न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मिळणार विद्यार्थिनींना प्रवेश
‘सुजाण नागरिक’ साठी प्रयत्नशील होणे गरजेचे – रवींद्र साठे
पुणे : युवकांनी संवेदनशील व सुजाण नागरिक बनणे गरजेचे आहे असे मत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद साठे यांनी व्यक्त केले. ते मंगळवारी महाराष्ट्र दिनानिमित्त ‘यशस्वी ‘ संस्थेतर्फे आयोजित ‘यशोत्सव’ स्नेहसंमेलनात बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, युवकांनी शिक्षण आणि कौशल्याद्वारे स्वतःच्या करिअरचा विकास जरूर करावा, मात्र स्वतः प्रगतीची उंच शिखरे पार करत असताना आपल्या समाजातील प्रश्नांबद्दल संवेदनशील असणे गरजेचे आहे, वेळप्रसंगी आदिवासी पाडे, दलित वस्त्यांमध्ये जाऊन तिथले प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न युवकांनी करायला हवा.’यशस्वी’ सारख्या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्याना थेट औद्योगिक कंपन्यांतून ऑन द जॉब ट्रेनिंग करण्याची संधी मिळत आहे आणि हजारो विद्यार्थी रोजगारक्षम बनत आहे ही निश्चितच कौतुकास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःमधील सुप्त गुण वेळीच ओळखून एखाद्या तरी क्षेत्रातील नैपुण्य प्राप्त करण्याचा ध्यास घ्यायला हवा, ध्येयाप्रती स्पष्टता असायाला हवी असेही त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
याप्रसंगी त्यांच्या हस्ते विविध कंपन्यांतून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते यावेळी ‘यशोगाथा’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले .
यावेळी कॅप्टन डॉ. सी.एम.चितळे, यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे संचालक डॉ. मिलिंद मराठे यांनीही विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी ‘यशस्वी’ संस्थेद्वारे ज्युनिअर इंजिनिअर पदाच्या नोकरीसाठी निवड झालेल्या महेंद्र गिरी या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यक्रमापूर्वी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. ‘शिकता शिकता कमवू या’ या समूह गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली.यावेळी विद्यार्थ्यानी नृत्य, गायन व काव्य वाचन असे विविध कलाप्रकार सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘यशस्वी’ संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी केले.
तर आभार प्रदर्शन ‘यशस्वी’ चे संचालक संजय छत्रे यांनी केले.यावेळी कार्यक्रमाला ‘यशस्वी’ च्या संचालिका स्मिता धुमाळ, संचालक राजेश नागरे, रजिस्टार डॉ. विजय कुलकर्णी, संस्थेचे सर्व शिक्षक, सुपरवायजर, फिल्ड ऑफिसर, शिक्षकेतर कर्मचारी आणि विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी श्वेता साळी, वैशाली भुसारी, माधवानंद खांडेकर, तेजस लवंगे, कल्याणी कबाळे,उर्मिला सातपुते,वर्षा राणे, सौमीन पात्रा, पूजा दोदे, मेघरंजनी रेवरे, मेघा बोरकर, रश्मी शिंदे व पवन शर्मा,नवल पुट्टा यांनी विशेष सहकार्य केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
”स्व. विलासराव देशमुख तारांगण अभ्यासकांना पर्वणी ”
शरद पवारांकडून व्हिडीओ काँन्फरन्सद्वारे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या कार्याचा गौरव
पुणे –ऐतिहासिक , सांस्कृतिक पुणे शहराला स्व. विलासराव देशमुख तारांगणामुळे आता नवी ओळख लाभली आहे. देशात पहिल्या ठरलेल्या या अत्याधुनिक तंत्रज्ञानावरील हे थ्रीडी तारांगण अभ्यासकांना, नागरिकांना पर्वणी आहे . अशा शब्दात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आपल्या भावना व्हिडीओ काँन्फरन्सद्वारे व्यक्त करताना नागरिकांच्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेबरोबरच नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या कार्याचाही गौरव केला.
माजी उपमहापौर व नगरसेवक आबा बागुल यांच्या संकल्पनेतून पुणे महानगरपालिकेतर्फे राजीव गांधी ई – लर्निंग स्कुल येथे उभारण्यात आलेल्या स्व. विलासराव देशमुख थ्रीडी तारांगणाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र दिनी राज्याच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, लोकसभेचे माजी सभापती व ,माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, स्व. विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आमदार अमित देशमुख,माजी मंत्री दिलीप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक , खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर , हर्षवर्धन पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम ,आमदार मेधा कुलकर्णी, उल्हास पवार , मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर , विरोधी पक्षनेते चेतन तुपे,माजी महापौर दत्ता धनकवडे, दीप्ती चवधरी ,राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी महापौर कमल व्यवहारे ,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी , गोपाळ तिवारी , वीरेंद्र किराड ,महेश वाबळे , नगरसेविका नंदा लोणकर , मंजुश्री खर्डेकर ,सुजाता शेट्टी, आयुक्त सौरभ राव, पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल आणि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उदघाटनास इच्छा असूनही वैद्यकीय कारणामुळे उपस्थित राहू न शकलेले माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्हिडीओ काँन्फरन्सद्वारे शुभेच्छा संदेश देताना स्व. विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला. एका खेड्यातून जन्म घेऊन राष्ट्रीय पातळीवर काम केलेल्या विलासराव देशमुख यांच्या नावाने या तारांगणाचे उदघाटन होत आहे ही आनंदाची बाब आहे केंद्रीय मंत्रीमंडळात मी विलासराव यांच्याबरोबर होतो. विज्ञानाचा प्रसार वाढविण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्यावर सोपवली होती. त्यांनी ज्याप्रकारे केंद्र आणि राज्यात काम केले ते आदर्शवत होते. परंतु आपल्या सगळ्यातून ते लवकर निघून गेले, त्यांचे निधन आम्हा सर्वांना चटका लावणारे होते अशा शब्दात त्यांनी विलासरावांबद्दल आठवणी जागविल्या. माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या कार्याचा गौरव करताना शरद पवार म्हणाले , गेली तीस वर्षे सातत्याने निवडून जाण्याचा विक्रम आबा बागुल यांनी केला आहे.
