्याची विरोधकांची रणनिती म्हणजे त्यांच्या बौध्दिक दिवाळखोरीचे दर्शन होते. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन गेल्या १८ वर्षांतील सर्वात कमी कामकाज झालेले अधिवेशन ठरले आहे. देशाची अर्थव्यवस्था गतीमान होत आहे. जीएसटी सारखा आर्थिक निर्णय महत्वपूर्ण ठरत आहे. ईज ऑङ्ग बिझनेसबाबत भारताचे मानांकन उंचावलेले आहे. शेतकर्‍यांच्या उत्पन्न वाढीसाठी सर्वार्थाने हिताचे व योग्य निर्णय घेतले जात आहेत.
मोदी सरकारची जनमानसातील प्रतिमा उंचावली असून, विकासाची कामे करणारे पारदर्शक, गतीमान सरकार अशी ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले असून, आगामी निवडणुकीतील पराभवाच्या भितीने कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी संसदेचे कामकाज रोखून धरले. भाजपच्या उंचावणार्‍या यशाच्या आलेखाने भयभीत होऊन काही प्रादेशीक पक्षांनी कॉंग्रेसला साथ दिली आहे.
निरव मोदीसारख्या गुन्हेगारांना चाप लावणारे विधेयक या अधिवेशनात संमत होणार होते. हे विधेयक संमत झाले असते तर अनेक गुन्हेगार अडकले असते. या गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी कॉंग्रेसने संसदेचे अधिवेशन रोखण्याचा मार्ग अवलंबिला आहे.
मोदी स्पष्ट बहुमताने सत्तेवर आल्यास ते संसद धाब्यावर बसवून सत्ता हाकतील अशी अनाठायी भिती व्यक्त करून देशात गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. परंतु भाजपाने संसदेच्या परंपरांचे पालन करीत अनेक निर्णय सर्वसहमतीने घेतले आहेत. कॉंग्रेसची जनहितविरोधी भूमिका देशातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि या अपप्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबिण्यात आला आहे.
सभापती किंवा उपसभापती हा निरपेक्ष असतो. राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरियन यांनी संसदेतील गदारोळाला कॉंग्रेस व विरोधी सदस्य जबाबदार धरले आहे. संसद चालू देण्यास सत्ताधारी पक्ष इच्छुक नसल्याची टीका साङ्ग चुकीची असल्याचेही त्यांनी जाहीरपणाने स्पष्ट केले. त्यांचे विधान जबाबदार पीठासीन अधिकारी म्हणून केलेले आहे. कॉंग्रेसचा अपप्रचार उघडा करण्यासाठी ते पुरेसे आहे.असेही अनिल शिरोळे यांनी म्हटले आहे .

शिवसेनेच्या मुळावर घाव घालणारे भाजपचे धंदे

0

अहमदनगर : एकीकडे युती करायची आणि दुसरीकडे शिवसेनेच्या मुलावर घाव घालणारे धंदे भाजप करत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. नगरमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून दहशत माजवण्याचा प्रकार सुरू आहे. नगरचा उत्तर प्रदेश झाला आहे. गृहखात्याची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्र्यांचं हे अपयश आहे, अशी टीका कदम यांनी केली. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर हि प्तात्रकार परिषद झाली .
शिवसेनेचे संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर आज दिवसभर नगरमध्ये तणाव आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी येथे येऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘भाजप आमदार शिवाजी कर्डिले व राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप व अरुण जगताप हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. एकीकडे युती असल्याचे दाखवायचे व दुसरीकडे शिवसेनेच्या मुळावर घाव घालण्याचे भाजपचे धंदे आम्हाला नवीन नाहीत,’ असा आरोप रामदास कदम यांनी केला.
शिवसैनिकांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी व्हावी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे. दोन्ही मृत शिवसैनिकांच्या कुटुंबीयांची जबाबदारी शिवसेना घेणार, असेही त्यांनी जाहीर केले. या घटनेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, असेही ते म्हणाले. सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे व कोतवाली पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या संगनमताने राष्ट्रवादीची नगरमध्ये गुंडगिरी सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणीही कदम यांनी केली आहे.

उदगीर, निलंगात गारांसह पाऊस

0

लातूर -जिल्ह्यातील उदगीर, निलंगा शहर आणि परिसरात गारांसह पावसाची दमदार बॅटिंग पाहायाला मिळाली. काही मिनिटे झालेल्या या पावसाने नागरिकांची दाणदाण उडाली. अचानक बरसलेल्या पावासाने शेतमालाचं मोठं नुकसान झाले आहे. तुफान पावसामुळे शहरातील भाजी विक्रेते आणि दुकानदारांची शेतमाल सुरक्षित स्थळी नेताना तारांबळ उडाली. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील उघड्यावर असलेला शेतमाल भिजल्याने बरेच नुकसान झाले आहे.

