Home Blog Page 3136

काही अधिकाऱ्यांनी प्रमोशनसाठी आपल्याला अडकविले , भुजबळ यांचा आरोप -(व्हिडीओ)

पुणे : काही अधिकाऱ्यांना प्रमोशन हवे होते म्हणून आपल्याला गुंतविण्यात आल्याच्या स्वरूपाचा आरोप आज छगन भुजबळ यांनी येथे केला . हे सांगताना , मै जिंदगीका साथ निभाता चला गाय …बर्बादियो का जश्न मनाता चला गया … या देव आनंद वरील चित्रित साहीर लुधीयांनी यांच्या गीताच्या ओळी त्यांनी मांडल्या .तर इंदिराजींची आणीबाणी घटनेवर आधारित होती ,पण आता ची जी आणीबाणी आहे ती भयंकर आणि घटनाबाह्य असल्याच्या न्यायमूर्ती पी बी सावंत यांच्या वक्तव्याचा उल्लेख करीत याविरुद्ध सर्वांनी एकत्र यायला हवे असे आवाहन त्यांनी केले .

राष्ट्रवादी काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाची आज (रविवार) पुण्यात सांगता सभा झाली. या सभेला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

या वेळी भुजबळ यांनी कारागृहातून आल्यावर प्रथमच भाषण केले आपल्या भाषणात ते म्हणाले ,सर्व पक्षांचे नेते भेटून गेले त्यामुळे चर्चांना सुरवात झाली भुजबळ कोठे जाणार, आता राष्ट्रवादीचे स्टेज असल्यामुळे मोकळेपणाने बोलणार आहे. वाघ म्हातारा झाला म्हणून गवत खात नाही. अजितदादा अडीच वर्षांपूर्वीच माझ्यावर हल्लाबोल झाला. एकाच ठिकाणी सात-सात वेळा धाडी मारण्यात आल्या. मिळाले काही नाही आणि सांगताना बरेच काही सांगण्यात आले, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

छगन भुजबळ म्हणाले, की मी निर्दोषत्व सिद्ध केल्याशिवाय शांत बसणार नाही. महाराष्ट्र सदनाचा कंत्राटदार छगन भुजबळ यांनी नेमला नाही आणि शिफारसही केली नाही. दोन महिन्यांपूर्वी मी खूप आजारी होतो. जिवघेणा आजार होता. परंतू आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि पवार साहेबांचे प्रयत्न यामुळे मी आज तुमच्यासमोर उभा आहे. न्यायदेवतेमुळे तुमच्यासमोर मला बोलता येत आहे. न्यायदेवतेवर माझा विश्वास होता आणि आहे. मी माझी बाजू मांडून निर्दोष सिद्ध केल्याशिवाय हा छगन भुजबळ शांत बसणार नाही. मला न्याय मिळण्यासठी नाशिकला प्रचंड मोठा मोर्चा निघाला. यामध्ये सर्व धर्माचे नागरिक होते. भाजपच्या दिलीप कांबळेही माझी सुटका व्हावी असे म्हणाले. मला भेटायला आलेल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो.

नोटबंदीमुळे सगळीकडे शांतता आहे, दहशतवाद संपला, कोठेही गोळीबार होत नाही, अशी खोचक टीका त्यांनी केली.  त्याचबरोबर पहिल्यापेक्षा जास्त स्मार्ट झालीत अशी चार शहरे यांनी सांगावीत, चार जिल्हे सांगावेत ज्यांचा विकास सांगावा. चार गावं हागणदारीमुक्त झालेली दाखवावीत, साखरवाला, दुधवाला, टोमॅटोवाला, कांदावाला रडत आहेत, हे कसले अच्छे दिन असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.आधी आत्महत्या गावात व्हायच्या आता मंत्रालयासमोर होतात. सगळ्यांना अच्छेदिन आलेत, सगळे रडत आहेत, पाकची साखर गोड़ झाली आहे, अशी अवस्था या चार वर्षात झाली आहे. 

मराठा या महाराष्ट्रात सगळ्यांचा मोठा भाऊ आहे. ओबीसी समाजाला आरक्षण पवार साहेबांमुळेच मिळाले. मी मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात कधीच नव्हतो. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रस्तावाला मी कधीच विरोध केलेला नाही. जाणीवपूर्वक माझी प्रतिमा मराठा समाजाच्या विरोधात बनवली गेली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ओबीसी समाजाला घेऊन मी रस्त्यावर यायला तयार आहे. मराठा समाजातील गरिबांना आरक्षण मिळालेच पाहिजे, असेही भुजबळ यावेळी म्हणाले.

पहा आणि ऐका नेमके भुजबळ काय म्हणाले ….

 

भाजपाच्या ‘पेशवाई’वर शरद पवारांचे जोरदार आसूड ..(व्हिडीओ)

पुणे- पेशवाई चे प्रतिक मानल्या जाणाऱ्या पुणेरी पगडीला या पुढे कायमची तिलांजली देण्याची सक्त ताकीद देत, पुरोगाम्यांना आणि एल्गार परिषद भरविणाऱ्यांना नक्षली ठरवता ,त्यांना गुन्हेगार बनविता , नेपाळ मधून भारतातल्या जुन्या नोटा बदलून देण्याचा धंदा मांडता ,महागाई ,आत्महत्या तर विचारू नका पण त्याकडे दुर्लक्ष करून परदेश दौरे ठोकता ,मशीन च्या आधारे निवडणुका लढविता ? ‘उधळलेल्या खोंडावर ‘ओढावेत असे जोरदार आसूड आज खुद्द शरद पवार यांनी भाजपवर ओढले.पीएम आणि सीएम यांच्या नावांचा उल्लेख न करता धमक्यांच्या पात्रांची खिल्ली उडवून हा अविशासार्ह आणि सहानुभूती मिळवू पाहणारा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले . सत्ता येते आणि जाते ..पण अशी मस्ती बरी नाही असे त्यांनी सांगितले आणि भाषणाच्या प्रारंभी पुणेरी पगडी चा आता त्याग करा असा आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला ….
राष्ट्रवादी काँग्रेसचा २० वा स्थापना दिन व पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभा पुण्यात सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल येथे आयोजित केली होता. यावेळी पवार बोलत होते. सभेसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, चित्रा वाघ, हसन मुश्रिफ , दिलीप वळसे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड, फौजिया खान, आण्णा डांगे, वंदना चव्हाण ,जयदेव गायकवाड,अंकुश काकडे,प्रशांत जगताप ,विशाल  तांबे,अश्विनी कदम, इक्बाल शेख  आदी मान्यवर उपस्थित होते.

