पुणे-आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने पुण्यातील गेली ३० वर्षे संगीत क्षेत्रात कार्यरत
असलेल्या व स.प.महाविद्यालय, पुणे येथून प्राध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झालेल्या गायिका सुजाता सोमण व
शिष्या यांच्या सुगीता भक्ती मंडळातर्फे भक्तिमय मैफल दिमाखदारपणे सादर करण्यात आली. ही मैफल श्रीमंत
दगडूशेठ दत्त मंदिर येथे उभारण्यात आलेल्या मंडपात पार पडली.
कबीरदास यांच्या गुरूंचे वर्णन करणाऱ्या दोह्यांनी मैफलीस प्रारंभ झाला. त्यानंतर गणराज गजानन
आवोनी, शंभो शंकरा, गुरुदेवा, सुंदर माझं जातं गं अशा गणपती, विठ्ठल यांचे वर्णन करणाऱ्या भक्तिमय रचना
तसेच आईभवानी, ताकधीनाधीन बाजे बाजा, स्मराहो दत्तगुरू दिनरात या रचनांही उत्तम सादर झाल्या. या
कार्यक्रमामध्ये आपल्या आवाजानी सोमण यांच्या शिष्या सुषमा राठी, शीला लिंगसूर, मालती जोशी, शोभा
शहा, उर्मिला प्रधान, कुंदा कुलकर्णी, नंदा कांबळे सर्वांना मंत्रमुग्ध केले.
सुषमा राठी, शीला लिंगसूर यांनी गुरुंवरील इंदुमती जोशी रचित रचना सादर करून सर्वांना जागीच
खिळवले. या मैफलीस हार्मोनियमची साथ सुजाता सोमण, तबला तन्मयी मेहेंदळे अशी लाभली होती.
कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिर एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तीगीत कार्यक्रम संपन्न
सकल मराठा समाजाशी सरकार सदैव चर्चेस तयार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 25 : सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यात काढण्यात आलेल्या शांततापूर्ण मोर्चांनंतर, राज्य सरकारने त्याची दखल घेत विविध प्रकारचे निर्णय घेतले. आजही सकल मराठा समाजाशी चर्चा करण्यास राज्य सरकार तयार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनात म्हटले आहे.मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतले. विशेषत: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार पूर्णत: कटिबद्ध आहे. त्यामुळेच राज्य सरकारने यासंदर्भातील कायदा तयार केला. परंतु, उच्च न्यायालयाने त्या कायद्याला स्थगिती दिली. त्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, तेथे राज्य सरकारला उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती मिळाली नाही. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न हा उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तथापि, यासंदर्भात संवैधानिक कारवाई पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने मागासवर्ग आयोग स्थापन केला आहे. त्या माध्यमातून कायद्याच्या कक्षेत संवैधानिक प्रस्ताव तयार केला जात आहे. सध्या हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे राज्य सरकार आपल्या अखत्यारितील सर्व बाबी पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे.
यासोबतच छत्रपती राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या माध्यमातून सुमारे 602 अभ्यासक्रमांसाठी 50 टक्के शैक्षणिक शुल्काचा परतावा राज्य सरकार देत आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ झालेला आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारण्याचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, त्यापैकी दोन वसतिगृहांचे काम अंतिम टप्प्यात आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुण उद्योजकांना व्याज परतावा तत्वावर सुलभ कर्ज देणारी योजना सुरू करण्यात आली आहे. या सर्व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती तयार करून त्याला सर्व अधिकार बहाल करण्यात आले आहेत. यावरूनच राज्य सरकारची याबाबतची भूमिका अतिशय स्पष्टपणे अधोरेखित होते.
