Home Blog Page 3164

आमच्या बहिणीने चिक्कीमध्ये पैसे खाल्ले,अन पुण्याच्या बापटांनी तूर घोटाळा केला : धनंजय मुंडे(व्हिडीओ)

0

पुणे-केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार येऊन चार वर्षांचा काळ झाला. मात्र, या चार वर्षांत सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत. या काळात सरकारच्या १६ मंत्र्यांनी तब्बल ९० हजार कोटींचा घोटाळा केला आहे. त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. याच घोटाळ्यांमध्ये आमच्या बहिणीनेही चिक्कीत पैसे खाल्ले, आणि पुण्याच्या बापटांचा तूर घोटाळा प्रकरणी आता कॅग चा हि अहवाल आला आहे .अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली. विशेष म्हणजे कालच एका कार्यक्रमात तब्बल ६ वर्षांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची गळाभेट झाली होती.

पुण्यात आयोजित राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेत धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे,दीपक मानकर, प्रकाश कदम आदी उपस्थित होते. मुंडे म्हणाले, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता येऊन चार वर्षांचा काळ झाला. या कालावधीमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्नांकडे भाजपाचे लक्ष नसून त्यांचे मंत्री भ्रष्टाचारात मग्न आहेत. राज्यातील भाजपच्या १६ मंत्र्यानी ९० हजार कोटींचे घोटाळे केले. पण त्यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोणतीही कारवाई केली नाही. तर उलट त्यांना काही तासात क्लीनचीट देण्याचेच काम केले आहे. या भाजपच्या मंत्र्यानी चिक्कीपासून उंदरांपर्यँत घोटाळा केला आहे. या घोटाळयामध्ये आमच्या बहिणीनेही चिक्कीत पैसे खाल्ले, असे सांगत त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली.मुंडे म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने जेवढी आश्वसने दिली त्यातील एकही पूर्ण झालेले नाही. भाजप सरकार सत्तेमध्ये येण्याचे मुख्य कारण म्हणजे हे लोक तरुणांना वर्षाला दीड कोटी रोजगार देणार होते. या घोषणेमुळे तरुणाईने भाजपाला मतदान केले. मात्र, आजअखेर किती रोजगार मिळाले याची आकडेवारी यांच्याकडे नाही.

ज्या शहीद राजगुरू यांनी देशासाठी प्राण दिले ते संघाचे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ही दुर्देवी बाब असून बरं झाले संघ १६ व्या शतकात नव्हता. अन्यथा छत्रपती शिवाजी महाराज देखील संघाचेच होते असे बोलण्यासही ते विसरले नसते, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावर त्यांनी टीका केली.

कॉंग्रेस ने ओबीसी कमिशन बिल रोखले – खा. अनिल शिरोळे

0

पुणे-SC/ST आयोगाला ज्या प्रमाणे घटनात्मक दर्जा आहे त्याच प्रमाणे ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देणारे  “Constitution (123rd Amendment) Bill 2017″ हे विधेयक लोकसभेत त्वरेने मंजूर करण्यात आले. दुर्दैवाने कॉंग्रेस पक्षाच्या ओबीसी विरोधी भूमिकेमुळे राज्यसभेत अजूनही हे विधेयक पास झाले नसून कॉंग्रेस नेहमीच ओबीसी समाजाविरोधात भूमिका घेत असल्याचा आरोप खासदार अनिल शिरोळे ह्यांनी केला. महात्मा फुले जयंतीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. कॉंग्रेस च्या ह्या आडमुठे पणामुळे ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी अत्यंत महत्वाचे असणारे हे विधेयक हेतुपूर्वक राज्यसभेत मंजूर झाले नसून कॉंग्रेस पक्षाने त्यांची हि आडमुठी भूमिका सोडून ओबीसी समाजाच्या विकासासाठी हे विधेयक पास करण्याची सकारात्मक भूमिका घ्यावी असे आवाहन देखील शिरोळे ह्यांनी केले आहे.

भारतात फिरण्यासाठी 5 ऑफ बीट ठिकाणे

0

भारतात भरपूर वैविध्यता आहे, आणि बहुतांश भाग अद्याप उत्सुक प्रवाशांनीही पाहिलेला नाही. उत्तुंग पहाडांपासून ते सुरेख तळी आणि घनदाट अरण्यांपर्यंत अनेक ऑफ बीट ठिकाणे प्रवाशांची वाट पाहात आहेत.

 

ऑफ बीट मार्गांची ही पाच ठिकाणे :

बैगुनी, सिक्कीम – बैगुनी हा सिक्कीमेच्या पश्चिमेकडील सुंदर डोंगराळ भाग आहे. कांचनजुंगा येथे सूर्योदय पाहता येईल, येथे पक्षी आणि तळ्यांचे सौंदर्य न्याहाळता येईल, बैगुनीमध्ये निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच आहे. येथे पॅराग्लायडिंग, रिव्हर राफ्टिंग, माउंटेन कँपिंग, व्हिलेज ट्रेकिंग यासारख्या अनेक गोष्टी येथील वास्तव्यात करताय येतील.

बिनसर, उत्तराखंड – वन्यजीवप्रेमींसाठी बिनसर म्हणजे स्वर्गच. बिनसर हे वन्यजीवांचे घरच आहे, येथे हरणं, जंगली बोकड, उडत्या खारी आणि इतर अनेक दुर्मीळ प्राणी येथे राहतात. बिनसरमध्ये पंच्चुली, शिवलिंग, चौखांबा, त्रिशुल आणि नंदादेवी असा 300 किमीचा पॅनोरॅमिक व्ह्यू आहे. येथे तुम्ही भटकंती, गावातील भटकंती, ट्रेकिंग आणि पक्षीनिरीक्षण आदी गोष्टी करता येतील

पूवर, केरळ – नदीच्या रुंद मुखासह असलेले हे बेट आहे, पूवर म्हणजे केरळमधील त्रिवेंद्रम जिल्ह्यातील स्वर्गच आहे. पूवरला नेय्यरचा वेढा आहे, त्रिवेंद्रमजवळील अगस्तीयरकूदमचे मूळ आणि अरबी समुद्रचा शेवट अशा ठिकाणी पूवर वसलेले आहे. हिरवी नारळाची झाडे आणि सोनेरी वाळू यांनी नेय्यर नदीचा परिसर सुरेख दिसतो. येथील बॅकबॉटर क्रूज म्हणजे अप्रतिम सौंदर्याची खाणच होय.