पहा आणि ऐका पवार यांच्या भाषणातील ठळक मुद्दे …..

मोदी-फडणवीस यांच्या जीवाला धोका हा राजकीय फसवा स्टंट- माजी सनदी अधिकारी सुरेश खोपडे

0

 

पुणे-देशभरात सध्या भाजपची पिछेहाट सुरू आहे. त्यामुळे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगून सरकार स्टंट निर्माण करत आहे. हे सरकार इतक संवेदनशील आहे, तर त्यांनी दाभोळकर-पानसरेंच्या खुन्यांना पकडण्याची हिम्मत का नाही दाखवली ? लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार असल्याची मार्मिक टीका करत माजी सनदी अधिकारी सुरेश खोपडे यांनी पोलीस जणू राज्यकर्त्यांच्या दावणीलाच बांधले असल्याचा संकेत आपल्या वक्तव्यातून दिला आहे . 

पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांच्यासह पाच जणांना अटक केली. त्याविषयी विचारले असता ते बोलत होते. खोपडे म्हणाले, “पोलिसांनी पत्रकार परिषद घेण्याची घाई का केली? हे कळायला मार्ग नाही. कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी अटक केलेल्या आरोपींविरोधात पोलिसांनी दिेलेले पुरावे पुरेसे नाहीत” केवळ आपला हेतू साध्य करण्यासाठी सरकार पोलीस खात्याचा वापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.ते म्हणाले, “गृहमंत्री असतानाही मुख्यमंत्र्यांना नागपूर शहरातील गुन्हेगारी थांबवता आली नाही.तर लोकशाही मार्गाने विद्रोह करणाऱ्यांची दडपशाही केली जात आहे. परंतु यामुळे चळवळ थांबणार नाही तर जेवढे दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढे अधिक लोक उसळून येतील” पोलीस दलात काम केल्यामुळे मला याचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.

‘युनिक इंग्लिश मीडियम स्कूल’चा दहावीचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकाल

निशिगंधा ढगे 94.20 टक्के मिळवून शाळेत प्रथम
पुणे: ‘ईगल एज्युकेशन सोसायटी’ संचालित कात्रज कोंढवा रोडवरील ‘युनिक इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॅालेज’चा माध्यमिक शालान्त (दहावी) परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला. निशिगंधा ढगे हिने 94.20 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. शाळेचा सतत सातव्या वर्षी 100 टक्के निकाल लागला आहे.
संतोषी देवासी हिने 93.60 टक्क्यांसह दुसरा; तर श्वेता मुंढे हिने 92.60 टक्क्यांसह तिसरा क्रमांक पटकावला. पुरब खोपडे 92.20 टक्के, गुलनाज शेख 91.80 टक्के, प्रगती चव्हाण 90.80 टक्के मिळवून या विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक डॉ.आर. ए. मुलाणी, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री जाधव व उपमुख्याध्यापिका सुनिता चांदगुडे तसेच शिक्षक व कर्मचारीवर्ग यांनी अभिनंदन केले.
शैक्षणिक वर्ष 2017-2018 मध्ये एकूण 65 विदयार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 32 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.

ताल आणि भावमुद्रांचा समन्वय साधणार्‍या ‘दिशा’ शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन

0
पुणे :‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत विलोभनीय भावमुद्रा, ताल आणि मुद्रा यांचा समन्वय साधणाऱ्या ‘दिशा- एक योग्य मार्ग’ या शास्त्रीय नृत्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नृत्ययात्री आर्ट मुव्हमेंट फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सादर होणार आहे.
ताल आणि मुद्रांचा नृत्याविष्कार असलेला हा कार्यक्रम शनिवार, दिनांक १६ जून २०१८ रोजी ‘भारतीय विद्या भवन’चे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह’, सेनापती बापट रोड येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे. ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
नेहा आपटे आणि अंजली हरिहरन या भरतनाटयम् प्रकारातील सोलो नृत्य सादर करणार आहेत. नेहा आपटे या स्वाती दैठणकर व लावण्या अनंथ यांची शिष्या आहेत. तर अंजली हरिहरन या प्रमद्वारा कित्तूर व अनिता गुहा यांची शिष्या आहेत, अशी माहिती संस्थेच्या संस्थापक -संचालक मेघना साबडे यांनी दिली.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
‘नृत्ययात्री आर्ट मुव्हमेंट फाऊंडेशन’ 
‘नृत्ययात्री आर्ट मुव्हमेंट फाऊंडेशन’ संस्थेच्या वतीने गेल्या ८ वर्षापासून विविध कार्यशाळा, व्याख्यान, प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शास्त्रीय नृत्याचे शिक्षण देत आहे. या कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी अनेक नृत्य गुरूंना निमंत्रित केले गेले होते. यामध्ये सी.व्ही.चंद्रशेखर (भरतनाट्यम्), ब्रागा ब्रेसेल आणि प्रियदर्शिनी गोविंद (नृत्यातील अभिनय), शमा भाटे (नृत्य दिग्दर्शन), शेजिथ कृष्ण आणि परीमल फडके (तालबद्ध नृत्यातील पैलू), जानकी रंगराजन (कर्णाचा नृत्यातील वापर), वैभव अरेकर (नृत्य रंगमंच) या गुरूंचा समावेश होता. संस्थेच्या माध्यमातून अनेक तरूण वर्ग नृत्य शिक्षणाचा लाभ घेत आहे. नृत्य जगाची आवड असणार्‍यांना ‘नृत्ययात्री आर्ट मुव्हमेंट फाऊंडेशन’संस्था उत्तम व्यासपीठ ठरत आहे, अशी माहिती संस्थेच्या संस्थापक- संचालक मेघना साबडे यांनी पत्रकाद्वारे दिली.