गेल्या काही दिवसांपासून होणारी आंदोलने, आत्महत्या किंवा आत्महत्येचे प्रयत्न या सर्व बाबी अतिशय दु:खदायी आहेत. राज्य सरकारचे असे स्पष्ट मत आहे की, या योजनांसंदर्भात किंवा इतर बाबींमध्ये कोणत्याही त्रुटी आढळून येत असतील, तर त्या चर्चेच्या माध्यमातून दूर करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. मेगाभरतीच्या संदर्भात जो संभ्रम सकल मराठा समाजाच्या मनात निर्माण झाला आहे, त्याही बाबतीत चर्चा करून सर्वमान्य असा उचित निर्णय घेणे शक्य आहे. त्यामुळे हिंसा किंवा आंदोलनाचा अवलंब न करता शासनाशी चर्चा करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
काही राजकीय नेते परिस्थिती आणखी चिघळवून त्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांनी महाराष्ट्राच्या हितार्थ व्यापक भूमिका घेऊन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी हातभार लावावा, असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.
शुक्रवारी चंद्रग्रहणाचे वेध दुपारी १२ पासून -दुपारी १२पूर्वी गुरूपूजन कराः पं.वसंतराव गाडगीळ
काकासाहेब शिंदे मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा – संभाजी ब्रिगेड (व्हिडीओ)
पोलीस उपअधीक्षकाची पत्रकारांवर अरेरावी
पुणे-मुंबई महामार्गावरील एका घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या ‘एमपीसी न्यूज’च्या वार्ताहरांसोबत पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस उपअधीक्षक गणपतराव माडगूळकर यांनी अरेरावी केली. हा प्रकार सोमवारी (दि. 23) दुपारी चारच्या सुमारास पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर भक्ती-शक्ती चौकाजवळ पुणे गेट हॉटेलसमोर घडला.
सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास दहा ते पंधरा जणांनी अचानक ‘चक्का जाम ‘ म्हणत जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील मालवाहतूक करणारी वाहने रोखली. यावेळी वाहन चालकांच्या संमतीशिवाय वाहनांची कागदपत्रे तसेच मालाचे चलन यांसारखी महत्वपूर्ण कागदपत्रे टोळक्याने जबरदस्तीने नेली. याबाबत स्थानिक नागरिकांनी येथील ‘एमपीसी न्यूज’च्या वार्ताहरांना फोन करून माहिती दिली. या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी ‘एमपीसी न्यूज’चे दोन प्रतिनिधी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी पोलीस उपअधीक्षक गणपतराव माडगूळकर आणि त्यांची टीम घटनास्थळी होती. त्यांच्या कामात कोणताही अडथळा न आणता ‘एमपीसी न्यूज’च्या छायाचित्रकाराने घटनास्थळाचे फोटो काढले.
यावर पोलीस उपअधीक्षकांनी वार्ताहरांना फोटो का काढले, असे खडसावून विचारले. त्यावर ‘एमपीसी न्यूज’च्या प्रतिनिधीने आपली ओळख सांगितली. वाहने अडविल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्याचे बातमीसाठी फोटो काढल्याचे स्पष्ट केले.
छायाचित्रकारांच्या या उत्तरावर चिडलेल्या पोलीस उपअधीक्षकांनी ‘फोटो काढताना मला का विचारले नाही’, म्हणून दरडावले. वाहनांच्या रांगा लागल्या आहेत, त्यामुळे फोटो काढले, असे एमपीसी न्यूजच्या छायाचित्रकाराने सांगताच त्यावर ‘तू मला शिकवू नको. विचारल्याशिवाय फोटो काढायचे नाहीत.’, असे पोलीस उपअधीक्षकांनी पुन्हा दरडावले.यानंतर ‘एमपीसी न्यूज’चे वार्ताहर आणि छायाचित्रकार रस्त्याच्या बाजूला वाहनचालकांशी संवाद साधत असताना देखील, ‘इथे काय करतोय. चल बाजूला हो.’ असे म्हणत वाहनचालकांशी संवाद साधण्यासही मनाई केली.
पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिका-याने वार्तांकनाचे कर्तव्य बजावणा-या पत्रकारांना अशा पद्धतीची अरेरावी केल्याबद्दल पत्रकारांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यासंदर्भात सर्व पत्रकार मिळून पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांना समक्ष भेटून तक्रार करणार आहेत.