मदिकेरी, कर्नाटक – कूर्ग (कोडागु) जिल्ह्यात मुख्यालय असलेले हे हिल स्टेशन आहे, मदिकेरी हे कर्नाटकातील सर्वात सुंदर ठिकाण आहे, डोंगररांगा, हिरवीगार शेतं, कॉफीची शेती आणि केशरी ऑर्चड म्हणजे पर्वणीच. येथील नदीचे खळाळते पाणी म्हणजे निसर्गदत्त देणगीच. एबी धबधबा, मंडालपट्टी, छेलावारा धबधबा, कोटेबेट्टा यासारखी खास सुंदर प्रेक्षणीय स्थळे येथे आहेत.

 

कुंभलगढ़, राजस्थान – कुंभलगढ़पेक्षा अधिक चांगलं ते काय असू शकतं, महाराजांची रॉयल लाइफ पाहण्याची ही एक संधी आहे. राजस्थानातील राजसअमंद जिल्ह्यातील हे शहर म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साइट आहे, कुंभलगढ़ ही फोटोग्राफर्ससाठी आणि वन्यजीवप्रेमींसाठी उत्तम जागा आहे. कुंभलगढ़ किल्ला 36 किमीचा आहे, आणि राजस्थानातील सर्वात महत्त्वाचा व दुसऱ्या क्रमांकावरील किल्ला आहे आणि ही जगातील सर्वात मोठी भिंत आहे. कुंभलगढ़ वन्यजीव सँक्च्युअरी, बादल महार, मम्मादेव मंदीर ही या शहरातील इतर आकर्षणस्थळे आहेत.

सध्याच्या एक्सप्लोअर्ड आणि अनएक्सप्लोअर्डबद्दल महिंद्रा हॉलिडेज आणि रिसॉर्ट इंडिया लिमिटेड (एमएचआरआयएल)चे प्रमुख वितरण अधिकारी गिरिधर सिथाराम म्हणाले की, “अनएक्सप्लोअर्ड ठिकाणी प्रवास करण्यात आज भारतीयांना स्वारस्य वाटू लागले आहे आणि ते वाढते आहे, यात त्यांचे पर्याय प्रायोगिक स्तरावरील आहेत. त्यांना अनोखा प्रवासाचा अनुभव मिळत असेल तर तो त्यांना हवा आहे. आम्ही क्लब महिंद्राने नेहमीच प्रत्येक कुटुंबाची सुट्टी विविध अनुभवांनी भरलेली राहील आणि नेहमीपेक्षा वेगळी राहील याची खात्री बाळगलेली आहे. भारतात अनेक ठिकाणी आमची मालमत्ता आहे, उत्तराखंडमधील बिनसर व्हॅली, केरळमधील पूवर येथील क्लब महिंद्रा, राजस्थानातील कुंभलगढ़ येथील क्लब महिंद्रा ही त्यापैकी काही उदाहऱणे आहेत.”

भ्रष्टाचाराचे आरोप खोटे निघाल्यास मला फाशी द्या-धनंजय मुंडे

0

पुणे : राज्य सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले असून मंत्र्यांनीही लाजा सोडल्या आहेत. १६ मंत्र्यांचे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले, ९० हजार कोटींचा भ्रष्टाचार यांनी केला. याची न्यायालयानी चौकशी व्हावी अशी मागणी करत भ्रष्टाचाराचे आरोप खोटे निघाले तर मला कोणत्याही चौकात फाशी द्या, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारला दिले. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे हल्लाबोल यात्रेत ते बोलत होते.

मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. भाजपाच्या महामेळाव्यातील मुख्यमंत्र्यांच्या भाषणात राष्ट्रवादीची दहशत दिसली. ज्यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीका केली तेव्हा त्यांची बोलती बंद झाली. त्यांना पाणी प्यावे लागले. मुख्यमंत्र्यांनी पवार साहेबांच्या वयाचे भान तरी ठेवायला हवे होते, असे त्यांनी म्हटले.

भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून देशात नवे प्रश्न उपस्थित करत आहे. मूलभूत प्रश्नांना बगल देत भलत्याच चर्चा रंगवत आहेत. या सरकारला घरी बसवल्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही. सरकारमधील मंत्र्यांनीही लाजा सोडलेल्या आहेत. १६ मंत्र्यांचे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले. त्याची न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी करत हे आरोप खोटे निघाले तर मला कोणत्याही चौकात फाशी द्या, असे आव्हान त्यांनी दिले.

लेम्मा टेक्नॉलॉजीजच्या सल्लागारपदी बॉब वॉल्झॅक

पुणे–डिजिटल आऊट ऑफ होम (DOOH) डव्हर्टायझिंग क्षेत्रातील आघाडीच्या आणि प्रोग्रॅमॅटिक डव्हर्टायझिंग सोल्यूशन्स विकसित करण्यावर भर देणाऱ्या लेम्मा टेक्नॉलॉजीज (Lemma Technologies) या पुणे स्थित कंपनीच्या सल्लागारपदी बॉब वॉल्झॅक (Bob Walczak) रुजू झाले असल्याचे कंपनीने अभिमानाने जाहीर केले आहे.

 बॉब वॉल्झॅक हे विपणन उद्योग प्रवर्तक असून त्यांनी रिंगलीडर डिजिटल (Ringleader Digital) या जाहिरात तंत्रज्ञान नवउद्योगाचे संस्थापक व मुख्य कार्य़कारी अधिकारी म्हणून यशस्वी भूमिका बजावली आहे. रिंगलीडर डिजिटल ही मोजक्या पहिल्या कंपन्यांपैकी आहे, ज्यांनी सर्वंकष मोबाईल ड सर्व्हर आणि पेटंटप्राप्त आयडी टेक्नॉलॉजी विकसित केले आहेत. सध्या ते ब्लॉकचेन (Blockchain) व क्रिप्टो (Crypto) श्रेणीतील एका प्रकल्पावर काम करत आहेत. याआधी वॉल्झॅक हे झॅसिस (Xaxis) कंपनीत ग्लोबल प्रॉडक्ट विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष, डब्ल्यूपीपीच्या (WPP)  प्रोग्रॅमॅटिक ऑडियन्स व्यवसायात होते. त्यांनी झॅसिसची आऊटकम्स परफॉर्मन्स डव्हर्टायझिंग डिव्हिजन असलेल्या लाईट रिक्शनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले आहे. तत्पूर्वी ते आयपॉनवेबच्या (IPONWEB) बिडस्विच (Bidswitch) प्लॅटफॉर्मचे सरव्यवस्थापक होते, जेथे त्यांनी या प्लॅटफॉर्मचे उत्पन्न ५०० टक्क्यांनी वाढवून दाखवले व वर्षभरात ग्राहक संख्या दुप्पटीने वाढवली. बिडस्विचच्या आधी ते पबमॅटिकमध्ये प्रॉडक्ट अँड इमर्जिंग मीडिया विभागाचे सरव्यवस्थापक व उपाध्यक्ष होते. या कार्य़काळात त्यांनी कंपनीच्या मोबाईल व इमर्जिंग मीडिया व्यवसायाची स्थापना करुन केवळ ३ वर्षांतच त्याचा वाटा कंपनीच्या एकूण उत्पन्नात २५ टक्क्यांपर्यंत पोचवून दाखवला होता.

