Home Blog Page 307

पुणे–ओकायामा मैत्रीच्या दोन दशकांच्या नात्याला नवी उभारी “कोनीचीवा २०२५”

पुणे–ओकायामा मैत्रीचा २० वा वाढदिवस-आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांनी साजरा केला “कोनीचीवा २०२५” कार्यक्रमाने

पुणे- आज पुणे–ओकायामा मैत्रीच्या २० वर्षांच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानातील पुणे–ओकायामा मैत्री उद्यानाला भेट दिली.

या कार्यक्रमाला कोजी याकी (कॉन्सलेट जनरल ऑफ जपान, मुंबई), ओकायामा प्रतिनिधी मंडळ, तसेच पुणे महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकारी अशोक घोरपडे (सह महापालिका आयुक्त), माधव जगताप (उपायुक्त), जयंत भोसेकर (उपायुक्त), आशा राऊत (उपायुक्त), प्रज्ञा पोद्दार (सहाय्यक महापालिका आयुक्त) आणि उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी कलाग्राम येथे आयोजित “कोनीचीवा २०२५” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमातून पुणे–ओकायामा मैत्रीच्या दोन दशकांच्या नात्याला नवी उभारी मिळाली.

मिळकतकर थकबाकी अभय योजनेची आज उत्साहात सुरुवात

पुणे– महानगरपालिकेच्या वतीने कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत १५ नोव्हेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ या दरम्यान राबविण्यात येणाऱ्या मिळकतकर थकबाकी अभय योजनेची आज उत्साहात सुरुवात झाली .
अभय योजनेमध्ये निवासी, बिगर निवासी व मोकळ्या जागा अशा सर्व जवळपास ४.८१ लाख मिळकतींच्या लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे . या सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी आज मुख्य इमारत, १५ क्षेत्रीय कार्यालये व ५९ CFC सेंटर या ठिकाणी बोर्ड, बॅनर्स, रांगोळी याद्वारे प्रचार प्रसिद्धी करण्यात आली .या सर्व ठिकाणी आल्यानंतर नागरिकांना आल्हाददायक वाटावे म्हणून कर संकलन विभागामार्फत कार्यालये सजविली आहेत . येणाऱ्या सर्व नागरिकांचे विभागीय निरीक्षक व पेठ निरीक्षक यांच्या हस्ते गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले .
कर आकारणी व करसंकलन विभागाचे उपायुक्त रवी पवार , सहाय्यक आयुक्त श्रीमती अस्मिता तांबे , सहाय्यक आयुक्त दिपक राऊत व सर्व प्रशासन अधिकारी यांनी वेगवेगळे कार्यालय व CFC सेंटर येथे भेटी देवून नागरिकांशी संवाद साधला.
मिळकत कर थकबाकी अभय योजना २०२५ -२६ ला चांगला प्रतिसाद मिळत आहे . जास्तीतजास्त नागरिकांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असेआवाहन महापालिका आयुक्त नवल किशोर राम व अतिरिक्त महापालिका आयुक्त .पृथ्वीराज बी.पी. यांनी नागरिकांना केले आहे .

काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर,रमेश बागवे,वसंत पुरके, वर्षा गायकवाडयांचा समावेश

रमेश चेन्नीथला, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार मुकुल वासनिक यांच्यासह खासदार, माजी मंत्री यांचा समावेश.

मुंबई, दि. १५ नोव्हेंबर २०२५..

नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रभारी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, खासदार, आमदार व वरिष्ठ पदाधिकारी यांचा यात समावेश आहे.

या यादीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, खा. शाहू महाराज छत्रपती, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक, खा. रजनीताई पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, खा. चंद्रकांत हंडोरे, आरिफ नसीम खान, खा. प्रणिती शिंदे, आ. डॉ. नितीन राऊत, सुनिल केदार, आ. अमित देशमुख, ऍड, के. सी. पाडवी, खा. वर्षा गायकवाड, आ. अस्लम शेख, आ. डॉ. विश्वजित कदम, एम.एम. शेख, मुजफ्फर हुसेन, रणजित कांबळे, राजेंद्र मुळक, आ. भाई जगताप, आ. साजीद खान पठाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष वसंत पुरके, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, ओबीसी विभागाचे अध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे, एस सी विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे, एनएसयुआयचे अध्यक्ष सागर साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राख आदींचा या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.

अपघातग्रस्त आगीत जिवंत जळत होते ,अन काही निर्लज्जपणे त्यांचे पैसे दागिने लुटत होते..?

पुणे : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघाताने राज्यभर हळहळ व्यक्त केली जात असताना या अपघातातील मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार एका व्हिडीओने समोर आणला आहे . एका बाजूला कुटुंब होरपळून मृत्युमुखी पडले असताना दुसरीकडे काही नागरिकांनी अपघातस्थळी लुटालूट करण्यासाठी गर्दी केली होती. या घटनेने काही लोकांच्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडवलं आहे.