एकवेळ लोकसभेवर निवडून येणे सोपे ;पण वॉर्डातून महानगरपालिकेची निवडणूक लढणे ही काही सोपी गोष्ट नसते. एकदा नव्हे , एक वर्षे नाही तीस वर्षांसाठी लोकांनी निवडून देणे ही एक आगळी – वेगळी कृती आहे. आबा बागुल यात यशस्वी ठरले. सातत्याने लोकांच्या भल्यासाठी काम करण्याची भूमिका प्रत्यक्ष कृतीत आणल्याने आणि मतदारसंघात वैशिष्ठयेपूर्ण विकासकामे करण्याची संकल्पना राबविल्याने नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे ही गोष्ट मान्य करावीच लागेल. त्यांनी अनेक विकासकामांना चालना दिली. त्यांचे कामाचे स्वरूप पाहता अन्य लोकप्रतिनिधींच्या तुलनेत वेगळेपण असल्याचे मला नेहमीच जाणवते. दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, भूगर्भात कमी होणारा पाणीसाठा पाहता शाश्वत उपायासाठी आबा बागुल यांनी राबविलेला ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प सर्वत्र झाल्यास पाण्याची बचत होणार आहे. शिवाय पाण्यावरून निर्माण होणारा दबावही नाहीसा होईल. पुण्यालगत असणाऱ्या टेकड्यांवरील जैववैविध्य यांचे जतन -संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यासाठी तळजाई टेकडीवर वसुंधरा जैववैविध्य उद्यान प्रकल्प राबविण्यात आबा बागुल यांचा पुढाकार आहे . ही एक दृष्टी आहे,निसर्गाच्या संवर्धनासाठी, पर्यावरण समतोलासाठी नव्या पिढीत महत्व ठसविण्याचा संदर्भात आबा बागुल यांनी घेतलेला पुढाकार पाहता त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. अनेक प्रकल्प असे आहेत ,जे पुणेकरांबरोबरच देशातील लोकांनाही उपयुक्त ठरणार आहेत . आज तारांगणाची उभारणी खगोल -विज्ञानासंदर्भात अभ्यासासाठी पर्वणीच ठरणार आहे.असेही शरद पवार म्हणाले.
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, स्व. विलासराव देशमुख तारांगणामुळे विज्ञान – तंत्रज्ञानबाबत माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले आहे. पुण्यात प्रेक्षणीय स्थळे खूप आहेत, आता त्यात या तारांगणाची भर पडली आहे. ज्या पुण्याने विलासरावाना घडविले,त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला. त्या पुण्यात तारांगणाच्या निर्मितीमुळे त्यांच्या स्मृतीला सदैव उजाळा मिळणार आहे. नगरसेवक आबा बागुल यांचे कोणतेही कार्य , विकासकामे ,उपक्रम हे नावीन्यपूर्ण असतात आणि ते पूर्णही करून दाखवतात हे या तारांगणाच्या उभारणीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. नावीन्यपूर्ण उपक्रमात आबा बागुल यांचा कुणीही हात धरणार नाही अशी त्यांची कार्ये आहेत. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी अशी तारांगणे व्यापक स्तरावर उभारणे ही काळाची गरज आहे.
लोकसभेचे माजी सभापती व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी म्हणाले, विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांमधील खगोलशास्त्राच्या कुतूहलात वाढ व्हावी आणि त्यांना विश्वाच्या व्यापक पसाऱ्यातील काही उदबोधक तथ्यांची माहिती व्हावी या उद्देशाने उभारण्यात आलेले तारांगण आणि त्याला विज्ञान – तंत्रज्ञान याबाबत सदैव सजग असलेल्या स्व. विलासराव देशमुख यांचे नाव याचा मनस्वी आनंद होत आहे. एका मुख्यमंत्र्यांची स्मृती या उपक्रमाद्वारे जपली जात आहे आणि ती संकल्पना पूर्णत्वास नेणाऱ्या आबा बागुल यांचे अभिनंदन केले पाहिजे. स्व . विलासराव हे माझे चांगले मित्र होते. ज्यावेळी हे तारांगण पाहिले त्याचक्षणी असे वाटले कि शिक्षण पद्धतीत आता बदल करण्याची गरज आहे. अभ्यासक्रमात तारांगण हा स्वतंत्र विषय अनिवार्य केला पाहिजे.
