पुणे : शहरी व ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी किंवा घरे, इमारतींच्या परिसरात असलेल्या वीजयंत्रणेजवळ असलेला कचरा जाळण्यामुळे किंवा कचर्याने पेट घेतल्यामुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होत आहे. सध्या उन्हाचा तडाखा सुरु असल्याने वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू किंवा जाळू नका असे आवाहन महावितरणने केले आहे.
शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पीलर, रोहित्र, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स, डीपी आदी वीजयंत्रणेजवळील उघड्यावर असलेल्या जागेत घरातील कचरा टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. वीजयंत्रणेजवळ साठवलेला कचरा पेटविल्याने किंवा इतर कारणांमुळे कचरा जळाल्याने जवळच असलेल्या विजेच्या भूमिगत केबल व इतर वीजयंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पर्यायाने संबंधीत परिसरातील वीजपुरवठाही खंडित झालेला आहे. सध्या तापमानही वाढत आहे. त्यामुळे कचर्यांमध्ये आगी लागण्याचे प्रकार वाढत आहेत. वीजयंत्रणाही उन्हामुळे तापलेली असल्याने अशा प्रकारांमुळे धोका वाढला आहे. ओव्हरहेड वीजतारांखाली असलेल्या कचर्याच्या ढिगारा पेटविल्यामुळे किंवा त्यास आग लागल्यामुळे वीजतारा वितळून तारा तुटण्याचा व त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका आहे.
महावितरणकडून सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांना संरक्षक जाळ्या, कपाऊंड लावलेले आहे. परंतु अनेक ठिकाणी कंपाऊंडच्या आतमध्ये कचरा टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. खाद्यपदार्थामुळे छोटे प्राणी तेथे येतात व वीजयंत्रणेच्या संपर्कात आल्यावर वीजपुरवठा खंडित होतो किंवा प्राण्याचा नाहक जीवही जातो. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांसह वीजयंत्रणेपासून सावध व सतर्क राहावे तसेच वीजयंत्रणेच्या परिसरात किंवा कपाऊंडमध्ये ओला व सुका कचरा टाकण्याचे टाळावे. नागरिकांनी उघड्यावर असलेल्या वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी कचरा टाकू नये किंवा साठवलेला कचरा जाळू नये. अशा घटनांतून वीजयंत्रणेला आग लागल्याचे किंवा संभाव्य धोका असल्याचे दिसताच टोल फ्री असलेल्या 1912 किंवा 18001023435 किंवा 18002333435 या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.