अपघातानंतर एका बाजूला लोक मदतीची अपेक्षा करत होते, तर दुसरीकडे काही जणांनी लुटालूट सुरू केली. दोन ट्रकच्या भीषण अपघातानंतर पैसे आणि सोन्याचे दागिने लुटण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली होती. पुण्यातील अपघातानंतर वाहनाला आग लागल्याने एका लहान चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाला होता, तर कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाला होता. समाजात हळहळ व्यक्त केली जात असताना काही असंवेदनशील व्यक्तींनी मात्र सोने आणि पैसे गोळा करण्यासाठी एकच गर्दी केली होती. यानिमित्ताने सर्वसामान्य नागरिकांची संवेदनशीलता हरवत चालली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबतचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार

मुंबई-काँग्रेसने आज अखेर मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. पक्षाने या प्रकरणी मारझोड करणाऱ्यांसोबत अर्थात मनसेसोबत जाण्यास ठाम नकार देत उद्धव ठाकरे यांना स्वतःचा निर्णय घेण्याची पूर्ण मोकळीक दिली. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडी म्हणून राज ठाकरे यांच्या मनसेशी युती करण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जबर झटका बसला आहे.

मुंबई येथे आज मुंबई काँग्रेसचे एकदिवसीय शिबिर सुरू आहे. त्यात मुंबईच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणूक स्वबळावर लढवण्याची मागणी केली. त्यानुसार काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली. ते म्हणाले, काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढेल. आम्ही सर्व 227 जागा लढवू. आमची जिल्हा काँग्रेस कमिटी, ब्लॉक काँग्रेस कमिटी व सर्व पदाधिकाऱ्यांची ही निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा होती. त्यांच्या इच्छेचा मान राखत आम्ही हा निर्णय घेतला.

ही काही लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक नाही. ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते जे म्हणतील तेच होईल. भविष्यात काँग्रेसला मजबूत बनवणे हे आमचे काम आहे. काँग्रेस मजबूत व्हावी अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या भावनांचा मान राखत हा निर्णय घेतला आहे, असे चेन्नीथला म्हणाले.

तत्पूर्वी, वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडली. त्या म्हणाल्या, आम्ही देशाचे संविधान मानणारी मंडळी आहोत. आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाणारे लोक आहोत. मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाले तर आम्ही सातत्याने मुंबईच्या विकासावर बोलतो. आम्ही रोज मुंबईकरांचा त्रास पाहत आहोत. या प्रकरणी सर्वांनी एकत्र येऊन बोलण्याची गरज होती. कारण, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. पण काही पक्षांच्या माध्यमातून सातत्याने जी मारहाण केली जाते किंवा कायदा सुव्यवस्था हातात घेतली जाते. विशेषतः त्यांच्याकडून जी भाषा वापरली जाते, ती भाषा आमच्या सुसंस्कृतपणाला शोभणारी भाषा नाही.

वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या, महाविकास आघाडीमध्ये आम्ही किमान समान कार्यक्रमावर चालण्याचा प्रयत्न केला. हा कार्यक्रम सर्वांसाठी असला पाहिजे. संविधानाच्या धाग्यातून असला पाहिजे. परंतु काही पक्षांची भूमिका ही मारहाणीची राहिली आहे. लोकांना त्रास देण्याची राहिली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी त्यांचा योग्य तो निर्णय घ्यावा. पण सध्या ते ज्या लोकांशी चर्चा करत आहेत, त्यांच्याशी आमचे कितपत जमेल हे आम्हाला माहिती नाही.

एखाद्या छोट्या टपरीवाल्याला किंवा एखादा दुकानदाराला अथवा एखाद्या समोसेवाल्याला मारहाण करणे ही संस्कृती काँग्रेसमध्ये केव्हाही खपली जाणार नाही. त्यामुळे मला असे वाटते की, जे अशा तऱ्हेने कारवाई करतात किंवा मोठ्या उद्योगपतींवर बोलण्यापेक्षा छोट्या – छोट्या माणसांवर आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासोबत आम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे शिवसेनेने (ठाकरे गट) त्यांना कुणासोबत जायचे त्याचा निर्णय घ्यावा. पण काँग्रेस पक्ष म्हणून आमचे म्हणणे आहे की, मुंबईत आलेली सर्व मंडळी ही मुंबईकर आहेत. सर्वांनी मुंबईच्या विकासात हातभार लावला आहे, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

अल्पकालीन उपाययोजना तातडीने अंमलात आणा- मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश

यंत्रणांवर जबाबदारी निश्चित.

तर जड वाहनांवर कारवाई
प्रादेशिक परिवहन विभागामार्फत खेड शिवापूर टोलनाक्यावर जड व अवजड वाहनांतील अतिभार (ओव्हरलोड), ब्रेक तसेच इतर तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात येईल. जड व अवजड वाहनांनी नियमांचे उल्लंघन केल्यास पुढच्या टोलनाक्यावर दंड करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

पुणे – नवले पूल परिसरात अपघात थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्याला वेळ लागत असल्यास अपघात रोखण्यासाठी तातडीने करावयाच्या उपाययोजनांची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार अल्पकालीन उपाययोजना त्वरित अमलात आणाव्यात, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी दिले.

