Home Blog Page 308

हरिहरन यांच्या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीतून १४ लाखांचा अपहर करणाऱ्या मोरया एंटरटेनमेंटचे विशाल गोरगोटे विरुद्ध गुन्हा दाखल

पुणे-सुप्रसिध्द गायक हरिहरन यांचा २१/९/२०२४ राेजी पुण्यातील कर्वेनगर येथील महालक्ष्मी लाॅन्स येथे कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता. या कार्यक्रमासाठी सुरुवातीला माेरया एंटरटनेमेंट एलएलपी कंपनीने आयाेजन केले हाेते. परंतु व्यैक्तिक कारणावरून त्यांनी सदर कार्यक्रम रद्द केला. मात्र, हरिहरन यांच्या विनंतीवरून स्वरझंकार हबने पुढाकार घेऊन केला. यादरम्यान बुक माय शाे वरून येणारे तिकिटाचे पैसे माेरया एंटरटेनमेंट यांनी स्वरझंकार हबला देण्याचा करार देखील झाला. मात्र, माेरया एंटरटेनमेंटने या कार्यक्रमाचे १४ लाख १७ हजार रुपये स्वरझंकार यांना न देता सदर रकमेचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. याप्रकरणी माेरया एंटरटेनमेंट एलएलपीचे मालक विशाल गाेरगाेटे यांचेवर वारजे माळवाडी पाेलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राजस अतुलकुमार उपाध्ये (वय- ३१,रा. सहकारनगर,पुणे) यांनी आराेपी विशाल गाेरगाेटे विराेधात पाेलीसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामांकित गायक हरिहरन यांचा कार्यक्रम माेरया एंटरटेनमेंट एलएलपी यांनी अायाेजित केला हाेता. परंतु त्यांना काही अडचणी आल्याने त्यांनी सदर कार्यक्रम रद्द केल्यावर गायक हरिहरन यांचे विनंतीवरून तक्रारदार राजस उपाध्ये यांनी हा कार्यक्रम घेण्याचे ठरवले हाेते. याबाबत हा कार्यक्रम हाेण्याकरिता रितसर सामंजस्य करार देखील झाला. सदरच्या कार्यक्रमाचे तिकिट विक्रीचे पैसे बुक माय शाेवरून माेरया एंटरटेनमेंट एलएलपी यांचे खात्यावर जाणार असल्याने सदरचे पैसे हे तक्रारदार यांचे स्वरझंकार हबचे खात्यावर येण्याकरिता आराेपी यांचेशी करार झाा हाेता. परंतु या कार्यक्रमाचे १४ लाख १७ हजार रुपये देण्याचे ठरलेले असताना देखील आराेपीने हे पैसे तक्रारदार यांना दिले नाही. तसेच त्यांची दिलेला चेक देखील बँकेत बाऊंस झाल्याने सदरचे पैसे तक्रारदार यांनी वारंवार मागून देखील त्यांना आराेपीने टाळल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदार यांनी याबाबत पाेलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पुढील तपास पाेलिस उपनिरीक्षक एस तरडे करत आहे.

बालवाङ्मय वाचण्याचे माझे वय राहिले नाही:देवेंद्र फडणवीसांचा ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकावरून संजय राऊतांना खोचक टोला

मुंबई बालवाङ्मय वाचण्याचे माझे वय राहिले नाही:देवेंद्र फडणवीसांचा ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकावरून संजय राऊतांना खोचक टोला
कथा, कादंबऱ्या किंवा बालवाङ्मय वाचवण्याचे माझे वय नसल्याची सडेतोड प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाविषयी दिली आहे. या पुस्तकाचे उद्या प्रकाशन होणार आहे. या पुस्तकामध्ये संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत मोठे दावे केल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांना वाचवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी मदत केली असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कथा कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचायचे माझे वय राहिले नाही. त्यामुळे अशा गोष्टी मी वाचत नाही. संजय राऊत कोण आहेत? ते खूप मोठे नेते आहेत का? असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकांमध्ये करण्यात आलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांच्या पुस्तकामध्ये ‘राजा का संदेश साफ है’ या नावाचे प्रकरण लिहिलेले असल्याची माहिती आता समोर आली आहे. आजपर्यंत कधीही समोर न आलेले अनेक खळबळजनक दावे यामध्ये करण्यात आले आहेत. यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन गुजरातचे आमदार अमित शहा यांच्यावर मोठे उपकार केले असल्याची संपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

गुजरात दंगल प्रकरणात सीबीआयचा ससेमिरा अमित शहा यांच्या मागे लागला होता. त्यावेळी त्यांना तडीपार देखील करण्यात आले होते. ही तडीपारी दूर करण्यासाठी अमित शहा हे मातोश्री दरबारी आले होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी एक फोन करून अमित शहा यांना या संकटातून कसे बाहेर काढले, याची माहिती देणारा दावा देखील या पुस्तकात करण्यात आला आहे.

संजय राऊत पुस्तकाबद्दल म्हणाले की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला याचे आम्हाला दुःख नाही. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि शरद पवार यांचा पक्ष भारतीय जनता पक्षाने लोफर व्यक्तींच्या हातात दिला. ‘नरकातला स्वर्ग’ या माझ्या पुस्तकात लिहिलेला प्रत्येक प्रसंग हा सत्य घटनेवर आधारित आहे. ते सत्य आहे, ती कादंबरी नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांच्या पुस्तकाबद्दल मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, बाळासाहेबांनी अनेकांना मदत केली. मात्र, ते बोलून दाखवले नाही. शिवसेनाप्रमुखांचा असा उल्लेख करणे गैर आहे. शिवसेनाप्रमुखांची गोध्राबाबतची भूमिका काय होती त्यावर स्पष्ट बोलले पाहिजे. नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी काही चोरी चपाटी केली नाही. संजय राऊत प्रसिद्धीसाठी बोलत असतात. त्यांना वाटते मी जे बोललो किंवा लिहले ते खरे आहे असे लोकांनी मानले पाहिजे.
कथा, कादंबऱ्या किंवा बालवाङ्मय वाचवण्याचे माझे वय नसल्याची सडेतोड प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाविषयी दिली आहे. या पुस्तकाचे उद्या प्रकाशन होणार आहे. या पुस्तकामध्ये संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत मोठे दावे केल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांना वाचवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी मदत केली असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कथा कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचायचे माझे वय राहिले नाही. त्यामुळे अशा गोष्टी मी वाचत नाही. संजय राऊत कोण आहेत? ते खूप मोठे नेते आहेत का? असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकांमध्ये करण्यात आलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांच्या पुस्तकामध्ये ‘राजा का संदेश साफ है’ या नावाचे प्रकरण लिहिलेले असल्याची माहिती आता समोर आली आहे. आजपर्यंत कधीही समोर न आलेले अनेक खळबळजनक दावे यामध्ये करण्यात आले आहेत. यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन गुजरातचे आमदार अमित शहा यांच्यावर मोठे उपकार केले असल्याची संपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

गुजरात दंगल प्रकरणात सीबीआयचा ससेमिरा अमित शहा यांच्या मागे लागला होता. त्यावेळी त्यांना तडीपार देखील करण्यात आले होते. ही तडीपारी दूर करण्यासाठी अमित शहा हे मातोश्री दरबारी आले होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी एक फोन करून अमित शहा यांना या संकटातून कसे बाहेर काढले, याची माहिती देणारा दावा देखील या पुस्तकात करण्यात आला आहे.