‘गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी सर्व ‘मूडस्’ ना गीतातून सजवले: प्रा.शलाका गोळे

पुणे: ‘हिंदी गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी जीवनातील सर्व भावभावना, ‘मूडस्’ नुसार उत्कट गीतलेखन केले, त्यामुळे त्यांची गीते सजली आणि लोकप्रिय ठरली’ असे उद्गार हिंदी भाषेच्या अभ्यासक प्रा.शलाका गोळे यांनी काढले.
‘रसिक मित्र मंडळ’आयोजित‘एक कवी -एक भाषा’ मासिक व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. हे व्याख्यान शुक्रवारी सायंकाळी श्रमिक पत्रकार भवन येथे झाले. ‘रसिक मित्र मंडळ’चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला यांनी स्वागत केले. ‘एक कवी -एक भाषा’ व्याख्यानमालेचे हे 56 वे पुष्प होते. अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश कामत होते. ‘रसिक मित्र मंडळ’च्या विश्वस्त डॉ. शशीकला शिरगोपीकर या उपस्थित होत्या.
प्रा.शलाका गोळे म्हणाल्या ‘राजेंद्र कृष्ण यांनी सर्व छटा असलेली गीते लिहिली, त्यात देशभक्तीपर गीतांचाही समावेश होता. ‘जहाँ डाल डाल पर सोने की चिडियाँ करती है बसेरा !’ ,‘सुनो सुनो बापूजी की अमर कहानी’ ही देशभक्तीपर गीते गाजली. ‘कौन आया मेरे मन के द्वारे’, ‘दो घडी वो पास आ बैठे, हम जमाने से दूर जा बैठे’ अशी हळूवार गीते, ‘इना मिना डिका’, ‘मेरे पिया रंगून’ यासारखी खेळकर गीतेही त्यांनी लिहिली. मात्र खेळकर शब्दांमुळे  हिंदी गीतसाहित्याची उंची कमी केल्याचा आरोपही त्यांच्या वाट्याला आला.
राजेंद्र कृष्ण यांच्या आठवणींना उजाळा देताना डॉ.प्रकाश कामत म्हणाले,‘ 2018 हे वर्ष राजेंद्र कृष्ण यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. अशावेळी या महान गीतकाराच्या शब्दांना उजाळा दिला पाहिजे.
पत्रकार संघात झालेल्या या व्याख्यानाला रसिकांची मोठी उपस्थिती होती

कॉबेक्स मास्टर गेमिंग फेज १ पुण्यात संपन्न ई- स्पोर्ट्स मध्ये विजेत्यांना जागतिक दर्जाच्या संधी

पुणे – कॉबेक्स मास्टर्स 2018 च्या पुण्यात संप्पन झालेल्या अंतिम फेरीमध्ये डोटा २ आणि सीएस गो ह्या खेळांमध्ये आर  ओ  जी टायटन्स आणि मॅग पुणे  फाईव्ह ने जी.जी.वेलप्लेड  आणि टीम एनएस के ला मात देऊन विजय मिळवला, भारतात ई- गेमिंगची अश्या प्रकारे खेळली जाणारी ही पहीली राष्ट्रीय  स्पर्धा आहे.
टूर्नामेंटमधील  विजेत्यांना ट्रॉफी बरोबरच प्रत्येकी 30,000 / – आणि कॉबेक्स मर्चंडाइझ मिळाले.  उपविजेत्यांना प्रत्येकी रु.  20,000 मिळाले. हा अंतिम सामना कोंढव्यामधिल मॅग कॅफे मध्ये आयोजित करण्यात आला होता. ह्यामध्ये  ई -गेमिंगची आवड असणार्या तरुण खेळाडूंनी  उत्साहपूर्ण सहभाग  घेतला होता.
आपले विचार व्यक्त करताना आर  ओ  जी टायटन्सचा कर्णधार दर्शन म्हणाला कि,  “आजचा दिवस आमच्यासाठी एक स्मरणीय दिवस आहे कारण आम्ही भारतातील सर्वात मोठ्या गेमिंग स्पर्धेच्या दुस-या टप्प्यासाठी पात्र ठरलो आहोत.” आतापर्यंत आम्ही अश्या स्थानिक स्पर्धांसाठी खेळलो जेथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाव नव्हता. कॉबेक्स मास्टर्स ने प्रथमच आम्हाला एक मोठ्या पातळीवर खेळण्याची संधी दिली. आपल्या देशात आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत.  आता अामचे ध्येय आहे ही टूर्नामेंट जिंकणे. “
टीम मॅग पुणे  फाईव्हचा कर्णधार रोशन म्हणाला कि, “सीएस गो खेळाकडे आम्ही गंमत म्हणून वळलो होतो, पण कॉबेक्स मास्टर्स ने  ह्या खेळाकडे व्यावसायिक  दृष्टीकोनातुन  आणि करिअर म्हणुन पहावयास शिकवले. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे आमचे स्वप्न आहे आणि  आता आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. “पुण्यातील पहिल्या टप्प्याच्या यशस्वी निष्कर्षानंतर आता सर्वांचे डोळे  फेज 1 च्या उर्वरित भागावर आहेत, सर्वोत्कृष्ट संघासह कट्टर प्रतिस्पर्ध्यांना तय्यार करून कोबेक्सने भारताला जागतिक दर्जाच्या गेमिंग स्पर्धेपर्यांत पोहचवले आहे.