 नव्या जबाबदारीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना बॉब वॉल्झॅक म्हणाले, आऊटडोअर मीडिया हा पूर्वीप्रमाणे स्थिर राहिलेला नाही. तो चालतो, बोलतो आणि अगदी विचारही करतो (कृत्रिम बुद्धिमत्ता). लेम्मा टेक्नॉलॉजीज ही या उद्योगात अशा अभिनव मार्गावर पाऊल ठेवणारी कंपनी आहे. जगातील आघाडीचा डिजिटल आऊट ऑफ होम प्रोग्रॅमॅटिक ड एक्स्चेंज प्लॅटफॉर्म बनण्यासाठी, आपला मध्यवर्ती दृष्टीकोन मजबूत राखून ग्राहकांना कमाल परिणाम मिळवून देण्यात मदत करण्यासाठी आणि अधिकाधिक साधनसंपत्तीपूर्ण मार्ग अवलंबण्यासाठी अभिनवता राबवण्यात आघाडीवर असलेल्या या प्रतिष्ठित कंपनीत काम करताना मला अत्यंत आनंद होत आहे.

 लेम्मा टेक्नॉलॉजीजचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब पाटील यांनी अभिमानाने सांगितले, की बॉब वॉल्झॅक यांचे आमच्या लेम्मा परिवारात स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. त्यांचे कौशल्य व दृष्टीकोन यांची मदत आमच्या कंपनीला अभिनव डिजिटल सोल्यूशन्स पुरवून डीओओएच प्रोग्रॅमॅटिक डव्हर्टायझिंग उद्योगाची प्रगती साधण्यात होईल. आमच्या ग्राहकांना नेहमीच सर्वोत्तम सेवा व सोल्यूशन्स पुरवण्याचा आमचा प्रयत्न असतो.

 ओओएच हा बिलबोर्ड्स, भित्तीचित्रे, बस, रेल्वे, मॉल्स, रेस्टॉरंट्स, विमानतळ आदी ठिकाणी स्क्रिन्सच्या माध्यमातून प्रभावी जाहिरातीचा विश्वसनीय मार्ग आहे.

नवीन मराठी शाळेत गणित प्रयोगशाळा

0

पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत मापन या संकल्पनेवर आधारित गणित प्रयोगशाळेचे उद्घाटन गणित तज्ज्ञ प्रदीप आगाशे यांच्या हस्ते करण्यात आले. गणिताचा अभ्यास हसत-खेळत करण्यासाठी गणित प्रयोगशाळेचा उपक्रम महत्वाचा असल्याचे मत श्री. आगाशे यांनी व्यक्त केले.
सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडचे मुख्याध्यापक नागेश मोने, प्रयोगशाळेचे निर्माते सुधीर नारखेडे, मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.
वार, दिनांक, महिने, उंची, वजन, दिशा, आकार, अंतर, द्रव पदार्थ आदीचे मापन करण्याच्या पध्दती शिकण्यासाठी आवश्यक खेळणी प्रयोगशाळेत मांडण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांचे कार्यकौशल्य विकसित करणे व बुध्दीला चालना देण्यासाठी प्रयोगशाळा उपयुक्त ठरणार आहे.
मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यश्री हजारे, तनुजा तिकोने, वंदना कदम, अश्‍विनी राजवाडे, वैशाली जाधव, प्रिया इंदूलकर या शिक्षकांचे प्रयोगशाळा निर्मितीत महत्वाचे योगदान आहे.

शिक्षण संस्थांनी समाजाशी संबंध दृढ केले पाहिजेत -कुलगुरु डॉ. नितीन करमळकर

0
पुणे- आपण काय करतो याची माहिती शिक्षण संस्थांनी नागरिकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. समाज, स्वयंसेवी संस्था, उद्योग यांच्या गरजा काय याचा अभ्यास केला पाहिजे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तिंच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला पाहिजे. आपण घडविलेला विद्यार्थी पुढे काय शिक्षण घेतो, कोठे नोकरी करतो याची माहिती संकलित केली पाहिजे. यासाठी शिक्षण संस्थांनी समाजाशी संबंध दृढ केले पाहिजेत असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील विविध शिक्षण संस्थांची मानांकने नुकतीच जाहीर केली. विद्यापीठ गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नववा आणि महाविद्यालय गटात फर्ग्युसन महाविद्यालयाने १९ वा क्रमांक मिळविला. दोन्ही संस्थांनी आपआपल्या गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. या निमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. करमळकर बोलत होते.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष विकास काकतकर, कार्यवाह डॉ. एस. एन. कानेटकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष राम निंबाळकर, प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी, उपप्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुणे विद्यापीठ व फर्ग्युसन महाविद्यालयाने राज्यात प्रथम क‘मांक मिळविला आहे. दोन्ही संस्थांचे यश हे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी केलेल्या कष्टांचे व एकत्रित प्रयत्नांचे फळ असल्याचे मत विकास काकतकर यांनी व्यक्त केले.
संस्थेच्या प्रगतीसाठी चर्चा, चिंतन, विचारमंथन आवश्यक असते. विविध क्षेत्रांत प्रगतीसाठी कर्मचार्‍यांनी सूचना करुन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन केले पाहिजे. असे मत डॉ. शरद कुंटे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात कुलगुरु डॉ. करमळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी यांनी प्रास्ताविक भाषण केले. डॉ. नितीन कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

6व्या कॉर्पोरेट सुपर 9 टी-20 क्रिकेट स्पर्धेत टेक महिंद्रा, सेल २ वर्ल्ड, अॅमडॉक्स, कॅलसॉफ्ट संघांची विजयी सलामी

0

पुणे: स्पोर्टीलव व महाराष्ट्र क्रीडा यांच्या तर्फे 6व्या कॉर्पोरेट सुपर 9 टी-20 क्रिकेट स्पर्धेत टेक महिंद्रा, सेल २ वर्ल्ड, अॅमडॉक्स, कॅलसॉफ्ट या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली.

सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, लवळे क्रिकेट मैदान येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत सेल्वा नारायणच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर टेक महिंद्रा संघाने इन्फोव्हिजन लॅब्स संघाचा 84 धावांनी दणदणीत पराभव करत उद्धाटनाचा दिवस गाजवला. पहिल्यांदा खेळताना स्वप्निल थोरातच्या 47 धावांच्या जोरावर टेक महिंद्रा संघाने 9 षटकात 3 बाद 106 धावा केल्या. 106 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सेल्वा नारायण व तन्विर शेख यांच्या अचूक गोलंदाजीपुढे इन्फोव्हिजन लॅब्स संघ चार चेंडू बाकी असताना सर्वबाद 22 धावांत गारद झाला. सेल्वा नारायण सामनावीर ठरला.

दुस-या लढतीत प्रतिक दुबेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सेल २ वर्ल्ड संघाने बार्कलेज संघाचा 6 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना बार्कलेज संघाने 9 षटकात 5 बाद 34 धावा केल्या. 34 धावांचे लक्ष अक्षय भोसलेच्या 14 तर प्रतिक दुबेच्या नाबाद 16 धावांच्या बळावर सेल २ वर्ल्ड संघाने 5.2 षटकात 2 बाद 35 धावांसह सहज पुर्ण करत विजय मिळवला. प्रतिक दुबे सामनावीर ठरला.

तिस-या लढतीत भावनीश कोहलीच्या अफलातू फलंदाजीच्या जोरावर अॅमडॉक्स संघाने नॉर-ब्रेम्से  संघाचा 140 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा अॅमडॉक्स संघाने 9 षटकात 3 बाद 169 धावा केल्या. यात भावनीश कोहलीने केवळ 39 चेंडबत अफलातून फटकेबाजी करत 138 केल्या. 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नॉर-ब्रेम्से संघाचा डाव केवळ  8.3 षटकात सर्वबाद 29 धावांत गारद झाला. निशांत रुकमंगद, सत्येंद्र यादव व हितेश थंडानी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करत संघाला विजय मिळवून दिला. भावनीश कोहली सामनावीर ठरला.

अन्य लढतीत निलेश साळुंखेच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर कॅलसॉफ्ट संघाने आयप्लेस संघाचा 55 धावांनी पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
टेक महिंद्रा- 9 षटकात 3 बाद 106 धावा(स्वप्निल थोरात 47, गुरप्रीत सिंग 23, श्रीकांत मेत्रे 22, मंदार कुलकर्णी 2-18) वि.वि इन्फोव्हिजन लॅब्स- 8.2 षटकात सर्वबाद 22 धावा(राकेश अगरवाल 20, सेल्वा नारायण 4-3, तन्विर शेख 2-7) सामनावीर- सेल्वा नारायण
टेक महिंद्रा संघाने 84 धावांनी सामना जिंकला.

बार्कलेज- 9 षटकात 5 बाद 34 धावा(संदिप कानिटकर 26, प्रतिक दुबे 2-5) पराभूत वि सेल २ वर्ल्ड- 5.2 षटकात 2 बाद 35 धावा(अक्षय भोसले 14, प्रतिक दुबे नाबाद 16, आकाश थिटे 2-11) सामनावीर- प्रतिक दुबे
सेल २ वर्ल्ड संघाने 6 गडी राखून सामना जिंकला.

अॅमडॉक्स- 9 षटकात 3 बाद 169 धावा(भावनीश कोहली 138(39), सुमित देसवाल 14, सिध्दार्थ वैद्य 2-54) वि.वि नॉर-ब्रेम्से- 8.3 षटकात सर्वबाद 29 धावा(सिध्दार्थ वैद्य नाबाद 24, मयुर घुले 14, निशांत रुकमंगद 2-10, सत्येंद्र यादव 2-10, हितेश थंडानी 2-30) सामनावीर- भावनीश कोहली
अॅमडॉक्स संघाने 140 धावांनी सामना जिंकला.

कॅलसॉफ्ट- 9 षटकात 2 बाद 102 धावा(अक्षय पिदाडी नाबाद 15, स्वप्निल पंडित नाबाद 40, शंतनू मराठे 2-40) वि.वि आयप्लेस- 9 षटकात 7 बाद 47 धावा(जेफ्री डिसुझा 19, तुषार तनपुरे 33, मंगेश अहिरे 11, निलेश साळुंखे 4-26) सामनावीर- निलेश साळुंखे
कॅलसॉफ्ट संघाने 55 धावांनी सामना जिंकला.

पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र आयुक्तालय-पालकमंत्री गिरीश बापट यांच्या प्रयत्नांना यश

0

पुणे : आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालय स्थापनेसाठी मंजुरी देण्यात आली. शहराची वाढती लोकसंख्या, नागरीकरण, औद्योगिकरण, शिक्षणसंस्था वाहनांची संख्या तसेच गुन्ह्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या स्वतंत्र पोलिस आयुक्तालयासाठी ३९३ कोटी रूपयांच्या खर्चास मान्यता दिली असल्याचे , या आयुक्तालयासाठी २६३३ नवीन पदांची निर्मिती करणार असल्याचे ही  पालकमंत्र्यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड हे औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. हिंजवडी परिसरात आय.टी कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे या शहरात राज्यासह देशाच्या विविध भागातून येणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. आज शहराची लोकसंख्या २२  ते २३ लाखाच्या दरम्यान पोहचली आहे.  वाढत्या नागरीकरणामुळे पिंपरी चिंचवडमध्ये शैक्षणिक व इतर भौतिक सुविधांचा विस्तार होत आहे. येथे नव्याने झालेली महाविद्यालये, वाढलेली कारखानदारी व आयटी कंपन्यांमध्ये असलेले कामगार, राजकीय पक्ष, कार्यकर्ते यामुळे भागात अनेक कामगार संघटना अस्तित्वात आल्यात पर्यायाने गुन्ह्यांच्या प्रमाणावरही वाढ होत आहे. यामुळे येथे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय असावे अशी अनेक दिवसांपासूनची पिंपरी चिंचवड वासियांची मागणी होती. याबाबत पालकमंत्री म्हणून बापट यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे आग्रह धरला होता.

पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महापालिका क्षेत्रात आजवर ३९ पोलिस स्थानक पुणे पोलिस आयुक्तांच्या कार्यकक्षेत येत होती. वाढत्या औद्योगिकरण तसेच शहरीकरणाबरोबरच या शहरात गुन्हेगारीत ही वाढ झाली. पोलिसांनी गुन्हेगारी संपवण्यासाठी प्रयत्न केले मात्र लोकसंख्येच्या मानाने असणारी पोलिसांची अपुरी संख्या यामुळे पोलिसांच्या प्रयत्न अपुरे पडत होते. तसेच लोकसंख्येच्या मानाने येथील वाहनांच्या संख्ये मध्ये वाढ होऊन वाहतूक नियोजन करणे ही पोलिसांना अवघड जात होते. या स्वतंत्र आयुक्तालयात निगडी, पिंपरी,चिंचवड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, वाकड, हिंजवडी,सांगवी, दिघी,चिखली तसेच ग्रामीण भागातील चाकण, आळंदी,देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी या पंधरा पोलिस स्थानकासह दोन परिमंडळांचा पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत असणार आहेत. मुख्यालयासाठी तात्पुरती भाडे तत्वावर जागा घेण्यात येणार आहे. तसेच या आयुक्तालयासाठी २६३३ नवीन पदांची निर्मिती करणार असल्याचे ही  पालकमंत्र्यांनी सांगितले.

शास्त्रीय नृत्य व संगीताच्या ‘अमृतांजली फेस्टिव्हल २०१८’ महोत्सवाचे पुण्यात आयोजन

0

पुणे-शास्त्रीय नृत्य व संगीताच्या ‘अमृतांजली फेस्टिव्हल २०१८’चे आयोजन पुण्यात येत्या १५ एप्रिलला करण्यात आले आहे. अमृतांजली महोत्सवाची सुरवात डॉ. शशिकला रवी यांनी सन २०१२ मध्ये केली आणि तेव्हापासून तो दरवर्षी येथील अत्याधुनिक अमृतांजली स्टुडिओमध्ये संपन्न होत आला आहे. यंदा या महोत्सवात अनेक नामवंत कलाकार आपले कला-कौशल्य सादर करणार असून विशेषतः संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या कलायमामणी गुरु लक्ष्मी विश्वनाथन् आणि गायिका शुभश्री रामचंद्रन आपल्या सहकारीवृंदांसह खास चेन्नईहून येणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे पुण्यातील ‘अमृतांजली स्कूल ऑफ भरतनाट्यम’च्या संस्थापक संचालक डॉ. शशिकला रवी याही प्रारंभीच्या वंदना सत्रात आपला अजोड नृत्याविष्कार सादर करणार आहेत.

महोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये :

  • संस्कृती सीरीजतर्फे भरतनाट्यमवरील पोएट्री ऑफ डान्स या शीर्षकाचा लघुपट, ज्यात गुरु लक्ष्मी विश्वनाथन यांच्या कामगिरीचा परिचय घडवला जाईल आणि त्यांच्या नृत्य प्रवासाबाबत संवादात्मक सत्रही होईल.
  • वंदना कलाविष्कार – डॉ. शशिकला रवी मुंबईच्या संगीतकारांसह महाराजा स्वाती तिरुनल यांच्या रचना सादर करतील.
  • भरतनाट्यम नृत्याविष्कार – संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या कलाईमामणी लक्ष्मी विश्वनाथन चेन्नर्ईतील संगीतकारांच्या साथीने अभिनय मंजरी हा नृत्याविष्कार सादर करतील.

यासंदर्भात बोलताना प्रख्यात भरतनाट्यम कलाकार डॉ. शशिकला रवी म्हणाल्या, “अमृतांजली फेस्टिव्हल भारताची प्राचीन परंपरा व समृद्ध संस्कृती टिकवण्यासाठी कटिबद्ध आहे. शास्त्रीय नृत्य आणि संगीत या समर्पणाच्या सखोल बैठकी असून त्या एखाद्याला उच्च आध्यात्मिक पातळीवर घेऊन जातात. पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे या कला अस्तंगत होणार नाहीत, याची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे.”

डॉ. शशिकला रवी :

डॉ. शशिकला रवी या पुण्यातील प्रख्यात भरतनाट्यम कलावंत, गुरु व नृत्य दिग्दर्शक आहेत. दिग्गज गुरुंच्या मार्गदर्शनाखाली शिकलेल्या डॉ. शशिकला आज आघाडीच्या भरतनाट्यम नर्तकांपैकी असून त्या एकल, तसेच समूह नृत्य आणि पारंपरिक ते संकल्पनात्मक नृत्य दिग्दर्शनाचा आविष्कार घडवतात. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्या पुण्यातील ‘अमृतांजली स्कूल ऑफ भरतनाट्यम’च्या संस्थापक असून तेथे अनेक शिष्यांना नृत्य प्रकाराचे सिद्धांत व प्रात्यक्षिक दृष्टीकोन यामध्ये पारंगत करत असतात. ‘अमृतांजली फेस्टिव्हल ऑफ क्लासिकल डान्स अँड म्युझिक’ आणि ‘अमृतांजली नृत्योत्सव’च्या त्या संस्थापक निमंत्रक व समन्वयक आहेत.

गुरु लक्ष्मी विश्वनाथन

भरतनाट्यम कलावंत गुरु लक्ष्मी विश्वनाथन यांना जिवंत आख्यायिका संबोधता येईल, एवढे त्यांचे योगदान आहे. त्या तंजावूर परंपरेच्या मूलतत्त्वाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांना ‘काव्यात्मक नर्तकी’ (पोएटिक डान्सर) आणि ‘नर्तकींची नर्तकी’ (डान्सर्स डान्सर) असे म्हटले जाते. त्या आपल्या नृत्याला तीव्रतेने दृश्य काव्य बनवतात. लक्ष्मी विश्वनाथन यांना अनेक पुरस्कार व बहुमानांनी गौरवण्यात आला आहे. त्यात राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार, म्युझिक ॲकॅडमी, मद्रासचा प्रतिष्ठेचा नृत्य कलानिधी पुरस्कार आणि कालिदास सम्मान यांचा समावेश आहे. त्या सध्या कलाक्षेत्र मासिकाच्या संपादक आहेत. यंदाच्या महोत्सवात त्या ‘अभिनय मंजरी’ हा आविष्कार सादर करणार आहेत.

