पुणे
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकांसह मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या ठरलेल्या देशातील पहिल्या राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलने सलग सहाव्यांदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्ड इयत्ता दहावी आणि राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या निकालात यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी अभिनंदन केले आहे.
सीबीएसई बोर्ड इयत्ता दहावीसाठी यंदा २० मुली आणि १९ मुले असे एकूण ३९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ती सर्व उत्तीर्ण झाली. साक्षी कमलापुरे हिने ८५.४ टक्के तर ओंकार गोरवडे ८३. ८ तसेच शुभम शिंदे याने ८३. ८ टक्के गुण प्राप्त केले आहे. तर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेला २७१ विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
एकूण ९८ टक्के निकाल लागला आहे,त्यात
१२४ विद्यार्थी विशेष गुणवत्ता तर ९८विद्यार्थी प्रथम श्रेणीत ,३७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. अनिरुद्ध अत्रे [ ९४. १५ टक्के ] अर्णव संभारे [ ९२.७७ टक्के ] अदिती जोशी [ ९२. ६२ टक्के ] मारिया जोजी [ ९२. ४६ टक्के ] समृद्धी मालेगावकर [ ९२ .४६ टक्के ] साक्षी पाटील [ ९२ . ३१ टक्के ] दिव्या अलोणे [९२.१५ टक्के ] अथर्व कुलकर्णी [ ९२ टक्के ] मृगशी कुलकर्णी [ ९२ टक्के ] प्रतीक्षा काकडे [ ९१. ३८ टक्के ] या विद्यार्थ्यांनी विशेष यश प्राप्त केले आहे.
याबाबत माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलमध्ये आर्थिक दुर्बल घटकासह मध्यमवर्गीयांची मुले शिक्षण घेतात. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी या शाळेने नावलौकिक प्राप्त केला आहे. सीबीएसई बोर्ड इयत्ता दहावीपर्यंत आणि राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. शाळेची स्थापना माझ्या पुढाकारातून झाली. स्थापनेपासून सलग शंभर टक्के निकालाची परंपरा राखण्यात यश मिळाले आहे.केवळ दहावी -बारावीमध्येच नाही तर आयआयटीमध्येही या शाळेतील विद्यार्थी टॉपर ठरले आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळेल यासाठी शिक्षकवर्ग , सर्व लोकप्रतिनिधी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याने हे यश मिळाले आहे असेही आबा बागुल यांनी नमूद केले .