स्मार्ट किडज प्री स्कुलचे उदघाटन

पुणे-स्मार्ट किडज प्री स्कुलचे उदघाटन नगरसेविका माई ढोरे व नगरसेवक हर्षल
ढोरे यांच्याहस्ते करण्यात आले . जुनी सांगवी मधील ढोरे नगर येथील लेन
नंबर दोन मध्ये या शाळेचा उदघाटन सोहळा पार पडला . या कार्यक्रमास
स्मार्ट किडज प्री स्कुलचे प्रिन्सिपल आशिष काळोखे , व्हेनेसा काळोखे ,
आमदार लक्ष्मण जगताप , नगरसेवक हर्षल ढोरे , पास्टर अल्फान्सो जोसेफ ,
मेरी डिक्रुझ , विजयमाला काळोखे . तृप्ती कांबळे आदी मान्यवर उपस्थित
होते
स्मार्ट किडज प्री स्कुलमध्ये प्रिस्कुल , डे केअर , नर्सरी टीचर
ट्रेनिंग कोर्स अभ्यासक्रम चालविण्यात येणार आहे . जुनी सांगवी व नवी
सांगवी मधील सर्वात मोठी प्री प्रायमरी शाळा असून वंचित मुलासाठी मोफत
शिक्षण देण्यात येणार आहे . उत्कृष्ट शिक्षक वर्ग , रंगीत रंगाचे आकर्षक
वर्ग , एल सी डी प्रोजेक्टर , स्वछ भारत अभियान शाळेमध्ये चालविले जाते .
ई लर्निंग , डॉल रूम , बॉल रूम , डायनिंग रूम , मुलांना खेळण्यासाठी
प्रशस्त जागा व बसेसची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे . अशी माहिती
स्मार्ट किडज प्री स्कुलचे  प्रिन्सिपल आशिष काळोखे यांनी दिली .

१० कोटीच्या बेंच घोटाळ्याकडे का हो दुर्लक्ष ? स्थायी समिती अध्यक्षांसह आयुक्तांना सवाल …आता संदीप खर्डेकरांनीहीवेधले लक्ष

पुणे-स्थायी समिती चे सदस्य उमेश गायकवाड यांनी ‘माय मराठी ‘ द्वारे पालिका करत असलेल्या बेंच खरेदीत कोट्यावधीचा घोटाळा होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर आता या घोटाळ्याकडे  भाजपचे नेते संदीप खर्डेकर यांनी हि लक्ष वेधणारे पत्र महापालिका आयुक्तांना दिले आहे . आता तरी स्थायी समिती अध्यक्ष   आणि महापालिका आयुक्त यांना जाग येणार काय ? या प्रकरणांची चौकशी करून दोषींना शासन होणार काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे . सुमारे १० कोटीचा हा घोटाळा उमेश गायकवाड यांनी १७ मे रोजी उघडकीस आणला होता.
(हि बातमी पहा या यु ट्यूब लिंक वर https://www.youtube.com/watch?v=t77R5dfn9iQ ) किंवा  http://mymarathi.net/local-pune/pmc-news-235/ येथे …
आजपर्यंत त्यावर स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्त यांनी काहीही भूमिका स्पष्ट केलेली नाही .
दरम्यान या प्रकरणी काल भाजपचे स्थानिक नेते संदीप खर्डेकर यांनी आता आवाज उठविला आहे .त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना याप्रकरणी पत्र दिल्याचे सांगितले आहे . या पत्रात त्यांनी काय म्हटले आहे ते जसेच्या तसे वाचा …
प्रति,
मा. सौरभ राव,
आयुक्त पुणे मनपा ,
विषय – डी एस आर दराची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करणेबाबत / तसेच पूर्वगणनपत्रक  व निविदेतील प्रचंड तफावतीबाबत ….
मा महोदय,
मनपा तील एस्टीमेट कमिटीच्या माध्यमातून खरेदी केल्या जाणाऱ्या विविध वस्तूंचे दरपत्रक निश्चित केले जाते व त्यानुसार निविदा काढून सदर वस्तू खरेदी केल्या जातात. हीच पद्धत विविध विकास कामांबाबत ही अवलंबिण्यात येते व त्यानुसार कामांच्या निविदा काढण्यात येतात.
मात्र अनेक वस्तूंचे डी एस आर ( DISTRICT SCHEDULED RATES) व बाजारातील दर यात मोठी तफावत असल्याचे दिसून येते.याबाबत विचारणा केली की ” वेगवेगळ्या दर्जाचे साहित्य असते व त्यामुळे वेगवेगळे दर असतात अशी मखलाशी केली जाते ” आणि बाजारात स्वस्तात मिळणार माल महागड्या दराने खरेदी करून अनेकांचे हित साधले जाते.
अगदी ताजे उदाहरण द्यायचे तर आमच्या भागात (कर्वेनगर हैप्पी कॉलोनी एरंडवणे ) नागरिकांच्या सोयीसाठी सुंदर बाक/ बेंच खरेदी करण्यात आली. सदर बेंच विमानतळावर असतात तसे सुंदर आहेत व नागरिकांना त्याचा उपयोग होतो आहे.मात्र मी अध्यक्ष असलेल्या बँकेसाठी मी अश्या प्रकारच्या बेंच ची खरेदी केली असता मला एक बेंच ६००० रुपयास पडला तर मनपा ने बेंच १०५०० रुपयास खरेदी केला (डी एस आर कडे बोट दाखवत )
खुल्या बाजारातील वितरकाने मला सांगितले कि हे बेंच तीन प्रकारचे येतात  यात २६ किलो चा बेंच ३५००,२९ किलो चा ४५०० आणि ३१/३२ किलो चा ५५०० हजारात देतो.दर्जा ही उत्तम व जागेवर पोच,तसेच बसवून ही देणार (म्हणजे जमिनीत चारही पाय रोवून त्यास सिमेंट काँक्रेट ने फिक्स करणार ) तसेच हजार पेक्षा जास्त नग घेतल्यास भरघोस डिस्काउंट देऊ असे सांगण्यास ही तो विसरला नाही.हे एवढे स्वस्त उपलब्ध असताना मनपा चे दर एवढे चढे कसे ?
तसेच कळीचा मुद्दा असा की प्रत्येक कामाचे पूर्व गणन पत्रक मनपा तर्फे तयार केले जाते,म्हणजे एखादा रास्ता डांबरीकरण किंवा पदपथ करणे किंवा खोल्या बंधने याचे दरनिश्चित करून त्याप्रमाणे निविदा काढली जाते,म्हणजेच एखादे काम १ कोटीचे आहे असे ठरविल्यावर जेव्हा निविदा ३०% ते ३५% कमी दराने भरली जाते तेव्हा संशय निर्माण होतो की हे परवडते कसे? एक कोटीचे काम भाववाढ,,व्याज,ओव्हरहेड्स,रिटेंशन हे सगळे गृहीत धरून ६०/६५ लेखाला कसे परवडू शकते ? काहीतरी चुकतंय एवढे नक्की, तरी याबाबत निश्चित खुलासा करावा व बेंच च्या दराची व दर्जाची तपासणी करावी आणि खरेदीप्रक्रियेची चौकशी करावी अशी आग्रही मागणी करत आहे.तसेच सर्व डी एस आर दरांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी ही मागणी करत आहे.
संदीप खर्डेकर,
अध्यक्ष क्रिएटिव्ह फाउंडेशन.
मो ९८५०९९९९९५