बेळगावमध्ये झाली गारपीट
बेळगाव शहरातही गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून उष्म्याने त्रस्त झालेल्या बेळगावकरांना ऐन उन्हाळ्यात सुखद गारवा अनुभवण्यास मिळाला. आज दुपारी ढगांचा गडगडाट सुरु झाला आणि पाऊस बरसण्यास सुरुवात झाली. त्यानंतर काही मिनिटांनी गाराही पडायला लागल्या. जवळपास 15 ते 20 मिनिट ही गारपीट सुरु होती.

व्हिजनरी उद्योजक, अनेकांचा अधारवड हरपला

0
 उद्योजक एस. बालन यांना मान्यवरांनी अर्पण केली श्रद्धांजली
पुणे-  साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे उत्तम उदाहरण असलेल्या एस. बालन यांच्यावर दैवी संस्कार झालेले होते. अत्यंत मृदु स्वभावचे, विनम्र, आदर्श व्यक्तीमत्व असलेले एस. बालन खऱ्या अर्थाने व्हिजनरी उद्योजक,  शिक्षण महर्षि होते,  त्यांच्या निधनाने अनेकांचा आधारवड हरपला अशी भावना व्यक्त करत मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.
ऑटोमोबाईल, रिअल इस्टेट, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रसिद्ध उद्योजक एस. बालन यांचे २९ मार्च रोजी निधन झाले. उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक कामात आपल्या कार्याचा ठसा उमटविलेल्या एस. बालन यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शनिवारी  श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती, यावेळी माजी खासदार रजनी पाटील, उद्योजक प्रकाश धारीवाल,  मराठी बांधकाम व्यावसायिक सघटनेचे अध्यक्ष गजेंद्र पवार, आमदार  अरुण जगताप, नगरसेवक अविनाश साळवे,  प्रजापती ब्राम्हकुमारी परिवाराच्या सुनंदा दीदी,  पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवीदास भंसाली, शिवसेनाचे रघुनाथ कुचिक,  अशोक अष्टेकर,  डॉ. नारायण  ढेकने,  अजिंक्य घाटे, राजेंद्र चोप्रा, उमेश जोशी, सतीश जोशी,  परिवर्तनचे किशोर ढगे, आयसर चे डॉ. नातू,  पोलिस अधिकारी विलास भोसले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एस.बालन यांच्या आठवणीना उजाळा देत आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी एस. बालन यांचे सुपुत्र पुनीत बालन यांनी कृतज्ञता व्यक्त करत बालन परिवाराच्या वतीने उपस्थित सर्वांचे आभार मानले.

खालसा दुचाकी रॅली उत्साहात संपन्न

0

पुणे-शीख यंग सर्कलच्यावतीने खालसा दुचाकी रॅली उत्साहात संपन्न झाली .पुणे कॅम्प जवळील रेसकोर्सजवळील गुरुद्वारा गुरुनानक दरबारपासून या रॅलीला गुरुद्वारा गुरुनानक  दरबारचे बिल्डिंग कमिटीचे चेअरमन संतसिंग मोखा यांच्याहस्ते ध्वज उंचावून करण्यात आले. यावेळी शीख यंग सर्कलचे अध्यक्ष अमरजितसिंग परिहार , गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग सहानी , रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य दलजितसिंग रँक, शीख यंग सर्कलचे कार्याध्यक्ष चरणजितसिंग कोहली ,  गुरुमुखसिंग खोक्कर , उपाध्यक्ष बलजितसिंग वाढे , सहसचिव गुरुदेवसिंग वाढे   , गुरुमतसिंग रत्तू , राजेंद्रसिंग वालिया , प्रितवालसिंग खंडूजा , गुरुमितसिंग कोहली ,हरजितसिंग बेदी  व शीख बांधव उपस्थित होते . यावेळी शीख युवक मोठ्या संख्येने दुचाकीसह रॅलीमध्ये सहभागी झाले होते . हि रॅली गुरुद्वारा गुरुनानक दरबारपासून सुरुवात झाली  पुणे कॅम्प , नाना पेठ , गणेश पेठ गुरुद्वारा , शिवाजीनगर गावठाण , ससून रुग्णालय रस्ता, अलंकार टॉकीज , बंडगार्डन , सादलबाबा चौक यामार्गे , खडकी , दापोडी , पिंपरी , आकुर्डी , निगडी मार्गे देहू रोड येथील गुरुद्वारा येथे रॅली समाप्ती झाली  .रॅली मार्गावर शरबत वाटप करून ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले .

बैसाखीपासून शीख लोकांच्या नववर्षास सुरवात होते. बैसाखी शक्यतो चौदा ते पंधरा एप्रिलच्या दरम्यान येते. या महिन्यापासूनच ते पेरणीस सुरवात करतात. सन १६९९  साली याच दिवशी शीखांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांनी ‘खालसा’ पंथाची स्थापना केली होती. त्यानिमित्त शीख यंग सर्कलच्यावतीने खालसा दुचाकी रॅलीचे दरवर्षी रॅलीचे आयोजन करण्यात येते अशी माहिती  शीख यंग सर्कलचे अध्यक्ष अमरजितसिंग परिहार यांनी दिली .

नारायण राणेंचा कोंडमारा -भाजपा- शिवसेना एकत्र आल्यास युतीतून बाहेर पडणार

0

मुंबई-भाजपाने शिवसेनेसमोर मैत्रीचा हात पुढे केला असतानाच नारायण राणे यांनी भाजपाला इशारा दिला आहे. भाजपा- शिवसेनेची युती झाली तर मी युतीत नसेन. मी युतीतून बाहेर पडणार, असा इशाराच नारायण राणेंनी दिला आहे. राज्यात भाजपाने ठरवले तर त्यांची स्वबळावर सत्ता येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.एकंदरीत जाईल तिथे नारायण राणेंचा कोंडमारा होईल अशी परिस्थिती निर्माण होते कि काय ? असा प्रश्न त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित होतो आहे .

नारायण राणे यांनी ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात भाजपा, शिवसेना व सद्य राजकीय स्थितीबाबत भाष्य केले. शिवसेना- भाजपा युतीविषयी ते म्हणाले, भाजपाच्या मंत्रिमंडळात मी गेलो तर शिवसेना सत्ता सोडणार होती. त्यांना इतकं असेल तर ते युतीत आले तर मी देखील युतीत राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. शिवसेना माझा क्रमांक एकचा शत्रू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपाने कोणाशी युती करावी हा त्यांचा प्रश्न आहे. पक्ष स्वबळावर येणार नाही हे जाणवल्यास युती केली जाते. पण राज्यात भाजपाने ठरवले तर त्यांची स्वबळावर सत्ता येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. राहुल गांधी मोठे होतायेत. पण त्यासाठी वेळ लागेल, असेही ते म्हणालेत.

भाजपाकडून मला २०१४ पासून विचारणा होत होती. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विमान प्रवास करत असताना त्यांनी मला पक्षात येण्याची ऑफर दिली. त्यांनी मला राज्यात मंत्रिपद देण्याची तयारी दर्शवली. २०१९ पर्यंत महाराष्ट्रात राहण्याचा आणि त्यानंतर दिल्लीत जाण्याचा निर्णय मी स्वतःच घेतला होता. पण भाजपासमोर काही अडचणी आल्या. सत्तेतून बाहेर जाण्याची शंका निर्माण झाल्याने भाजपाने मला राज्यसभेत खासदारकीची ऑफर दिली. मी ती ऑफर नाकारली होती. पण पक्षाध्यक्ष अमित शहांनी माझ्याशी चर्चा केली. तुम्हाला दिल्लीत कायमस्वरुपी ठेवणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आणि मग मी त्यासाठी तयार झालो, असे त्यांनी सांगितले. ही एक तडजोड होती. पण राज्यात भाजपाची सत्ता जाऊ दिली नसती, असा दावाही त्यांनी केला.