संजय राऊत पुस्तकाबद्दल म्हणाले की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला याचे आम्हाला दुःख नाही. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि शरद पवार यांचा पक्ष भारतीय जनता पक्षाने लोफर व्यक्तींच्या हातात दिला. ‘नरकातला स्वर्ग’ या माझ्या पुस्तकात लिहिलेला प्रत्येक प्रसंग हा सत्य घटनेवर आधारित आहे. ते सत्य आहे, ती कादंबरी नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांच्या पुस्तकाबद्दल मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, बाळासाहेबांनी अनेकांना मदत केली. मात्र, ते बोलून दाखवले नाही. शिवसेनाप्रमुखांचा असा उल्लेख करणे गैर आहे. शिवसेनाप्रमुखांची गोध्राबाबतची भूमिका काय होती त्यावर स्पष्ट बोलले पाहिजे. नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी काही चोरी चपाटी केली नाही. संजय राऊत प्रसिद्धीसाठी बोलत असतात. त्यांना वाटते मी जे बोललो किंवा लिहले ते खरे आहे असे लोकांनी मानले पाहिजे.

बाळासाहेब ठाकरेंचे मोदी-शहांवर अनंत उपकार! शरद पवारांनीही मदत केल्याचा दावा,शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी अमित शहा निर्घृणपणे वागले

संजय राऊत यांचे ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकात गौप्यस्फोट:मोदींना अटक होऊ नये म्हणून शरद पवार यांनी कॅबिनेटमध्ये कोणती भूमिका मांडली
मुंबई – उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर अमित शहा हे देशाच्या राजकारणात राहणार नाही, असा दावा काल केला होता. त्यानंतर आता त्यांच्या या पुस्तकातील काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठे खुलासे केले आहेत. इतकेच नाही तर नरेंद्र मोदी यांना त्याकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर शरद पवार यांनी देखील मदत केली होती. असा दावा या पुस्तकात करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या पुस्तकामध्ये ‘राजा का संदेश साफ है’ या नावाचे प्रकरण लिहिलेले असल्याची माहिती आता समोर आली आहे. आजपर्यंत कधीही समोर न आलेले अनेक खळबळजनक दावे यामध्ये करण्यात आले आहेत. यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन गुजरातचे आमदार अमित शहा यांच्यावर मोठे उपकार केले असल्याची संपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. गुजरात दंगल प्रकरणात सीबीआयचा ससेमिरा अमित शहा यांच्या मागे लागला होता. त्यावेळी त्यांना तडीपार देखील करण्यात आले होते. ही तडीपारी दूर करण्यासाठी अमित शहा हे मातोश्री दरबारी आले होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी एक फोन करून अमित शहा यांना या संकटातून कसे बाहेर काढले, याची माहिती देणारा दावा देखील या पुस्तकात करण्यात आला आहे.

संजय राऊत यांच्या या पुस्तकांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कशाप्रकारे मदत केली याची माहिती देण्यात आली आहे. इतकेच नाही तर गुजरात दंगल प्रकरणात वाचवण्यासाठी शरद पवार यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कशा पद्धतीने मदत केली, याचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. मोदींना अटक होऊ नये म्हणून शरद पवार यांनी कॅबिनेटमध्ये कोणती भूमिका मांडली. तसेच अमित शहा यांना वाचवण्यासाठी मोदींच्या फोन नंतर शरद पवारांनी कशी सूत्रे हलवली याबाबत देखील या पुस्तकात संजय राऊत यांनी लिहिले आहे.अमित शहा यांच्या मागे सीबीआय तपासाचा ससेमिरा लागल्यानंतर त्यांना बाळासाहेब ठाकरेच मदत करू शकतात, असे कोणीतरी सुचवले होते. त्यामुळे लहान असलेल्या जय शहाला घेऊन अमित शहा हे मुंबईत पोहोचले होते. मात्र कलानगरच्या मुख्य गेटवरच शहा यांना अडवून ठेवण्यात आले होते. बऱ्याच काळ प्रतीक्षा करूनही ठाकरे यांची भेट होत नसल्याने अमित शहा हे घामाघूम झाले होते. असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. मात्र त्या दिवशी बाळासाहेब ठाकरे आणि अमित शहा यांची भेट झाली नाही. बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी दुसऱ्या दिवशी देखील शहा मातोश्रीवर पोहोचले. मात्र शिवसेनाप्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली. गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा आपण भोगत आहोत, अशी दर्दभरी कहानी अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी एक फोन केला. त्यानंतर अमित शहा यांची सुटका झाली असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.अमित शहा यांना राजकारणातील प्रवासात आणि जीवनात असलेला प्रमुख अडथळा बाळासाहेब ठाकरे यांनी दूर केला. त्या नंतर अमित शहा यांनी पुढे काय केले, हे सर्व जगाने पाहिले असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी अमित शहा हे निर्घृणपणे वागले असल्याचे देखील आरोप संजय राऊत यांनी या पुस्तकात केले आहे.

कारणे सांगू नका, रिझल्ट द्या:नालेसफाईत ‘हात कि सफाई’ नकोच-केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे महापालिकेला निर्देश

हलगर्जीपणा करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई करा !