टाटा क्लासएज आणि डेल एकत्र येऊन शिक्षणातील तंत्रज्ञानाच्या उदयोन्मुख भूमिकेवर काम करणार

बेंगळुरूडेल आरंभ हा शैक्षणिक उपक्रमासाठी तयार केलेला पर्सनल कम्प्युटर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डेलने आज टाटा क्लासएज या तंत्रज्ञानावर आधारित अध्ययन सोल्युशन्स पुरवणाऱ्या अग्रगण्य कंपनीसोबत सहयोगाची घोषणा केली. डिजिटल प्रशिक्षण शाळांपर्यंत घेऊन जाण्याच्या तसेच हे तंत्रज्ञान वर्गांमध्ये अमलात आणण्यासाठी आवश्यक ते ज्ञान शिक्षकांना देण्याच्या उद्देशाने ही भागीदारी करण्यात आली आहे. या सहयोग करारामुळे डेल आरंभ टाटा क्लासएजच्या शिक्षण संस्थांतील नेटवर्कच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकणार आहे.

पर्सनल कम्प्युटर अर्थात पीसीचे शिक्षणातील महत्त्व समजलेल्या आणि अधिक चांगल्या अध्ययनासाठी पीसी वापरातील नवीन घडामोडींसोबत सातत्याने पुढे जाऊ इच्छिणाऱ्या पालक व शिक्षकांच्या मार्गातील अडथळे दूर करणे हे डेलच्या आरंभचे उद्दिष्ट आहे.या सहयोगामुळे डेल आरंभ टाटा क्लासएजच्या समूहातील शाळांपर्यंत पोहोचू शकेल आणि डेल आरंभच्या समूहातील शाळांना टाटा क्लासएजच्या ई-लर्निंग सोल्युशन्सचा लाभ करून घेता येईल. शाळेच्या मुख्याध्यापकांना धोरणात्मक विचार आणि नेतृत्वकौशल्यांचे प्रशिक्षण देणारा टाटा क्लासएजचा ‘प्रिन्सिपॉल लीडरशिप प्रोग्राम’ही सध्या डेल आरंभच्या नेटवर्कमध्ये असलेल्या शाळांत राबवला जाणार आहे.

या सहयोगाबद्दल टाटा क्लासएजचे मुख्य व्यावसायिक अधिकारी श्री. संजय राधाकृष्णन म्हणाले, “तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग झाले आहे अशा काळात, शालेय शिक्षणही त्यास सुसंगत असले पाहिजे. विद्यार्थी व शिक्षकांमध्ये वर्गाच्या पलीकडे संवाद घडला पाहिजे. शिक्षणात तंत्रज्ञानाचा अंतर्भाव झाल्यास संवादात्मक अध्ययन साधनांच्या मदतीने शिक्षण प्रक्रियेचा कायापालट होईल आणि या अध्ययनाची निष्पत्तीही अधिक चांगली असेल. डेलशी सहयोग केल्यामुळे आम्हाला डेल आरंभ शाळांपर्यंत पोहोचून आमची अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन आणि समाजाशी जोडून घेण्यासाठीची सर्वसमावेश सूचनाधारित सोल्युशन्स त्यांना देता येतील.”

डेल कंझ्युमर अॅण्ड स्मॉल बिझनेस इंडियाच्या मार्केटिंग संचालक रितू गुप्ता म्हणाल्या“उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये घोडदौड करणाऱ्या नवभारतासाठी आपले शिक्षक आणि विद्यार्थी शिक्षणातील तंत्रज्ञानाचे दूत झाले पाहिजेत. भविष्यकाळातील मनुष्यबळाला शिक्षण देणाऱ्या शिक्षकांमध्ये आत्मविश्वास आणि क्षमता बांधणी करण्यासाठी डेल आरंभ हा आमचा वायदा आहे.टाटा क्लासएजसोबत सहयोग हे या  दिशेने टाकलेले एक सकारात्मक पाऊल असून, समान लक्ष्याच्या पूर्तीसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. पर्सनल कम्प्युटर वापरण्याचे लाभ अद्याप बहुतेक भारतीयांना लक्षात आलेले नाहीत हे सत्य आहे. शिक्षणात तंत्रज्ञानाची संकल्पना अशा सहयोगांमुळे भक्कम होणार आहे हे महत्त्वाचे.”