‘फेमिना पुणेज मोस्ट पॉवरफुल २०१८-२०१९’संस्मरणीय रात्र
पुणे-फेमिना या महिलांसाठीच्या आघाडीच्या ब्रँडने देशातील सर्वोत्तम आणि चमकदार व्यक्तिमत्वांनी साध्य केलेले यश आणि दिलेले योगदान साजरे करण्यासाठी “फेमिना पुणेज मोस्ट पॉवरफुल २०१८-२०१९’ या सोहळ्याचे आयोजन केले होते. युएसके फाउंडेशनचे पाठबळ असलेला हा प्रतिष्ठेचा कार्यक्रम आयक्यू हयात रिजन्सी हॉटेल, पुणे येथे नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या श्रीमती अमृता फडणवीस यांनी एका अतिशय खास प्रकारे तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल पुस्तकाचे अनावरण केले. शहरातील ७२ नामांकित नावांचा या पुस्तकात समावेश आहे. या अनावरण सोहळ्यानंतर फेमिनातर्फे मनोरंजन, व्यवसाय, फॅशन आणि अन्य क्षेत्रांतील प्रेरणादायी व प्रभावशाली व्यक्तिमत्वांचा गौरव करण्यात आला. एकमेकांच्या क्षेत्रात प्रत्येकाने साध्य केलेले यश साजरे करण्यासाठी शहरातील एक से एक निवडक आणि नामांकित व्यक्ती एकाच छताखाली एकत्र आल्यामुळे, कार्यक्रमाची रात्र अतिशय संस्मरणीय बनली.
महिंद्रातर्फे फुरिओचे अनावरण, इंटरमीडिएट कमर्शिअल व्हेइकल्सची (आयसीव्ही) नवी जागतिक दर्जाची रेंज
चाकण: 20.7 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या, महिंद्राच्या ट्रक अँड बस डिव्हिजनने (एमटीबीडी) आज फुरिओ या इंटरमीडिएट कमर्शिअल व्हेइकल्सच्या (आयसीव्ही) नव्या रेंजचे अनावरण केले. कंपनीने फुरिओद्वारे आयसीव्ही श्रेणीमध्ये प्रवेश केला आहे आणि महिंद्रा ही परिपूर्ण रेंज असलेली कमर्शिअल व्हेइकल कंपनी बनवण्यासाठी कंपनी सज्ज झाली आहे.
महिंद्राचे 500 हून अधिक इंजिनीअर, 180 पुरवठादार यांचे एकत्रित प्रयत्न आणि 600 कोटी रुपयांची गुंतवणूक यातून महिंद्रा फुरिओ तयार झाली आहे.
यानिमित्त बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोएंका यांनी सांगितले, “आम्ही नव्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी आणि परिपूर्ण रेंज असलेली कमर्शिअल व्हेइकल कंपनी बनण्यासाठी सज्ज असल्याने, आयसीव्ही ट्रकची फुरिओ ही नवी रेंज दाखल करणे, हा आमच्या ट्रक व बस व्यवसायासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. पिनइन्फारिनापासून प्रेरित डिझाइन असलेली फुरिओ रेंज आमच्यासाठी व खरेतर या उद्योगासाठी मोठे परिवर्तन आणणार आहे. तसेच, नव्या ट्रकमध्ये अतिशय सुरक्षित, अत्यंत अर्गोनॉमिक व आरामदायी केबिन असणार असून, त्यामुळे नवी प्रमाणके निर्माण केली जाणार आहेत. ब्लेझो एचसीव्ही सीरिजप्रमाणे, आयसीव्हीची फुरिओ रेंज कामगिरी, अर्निंग्स या बाबतीत नवे बेंचमार्क निर्माण करणार आहे आणि ग्राहकांना उत्तम मूल्ये देणार आहे.”