नवले पूल येथे झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी विविध यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी आमदार भीमराव तापकीर, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पीएमआरडीचे आयुक्त योगेश म्हसे, पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी संजय कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी व अन्य उपस्थित होते.

या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नेमके काय करता येईल, याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानुसार जांभूळवाडी ते वडगाव विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या रस्ता सुरक्षा समितीची बैठक ठरल्याप्रमाणे नियमितपणे व्हायलाच हवी. सेवा रस्त्यांचे रखडलेले काम त्वरित पूर्ण झाले पाहिजे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वडगाव पुलाच्या रूंदीकरणाचे काम तातडीने सुरू करावे, अशा स्पष्ट सूचना मोहोळ यांनी या बैठकीत दिल्या.

कायमस्वरूपी उपाययोजना
जांभूळवाडी ते वारजे रिंग रोड आणि जांभूळवाडी ते रावेत उन्नत मार्ग हा नवले पूल परिसरातील अपघात कमी करण्यासाठीचा कायमस्वरूपी उपाय आहे.पीएमआरडीए’च्या वतीने जांभूळवाडीपासून ते वारजेपर्यंत रिंगरोडचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू असून त्या कामाला गती द्यावी. उन्नत कॉरिडॉरचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पूर्ण झाला आहेे. हा अहवाल लवकरात लवकर मंत्रीमंडळासमोर मान्यतेसाठी सादर केला जाईल, असे मोहोऴ म्हणाले.

जबाबदारी निश्चित
या बैठकीत सर्व यंत्रणांवर आवश्यक जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्याचबरोबर या बैठकीच्या इतिवृत्तानुसार कोणत्या यंत्रणेने काय काम केले याचा आढावा डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घेतला जाईल, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

या उपाययोजना होणार
स्पीड गन्सची संख्या तीनऐवजी सहापर्यंत वाढवावी.

  • वाहनांची वेगमर्यादा प्रतितास ६० ऐवजी ३० किमी करावी.
  • रस्त्यावरील रिफ्लेक्टर्सची संख्या वाढवावी.
  • पीएमपीने अधिकृत बसथांबे उभारावेत.
  • सर्व यंत्रणांनी आपापल्या हद्दीतील सेवारस्त्यांवरील अतिक्रमणे त्वरित काढून घ्यावीत.

युवा कलाकारांचा स्वराविष्कार

पुणे : प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशन आयोजित मैफलीत श्रुती बुजरबरुआ (ठाणे) आणि शुभम खंडाळकर (पुणे) या युवा कलाकारांनी सादर केलेल्या होरी, भजन, नाट्यगीत तसेच पारंपरिक रचनांद्वारे साकारलेला स्वराविष्कार रसिकांनी अनुभवला. तर विदुषी सानिया पाटणकर आणि शिष्यांनी प्रथमच सादर केलेला ‘अष्टरंग’ हा गायन प्रकार कार्यक्रमाचे वेगळेपण ठरला.

युवा पिढीतील प्रतिभावान कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या उद्देशाने प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशन कार्यरत आहे. याच उद्देशाने ज्योत्स्ना भोळे सभागृहात युवा कलाकारांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

श्रुती बुजरबरुआ यांनी राग पटदीपने गायनाची सुरुवात केली. त्यात मध्यलय एक तालातील ‘दीप जले घर आएना शाम’ ही बंदिश सादर करून द्रुत तीन तालातील रचना सादर केली, ‘रंग डारुंगी नंद के लालन पें’ ही होरी रसिकांना विशेष भावली. ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’, ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ या रचनांनंतर ‘झाले युवती मना’ हे नाट्यगीत प्रभावीपणे सादर करून मैफलीची सांगता केली.

त्या नंतर शुभम खंडाळकर यांनी आपल्या मैफलीची सुरुवात राग यमन कल्याणमधील तराणा सादर करून द्रुत लयीत बंदिश सादर केली. ‘बाली उमरिया सजनिया, ‘याद पिया की आए’ या सुप्रसिद्ध रचना तयारीने ऐकवून ‘भेटी लागी पंढरीनाथा’ हे भजन मोठ्या भक्तीभावाने सादर केले. ‘शब्दांवाचून कळले शब्दांपलिकडचे’ या अभिषेकी बुवांच्या रचनेनंतर ‘बाजे रे मुरलिया बाजे’ ही रचना सादर करून रसिकांची मने जिंकत मैफलीची सांगता केली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विदुषी सानिया पाटणकर आणि त्यांच्या शिष्यांनी सादर केलेला अष्टरंग हा गायन प्रकार रसिकांना विशेष भावला. अष्टरंग गायन म्हणजे संगीताचे आठ प्रकार. यात चार विविध राग आणि चार विविध तालांसह संगीताचे चार प्रकार या अष्टरंगामध्ये सादर करण्यात आले. याच शास्त्रीय संगीताचे अभ्यासक चैतन्य कुंटे यांच्या रचना सादर करण्यात आल्या.  