मनोगतात आमदार होण्याविषयी आबा बागुल यांनी व्यक्त केलेल्या इच्छेवर स्व. विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आमदार अमित देशमुख म्हणाले,चांगले कार्य करणाऱ्या आबा यांच्या पाठीशी व्यासपीठावरील सर्वपक्षीयांनी उभे राहिले पाहिजे.विधिमंडळाचा मार्ग आपल्या सर्वांनाच त्यांना दाखवायचा आहे. आपण सर्वांनी ठरवले तर आबा बागुल यांची आमदार होण्याची इच्छा अपूर्ण राहणार नाही. एका चांगल्या कार्यकर्त्याला पाठबळ दिले पाहिजे . तीन दशके नेतृत्व करणारे आणि तेही एका पक्षातुन सहा टर्म लोकप्रतिनिधित्व करणे हा एक विक्रम आहे आणि यापेक्षा आणखी काय एका कार्यकर्त्याने सिद्ध करावे.आबा बागुल आम्ही तुमची शिफारस करू. २०१९ मध्ये तुम्हाला काँग्रेसची उमेदवारी मिळो अशी प्रार्थना करतो. ज्या पुण्यात स्व. विलासराव देशमुख यांचे शिक्षण झाले, त्याच शहरात त्यांच्या नावाने तारांगण उभारले गेले. याचा मला अभिमान असून पुढील पिढीला यातून खूप काही शिकता येणार आहे. बाबांचे पुणे हे सर्वात आवडत शहर होते. ते जर गावी नसते आले, तर त्यांची पुण्यातून राजकीय प्रवासाला सुरुवात झाली असती, असेही त्यांनी नमूद केले.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, या तारांगणाने पुण्याच्या प्रतिष्ठेत भर घातली आहे.सातत्य आणि नावीन्यपूर्ण कामांमुळे आबा बागुल तीस वर्षे लोकप्रतिनिधी आहेत. चांगल्या कामात सदैव ते पुढे असतात. विधीमंडळ असो किंवा लोकसभा, आबा बागुल तिकडे गेले तर आमचा प्रॉब्लेम होईल त्यामुळे आबा बागुल यांनी आमदार होऊ नये असेही ते मिश्कीलपणे म्हणाले.
मनोगत व्यक्त करताना माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले, दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख हे एक कणखर नेतृत्व होते. आज त्यांच्या नेतृत्वाला काँग्रेस पोरकी झाली आहे. विज्ञान – तंत्रज्ञानाबाबत सजग असलेल्या स्व. विलासराव देशमुख यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या नावाने पुणे महानगरपालिकेने या तारांगणाची उभारणी केली आहे.त्यासाठी सर्वपक्षीयांनी सहकार्य केले याबद्द्ल त्यांनी आभार मानले.
प्रास्ताविकात महापौर मुक्ता टिळक यांनी हे तारांगण देशात आदर्शवत ठरले आहे. आबा बागुल यांची दूरदृष्टी आणि सदैव नावीन्यपूर्ण उपक्रम यामुळे ते लोकप्रिय आहेत . गोपाळ चिंतल यांनी आभार मानले.
महावितरणच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी पदोन्नतीने श्री. पी.एस. पाटील यांची निवड
मुंबई-
महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून श्री. पी. एस. पाटील यांची पदोन्नतीने नुकतीच निवड करण्यात आली आहे. महावितरणचे व्यवस्थापन आणि प्रसार माध्यमे, ग्राहक व इतर घटकांमध्ये उत्तम समन्वय साधून काम करणारे तसेच दांडगा जनसंपर्क असणारे अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. या पूर्वी ते सहमुख्य जनसंपर्क अधिकारी-(I) या पदावर कार्यरत होते.
1992 साली सरळ सेवेतून त्यांची तत्कालीन महाराष्ट्र राज्य विदयुत मंडळात जनसंपर्क अधिकारी म्हणून निवड झाली. त्यानंतर उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, सहमुख्य जनसंपर्क अधिकारी-(I) या पदांसह शिष्टाचार अधिकारी या पदाची धुरा त्यांनी मागील अनेक वर्षापासून यशस्वीरित्या सांभाळली आहे. श्री. पी.एस. पाटील यांच्या नेतृत्वात महावितरणच्या जनसंपर्क विभागाने अधिक भरीव कामगिरी करत जनसंपर्क विभागाला नवे आयाम मिळवून दिले आहे. श्री. पी.एस. पाटील यांच्या कामातील तत्परता, मनमिळावू स्वभाववृत्तीमुळे जनसंपर्क विभाग यशस्वी कामगिरी करीत असून त्यातून उत्तम समन्वय, चांगली प्रतिमा निर्मिती व ग्राहकांचा पाठिंबा मिळविण्यात, प्रभावी जनमत घडवून ग्राहक जागृती करण्यात महावितरणला यश मिळाले आहे. श्री. पाटील यांच्या या प्रभावी कामाची दखल घेत महावितरण व्यवस्थापनाने पदोन्नतीने त्यांची मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी निवड केली आहे.
श्री. पी.एस. पाटील हे मुळचे पिशवी (ता. शाहुवाडी, जि कोल्हापूर) येथील रहिवाशी असून महावितरणमध्ये रूजू होण्यापूर्वी त्यांनी कोल्हापूर येथून दैनिक पुढारीसाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि विविध सामाजिक संस्थेत ते सक्रियपणे कार्यरत आहेत. राज्याच्या सहकार क्षेत्रात भरीव योगदान देणारे दिवंगत खासदार उदयसिंगराव गायकवाड यांची प्रेरणा व आदर्श यामुळेच आपण या पदापर्यन्त पोहचलो असे श्री. पी.एस. पाटील यांचे कृतज्ञतापूर्वक म्हणणे आहे. श्री. पी.एस. पाटील यांच्यापूर्वी या पदावर श्री. राम दोतोंडे कार्यरत होते.
सई ताम्हणकरने पुण्याजवळच्या सुकळवाडी गावात केले श्रम
पाणी फाउंडेशनची सक्रिय कार्यकर्ती असलेल्या अभिनेत्री सई ताम्हणकरने महाराष्ट्रदिनी पुण्याजवळच्या सुकळवाडी गावात श्रम केले. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी सई ताम्हणकर गेली तीन वर्ष कार्यरत आहे.
