Home Blog Page 3141

भाजयुमोचा अरविंद शिंदें विरोधात आंदोलनाचा इशारा

 पुणे-महापालिकेच्या मुख्य सभेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या, सभागृहनेते आणि कॉंग्रेसचे गटनेते यांनी एकमेकांविरोधात बदनामीच्या तक्रारी केल्या . पोलीस आणि न्यायालय इथपर्यंत त्या पोहोचल्या असे असताना आता नवे तरुण नगरसेवक दीपक पोटे आणि सुशील मेंगडे यांनी अरविंद शिंदेंवर आरोप करत त्यंच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे .

 भा.ज.यु.मो,पुणे शहर अध्यक्ष असलेले नगरसेवक दिपक पोटे  , युवा मोर्चा सरचिटणीस असलेले आणि महापालिकेतील  शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष असलेले नगरसेवक सुशील मेंगडे तसेच संपर्कप्रमुख प्रतीक देसरडा यांच्या नेतृत्वाखाली  भा.ज.यु.मोर्चाच्या शिष्टमंडळाने महापौर सौ.मुक्ता टिळक यांना  या संदर्भात निवेदन दिले आहे .काँग्रेस चे पुणे महानगरपालिकेतील गटनेते अरविंद तुकाराम शिंदे गेले अनेक वर्ष नगरसेवक असून काँग्रेस – राष्ट्रवादी ची सत्ता गेल्या नंतर भारतीय जनता पार्टी सत्तेवर आल्यावर सर्वसाधारण सभेच्या वेळी सभागृहात सातत्याने अडथळे निर्माण करत आहेत . सातत्याने बेताल वक्तव्य करत सभागृहातील वातावरण गढूळ करत आहेत व सभागृहातील कामकाज बंद पाडत आहे . भारतीय जनता पार्टी च्या वरीष्ठ नेत्यांची , पदाधिकाऱ्यांची , पुणे महानगरपालिकेतील सभागृह नेते यांची  बदनामी करण्याचा सपाटा  त्यांनी लावला .श्री.शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेचे सभागृहातील सभांमध्ये असाच अडथळा सुरू ठेवला तर त्यांच्या विरुद्ध भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे आंदोलन करण्यात येईल .असे या निवेदनात म्हटले आहे .
यावेळी भा.ज.यु.मो,पुणे शहराचे पदाधिकारी राजू परदेशी , सुनील मिश्रा, कुणाल चौगुले, किरण ओरसे , बाबू खैर , शाम काची , शशांक सुर्वे , यश सुरती आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

माता रमाईचे जीवन प्रत्येक भारतीय महिलेसाठी प्रेरणादायी – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

पुणे-माता रमाई आंबेडकर या डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाच्या इमारतीचा पाया होत्या. बाबासाहेबांच्या कार्यात अडथळा होऊ नये यासाठी रमाईंनी त्यांना आयुष्याच्या अखेरपर्यंत साथ दिली. डॉ.आंबेडकर यांच्या आयुष्यात त्यांचे योगदान खूप मोठे आहे. माता रमाई यांचे जीवन प्रत्येक भारतीय महिलेसाठी प्रेरणादायी असल्याचे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले.

पुण्यात आज (बुधवार) माता रमाई आंबेंडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.विद्यासागर राव, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आदी उपस्थित होते.

राष्ट्रपती कोविंद पुढे म्हणाले, “रमाई यांच्या व्यक्तिमत्वाची उंची खूप मोठी आहे. ज्यावेळी कठीण परिस्थितीत बाबासाहेबांना कोणी साथ देत नव्हते, त्यावेळी रमाई यांनी त्यांची साथ सोडली नाही. त्यांनी बाबासाहेबांसोबत राहून त्यांच्या कार्यात त्यांना प्रोत्साहित केले. बाबासाहेबांच्या महान व्यक्तिमत्वाचा आदर संपूर्ण जगात केला जातो. त्यांना विश्वव्याख्यात करण्यात रमाईंचे मोठे योगदान आहे. महिलांना समान हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी कायमच प्रयत्न केले आहेत. याचेच प्रतिबिंब बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानात उमटले आहे”

त्रास न थांबल्यास असहकार आंदोलनाचा व्यापाऱ्यांचा इशारा

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, काटा वैध मापन, अन्नधान्य व औषध परवाना अधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना त्रास

पुणे : प्लास्टिक बंदी, काटा वैधमापन शुल्क आकारणी, अन्नधान्य व औषध परवाना इत्यादी अनेक बाबतीत व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता राज्य सरकार कायद्याची अंमलबजावणी करीत आहे. व्यापाऱ्यांना गृहित धरुन माहिती न देता कायद्याची अंमलबजावणी करताना संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे. हे असेच सुरु राहिले तर, व्यापारी त्याविरोधात असहकार आंदोलन करतील, असा इशारा पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने आज पत्रकार परिषदेत दिला.