  • मान्सूनपूर्व कामांचा मोहोळ यांच्याकडून आढावा

पुणे –
मागील काही वर्षात शहरात कमी वेळात अधिक पाऊस पडण्याचा नवीन ट्रेंड दिसून येत असून या पार्श्वभूमीवर पूरस्थिती टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाला निर्देश दिले असून कामे वेगाने आणि दर्जेदार करावीत, असे निर्देश महापालिका प्रशासनाला देत मान्सूनपूर्व कामासाठी नियुक्त केलेले ठेकेदार रिझल्ट देत नसतील, तर त्यांना काळ्या यादीत टाकावे. तसेच ठेकेदार किंवा अधिकारी जे जबाबदार असतील त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशीही सूचना केली असल्याची माहिती पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी केल्या जाणाऱ्या कामाचा आढावा महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतला. यावेळी आमदार भीमराव तापकीर, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले,पल्लवी जावळे यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते.

बैठकीबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘चेंबर साफसफाई, अतिक्रमण काढणे, नाले रुंदीकरण आदी कामाचा आढावा घेण्यात आला. पावसाने कुठे पाणी साठून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो त्या जागेवर उपाययोजना करण्याचे सूचना मनपाला दिल्या आहे. पुण्यात ८७५ किलोमीटरचे एकूण नाले आहे. त्याबाबत सफाई तपासणी मनपाकडून करण्यात येत आहे. पावसाळापूर्व कामात सुसूत्रता येण्यासाठी सर्व विभागाकडून एकत्रित काम केले जाईल. नालेसफाईचे यंदा २३ टेंडर मनपाने काढली असून पावसाळी कामाबाबत १५ टेंडर काढून कामे करण्यात येत आहे. जे ठेकेदार कामाची निविदा घेऊन प्रत्यक्ष काम करत नाही, अशा तक्रारी काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत. यापुढे अशी गोष्ट कुठे दिसल्यास संबंधित ठेकेदारांना काळया यादीत टाकले जाईल. शिवाय ठेकेदार किंवा अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार आहे.

मोहोळ म्हणाले, पुण्यात आधी ११७ क्रॉनिक स्पॉट होते. त्यानंतर २२ गावे समाविष्ट झाल्यावर आता ही संख्या २०१ वर पोहोचली आहे. त्यापैकी ११७ स्पॉटचे काम पूर्ण झाले आहे. त्याजागी नालेसफाई झाली असून उर्वरित ८४ जागांवर काम सुरू आहे. ती कामे पावसाळापूर्व पूर्ण होतील. इतर जे ३९ स्पॉट कामे यंदा पूर्ण होऊ शकणार नाही, त्याठिकाणी तात्पुरते उपाययोजना करण्यात येत आहे. नागरिकांचे हाल होऊ नये, याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी सूचना मनपाला दिल्या आहे.

‘सन २०१९ मध्ये आंबील ओढा येथे पूर येऊन मोठी आपत्ती आली होती. त्यानंतर उपाययोजना काम करून कात्रज ते दत्तवाडीदरम्यान नाले दुरुस्ती आणि रुंदीकरण करण्यात आल्याने परत काही अडचण आली नाही. पुण्यात नगरसेवक नसले तरी मनपात आमदार, खासदार लक्ष्य देत असून समन्वयाने काम करण्याचे ठरले आहे. पुण्यात मान्सूनपूर्व कामाचा वॉर्ड निहाय रिपोर्ट करून त्याचा एकत्रित अहवाल करण्याच्या सूचना दिल्या आहे. प्रत्येक जागी कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करण्यास देखील सांगितली आहे.जे नेमून दिलेली कामे करत नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मनपाने अतिक्रमण बाबत कडक कारवाई करावी. आपत्ती व्यवस्थापन तयारी आढावा देखील घेतला गेला आहे. पुणे शहरासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडून जो निधी मंजूर होऊन आलेला आहे तो मनपाला मिळण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जातील, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.

भोसरी, मोशी परिसरात दोन तास वीज खंडित

पुणे, दि. १६ मे २०२५: महापारेषण कंपनीच्या भोसरी २२०/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील वीजयंत्रणेत
बिघाड होऊन ५० एमव्हीए क्षमतेचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर बंद पडले. त्यामुळे गुरुवारी (दि. १५) रात्री ९ ते ११
वाजेदरम्यान भोसरी व मोशी परिसरातील सुमारे ८० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा दीड ते दोन तासांपर्यंत खंडित
होता.
याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या भोसरी (आरएस-२) अतिउच्चदाब २२० केव्ही उपकेंद्रांमध्ये
५० एमव्हीए क्षमतेचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे. मात्र वीजयंत्रणेत बिघाड झाल्यामुळे गुरुवारी (दि. १५) रात्री ९
च्या सुमारास या दोन्ही ट्रान्सफॉर्मरमध्ये ट्रिपींग आले व वीजपुरवठा बंद पडला. परिणामी महावितरणच्या ८
उपकेंद्रांसह २२ केव्ही क्षमतेच्या १५ वीजवाहिन्यांचाही वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे भोसरी, डुडूळगाव,
चिखली, घरकुल, मोरेवस्ती, नाशिक हायवे, मोहननगर, जय गणेश साम्राज्य, खडीमशीन, चऱ्होली, अलंकापुरम,
चोविसावाडी, एमआयडीसीमध्ये सेक्टर ७, सेक्टर १०, सेक्टर १२, पीएमएवाय घरकुले आदी परिसरातील सुमारे
८० हजार घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.
दरम्यान, महापारेषणकडून तातडीने वीजयंत्रणेतील बिघाड दुरूस्त करण्यात आला. दोन्ही पॉवर ट्रान्सफॉर्मर
अनुक्रमे रात्री १० व १०.३० च्या सुमारास सुरू करण्यात आले. त्यानंतर महावितरणकडून रात्री १०.३० ते ११
वाजेदरम्यान सर्व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

फडणविसांनी केले शरद पवारांचे कौतुक,CM फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर

मुंबई-मुंबई येथील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियम येथे नामकरण सोहळा पार पडला. यावेळी क्रिकेटपटू रोहित शर्मा तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाच्या स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. अजित वाडेकर यांच्याही नावाचे स्टँड यावेळी उभारण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर दिसून आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले, अतिशय ज्येष्ठ नेते ज्यांचे क्रिकेटमधील योगदान नेहमीच लक्षात राहील असे शरद पवार साहेब तसेच आपल्या बॅटिंगने मंत्रमुग्ध करणारे रोहित शर्मा, दिलीप वेंगसरकर, अजित वाडेकर यांचे कुटुंबीय आणि उपस्थित सर्व क्रिकेटप्रेमी भगिनी आणि बंधूंनो मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. मी एमसीएने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करतो.

