पुणे : शहराच्या आरोग्य क्षेत्रातील ‘लाईफ लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मादाय (आयपीएफ) योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी आणि ही योजना सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचावी, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी (गुरुवारी) आयपीएफ संबंधात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सांगितले .
“महाराष्ट्र राज्यातील धर्मादाय रुग्णालय चौकशी समिती सदस्य” या नात्याने योजनेच्या कार्यवाहीसाठी जबाबदार शासकीय अधिकारी आणि धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सुसज्ज आणि दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवताना येणाऱ्या समस्या व अडचणींवर चर्चा झाली, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
या बैठकीस प्रमुख धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यात सध्या सुमारे ६० रुग्णालये आयपीएफ योजनेअंतर्गत कार्यरत आहेत. या योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल (निर्धन) रुग्णांना दिला जातो, अशा रुग्णांच्या तक्रारी आणि रुग्णालयांना भेडसावणाऱ्या समस्या यामध्ये समन्वय साधून योजना प्रभावीपणे कशी राबवता येईल, यावर सखोल विचारविनिमय झाल्याचे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी नगर मतदारसंघातील वैद्यकीय गरजांचा विचार करता, काही धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता भासते. येत्या काळात, योजनेअंतर्गत समाविष्ट सर्व रुग्णालयांमध्ये अधिक सक्षम समन्वय साधण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन, असा निर्धार आमदार शिरोळे यांनी व्यक्त केला.
बैठकीला धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी, धर्मादाय कार्यालयातील न्यास निरीक्षक, समन्वयक, तसेच जिल्हा प्रशासनातील सुहास मापारी (अप्पर जिल्हाधिकारी), सुयोग दिवसे (नायब तहसीलदार, सर्वसाधारण शाखा), डॉ.मानसिंगजी साबळे (अध्यक्ष – मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे) तसेच आनंद छाजेड आणि प्रकाश सोळंकी उपस्थित होते.