यंदा सुकळवाडीत गेलेल्या सईला श्रम केल्यानंतरच्या अनुभवाविषयी विचारल्यावर ती म्हणते, “दरवेळी श्रम करण्यासाठी स्वेच्छेने सहभागी होणा-या कार्यकर्त्यांची संख्या वाढतेय. आणि महाराष्ट्राच्या मातीची नव्या पिढीला ओढ लागतेय, हे पाहून मला खूप छान वाटतंय. इथे कुटूंबच्या कुटूंब येऊन श्रम करताना मी पाहते आहे. त्यातल्या एका शहरी कुटूंबप्रमुखाने श्रमकरते वेळी मला सांगितलं, की, मी शेतक-याचा मुलगा असल्याने श्रमाचे महत्व मला आहे. पण माझ्या मुलीला पाणी कुठून येतं विचाराल तर ती सांगेल की नळातून. हे ऐकायला तात्पूरतं मजेशीर वाटलं तरीही हे भयाण सत्य आहे. त्यामूळेच आपल्या मातीची ओढ लागावी. म्हणून मी तिला श्रम करण्यासाठी घेऊन आलोय”
सई पूढे म्हणते, “ही प्रतिक्रियाच सांगते, की आजचे पालक आपल्या मुलांना पून्हा एकदा मातीची ओढ लावू पाहता आहेत. आणि हे जर श्रम करण्याने शक्य होत असेल, तर पाणी फाऊंडेशन नक्कीच यशस्वी ठरतेय असं मला वाटतं.”
ती पूढे सांगते, “1 मेच्या दिवशीच लग्न असलेलं एक जोडपं श्रम करायला आलं होतं. त्याचप्रमाणे मी यावेळी अगदी सात वर्षांच्या लहानग्यांना आणि सत्तरी पार केलेल्या आजी-आजोबांनाही धडाडीने कुदळ फावडे हातात घेऊन काम करताना पाहिलं आणि श्रम करण्याचा हुरूप अजूनच वाढला. एक आगळं समाधान घेऊन मी त्या गावातून परत आली आहे.”
महिंद्रच्या मोटार वाहनांच्या विक्रीत 22 टक्क्यांची वाढ
एप्रिलमध्ये 48,097 वाहनांची विक्री
मुंबई- महिंद्र अॅन्ड महिंद्र लि. या कंपनीच्या मोटार वाहनांच्या विक्रीत एप्रिल महिन्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 22 टक्क्यांची वाढ झाली आहे.यंदाच्या एप्रिलमध्ये या वाहनांची विक्री 48,097 इतकी झाली. गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये ही विक्री 39,417 इतकी झाली होती.
महिंद्र अॅन्ड महिंद्र कंपनीच्या वाहन उत्पादन विभागाने ही आकडेवारी जाहीर केली. यंदाच्या एप्रिलमध्ये वाहनांची देशांतर्गत विक्री 45,217 इतकी झाली. तीमध्ये 19 टक्क्यांची वाढ झाली आहे. प्रवासी वाहनांच्या विभागात (यूव्ही, कार, व्हॅन) 21,927 इतक्या युनिट्सची विक्री झाली. ही वाढ 13 टक्क्यांची आहे. व्यावसायिक वाहनांच्या विभागात 18,963 युनिट्सची विक्री झाली. ही वाढ 26 टक्क्यांची आहे. मध्यम व जड व्यावसायिक वाहनांची विक्री एप्रिलमध्ये 904 इतकी झाली. तसेच 2,880 वाहनांची निर्यात करण्यात आली. ही निर्यातीतील वाढ तब्बल 88 टक्क्यांची आहे.
या कामगिरीबद्दल महिंद्र अॅन्ड महिंद्र कंपनीच्या वाहन उत्पादन विभागाचे प्रमुख राजन वधेरा म्हणाले, की 2017-18 या वर्षी आमची कामगिरी उत्तम झाली. त्यानंतरच्या पहिल्याच महिन्यात, एप्रिलमध्ये आम्ही 22 टक्क्यांची विक्रीत वाढ केली आहे. व्यक्तिगत व व्यावसायिक, अशा दोन्ही वाहनांच्या विक्रीत ही वाढ आम्ही अनुभवतो आहोत. आमच्या ‘प्लश न्यू एक्सयूव्ही-500’ या मॉडेललाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ट्रक व बस विभागाने यंदा उत्तुंग कामगिरी बजावली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आमची कामगिरी याच जोमाने होईल, याविषयी आम्हाला खात्री आहे.
वाहन उद्योग विभाग
एप्रिलमधील विक्री
श्रेणी आर्थिक वर्ष 2018-19 आर्थिक वर्ष 2017-18 वाढ
प्रवासी वाहने 21927 19391 13 टक्के
युटिलिटी वाहने 20371 18363 11 टक्के
कार्स व व्हॅन्स 1556 1028 51 टक्के
व्यावसायिक वाहने 18963 15060 26 टक्के
एलसीव्ही
(3.5 टनांपेक्षा कमी वजनाची) 17495 14360 22 टक्के
एलसीव्ही
(3.5 टनांपेक्षा अधिक वजनाची) 564 422 34 टक्के
एमएचसीव्ही 904 278 225 टक्के
3 डब्ल्यू 4327 3438 26 टक्के
एकूण देशांतर्गत विक्री 45217 37889 19 टक्के
एकूण निर्यात 2880 1528 88 टक्के
एकूण विक्री (देशांतर्गत अधिक निर्यात) 48097 39417 22 टक्के
(टीप ः कार्सच्या देशांतर्गत विक्रीमध्ये महिंद्र इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. या कंपनीच्या उत्पादनांची विक्रीही समाविष्ट.)