शरद पवार यांच्याबद्दल सांगण्याची आवश्यकताच नाही की भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आणि क्रिकेटचे जे प्रशिक्षक असतील त्यांच्यात शरद पवार यांचे नाव नेहमीच आदरणीय राहील. बीसीसीआय असेल किंवा आयसीसी असेल यात शरद पवार यांचे योगदान फार मोठे आहे. त्यामुळे एमसीएने शरद पवार यांच्या नावाचे स्टँड उभारण्याचा जो निर्णय घेतला आहे याचे मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

माझे मित्र अमोल काळे यांनी एमसीएमध्ये महत्त्वपूर्ण काम केले आहे. अमोल काळे यांना ईश्वराने अचानक नेले पण त्यांनी पाहिलेले स्वप्न एमसीए नक्कीच पूर्ण करेल. एमसीए लौंजला त्यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच रोहित शर्मा म्हणजे जे मैदानात आल्यावर मैदान दणाणून सोडतात. त्यांनी अशा दोन स्पर्धा जिंकवून दिल्या आहेत, ज्या आपल्या इच्छा अपूर्ण राहिल्या होत्या त्या त्यांनी पूर्ण करून दाखवल्या. त्यांचे मैदानात मोकळेपणे वागणे अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी अतिशय लीलया या ठिकाणी कर्णधार म्हणून सगळ्या फॉरमॅटमध्ये अतिशय सुंदर आहे. आम्ही आता वाट पाहत आहोत की त्यांचा एक शॉट कधी रोहित शर्मा स्टँडला जाऊन लागतो याची आम्हा सर्वांनाच उत्सुकता असणार आहे. मला विश्वास आहे की यामुळे ते अधिक चांगले आणि अधिक काळ खेळतील.

खरे तर लोक पूर्वी असे म्हणायचे की लॉर्ड ही क्रिकेटची पंढरी आहे. परंतु खरी पंढरी ही वानखेडे आहे. पंढरी तिथे देव त्या अर्थाने वानखेडे येथे सचिन तेंडुलकरचा पुतळा आहे. वानखेडे पेक्षा मोठे स्टेडियम उभारण्याची जागा आम्ही उपलब्ध करून देऊ जिथे एक लाख प्रेक्षक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. चार वर्षांनी एमसीएला शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळी अजून एक नवीन स्टेडियम उभारले जाईल, असा आपण प्रयत्न करू. या अतिशय सुंदर कार्यक्रमात तुम्ही मला बोलावले हा मी माझा सन्मान समजतो.

पुणे महापालिका निवडणूक:भाजप १२५ जागांवर लढणार , युतीबाबत प्रदेश पातळीवर निर्णय होणार

पुणे-पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहर भाजपने १२५ जागांवर लढण्याची तयारी चालविली आहे तर अन्य सुमारे ५० जागा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांना सोडण्याची तयारी शर भाजपने दर्शविण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे भाजपने जाेरात तयारी सुरु केली आहे. पुन्हा एकदा भाजपचा महापाैर महानगरपालिकेत बसला पाहिजे. यादृष्टीने काम करा असे फडणवीस यांनी देखील सांगितले आहे.या पार्श्वभूमीवर भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले कि,’ सध्या भाजपचे पुण्यात १०५ नगरसेवक असून त्या १०५ जागा पुन्हा निवडून येणे ही पक्षाची प्राथमिक प्राधान्याने तयारी आहे. त्या संदर्भातील उमेदवारी बाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरुन घेतला जाईल. आता आम्ही भाजप पक्ष म्हणून ज्या ज्या ठिकाणी जागा आहे तिथे तयारी करण्यास लागणार आहे. महायुती म्हणून निवडणुक लढवायची असेल तर आम्ही आमचे मत जे असेल ते निश्चित मांडू पण त्याबाबतचा जागांचा फाॅर्म्युला हा प्रदेश स्तरावर ठरणार आहे,असे मत व्यक्त केले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात गुरुवारी रात्री मुक्कामी असल्याने शुक्रवारी सकाळी त्यांना भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह माजी आमदार जगदीश मुळीक, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी भेट घेत आगामी मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली.

याबाबत घाटे म्हणाले, काही नगरसेवक आमचे मागील निवडणुकीत कमी मतांनी पडलेले आहे. त्यामुळे जागांचे गणिताबाबत जागांची जुळवाजुळव आम्ही करत आहे. परंतु सन २०१७ च्या निवडणुकीत ज्या जागावर भाजप नगरसेवक विजयी झाल्या आहे त्या सर्व जागा आम्ही लढणारच आहे. मागील तीन वर्ष निवडणुक न झाल्याने आम्ही थांबलेलाे हाेताे. आता न्यायालयाने निर्णय दिल्याने आम्ही तयारीस लागलाे आहे. स्वबळावर निवडणुक की युतीत लढायचे आहे याबाबतचा निर्णय प्रदेश स्तरावर हाेणार असला तरी आम्ही आमची निवडणुक तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री यांनी काेणता कानमंत्र आम्हाला दिला नाही. त्यांनी काही सूचना दिल्या आहे त्यानुसार आम्ही आमचे काम सुरु केले आहे. अध्यक्षपदाचा कार्यभार पुन्हा सांभाळल्या बद्दल त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री खालील पातळीवर चर्चा करुनच नंतर प्रदेश स्तरावर पुढील निवडणुकीच्या अनुषंगाने निर्णय घेतील. पुण्यात रविवारी दुपारी चार वाजता डेक्कन येथून फर्ग्युसन रस्त्यावर माेठी तिरंगा यात्रा आयाेजन केले आहे. यामध्ये पुण्यातील विविध मंडळे, संस्था, पक्ष व नागरिक यांनी सहभागी हाेण्याचे आवाहन केले आहे. भारत व पाकिस्तान मध्ये जे युध्द झाले त्यात भारतीय सैन्याने जी अतुलनीय कार्य केले त्याबद्दल आभार मानण्यासाठी ही रॅली आहे.

धर्मादाय रुग्णालयांची सेवा सर्वसामान्यांपर्यंत मिळावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : शहराच्या आरोग्य क्षेत्रातील ‘लाईफ लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मादाय (आयपीएफ) योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी आणि ही योजना सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचावी, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी (गुरुवारी) आयपीएफ संबंधात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सांगितले .

