शरद पवारांकडून व्हिडीओ काँन्फरन्सद्वारे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या कार्याचा गौरव
पुणे –ऐतिहासिक , सांस्कृतिक पुणे शहराला स्व. विलासराव देशमुख तारांगणामुळे आता नवी ओळख लाभली आहे. देशात पहिल्या ठरलेल्या या अत्याधुनिक तंत्रज्ञानावरील हे थ्रीडी तारांगण अभ्यासकांना, नागरिकांना पर्वणी आहे . अशा शब्दात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आपल्या भावना व्हिडीओ काँन्फरन्सद्वारे व्यक्त करताना नागरिकांच्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेबरोबरच नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या कार्याचाही गौरव केला.
माजी उपमहापौर व नगरसेवक आबा बागुल यांच्या संकल्पनेतून पुणे महानगरपालिकेतर्फे राजीव गांधी ई – लर्निंग स्कुल येथे उभारण्यात आलेल्या स्व. विलासराव देशमुख थ्रीडी तारांगणाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र दिनी राज्याच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, लोकसभेचे माजी सभापती व ,माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, स्व. विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आमदार अमित देशमुख,माजी मंत्री दिलीप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक , खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर , हर्षवर्धन पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम ,आमदार मेधा कुलकर्णी, उल्हास पवार , मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर , विरोधी पक्षनेते चेतन तुपे,माजी महापौर दत्ता धनकवडे, दीप्ती चवधरी ,राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी महापौर कमल व्यवहारे ,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी , गोपाळ तिवारी , वीरेंद्र किराड ,महेश वाबळे , नगरसेविका नंदा लोणकर , मंजुश्री खर्डेकर ,सुजाता शेट्टी, आयुक्त सौरभ राव, पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल आणि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उदघाटनास इच्छा असूनही वैद्यकीय कारणामुळे उपस्थित राहू न शकलेले माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्हिडीओ काँन्फरन्सद्वारे शुभेच्छा संदेश देताना स्व. विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला. एका खेड्यातून जन्म घेऊन राष्ट्रीय पातळीवर काम केलेल्या विलासराव देशमुख यांच्या नावाने या तारांगणाचे उदघाटन होत आहे ही आनंदाची बाब आहे केंद्रीय मंत्रीमंडळात मी विलासराव यांच्याबरोबर होतो. विज्ञानाचा प्रसार वाढविण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्यावर सोपवली होती. त्यांनी ज्याप्रकारे केंद्र आणि राज्यात काम केले ते आदर्शवत होते. परंतु आपल्या सगळ्यातून ते लवकर निघून गेले, त्यांचे निधन आम्हा सर्वांना चटका लावणारे होते अशा शब्दात त्यांनी विलासरावांबद्दल आठवणी जागविल्या. माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या कार्याचा गौरव करताना शरद पवार म्हणाले , गेली तीस वर्षे सातत्याने निवडून जाण्याचा विक्रम आबा बागुल यांनी केला आहे.
एकवेळ लोकसभेवर निवडून येणे सोपे ;पण वॉर्डातून महानगरपालिकेची निवडणूक लढणे ही काही सोपी गोष्ट नसते. एकदा नव्हे , एक वर्षे नाही तीस वर्षांसाठी लोकांनी निवडून देणे ही एक आगळी – वेगळी कृती आहे. आबा बागुल यात यशस्वी ठरले. सातत्याने लोकांच्या भल्यासाठी काम करण्याची भूमिका प्रत्यक्ष कृतीत आणल्याने आणि मतदारसंघात वैशिष्ठयेपूर्ण विकासकामे करण्याची संकल्पना राबविल्याने नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे ही गोष्ट मान्य करावीच लागेल. त्यांनी अनेक विकासकामांना चालना दिली. त्यांचे कामाचे स्वरूप पाहता अन्य लोकप्रतिनिधींच्या तुलनेत वेगळेपण असल्याचे मला नेहमीच जाणवते. दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, भूगर्भात कमी होणारा पाणीसाठा पाहता शाश्वत उपायासाठी आबा बागुल यांनी राबविलेला ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प सर्वत्र झाल्यास पाण्याची बचत होणार आहे. शिवाय पाण्यावरून निर्माण होणारा दबावही नाहीसा होईल. पुण्यालगत असणाऱ्या टेकड्यांवरील जैववैविध्य यांचे जतन -संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यासाठी तळजाई टेकडीवर वसुंधरा जैववैविध्य उद्यान प्रकल्प राबविण्यात आबा बागुल यांचा पुढाकार आहे . ही एक दृष्टी आहे,निसर्गाच्या संवर्धनासाठी, पर्यावरण समतोलासाठी नव्या पिढीत महत्व ठसविण्याचा संदर्भात आबा बागुल यांनी घेतलेला पुढाकार पाहता त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. अनेक प्रकल्प असे आहेत ,जे पुणेकरांबरोबरच देशातील लोकांनाही उपयुक्त ठरणार आहेत . आज तारांगणाची उभारणी खगोल -विज्ञानासंदर्भात अभ्यासासाठी पर्वणीच ठरणार आहे.असेही शरद पवार म्हणाले.