शुभश्री रामचंद्रन

गायिका शुभश्री रामचंद्रन या पद्मभूषण संगीत कलानिधी त्रिचूर रामचंद्रन व कलानिधी चारुमती रामचंद्रन यांच्या कन्या असून अधिकारी एकल गायक (सोलो व्होकलिस्ट) म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या सध्याच्या काळात संगीतातील जीएनबी-एमएलव्ही परंपरेची मशाल पुढे नेणाऱ्या सर्वाधिक प्रभावी नेत्या आहेत. त्यांना दिग्गज गुरु डी. के. पट्टमल यांच्याकडून संगीत शिकण्याचे भाग्य लाभले आहे. शुभश्री यांना अनेक पुरस्कार व बहुमानांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यात युवा कला भारती, भारतीय विद्या भवन यंग म्युझिशियन ॲवॉर्ड २०१४, कृष्ण गण सभेतर्फे सन २०१५ चा यज्ञरामन एक्सलन्स ॲवॉर्ड आदींचा समावेश आहे.

महोत्सवाची तारीख : रविवार, १५ एप्रिल २०१८, वेळ – सायंकाळी पाच ते आठ

ठिकाण : अमृतांजली स्टुडिओ, ४०७-४०९, लुंकड स्कायमॅक्स, दत्त मंदिरासमोर, विमान नगर, पुणे ४११००६

‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांची पुण्यामध्ये मुलाखत

0

पुणे : जागतिक कीर्तीचे उद्योगपती आणि दुबईस्थित ‘अल अदील’ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार येत्या १३ एप्रिल २०१८ (शुक्रवार) रोजी पुण्यात येत आहेत. ‘मराठी युवा उद्योजक उद्योगिनी सेवाभावी संस्था, महाराष्ट्र’तर्फे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित ‘खासा २०१८’ या उद्योग प्रदर्शन-विक्री कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. दातार यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी टिळक स्मारक मंदिरात प्रसिद्ध निवेदिका सौ. उत्तरा मोने या डॉ. दातार यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. आपल्या कर्तृत्वाची यशोगाथा उलगडत डॉ. दातार नवउद्योजक व उद्यमशील तरुणाईला मार्गदर्शन करणार आहेत. मुलाखत व उद्घाटनाचा हा कार्यक्रम सकाळी ९ ते १२ या वेळेत होईल. जीवनाच्या संघर्षपूर्ण प्रवासातून अनेक अडथळे पार करत व्यवसायात गरूडभरारी घेणाऱ्या आणि मराठी उद्योजकतेचा झेंडा जागतिक पातळीवर फडकावणाऱ्या डॉ. दातारांशी संवाद साधण्याची संधी नवउद्योजकांना, तसेच पुणेकरांना मिळणार आहे.

‘खासा २०१८’ हा उद्योजकांसाठीचा खास उद्योग प्रदर्शन-विक्री उपक्रम असून तो १३ ते १५ एप्रिल २०१८ (शुक्रवार ते रविवार) असे तीन दिवस गणेश कला क्रीडा मंच येथे सुरु राहणार आहे. प्रदर्शनात सागवानी, देवघर पेंटिंग, इमिटेशन ज्वेलरी, हँडमेड ज्वेलरी, सेंद्रिय खाद्यपदार्थ, उत्पादकांनी बनवलेले मसाले, ड्रेस मटेरियल, शर्ट्स, टूर-ट्रॅव्हल्सचे पॅकेजेस, विविध क्षेत्रातील सेवा यांचा समावेश असून पोटपूजेसाठी खास खाऊगल्लीही आहे. त्यामध्ये उकडीच्या मोदकापासून हैदराबादी बिर्याणीपर्यंत आणि चाटपासून पिझ्झा-बर्गरपर्यंत वैविध्यपूर्ण खाद्य पदार्थांचा आस्वाद घेता येईल.

जिद्द, अफाट मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्रात अनेक उद्योजक घडले आहेत. यातील काही मोजक्या उद्योजकांनी भारतातच नव्हे, तर जगातही आपल्या उद्योगाचे साम्राज्य निर्माण केले आहे. दुबईतील सुप्रसिद्ध ‘अल अदील’ समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या डॉ. दातार यांनी गेल्या ३३ वर्षांत आपल्या व्यवसायाचा आखाती देशांत प्रचंड जम बसवला. दुबईमध्ये एका छोट्याशा दुकानापासून व्यवसायास सुरुवात करणाऱ्या दातार यांनी आखाती देशांत ३९ सुपर मार्केट्सची स्वत:ची रीटेल आऊटलेट्सची साखळी निर्माण केली. त्याचबरोबर पिठाच्या दोन गिरण्या आणि  मसाल्याचे दोन कारखानेही उभारले. धनंजय दातार यांची ‘अल अदिल ट्रेडिंग’ कंपनी आखाती देशांतील स्थानिक व भारतीयांच्या घराघरांत पोचली आहे.

डॉ. धनंजय दातार यांची यशोगाथा उद्योगाची आकांक्षा बाळगणाऱ्या तरुणांसाठी, तसेच नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. गरीबीत बालपण गेलेल्या धनंजय यांनी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्षाचा मुकाबला केला आहे. कोणताही उद्योजकीय वारसा अथवा आर्थिक पाठबळ नसताना त्यांनी तरुण वयात व्यवसायाचे स्वप्न बघितले. मुंबईत फिनेल विक्रीचा व्यवसाय करताना विक्रीकला व ग्राहकसेवा कौशल्य आत्मसात केले. वडिलांनी दुबईत सुरु केलेल्या छोट्याशा दुकानात झाडू-पोछा, लादी सफाई, पोती वाहून नेणे अशा कामांतून कारकीर्दीची सुरवात केली. आई-वडिलांच्या संस्काराची शिदोरी आणि कष्टाळू वृत्ती या जोरावर त्यांनी एका छोट्याशा व्यवसायाचे रुपांतर बहुराष्ट्रीय उद्योग समूहात करुन दाखवले. दुबईच्या शासकांनी धनंजय दातार यांना ‘मसालाकिंग’ बहुमानाने संबोधून त्यांच्या परिश्रम आणि कर्तृत्वाचा यथोचित गौरव केला आहे.