“महाराष्ट्र राज्यातील धर्मादाय रुग्णालय चौकशी समिती सदस्य” या नात्याने योजनेच्या कार्यवाहीसाठी जबाबदार शासकीय अधिकारी आणि धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सुसज्ज आणि दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवताना येणाऱ्या समस्या व अडचणींवर चर्चा झाली, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

या बैठकीस प्रमुख धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यात सध्या सुमारे ६० रुग्णालये आयपीएफ योजनेअंतर्गत कार्यरत आहेत. या योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल (निर्धन) रुग्णांना दिला जातो, अशा रुग्णांच्या तक्रारी आणि रुग्णालयांना भेडसावणाऱ्या समस्या यामध्ये समन्वय साधून योजना प्रभावीपणे कशी राबवता येईल, यावर सखोल विचारविनिमय झाल्याचे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी नगर मतदारसंघातील वैद्यकीय गरजांचा विचार करता, काही धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता भासते. येत्या काळात, योजनेअंतर्गत समाविष्ट सर्व रुग्णालयांमध्ये अधिक सक्षम समन्वय साधण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन, असा निर्धार आमदार शिरोळे यांनी व्यक्त केला.

बैठकीला धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी, धर्मादाय कार्यालयातील न्यास निरीक्षक, समन्वयक, तसेच जिल्हा प्रशासनातील सुहास मापारी (अप्पर जिल्हाधिकारी), सुयोग दिवसे (नायब तहसीलदार, सर्वसाधारण शाखा), डॉ.मानसिंगजी साबळे (अध्यक्ष – मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे) तसेच आनंद छाजेड आणि प्रकाश सोळंकी उपस्थित होते.

२०२२ नुसारच प्रभागरचना:एकनाथ शिंदे

पुणे : महापालिकेच्या निवडणुकीसाठी २०२२ मध्ये जी प्रभागरचना होती, त्याच प्रभागरचनेनुसार राज्यातील महापालिकेच्या निवडणुका होतील,’ असे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
निवडणूक घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणुका घेतल्या जाणार असून, महायुतीच्या माध्यमातून राज्यात सत्ताधारी असलेले तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवतील,’ असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

राज्यातील महापालिका आयुक्त आणि नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्या कार्यशाळेचे आयोजन ‘यशदा’ येथे करण्यात आले होते. त्यानिमित्त आले असता, शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक घेण्याबाबतचे काम निवडणूक आयोगाकडून सुरू झाले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार २०२२ नुसारच प्रभागरचना असणार आहे.

राज्यात सत्ताधारी असलेले तिन्ही पक्ष लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून लढले. त्यामुळे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकादेखील महायुतीच्या माध्यमातूनच लढविण्यात येणार आहेत.’

…पीएमआरडीएचा विकास आराखडा जरी माझ्या कार्यकाळात झाला असला तरी तो रद्द झाला कारण त्यात काही त्रुटी असल्याचे शिंदे यांनी यावेळी मान्य केले. विकास आराखडा हा त्या शहरातील नागरिकांच्या विकासाचा विचार करून झाला पाहिजे. त्यामुळे नियोजित शहर कसे असेल याचा विचार करून व त्रुटी दूर करून नव्याने हा आराखडा तयार करण्याचा प्रयत्न केले जात आहे.

विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून शहर विकासाला शासनाचे प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महानगरपालिका आयुक्त आणि नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत शहरांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुख्यमंत्र्यांनी मांडला शहर विकासाचा रोडमॅप

पुणे दि.१५: विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून शहर विकासाला केंद्र आणि राज्यशासन प्राधान्य देत असून गेल्या १० वर्षात नागरीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. शहरी भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांना उत्तम सुविधा देण्यासाठी चांगल्या योजना राबविल्यास राज्य शासनातर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांना सहकार्य करण्यात येईल,असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नगरविकास विभागातर्फे राज्यातील महानगरपालिका आयुक्त आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकरिता यशदा येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या असलेले दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. विकासाची प्रक्रिया नागरिकरणाभोवती फिरते. शिक्षण, आरोग्य, रोजगार, मनोरंजन या चार गोष्टींसाठी नागरिक शहराकडे आकर्षित होतात. असे असताना विकासासोबत वाढत्या शहरीकरणाचा योग्यरितीने विचार न केल्याने शहर विकासाचे योग्य धोरण करण्यात आले नाही आणि त्यामुळे शहरातील समस्या निर्माण झाल्या. राज्यात ६ कोटी लोक ४५० शहरात राहतात. ही शहरे सुंदर करता आली तर ५० टक्के जनतेचे जीवनमान उंचावता येईल.

शिक्षण आणि आरोग्य सुविधांवर भर द्या
शहरी भागातील प्राथमिक आरोग्य सुविधा निर्मितीकडे लक्ष द्यावे लागेल. यासाठी केंद्र आणि राज्यशासनाच्या योजनांची अंमलबजावणी करावी. महानगरपालिकेच्या शाळेत गरीबाच्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होण्यासाठी त्याचा नियमित आढावा घेऊन त्यातील अडचणी दूर करणे गरजेचे आहे. पाणी पुरवठ्यासाठी योग्य वितरण प्रणाली उभी करणे आणि मीटर पद्धत सुरू करणे तेवढेच महत्वाचे आहे. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठीच्या अशा योजनांसाठी शासन सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शहराच्या आर्थिक विकासाला चालना द्या
गेल्या काही वर्षात शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला. वस्तू आणि सेवा पुरविताना नवा दृष्टिकोन स्वीकारण्यासह नव्या कल्पना अंमलात आणाव्या लागतील. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी उभारण्याचे नवे स्रोत शोधावे लागतील, त्यासोबत करांच्या वसुलीकडेही लक्ष द्यावे. शहराच्या आर्थिक प्रगतीवर भर दिल्यास नागरिक कर भरण्यास पुढे येतील. चांगल्या प्रकल्पासाठी खाजगी क्षेत्रातूनही निधी सहज उपलब्ध होऊ शकेल. त्यादृष्टीने शहरच्या शाश्वत विकासाचे नियोजन करावे, असे आवाहन श्री. फडणवीस यांनी केले. शहर विकासाच्या आराखड्याद्वारे शहराचा सुनियोजित विकास करता येतो. सुनियोजित रस्ते तयार केल्यास शहर सुंदर करता येतील, असेही ते म्हणाले.

शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांनी चांगली कामगिरी केली. नव्याने केलेल्या सुधारणा संस्थात्मक पातळीवर राबवल्या गेल्यास प्रशासन निरंतर सुधारत राहील. आता १५० दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. यामध्ये ई- गव्हर्नसचा उपयोग आणि मनुष्यबळ विकासावर भर द्यायचा आहे. यासाठी शासनाकडून सर्व सहकार्य करण्यात येईल. मनुष्यबळासंबंधी सुधारणा करून आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रशासन अधिक कार्यक्षम करता येईल.