प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी कामगारांचे श्रम महत्वाचे : अमित गोयल
पुणे : अस म्हणतात आपलजग कष्टकरी कामगारांच्या श्रमांवर चालतं. कामगारांनी आपल्या श्रमाने हे सिद्ध करून दाखवलं आहे. गोयल गंगा प्रकल्प यशस्वी होण्यापाठीमागे या कुशल कामगारांचा वाटा खूप महत्वाचा आहे. असे प्रतिपादन गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त अमित गोयल यांनी केले. गोयल गंगा फौंडेशन तर्फे मंगळवारी गंगा गिट्झ, गंगा लेजंड्स, गंगाधाम टॉवर्स (दि.१ ) येथे कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी कामगारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
अमित गोयल यांनी काही कामगारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी कामगारांनी प्रशिक्षण घेण्याआधी व त्यानंतर त्यांच्या राहणीमानात तसेच उत्पन्नात सकारात्मक बदल झाले, असल्याचे मत व्यक्त केले. आज बांधकाम क्षेत्रात कारागिरामध्ये कुशलता महत्वाची असते. गोयल गंगा फौंडेशनच्या माध्यमातून कामगारांना प्रशिक्षित केले जाते त्यामुळे आमचा कामाचा दर्जा अधिक उंचावत आहे. अशी भावना अनेक कामगारांनी यावेळी व्यक्त केली.
साईट वरील प्रोजेक्ट मैनेजर वीरेन कुसुरकर महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे महत्व सांगताना म्हणाले कि, १ मे हा दिवस आपण “महाराष्ट्र दिन” आणि “जागतिक कामगार दिन” म्हणून साजरा करतो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणूनही महाराष्ट्रात साजरा केला जातो. जगभरातील कामगार चळवळींचा गौरव करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा विशेष दिन म्हणून १ मे हा दिवस पाळला जातो. औद्योगिक क्रांती नंतर कामगारांना रोजगार प्राप्त होऊ लागला पण त्यांची पिळवणूकही होत होती. कोणत्याही सुविधांशिवाय अल्प मजुरीच्या मोबदल्यास १२ ते १४ तास कष्ट करून घेतले जात होते. याविरोधात कामगारांनी एकत्रित येऊन कामगार संघटनांची निर्मिती केली. कामगारांच्या कामाची वेळ केवळ ८ तास असावी, असा ठराव करण्यात आला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली व १८९१पासून १ मे हा कामगार दिन पाळण्यात येतो.
प्रोजेक्ट हेड कुमार बर्डे,इम्तियाझ पटेल व सुधीर अग्रवाल याप्रसंगी उपस्थित होते.
टाटा स्काय घेऊन येत आहे अमिताभ बच्चन यांच्या साथीने मॅक्झिमम एन्टरटेन्मेंट कॅम्पेन
यंदाच्या क्रिकेट मोसमासाठी टाटा स्कायने मेगास्टार अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेली #HarScenekoMazzaLo ही एक नवीन कोरी जाहिरात मोहीम प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. टाटा स्कायकडून पुरवले जाणारे मनोरंजन किती सखोल आणि सर्वांगीण नाही हे सहज आवडून जाईल आणि लक्षात राहील अशा शैलीत सांगणाऱ्या या जाहिरातीमध्ये अमिताभ बच्चन एका टीकाकारांच्या भूमिकेत दिसणार आहेत. एकूण नऊ भागांची ही जाहिरात संपूर्ण मे महिनाभर टप्प्याटप्प्याने प्रसारित केली जाणार आहे.
टाटा स्कायचे चीफ कम्युनिकेशन ऑफिसर मल्ल्या दीक्षित म्हणाले “ टाटा स्काय कडे केवळ टीव्हीच नव्हे तर मोबाइल अॅपद्वारे उपलब्ध असलेल्या मनोरंजनाच्या प्रकारांना वाहिलेले चॅनल्स प्रचंड संख्येने आहेत. आमच्या मनोरंजन मंचाकडून प्रेक्षकांना सतत काहीतरी नवे ,काहीतरी नवलाईचे मिळत राहील हे ग्राहकांना सांगावे अशी कल्पना आमच्या मनात होती. आमच्या ताजा जाहिरात मोहिमेत अमिताभ बच्चन याच गोष्टीचे प्रात्यक्षिक देताना दिसतील. आमच्या ग्राहकांना टाटा स्कायकडून मिळणारे अखंड मनोरंजन आणि टीव्ही पाहण्याच्या अद्ययावत अनुभव या गोष्टींना या जाहिरातीमधून अधोरेखित करण्यात आले आहे.”
अथकपणे टीव्हीच्या पडद्यासमोर बिंज वॉचर्स म्हणजे स्वयंघोषित टीकाकार असतात. याच आवेशात बिग बीसुद्धा त्यांच्या आवडणाऱ्या चित्रपटांमधील तारे धारकांवर टीका करताना या जाहिरातींमध्ये दिसणार आहेत. ८१ हून अधिक मूव्ही चॅनल्स आणि एकूण ६००चॅनल्स व सेवा यांच्यासह टाटा स्काय ग्राहकांना त्यांनी निवडलेल्या रकमेच्या पॅकेजमध्ये भरपूर मनोरंजन आणि मौज देऊ करते. यात भर म्हणजे टाटा स्काय मोबाइल अॅपच्या मदतीने कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय दोन नोंदणीकृत उपकरणांवर एकाच वेळी वेगवेगळे कार्यक्रम पाहता येत असल्याने एकाच कुटुंबातील वेगवेगळ्या आवडी निवडी जपणाऱ्या सदस्यांना त्यांच्या आवडीचे कार्यक्रम पाहता येतात आणि मनोरंजनाचा आस्वाद घेता येतो
काकडे व कलमाडींमध्ये राजकीय गुप्तगू!
वाढदिवसानिमित्त खासदार काकडेंकडून कलमाडींना शुभेच्छा!
पुणे : पुण्यातील दोन ‘एस के’ म्हणजेच खासदार संजय काकडे व माजी खासदार सुरेश कलमाडी यांची आज भेट झाली. त्यांच्यात बराचवेळ राजकीय गुप्तगू झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या आजच्या वाढदिवसाचे निमित्त साधून भाजपचे सहयोगी सदस्य व खासदार संजय काकडे यांनी भेट घेतली व त्यांना उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.