आयसीव्ही रेंज दाखल करण्याबद्दल बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष राजन वधेरा यांनी सांगितले, “ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादाच्या अनुषंगाने महिंद्रा फुरिओची निर्मिती केलेली असल्याने, फुरिओ हे भारतीय ग्राहकांसाठी सर्वोत्तम उत्पादने तयार करण्याच्या महिंद्राच्या क्षमतेचे प्रतिक आहे. महिंद्रासाठी व्हॉल्युम व बाजारहिस्सा यामध्ये लक्षणीय वाढ करणारी ब्लेझो ही महिंद्राची अतिशय यशस्वी ट्रकची एचसीव्ही रेंज दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर फुरिओ दाखल करण्यात आली आहे. आयसीव्हीची ही नवी रेंज दाखल केल्याने, एमटीबी ही भारतातील सीव्ही क्षेत्रातील परिपूर्ण ट्रकिंग सोल्यूशन देणारी कंपनी ठरणार आहे.”
महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या महिंद्रा ट्रक व बस व कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट डिव्हिजन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद सहाय यांनी सांगितले, “उच्च अर्निंग्स, वापरण्याचा कमी खर्च, उत्तम सुरक्षितता, सुधारित अर्गोनॉमिक्स, आरामदायी राइड व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मालकीचा जागतिक दर्जाचा अनुभव देणारा आदर्श ट्रक भारतातील आयसीव्ही ग्राहकांना हवा आहे. आमची नवी फुरिओ रेंज याच घटकांवर आधारित आहे आणि लवकरच ती आयसीव्ही ग्राहकांची पसंती मिळवेल, असा विश्वास आहे. महिंद्रा ट्रक अँड बस डिव्हिजनमध्ये आम्ही आमच्या पोर्टफोलिओमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत आणि ग्राहकांना विशिष्ट आश्वासने दिली आहेत, यामुळे या क्षेत्रापेक्षा अधिक वेगाने प्रगती करणे आम्हाला शक्य झाले आहे. आगामी काळात आम्ही आयसीव्ही क्षेत्राच्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीमध्ये नवे बदल आणणार आहोत आणि या श्रेणीमध्ये लक्षणीय हिस्सा साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत.”
फुरिओमुळे उच्च मायलेज, कमी मेंटेनन्स व भार वाहण्याच्या वाढलेल्या क्षमतेसाठी अधिक ताकद यामार्फत ऑपरेटिंग अर्गोनॉमिक्समध्ये वाढ होईल, अशी अपेक्षा आयसीव्ही वाहतूकदारांना आहे. हे लक्षात घेता, इंधनाचा सर्वोत्तम वापर करण्याच्या दृष्टीने, नव्या एमडीआय टेक, आयसीव्ही इंजिनामध्ये महिंद्राचे फ्युएलस्मार्ट तंत्रज्ञान समाविष्ट असेल. गाडीतील वजन व रस्त्याची स्थिती यानुसार इंधनाचा सर्वोत्तम वापर करण्याच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान म्हणजे मल्टिमोड स्विचेस आहे, हे मुख्य वैशिष्ट्य आहे. याव्यतिरिक्त, एमडीआय टेक तंत्रज्ञान वजनाने हलके असेल व लो फ्रिक्शन असेल, यामुळे कार्यक्षमता आणखी वाढेल. हे इंजिन लो आरपीएमला उच्च टॉर्क देईल व त्यामुळे शहरातील व आंतर-शहरे वाहतुकीमध्ये उच्च कामगिरी करेल. वाहन विकसित करत असताना, इंजिन टेस्टिंगमध्ये भिन्न टेस्ट सायकल असलेले प्रत्येकी 8,000 तासांचे दोन टप्प्यातील अक्सिलरेटेड टेस्टिंग केले गेले.
