नागपूर – महाराष्ट्रामध्ये 700 पेक्षा जास्त तर देशभरात 1100 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सुनील घनवट यांनी दिली आहे. या निर्णयामुळे भाविकांनी मंदिरात येताना पारंपरिक वेशभूषा करावी, असा नियम करण्यात आला आहे. येत्या काळात राज्यात आणखी १५० मंदिरात वस्त्र संहीता लागू केली जाईल, असे घनवट यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि इतर मंदिरांनी भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू केली आहे. त्यानुसार, पुरुषांनी पूर्ण कपडे आणि महिलांनी साडी किंवा चुडीदार अशा पारंपरिक वेशभूषेचा वापर करावा, असे म्हटले आहे. कोल्हापूर येथील अंबाबाई महालक्ष्मी आणि जोतिबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय परंपरेला शोभेल अशा पद्धतीची वस्त्रे धारण करावीत, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केले आहे.
जेजुरीच्या खंडोबा मंदिरात देखील वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 50 मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे, अशी माहिती घनवट यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू झाली पाहिजे, मंदिराचे पावित्र्य जपले गेले पाहिजे. मंदिरात अंगप्रदर्शन होणार नाही, असभ्य, अशोभनीय व तोकडे कपडे घालून प्रवेश करू नये यासाठी नियम लागू करण्यात आला आहे. यापुढेही आमचे प्रयत्न सुरूच राहिल असे घनवट यांनी सांगितले. राज्य सरकारची देखील सरकारी कार्यालयांसाठी वस्त्र संहिता आहे. मग मंदिरासाठी का नको? असा सवाल देखील घनवट यांनी केला आहे.
देशभरातील अनेक मोठ्या मंदिरांमध्ये आधीच वस्त्र संहिता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व मंदिरात ती लागू व्हावी अशी आमची भूमिका आहे. मंदिरात अशोभनीय, तोकडे कपडे घालून आले तर त्याला परत पाठवण्याऐवजी मंदिराच्या प्रवेशद्वारावर शाल, ओढणी, धोतर असे कपडे देण्यात येणार आहे. भाविकाला ते वापरून पांघरून मंदिरात जाता येणार आहे. ड्रेसकोडबाबत मंदिराने कडक नियम घालून दिले आहेत. केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठी देखील हे नियम आहेत.