खासदार संजय काकडे यांनी नुकतेच आपणही पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केल्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. या घोषणेनंतर खासदार काकडे यांच्या पुणे लोकसभा मतदार संघातील भेटी वेगाने वाढल्याचे दिसून येत आहे. विविध कार्यक्रमातील त्यांची लक्षवेधी उपस्थिती पुणे लोकसभा मतदार संघात ते चांगलेच सक्रिय झाल्याचे निदर्शक मानले जात आहे. पुण्यातील भीम महोत्सव व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीस त्यांनी सुरुवात केली आहे. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. एस के जैन यांची नुकतीच भेट घेतली. त्यानंतर आज जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ व मुस्लिम समाजातील सन्माननीय असलेले डॉ. पी ए इनामदार यांच्या समवेत खासदार काकडे यांनी पुण्याच्या राजकारणात एक तपाहून अधिक काळ ‘सबसे बडा खिलाडी’ राहिलेल्या काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांची भेट घेतली. कलमाडी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून झालेल्या या भेटीदरम्यान तिघांमध्ये बराचवेळ राजकीय चर्चा झाली. कर्नाटक निवडणूक, देश व राज्यातील सद्यस्थिती, पुण्यातील विकासाचे प्रकल्पासह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडींबद्दल भेटीत चर्चा झाल्याचे समजते.
महापालिका निवडणुकीपर्यंत खासदार संजय काकडे यांचे राजकारण तसे फारसे कोणाला परिचित नव्हते. राजकारणात नवखे असल्यामुळे खासदार काकडेंच्या बोलण्याकडे व त्यांच्या कृतीकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र, महापालिकेतील निकालाचा अचूक अंदाज वर्तविलेले खासदार काकडे चर्चेत आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली निवडणुकीतील जबाबदारी अत्यंत चोखपणे बजावून खासदार काकडे यांनी केलेली राजकीय गोळाबेरीज अजूनही अनेकांना बुचकळ्यात टाकते.
खासदार संजय काकडे इच्छुक झाल्याने भाजपमधील स्पर्धेत चांगलीच रंगत आली आहे. राष्ट्रवादीकडून पुण्याच्या लोकसभेवर केलेला दावा आणि त्यामुळे येणारी लोकसभा निवडणूक रंगतदार असेल हे नक्की.
वाचन संस्कृती समाजाला समृद्ध करु शकते –पालकमंत्री
बारामती – सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृतीची जोपासना करणे आवश्यक आहे. वाचनालयात वाचल्या जाणाऱ्या पुस्तकांमुळे समाजात चांगले विचार पोहचू शकतात. त्यामूळे वाचन संसकृती समाजाला समृद्ध करू शकते, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
बांदलवाडी येथील क्रांती ग्रामविकास मंडळातर्फे उभारण्यात आलेल्या क्रांती ग्रामविकास वाचनालय व ग्रंथालय इमारतीचे उद्धघाटन श्री. बापट यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार अमर साबळे, आमदार संजय भेगडे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे, पंचायत समिती सदस्य भारत गावडे, क्रांती ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष दिलीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री बापट म्हणाले, गावात असणारे वाचनालय हे शिक्षणाचे, संशोधनाचे तसेच चांगले विचार रुजवण्याचे केंद्र असते. सध्या पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. तथापि या वाचनालयाच्या माध्यमातून येथील नागरिकांची वाचनाची ओढ नक्कीच वाढेल. सुरुवातीला भाषा निर्माण झाली, त्या भाषेच्या जोरावर लिखाणास सुरुवात झाली आणि तिथेच वाचन संस्कृतीचा जन्म झाला. सामाजिक जबाबदारी व बांधिलकी वाढवायची असेल तर वाचन करणे आवश्यक आहे. खासदार श्री. साबळे यांच्या निधीतून आणि मंडळाचे अध्यक्ष श्री. शिंदे यांच्या प्रयत्नातून निर्माण झालेले हे ग्रंथालय भावी पिढीसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास श्री. बापट यांनी व्यक्त केला.
खासदार अमर साबळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ज्ञानदेव बुरुंगळे यांनी केले.
पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ
बारामती – नगरपालिकेच्यावतीने जुना माळेगाव रस्त्यावरील गणेश मंदिर परिसरात आयोजित स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी खासदार अमर साबळे, आमदार संजय भेगडे, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसीलदार हनुमंत पाटील व बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश कडूस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री.बापट यांनी येथील व्यायामशाळा व कुस्तीच्या तालमीची पाहणी केली. श्री. बापट म्हणाले, युवकांच्या चांगल्या आरोग्यासाठी सर्वसोयींनीयुक्त व्यायामशाळा असणे आवश्यक असते. या व्यायामशाळेला जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक साहित्य पुरविण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी विविध विषयांबाबत चर्चा केली.
या कार्यक्रमा प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, शासकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
विविध विकासकामांचे भूमीपूजन
मौजे माळेगाव बुद्रुक येथे करण्यात येणा-या विविध विकास कामांचे भूमीपूजन अन्न् व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार अमर साबळे, आमदार संजय भेगडे, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसीलदार हनुमंत पाटील, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश कडूस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. माळेगाव बु. येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची पायाभरणी, क-हा-वागज ते शिरवली मार्गाचे भूमीपूजन, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प आठवडे बाजारतळ विकास कामांचे भूमीपूजन, भिमदेवराव गोफणी मार्ग ते कारखाना मार्गाच्या कामाचे भूमीपूजन, समाजमंदिराचे सुशोभीकरण, मुस्लीम दफनभूमीचे सुशोभीकरण, पालखी मार्ग रस्त्याचे डांबरीकरण अशा विविध विकास कामांचे भूमीपूजन पालकमंत्री श्री. बापट यांच्या हस्ते करण्यात आले. ही कामे पालकमंत्री श्री.बापट, खासदार अमर साबळे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या निधीतून तसेच जिल्हा वार्षिक योजना, व जिल्हा परिषदेच्या निधीतून करण्यात येणार आहेत.