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, पुणे व्यापारी महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, रिटेल व्यापारी संघाचे उपाध्यक्ष सोमाराम राठोड, अशोक साळेकर, समग्र नदी परिवाराचे ललीत राठी, सुनील गेहलोत, रवींद्र सारूक, सोहम कुमावत, सारंग राडकर, विजय नरेला, मोटाराम चौधरी, विनोद चौधरी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यापूर्वी व्यापाऱ्यांना माहिती देऊन त्याबाबत जनजागृती करायला हवी होती. त्याऊलट अधिकाऱ्यांनी थेट दंड वसुली करण्यास सुरुवात केली. याविषयी अधिकाऱ्यांना विचारले तर, आम्हाला टारगेट दिल्याचे  ते सांगतात. काटा वैध मापन विभागाकडूनही 20 एप्रिल पासून शासकीय शुल्क दुप्पट करण्यात आले आहे. काटे, वजन व पट्टी यांचे एक वर्षाकरिता नुतनीकरण करण्यासाठी शासकीय परवानाधारकचे प्रमाणपत्र लागते. त्यासाठीच्या स्टँपिंगसाठी अधिकारी त्यांच्या मर्जीनुसार शुल्क आकारत की, जे नियमापेक्षा अधिक असते.

अधिकाऱ्यांच्या संगनमताने शिबिर घेतले जाते व त्यामध्ये बोलावून व्यापाऱ्यांना कारवाई करण्यासंदर्भात धमक्या दिल्या जातात. शिबिरासाठी 1200 ते 2500 रुपये शुल्क आकारले जाते व पावती 400 रुपयांचीच दिली जाते. अनेकदा काटा दुरुस्त करणारी व्यक्ती आपण अधिकारी असल्याचे भासवतात व व्यापाऱ्यांकडून पैसे काढतात.

अन्नधान्य व औषध परवाना काढताना व्यापाऱ्यांना सहा महिने ते दोन वर्षे हेलपाटे मारावे लागत आहेत. उलटसुलट उत्तरे देऊन व्यापाऱ्यांच्या शंकांना टाळले जाते. ऑनलाइन काढून घ्या, पोस्टाने पाठविले आहे, वाट पहा अशी उत्तरे दिली जातात.

कायद्याची माहिती विचारली की, भलीमोठी पुस्तिका समोर टाकली जाते. वास्तविक कायद्याची सोप्या भाषेतील पुस्तिका शासनाकडून वितरीत होणे आवश्यक आहे. व्यापाऱ्यांमध्ये कायद्याबाबत जनजागृती करण्याऐवजी त्यांना त्रास होईल अशी व्यवस्था राबविली जात आहे. कायद्याचा आदर केला जाईल असे न वागता त्याची भिती वाटेल असे वातावरण निर्माण केले जात आहे.

व्यापारी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत कष्ट करतो. सर्व प्रकारचे कर भरतो तरीही त्याला ही वागणूक दिली जाते. कायद्याप्रमाणे वागण्यास व्यापारी नेहमी तयार आहे व असेल. परंतु, विनाकारण कायद्याची भिती दाखवून व्यापाऱ्यांची होणारी लूट आता थांबली पाहिजे. व्यापाऱ्यांची एकी आहे. यापुढे व्यापाऱ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही. अन्यायाविरोधात व्यापारी आता असहकार आंदोलन करेल, अशा शब्दांत सचिन निवंगुणे व सूर्यकांत पाठक यांनी व्यापाऱ्यांची भूमिका मांडली.

वालचंद कॉलेजतर्फे 8वा ग्रॅज्युएशन समारंभ साजरा

0

सांगली,: वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (WCE) चा आठवा ग्रॅज्युएशन समारंभ आज साजरा करण्यात आला. समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे उपस्थित होते. WCE च्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी ग्रॅज्युएशन समारंभात यशस्वी इंजिनीअरिंग ग्रॅज्युएटना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 2017-18 मध्ये B.Tech पूर्ण करणाऱ्या 431 विद्यार्थ्यांना व 2016-17 मध्ये M.Tech पूर्ण करणाऱ्या 233 विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन समारंभात गौरवण्यात आले.

WCE ने प्लेसमेंटच्या बाबतीत यंदाही उत्कृष्ट काम केले आणि अंदाजे 74% अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना व 30% पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. 416 पैकी 302 अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना एकूण 458 नोकऱ्यांच्या ऑफर देण्यात आल्या.

या वर्षीच्या प्लेसमेंटचे वैशिष्ट्य म्हणजे, मायक्रोसॉफ्टने  WCE मधील कॉम्प्युटर सायन्स शाखेतील दोन विद्यार्थ्यांना प्रत्येकी 37 लाख रुपये पगार देण्याचे ठरवले आहे. या वर्षी, अंदाजे 54 विद्यार्थ्यांना 29 लाख रुपये ते 7 लाख रुपये या दरम्यान पगाराचे पॅकेज मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या 4 लाख रुपयांच्या तुलनेत यंदा सरासरी पगार 5 लाख रुपये आहेत. तसेच, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात काम करण्यास तयार करण्यासाठी अंदाजे 100 विद्यार्थ्यांना लोकप्रिय कंपन्यांमध्ये इन्टर्नशिप देण्यात आली व त्यांना दरमहा 35,000 रुपये स्टायपेंड मिळत आहे.

भारतातील 22 कॉलोजांमध्ये AICTE ने नॅशनल डॉक्टरल फेलोशिप साठी  WCE  चा समावेश  केला आहे व या साठी स्टायपेंड म्हणून दरमहा 28000 रुपये व  HRA देण्यात येणार आहे.

वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे संचालक डॉ. जी. व्ही. परिश्वद यांनी सांगितले, “संशोधन व नेतृत्व यासाठी योग्य दृष्टी असलेले सक्षम ग्रॅज्युएट इंजिनीअर घडवण्याच्या आमच्या अनुषंगाने, आमचे विद्यार्थी सर्व क्षेत्रांत उत्कृष्ट ठरत आहेत. 2018 मध्ये, अंदाजे 113 WCE विद्यार्थी GATE साठी पात्र ठरले, तर 5 विद्यार्थ्यांनी आघाडीच्या 500 क्रमांकांमध्ये स्थान मिळवले. आमच्या पाच विद्यार्थ्यांनी CAT मध्ये 96.5 व 99.34 या दरम्यान टक्के मिळवले. तसेच, 2014 व 2015 वर्षातील बॅचमधील 5 माजी विद्यार्थी चांगल्या क्रमवारीने UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले.”

मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या भारत सरकारच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क (NIRF)) मध्ये 2018 मध्ये 101-150 च्या रँक बँडमध्ये WCE चा समावेश करण्यात आला. या वर्षी, मुंबईतील 9 संस्था, पुण्यातील 10 व नागपूरमधील 5 संस्थांनी आघाडीच्या 200 इंजिनीअरिंग संस्थांमध्ये स्थान मिळवले. उर्वरित महाराष्ट्रातून या यादीमध्ये स्थान मिळवणारी WCE ही एकमेव संस्था आहे.

वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगविषयी

वालचंद कॉलेज ऑफ इंजिनियरिंगची 1947 साली स्थापना झाली आणि भारतातील सर्वात जुनी अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक आहे. विशेषतः 2007 पासून आपल्या दूरदर्शी अध्यक्ष, श्री अजीत गुलाबचंद आणि प्रशासकीय मंडळाच्या इतर प्रतिष्ठित सदस्यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाखाली स्वायत्त संस्थेची स्थापना झाल्यानंतर महाविद्यालय नव्या रुपाने कार्यंरथ झाले. मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या भारत सरकारच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) मध्ये 2018 मध्ये 101-150 च्या रँक बँडमध्ये WCE विशेष TEQIP च्या तिसया टप्प्यात वालचंद कॉलेजची निवड करण्यात आली आहे. त्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जबलपूरचे मार्गदर्शन करणार आहे.

राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलने सलग सहाव्या वर्षी राखली शंभर टक्के निकालाची परंपरा !

पुणे

 गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकांसह मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या ठरलेल्या देशातील पहिल्या  राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलने सलग सहाव्यांदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्ड   इयत्ता  दहावी आणि राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या निकालात यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी अभिनंदन केले आहे. 

सीबीएसई बोर्ड   इयत्ता  दहावीसाठी   यंदा २० मुली आणि १९ मुले असे एकूण ३९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ती सर्व उत्तीर्ण झाली. साक्षी कमलापुरे हिने ८५.४ टक्के तर ओंकार गोरवडे ८३. ८ तसेच शुभम शिंदे याने ८३. ८ टक्के गुण प्राप्त केले आहे. तर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या  बारावी परीक्षेला  २७१ विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी  चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

​एकूण ९८ टक्के निकाल लागला आहे,त्यात ​

​​१२४ विद्यार्थी विशेष गुणवत्ता तर ९८विद्यार्थी  प्रथम श्रेणीत ,३७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.  अनिरुद्ध अत्रे [ ९४. १५ टक्के ] अर्णव संभारे [ ९२.७७ टक्के ] अदिती जोशी [ ९२. ६२ टक्के ] मारिया जोजी [ ९२. ४६ टक्के ] समृद्धी मालेगावकर [ ९२ .४६ टक्के ] साक्षी पाटील [ ९२ . ३१ टक्के ] दिव्या अलोणे [९२.१५ टक्के ] अथर्व कुलकर्णी [ ९२ टक्के ] मृगशी कुलकर्णी [ ९२ टक्के ] प्रतीक्षा काकडे [ ९१. ३८ टक्के ] या विद्यार्थ्यांनी विशेष यश प्राप्त केले आहे. 

याबाबत माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलमध्ये आर्थिक दुर्बल घटकासह मध्यमवर्गीयांची मुले शिक्षण घेतात. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी या शाळेने नावलौकिक प्राप्त केला आहे.   सीबीएसई बोर्ड   इयत्ता  दहावीपर्यंत आणि  राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. शाळेची स्थापना माझ्या पुढाकारातून झाली. स्थापनेपासून  सलग शंभर टक्के निकालाची परंपरा राखण्यात यश मिळाले आहे.केवळ दहावी -बारावीमध्येच नाही तर आयआयटीमध्येही या शाळेतील विद्यार्थी टॉपर ठरले आहेत.  विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळेल यासाठी   शिक्षकवर्ग , सर्व लोकप्रतिनिधी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याने हे यश मिळाले आहे असेही  आबा बागुल यांनी नमूद केले .  