कलाकारांना यशवंत थिटे (संवादिनी), ताराशिष बक्षी (तबला), महेंद्र शेडगे (तालवाद्य), मनिषा पिंपळगावकर, ज्ञानेश्र्वरी ठाकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली. चंद्रशेखर शेठ, विवेक सुरा यांनी कलाकारांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन महाबळेश्र्वरकर यांनी केले.

काँग्रेस कधीच संपत नसते, इंदिराजी व राजीवजी गांधी यांच्यावेळीही पराभव झाला पण काँग्रेस पुन्हा ताकदीने उभी राहिली: रमेश चेन्नीथला

बिहारच्या निकालाने खचून जावू नका, नकारात्मकता सोडा आणि लढायची तयारी ठेवा: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. १५ नोव्हेंबर २०२५

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलेली टीका निरर्थक आहे. इंदिराजी गांधी, राजीवजी गांधी यांचाही निवडणुकीत पराभव झाला पण त्यानंतर काँग्रेस पक्ष नव्या जोमाने व ताकदीने उभा राहिला. काँग्रेस ही एक विचारधारा आहे आणि जनतेचा काँग्रेसवर विश्वास आहे, त्यामुळे काँग्रेस संपेल, काँग्रेसचे तुकडे पडतील अशा टीकेला काहीही अर्थ नसून काँग्रेस कधीच संपत नाही, असे चोख प्रत्युत्तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिले.

मुंबई काँग्रेसचे एक दिवसीय शिबीर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थित पार पडले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, सहप्रभारी यु. बी. व्यंकटेश, माजी मंत्री अस्लम शेख, आमदार भाई जगताप, आ. ज्योती गायकवाड यांच्यासह नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बिहार विधानसभेचे निकाल उलटे लागले असते तर आजचा उत्साह अधिक वाढला असता पण पराभव झाला म्हणून खचून जावू नका. काँग्रेस कार्यकर्त्याने पुन्हा नव्या जोमाने व ताकदीने कामाला लागले पाहिजे. रडायचे नाही तर लढायचे हा बाणा अंगी बाळगला पाहिजे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजयी झेंडा फडवण्यासाठी ताकदीने कामाला लागा, असे आवाहन सपकाळ यांनी केले.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे आणि दिपस्तंभासारखे राहुल गांधी यांचे नेतृत्व काँग्रेस पक्षाकडे आहे. नफरत छोडो, भारत जोडो हा नारा देत भयमुक्त समाजासाठी त्यांनी देशभर पदयात्रा काढली. संविधानाचे संरक्षण व संवर्धन हे राहुल गांधी यांचे स्वप्न आहे. संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करणे हे आपले ध्येय आहे. निवडणूकीत हार जीत होतच असते पण सत्ता नाही म्हणून थांबून चालणार नाही. नकारात्मकता सोडून द्या व लढाऊ बाणा अंगी बाळगा, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

आठव्या निसर्गोपचार दिनानिमित्त नैसर्गिक खाद्य महोत्सवाचे निसर्ग ग्राम येवलेवाडी येथे १६ ते १८ नोव्हेंबरला आयोजन

राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत मंगळवारी समारोप

पुणे: निसर्गोपचाराच्या तत्त्वज्ञानाला नवी दिशा देण्यासाठी राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेतर्फे (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी – एनआयएन) आठव्या निसर्गोपचार दिनानिमित्त तीन दिवसीय नैसर्गिक आहार महोत्सवाचे आयोजन केले आहे. रविवार (ता. १६) ते मंगळवार (ता. १८) या कालावधीत येवलेवाडी येथील निसर्ग ग्राम कॅम्पसमध्ये हा महोत्सव विविध वैज्ञानिक, शैक्षणिक व जनजागृती उपक्रमांसह साजरा केला जाणार आहे, अशी माहिती प्रभारी संचालक अमरेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी डॉ. सत्यनाथ, ओमप्रकाश शुक्ला, मंदार देशपांडे, सौरभ साकल्ये आदी उपस्थित होते.

अमरेंद्र सिंह म्हणाले, “निसर्गोपचार दिनानिमित्त आयोजित हा आहार महोत्सव रोज सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत सर्वांसाठी खुला असेल. ‘निसर्गोपचाराच्या माध्यमातून नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करणे’ अशी यावर्षीची संकल्पना आहे. या महोत्सवात तेलमुक्त, वनस्पती-आधारित आहारावर भर देण्यात येणार असून, प्रात्यक्षिके, शैक्षणिक प्रदर्शने आणि आरोग्यदायी पदार्थांचे स्टॉल्स आहेत. याप्रसंगी निसर्गोपचार व योग शास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरमहाविद्यालयीन मीट आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये वैद्यकीय प्रश्नमंजुषा, वक्तृत्व-निबंध, संशोधन पेपर सादरीकरण, फिजकल्टोपॅथी, रील्स स्पर्धा, फायर शिवाय कुकिंग, फळ-भाजी कोरीवकाम व आयडिया हॅकाथॉन यांचा समावेश आहे. तर शिक्षकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम, तसेच ऑस्टिओपॅथी व चिरोप्रॅक्टिक कार्यशाळा होणार आहेत.”

