पुणे: पुण्यात हज हाऊस बांधणे आणि पवित्र हज यात्रेला जाण्यासाठी पुण्यातून थेट विमानसेवा सुरु करण्याचे आश्वासन आपण महापालिका निवडणुकीवेळी दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करावी, असे निवेदन भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. यासंबंधीत अधिकाऱ्यांशी बोलून त्वरित कार्यवाही केली जाईल असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी खासदार काकडे यांना दिले.
पुण्यात हज हाऊस व्हावे व येथून हज यात्रेसाठी थेट सौदी अरेबियाला विमानसेवा सुरु करावी ही मुस्लिम बांधवांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व अहमदनगर येथून पवित्र हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ही मागणी रास्त आहे.
पश्चिम महाराष्ट्रातून हज यात्रेला जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना मुंबईला जावे लागते. यामध्ये जेष्ठ नागरिकांची संख्या मोठी असून त्यांना या प्रवासाचा त्रास होतो. मुख्यमंत्री फडणवीस यांना 30 सप्टेंबर 2016 रोजी खासदार संजय काकडे यांनी पुण्यातून थेट सौदी अरेबियाला विमानसेवा सुरु करण्यासंदर्भात पत्राद्वारे विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनीही यासंदर्भात अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासित केले होते. पुढे 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीदरम्यान हज हाऊस बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. या दोन्ही विषयासंदर्भात त्वरित निर्णय घ्यावा, अशी विनंती खासदार संजय काकडे यांनी आज निवेदनाद्वारे केली आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत या विषयासंदर्भात संबंधीत अधिकाऱ्यांशी बोलून त्वरित कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिल्याची माहिती खासदार संजय काकडे यांनी दिली.