टाटा क्लासएजची डिजिटल लर्निंग सोल्युशन्स आता भारतभरातील १,४०० शाळांमधील १००,०००हून अधिक शिक्षक वापरत आहेत. डेल आरंभचे हे दुसरे वर्ष असून, ७९ शहरांतील ४,०००हून अधिक शाळांतील ७५,००० शिक्षकांपर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे. पीसीच्या वापराबाबत शिक्षकांना मूलभूत आणि अद्ययावत प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा उपयोग ते सहज अध्ययन-अध्यापनाच्या अनुभवात करू शकतात.

टाटा क्लासएज विषयी:

वर्गातील अभ्यासक्रमावर आधारित उपक्रम आणि संवादात्मक तंत्रज्ञान यांचा प्रभावी मिलाफ साधून शिक्षकांना अधिक चांगल्या अध्यापनासाठी सक्षम करणारी कल्पक व सर्वसमावेशक सूचनाधारित सोल्युशन्स टाटा क्लासएज पुरवते. टाटा क्लासएजने स्वत:विकसित केलेले सूचनाधारित मार्गदर्शन आणि मल्टिपल लर्निंग एक्स्पीरियन्सेस (एमएलईएक्स™) प्रारूप विद्यार्थ्यांची सामाजिक,वैचारिक कौशल्ये वाढवणाऱ्या अनेकविध उपक्रमांचा वापर करते. यामध्ये महत्त्वपूर्ण विचार, सृजनशीलता, संघभावना, संशोधन प्रवृत्ती आणि संवाद कौशल्यांचा समावेश असतो. भारतभरातील १००,०००हून अधिक शिक्षकांनी आधीच टाटा क्लासएजची अध्यापन पद्धती स्वीकारली आहे.

डेलविषयी:

पुरस्कारप्राप्त डेस्कटॉप्स, लॅपटॉप्स, टू-इन-वन्स आणि थिन क्लायंट्स (हलक्या वजनाचे कम्प्युटर्स), शक्तिशाली वर्कस्टेशन्स, विशिष्ट वातावरणासाठी तयार केलेली दणकट उपकरणे, मॉनिटर्स, एण्डपॉइंट सुरक्षा सोल्युशन्स आणि सेवा यांसह डेल आजच्या कार्यालयाला सुरक्षितपणे जोडणीसाठी, उत्पादनासाठी आणि कोठूनही कुठेही सहयोगासाठी जे आवश्यक आहे ते सगळे पुरवते. डेल टेक्नोलॉजीजचा भाग असलेले डेल सर्व प्रकारच्या ग्राहकांना, संस्थांना १८० देशांत सेवा देत असून, उद्योगक्षेत्रातील सर्वाधिक सर्वसमावेशक आणि कल्पक अशी एण्ड-यूजर श्रेणी आहे.

डेल आरंभविषयी:

तंत्रज्ञानाची शक्ती वापरून अध्ययन अधिक प्रभावी करण्यासाठी विशेषरित्या विकसित केलेला आरंभ हा भारतभरात उपलब्ध असलेला पीसी आहे; डिजिटल भारतात ठामपणे पाय रोवण्यास पालक, शिक्षक आणि  विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी हा डिझाइन करण्यात आला आहे. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना परस्परांशी जोडून त्यांना पीसीचा उपयोग घरी व शाळेत दोन्ही ठिकाणी अधिक चांगल्या अध्ययनासाठी करण्यास शिकवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. डेलच्या आरंभ या शैक्षणिक उपक्रमांसाठीच्या पीसीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया भेट द्या- www.dellaarambh.com

अरूण वाकणकर मेमोरियल एटीएफ आशिया 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत दक्ष अगरवाल, श्रुती अहलावत यांना दुहेरी मुकुट

पुणे- पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे एमएसएलटीए केपीआयटी अरूण वाकणकर यांच्या स्मरणार्थ अरूण वाकणकर मेमोरियल एटीएफ आशिया 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात  श्रुती अहलावत हिने, तर मुलांच्या गटात दक्ष अगरवाल या खेळाडूंनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.

म्हाळुंगे बालेवाडी येथील एमएसएलटीए स्कुल ऑफ  टेनिस येथे पार पडलेल्या या स्पर्धेत  एकेरीत  मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत पाचव्या मानांकीत  दक्ष अगरवाल याने मानस धामणेचा 6-4,6-2 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. हा सामना 1तास 15मिनिटे चालला. सामन्यात 13वर्षीय दक्षने पहिल्या सेटमध्ये सुरेख सुरुवात करत मानसची तिसऱ्या व पाचव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट  6-4असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये दक्षने  पहिल्याच गेममध्ये  मानसची सर्व्हिस भेदली. या सेटमध्ये दक्षने वर्चस्व राखत तिसऱ्या, पाचव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट  6-2 असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. दक्ष हा विजडम शाळेत नववी इयत्तेत शिकत असून फर्ग्युसन कॉलेज येथे प्रशिक्षक संग्राम चाफेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे हे सहावे विजेतेपद आहे .  यावेळी दक्ष म्हणाला की, मी सामन्यात सुरूवातीपासुनच वर्चस्व राखले. 5-1 अशी आघाडी घेतल्यानंतर मानसने रॅली करण्यास सुरूवात केली. सामन्यावर नियंत्रण राखत मी पहिला सेट जिंकला. मानस तुलनेने कमी उंच असल्याने मी फायदा घेत खेळात बदल केले व सामना जिंकला.