कुणालकुमार यांचे ‘हे आदेश’ संशयाच्या भोवऱ्यात…

0

पुणे-महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बदली झाल्यानंतर पदभार सोडण्याचे आदेश आले त्या दिवशी म्हणजे ६ एप्रिल आणि ५ एप्रिल  रोजी घेतलेल्या निर्णयांची  आणि दिलेल्या आदेशांची खऱ्या अर्थाने योग्य आणि काटेकोर चौकशी झाली तर बरेच गौडबंगाल बाहेर येईल असा दावा पालिकेच्या राजकीय आणि प्रशासकीय अशा दोन्ही स्तरावरून करण्यात येतो आहे. एकूण कुणालकुमार  यांची तशी संपूर्ण कारकीर्द संशयास्पद राहिली आहे. यांच्या कारकिर्दीत ७२ लोक जे महापालिकेचे अधिकृत वा ठेकेदार पद्धतीने देखील कर्मचारी नसताना बिनदिक्कत पणे महापालिका भवनात कुणालकुमार यांच्या समक्ष विविध खात्यात काम करत होते ,यापैकी दोघांना ‘मायमराठी’ने रंगेहाथ पकडून दिले .पण त्यानंतर बोगसकर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करायचे नाहीत , केवळ याबाबत थातूर मातुर उपाययोजना करायच्या असे करीत कारभार पुढे रेटण्यात आला. या कामी त्यांना सहाय्य करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही कुणाल कुमार यांनी सातत्याने प्रोटेक्ट केल्याचे वारंवार दिसून आले आहे.कुणाल कुमार यांच्याच कारकिर्दीत २४ बाय ७ पाण्याच्या योजनेत सुमारे ५०० कोटीने वाढलेली निविदा रक्कम उघड झाली .स्मार्ट पुणे करता करता कधी  टेंडर जादा दराने आल्याचे तर कधी इस्टीमेट रक्कम वाढीव केल्याचे वेळोवेळी निष्पन्न झाले .बोगस कर्मचाऱ्यांचा डाग तर त्यांच्या कारकीर्दीवर राहीलच पण त्याबरोबर त्यांच्या , सायकल ट्रेक शहरात उखडणे आणि उभारणे, पे आणि पार्क संपूर्ण महापालिका हद्दीत करण्याचा प्रस्ताव करने अशा योजना वादग्रस्त झाल्या आणि वादग्रस्त राहतील अशी शक्यता असताना ,अगदी जाता जाता देखील त्यांनी काही आदेश काढले आहेत . जर आपली बदली झाली आहे आपल्याला येथील पदभार सोडायचे आदेश आलेले आहेत  हे माहिती असताना कुणाल कुमार यांनी आपल्या सहीने काढलेले आदेश .. संशयाच्या भोवऱ्यात सापडतील असेच आहेत .अर्थात काही पदाधिकारी त्याबाबत पाठीराखे आहेत . ते फार काळ लपून राहू शकत नाही .पण सध्या एवढे काय नडले होते ,कुमारांचे आणि पुणे शहराचे कि त्यांनी हे आदेश जाताजाता काढले ..ते आदेश पहा इथे

 

 

 

कुणाल कुमार यांनी चार अधिकाऱ्यांना अखेर उपायुक्तपदी बढती दिली आहे. महापालिकेतील आयुक्त पदाचा कार्यभार सोडतानाच कुमार यांनी बढतीच्या आदेशावर सही केली आहे. याबरोबरच चार अधिकाऱ्यांना सहायक आयुक्तपदी बढती देऊन मोठ्या प्रमाणात प्रशासकीय बदलही त्यांनी केले आहेत.

आयुक्तपदाच्या जबाबदारीतून मुक्त होताना कुमार यांनी या बढतीला मान्यता दिली आहे. उपायुक्तपदी बढती देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये माधव देशपांडे, संध्या गागरे, उमेश माळी तसेच वसंत पाटील या चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे; तर वैभव कडलख आणि आशिष महादडळकर, संतोष तांदळे, सुनील झुंजार यांना सहायक महापालिका आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे.

याबरोबरच पालिकेकडून शहरासाठी राबविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय नदी संवर्धन प्रकल्प तसेच सार्वजनिक पार्किंग धोरणाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यासही महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. पथ विभागाचे प्रभारी प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या राजेंद्र राऊत यांची बांधकाम विभागात बदली करण्यात आली असून त्यांचा पदभार अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे देण्यात आला आहे; तर अधीक्षक अभियंता मदन आढारी, विजय शिंदे यांचीही पथ विभागात बदली करण्यात आली आहे. भवन रचना विभागाचे प्रमुख संदीप खांडवे यांच्याकडे मलनिस्सारण, देखभाल दुरुस्ती विभागाचा पदभार देण्यात आला आहे.

या शिवाय अनेक वर्षे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या कात्रज-कोंढवा रोडच्या कामाच्या निविदेवर आयुक्त कुणाल कुमार यांनी स्वाक्षरी केली आहे. या रस्त्याचे पालिकेच्या नियमानुसार अद्यापही भूसंपादन झाले नसताना तब्बल १७८ कोटी रुपयांच्या निविदेला आयुक्तपदाचा पदभार सोडण्याच्या आदल्या दिवशी कुमार यांनी मान्यता दिल्याने यामध्ये काळेबेरे असल्याची चर्चा पालिकेत सुरू झाली आहे.