राज्य आणि केंद्राकडून मिळणारा निधी वेळेवर खर्च करून विकासाला गती देणे गरजेचे आहे, त्यासाठी डिजिटल प्रणालीचा पूर्ण वापर करणे महत्वाचे आहे. तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे कामावर नियंत्रण ठेऊन गुणवत्ता सुनिश्चित करण्याची गरज आहे. शासकीय सेवेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून यामध्ये विविध उपक्रम राबविल्यास ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चा आराखडा तयार करणे सुलभ होईल. यासाठी सर्वांच्या सूचना उपयुक्त ठरतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

सुंदर व सुनियोजित शहरांसाठी शासनाचे सहकार्य-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. राज्याच्या विकासात महानगरपालिका आणि नगरपालिकांचा महत्वाचा वाटत आहे. सर्व शहरांचा समान विकास झाल्यास राज्यात विकासाचा असमतोल राहणार नाही, त्यासाठी शहरातील समस्या दूर कराव्या लागतील. शहरीकरणाचा वेग वाढत असताना नागरिकांना सुविधा देण्याची जबाबदारी वाढली आहे. ५ कोटी पेक्षा अधिक नागरिक शहरी भागात रहात असल्याने तेथील समस्या सोडविण्याला प्राधान्य द्यावे लागेल, यासाठी शासन महानगरपालिका आणि नगरपालिकांना सहकार्य, करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.

महानगरपालिकांनी निश्चित उद्दिष्ट समोर ठेऊन काम करावे आणि कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करावा. भविष्यात नव्या झोपडपट्ट्या होणार नाहीत यावर लक्ष देताना समूह विकासावरही लक्ष द्यावे. यासाठी क्षेत्र भेटी आणि महत्वाच्या प्रकल्प भेटीवर भर द्यावे. अशाने गुणवत्तापूर्ण काम सुनिश्चित करता येईल. जनतेला हक्काचे घर दिल्यास शहरे सुंदर व सुनियोजित होतील. यापुढे शहरांत अतिक्रमण होणार नाही याकडे अधिक लक्ष द्यावे. सांडपाणी व्यवस्थापन, प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर, वेस्ट टू एनर्जीसारखे उपक्रम, उत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था राबवून शहरे अधिक सुंदर करता येतील, असेही श्री. शिंदे म्हणाले.

शासनामार्फत गतकाळात लोकाभिमुख योजना आखण्यात आल्या आणि अनेक लोकहिताचे निर्णय घेण्यात आले. याआधी ‘शासन आपल्या दारी’ यासारखे उपक्रम राबविले गेले. जनतेच्या आशा पूर्ण करण्यासाठी अधिक गतीने जनतेच्या हितासाठी कार्य करणे गरजेचे आहे. जनतेला शासनाच्या विविध सेवा व सुविधा प्रभावीपणे मिळाव्यात, प्रशासनाला गती मिळावी,यासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा राबवण्यात आला. त्यात गुंतवणूक, क्षेत्रीय कार्यालयाना भेटी, स्वच्छता, प्रशासकीय सुधारणा यावर भर देण्यात आल्या. आता १५० दिवस कार्यक्रमही त्याचं पद्धतीने राबवून राज्याच्या विकासाला वेग देण्यात येणार असल्याचेही श्री. शिंदे म्हणाले. सर्व क्षेत्रात राज्य पुढे जात असताना आपली शहरे विकसित करण्यासाठी कार्यशाळेच्या माध्यमातून मंथन व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शहर सुंदर करण्यासाठी प्रयत्न करा-राज्यमंत्री माधुरी मिसाळ
राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, शहरी भागातील समस्या दूर करण्यासाठी विविध उपायांबाबत कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. बेकायदेशीर बांधकामामुळे शहरे बकाल होऊ नयेत यासाठी उपाय करण्याची आवश्यकता आहे. याबाबत शासनाच्या नियमावलीची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. यादृष्टीने काम करताना लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवावा. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुधारणांबाबतही विचार व्हावा. शहरे सुंदर करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

अतिरिक्त मुख्य सचिव गुप्ता म्हणाले, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थानी विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी १५० दिवस कार्यक्रमांतर्गत ई- गव्हर्नन्सचा उपयोग करावा. महानगरपालिका आणि नगरपालिकांनी विकास प्रकल्पांसाठी निधी उभारण्याचे नवे स्रोत शोधावे. काळानुरूप कामकाजात सुधारणा करण्यावर भर द्यावा. महानगरपालिका आयुक्त पदावर काम करताना मिळणाऱ्या संधीचा उपयोग करून शहराच्या विकासावर अधिक भर द्यावा असे त्यांनी सांगितले.

प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी प्रस्ताविकात कार्यशाळेची माहिती दिली. राज्याच्या शहरी भागात सर्वांगीण विकास करताना कामाची गुणवत्ता, केंद्राकडून अधिक निधी मिळविणे, नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग आणि कामाचा वेग वाढविण्यासाठीच्या उपाययोजनांवर कार्यशाळेत चर्चा करण्यात येणार आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी सकारात्मक भावनेने आणि क्षमतेने काम करावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
0000

महाराष्ट्रातील 700 मंदिरांत वस्त्रसंहिता,150 आणखी मंदिरांत नियम लागू होणार

नागपूर – महाराष्ट्रामध्ये 700 पेक्षा जास्त तर देशभरात 1100 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सुनील घनवट यांनी दिली आहे. या निर्णयामुळे भाविकांनी मंदिरात येताना पारंपरिक वेशभूषा करावी, असा नियम करण्यात आला आहे. येत्या काळात राज्यात आणखी १५० मंदिरात वस्त्र संहीता लागू केली जाईल, असे घनवट यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि इतर मंदिरांनी भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू केली आहे. त्यानुसार, पुरुषांनी पूर्ण कपडे आणि महिलांनी साडी किंवा चुडीदार अशा पारंपरिक वेशभूषेचा वापर करावा, असे म्हटले आहे. कोल्हापूर येथील अंबाबाई महालक्ष्मी आणि जोतिबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय परंपरेला शोभेल अशा पद्धतीची वस्त्रे धारण करावीत, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केले आहे.