व्यवसाय लहान आहे, की मोठा, असा विचार न करता वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा आणि परिणामकारक सेवा या त्रिसूत्रीच्या जोरावर ग्राहकांचे समाधान केल्यास नक्कीच यश मिळते, यावर डॉ. दातारांचा भर आहे. प्रचंड मेहनत आणि प्रामाणिकपणा याशिवाय स्वप्ने पूर्ण होत नाहीत, असा सल्ला ते नेहमीच तरुणांना देतात. हाच प्रामाणिकपणा दातार यांनी मागील ३३ वर्षे आपल्या व्यवसायात कायम ठेवला. यामुळे त्यांना भारताबरोबरच जागतिक स्तरावरही अनेक प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.‘फोर्ब्स मिडल ईस्ट’तर्फे नुकताच ‘टॉप इंडियन लीडर्स इन द अरब वर्ल्ड २०१७ – रीटेल ॲवॉर्ड’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. डॉ. दातार हे ‘फोर्ब्स मिडल ईस्ट’च्या आघाडीच्या १०० भारतीय नेत्यांच्या मानांकन यादीतील बहुधा एकमेव महाराष्ट्रीय आहेत. अरेबियन बिझनेस रँकमध्ये त्यांना १४ वे, तर फोर्ब्जच्या यादीमध्ये ३३ वे मानांकन मिळाले आहे.

डॉ. दातार यांनी विविध संस्थांना मदत करुन सामाजिक बांधीलकीही जपली आहे. भारतीय संस्कृतीचे आखाती देशांमध्ये संवर्धन करण्यात ते आघाडीवर आहेत. दुबईमध्ये मराठी उपक्रम राबवण्यास ते अधिकाधिक मदत करतात.

‘अल अदील ट्रेडिंग’ समूहाने डॉ. धनंजय दातार यांच्या चैतन्यशील नेतृत्वाखाली ९००० भारतीय उत्पादने संयुक्त अरब अमिरातीत (युएई) आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून स्वतःच्या ‘पिकॉक’ या ब्रँडअंतर्गत तयार पिठे, मसाले, लोणची, मुरंबे, नमकीन, इन्स्टंट अशा श्रेणींत ७०० हून अधिक उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहेत. मसाले व पिठे तयार करुन पॅकबंद करण्यासाठी डॉ. दातार यांनी दुबई इन्व्हेस्टमेंट पार्कमध्ये दीड लाख चौरस फुटांचा भव्य प्रकल्प उभारला आहे. त्यांच्या उद्योगाची भारतीय शाखा ‘मसाला किंग एक्स्पोर्ट्स’ या नावाने मुंबईत कार्यरत आहे. ‘अल अदील’ समूहाचे ३९ आऊटलेट्स, आधुनिक तंत्रज्ञानयुक्त २ पिठाच्या गिरण्या व २ मसाला कारखाने असे जाळे दुबई, अबू धाबी, शारजा व अजमान येथे विस्तारले असून मुंबई निर्यात विभागाची शाखा ‘मसाला किंग एक्स्पोर्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ नावाने मुंबईत आहे. ‘अल अदील’ समूह सक्रिय विस्ताराच्या टप्प्यात असून त्याने नुकतीच दुबईसह ओमान, बहारीन व सौदी अरेबियामध्ये नवी आऊटलेट्स उघडली आहेत. कंपनीने अमेरिका, कॅनडा, टांझानिया, केनया, स्वित्झर्लंड, इटली व एरित्रिया, तसेच कुवेत, ओमान व संयुक्त अरब अमिरातीत विशेष व्यापारी मार्ग स्थापन करुन आयात व निर्यात क्षेत्रातही विस्तार साधला आहे.

हयात गेली जिन्यात ..कहाणी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांची …

0

पुणे-देशातील ज्या महान विभूतींच्या, राष्ट्रपुरुषांच्या  नावाने आयुष्यभर राजकारण आणि समाजकारण करत महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावरील अलिशान दालनात आणि सभागृहात अनेक पुढारी ,नेते पोहोचले … त्या महान विभूतींच्या  राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांची हि कहाणी …
तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचताना या प्रतिमा जिन्यात दिसतात . पण एकदा तिसऱ्या मजल्यावर आपण पोहोचलो, विविध पदाधिकाऱ्यांच्या वातानुकुलीत अलिशान दालनात , खाजगी दालनात (अँटी चेंबर्स) पोहोचलो कि या तस्वीरी आपणास दिसत नाहीत . तिथे दिसतात , आपापल्या पक्षाचे अध्यक्ष आणि पक्षांच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे फोटो …. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महापालिकेची मुख्य सभा भरते तिथे  महाराजांची तसबीर तर असणारच.. . पण घटनाकार डॉ. आंबेडकर ,साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या तसबिरी पदाधिकाऱ्यांच्या दालनात,पक्षांच्या दालनात  अगर सभागृहात दिसत नाही. इथे देखील त्यांच्या नावांचे राजकारण चालते पण कदाचित या तसबिरींची येथे गरज भासत नसावी .
महापालिकेचा तिसरा मजला …. म्हणजे महापालिकेचे  सर्व पदाधिकारी , विविध पक्षांची दालने आणि अँटी चेंबर्स येथे आहेत.येथे सर्व नगरसेवक, अधिकारी, माध्यम प्रतिनिधी आणि अडलेली ,नडलेली अनेक कामे  घेवून आलेले सामान्य नागरिक ,बडे नागरिक यांची वर्दळ असलेला हा महत्वपूर्ण मजला आहे. या शिवाय पालिकेत लगतच्या इमारतीत अधिकाऱ्यांची वातानुकुलीत दालने आहेत . नौकर , चाकर , कमी पगारातले सुरक्षा रक्षक , हुजरेगिरी करणारे ,वाद विवाद करणारे , न्यायासाठी हेलपाटे मारणारे , ठेके मिळवायला येणारे अशा अनेकांची वर्दळ पालिकेत सर्वत्र असते . पण राष्ट्रपिता महात्मा गांधी ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,इंदिरा गांधी ,पंडित नेहरू यांच्या तसबिरी असणारा परिसर पाहिला तर तो बहुतांशी परिसर जिन्यातच आढळून येतो .नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस,रामदास आठवले, राहुल गांधी, सोनिया गांधी , शरद पवार , सुप्रिया सुळे या सर्वांच्या प्रतिमा अलिशान दालनात विराजमान आहेत . पण कित्येक वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी , इंदिरा गांधी ,अण्णाभाऊ साठे  आदी मान्यवरांच्या तसबिरी जिन्यातच आहेत .स्व. राजीव गांधींची एक तसबीर व्हरांड्यात आहे.