 

मुख्यमंत्र्यांचे विधान अपरिपक्वपणाचे : खासदार – वंदना चव्हाण

0
पुणे ः 
मुख्यमंत्री कार्यालयाच्या चहापाण्याच्या खर्चावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी उपस्थित केलेली शंका संसदीय भाषेत होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले प्रत्युत्तर अपरिपक्वपणाचे आहे.
राष्ट्रवादी औषधालाही उरणार नाही, असे म्हणणे तर फाजील आत्मविश्‍वासाचे लक्षण आहे, असा बालीशपणा मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीकडून अपेक्षित नाही, अशी टीका पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा, खासदार, अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी केली आहे.शनिवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी ही टीका केली आहे.
‘भारतीय जनता पक्षाच्या वर्धापनदिना’ची सभा अत्यंत खालच्या पातळीवरील भाषणांची झाली. त्यात राष्ट्रीय अध्यक्षांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी पातळी सोडली. संस्कारांचे वारंवार नामस्मरण करणार्‍या पक्षाचे प्रत्यक्षातील वर्तन दिसून आले आहे. विरोधकांना कोल्हे, लांडगे म्हणणे लोकशाहीच्या कोणत्या व्याख्येत बसते?’ असा प्रश्‍न अ‍ॅड. खासदार वंदना चव्हाण यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस लोकशाहीच्या भल्यासाठी कोणच्याही नादाला लागायला घाबणार नाही आणि औषध घेण्याची कोणावर वेळ येते, हे ही आगामी काळात कळेल, असा टोलाही खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी लगावला आहे.
देशातील राज्यातील वातावरण भाजपाला प्रतिकूल होत चालले आहे. जनतेचा भ्रमनिरास झालेला आहे आणि विरोधक मतभेद विसरून एकत्र येत असल्याने, भाजप नेतृत्वाचा जळफळाट होत असून, अशा भाषणातून तो व्यक्त होत आहे, असेही खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी पत्रकात म्हटले आहे. ​
जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम तर भाजपाच करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अशा मार्गावरून मार्गक्रमण करीत नाही. लोकांची दिशाभूल करण्याचे काम भाजपा करीत आहे, असेदेखील खा. चव्हाण म्हणाल्या.

​महसूल विभाग अधिक पारदर्शी आणि गतिमान होण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रयत्न करावेत

0

पुणे- महसूल विभाग अधिक पारदर्शी आणि गतिमान होण्यासाठी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

राज्यातील सर्व विभागीय आयुक्त यांच्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे आयोजित कार्यशाळेत   श्री. पाटील बोलत होते. यावेळी महसूल व मुद्रांक शुल्क नोंदणी विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, पुणे, कोकण, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या विभागांचे विभागीय आयुक्त अनुक्रमे सौरभ राव, जगदीश पाटील, राजाराम माने, पुरुषोत्तम भापकर, अनुप कुमार, पियूष सिंह, राज्याचे नोंदणी महानिरिक्षक अनिल कवडे आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले,  विविध विभागांच्या तुलनेत सर्वात जास्त निर्णय महसूल विभागाने घेतले आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात सुलभता येत आहे, ही बाब आनंदाची आहे. री एडिट मोड्यूल अंतर्गत नागरिकांच्या सोयीसाठी सातबारा संगणकीकरणाचे काम गतीने पूर्ण करावे. येत्या 30 एप्रिल पर्यंत राज्यातील 300 तालुक्यांचे काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी नियोजन करुन त्याप्रमाणे कार्यवाही करावी, अशी सुचना करुन या कामात अमरावती विभागाचे काम शंभर टक्के झाल्याबदद्ल श्री. पाटील यांनी विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांचे अभिनंदन केले.

श्री. पाटील म्हणाले, प्रशासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख होण्यासाठी बऱ्याच ध्येयधोरणांमध्ये बदल करणे आवश्यक असते. हे बदल घडविण्यासाठी विभागीय आयुक्तांनी याविषयी अभ्यास करुन जिल्हाधिकारी यांच्यासोबत होणाऱ्या बैठकांमध्ये वेळोवेळी चर्चा करुन नागरिकांच्या सोयीसाठी योग्य ते निर्णय घ्यावेत. सुट्टीच्या कालावधीत महसूल कार्यालयात येणाऱ्या सैनिकांना जलद सुविधा मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याबाबत विचार विनिमय करावा.

स्वाधीन क्षत्रीय म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार कामकाज होण्यासाठी राज्य शासन भर देत आहे. यासाठी विभागीय आयुक्तांनी दरमहा जिल्हाधिकारी यांच्याकडून याबाबत आढावा घ्यावा. तसेच या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी व्यक्तीश: प्रयत्न करावेत. या कायद्याच्या जनजागृती आणि प्रसारासाठी प्रयत्न करावेत.

माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी यावेळी झिरो पेंडन्सीबाबत मार्गदर्शन केले.

विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासाठी मुंबई येथे घेण्यात येणाऱ्या बैठका व व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे विभागांतर्गत दौरा अपूर्ण ठेवून तातडीने मुख्यालयात उपस्थित रहावे लागते. याचा प्रशासकीय कामकाजावर परिणाम होतो. यासाठी या बैठका पूर्वनियोजित तारखेलाच होणे आवश्यक आहे, अशा विविध  सूचना उपस्थित विभागीय आयुक्तांनी मांडल्या.