जेजुरीच्या खंडोबा मंदिरात देखील वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 50 मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे, अशी माहिती घनवट यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू झाली पाहिजे, मंदिराचे पावित्र्य जपले गेले पाहिजे. मंदिरात अंगप्रदर्शन होणार नाही, असभ्य, अशोभनीय व तोकडे कपडे घालून प्रवेश करू नये यासाठी नियम लागू करण्यात आला आहे. यापुढेही आमचे प्रयत्न सुरूच राहिल असे घनवट यांनी सांगितले. राज्य सरकारची देखील सरकारी कार्यालयांसाठी वस्त्र संहिता आहे. मग मंदिरासाठी का नको? असा सवाल देखील घनवट यांनी केला आहे.

देशभरातील अनेक मोठ्या मंदिरांमध्ये आधीच वस्त्र संहिता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व मंदिरात ती लागू व्हावी अशी आमची भूमिका आहे. मंदिरात अशोभनीय, तोकडे कपडे घालून आले तर त्याला परत पाठवण्याऐवजी मंदिराच्या प्रवेशद्वारावर शाल, ओढणी, धोतर असे कपडे देण्यात येणार आहे. भाविकाला ते वापरून पांघरून मंदिरात जाता येणार आहे. ड्रेसकोडबाबत मंदिराने कडक नियम घालून दिले आहेत. केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठी देखील हे नियम आहेत.

गोयल कुटुंबाकडून मानवसेवेला समर्पित योगदान — लायन्स क्लब आय फाउंडेशन हॉस्पिटलला डायलिसिस मशीन भेट

पुणे : समाजसेवा क्षेत्रात आणखी एक प्रेरणादायी पाऊल उचलत, गोयल कुटुंबाने लायन्स क्लब आय फाउंडेशन हॉस्पिटल (मित्र मंडळ चौक, पुणे) यांना अत्याधुनिक डायलिसिस मशीन भेट दिली आहे. ही मशीन ब्रदरहुड फाउंडेशनचे संस्थापक, स्व. जयप्रकाश गोयल यांच्या पुण्यस्मरणार्थ समर्पित करण्यात आली आहे.

हॉस्पिटलच्या आवारात पार पडलेल्या एक साधेपणाने भरलेल्या भावनिक समारंभात गीता जयप्रकाश गोयल, अतुल गोयल आणि अमित गोयल यांच्या उपस्थितीत मशीनचे पूजन करून रुग्णसेवेसाठी समर्पित करण्यात आले.

या कार्यक्रमास लायन्स क्लब व अग्रवाल समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये लायन राजेंद्र मुच्छाल, विजय डांगरा, लायन विजय सारडा, लायन राजेश अग्रवाल, पीआयडी नरेंद्र भंडारी, राजेंद्र गोयल, विजय जाजू, दीपक कुदळे, बिपिन सेठ, फ्रेडी गोदरेज, आर. के. शाह, नीरज कुदळे, संजय अग्रवाल, पवन बंसल आदींचा समावेश होता.

गीता गोयल म्हणाल्या, “स्व. जयप्रकाशजींचं स्वप्न होतं की कोणत्याही व्यक्तीला उपचाराच्या अभावामुळे वेदना सहन कराव्या लागू नयेत. ही मशीन त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.”

याच प्रसंगी श्री रामनिवास चेतराम अग्रवाल यांनीही आणखी एका मशीनच्या दानाची घोषणा केली. तसेच तनय मनोज अग्रवाल कुटुंब आणि सौ. शकुंतला द्वारकाप्रसाद बंसल कुटुंब यांच्याद्वारेही प्रत्येकी एक डायलिसिस मशीनचे दान करण्यात आले.

लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट लायन राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, आता हॉस्पिटलमध्ये ८ डायलिसिस मशीन कार्यरत आहेत आणि प्रत्येक महिन्यात ८०० ते १००० रुग्ण अत्यल्प शुल्कात उपचार घेत आहेत. लवकरच आणखी दोन मशीन सुरू केल्या जातील.

लायन्स क्लब ही जगातील सर्वात मोठी सेवा संस्था असून, पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये ११३ डायलिसिस मशीनद्वारे हजारो गरजू रुग्णांवर उपचार होत आहेत. १७ शैक्षणिक संस्था, ४००० पेक्षा अधिक नेत्रशस्त्रक्रिया, तसेच पॅथोलॉजी, डायबेटिक आणि व्हिजन सेंटर्ससह लायन्स क्लबचे कार्य अविरत सुरू आहे. येत्या काळात खराडी आणि पिंपरी-चिंचवड भागातही नवीन सेवा केंद्र सुरू केले जातील.

सर्व उपस्थित मान्यवरांनी गोयल कुटुंबाच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आणि समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण म्हटले.

राहुल गांधींचा ताफा अडवणे ही हुकुमशाही, मुलभूत अधिकारांवर घाला.

कर्नल सोफिया यांचा अपमान करणाऱ्या मंत्री विजय शाहांना तत्काळ बरखास्त करून, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा.

मुंबई, दि. १५ मे २५
ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढी भागिदारी या तत्वानुसार राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची आग्रही मागणी केली होती. भाजपाने सातत्याने या मागणीला विरोध केला पण नाईलाजाने भाजपा सरकारने ती मान्य केली. जातनिहाय जनगणनेनंतर सर्वच समाज घटकांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. सरकारने जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून तेलंगणा व कर्नाटक पॅटर्न राबवावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, जातनिहाय जनगणना ही केवळ शिरगणती नाही तर सामाजिक अजेंडा आहे. महाराष्ट्रात ओबीसींची संख्या २७ वरून वाढून ६४ टक्क्यापर्यंत जाऊ शकते. या जनगणनेमुळे प्रत्येक समाज घटकांची लोकसंख्या किती हेही समजेल, पाटीदार, गुर्जर, मराठा आरक्षणाचा प्रश्नही यामुळे सुटण्यास मदत होईल. भाजपा सरकारला जातनिहाय जनगणनेचा निर्णय घ्यावा लागला याचे सर्व श्रेय राहुल गांधी यांना जाते, त्यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला. सरकारने याची प्रक्रिया काय आहे? माहिती कशी जमा करायची? याचे प्रशिक्षण कर्मचारी अधिकारी यांना दिले पाहिजे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

राहुल गांधींचा ताफा अडवणे तानाशाहीचा प्रकार..
लोकसभेतील विरोध पक्षनेते राहुल गांधी बिहारमध्ये ‘पलायन रोको नोकरी दो’ अभियानासाठी जात असताना त्यांचा तोफा पोलिसांनी अडवला यातून सत्तेचा माज दिसतो आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास जाणे हा काय गुन्हा आहे का? पण भाजपा आघाडीचे सरकार लोकशाही मानत नाही. हा सर्व प्रकार तानाशाहीचा असून मुलभूत अधिकारांवर घाला घालणारा आहे. काँग्रेस पक्ष याचा निषेध करत आहे.

