पुणे-महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बदली झाल्यानंतर पदभार सोडण्याचे आदेश आले त्या दिवशी म्हणजे ६ एप्रिल आणि ५ एप्रिल रोजी घेतलेल्या निर्णयांची आणि दिलेल्या आदेशांची खऱ्या अर्थाने योग्य आणि काटेकोर चौकशी झाली तर बरेच गौडबंगाल बाहेर येईल असा दावा पालिकेच्या राजकीय आणि प्रशासकीय अशा दोन्ही स्तरावरून करण्यात येतो आहे. एकूण कुणालकुमार यांची तशी संपूर्ण कारकीर्द संशयास्पद राहिली आहे. यांच्या कारकिर्दीत ७२ लोक जे महापालिकेचे अधिकृत वा ठेकेदार पद्धतीने देखील कर्मचारी नसताना बिनदिक्कत पणे महापालिका भवनात कुणालकुमार यांच्या समक्ष विविध खात्यात काम करत होते ,यापैकी दोघांना ‘मायमराठी’ने रंगेहाथ पकडून दिले .पण त्यानंतर बोगसकर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करायचे नाहीत , केवळ याबाबत थातूर मातुर उपाययोजना करायच्या असे करीत कारभार पुढे रेटण्यात आला. या कामी त्यांना सहाय्य करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही कुणाल कुमार यांनी सातत्याने प्रोटेक्ट केल्याचे वारंवार दिसून आले आहे.कुणाल कुमार यांच्याच कारकिर्दीत २४ बाय ७ पाण्याच्या योजनेत सुमारे ५०० कोटीने वाढलेली निविदा रक्कम उघड झाली .स्मार्ट पुणे करता करता कधी टेंडर जादा दराने आल्याचे तर कधी इस्टीमेट रक्कम वाढीव केल्याचे वेळोवेळी निष्पन्न झाले .बोगस कर्मचाऱ्यांचा डाग तर त्यांच्या कारकीर्दीवर राहीलच पण त्याबरोबर त्यांच्या , सायकल ट्रेक शहरात उखडणे आणि उभारणे, पे आणि पार्क संपूर्ण महापालिका हद्दीत करण्याचा प्रस्ताव करने अशा योजना वादग्रस्त झाल्या आणि वादग्रस्त राहतील अशी शक्यता असताना ,अगदी जाता जाता देखील त्यांनी काही आदेश काढले आहेत . जर आपली बदली झाली आहे आपल्याला येथील पदभार सोडायचे आदेश आलेले आहेत हे माहिती असताना कुणाल कुमार यांनी आपल्या सहीने काढलेले आदेश .. संशयाच्या भोवऱ्यात सापडतील असेच आहेत .अर्थात काही पदाधिकारी त्याबाबत पाठीराखे आहेत . ते फार काळ लपून राहू शकत नाही .पण सध्या एवढे काय नडले होते ,कुमारांचे आणि पुणे शहराचे कि त्यांनी हे आदेश जाताजाता काढले ..ते आदेश पहा इथे
कुणाल कुमार यांनी चार अधिकाऱ्यांना अखेर उपायुक्तपदी बढती दिली आहे. महापालिकेतील आयुक्त पदाचा कार्यभार सोडतानाच कुमार यांनी बढतीच्या आदेशावर सही केली आहे. याबरोबरच चार अधिकाऱ्यांना सहायक आयुक्तपदी बढती देऊन मोठ्या प्रमाणात प्रशासकीय बदलही त्यांनी केले आहेत.
आयुक्तपदाच्या जबाबदारीतून मुक्त होताना कुमार यांनी या बढतीला मान्यता दिली आहे. उपायुक्तपदी बढती देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये माधव देशपांडे, संध्या गागरे, उमेश माळी तसेच वसंत पाटील या चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे; तर वैभव कडलख आणि आशिष महादडळकर, संतोष तांदळे, सुनील झुंजार यांना सहायक महापालिका आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे.
याबरोबरच पालिकेकडून शहरासाठी राबविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय नदी संवर्धन प्रकल्प तसेच सार्वजनिक पार्किंग धोरणाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यासही महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. पथ विभागाचे प्रभारी प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या राजेंद्र राऊत यांची बांधकाम विभागात बदली करण्यात आली असून त्यांचा पदभार अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे देण्यात आला आहे; तर अधीक्षक अभियंता मदन आढारी, विजय शिंदे यांचीही पथ विभागात बदली करण्यात आली आहे. भवन रचना विभागाचे प्रमुख संदीप खांडवे यांच्याकडे मलनिस्सारण, देखभाल दुरुस्ती विभागाचा पदभार देण्यात आला आहे.
या शिवाय अनेक वर्षे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या कात्रज-कोंढवा रोडच्या कामाच्या निविदेवर आयुक्त कुणाल कुमार यांनी स्वाक्षरी केली आहे. या रस्त्याचे पालिकेच्या नियमानुसार अद्यापही भूसंपादन झाले नसताना तब्बल १७८ कोटी रुपयांच्या निविदेला आयुक्तपदाचा पदभार सोडण्याच्या आदल्या दिवशी कुमार यांनी मान्यता दिल्याने यामध्ये काळेबेरे असल्याची चर्चा पालिकेत सुरू झाली आहे.