यावेळी मुद्रांक शुल्क वसूली शासनाने दिलेल्या उद्दीष्टा पेक्षा अधिक केल्याबद्दल अनिल कवडे यांचे अभिनंदन करण्यात आले. स्वागत प्रभारी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले.

भरतनाट्यम्, कथक, कुचिपुडी, ओडिसीचे एकत्रित आविष्कार

0
पुणे -नवभारत निर्मिती संकल्प-सिध्दीच्या वतीने शहरातील ७५० अभिजात नृत्य कलाकारांच्या साधनेचा आविष्कार असलेला नृत्योत्सव  न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेच्या मैदानावर संपन्न झाला . या कार्यक्रमाद्वारे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाची जनजागृती करण्यात आली अशी  माहिती समन्वयक योगेश गोगावले यांनी दिली आहे.
भरतनाट्यम्, कथक, कुचिपुडी, ओडिसी या भारतीय शास्त्रीय नृत्य शैलींचे सादरीकरण करण्यात आले.गुरु मनिषा साठे, सुचेता चापेकर, गुरु शमा भाटे, नीलिमा अध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अठरा नृत्य संस्थांतील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या
नृत्यभारती, मनीषा नृत्यालय, नादरुप, कलावर्धिनी, नुपूरनाद, आर्टिट्यूड, शांभवीज, कलासक्त, नृत्यधाम, नृत्यप्रेरणा, सुनाट्य अमृतवर्षा, नृत्योन्मेष, चिदंबरम, नृत्यप्रिया आणि ओडिसी अशी या संस्थांची नावे  आहे.