“या नैसर्गिक आहार महोत्सवाचा समारोप मंगळवारी (दि. १६) दुपारी ४ वाजता होणार आहे. या सोहळ्यास राज्यपाल आचार्य देवव्रत व केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह यांची विशेष उपस्थिती असणार आहे. यावेळी राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेवरील विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन, विविध प्रकाशनांचे लोकार्पण व स्पर्धांच्या विजेत्यांची घोषणा होईल. कार्यक्रमात डॉ. दिनशाह के. मेहता (उत्कृष्ट तज्ज्ञ) व डॉ. एस. एन. मूर्ती (उत्कृष्ट पी.जी. विद्यार्थी) यांना पुरस्कार प्रदान केले जातील,” असेही त्यांनी नमूद केले.

बिहार निवडणुकीत महिलांना 10 हजार वाटल्याने NDA चा विजय:शरद पवार यांचा दावासरकारने मतांसाठी पैसे वाटले

पुणे -केंद्र सरकारने बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना प्रत्येकी 10 हजार रुपये वाटले. या पैशांमुळेच तिथे भाजप प्रणित एनडीएचा विजय झाला, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केला. सरकारने निवडणुकीपूर्वी अधिकृतपणे पैसे वाटल्यामुळे बिहारमध्ये याहून वेगळा निकाल लागण्याची अपेक्षा नव्हती, असेही ते यावेळी म्हणाले.

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप – जदयु आघाडीचा दैदिप्यमान विजय झाला. यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात तिथे एनडीएचे सलग 5 व्यांदा सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विरोधकांनी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी वरील दावा केला आहे. ते शनिवारी बारामतीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, बिहार निवडणुकीपूर्वी सरकारने तिथे मोठ्या प्रमाणात पैसै वाटले. त्यामुळे तिथे वेगळा निकाल लागण्याची शक्यता शक्यता नव्हती.

शरद पवार म्हणाले, बिहार विधानसभेचे मतदान झाल्यानंतर मी काही लोकांशी संवाद साधला. त्यांच्याकडून मला असा फिडबॅक मिळाला की, ही निवडणूक महिलांनी हातात घेतली होती. सरकारने महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपये टाकले. त्यामुळे महिलांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान केले. बिहारमधील एनडीएचा विजय हा त्याचा परिणाम असावा. महाराष्ट्रातही निवडणुकीच्या अगोदर अधिकृतपणे पैसे वाटण्यात आले. हा प्रकार एखादा व्यक्ती मतांसाठी पैसे वाटतो तसा नव्हता, तर सरकारने स्वतः लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अधिकृतपणे मतांसाठी पैसे वाटले होते.

तसाच प्रकार बिहारमध्ये घडला. आत्ता प्रश्न असा आहे की, येथून पुढील निवडणुकांत ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचे वाटप करून निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली, तर एकंदर निवडणुकीच्या पद्धतीविषयी लोकांच्या मनात असलेल्या विश्वासालाच धक्का बसेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप करणे योग्य आहे का? याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगानेही याचा विचार केला पाहिजे.

निवडणुका स्वच्छ, पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात. यावर कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. पण 10-10 हजार रुपये देणे, ही काही लहान रक्कम नाही. महिलांना एवढी मोठी रक्कम द्यायची आणि त्यानंतर निवडणुकीला सामोरे जायाचे, याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक व स्वच्छ होत्या का? याविषयी लोकांच्या मनात शंका आहे. याचा विचार निवडणूक आयोगाने केला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.

स्थानिकच्या निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांना सर्वाधिकार

पत्रकारांनी यावेळी चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली, अशी युती पुण्यातही होईल का? असा प्रश्न केला. त्यावर शरद पवार यांनी आम्ही आमच्या स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याचे सांगितले.

जिल्हा परिषद पुणे आयोजित दोन दिवसीय बालसाहित्य महोत्सव उत्साहात संपन्न ; ३० शाळांचे ६०० विद्यार्थी ग्रंथ-दिंडीत सहभागी