भाजपाचा मंत्री विजय शाहवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा.
कर्नल सोफिया यांच्याबद्दल अत्यंत घाणेरडी भाषा वापरणारा भाजपाचा मध्य प्रदेशातील मंत्री विजय शाह यांना भाजपाने मंत्रीपदावरून व पक्षातून तात्काळ हाकलून दिले पाहिजे पण भाजपाचे केंद्रीय नेतृत्वही त्यांना पाठीशी घालत आहे असे दिसते. मा. हाय कोर्टाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले असताना विजय शाह निर्लज्जपणे सुप्रीम कोर्टात जातात. पण सुप्रिम कोर्टानेही त्यांना फटकारले आहे. हा देशाच्या सन्मानाचा प्रश्न आहे, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

तत्पूर्वी आज सकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यूनिसेफ प्रकल्पाच्या माजी शिक्षणाधिकारी विजयाताई चव्हाण यांची भेट घेतली. २००२ मध्ये, बुलढाणा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक उपक्रम राबविले. त्या काळात विजयाताईंनी दिलेले मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य आजही स्मरणात आहे. आज मुंबईत त्यांनी खास बोलावून, आत्मीयतेने न्याहारीची व्यवस्था केली, आणि ५००० रुपयांचा पक्षनिधी धनादेशाद्वारे सुपूर्त केला असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

“अहिल्याबाईंच्या विचारांप्रमाणे समाजासाठी न्यायदायी कार्य करण्याचा निर्धार” — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन करत डॉ. नीलम गोऱ्हे यांचा इतिहास, महिलासक्षमीकरण व शासन निर्णयांवर भर

विधान परिषदेचे सभापती मा. राम शिंदे यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट

चौंडी, दि.१५ मे २०२५ : विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम ताई गोऱ्हे यांनी दिनांक १५ मे रोजी सकाळी ११:३० वाजता चौंडी (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले.

या प्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “चौंडी येथील हे भव्य स्मारक ग्रामस्थ व शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून उभारण्यात आले असून, अहिल्याबाईंचं संपूर्ण आयुष्य न्याय, सामाजिक समता आणि महिलांच्या हक्कासाठी झगडण्यात गेलं. त्या केवळ राणी नव्हत्या, तर रयतेच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या एक आदर्श नेत्या होत्या.”

त्यांनी पुढे सांगितले की, “इथे नुकतीच झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. महिलांसाठी ‘आदिशक्ती योजना’ जाहीर करण्यात आली असली तरी एकल महिलांच्या संदर्भात सर्वेक्षणाची गरज आहे.”

“त्रिशताब्दी वर्षानिमित्त पुढील कार्यक्रमही होत राहणार आहेत. ग्रामस्थ, सरपंच व अधिकाऱ्यांनी इथली व्यवस्था अतिशय चांगली ठेवली असून उर्वरित काम लवकर पूर्ण व्हावीत यासाठी माझं पूर्ण सहकार्य राहील,” असेही त्यांनी नमूद केले.

या दौऱ्यादरम्यान, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेचे सभापती मा. राम शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या मातोश्री आणि पत्नीची सदिच्छा भेट घेऊन स्नेह संवाद साधला.

या भेटीदरम्यान स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, शिवसेना पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसाठी शिक्षणसंस्था ही भीती व नैराश्याची नव्हे, तर आत्मविश्वास व विकासाची ऊर्जा केंद्रे व्हावीत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

“शैक्षणिक संस्थांमध्ये मानसिक आधार व रॅगिंग प्रतिबंधासाठी कार्यप्रणालीची गरज”

एम्स भोपाळच्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची महत्त्वपूर्ण मागणी

पुणे -देशभरातील उच्च शिक्षणसंस्थांमध्ये वाढत्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी महाराष्ट्रातील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्राच्या माध्यमातून ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे.

१२ मे २०२४ रोजी AFMC, पुणे येथे सुरू असलेल्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेला AIIMS, भोपाळचा वैद्यकीय विद्यार्थी उत्कृष्ट महादेव शिंगणे (वय २०, रा. बीड) याने आत्महत्या केली. नैराश्यातून त्याने स्वतःच्या छातीत चाकूने वार करून आपले जीवन संपवले. तो गेल्या काही महिन्यांपासून मानसिक आजारासाठी उपचार घेत होता आणि आत्महत्येपूर्वी त्यांनी “कोणी जबाबदार नाही” असे स्पष्ट करत, शालेय स्तरावर शिवाजी महाराज व महाराणा प्रतापांचे विचार शिकवण्याची विनंती करणारा संदेशही सोडला.

या पार्श्वभूमीवर, डॉ. गोऱ्हे यांनी राज्य शासनाला संबोधित करत विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात समुपदेशन केंद्र सुरू करणे, प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी साप्ताहिक समुपदेशन सत्र अनिवार्य करणे, रॅगिंगविरोधी कायद्यांची सक्त अंमलबजावणी आणि अनामिक तक्रार नोंदणी यंत्रणा प्रभावीपणे राबवण्याची मागणी केली. तसेच, प्रत्येक शैक्षणिक संस्थेने वार्षिक मानसिक आरोग्य व रॅगिंग अहवाल सादर करणे बंधनकारक करण्याची सूचना केली.

डॉ. गोऱ्हे यांनी केंद्र सरकारकडेही शिक्षण संस्थांमधील आत्महत्यांचे खरे कारण शोधण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी, सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये मानसिक आरोग्य कक्ष स्थापन करून व्यावसायिक समुपदेशक नेमावेत, विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्ये व भावनिक सक्षमीकरणाचे अभ्यासक्रम शिकवावेत, आणि UGC मार्फत वार्षिक मानसिक आरोग्य अहवाल सादर करणे बंधनकारक करावे अशी मागणी केली आहे. याशिवाय, रॅगिंगविरोधीतरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करावी व तक्रारींसाठी गोपनीय आणि सुलभ व्यवस्था कार्यान्वित करावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.

शेवटी, डॉ. गोऱ्हे यांची स्पष्ट भूमिका मांडली की विद्यार्थ्यांसाठी शिक्षणसंस्था ही भीती नव्हे, तर आत्मविश्वास व विकासाची केंद्रे व्हावीत.
विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य, सुरक्षितता व सुसंवेदनशील शैक्षणिक वातावरण सुनिश्चित करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत,ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.