बारावीच्या परीक्षेत अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल अँड आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 95.42 टक्के

पुणे : 
 
पुणे-महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल अँड आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स्, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स’ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल 95.42 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेची हर्षदा महेश पाटील हीने 92.76 टक्के मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला.
 
वाणिज्य शाखेत मुस्कान सलीम खान हीने 86.76 % तर कला शाखेत सिमरन पीटर दास हीने 87.84 % मिळवून प्रथम क्रमांक मिळविला, अशी माहिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य गफार एल. सय्यद यांनी दिली.
 
महाविद्यालयाचा विज्ञान शाखा निकाल 98.24 %, वाणिज्य शाखा निकाल 91.60 %, कला शाखा निकाल 98.68% तर एच एस सी व्होकेशनलचा निकाल 100 % लागला आहे.
 
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, सचिव लतीफ मगदूम, महाविद्यालयाच्या प्राचार्या आएशा शेख यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

पुणे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

पुणे – पुणे शहराचा शैक्षणिक वारसा हा येथील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. पुणे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हणून अखंड भारत देशात प्रसिद्ध आहे. पुणे शहराच्या नावलौकीकात भर पाडण्यासाठी साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल उत्कृष्ट योगदान देईल, असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला.

येथील साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलचे उद्धघाटन राष्ट्रपती श्री. कोविंद यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, माजी उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, दादा जे. पी. वासवानी, रत्ना वासवानी आदी उपस्थित होते.

राष्ट्रपती श्री. कोविंद म्हणाले, आधुनिक भारताच्या जडण-घडणीमध्ये शिक्षणाचा मोठा वाटा आहे. या शिक्षण संस्थेस मोठा इतिहास आहे. विद्यार्थ्यांमध्ये फक्त पाठ्यपुस्तकी शिक्षणाऐवजी चांगले संस्कार रूजविणे गरजेचे आहे. आधुनिक भारताच्या शिक्षण व्यवस्थेचा पाया महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी याच पुणे शहरात घातला. शिक्षकांनी दिलेले ज्ञानच विद्यार्थ्याची खरी ओळख असते. साधू वासवानी शाळेतून देश सेवेसाठी चांगले नागरीक घडावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

माजी उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी शुभेच्छापर भाषणात येथे येऊन आनंद झाल्याचे सांगितले.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री श्री. जावडेकर म्हणाले, गुणांची टक्केवारी या मध्ये निर्माण झालेली स्पर्धा घातक आहे. विद्यार्थी आज मैदानात खेळायला जात नाहीत. अभ्यासक्रमाच्या ओझ्याखाली विद्यार्थी राहू नयेत म्हणून लवकरच नवीन शिक्षण पद्धती आणण्यात येईल. जीवनाचे शिक्षण देणारे मंदिर म्हणजेच शाळा असते, असे ते म्हणाले.

दादा जे. पी. वासवानी यांनी आपल्या भाषणात शाळा स्थापनेचा उद्देश सांगितला. नवीन शिक्षण पद्धतीमुळे मानवतेचा विकास होण्यास मदत होत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक साधू वासवानी मिशनच्या गुलशन गिडवानी यांनी केले. आभार शाळेच्या प्राचार्या श्रीमती आरती पाटील यांनी मानले.

वर्षभरामध्ये पुणे, पिंपरी शहरातील खोदकामात 318 ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या तोडल्या महावितरणचे आर्थिक नुकसान; वीजग्राहकांचाही गैरसोय

पुणे गेल्या वर्षभरामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध कामांसाठी जेसीबी किंवा इतर यंत्राद्वारे झालेल्या अधीकृत किंवा अनधिकृत खोदकामात तब्बल 318 ठिकाणी महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आलेल्या आहेत. यामुळे महावितरणला लाखो रुपयांच्या आर्थिक नुकसानीसह वीजग्राहकांनाही खंडित वीजपुरवठ्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला आहे.

दरम्यान सोमवारी (दि. 28) पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा करणार्‍या दोन भूमिगत वीजवाहिन्या महानगरपालिकेच्या पाईपलाईनसाठी सुरु असलेल्या जेसीबीच्या खोदकामात तोडल्यामुळे या केंद्गाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मध्यरात्री या दोन्ही वीजवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आली असून जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

गेल्या वर्षभरात पुणे शहरात विविध कामांसाठी पुणे महानगरपालिका, एमएनजीएल व इतर कंपन्यांच्या कंत्राटदारांनी जेसीबी व इतर यंत्राद्वारे केलेल्या खोदकामात 282 ठिकाणी महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडल्या गेल्या. यामध्ये सर्वाधिक पद्मावती विभागामध्ये सर्वाधिक 157 ठिकाणी असे प्रकार घडले. या विभागअंतर्गत पद्मावती, धनकवडी, मार्केटयार्ड, बिबवेवाडी, कात्रज, आंबेगाव, गुलटेकडी, भवानीपेठ, गंजपेठ, सहकारनगर, बालाजीनगर आदी परिसर येतो. पुणे शहरात आतापर्यंत 6 ठिकाणी संबंधीत कंत्राटदारांविरुद्ध पोलीसांनी गुन्हे नोंदविले आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या वर्षभरात 36 ठिकाणी खोदकामामध्ये भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आल्या. यातील 15 ठिकाणच्या कंत्राटदारांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वीजवाहिन्या तोडल्यानंतर महावितरणकडून करण्यात आलेल्या तक्रारी या अनेक पोलीस ठाण्यात अदखलपात्र म्हणून नोंदविण्यात येत असल्यामुळे पुढील कारवाई सुद्धा पोलिसांकडून होत नाही.

पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने एप्रिल व मे महिन्यात खोदकामांना वेग येतो. याच दिवसांत विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली असते व वाहिनी तोडल्यानंतर वीजपुरवठा खंडित झाल्यास भारव्यवस्थापन शक्य होत नसल्याने पर्यायी व्यवस्था असूनही वीजपुरवठा सुरु करता येत नाही. तसेच वेळप्रसंगी चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागते. यामध्ये हजारो वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. खंडित वीजपुरवठ्यामुळे महावितरणला सुद्धा वीजविक्रीमध्ये नुकसान तसेच तोडलेल्या वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचा खर्च सहन करावा लागत आहे. परंतु अनेक ठिकाणी संबंधीत कंत्राटदारांकडून तोडलेल्या वीजवाहिनीचा दुरुस्तीचा खर्च वसूल केल्या जात असला तरी वीजग्राहकांना मात्र वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे.

खोदकामासाठी परवानगी मिळविल्यानंतर संबंधीत विभाग व कंपन्यांचे कंत्राटदार महावितरणला कोणत्याही प्रकारची पूर्वमाहिती न देता थेट खोदकामास सुरवात करीत असल्याची स्थिती अद्यापही कायम आहे. दिवसा, रात्री किंवा मध्यरात्रीनंतर केव्हाही होणार्‍या खोदकामात महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात येत असल्याची स्थिती आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून खोदकामाची परवानगी घेतल्यानंतर संबंधित विभाग किंवा कंत्राटदारांनी महावितरणच्या संबंधित कार्यालयास कळविल्यास वीजवाहिन्यांना धोका होणार नाही याची काळजी महावितरणकडून घेण्यात येऊ शकते. परंतु खोदकामाबाबत पूर्वसूचना किंवा माहिती मिळत नसल्याने गेल्या वर्षभरात खोदकामामध्ये भूमिगत वीजवाहिन्या तोडण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.

गेल्या सप्टेंबर महिन्यातील दिवाळी सणाच्या कालावधीत महापारेषणची 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनी खोदकामात तोडण्यात आली व त्यामुळे 6 उपकेंद्र बंद पडले होते. पुणे शहरातील सुमारे 2 लाख 50 हजार वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा धोका निर्माण झाला होता. तथापि महावितरणने 80 मेगावॉट विजेचे भारव्यवस्थापन करून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यश मिळविले. परंतु असे प्रकार उन्हाळ्यात घडल्यास भारव्यवस्थापन शक्य होत नसल्याने महावितरणला नाईलाजाने पर्यायी व्यवस्था असूनही वीजपुरवठा करता येत नाही.

गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांना भरघोस यश

पुणे :- दहावीच्या सीबीएसई बोर्डाचा निकाल आज जाहीर झाला. पिंपरीतील गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलचा निकाल १०० टक्के लागला असून येथील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले असून अंजली नायर हिला सर्वाधिक ९८ %  गुण मिळाले आहेत. शाळेची एकूण टक्केवारी ८० टक्के आहे. परीक्षेला बसलेल्या ११५ विद्यार्थ्यांपैकी ३२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक तर ६३  विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.

पलक भंडारी हिला ९६ टक्के तर उत्कर्ष रस्तोगी ९५. ५ टक्के मिळाले आहेत.

डिस्लेक्सिया डिस्ग्रॅफिया असलेल्या अभिनव सरकार ने ८५ टक्के मिळवत शाळेचे नाव उंचावले आहे. याला बिझनेस स्टडीज या विषयात ९७ मार्क(without any internal marks) मिळाले आहेत.

हाडाचे शिक्षक फक्‍त परीक्षेपुरते शिकवत नाहीत, तर त्या विद्यार्थ्यांला  भविष्यात ते काही काम करतील त्यात अधिकाधिक प्रगती नेहमी करत राहावी अशा दृष्टीने शिकवत असतात.   समाजातील कर्तव्यनिष्ठ व्यक्तितीत परिवर्तित करण्याचे काम करत असतात आणि असाच प्रयत्न आम्ही नेहमी करत राहू असे मत  मुख्याध्यपिका भारती भागवाणी यांनी व्यक्त केले.

आमच्या येथील प्रत्येक शिक्षक सकारात्मक विचारांतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो . त्यामुळेच येथील विद्यार्थी शिक्षणाबरोबरच इतर अनेक कौशल्यांमध्ये पारंगत होत आहेत.म्हणूनच मी विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचेही  अभिनंदन करू इच्छ्ते अशा भावना शाळेच्या संचालिका सोनू गुप्ता यांनी मांडल्या .