पुणे, दि. १५ नोव्हेंबर – जिल्हा परिषद, पुणे आणि अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे यांच्या सहकार्याने आयोजित दोन दिवसीय बालसाहित्य महोत्सव – २०२५ हा १३ व १४ नोव्हेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर साहित्य संमेलन घेण्यात आल्याने हा उपक्रम ऐतिहासिक ठरला.
महोत्सवाची सुरुवात ३० शाळांमधील ६०० विद्यार्थ्यांच्या भव्य ग्रंथ-दिंडीने झाली. ज्ञानेश्वरीतील विविध व्यक्तिरेखांच्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांच्या लेझीम, ढोल-ताशा आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी वातावरण रंगून गेले.
उद्घाटन समारंभाचे शुभारंभ विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस होते. जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील आणि संस्था अध्यक्ष श्री. राजन लाहे मान्यवर उपस्थित होते.
पहिल्या दिवशी “विद्यार्थी व शिक्षकांमध्ये सकारात्मक वाचनपर्यावरण” या परिसंवादात श्री. चारुहास पंडित व सौ. संगीता बर्बे यांनी मार्गदर्शन केले. तर ३० बाललेखकांचा पद्मश्री श्रीमती माधुरी पुरंदरे यांच्याशी प्रेरणादायी संवाद झाला. बालकवी संमेलनात १५ बालकवींनी स्वतः रचलेल्या कविता सादर केल्या.
दुसऱ्या दिवशी कथा-कथन व वक्तृत्व सत्रात १५ विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण केले. रवी मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने ‘टोटोचन’ नाट्यप्रयोग सादर झाला. अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री.विश्वास नांगरे पाटील यांच्याशी विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी संवाद पार पडला.
“लेखक आपल्या भेटीला” सत्रात बालभारतीचे लेखक — श्री. एकनाथ आव्हाड , श्री. विलास सिंदगीकर, सौ. सुनंदा भावसार आणि सौ. मृणालिनी कानिटकर यांनी कथानिर्मिती, चित्रांकन आणि लेखनप्रक्रियेवरील नवमार्गदर्शन दिले.
यंदा प्रथमच आयोजित शिक्षक साहित्य संमेलनात शिक्षकांनी कविता,कथा-कथन आणि एकपात्री नाट्यप्रयोगातून आपली कला सादर केली.
समारोप सत्रात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एन. एम. जोशी, श्री. लक्ष्मीकांत देशमुख आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. संतोष राऊत उपस्थित होते. ८ गटांतील २४ विद्यार्थी व २ गटांतील ६ शिक्षकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला सृजनशील व समावेशक शिक्षणपरिसर देण्याची बांधिलकी व्यक्त केली.
दोन दिवसीय हा बालसाहित्य महोत्सव विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, कला, साहित्य, व्यक्तिमत्वविकास आणि प्रेरणेचा उत्सव ठरला.
बाळगंधर्व रंगमंदिरातील कलादालनात जिल्हा परिषद शाळांमधील १,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी साकारलेल्या साहित्यकृतींचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
लीडरशिप फॉर इक्विटी (LFE), रूम टू रीड, ओपन लिंक फाउंडेशन (OLF), फॉरेन लँग्वेज ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन (FLOA), थिंकशार्प फाऊंडेशन आणि प्रथम बुक्स या संस्थांनी साक्षरता उपक्रमांच्या चौकटीत जिल्हा परिषद शाळांमधील विविध यशोगाथा प्रदर्शित केल्या.
मेहता पब्लिशिंग हाऊस, ज्योत्स्ना प्रकाशन, साधना प्रकाशन, बालभारती प्रकाशन, न्यानगंगा प्रकाशन आणि ज्ञानप्रबोधिनी प्रकाशन या नामांकित प्रकाशन संस्थांनीही या महोत्सवात सहभाग घेतला व मुलांच्या साहित्याचा समृद्ध आणि विस्तृत संग्रह सादर केला.

काँग्रेस ही जनचळवळ; समुद्रात काठी मारून समुद्र तुटत नाही- सचिन सावंत

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ‘काँग्रेस मुक्त भारत’चे स्वप्न पाहणाऱ्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. नरेंद्र मोदी हे गेल्या 11 वर्षांपासून सगळ्या राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि संवैधानिक संस्था वापरून EVM चे शास्त्र करून ECला कवेत पकडून ‘व्होट चोरी’ करूनही काँग्रेसला संपवण्यात अयशस्वी ठरले, अशी टीका सावंत यांनी केली.

सचिन सावंत म्हणाले की, काँग्रेस पक्ष 140 वर्षे सगळी वादळे सहन करून टिकून राहिला आहे. आम्ही इंग्रजांच्या विरुद्ध घाबरलो नाही, तर तुम्ही कोण आलात? असा थेट प्रश्न त्यांनी भाजपला विचारला. काँग्रेसला विभाजित करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी ते यशस्वी होणार नाहीत, कारण काँग्रेस ही जनचळवळ आहे. समुद्रात काठी मारल्याने समुद्र विभाजित होत नाही, असे म्हटले आहे.

नेमके सावंत काय म्हणाले?

