दहावी-बारावीनंतर करिअर निवडताना आत्मविश्वास, कौशल्यविकास आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक : आमदार डॉ. नीलम गोऱ्हे

Date:

धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी नियमित अभ्यासवर्ग, चर्चा सत्रे, समुपदेशन शिबिरे आणि रोजगाराभिमुख मार्गदर्शन उपक्रम राबविणार

पुणे.दि.१: शिवसेना पुणे शहर व धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष यांच्या वतीने शिवसेना भवन येथे इयत्ता दहावी व बारावीनंतरच्या करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांनी केवळ गुणांवर किंवा पारंपरिक करिअर पर्यायांवर अवलंबून न राहता बदलत्या काळानुसार कौशल्यविकास, संवादकौशल्य, तांत्रिक ज्ञान आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करण्याची गरज असल्याचे सांगितले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, सध्या स्पर्धात्मक वातावरणामुळे विद्यार्थी आणि पालक या दोघांवरही मोठा मानसिक ताण निर्माण होत आहे. दहावी-बारावी, नीट, जेईई, एमपीएससी, यूपीएससी यांसारख्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आणि निराशा वाढताना दिसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य वेळी समुपदेशन, मार्गदर्शन आणि संवादाची संधी उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी अपयशाला घाबरून न जाता त्यातून शिकत पुढे जाण्याची वृत्ती विकसित करावी, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

आजच्या काळात रोजगाराच्या संधी केवळ पारंपरिक क्षेत्रांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. सेवा क्षेत्र, तंत्रज्ञान, सौर ऊर्जा, आरोग्यसेवा, डिजिटल सेवा, परदेशी भाषा आणि कौशल्याधारित व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी, क्षमता आणि कौशल्ये ओळखून करिअरची दिशा निश्चित करावी, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.

संवादकौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचे महत्त्व अधोरेखित करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, अनेकदा विद्यार्थ्यांकडे ज्ञान असते; मात्र ते प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य नसते. मुलाखतीत आत्मविश्वास, सकारात्मकता आणि प्रभावी संवाद या बाबी तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचन, चर्चासत्रे, वक्तृत्व आणि संवाद यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा.

विद्यार्थ्यांसाठी नियमित अभ्यासवर्ग, चर्चा सत्रे, समुपदेशन शिबिरे आणि रोजगाराभिमुख मार्गदर्शन उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन देण्याचा मानस व्यक्त केला. युवकांच्या मनातील प्रश्न समजून घेऊन त्यांना योग्य दिशा देण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

यावेळी विजय कचरे यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले, तर अनिल गुंजाळ यांनी व्यवस्थापन विषयावर विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमास अनिल गडकरी, वैभव वाघ, संदीप शिंदे, प्रकाश ढमढेरे, सुधीर जोशी, सुदर्शना त्रिगुणाईत यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एकपात्री महोत्सवाला सुरुवात

पुणे : एकपात्री या कलाप्रकाराला आजच्या काळात भरपूर वाव...

मुठा नदीवरील धोकादायक पूल कायमस्वरूपी बंद; वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश

पुणे, दि. 1 : हवेली तालुक्यातील कातवडी–कॉदूर–निळकंठेश्वर मार्गावरील (ग्रामा-४५...