सामाजिक आरोग्याबाबत भारताची स्थिति चिंताजनक – डॉ.एन.जे.पवार

0
सार्वजनिक आरोग्यावर हवामान बदलांचा दुष्पपरिणाम या विषयावर गोलमेज परिषद
पुणे- आरोग्या बाबत भारताची सामाजिक आणि वैयक्तिक स्थिति अत्यंत चिंताजनक आहे. त्यात आता हवामान बदलाचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असल्यामुळे दिवासाच्या तापमानात प्रचंड वाढ आणि रात्रीच्या तापमानात उतार अशी परिस्थितीही निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे बोअरवेलच्या पाण्याचे सेवन अधिक वाढल्यामुळे किडनीच्या आजारात वृध्दी झाली असून यातून निर्माण होणारे अनेक आजार प्राणघातक ठरत आहेत. त्यामुळे पुणे येथील सेंटर फॉर क्लायमेंट चेंजिंग येथे या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन केले जात आहे. त्यानुसार  उपाययोजना करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.एन.जे.पवार यांनी व्यक्त केले.
डॉ.विश्‍वनाथ कराड एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठ, पुणे आणि माईर्स महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, तळेगाव-दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक आरोग्यावर हवामान बदलांचा दुष्परिणाम या विषयावरील एक दिवसीय गोलमेज परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ.विश्‍वनाथ दा. कराड हे होते. टेरीचे संस्थापक अध्यक्ष व सुप्रसिध्द पर्यावरण तज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे  माजी कुलगुरु प्रा. डॉ. अरुण जामकर, तळेगाव दाभाडे येथील माईर्स महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्यूकेशन अ‍ॅण्ड रिसर्चच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे व मायमरचे प्राचार्य डॉ. आर.के. गुप्ता हे उपस्थित होते.
डॉ.एन .जे.पवार म्हणाले, जागतिक तापमानवाढ, आम्लयुक्त पाऊस, वायू प्रदूषण, नागरी अव्यवस्था, कचरा समस्या, ओझोन वायूची घटती पातळी, जल प्रदूषण अशा एक ना अनेक समस्यांनी पृथ्वीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. मागील काही दशकांपासून मानवाकडून चाललेले पृथ्वीचे शोषण आणि वातारणाच्या अवनतीने आता धोक्याची पातळी ओलंडली आहे. आपली स्वार्थी चंगळवाडी कृष्णकृत्ये पृथ्वीच्या प्रकृतीरक्षणाला अनुकूल नसल्याने, पूर, भूकंप, त्सुनामी, वादळे यासारख्या नैसर्गिक आपत्तींना वारंवार तोंड द्यावे लागत आहे.
पंजाब, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यातील खाली गेलेला भूजल स्तर हा मानव जातीला प्राणघातक ठरत आहे. येथे बोअरवेलच्या पाणी सेवनाचे प्रमाण वाढल्याने अनेक आजारांना जन्म दिला आहे. बर्फाळ प्रदेशात मानवाचे वास्तव वाढल्याने तेथील तापमानात वृध्दी झाली आहे. त्यामुळे पक्ष्यांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. त्याचाच दुष्पपरिणाम म्हणजे अनेक वेगवेगळ्या आजारांचा उगम. तापमानातील अती वाढीमुळे डासांपासून होणार्‍या मलेरिया, हॅपिटाईटिस सारख्या आजारांच्या स्वरूपामध्येही बदल झालेला आहे. एकंदरीतच सृष्टीवरील सर्व गोष्टींच्या असंतुलनामुळे सामाजिक आरोग्याची स्थिति चिंताजनक बनली आहे. अशा वेळेस त्यावर सखोल संशोधनाची गरज आहे.
प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली आहे. वाढत्या जनसंख्येबरोबरच वाढत जाणारी वाहने आणि तंत्रज्ञानामुळे मानवाच्या आरोग्यावर दुष्पपरिणामच होत आहे. कार्बन डाय ऑक्साईडचे वातावरणातले आणि पाण्यातले वाढते प्रमाण सातत्याने सर्व सजीव सृष्टीसाठी धोकादायक होत चाललेले आहे. वातावरणात बदल झाल्याने अनेक नव्या आजारांना जन्म दिला जात आहे. या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन ३० वर्षांपासून श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या माध्यमातून नदी प्रदूषण कमी करणे व स्वच्छतेचे कार्य हाती घेतले गेले आहे. सामाजिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी छोट्या व नियोजनबद्ध गावांची निर्मिती करणे गरजेचे आहे.
डॉ. राजेंद्र शेंडे म्हणाले, सृष्टीवरील ओझोन वायूचा थर हा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण दिले जात आहे. दर वर्षी अडीच लाख लोकांचा बळी फक्त आजारांमुळे होत आहे. त्यामुळे या विषयावर जितक्या मोठ्या प्रमाणात चर्चा होते तेवढ्याच प्रमाणात योग्य संवादाच्या माध्यमातून समाजापर्यंत या विषयाला पोहचवून जागृती करणे गरजेचे आहे. शहरांमध्ये प्रदूषण पातळी ही अगदी वरच्या स्तरापर्यंत पोहचली आहे. त्याला नियंत्रित करणे गरजेचे आहे. अन्यथा दुष्परिणामाचा सामना करावयास तयार रहावे लागेल.
डॉ. सुचित्रा कराड-नागरे यांनी प्रस्ताविक केले. डॉ. जामकर यांनी गोलमेज परिषदेच्या आयोजना मागची भूमिका स्पष्ट केली.
डॉ. संदीप साळवी, डॉ. मिलिंद गोरे, डॉ. गुफरान बेग, डॉ. पारूल ऋषी, डॉ. हेम डोलकीया व डॉ. महावीर गोलेचा इत्यादी मान्यवरांनी आपले विचार मांडले.
तळेगाव दाभाडे येथील माईर्स महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्यूकेशन अ‍ॅण्ड रिसर्च येथे सेंटर फॉर क्लायमेंट चेज अ‍ॅण्ड हेल्थ सेंटरची आज स्थापना करण्यात आली. येथे वरील विषयांवर मोठ्या प्रमाणात संशोधन करून त्यावर उपाययोजना केल्या जातील. तसेच, सामाजिक आरोग्यासंदर्भात जनजागृती केली जाईल.
डॉ. सुषमा शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. डेरेक डिसूझा यांनी आभार मानले.

५० हजाराच्या जामीनावर,येणार बाहेर..टायगर

0

जोधपूर– काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या सलमान खानला सेशन्स कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर न्यायमूर्ती  रवींद्रकुमार जोशी यांनी  सलमानला जामीन मंजूर केला आहे. गुरुवारपासून जोधपूर मध्यवर्ती कारागृहात असलेला सलमान आज संध्याकाळपर्यंत बाहेर येण्याची शक्यता आहे.

कांकाणी गावातील काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या सलमान खानच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी झाली. बचाव पक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती जोशी यांनी दुपारी 3 पर्यंत निर्णय राखून ठेवला होता. जज रवींद्र जोशी यांनी दुपारी तीन वाजता जामीन मंजूर केला. दरम्यान, सकाळी 10.30 वाजता न्यायालयाबाहेर  त्याची बहिण अलवीरा आणि बॉडीगार्ड शेरा हजर होते. सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी करणारे न्यायाधीश  रवींद्र जोशी यांच्यासह राजस्थान मधील  87 न्यायाधीशांची शुक्रवारी रात्री बदली झाली. यामुळे शनिवारी सलमानच्या अर्जावर सुनावणी होणार की नाही, यावर तर्क-वितर्क सुरु होते. शनिवारी सकाळी न्यायाधीश  जोशी कोर्टात पोहोचले आणि सर्व चर्चेला पूर्णविराम मिळाला. शुक्रवारी सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण होऊ शकली नव्हती. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रवींद्र जोशी यांनी ट्रायल कोर्टचे रेकॉर्ड मागवले होते. ट्रायल कोर्टने सलमानला गुरुवारी काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरवत 5 वर्षे कैद आणि 10 हजार रुपये दंड ठोठावला होता.