मुलींच्या गटात अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित श्रुती अहलावट हिने चौथ्या मानांकित वेदा प्रापुर्नाचा 6-0,6-3असा पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना 1तास 15मिनिटे चालला. श्रुती हि द मौर्या स्कुलमध्ये सातवी इयत्तेत शिकत असून गुडगाव येथे ब्लिस टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक सौरभ शर्मा व विबोर शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

स्पर्धेतील विजेत्याला 300 एटीएफ गुण तर उपविजेत्या खेळाडूस 200 एटीएफ  गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अपर्णा वाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंदार वाकणकर, स्पर्धा संचालक कौस्तुभ शहा, वैशाली शेकटकर आणि संयोजन सचिव प्रवीण झिटे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:  अंतिम  फेरी:  14 वर्षाखालील मुले:

दक्ष अगरवाल(भारत)(5)वि.वि.मानस धामणे(भारत)6-4,6-2

   14 वर्षाखालील मुली:

श्रुती अहलावट(भारत)(3)वि.वि.वेदा प्रापुर्ना(भारत)(4)6-0,6-3

मलनिःस्सारण आराखडा :सल्लागार कंपनीसाठी पालिकेचीच ‘बनवा-बनवी ‘!

 समाविष्ट  गावांसाठी ‘पीएमआरडीए’चा 
आराखडा तयार  ;पण ९८ लाख रुपये  देण्याचा घाट    
 माजी उपमहापौर आबा बागुल
 यांच्याकडून चौकशीची मागणी 
पुणे : महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये मलनिःसारण  वाहिन्या टाकण्यासंदर्भात आराखडा तयार करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी काम दिलेल्या सल्लागार कंपनीने कोणते काम केले याची माहितीही  न घेता पुन्हा वाढीव दराने ९८ लाख रुपये देण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला आहे. विशेष म्हणजे पीएमआरडीएने आराखडा तयार केलेला असताना तो ताब्यात न घेता पालिका प्रशासन सल्लागार कंपनीवर का मेहरबान होत आहे असा प्रश्न करून तातडीने या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. 
 
यासंदर्भांत माजी उपमहापौर आबा बागुल यांनी म्हटले आहे कि, महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये मलनिःसारण  वाहिन्या टाकण्यात येणार आहे. याचा आराखडा तयार करण्याचे नियोजन सुरू असून, त्यासाठी सल्लागार कंपनीला 3 कोटी 93 लाख रुपये देण्यात येणार आहे. मात्र दोन वर्षांपूर्वी त्या सल्लागार कंपनीला काम देण्यात आले होते. याकडे दुर्लक्ष करून   त्यात आता  ९८ लाख रुपयांची वाढीव तरतुदीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. येत्या मंगळवारी (ता. 12) स्थायीच्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे. वास्तविक दोन वर्षांपूर्वी हे काम संबंधित कंपनीला दिले होते. त्यांनी काय केले ? कोणता फरक पडला ? याबाबत कोणतीही माहिती न घेता आणि  नवीन टेंडर न काढता परस्पर पुन्हा त्या कंपनीला ९८ लाख  रुपये वाढीव दराने देण्याचा प्रस्ताव हा बेकायदेशीर आहे. 
एकप्रकारे करदात्या पुणेकरांच्या रकमेची ही उधळपट्टी आहे. त्यातही ९८  लाख रुपयांची किंमत कशी काढली ? हा प्रश्नही उपस्थित होत आहे. मुळातपीएमआरडीएने समाविष्ट गावांच्या मलनिःस्सारण वहनाचा आराखडा आधीच तयार केलेला आहे;मग तो ताब्यात घेण्याऐवजी सल्लागार कंपनीला ९८ लाख रुपये देण्याचा घाट का घातला जात आहे ?हा प्रश्न दुर्लक्षून चालणार नाही. वास्तविक या गावांचा विकास आराखडा तयार नाही आणि पीएमआरडीएने मलनिःसारण वहन आराखडा तयार केलेला असताना पुन्हा जुन्या सल्लागार  कंपनीला ९८ लाख वाढीव तरतूद घाईगडबडीने देण्याचा प्रकार बेकायदेशीर आहे. त्यामुळे संबंधित  सल्लागार कंपनीने कोणते काम केले याचा अहवाल आणि पीएमआरडीएने केलेला सर्व्हे ताब्यात घेऊन त्याची सर्व माहिती मुख्यसभेसमोर  पालिका प्रशासनाने ठेवावी,असेही आबा बागुल यांनी नमूद केले आहे. 
 
‘अजब तुझे सरकार , अजब तुझा कारभार ‘  
 
नुकतेच पालकमंत्री गिरीश बापट यांनी  सल्लागार कंपन्या आणि त्यांच्या कामांबाबत इत्यंभूत माहिती पालिका प्रशासनाकडून मागवलेली असताना आता  हा प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे पालकमंत्री गिरीश बापट आता कोणती भूमिका घेणार ? असा सवालही माजी उपमहापौर आबा बागुल यांनी उपस्थित केला आहे. करदात्या नागरिकांच्या रकमेची अशा पद्धतीने उधळपट्टी होणार असताना त्यावर सत्ताधाऱ्यांचा अंकुश नाही हेच स्पष्ट होत असून ‘अजब तुझे सरकार , अजब तुझा कारभार ‘ असे म्हणण्याची वेळ ओढवली आहे अशी उपरोधिक प्रतिक्रियाही आबा बागुल यांनी दिली  

चाटेंच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी ; 99.80 टक्केचा विद्यार्थी प्रथम(व्हिडीओ)