बारवी धरणातील पाण्यामुळे आपत्ती ओढवू नये यासाठी विशेष खबरदारी – उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या पावसाळ्यात बारवी धरणासंदर्भात विशेष खबरदारी घेतली आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे आपत्ती ओढवू नये यासाठी ओव्हर फ्लो होण्याआधीच ( Hydro Generation ) जलविद्युत निर्मितीसाठी पाण्याचा वापर केला, त्यामुळे गावांच्या दिशेने होणारा पाण्याचा फुगवटा कमी झाला आणि रस्ते पाण्याखाली जाण्याचे टळले आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
श्री. देसाई म्हणाले, कोळेवडखळ या गावाला असलेला पुराच्या पाण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन इथे होड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पुराच्या पाण्याच्या अभ्यासासाठी पहिल्यांदाच ड्रोनने सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. रात्रंदिवस सतर्क राहणारे पथक रेस्क्यू टीम (Rescue Team) कार्यरत आहे. आपत्कालीन मदतीसाठी टोल फ्री क्रमांक 180 023 343 96 कार्यान्वित करण्यात आला आहे. तर, मुरबाड येथे आपत्कालीन केंद्रही तयार करण्यात आले आहे. या साठी dmcellbarvidam@midcindia.org या ई मेल पत्त्यावर संपर्क साधता येणार आहे.
बारवी धरणातून पाणी ओव्हरफ्लो झालेल्या अंबरनाथ तालुक्यातील अनसोली, राहतोली, चोण, सागाव, पाटीलपाडा, चंदनपाडा, पादिरपाडा, पिंपळोली, करंद या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय तोंडली, काचकोली व संलग्न पाडे, मोहघर, कोळेवडखळ, मानिवली, सुकाळवाडी हे अतिबाधित होत असून येथे रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणीही विशेष काळजी घेण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात नदीच्या बाजूस तात्पुरते बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत.
तोंडली येथील 286 कुटुंबाना खावटी खर्च देण्यात आला आहे. यात एकवेळ खर्च म्हणून रु.10 हजार, किराणा मालासाठी रु. 5 हजार आणि मिनरल वॉटरसाठी रु. 2 हजार 790 धनादेशाद्वारे देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे काचकोली पाडयांसाठीही खावटी खर्च देण्यात आला आहे. जुलै महिन्याचा हा खर्च अदा करण्यात आला असून आवश्यकता भासल्यास ऑगस्ट व सप्टेंबर पर्यंत हा खावटी खर्च देण्यात येईल.
पूरग्रस्त घरातील 20 परिवारांना मुरबाड येथे भाडयाच्या घरात हलविण्यात आले आहे. तर 45 लोकांना लोवर तोंडली येथील तात्पुरत्या शेडमध्ये हलविण्यात आले आहे. तसेच तेथील अडचणींचा विचार करता व लोकांच्या मागणीनुसार त्यांना तोंडली गाव येथे नवीन 45 शेड बांधून स्थलांतरित करण्यात येणार आहे. या शेडचे बांधकाम सुरु आहे. त्याचप्रमाणे काचकोली येथे लोकांच्या मागणीनुसार 19 शेडचे बांधकाम सुरु आहे.
इतर भागातील लोकांसाठी तात्पुरते शेडस् उभारण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी वीज, डी.जी.सेट, पिण्याचे पाणी आणि वाहनांची 24 तास सज्जता ठेवण्यात आली आहे. तोंडली व कोचकोली येथील उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या शेडच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आलेले आहे. त्या अंतर्गत त्यांना शौचालय व बाथरुमची व्यवस्था करण्यात येत आहेत. काचकोली येथील जांभुळवाडी व कोळेवडखळ येथे पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या सर्व मोहिमेत जिल्ह्याची महसूल यंत्रणा संपूर्ण सहकार्य देत आहे.
क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारशींची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले
मुंबई : मातंग समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी गठीत केलेल्या क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारशींची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज दिले.