अगोदर महागाई त्यात मनभेद ; देशभरातील असंतोषाचे जनक भाजप सरकार – रमेश बागवे

0

पुणे- अगोदरच महागाईच्या ज्वाळात होरपळनाऱ्या जनतेला आणखी  जातिभेदाच्या खाईत ढकलून भाजप सरकार देशाची अवहेलना करीत आहे. खोटी आश्वासनं तर दिली पण आता सलोखा हि बिघडवला आहे . त्यामुळे सामाजिक समता ,शांतता ,आणि बंधुत्वासाठी आम्ही लक्ष्यवेधी म्हणून  उपोषण करीत आहोत असे पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले.
आज अलका टाॅकीज चौकात कॉंग्रेस पक्षाने भाजपा सरकारच्या धोरणाविरुद्ध आणि जनतेत सलोखा राहावा या उद्देशाने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे ,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , बाळासाहेब शिवरकर ,अरविंद शिंदे, अविनाश बागवे ,मनीष आनंद,बंडू नलावडे ,अजित दरेकर , शरद रणपिसे, गोपाळ तिवारी, नीता रजपूत,चांदबी नदाफ,शेखर कपोते, सोनाली मारणे,सतीश पवार, काका धर्मावत ,रफिक शेख ,विकास लांडगे ,लता राजगुरू, भारती कोंडे, शिवा मंत्री, राजू गायकवाड ,विश्वास दिघे, निलेश बोराटे आदी असंख्य मान्यवर कार्यकर्ते या वेळी सहभागी झाले होते .

वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नका, जाळू नका; महावितरणचे आवाहन

0

 

पुणे : शहरी व ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी किंवा घरे, इमारतींच्या परिसरात असलेल्या वीजयंत्रणेजवळ असलेला कचरा जाळण्यामुळे किंवा कचर्‍याने पेट घेतल्यामुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होत आहे. सध्या उन्हाचा तडाखा सुरु असल्याने वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू किंवा जाळू नका असे आवाहन महावितरणने केले आहे.

शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पीलर, रोहित्र, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स, डीपी आदी वीजयंत्रणेजवळील उघड्यावर असलेल्या जागेत घरातील कचरा टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. वीजयंत्रणेजवळ साठवलेला कचरा पेटविल्याने किंवा इतर कारणांमुळे कचरा जळाल्याने जवळच असलेल्या विजेच्या भूमिगत केबल व इतर वीजयंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पर्यायाने संबंधीत परिसरातील वीजपुरवठाही खंडित  झालेला आहे. सध्या तापमानही वाढत आहे. त्यामुळे कचर्‍यांमध्ये आगी लागण्याचे प्रकार वाढत आहेत. वीजयंत्रणाही उन्हामुळे तापलेली असल्याने अशा प्रकारांमुळे धोका वाढला आहे. ओव्हरहेड वीजतारांखाली असलेल्या कचर्‍याच्या ढिगारा पेटविल्यामुळे किंवा त्यास आग लागल्यामुळे वीजतारा वितळून तारा तुटण्याचा व त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका आहे.

महावितरणकडून सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांना संरक्षक जाळ्या, कपाऊंड लावलेले आहे. परंतु अनेक ठिकाणी कंपाऊंडच्या आतमध्ये कचरा टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. खाद्यपदार्थामुळे छोटे प्राणी तेथे येतात व वीजयंत्रणेच्या संपर्कात आल्यावर वीजपुरवठा खंडित होतो किंवा प्राण्याचा नाहक जीवही जातो. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांसह वीजयंत्रणेपासून सावध व सतर्क राहावे तसेच वीजयंत्रणेच्या परिसरात किंवा कपाऊंडमध्ये ओला व सुका कचरा टाकण्याचे टाळावे. नागरिकांनी उघड्यावर असलेल्या वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी कचरा टाकू नये किंवा साठवलेला कचरा जाळू नये. अशा घटनांतून वीजयंत्रणेला आग लागल्याचे किंवा संभाव्य धोका असल्याचे दिसताच टोल फ्री असलेल्या 1912 किंवा 18001023435 किंवा 18002333435 या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

पुणे झोनमध्ये सव्वा आठ लाख ग्राहक वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’

0

वेबसाईट, मोबाईल अ‍ॅपद्वारे कुठूनही पेमेंट शक्य

पुणे : महावितरणचे वीजबिल भरण्यासाठी वीजग्राहकांचा पुणे परिमंडलात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून गेल्या मार्च महिन्यात तब्बल 8 लाख 21 हजार 901 वीजग्राहकांनी 145 कोटी 87 लाख 47 हजार रुपयांचा ऑनलाईनवीजबिल भरणा केला आहे. पुणे परिमंडलातील मार्चमधील ग्राहकसंख्या ही आजवरची ऑनलाईनवीजबिल भरणा करणारी सर्वाधिक ग्राहकसंख्या आहे.

      पुणे परिमंडलातील पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह हवेली, मुळशी, आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालुक्यात सातत्याने ऑनलाईनवीजबिल भरण्यासाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे. महावितरणची वेबसाईट, मोबाईलअ‍ॅप तसेच इतर ऑनलाईन सुविधांतून ऑनलाईनवीजबिल भरणा कुठूनही करणे सहज शक्य झाले आहे. मागील मार्च महिन्यात पुणे शहरातील 4 लाख 88 हजार वीजग्राहकांनी 82 कोटी 60 लाख, पिंपरी चिंचवड शहरातील 2 लाख 31 हजार वीजग्राहकांनी 42 कोटी 4 लाख तसेच मुळशी, आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालुक्यातील 1 लाख 2 हजार वीजग्राहकांनी 21 कोटी 24 लाख रुपयांचा ऑनलाईनभरणा केला आहे.

महावितरणने लघुदाब वीजग्राहकांसाठी ऑनलाईनबिल भरण्यासाठी www.mahadiscom.in या वेबसाईटद्वारे सोय उपलब्ध करून दिलेली आहे. जून 2016 मध्ये वीजग्राहकांसाठी मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली. या अ‍ॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्‌सचा पर्याय उपलब्ध आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळत आहे. ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपवरून वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणे केले आहे.