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, काँग्रेस मुक्त भारताचे स्वप्न बघणारे नरेंद्र मोदी गेले 11 वर्षे सगळ्या राष्ट्रीय तपास यंत्रणा लावून आणि संवैधानिक संस्था वापरून व्होट चोरी करून अयशस्वी ठरले.
काँग्रेस पक्ष 140 वर्षे सगळी वादळे सहन करुन टिकून राहिला आहे.इंग्रजांच्या विरुद्ध घाबरलो नाही तर तुम्ही कोण आलात? काँग्रेस विभाजित करण्याचा कितीही प्रयत्न करा. काँग्रेस ही जनचळवळ आहे. समुद्रात काठी मारल्याने समुद्र विभाजित होत नाही. बरं, इतिहासात डोकवा मुस्लीम लीग विरोधात काँग्रेस लढली तुमच्या पूर्वजांनी त्यांच्यासमवेत सरकारे स्थापन केली होती इतके तुमचे मुस्लिम लीगवर प्रेम होते. तुम्ही संविधान व लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत रहा, आम्ही राहुल गांधीजींच्या नेतृत्वाखाली संविधानाच्या व लोकशाहीच्या संरक्षणासाठी प्राणाची बाजी लावत राहू.

मी कट्टर भाजप समर्थक: महेश कोठारे नंतर आता निवेदिता सराफांचे वक्तव्य:भाजप विरोधी म्हणाले -यांचा,भेळ तिथे खेळ’ असतोय..


मुंबई-सिने अभिनेते अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी बिहारमधील भाजप-जदयु महायुतीच्या दैदिप्यमान विजयावर आनंद व्यक्त केला आहे. मी कट्टर भाजप समर्थक असल्यामुळे मला बिहारमधील एनडीएच्या विजयाचा फारच आनंद झाला, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकीय, सामाजिक व कला क्षेत्रात खमंग चर्चा रंगली आहे.कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी आणि माणसे मधून याची तीव्र प्रतिक्रिया उमटते आहे, यांचे कसे ,’भेळ तिथे खेळ असतोय ..उद्या भाजपा कोसळू द्यात हे सारे म्हणतील भाजपचा आमचा काहीच संबध नव्हता , ते मिडिया वाले आपले काहीही छापत होते .

ठाण्यात आयोजित एका कार्यक्रमात निवेदिता सराफ यांना गंधार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना त्यांचे पती व ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी वरील विधान केले. निवेदिता सराफ पुढे म्हणाल्या, आज मी जे काही आहे ते माझे गुरू, माझे पती अशोक सराफ यांच्यामुळे आहे. त्यामुळे त्यांच्याच हस्ते मला हा पुरस्कार दिला गेला याचा मला मनस्वी आनंद आहे.

माझ्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ही बालनाट्यापासून झोाली. सुधा करमरकर या माझ्या पहिल्या गुरू होत्या. त्यांच्या संस्थेतर्फे मी अनेक बालनाट्यांमध्ये काम केले. त्यानंतर अमृतवेल व बंध रेशमाचे या खूप मोठ्या नाटकांम्ध्येही मी काम केले. सुधा ताईंनी मला खऱ्या अर्थाने रंगमंचावर उभे राहायला शिकवले. त्या काळात रत्नाकर मतकरी व सुधाताई सातत्याने बालनाट्य रंगमंचावर आणत होत्या. त्यांचे महाराष्ट्रभर दौरे असायचे. बालनाट्यामुळे उद्याचे प्रेक्षक घडतात. त्यामुळे बालनाट्यांची शिबिरे आयोजित करणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी माझी मदत करण्याची तयारी आहे, असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.

महेश कोठारेंनीही केले होते भाजपचे समर्थन

उल्लेखनीय बाब म्हणजे मराठी कलाकारांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अभिनेते तथा दिग्दर्शक महेश कोठारे यांनीही पंतप्रधान मोदींचे तोंड भरून कौतुक केले होते. भाजपा म्हणजे आपले घर आहे. कारण, मी स्वतः भाजपचा भक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त आहे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना खोचक टोला हाणला होता.

महेश कोठारे हे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते. ते कोणत्याही पक्षाचे असू द्या. प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही कलाकार आहात. तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत. त्यामुळे तुम्ही असे काही बोलला तर तात्या विंचू तुम्हाला चावेल. रात्री येऊन तुमचा गळा दाबेल, असे संजय राऊत म्हणाले होते. ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनीही या प्रकरणी महेश कोठारेंवर निशाणा साधला होता. महेश कोठारे यांनी आपल्या सुनेला अपघात प्रकरणातून वाचवण्यासाठी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्याचा दावा त्यांनी केला होता.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले आहे. त्यातच बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा मोठा विजय झाल्यामुळे विरोधकांच्या तिळपापड झाला आहे. त्यांनी या प्रकरणी ईव्हीएम व कथित मतचोरीला दोष दिला आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी भाजपच्या बिहारमधील विजयावर आनंद व्यक्त केला आहे. ‘व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर, आमदार संजय केळकर तुम्हा सर्वांचे बिहार विधानसभा निवडणुकीत विजय झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. मी जरा कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आनंद झाला आहे’, असे त्या म्हणाल्या.