क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. बडोले म्हणाले, क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारशी या मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहेत. बेरोजगार तरुणांना रोजगार, मातंग समाजातील महिला बचत गट स्थापन करण्यासाठी विशेष प्रोत्साहन, दारिद्रय निर्मूलन करण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम, सरकारी स्वस्त धान्य दुकान, रॉकेल, गॅस व पेट्रोल एजन्सी मातंग समाजातील बेरोजगार तरुणांना विशेष प्राधान्यक्रमाने देण्यात यावे. मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्यात पुणे व औरंगाबाद येथे वसतीगृह, पाच ठिकाणी निवासी शाळा स्थापन करण्याबाबतची कार्यवाही त्वरित करण्याचे निर्देश यावेळी श्री. बडोले यांनी दिले.
मृत नद्यांना पुनर्जीवित करा – श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड यांची विनंती
पुणे: “दिवसंदिवस वाढत जाणाऱ्या मृत नद्यांना पुनर्जीवित केले नाही तर भविष्यात मानव जातीला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. प्रदुषित पर्यावरणसारखी समस्या २०२५ पर्यंत प्रखरतेने जाणवेल. त्यासाठी प्रत्येक वारकऱ्यांने घरातील जेवढे सदस्य आहेत त्यांच्या नावे दोन दोन झाडे लावावीत . अशी कळकळीची विनंती बडोदा संस्थानचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे पंतू श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड यांनी वारकऱ्यांना केली.
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी देहू पंढरपूर परिसर विकास समितीच्या वतीने ‘पवित्र चंद्रभागे’ची आरती या नित्य उपक्रमाचा एक भाग म्हणून कार्तिक शुद्ध एकादशीच्या पूर्व संध्येला भक्त पुंडलिक घाटावर श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड यांच्या हस्ते चंद्रभागेची आरती संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, सौ. उर्मिला विश्वनाथ कराड, सौ.उषा विश्वनाथ कराड, सौ. ज्योती कराड-ढाकणे, प्रा. स्वाती कराड-चाटे, डॉ. सुचित्रा कराड-नागरे, मुंकुंद चाटे, अजित गोसावी, सरकार निंबाळकर, डॉ. सुदाम महाराज पानेगावकर, दत्तात्रय बडवे हे उपस्थित होते.
श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड म्हणाले,“ वारकऱ्यांनो दोन्ही हातांनी झाडे लावा तसेच पाण्याची बचत मोठ्या प्रमाणात करा. दिवसंदिवस कमी होत जाणारी पाण्याची पातळी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करावी लागेल. त्यासाठी सरकारद्वारा चालविण्यात येणाऱ्या पाणतळ योजना, सिंचन योजना शेत तळ सारख्या आदी योजना अमलात आणावी. पाझर तलावांची संख्या वाढवून मृत नद्यांना पूनर्जिवीत करा. पंढरीच्या तीर्थ क्षेत्राला आता ज्ञान तीर्थ क्षेत्र बनविण्यासाठी वारकऱ्यांनी नद्यात घाण व कचरा टाकू नये. यासाठी सहकार आणि ऐक्याशिवाय हे उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून समाजातील माणसाचे मनोबल बदलण्याची आवश्यकता आहे. ”
प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“नमामि गंगे सारखा उपक्रम सुरू करून सरकारने अतिशय महत्त्वाचा उपक्रम राबविला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नद्यांना पुनर्जीवन मिळेल. त्यामुळे यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. या ठिकाणी उत्तम प्रकाराच्या घाटांची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा आहे. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून ते ज्ञानपंढरी म्हणून ओळखले जाते. भविष्यात वारकरी संप्रदाय जगाला सुख समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल. ”
डॉ.एस.एन.पठाण म्हणाले,“सृष्टीमधील अनेक नद्या मृत झाल्या आहेत. नदीमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढायला हवे. यात कमीत कमी ९पीपीएम ऑक्सिजनची आवश्यकता असते. तसे पाहिले तर २० पीपीएमच्या वर ऑक्सिजनची गरज आहे. परंतू बऱ्याच नद्या या आता मृतावस्थेतील झाल्या आहेत. भविष्यात ही समस्या उग्र रूप धारण करेल त्यामुळे २०७० पर्यंत आम्हाल प्यायला पाणी व ऑक्सिजन मिळणार नाही. या पासून स्वतःला व येणाऱ्या पिढीला सुरक्षित करण्यासाठी सर्व वारकऱ्यांना संकल्प घ्यावा लागेल की नदी प्रदुषण कमी करू. सरकारने नमामि गंगे सारखा उपक्रम सुरू केला पण त्याला हवी तेवढी गती मिळाली नाही. त्यासाठी सर्वांना एकत्रित होऊन कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.”