कोर्टरूमध्ये काय झाले?
– सलमानचे वकील महेश बोडा म्हणाले, 20 वर्षांपासून हा खटला सुरु असून सलमान जामीनावर बाहेर होता. त्याने नेहमीच कोर्टाचा आदर केला आहे, जेव्हा सांगितले तेव्हा सुनावणीला हजर झाला होता. त्यामुळे त्याच्या जामीन अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा.
– त्यावर सरकारी वकील पोकरराम यांनी म्हटले, की साक्षीदार आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टने स्पष्ट झाले आहे की सलमानने गोळी मारुन काळविटाची शिकार केली. त्याच आधारावर ट्रायल कोर्टाने त्याला दोषी ठरवले आहे. तेव्हा त्याला जामीन देऊ नये.
– दुसरीकडे, बिष्णोई समाजाचे वकील महिपाल बिष्णोई म्हणाले, सलमानविरोधात आरोपी निश्चित झाले आहेत. त्यामुळे त्याच्या जामीनावर सुनावणी करण्याऐवजी तुरुंगात ठेवण्यावर लवकर सुनावणी केली पाहिजे. त्याच्या विरोधात ठोस पुरावे आहेत. पुराव्यांच्या आधारावर यापुढेही त्याला दोषीच ठरवले जाईल.

राष्ट्रवादीच्या ‘जाऊबाई सुसाट ‘ अन भाजपची पीछेहाट

0

पुणे :  मुंढव्यातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारआणि स्व.चंचला कोद्रे यांच्या  जाऊबाई पूजा कोद्रेंनी  बाजी मारली असून, राष्ट्रवादीचा गड राखला. कोद्रे यांनी शिवसेनेच्या मोनिका तुपे यांना 3 हजार 528 एवढ्या मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे, या निवडणुकीत भाजपला जबरदस्त तडाखा मतदारांनी दिला आहे.  भाजपच्या उमेदवार सुकन्या गायकवाड यांना तिसऱ्या क्रमाकांची मते मिळाली.  या निकालामुळे हडपसरच्या राजकारणावर राष्ट्रवादीचा असलेला वरचष्मा पुन्हा अधोरेखित झाला आहे .माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनामुळे ही निवडणूक झाली. त्यासाठी राष्ट्रवादीने कोद्रे यांच्या जाऊबाई पूजा यांना तर भाजपने सुकन्या गायकवाड आणि शिवसेनेच्या मोनिका तुपे निवडणूक रिंगणात होत्या. या प्रभागातील एका जागेसाठी शुक्रवारी मतदान झाले.

या निवडणुकीत कोद्रे यांना 8 हजार 991 मते मिळाली. तर शिवसेनेने मुसंडी मारत   5 हजार 479 मते मिळविली. तर भाजपच्या गायकवाड यांना 4 हजार 334 मतांवर समाधान मानावे लागले. गेल्या निवडणुकीत गायकवाड यांना 11 हजार 400 मते मिळाली होती. सातत्याने पूर्व भागावर अन्याय करण्याचे पालिकेतील सत्ताधार्यांचे धोरण आणि त्याविरुद्ध चेतन तुपे, प्रशांत जगताप , वैशाली बनकर यांनी सातत्याने उठविलेले रान याचा परिणाम  राष्ट्रवादीच्या विजयापेक्षा येथे भाजपची  मते घटण्यात झाला आणि हे या निवडणुकीचे वैशिष्टय ठरले आहे.

या पोट निवडणूकीचा विचार करता हि निवडणूक  केवळ चंचला कोद्रे यांच्याबाबत सहानुभूती म्हणून राष्ट्रवादीने जिंकली असे मानता येणार नाही तर २०१९ च्या आगामी निवडणुकीची हलकीशी चाहूल मानता येईल असा दावा करण्यात येतो आहे. भाजपने केलेल्या कारभाराची पावती त्यांना मिळेल असे या निकालाने दर्शवून दिल्याचे मानण्यात येते .भाजप आणि शिवसेनेच्या मतांचे विभाजन होणे कसे धोकादायक आहे आणि कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करणे कसे फायदेशीर ठरू शकेल हे देखील या निकालाने दाखवून दिले आहे .