आबा बागुल आमदार होणार ? (व्हिडीओ)
पुणे- तब्बल ३० वर्षे एकाच पक्षातून सातत्याने नगरसेवक म्हणून समाधानकारक काम करणारे माजी उपमहापौर आबा बागुल आता येत्या २०१९ मध्ये तरी आमदार होणार काय? पक्ष त्यांना न्याय देणार काय ? अन्य पक्षीय त्यांचेबाबत काय भूमिका घेतील ?जनता आमदारकीसाठी त्यांच्या पाठीशी राहील काय ? अशा सर्व प्रश्नांवर आता खल सुरु होत आहे .
त्यास कारण ही तसे जाहीर घडले आहे. आज दुपारी आबा बागुल यांच्या प्रभागातील थ्री डी तारांगण चे उद्घाटनप्रसंगी आबा यांच्या आमदारकीसाठी व्यासपीठावरून काही वक्तव्ये झडली आहेत . अर्थात हि वक्तव्ये जरी हसत खेळत केली गेली असली तरी राजकारणात या वक्तव्यांना कसे महत्व आहे हे येत्या २०१९ च्या निवडणुकीत दिसणार आहे . या कार्यक्रमास शरद पवार खुद्द येवू शकले नाहीत पण विशेष म्हणजे त्यांनी आपले अर्धा तासाचे भाषण व्हिडीओ रेकोर्ड करून येथे पाठविले. पवार यांनी आपल्या भाषणात आबा बागुल यांच्या कामाचे कौतुक केले आहे .
आबा बागुल यांच्या संकल्पनेतून पुणे महानगरपालिकेतर्फे स्व .विलासराव देशमुख थ्री-डी तारांगणाच्या उदघाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी केंद्रीय कृषिमंत्री, माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची ध्वनीचित्रफीत उदघाटन सोहळ्या प्रसंगी दाखविण्यात आली. यावेळी महापौर मुक्ता टिळक ,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री गिरीश बापट, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, खासदार सुप्रिया सुळे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे ,माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार अमित देशमुख, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अंकुश काकडे, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार,मोहन जोशी तसेच नगरसेवक महेश वाबळे ,राजेंद्र शिळीमकर ,मंजुषा खर्डेकर, पालिका आयुक्त सौरव राव उपस्थित होते.
आबा यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे , आपण माझ्यावर कायम असेच प्रेम राहू द्यावे आणि २०१९ च्या निवडणुकीत मला आमदार करावे ..अशी थेट मागणी केली . पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणातून आबा यांच्या कामाचे कौतुक केले पण आबा यांच्या या मागणीबाबत चाकर शब्द काढला नाही . पण हा धागा पकडून भाजपचे आमदार आणि पालकमंत्री यांनी मात्र आबा बागुल यांच्या कामाचे कौतुक करत ३० वर्षे नगरसेवक आहात ,पुढे ही अजून ३०वर्षे नगरसेवकच रहा असे वक्तव्य केले ..तर आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आपण तुम्ही आमदार व्हावे म्हणून प्रार्थना करू असे सांगितले आणि पालकमंत्री , तसेच राष्ट्रवादीचे उपस्थित नेते यांचे नाव घेत या सर्वांनी चांगल्या कार्यकर्त्याला पुढे नेण्याचे ठरविले तर आबा तुमची मनोकामना पूर्ण होण्यास काही अडथला येणार नाही असे वक्तव्य केले.
आबा बागुलांच्या आमदारकीच्या कामनेविषयी व्यासपीठावर झालेली वक्तव्ये पहा जशीच्या तसी ….
महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण
पंजाबच्या पुत्राला महाराष्ट्राच्या आईने दत्तक घेतले – धर्मेंद्र
मुंबई : पंजाबच्या पुत्राला महाराष्ट्राच्या आईने दत्तक घेतले, या घटनेला ६०वर्षे झाली आहेत. त्यामुळे महाराष्ट्राशी आयुष्यभर कृतज्ञ राहीन, केवळ मलाच नव्हे, तर माझ्यानंतरच्या पिढ्यांनाही या भूमीने आपलेसे केले आहे. केवळ चाहत्यांच्या प्रेमामुळेच आज मी ८२ वर्षांचा चिरतरुण आहे, अशी कृतज्ञतापूर्वक भावना ज्येष्ठे अभिनेते धर्मेंद्र यांनी व्यक्त केली.
राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना सोमवारी नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडियाच्या स्टेडियममध्ये प्रदान करण्यात आला. त्या वेळी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये, मानपत्र व सन्मानचिन्ह असे होते. या पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सुप्रसिद्ध अभिनेते जितेंद्र, गतवर्षीचे पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ आणि सांस्कृतिक खात्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी, राजकपूर विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना तर ‘चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण आणि ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान’ पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना घोषित करण्यात आला आहे. ‘जीवनगौरव’ पुरस्कार पाच लाख रुपयांचा, तर ‘विशेष योगदान’ पुरस्कारांचे स्वरूप तीन लाख रुपये असे आहे. या सोहळ्यात ९८वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या लोगोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण केले.
पडद्यामागेही ‘ती’ यशस्वीच – मृणाल कुलकर्णी
पडद्यासमोर जितके महिला कलाकारांचे योगदान आहे, तितकेच पडद्यामागे काम करणाऱ्या महिलांचेही आहे, हे या पुरस्काराने अधोरेखित केले. पडद्यामागची ‘ती’ही यशस्वीच आहे, यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यामुळे चित्रपट क्षेत्रात पडद्यामागे काम करणाºया महिलांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारते.