शालिग्राम खंदारे यांनी सूत्रसंचालन केले. तसेच, आभार मानले.
ओतुरमध्ये कडकडीत बंद ,सात जणांना पोलिसांकडुन नोटीस
मराठा आंदोलन..काकासाहेबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, खासदार खैरेंना जमावाने पिटाळून लावले
कायगाव टोका – काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी ‘काकासाहेब अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. अंत्यविधीला तब्बल 800 पोलिसांचा बंदोबस्त होता. पंचक्रोशीतील हजारोंच्य संख्येने गावकरी हजर होते. या वेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. औरंगाबाद-नगर महामार्ग बंद करण्यात आला आहे. हजारो मराठा समाजाचे कार्यंकर्ते रस्त्यावर ठिय्या मांडून आहेत.
खैरेंना मज्जाव, 150 ते 200 जणांनी लावले पिटाळून, पोलिस संरक्षणात खासदार परतले
अंत्यविधी कार्यक्रमासाठी खासदार चंद्रकांत खैरे, तसेच सुभाष झांबड आले, परंतु संतप्त जमावाने त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यांना अंत्यविधीस्थळी प्रवेशापासून मज्जाव करण्यात आला. ‘गो बॅक- गो बॅक’ अशा घोषणाबाजी सुरू झाली. जवळजवळ दीडशे ते 200 जणांचा जमाव खैरेंवर चालून गेला. त्यांच्या गाडीलाही धक्काबुक्की केली. खैरेंना पोलिस तसेच एसआरपीएफच्या संरक्षणात माघारी जावे लागले.
संतोष मानेंना किरकोळ दुखापत
दरम्यान, या गोंधळात माजी आमदार अण्णासाहेब माने यांचा मुलगा संतोष माने हा किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
अंबासाहेब दानवे, झांबड उपस्थित
अंत्यविधीच्या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी आमदार अण्णासाहेब माने, माजी सभापती संतोष जाधव, कृष्णा पाटील डोणगावकर यांच्यासह अनेक नेते-पदाधिकारी उपस्थित आहेत. तसेच काकासाहेब शिंदे यांच्या आणि आजूबाजूच्या गावांतील नागरिक हजारोंच्या संख्येने दाखल झाले आहेत.
सकाळपासून हजारोंची गर्दी
‘काकासाहेब शिंदे अमर रहे’च्या घोषणा पुलावर सुरू आहेत. या पुलावर हजारोंच्या संख्येने आंदोलक जमले. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे.
पोलिसच म्हणाले, उड्या मारा , आंदोलकांचा गंभीर आरोप
दरम्यान, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच काकासाहेब शिंदेंचा बळी गेल्याचा आरोप प्रदीप निरफळ आणि सुदाम मंडलिक यांनी केला. हे दोघेही काल घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी दिव्य मराठीला माहिती दिली की, काल पोलिसच आंदोलकांना उड्या मारा म्हणत होते. यावर खरंच काकासाहेब याने गोदावरीत उडी मारल्यावर त्याला वाचवण्यासाठी इतर कार्यकर्त्यांनी वाचवण्यापासून रोखले. पोलिस म्हणत होते, तुम्ही उडी घेऊ नका, इतर लोक त्याला वाचवतील.
मनसे कार्यकर्ते अण्णासाहेब जाधव यांनीही पोलिसांवर आरोप केला. पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळेच काकासाहेब शिंदेंचा बळी गेल्याचे ते म्हणाले.
