चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन करत डॉ. नीलम गोऱ्हे यांचा इतिहास, महिलासक्षमीकरण व शासन निर्णयांवर भर
विधान परिषदेचे सभापती मा. राम शिंदे यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट
चौंडी, दि.१५ मे २०२५ : विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम ताई गोऱ्हे यांनी दिनांक १५ मे रोजी सकाळी ११:३० वाजता चौंडी (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले.
या प्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “चौंडी येथील हे भव्य स्मारक ग्रामस्थ व शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून उभारण्यात आले असून, अहिल्याबाईंचं संपूर्ण आयुष्य न्याय, सामाजिक समता आणि महिलांच्या हक्कासाठी झगडण्यात गेलं. त्या केवळ राणी नव्हत्या, तर रयतेच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या एक आदर्श नेत्या होत्या.”
त्यांनी पुढे सांगितले की, “इथे नुकतीच झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. महिलांसाठी ‘आदिशक्ती योजना’ जाहीर करण्यात आली असली तरी एकल महिलांच्या संदर्भात सर्वेक्षणाची गरज आहे.”
“त्रिशताब्दी वर्षानिमित्त पुढील कार्यक्रमही होत राहणार आहेत. ग्रामस्थ, सरपंच व अधिकाऱ्यांनी इथली व्यवस्था अतिशय चांगली ठेवली असून उर्वरित काम लवकर पूर्ण व्हावीत यासाठी माझं पूर्ण सहकार्य राहील,” असेही त्यांनी नमूद केले.
या दौऱ्यादरम्यान, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेचे सभापती मा. राम शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या मातोश्री आणि पत्नीची सदिच्छा भेट घेऊन स्नेह संवाद साधला.
या भेटीदरम्यान स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, शिवसेना पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.