पुणे: ‘हिंदी गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी जीवनातील सर्व भावभावना, ‘मूडस्’ नुसार उत्कट गीतलेखन केले, त्यामुळे त्यांची गीते सजली आणि लोकप्रिय ठरली’ असे उद्गार हिंदी भाषेच्या अभ्यासक प्रा.शलाका गोळे यांनी काढले.
‘रसिक मित्र मंडळ’आयोजित‘एक कवी -एक भाषा’ मासिक व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. हे व्याख्यान शुक्रवारी सायंकाळी श्रमिक पत्रकार भवन येथे झाले. ‘रसिक मित्र मंडळ’चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला यांनी स्वागत केले. ‘एक कवी -एक भाषा’ व्याख्यानमालेचे हे 56 वे पुष्प होते. अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश कामत होते. ‘रसिक मित्र मंडळ’च्या विश्वस्त डॉ. शशीकला शिरगोपीकर या उपस्थित होत्या.
प्रा.शलाका गोळे म्हणाल्या ‘राजेंद्र कृष्ण यांनी सर्व छटा असलेली गीते लिहिली, त्यात देशभक्तीपर गीतांचाही समावेश होता. ‘जहाँ डाल डाल पर सोने की चिडियाँ करती है बसेरा !’ ,‘सुनो सुनो बापूजी की अमर कहानी’ ही देशभक्तीपर गीते गाजली. ‘कौन आया मेरे मन के द्वारे’, ‘दो घडी वो पास आ बैठे, हम जमाने से दूर जा बैठे’ अशी हळूवार गीते, ‘इना मिना डिका’, ‘मेरे पिया रंगून’ यासारखी खेळकर गीतेही त्यांनी लिहिली. मात्र खेळकर शब्दांमुळे हिंदी गीतसाहित्याची उंची कमी केल्याचा आरोपही त्यांच्या वाट्याला आला.
राजेंद्र कृष्ण यांच्या आठवणींना उजाळा देताना डॉ.प्रकाश कामत म्हणाले,‘ 2018 हे वर्ष राजेंद्र कृष्ण यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. अशावेळी या महान गीतकाराच्या शब्दांना उजाळा दिला पाहिजे.
पत्रकार संघात झालेल्या या व्याख्यानाला रसिकांची मोठी उपस्थिती होती