पोलिसांची अतिरिक्त कुमक आंदोलनस्थळी दाखल
तथापि, डीएसपी उज्ज्वला बनकर यांनी माहिती दिली की, उस्मानाबाद आणि बीडवरून पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलावलेली आहे. यात 4 डीवायएसपी, 2 अॅडिशनल एसपी आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह 100 पोलिस कर्मचारी व एसआरपीच्या 3 तुकड्या आंदोलनस्थळी दाखल आहेत.
आंदोलनात पेड लोकांची घुसखोरी; चंद्रकांत पाटील
मुंबई-मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा संघटनांनी आंदोलन सुरु केले असतानाच ‘या आंदोलनात काही पेड लोक घुसली असून हे आंदोलन बदनाम करुन महाराष्ट्र अस्थिर करण्याचा त्यांचा डाव आहे’, असा आरोप महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.
राज्यात मराठा संघटनांनी आरक्षणाच्या मागणीवरुन आंदोलन सुरु केले असून या आंदोलनात सोमवारी औरंगाबादजवळ काकासाहेब शिंदे यांचा मृत्यू झाला. यानंतर आंदोलन चिघळले असून मंगळवारी राज्यात बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. चंद्रकांत पाटील म्हणाले, आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काम केले आहे. आता हा मुद्दा न्यायालयाच्या अखत्यारित आहे. मंत्र्यांच्या गाड्या फोडून आरक्षण मिळणार असेल तर गाड्या फोडा. पण शेवटी यात समाजाचे मोठे नुकसान होणार आहे. काही पेड लोक या आंदोलनात घुसली असून त्यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, असा आरोप त्यांनी केला.
राज्यात चार वर्षे उत्तम कारभार चालला. शेतकऱ्यांना कर्जमाफीही झाली. पण आता निवडणुका जवळ येताच हिंसक आंदोलनाचे प्रकार वाढतील. आता जे खरे आंदोलक आहेत, त्यांनी समाजकंटकांना खड्यासारखे बाजूला काढावे, असे आवाहन त्यांनी केले. सरकार आंदोलकांशी चर्चा करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे या तरुणाला जीव गमवावा लागला, ही दुर्दैवी गोष्ट आहे. पण अशा मार्गाने प्रश्न सुटणार नाही. जे आपल्या हातात नाही, त्यासाठी आंदोलन करुन उपयोग नाही. बंदमुळे पंढरपूरमध्ये ७ लाख वारकरी अडकून पडले आहेत, याला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी विचारला.
पुण्यातील लक्ष्मी रोड वर मराठा यल्गार ..
पुणे- आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला असताना पुण्यात मराठा संघटनेच्या आणि समाजाच्या विविध स्तरावरील नागरिकांनी लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणूक काढली आणि यावेळी पोलीस बंदोबस्तात .. लक्ष्मी रोड बंद हि झाला ..
मराठा आरक्षण : औरंगाबादमध्ये आणखी एका युवकाने नदीपात्रात मारली उडी
औरंगाबाद-
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या युवकाने गोदावरी नदीवरील पुलावरून आत्महत्या केल्याच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असताना आता औरंगाबादमध्येच आणखी एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं वृत्त आहे. कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे कोरड्या नदीपात्रात या तरुणाने उडी मारली असून यामध्ये तो जखमी झाल्याची माहिती आहे. उपचारासाठी त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे गुड्डू सोनावणे असं उडी मारणाऱ्या तरुणाचं नाव आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून काल म्हणजेच सोमवारी (२३जुलै) औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणानं गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चानं आंदोलन तिसऱ्या दिवशी अधिक तीव्र केलं आहे. आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
दरम्यान, सोमवारी गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथे मराठा समाजाच्या नेत्यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. दुपारी तीनच्या दरम्यान कायगाव टोका येथील गोदावरी नदीवरील पुलाकडे मोर्चेकरी निघाले. त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यातच काकासाहेब शिंदे यांनी पुलावरून उडी मारली. त्यांचा तेथे मृत्यू झाला.