पुण्यात हज हाऊस व हज यात्रेसाठी विमानसेवा सुरु होणार!मुख्यमंत्र्यांचे खासदार संजय काकडेयांना आश्वासन-

पुणे: पुण्यात हज हाऊस बांधणे आणि पवित्र हज यात्रेला जाण्यासाठी पुण्यातून थेट विमानसेवा सुरु करण्याचे आश्वासन आपण महापालिका निवडणुकीवेळी दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करावी, असे निवेदन भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. यासंबंधीत अधिकाऱ्यांशी बोलून त्वरित कार्यवाही केली जाईल असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी खासदार काकडे यांना दिले.

पुण्यात हज हाऊस व्हावे व येथून हज यात्रेसाठी थेट सौदी अरेबियाला विमानसेवा सुरु करावी ही मुस्लिम बांधवांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व अहमदनगर येथून पवित्र हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ही मागणी रास्त आहे.

पश्चिम महाराष्ट्रातून हज यात्रेला जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना मुंबईला जावे लागते. यामध्ये जेष्ठ नागरिकांची संख्या मोठी असून त्यांना या प्रवासाचा त्रास होतो. मुख्यमंत्री फडणवीस यांना 30 सप्टेंबर 2016 रोजी खासदार संजय काकडे यांनी पुण्यातून थेट सौदी अरेबियाला विमानसेवा सुरु करण्यासंदर्भात पत्राद्वारे विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनीही यासंदर्भात अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासित केले होते. पुढे 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीदरम्यान हज हाऊस बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. या दोन्ही विषयासंदर्भात त्वरित निर्णय घ्यावा, अशी विनंती खासदार संजय काकडे यांनी आज निवेदनाद्वारे केली आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत या विषयासंदर्भात संबंधीत अधिकाऱ्यांशी बोलून त्वरित कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिल्याची माहिती खासदार संजय काकडे यांनी दिली.

राष्ट्रपतींच्या हस्ते बुधवारी साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलचे औपचारिक उदघाटन

पुणे-राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या बुधवार (दि. 30) पुणे शहराच्या दौऱ्यावर येणार असून दादा वासवानी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या हस्ते प्राधिकरणातील साधु वासवानी इंटरनॅशनल स्कूलचे औपचारिक उदघाटन करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम पुणे कॅम्प येथील साधू वासवानी मिशन येथे सकाळी 11 वाजता होणार असून या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. व्ही. राव, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपचे संसदीय पक्षाध्यक्ष ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, उद्योगपती राहूल बजाज, अजय पिरामल, रमेश व सुमन तुलसियानी, नितीन न्याती आदी उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेस पक्षच देशाला तारू शकेल – श्रीपाल सबनीस

पुणे –
पुणे शहर ज़िल्हा काँग्रेस कमिटी  पार्वती विधानसभा मतदार संघ काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आज रोजी स्वयंवर मंगल कार्यालय, पुणे सातारा रोड येथे संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक  डॉ. श्रीपाल सबनीस ( जेष्ठ साहित्यिक ), प्रमुख पाहुणे हर्षवर्धन पाटील ( माजी मंत्री महा. राज्य ),  आमदार विश्वजीत कदम ( अध्यक्ष म. प्र. यु. काँ. ), कार्यक्रमाचे अध्यक्ष  रमेश बागवे ( अध्यक्ष पुणे शहर ज़िल्हा काँग्रेस कंमिट्टी ) उपस्थित होते. सर्व पाहुण्यांचे अभय छाजेड यांच्या हस्ते पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले.
श्रीपाल सबनीस आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले ….सर्वात जुना व देशाला लोकशाही मूल्ये रुजवणारा पक्ष म्हणून ख्याती असलेला काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस शिवाय देशाला तारुन नेऊ शकणार दुसरा कोणताही पक्ष नाही. काँग्रेस पक्षाने गांधीजींचा वारसा जपल्यास काँग्रेस पक्षाची विचारधारा जनसामान्यांत अधिक दृढ होईल असेही  ते म्हणाले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले .. जी लोक काम करतात त्यांच्यावरच टीका होते. भाजपा कडे कोणताही ठोस मुद्दा नसल्याने काँग्रेसवर खालच्या पातळीवर जाऊन पंतप्रधान टीका करत असल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केले.
उल्हास पवार म्हणाले… पंतप्रधान मोदी हे काँग्रेस द्वेषाने पछाडलेले असून पंडित जवाहरलाल नेहरूंचे कार्य झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अभय छाजेड  म्हणाले … भ्रष्टाचार कोण करतं काँग्रेस करतं, जातीवाद कोण करतं , असे अमित शहा म्हणतात, परंतु या सर्व गोष्टी भाजपच करत असून स्वतःच्या चुकीच्या गोष्टी काँग्रेसच्या नावावर ढकलण्याचे काम भाजप करत आहे. भाजपच्या
चार वर्ष्याच्या कारकीर्दीत देशाला आर्थिक आघाडीवर दहा वर्ष मागे ढकलण्याचे काम भाजपने केले असल्याचा आरोप अभय छाजेड यांनी केले.
रमेश बागवे म्हणाले .. मोदी सरकारची चार वर्षाची कारकीर्द पूर्णतः अपयशी ठरल्याची टीका शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी केली, तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सर्व नेते कार्यकर्ते गटतट विसरून जोमाने कामाला लागले पाहिजे.
या प्रसंगी नवनिर्वाचित आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचा महात्मा गांधी यांची प्रतिमा व पुष्पगुछ ,शॉल देऊन मा. हर्षवर्धन पाटील, श्रीपाल सबनीस, उल्हास पवार, शरद रणपिसे, रमेश बागवे, अभय छाजेड यांच्या हस्ते देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी बाळासाहेब शिवरकर, कमल व्यवहारे , गोपाळ तिवारी, विकास लांडगे, , अमीर शेख. आबा बागुल, अजित दरेकर, सोनाली मारणे ,अरविंद शिंदे, मोहन जोशी, संजय बालगुडे, पी.ए.इनामदार, मनीष आनंद,सुनील शिंदे, नीता राजपूत, सहानी नौशाद, संगीता तिवारी, राजेंद्र भुतडा, द. स. पुळेकर, अमरजितसिंग  मक्कड, रमेश अय्यर, रमेश टकट, राजेंद्र सिरसाट, मामा तुपे, व असंख्य कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित होते. सूत्रसंचालन  आभार द. स. पुळेकर यांनी मानले.
कार्यक्रमाचे आयोजन अभय छाजेड यांनी केले.

वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधील कॅम्पस रिक्रुटमेंटमध्ये मायक्रोसॉफ्टने दिले सर्वाधिक पॅकेज

0

सांगली: मायक्रोसॉफ्टने यंदाच्या कॅम्पस रिक्रुटमेंटमध्ये सांगलीतील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथे ह्यावर्षी 37 लाख रुपये इतके सर्वाधिक पॅकेज देऊ केले आहे. यंदाच्या कॅम्पस रिक्रुटमेंटमध्ये सहभागी झालेल्या 75 कंपन्यांपैकी 16 कंपन्यांनी ह्यावर्षी 7 लाखांहून अधिक रुपयांचे पॅकेज दिले आहे आणि 52 कंपन्यांनी वार्षिक 4 लाखांहून अधिक पॅकेज दिले आहे. आतापर्यंत सरासरी 5.07 लाख रुपये वार्षिक पगार देऊ करण्यात आला आहे.

टीसीएस, इन्फोसिस, आयबीएम, कॅपजेमिनी व विप्रो यांनी वालचंद ग्रॅज्युएड्सची मोठ्या प्रमाणात नियुक्ती केली, तर मायक्रोसॉफ्ट, डायरेक्ट I, बीपीसीएल, सिमेंटेक, व्हेरिटाज, हिंदुस्तान युनिलिव्हर, बार्कलेज, ईएमसी, सिमेन्स, इटॉन कॉर्पोरेशन, जॉन डीअर, थॉटवर्क्स यांनी उत्तम पगाराची पॅकेज दिली.

आतापर्यंत एकूण 366 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली आहे. त्यापैकी 306 विद्यार्थी अंडरग्रॅज्युएट आहेत व 60 पोस्टग्रॅज्युएट आहेत. लोकप्रिय कंपन्यांमध्ये अंदाजे 212 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली. येत्या काही दिवसांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळणार आहे, तर काही विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाचा पर्याय निवडला आहे. याबरोबरच, संस्थेने गेल्या सेमिस्टरमध्ये 107 अंडरग्रॅज्युएट व 93 पोस्टग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना इंटर्नशिप दिली आहे.

वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगविषयी

वालचंद कॉलेज ऑफ इंजिनियरिंगची 1947 साली स्थापना झाली आणि भारतातील सर्वात जुनी अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक आहे. विशेषतः 2007 पासून आपल्या दूरदर्शी अध्यक्ष, श्री अजीत गुलाबचंद आणि प्रशासकीय मंडळाच्या इतर प्रतिष्ठित सदस्यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाखाली स्वायत्त संस्थेची स्थापना झाल्यानंतर महाविद्यालय नव्या रुपाने कार्यंरथ झाले. मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या भारत सरकारच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) मध्ये 2018 मध्ये 101-150 च्या रँक बँडमध्ये WCE विशेष टीक्यूआयपीच्या तिसया टप्प्यात वालचंद कॉलेजची निवड करण्यात आली आहे. त्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जबलपूरचे मार्गदर्शन करणार आहे.

डुक्करमुक्त प्रभागासाठी शिवसेना नगरसेवक भानगिरे यांचे आंदोलन

पुणे-डुक्कर मुक्त प्रभाग ,सुरळीत पाणी पुरवठा, अतिक्रमण हटवणे, भाजी मंडई स्थलांतर, वाहतूक कोंडी ,या प्रश्न सोडविण्यासाठी व अधिकाऱ्यांना जाग करण्यासाठी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे ,नगरसेविका प्राची आल्हाट यांनी शिवसेना स्टाइल नि हडपसर क्षेत्रीय कार्यलय मध्ये डुक्कर सोडून, उपोषण सुरू केले ,तसेच अधिकाऱ्यांना मिरची तसेच गाजर गांधीगिरी स्टाईल  देऊन आंदोलन केले आता कोणत्या प्रकारचे आंदोलन करून अधिकाऱ्यांना  जाग येणार आहे? असा कडवट प्रश्न अधिकाऱ्यांना नगरसेवक नाना भानगिरे यांनी  विचारला
व निवेदन दिले या वेळी आशीष आल्हाट ,नाना तरवडे,जावेद कलावंत ,उमेश अल्हाट,योगेश सातव,विशाल वाल्हेकर,राहुल भुजबळ रॅम रहीम मित्र मंडळ उपस्थित होते