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, स्व. विलासराव देशमुख तारांगणामुळे विज्ञान – तंत्रज्ञानबाबत माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले आहे. पुण्यात प्रेक्षणीय स्थळे खूप आहेत, आता त्यात या तारांगणाची भर पडली आहे. ज्या पुण्याने विलासरावाना घडविले,त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला. त्या पुण्यात तारांगणाच्या निर्मितीमुळे त्यांच्या स्मृतीला सदैव उजाळा मिळणार आहे. नगरसेवक आबा बागुल यांचे कोणतेही कार्य , विकासकामे ,उपक्रम हे नावीन्यपूर्ण असतात आणि ते पूर्णही करून दाखवतात हे या तारांगणाच्या उभारणीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. नावीन्यपूर्ण उपक्रमात आबा बागुल यांचा कुणीही हात धरणार नाही अशी त्यांची कार्ये आहेत. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी अशी तारांगणे व्यापक स्तरावर उभारणे ही काळाची गरज आहे.
लोकसभेचे माजी सभापती व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी म्हणाले, विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांमधील खगोलशास्त्राच्या कुतूहलात वाढ व्हावी आणि त्यांना विश्वाच्या व्यापक पसाऱ्यातील काही उदबोधक तथ्यांची माहिती व्हावी या उद्देशाने उभारण्यात आलेले तारांगण आणि त्याला विज्ञान – तंत्रज्ञान याबाबत सदैव सजग असलेल्या स्व. विलासराव देशमुख यांचे नाव याचा मनस्वी आनंद होत आहे. एका मुख्यमंत्र्यांची स्मृती या उपक्रमाद्वारे जपली जात आहे आणि ती संकल्पना पूर्णत्वास नेणाऱ्या आबा बागुल यांचे अभिनंदन केले पाहिजे. स्व . विलासराव हे माझे चांगले मित्र होते. ज्यावेळी हे तारांगण पाहिले त्याचक्षणी असे वाटले कि शिक्षण पद्धतीत आता बदल करण्याची गरज आहे. अभ्यासक्रमात तारांगण हा स्वतंत्र विषय अनिवार्य केला पाहिजे.
मनोगतात आमदार होण्याविषयी आबा बागुल यांनी व्यक्त केलेल्या इच्छेवर स्व. विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आमदार अमित देशमुख म्हणाले,चांगले कार्य करणाऱ्या आबा यांच्या पाठीशी व्यासपीठावरील सर्वपक्षीयांनी उभे राहिले पाहिजे.विधिमंडळाचा मार्ग आपल्या सर्वांनाच त्यांना दाखवायचा आहे. आपण सर्वांनी ठरवले तर आबा बागुल यांची आमदार होण्याची इच्छा अपूर्ण राहणार नाही. एका चांगल्या कार्यकर्त्याला पाठबळ दिले पाहिजे . तीन दशके नेतृत्व करणारे आणि तेही एका पक्षातुन सहा टर्म लोकप्रतिनिधित्व करणे हा एक विक्रम आहे आणि यापेक्षा आणखी काय एका कार्यकर्त्याने सिद्ध करावे.आबा बागुल आम्ही तुमची शिफारस करू. २०१९ मध्ये तुम्हाला काँग्रेसची उमेदवारी मिळो अशी प्रार्थना करतो. ज्या पुण्यात स्व. विलासराव देशमुख यांचे शिक्षण झाले, त्याच शहरात त्यांच्या नावाने तारांगण उभारले गेले. याचा मला अभिमान असून पुढील पिढीला यातून खूप काही शिकता येणार आहे. बाबांचे पुणे हे सर्वात आवडत शहर होते. ते जर गावी नसते आले, तर त्यांची पुण्यातून राजकीय प्रवासाला सुरुवात झाली असती, असेही त्यांनी नमूद केले.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, या तारांगणाने पुण्याच्या प्रतिष्ठेत भर घातली आहे.सातत्य आणि नावीन्यपूर्ण कामांमुळे आबा बागुल तीस वर्षे लोकप्रतिनिधी आहेत. चांगल्या कामात सदैव ते पुढे असतात. विधीमंडळ असो किंवा लोकसभा, आबा बागुल तिकडे गेले तर आमचा प्रॉब्लेम होईल त्यामुळे आबा बागुल यांनी आमदार होऊ नये असेही ते मिश्कीलपणे म्हणाले.
मनोगत व्यक्त करताना माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले, दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख हे एक कणखर नेतृत्व होते. आज त्यांच्या नेतृत्वाला काँग्रेस पोरकी झाली आहे. विज्ञान – तंत्रज्ञानाबाबत सजग असलेल्या स्व. विलासराव देशमुख यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या नावाने पुणे महानगरपालिकेने या तारांगणाची उभारणी केली आहे.त्यासाठी सर्वपक्षीयांनी सहकार्य केले याबद्द्ल त्यांनी आभार मानले.
प्रास्ताविकात महापौर मुक्ता टिळक यांनी हे तारांगण देशात आदर्शवत ठरले आहे. आबा बागुल यांची दूरदृष्टी आणि सदैव नावीन्यपूर्ण उपक्रम यामुळे ते लोकप्रिय आहेत . गोपाळ चिंतल यांनी आभार मानले.