प्रवास बाकी – विजय चव्हाण
पुरस्कार मिळाल्याचा फोन आला, तेव्हा विश्वास बसत नव्हता. अभिनयाची नव्हे, तर केवळ नकला करायची आवड होती. बाबांच्या बळजबरीमुळे ‘संभाजी’ची भूमिका केली होती, त्या पहिल्याच अभिनयाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला. तेव्हापासून आजतागायत काम सुरू आहे, प्रवास संपला नाही बाकी आहे. पुढच्या वेळी तावडे मुख्यमंत्री होतील आणि मुख्यमंत्री राष्ट्रपती होतील, त्या वेळेसही पुरस्कार स्वीकारण्यास येणार, अशी मिश्कील भावना व्यक्त केली.
एवढ्यात निवृत्ती नकोय – राजकुमार हिराणी
पुरस्कार म्हटलं की, निवृत्तीची वेळ जवळ आली असे वाटते. मात्र, एवढ्यात निवृत्ती नकोय, खूप पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे योगदानासाठी मिळालेला पुरस्कार महत्त्वाचा आहे.
‘वीरूगिरी’ भलतीच फेमस – मुख्यमंत्री
धर्मेंद्र यांनी ‘शोले’मध्ये केलेली टाकीवर चढून केलेली ‘वीरूगिरी’ भलतीच फेमस झाल्याचा हास्यापद किस्सा मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितला. ते म्हणाले, हल्ली कुणीही येत आणि टाकीवर चढून आंदोलन करत. त्या वेळेस आम्हाला ते मान्य करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे ही ‘वीरूगिरी’ कायमचीच चाहत्यांच्या पसंतीची आहे.
हरवलेले पंधरा तोळयांचे दागिने परत मिळाले
पुणे : नारायण पेठ भागातून रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेचे पंधरा तोळ्यांचे दागिने, मोबाइल संच असलेली पिशवी रिक्षात विसरली. पिशवी विसरल्याचे लक्षात आल्यानंतर घाबरलेल्या महिलेला क्षणभर काय करावे, हे सुचले नाही. अखेर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. देवावर हवाला ठेवला. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. नारायण पेठ भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेल्या चित्रीकरणाद्वारे रिक्षाचालकाचा शोध सुरू करण्यात आला. पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. तेवढय़ात रिक्षाचालक प्रवासी महिलेची पिशवी घेऊन नारायण पेठेत आला आणि रिक्षात विसरलेली पिशवी त्याने महिलेला परत केली. पोलीस आणि रिक्षाचालकाच्या प्रयत्नांमुळे महिलेला हरवलेला ऐवज परत मिळाल्याने तिने त्यांचे मनोमन आभार मानले.
आरती अरुण कदम (वय ४८, रा. हंसनगर, ठाणे) या नातेवाइकांकडे असलेल्या मंगलकार्यासाठी रविवारी (२९ एप्रिल) पुण्यात आल्या होत्या. सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर येथून त्या सकाळी रिक्षाने नारायण पेठेत आल्या. सकाळी साडेअकराच्या सुमारास केसरी वाडय़ानजीक त्या रिक्षातून उतरल्या. गडबडीत त्या रिक्षात ठेवलेली पिशवी घ्यायच्या विसरल्या. दरम्यान, रिक्षाचालक तेथून निघून गेला होता. पिशवी विसरल्याचे लक्षात आल्यानंतर कदम घाबरल्या. क्षणभर काय करावे हे सुचले नाही. नेमक्या त्या वेळी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सुधीर भिलारे, प्रकाश ओव्हाळ तेथून गस्त घालण्यासाठी निघाले होते.
नारायण पेठ पोलीस चौकीसमोर थांबलेल्या कदम यांच्याकडे त्यांनी विचारपूस केली. तेव्हा रिक्षात विसरलेल्या पिशवीत पंधरा तोळयांचे दागिने, दोन मोबाइल संच आणि मनगटी घडय़ाळे असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
पोलीस शिपाई भिलारे आणि ओव्हाळ यांनी कदम यांना रिक्षाचा क्रमांक विचारला. तेव्हा कदम यांनी रिक्षाचा क्रमांक माहीत नसल्याचे सांगितले. त्यानंतर भिलारे आणि ओव्हाळ विश्रामबाग पोलीस ठाण्यात आले. त्यांनी तेथील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून केळकर रस्ता भागातील सीसीटीव्ही चित्रीकरण पडताळण्यास सुरुवात केली. कदम यांना केळकर रस्त्यावर सोडणाऱ्या रिक्षाचा क्रमांक चित्रीकरणात आढळला. त्यानंतर रिक्षाक्रमांकावरून त्यांनी रिक्षाचालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. रिक्षाचालकाचे नाव सागर प्रकाश बिबवे (वय ३६, रा.वडगाव बुद्रुक , सिंहगड रस्ता) असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी कदम यांना रिक्षात विसरलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याची सूचना दिली. कदम याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तातडीने प्रयत्न सुरू केले. दरम्यान रिक्षाचालक बिबवे याला प्रवासी महिलेची पिशवी रिक्षात विसरल्याचे निदर्शनास आले. बिबवे पुन्हा नारायण पेठेत आले. त्या वेळी तेथे कदम थांबल्याचे त्यांनी पाहिले. कदम यांना बिबवे भेटले. त्यांना रिक्षात विसरलेली पिशवी परत केली.
पिशवीत असलेल्या ऐवजाची पाहणी केल्यानंतर कदम यांनी त्यांचे आभार मानले. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे, उपनिरीक्षक जे. के. जगताप, भिलारे, ओव्हाळ यांची भेट घेऊन त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक कदम यांनी केले. पोलीस आणि रिक्षाचालकाच्या प्रयत्नांमुळे पिशवी परत मिळाली, असे कदम यांनी सांगितले.