पुणे- बारावीच्या निकालानंतर दहावीच्या परीक्षेत देखील आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवून चाटेंच्या  विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले .दहावीचा निकाल जाहीर होताच आज सातारा रस्त्यावरील चाटे क्लासेस येथे विद्यार्थी आणि पालक यांची एकच गर्दी उसळली , हातात पुष्पगुच्छ,पेढ्यांचा बॉक्स आणि चेहऱ्यांवर ओसंडून  वाहणारा आनंद यामुळे येथील वातावरण चैतन्यमय बनले होते. हि शेवटची परीक्षा नाही .. .. असे सांगत का होईनात पण सर आणि  शिक्षक देखील  पालक आणि विद्यार्थी यांच्या आनंदात सहभागी होताना दिसत होते . मोबाईलवर फोटो काढणे ,सेल्फी घेणे पेढे भरविणे या साऱ्यांचा या वातावरणात खच्चून समावेश होता .
चाटेंच्या समुहाने १०० टक्के यश संपादन केले आहे . अथर्व कुलकर्णी या विद्यार्थ्याला तब्बल 99.80टक्के गुण मिळाले तो या समूहातील पहिल्या क्रमांकाचा विद्यार्थी ठरला .तर सुतार जानव्ही ला ९८ टक्के गुण मिळाले . पालक ,विद्यार्थी शिक्षक अशा तिघांच्या मेहनतीचा हा त्रिवेणी संगम आहे , मात्र हि परीक्षा शेवटची नसली तरी ..पुढील परीक्षांना आपण लीलया पेलू ..असे आव्हान देणारे बळ निश्चित देवून जाणारी आहे असे सांगून प्रा. फुलचंद चाटे यांनी बदल्यात्या शिक्षण पद्धतीचा सामना करा आणि प्रगती करा अशा शुभेच्छ्या विद्यार्थ्यांना दिल्या . चाटे समूहाच्या प्रा . फुलचंद चाटे ,प्रा. विजय बोबडे ,बाप्पू काटकर ,समर जमादार,रत्नाकर सोनवणे आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छ्या दिल्या .

 

कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

पुणे :-  बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य व्यवस्थित राहावे यादृष्टीने  पुणे महानगपालिका आणि क्रेडाई पुणे मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने गोयल गंगा टॉवर्स मार्केटयार्ड या प्रकल्याच्या साईट वरील कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या  आरोग्य तपासणी शिबिरात १५० हुन अधिक बांधकाम कामगारांची तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणीबरोबरच कामगारांना धनुर्वाताचे इंजेक्‍शन आणि रक्तदाब तपासणी आणि  इतर अजून तपासण्या करण्यात आल्या. याशिवाय पावसाळ्यात बळावणाऱ्या रोगांची संख्या लक्षात घेवून डेंगू, मलेरिया सारख्या इतर रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही याविषयी देखील मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

क्रेडाई पुणे मेट्रो, पुणे महापालिका आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होत आहे. गोयल गंगा डेव्हलपर्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक अतुल गोयल,  संचालक  अमित गोयल, क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ. दिवाकर अभ्यंकर, क्रेडाई पुणे मेट्रोच्या कामगार कल्याण समितीचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ आणि क्रेडाई पुणे मेट्रो महिला शाखेच्या निमंत्रक अर्चना बडेरा, कामगार कल्याण समितीचे सदस्य पराग पाटील, मुकेश गाडा, समीर पारखी, गोयल गंगा डेव्हलपर्सच्या मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख उदय पाटील, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत, महापालिकेचे समन्वयक अधिकारी विनोद जाधव व राष्ट्रीय शहर आरोग्य अभियानाच्या सहसचिव डॉ. केतकी घाटगे यावेळी उपस्थित होते.

यावेळी अतुल गोयल म्हणाले कि, आजच्‍या धकाधकीच्‍या युगात वाढते औद्योगिकरण व त्‍यांच्‍याशी संबंधित शारीरिक व्याधी वाढत आहेत त्यामुळेच वेळीच याला प्रतिबंध घातला गेला पाहिजे. यासाठी आरोग्य तपासणी अत्यंत आवश्यक आहे.

देशाच्या प्रगतीत कामगारांचे मोलाचे योगदान आहे.त्यासाठी त्याचे आरोग्य कसे सुदृढ राहील याची काळजी घेणे हि आमची जबाबदारी आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ कामगारांपर्यंत पोहचविण्यात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देखील अमित गोयल यांनी दिले.

दहावीचा निकाल ८९. ४१ टक्के …कोकणाची भरारी ९६ टक्के ..पुणे ९२ तर मुंबई ९० टक्के

0

पुणे –

मार्चमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (शुक्रवार, ८ जून) दुपारी १ वाजता जाहीर झाला आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा लवकर निकाल जाहीर होत असून उद्यापासून (९ जून) विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तर पत्रिकांच्या छायाप्रतींसाठी अर्ज करता येईल. राज्याचा निकाल ८९. ४१ टक्के लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात अर्धा टक्क्याने वाढ झाली आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला असून कोकणातील ९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विभागनिहाय दहावीच्या निकालाची टक्केवारी 

  • मुंबईः  टक्के ९०.४१ %
  •  कोकणः  टक्के ९६.०० %
  • पुणेः  टक्के ९२.०८ %
  •  नाशिकः  टक्के ८७.८२ %
  •  नागपूरः  टक्के ८५.९७ %
  • कोल्हापूरः  टक्के ९३.८८ %
  • अमरावतीः  टक्के ८६.४९ %
  • औरंगाबादः  टक्के ८८.८१ %
  • लातूरः  टक्के ८६.३० %

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ मंडळांमार्फत मार्च २०१८ मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.  परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या किंवा श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना जुलैमध्ये फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे.

राज्य मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.  मुलींनी यशाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९१.९७ टक्के तर मुलांची ८७.२७ टक्के आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी दहावीची लगेच १७ जुलै २०१८ पासून फेर परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेला अनुत्तीर्ण विद्यार्थां बरोबरच श्रेणी सुधार करू इच्छिनाऱ्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा देता येणार आहे. मागील वर्षी दहावीचा निकाल ८८.७४ टक्के लागला होता, त्यातुलनेत यंदाच्या निकालात ०.६७ टक्क्यांची वाढ झाली आहे. राज्यातून १६ लाख २८ हजार ६१३ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.

या वेबसाइटवर पाहता येणार निकाल

www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
असा पाहा निकाल?
दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील. समजा तुमचा नंबर P123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात P123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.