मोदी सरकारने केला जनतेचा विश्वासघात-रमेश बागवे

पुणे-मोदी सरकारच्या ४ वर्षांच्या अपयशी कारभाराच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा
काँग्रेस कमिटीतर्फे आज सोमवार दि. २८ मे  रोजी सकाळी १०.३० वा., टिळक
पुतळा (महात्मा फुले मंडई) ते कै. केशवराव जेधे चौकापर्यंत काळी फित बांधून ‘मुक
मोर्चा’ काढण्यात आला. ‘मुक मोर्चा’ रामेश्वर चौक मार्ग – शिवाजी रोड – खडक
पोलीस स्टेशन – राष्ट्रभुषण चौक – कै. केशवराव जेधे पुतळा, स्वारगेट पर्यंत
काढण्यात आला.
सदर मोर्चाचे नेतृत्व पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी
केले.‌ मोर्चाच्या समारोपाच्या ठिकाणी भाषण करताना शहराध्यक्ष रमेश बागवे
म्हणाले की, ‘मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केलेला आहे.‌ सत्तेत येण्यापूर्वी
पंतप्रधान मोदींनी जनतेला अनेक आश्वासने दिली होती ती आश्वासने पूर्ण करण्यास
मोदी सरकार अपयशी ठरले. मोदी सरकारच्या राजवटीत अनेक ज्वलंत प्रश्न देशापुढे
आहेत. त्यांच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था विस्कळित झाली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही या उलट
मोदी सरकारने आपल्या उद्योगपती मित्रांचे २ लाख कोटींचे कर्ज माफ केले. स्वतंत्र
भारताच्या इतिहास पहिल्यांदा मोदी सरकारने कृषी क्षेत्रावर टॅक्स लावला. दरवर्षी २
कोटी तरूणांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता करू शकले नाही
आणि आता ४ वर्ष सत्ता भोगल्यानंतर मोदी सांगतात की, तरूणांनी पकोडे विकले
पाहिजे. या जुमला सरकारने सांगितले होते की, परदेशात गेलेला काळा पैसा परत
आणून १५ लाख प्रत्येक भारतीय नागरिकाच्या खात्यात जमा करू. आजपर्यंत एक
नया पैसाही जनतेच्या खात्यात जमा झालेला नाही. राफेल विमान खरेदीमध्ये हाजारो
कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे. मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण फेल झालेले आहे.
दररोज पाकिस्तान मधून अतिरेक्याची घुसखोरी होत आहे. या अतिरेक्यांबरोबर
झालेल्या चकमकित ३०० पेक्षा अधिक जवान मारले गेले. चीन डोकलाममध्ये –

आपल्या सैन्यांनसह तळ ठोकून आहेत. आपल्या पंतप्रधानांनी चीनचा दौरा
केला परंतु चीनच्या राष्ट्राध्यक्षाबरोबर डोकलाम विषयी चर्चा केली नाही. काश्मिरचा
प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चाललेला आहे, विकासदर घटत आहे, इंधन दरवाढीतून
जनतेची लूटमार होत आहे. उनाव आणि कथुआमध्ये महिलांवर बलात्कार झाले.
कथुआच्या आरोपींना मदत करण्यासाठी भाजपचे मंत्र्यांनी पुढाकार घेतला.’
वाढलेल्या इंधनदरवाढीमुळे सामान्य जनतेला जगणे कठिण झाले आहे. जनतेला
होत असलेल्या समस्यांचा विचार न करता वस्तूस्थिती जाणून न घेता मोदी सरकार
जाहिरात बाजी करून जनतेची दिशाभुल करीत आहे. येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकीत
जनता या जुमला सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.’
अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सौ. कमल व्यवहारे व
नगरसेवक आबा बागुल यांचीही यावेळी भाषणे झाली. या मोर्चामध्ये माजी आमदार
बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, श्रीकांत शिरोळे, गटनेते
अरविंद शिंदे, संजय बालगुडे, सदानंद शेट्टी, गोपाळ तिवारी, अंजनी निम्हण,
नगरसेवक अजित दरेकर, लता राजगुरू, मनिष आनंद, रविंद्र धंगेकर, अविनाश
बागवे, वैशाली मराठे, महिला अध्यक्षा सोनाली मारणे, युवक अध्यक्ष विकास लांडगे,
सेवादलाचे रविंद्र म्हसकर, बाळासाहेब दाभेकर, मुकारी अलगुडे, संगिता तिवारी, द. स.
पोळेकर, शेखर कपोते, इंदिरा अहिरे, सुनिल शिंदे, राजू मगर, काका धर्मावत, राजेंद्र
भुतडा, प्रदिप परदेशी, विजय खळदकर, शिवा भोकरे, प्रविण करपे, सतिश पवार,
जयकुमार ठोंबरे, साहिल राऊत, सुनिल पंडित, राजेंद्र पेशने, राजू गायकवाड, भारती
कोंडे, नरसिंह आंदोनी, प्रकाश आरणे, प्रशांत सुरसे आदी सहभागी झाले होते.