जम्मू-काश्मीरमधील नौगाम पोलिस ठाण्यात स्फोट, 9 जणांचा मृत्यू

0

श्रीनगर-जम्मू – काश्मीरमधील श्रीनगरमधील नौगाम पोलिस स्टेशनमध्ये गुरुवारी रात्री ११:२० वाजता मोठा स्फोट झाला. यात 9 जणांचा मृत्यू झाला तर २७ जण जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींपैकी बहुतेक पोलिस अधिकारी आहेत. त्यांच्यावर ९२ आर्मी बेस आणि एसकेआयएमएस सौरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.नौगाम पोलिस स्टेशनच्या स्फोटात कुपवाडा येथील राज्य तपास संस्थेचे (SIA) पोलिस अधिकारी असरार अहमद यांचाही मृत्यू झाला.

जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी नलिन प्रभात म्हणाले की, हा एक अपघात होता. सॅम्पलिंग दरम्यान हा स्फोट झाला. मृतांमध्ये एक निरीक्षक, तीन फॉरेन्सिक टीम सदस्य, दोन गुन्हे शाखेचे छायाचित्रकार, दोन महसूल अधिकारी आणि एक शिंपी यांचा समावेश आहे.नौगाम पोलीस ठाण्यातील स्फोटाबाबत स्थानिक रहिवासी शफाद अहमद म्हणाले, “काल रात्री ११:२० च्या सुमारास मोठा स्फोट झाला. आम्ही हादरलो. माझे नातेवाईक पोलीस ठाण्याजवळ राहतात. मी त्यांच्याशी बोलू शकलो नाही. ते (सुरक्षा कर्मचारी) आम्हाला त्यांना भेटू देत नाहीत. मी माझ्या आयुष्यात कधीही इतका मोठा स्फोट ऐकला नाही.”

हरियाणातील फरीदाबाद येथे अटक करण्यात आलेल्या डॉ. मुझम्मिल गनईच्या भाड्याच्या घरातून स्फोटके जप्त करण्यात आली. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात गनईला आधीच अटक करण्यात आली आहे. १० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला होता.

जम्मू आणि काश्मीर: काल रात्री नौगाम पोलिस स्टेशनजवळ झालेल्या स्फोटात ९ जणांचा मृत्यू आणि अनेक जखमी.
श्रीनगरमधील एसएमएचएस रुग्णालयाबाहेरील दृश्ये जिथे जखमींना आणण्यात आले आहे.

बिहारच्या निकालांचा धक्का बसलेला नाही:निवडणूक आयोगाचे अभिनंदन, हा त्यांचा विजय; आदित्य ठाकरेंची खोचक टीका

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, सध्याच्या कलानुसार एनडीए आघाडीने भक्कम बहुमत मिळवले आहे, ज्यामुळे राज्यात पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याच निकालावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. या निकालांचा धक्का बसलेला नाही, असे सांगत त्यांनी निवडणूक आयोगाचे अभिनंदन केले आणि उपरोधाने म्हटले की, हा निवडणूक आयोगाचा विजय आहे. भाजपने आता अमेरिकेतही निवडणूक लढवली, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, जसे तुम्ही पाहिले तसे आम्ही पाहिले आहे. जे काही निकाल आले त्याचा धक्का बसलेला नाही. मी निवडणूक आयोगाचे अभिनंदन करतो हा त्यांचा विजय आहे. मतदानाचा अधिकार काढून टाकल्यावर काय होत हे आज दिसले, असे ठाकरेंनी म्हटले आहे. तसेच नितीश कुमार यांची पंतप्रधान पदासाठी चर्चा सुरू होती. तेजस्वी यादव यांचा अजेंडा नोकऱ्या देणे हा होता. राहुल गांधी यांनी वोट चोरी दाखवली. वोट चोरी झाली होती. लवकरच आम्ही सगळे मुद्दे बाहेर काढू अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा साधला. आम्ही निवडणूक आयोगावर आरोप करतो आणि देवेंद्र फडणवीस आम्हाला उत्तर देतात, असा टोला त्यांनी लगावला. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत त्यांनी ‘चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही’ असे स्पष्ट केले. तसेच, राज्यात ‘व्होट चोरी’ झाली असून, ती चोरी पकडण्याचे काम सुरू आहे. याची प्रारूप यादी अजूनही आलेली नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ठाकरे यांच्या मते, त्यांचा धसका घेऊन निवडणूक आयोग काम करत आहे.

बिहारमध्ये गेलेले भाजप नेते आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची वाट पाहतील, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. त्यांनी आरोप केला की, भाजपचे कार्यकर्ते मतदानात सक्रिय आहेत. महिला मतदारांविषयी बोलताना ते म्हणाले की, महिलांचे मत मिळवण्यासाठी त्यांचा विश्वास संपादन करणे आवश्यक आहे, केवळ टॅक्सपेयरचा पैसा वळवून किंवा ₹1,500 देऊन महिला मतदान करत नाहीत. अशा प्रकारे, त्यांनी मतांसाठी ‘टॅक्स पेयर’च्या पैशाचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला आणि महिलांच्या राजकीय जाणिवांबद्दल भाष्य केले.