वेबसाईट, मोबाईल अॅपद्वारे कुठूनही पेमेंट शक्य
पुणे : महावितरणचे वीजबिल भरण्यासाठी वीजग्राहकांचा पुणे परिमंडलात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून गेल्या मार्च महिन्यात तब्बल 8 लाख 21 हजार 901 वीजग्राहकांनी 145 कोटी 87 लाख 47 हजार रुपयांचा ‘ऑनलाईन‘ वीजबिल भरणा केला आहे. पुणे परिमंडलातील मार्चमधील ग्राहकसंख्या ही आजवरची ‘ऑनलाईन‘ वीजबिल भरणा करणारी सर्वाधिक ग्राहकसंख्या आहे.
पुणे परिमंडलातील पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह हवेली, मुळशी, आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालुक्यात सातत्याने ‘ऑनलाईन‘ वीजबिल भरण्यासाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे. महावितरणची वेबसाईट, मोबाईलअॅप तसेच इतर ऑनलाईन सुविधांतून ‘ऑनलाईन‘ वीजबिल भरणा कुठूनही करणे सहज शक्य झाले आहे. मागील मार्च महिन्यात पुणे शहरातील 4 लाख 88 हजार वीजग्राहकांनी 82 कोटी 60 लाख, पिंपरी चिंचवड शहरातील 2 लाख 31 हजार वीजग्राहकांनी 42 कोटी 4 लाख तसेच मुळशी, आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालुक्यातील 1 लाख 2 हजार वीजग्राहकांनी 21 कोटी 24 लाख रुपयांचा ‘ऑनलाईन‘ भरणा केला आहे.
महावितरणने लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन‘ बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in या वेबसाईटद्वारे सोय उपलब्ध करून दिलेली आहे. जून 2016 मध्ये वीजग्राहकांसाठी मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात आली. या अॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळत आहे. ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अॅपवरून वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणे केले आहे.